जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, April 12, 2009

पॅसिव्ह अग्रेसिव्ह


कॉलेजमध्ये खूप मस्त ग्रुप होता माझा. हसणे, खिदळणे,दंगा, कुणाला तरी दररोज पिळणे, नुसती धमाल चाले. ग्रुपमध्ये तिघांचे गुफ्तगू चालू होते . काही जण रोज कुणाच्या तरी प्रेमात पडायचे, आठवड्यात दाढी वाढवून घ्यायचे. आम्हाला इतकी सवय झाली होती की पुढेपुढे तर पंधरा दिवस कुणी देवदास नाही झाले तर फारच चुकल्यासारखे होई. ह्या आमच्या बिनधास्त ग्रुपमध्ये एक पात्र होते. आम्ही सगळे ती नसली की जाम टर उडवायचो, हसायचो. एकवेळ अशी आली की आम्ही सगळे ठार वेडे, हिच्या स्लो पॉयझनिंग चे शिकार झालो.

ही मैत्रीण म्हणजे ग्रुपमध्ये आहे एवढेच. स्वतःचे कुठलेही मत नाही. काहीही विचारले तर सगळ्याला हो म्हणणार. आग्रही धोरण नाही की कशाची आवड नाही. जे तुम्हाला चालेल ते मला चालेल. काही हेल्प हवी आहे असे कुणी विचारले, " नाही, नको. मी करीन मॅनेज. " ही उत्तरे ठरलेली. दिसायला बरी होती. आमच्यामध्ये होतीही आणि नव्हतीही.

हा प्रकार जोवर असा होता तोवर सगळे ठीक होते. हळूहळू आम्हा मैत्रिणींच्या लक्षात येऊ लागले काहीतरी गडबडआहे. पण काय ते कळत नव्हते. ग्रुपमध्ये एक पोरगा होता. डॅशिंग, हँडसम. सगळ्या पोरी त्याच्या प्रेमात, पण हा पठ्ठ्या अजूनतरी कुणालाही मनात शिरू देत नव्हता. हिच्याशी जवळजवळ बोलणे नाहीच. हिच्या मनात कायचालले आहे ते देवालाही शोधायला कष्ट घ्यावे लागले असते तिथे आम्हाला कळणे शक्य नव्हतेच. तशी इच्छाही नव्हती.

कॉलेज डे चा दिवस म्हणजे काय वाट्टेल ते. संध्याकाळी सगळे जमले. पोरी मस्त नटलेल्या, पोरही नेहमीचा अवतार टाकून जरा माणसात आली होती. सगळे प्रोग्रॅम संपले, मग कट्ट्यावर आमची धमाल सुरू झाली. होता होता दोन वाजले. कटायला सुरवात झाली. पोरींना नीट सोडा रे वगैरे चालू असताना हिला कुणीतरी विचारले तू कशी जाणार आहेस? " मी जाईन, आय विल मॅनेज. " "यू शुअर? बरेच वाजलेत. बघ हं, नाहीतर येईल कुणीतरी सोबत. " " नाही, नको. मी नक्की जाईन. बस मिळेल नाहीतर टॅक्सी घेऊन जाईन. नक्की जाईन. " हे सगळे त्याच्याकडे पाहत बोलत होती. त्याने हिच्याकडे पाहताच एकदम भोळाभाबडा चेहरा करून तोंडातल्या तोंडात पुटपुटत राहिली.

अचानक हा उठला, म्हणाला, " नको. फार उशीर झालाय, मी सोडतो. " हे एकताच पटकन उठली, " पण तुला कशाला त्रास, मी जाईन. " हे म्हणत त्याच्या बाइकपाशी पोचली अन बसली सुद्धा. ती बसली आहे पाहिल्यावर त्याला तिला घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हताच. दोघ गेली आणि बाकीचा ग्रुप हक्काबक्का. त्यादिवशी पहिल्यांदा हिच्या पासून सांभाळून राहायला हवे असे वाटले. असेच काही दिवस गेले. ग्रुप दोन दिवसांच्या ट्रीपला जायला निघाला. ही होतीच. प्रवासात सीटवर एकटीच बसली. रूमसाठी मारामारी नाही की खाण्यापिण्यात प्रेफरन्स नाही. पण हे सगळे इतरांना जाणवेल ह्याची पर्फेक्ट खबरदारी. अर्थात हे सगळे आम्हाला नंतर कळले.

रात्री कोण काय खाणार ही चर्चा चालू होती. त्याने हिला विचारले, त्यावर मला काहीही चालेल. त्याने परत विचारले, " अग सांग ना काय आणू? " " तुला आवडेल ते आण, असे उत्तर ही देईल तर सोपे होते, पण उत्तर आले, "खरचं भूक नाहीये रे. " खांदे उडवून तो वळला मात्र, " आता तू एवढे विचारतो आहेस, तर व्हेज बिर्याणी आणि फालुदा खाईन. " तो एकदम सरप्राइज आणि आम्ही भडकलेले. बरं आणतो म्हणून निघाला, तर बाईसाहेबांचे शब्द आले, " अरे प्लीज जरा ज्यूसही आणशील ना? " हो म्हणत तो गेला, सगळे घेऊन आला. हिच्याबरोबरच जेवला. अगदी तब्येतीत जेवल्या बाईसाहेब.

पाहता पाहता आमच्या ग्रुपचा हिरो धारातीर्थी पडला आणि आम्ही सगळेही हिच्या पॅसिव्ह अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजीचे शिकार झालो होतो. हे असे लोक आपल्या अवतींभोवती असतात. बऱ्याचदा आपण आपल्याच नादात असतो त्यामुळे लक्षात यायला वेळ लागतो. हे लोक त्यांना हवे ते नको नको म्हणत बरोबर मिळवतात. अशांचे नवरा/ बायको/ नातेवाईक/मित्रमैत्रिणी, काहीही चालते ह्या त्यांच्या खोटारडेपणाला भुलून आयुष्यभर त्यांना हवे तेच करतात. स्ट्रेट फॉरवर्ड, अग्रेसिव्ह लोक इतरांना आगाऊ वाटतात. खरे तर ते परवडले, मनात एक बाहेर एक असा प्रकार नसतो. पण हे स्लो पॉयझन...

2 comments:

  1. खतरनाक !! काय स्ट्रॅटेजी आहे. आपणही कधी तरी अवलंबायला हवी. अशी लोकं खूप धूर्त असतात.आमच्यात होता एक असाच धूर्त. असाच मी साधा साधा दाखवायचा.सुदैवाने त्याच्या हाती कोणी लागली नाही.

    ReplyDelete
  2. आभार साधक. हो ना, गंमत म्हणजे अशा लोकांना ही कला इतकी छान साधलेली असते.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !