जाता जाता एक नजर इथेही........

Monday, June 27, 2011

फणसाची भाजी

साकट्या फणसाची भाजी



वाढणी : आवडीनुसार व उपलब्धतेवर अवलंबून


साहीत्य:

साकट्या फणसाच्या फोडी किंवा मोठे तुकडे घ्यावेत.

फणसाच्या जोडीला घालण्यासाठी ओले वाल किंवा ओला मटार घालावा. ( साकट्याच्या फोडी चार वाट्या भरल्या तर एक वाटी किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्त वाल/मटार घ्यावेत. या दाण्यांमुळे चवीत भर पडते आणि मुख्य म्हणजे भाजी वाढते!! काहीही भर नाही घातली तरी चालते.),

फोडणीसाठी:

भरपूर गोडे तेल (नेहमीच्या भाज्यांपेक्षा ह्या भाजीला तेल जास्त लागते.) मोहरी, हिंग, हळद, सुक्या लाल मिरच्या.

भाजीसाठी:

थोडे लाल तिखट, मीठ, गूळ (हिला गूळ भरपूर लागतो. पण आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त घालावा. हिला कोणत्याही मसाल्याची गरज नसते पण पाहिजेच असेल तर आवडीप्रमाणे मसाला घालावा.)

कृती:

साकट्या फणसाच्या फोडी किंवा मोठे तुकडे कुकरमध्ये उकडून घ्यावे. वाल किंवा मटार असल्यास तेही उकडावे. उकडताना पाण्याचा हबका मारावा. साकट्याचे तुकडे मोठे असल्यास ठेचून घ्यावे. फोडीही थोड्या ठेचाव्या म्हणजे भाजी चांगली मिळून येते.

पातेल्यात/कढईत तेल घालून ते चांगले तापले की मोहरी-हिंग-हळद यांची फोडणी करावी. फणस आणि दाणे एकत्र करून फोडणीस टाकावे. थोडेसे पाणी घालून शिजू द्यावे. नंतर लाल तिखट, मीठ व गूळ घालून परत एक सणसणीत वाफ आणावी. आधीच फोडी उकडून घेतल्या असल्यामुळे भाजी पटकन शिजते.

वरून घालावयाची फोडणी :

लहान कढईत जरा जास्तच तेल घालून नेहमी करतो तशीच मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. (फोडणी जास्त झाली तरी ती ठेवता येते आणि दुसऱ्या कोणत्याही पदार्थावर घेता येते. फणसाच्या भाजीलाच संपली पाहिजे असे नाही.) त्यात सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालावे. किंचित काळसर रंग येऊ द्यावा. ही फोडणी अतिशय खमंग लागते. पानात भाजी घेतल्यावर आवडीप्रमाणे वरून फोडणी घालून घ्यावी.



साकट्या फणसाची भाजी


ही भाजी म्हणजे कोकणची खास देणगी आहे. कितीही केली तरी अपुरीच वाटणारी आहे. कारण सकाळी खाल्ली तरी पुन्हा रात्री किंवा दुपारीही नुसतीच वाटीत घेऊनही खावीशी वाटणारी आहे. फणसाच्या दिवसात कमीत कमी ४/५ वेळा तरी व्हायलाच हवी. तरच जीभ काहीशी तृप्त होते.

कोवळ्या फणसाची भाजी


साकट्या फणसाच्या भाजीप्रमाणेच भाजी करावी. लहानलहान कोवळे गरे आणि कोवळ्याच आठळा असल्याने थोडी वेगळी लागते. पण याचीही चव जिभेवर रेंगाळत राहणारीच आहे हे नक्की!!

कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी



वाढणी : आवडीनुसार व उपलब्धतेवर अवलंबून


साहित्य:

कच्च्या फणसाच्या आठळा काढलेल्या गऱ्यांचे १ इंच लांबीरुंदीचे तुकडे , ठेचलेले किंवा चिरलेले आठळांचे बारीक (शेंगदाण्याच्या आकाराचे) तुकडे, (या भाजीत भरीला काही घालत नाहीत.)

फोडणीसाठी:

भरपूर गोडे तेल (नेहमीच्या भाज्यांपेक्षा ह्या भाजीला तेल जास्त लागते.) मोहरी, हिंग, हळद, चारपाच सुक्या लाल मिरच्या.

भाजीसाठी:

थोडे लाल तिखट, मीठ, गूळ (हिला गूळ भरपूर लागतो. पण आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त घालावा. हिलाही कोणत्याही मसाल्याची गरज नसते पण पाहिजेच असेल तर आवडीप्रमाणे मसाला घालावा.)

कृती:

ठेचलेले किंवा चिरलेले आठळांचे बारीक तुकडे कुकरमध्ये थोडेसे पाणी घालून उकडून घ्यावे. गऱ्यांचे तुकडे उकडायची गरज नाही कारण ते लवकर शिजतात. पातेल्यात/कढईत मोहरी-हिंग-हळद यांची फोडणी करून त्यावर फणसाच्या गऱ्यांचे तुकडे आणि उकडलेले आठळांचे तुकडे एकत्र करून फोडणीस टाकावे. त्यावर लाल तिखट व थोडेसे पाणी घालून शिजू द्यावे. आठळा उकडून घेतल्या असल्या तरी काही वेळा टणक राहतात. त्या नीट शिजल्या तर काजूंसारख्या चवदार लागतात. अर्थात जास्त शिजून त्यांचे पीठ होणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर मीठ व गूळ घालून मंद आचेवर परत चांगली वाफ आणावी. भाजी तयार झाली.

वरून घालावयाची फोडणी :

लहान कढईत जरा जास्तच तेल घालून फोडणी करावी. (फोडणी जास्त झाली तरी ती दुसऱ्या कोणत्याही पदार्थावर घेता येते. फणसाच्या भाजीलाच संपली पाहिजे असे नाही.) त्यात सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालावे. किंचित काळसर रंग येऊ द्यावा. फोडणी खमंग लागते. पानात भाजी घेतल्यावर आवडीप्रमाणे वरून फोडणी घालून घ्यावी.

गरे आपल्या मूळ रंगामुळे आणि हळदीमुळे पिवळेपिवळे, आठळा मधूनच पांढऱ्या, मधूनच लालसर आणि मिरच्यांचे तुकडे लालचुटुक खमंग तळलेले असल्यामुळे ही भाजी दिसतेही अगदी देखणी! आणि चवीबद्दल काय सांगणार? मऊ लुसलुशीत गरे आणि काजूगरासारखे खमंग-गोड आठळाचे तुकडे!! पहिल्या दोन्ही भाज्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसणारी आणि वेगळी लागणारी फणसाच्या गऱ्यांची भाजी. कधीच संपू नये असे वाटणारी!!

टीपा:

कुठल्याही फणसाची भाजी करताना फोडी, तुकडे, अठळा ठेचायला विसरू नये. त्यामुळे त्या लवकर शिजतात व भाजी मिळूनही येते.

ही भाजी वर्षातून अगदीच एखाद दोनदाच होत असल्याने वरून घालावयाची फोडणी करताना तेल जरा तब्येतीतच घालावे. कमी तेल घालून फोडणी केल्यास ती तितकीशी चमचमीत लागत नाही.

ओला मटार/ वाल घालताना त्यांची चव पुढे येणार नाही इतपतच घालावेत. नाहीतर धड ना फणसाची चव धड ना वालाची चव.

या भाजीला कुठलाही मसाला शक्यतो घालूच नये. त्याने फणसाची मूळ चव मारली जाऊ शकते.

Thursday, June 23, 2011

फणस...

मायदेशी येणेजाणे हे नेहमीच हवेहवेसे असले तरी वर्षातील सगळ्याच ऋतूंची मजा लुटता येत नाही. म्हणजे ज्याला सहजी व पुन्हा पुन्हा जाणे शक्य आहे त्यांची बातच निराळी. पण सामन्यत: कुठलातरी एकच सीझन गाठू शकतो. आणि मग त्या अनुषंगाने येणारे सणवार व खादाडी. धमाल करता येते. इथे आपल्याकडचे आंबे, खास करून हापूस आणता येत नसल्याने मायदेशी जायचेच तर निदान या फळांच्या राजाला मनसोक्त खाता येईल तेव्हां तरी जावे. शिवाय शाळांना सुट्ट्याही त्याच दरम्यान असतात.

होळी संपल्यावर हळूहळू आंबे, फणस, काजूची बोंडे-ओले काजूगर, रातांबे, जांभळे, करवंद यांची चाहूल लागू लागते. आंबे तरी एकवेळ सगळीकडे मिळतील. मग भले ते मेक्सिकन असू देत नाहीतर अजून कुठल्या काशीतले. आता हापूसच्या मधुर चवीची, राजस रूपाची, तुकतुकीत सोनेरी अंगावर चढलेल्या केशरलालीची, नुसत्या गंधाने नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेचे पारणे फेडणार्‍या वासाची आठवणही मनात येऊ न देता, मिळतोय ना आंबा इथे, मग कुठला का असेना घ्या खाऊन, असे म्हणत दुधाची तहान पाण्यावर भागवता येण्याचा प्रयत्न तरी करता येतो. पण या राजसासोबत येणार्‍या अष्टमंडळाचा आस्वाद मात्र मिळत नाही. त्यातल्यात्यात फणसाचे तर नामोनिशाण नसते. हा आता टीन मधला फणस मिळतो म्हणा. पण त्याला कुठली असायला आपल्या दारच्या खासंखास फणसाची चव. चहुबाजूने फुटून लेकुरवाळ्या झालेल्या फणसाच्या झाडांभोवती घुटमळत, कुठे इटुकलेपिटुकले तर कुठे मोठे होऊ घातलेले आणि चांगले फोफावलेले फणस हेरत, त्यांच्या वरून खडबडीत भासणार्‍या अंगावरून प्रेमाने हात फिरवत फिरवत अंदाज घ्यायचा. कुठला भाजीचा, कुठला जरासा जून असला तरी अजूनही भाजीसाठी धावेल. फणस पिकू लागला की भाजीसाठी घेऊच नये. एकतर त्याचा वासही गोडसर होऊ लागलेला असतो आणि निबरही.

'कापा आणि बरका ' हे फणसाचे प्रकार. दोन्हीही मस्तच लागतात. दोघांची स्वत:ची खासियत आहे.' कापा ' कसा अगदी सुटसुटीत-खुटखुटीत-करकरीत. पाण्यात राहूनही कोरडा असल्यागत अचळ काढता येतो. अगदी न धुता तोंडात सोडला तरी फारसा चीक लागत नाही. ' बरका ' मात्र धमाल बुळबुळीत अन सुळसुळीत. जिकडून तिकडून तारा येत असतात, हातातून गरे सटकत राहतात, पाण्यात लगोलग टाकला तरीही चीक चिवटपणा सोडत नाही. पण चवीला काय लागतो महाराजा! काप्यालाही मागे टाकेल. दोघांचेही गरे पिवळसर सोनेरी. त्यावरील तकाकी पाहत राहावी. नुसता एकच एक फणस खाण्यात मजा नाही. या जोडगोळीचा आस्वाद जोडीनेच घ्यायला हवा. अगं, याचा गरा अजूनही तितकाच मधुर व करकरीत असतो बरं. आणि हा बरका असला ना तरी इतकी गोडी आहे ना त्याला. की कापतानाचा त्रास पुरेपूर भरून निघतो बघ. सासूबाई सांगत होत्या.



आमच्या शेतात प्रचंड आंबा, काजू, नारळ, फणस, रातांबे, बांधावर जिकडे तिकडे लावलेली करवंदाची जाळी, चिकू, पेरू... हळद, सूर्यफुले, केळी... नुसती धमाल आहे. यंदा मार्च-एप्रिल मध्ये येणे झाल्याने खूपच चंगळ झाली. वल्डकप जिंकून आम्ही शेताकडे प्रस्थान केले. चार दिवस कानात हवा भरलेल्या वासरासारखे नुसते हुंदडलो. शेतातूनच बावनदी जात असल्याने आंबा, काजू, नारळीच्या बागेतून, शेवरीखालून हुंदडून नदीच्या थंडगार पाण्यात झोकून दिले. स्वत:ला तिच्या स्वाधीन करून टाकल्यावर, " किती दिवसांनी आलात गं " असे म्हणत बाहु पसरून तिने आम्हाला अलगद मिठीत घेतले. पाहता पाहता तिच्या मायेच्या उबदार स्पर्शाने आम्ही अंर्तबाह्य पुलकित झालो. किती वेळ डुंबलो तरीही निघावेसेच वाटेना. शेवटी हाकारे आले, " बाजरीची भाकरी, झुणका, ओल्या खोबर्‍याची खास पाट्यावर वाटलेली लसणीची चटणी तयार आहे. चला पटापट. " डोंगर चढून, नदीच्या मायेत आकंठ डुंबून मन भरले असले तरी पोटात होमकुंड पेटले होते. त्यात हा खासा मेन्यू ऐकून क्षणात सगळे घराकडे पळत सुटलो. चुलीवरून पानात पडणार्‍या भाकरीचा खरपूस वास, लसणाची लुसलुशीत आणि झणझणीत चटणी... अहाहा... तडस लागेस्तोवर जेवलो. हातावर पाणी पडताच ज्याने त्याने सोयीस्कर जागा पकडून दिली ताणून.

आमचे घर

नारळ





यावर्षी दोनदा मोहोर आला पण दोन्ही वेळा गळून गेला
थोड्याश्या कैर्या लागलेल्या...


काजू

संध्याकाळी सूर्य अस्ताला जाऊ लागला तशी विलक्षण शांतता पसरली. दूरवर घरी परतणाऱ्या गायींच्या गळ्यातील घंटांचा किणकीण नाद या निरवतेला भेदत होता. नारळीच्या झाडांवर उतरत गेलेले निवलेल्या सूर्याचे किरण, चहूकडे पसरलेला संधिप्रकाश, रातकिड्यांची किरकिर, मधूनच येणारा बेडकांचा डरावं डरावं, अचानक टिवटिवत गेलेली एखादी चुकार टिटवी. अंगणात घराच्या पायऱ्यांवर बसून मूकपणे त्या वातावरणात विरून गेले.



किर्र अंधार पडला आणि भानावर आले. अंगण दुधाने उजळून निघालेले. नजर आसमंतावर गेली आणि तिथेच खिळली. काळ्याभोर आभाळात लाखो करोडो चांदण्यांचा अक्षरशः खच पडला होता. कित्येक वर्षात इतके विलोभनीय दृश्य पाहिले नव्हते. डोळ्यांचे पारणे फिटले. पळत गच्चीवर जाऊन त्या अथांग पसरलेल्या दूरस्थ विश्वाच्या भव्यतेत मनातल्या सगळ्या भावांना डोहाच्या तळाशी ढकलून स्वतःला संपूर्णपणे विलीन करून टाकले. तादात्म्य पावणे म्हणतात ते बहुदा हेच असावे.



दुसर्‍या दिवशी अगदी निवडून निवडून कच्चे फणस उतरवले, निगुतीने मन लावून त्याची भाजी केली. पंचेंद्रिये एकवटून अगदी टल्ली होऊन ती अग्रास खाल्ली. तरीही मनाची तृप्ती होईना म्हणून चार फणस घेऊन मुंबई गाठली. त्यांचीही भाजी करून पुढल्या दोन तीन वर्षांच्या समाधानाची बेगमी करून घेतली. निघता निघता १०० रुपयाला एक या भावाने का होईना चक्क हापुसाचीही चव चाखता आली. चला पावसाची मनोहरी रुपे नाही पण कोकणचा मेवा तर पदरी पडला.

यावेळची मायदेशवारी काही अंशी सार्थकी लागल्याचे समाधान घेऊन भरारी घेतली. इथे आले, येऊन जुनी झाले पण फणसाच्या भाजीची जिभेवर रेंगाळणारी चव काही कमी होईना. तशी अगदी येताजाता होणारी भाजी नसली तरी बहुतेकांच्या घरी निदान एकदातरी होतेच. केळफुलासारखेच फणसाचेही बाळंतपण बरेच करावे लागते खरे पण श्रमाचा पुरेपूर मोबदला मिळतोच मिळतो. आपल्याकडे सर्वसाधारणपणे बाजारात मिळणारा भाजीचा फणस काहीसा गरे होऊ लागलेलाच असतो. परंतु निरनिराळ्या रूपातल्या फणसाची भाजी करता येते व त्याची चवही त्यानुसार बदलते. बरीच वर्षे शेतावर जाऊन जाऊन, सासूबाईंकडून फणस व त्याची भाजी याविषयी बरीच माहिती गोळा केली. तुम्हालाही कदाचित माहीत असेल....


यात तिन्ही फणस अगदी नीट कळून येत आहेत


फणसाची भाजी

फणसाची भाजी करण्यासाठी सगळे ' कच्चे फणस ' उपयोगी पडतात. पण वेगवेगळ्या अवस्थेतील फणसाची भाजी वेगवेगळी होते आणि सर्व प्रकारच्या भाज्या चांगल्याच लागतात. अगदी कोवळा, मध्यम कोवळा आणि गरे झालेला. सर्वसाधारणपणे अशी विभागणी होऊ शकते. या तिन्ही भाज्यांची चव, स्वाद वेगवेगळा येतो पण प्रत्येक प्रकारची भाजी उत्तमच होते.

१. साकटा फणस म्हणजे अगदी कोवळा फणस. त्याच्यात अजिबात गरे झालेले नसतात. अशा फणसाची भाजी उत्कृष्ट होते. बाहेरून साकटा कसा ओळखायचा? ज्या फणसाचे काटे बारीक आणि अगदी जवळजवळ असतात तो बहुतेक साकटा निघतो. फणस विकणारेच फणसाचे काटे काढून त्याचे मोठेमोठे तुकडे करून देतात. त्याची पावही (म्हणजे मधला दांडा) कोवळी असते. तीही काढून टाकावी लागत नाही. जरासे काटे रुंदावले तरीही तो कोवळाच असतो. पण त्याची पाव जर जून झाली असेल तर ती काढावी लागते कारण ती शिजत नाही. भाजीवाल्याला ते समजते. तो पाव काढून टाकतो. ह्या फणसालाही साकटाच म्हणतात. फणस कापण्याचे प्राथमिक काम भाजीवाल्याने करून नाही दिले तर आपल्याला करावे लागते.


वर्तमानपत्राचा मोठा कागद पसरावा. त्याच्यावर विळी ठेवावी. सुरीने कापायचा असेल तर लाकडाचा किंवा प्लॅस्टिकचा तुकडा घ्यावा. एका रुंद भांड्यात पाणी घ्यावे. विळीच्या किंवा सुरीच्या पात्याला तेल (गोडे) लावावे. पाण्यात २/३ चमचे तेल घालावे. आपल्या हातांनाही तेल लावावे. प्रथम काटे काढून नंतर जरूर असल्यास पाव काढावी. १/२ इंच लांबीरूंदीचे तुकडे चिरून घ्यावे. ते पाण्यात टाकले की पाण्यात तेल असल्यामुळे फणसाचा चीक निघून जातो.

२. फणसात गरे व्हायला सुरुवात झाली तरीही तो सुरुवातीला कोवळा फणसच असतो. गऱ्यांच्या बाजूला बारीकबारीक पात्यांचे आवरण असते. ह्या पात्यांना सांगूळ म्हणतात. सांगळं कोवळी असेपर्यंत ह्या फणसाचीही साकट्यासारखीच भाजी करता येते. अर्थात त्याची पाव काढावी लागते. अगदी कोवळ्या साकट्यापेक्षा ही भाजी थोडी वेगळी लागते पण छानच लागते. आपण चिरायची असल्यास वर सांगितल्या प्रमाणेच चिरावी.

३. गरे झालेल्या फणसाची भाजी म्हणजे खरे तर ती गऱ्यांचीच भाजी असते. प्रथम फणसाचे गरे काढावे लागतात. भाजीवाल्याने काढून दिले तर उत्तमच. नाहीतर फणसाचे मोठे तुकडे करून त्यातील सांगळं बाजूला करण्यासाठी बोटांना तेल लावून मधला गरा काढायचा असतो. गरे काढल्यावर त्यांतील बिया म्हणजेच आठळा काढायच्या. त्यावर एक पापुद्र्यासारखे आवरण असते तेही काढून टाकावे लागते. थोडेसे किचकट काम आहे पण भाजीची चव आठवावी म्हणजे किचकट वाटणार नाही. गऱ्यांचे लहानलहान १ इंच लांबीरुंदीचे तुकडे करायचे. आठळाही ठेचून बारीक तुकडे करून घ्यायचे.

ह्या ३ प्रकारच्या फणसांच्या भाज्या करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. त्यांची कृती टाकतेच लगोलग.

Tuesday, June 21, 2011

तडजोड की अव्याहत चालणारी अपरिहार्यता...

आमच्या वसाहतीचे एक छोटेसे जीम व तरणतलाव आहे. गेले काही दिवस मी नित्यनेमाने जीम मध्ये जाते आहे. जीम व तलाव वसाहतीच्या मानाने फारच पिल्लू आहेत. पण आहेत हेही नसे थोडके या धरतीवर उपयोग करून घेण्याचा माझ्यासारखाच प्रयत्न इतरही करत असतात. सुरवातीला तरणतलावावर सकाळी व संध्याकाळी बराच गजबजाट असायचा. सकाळी भरणा असे तो बायकांचा. अगदी लहान पोरींपासून ते आज्यांपर्यंत. बराचश्या तेराचौदा ते वीसबावीशीतल्या पोरी स्वीमसूटमध्ये सनबाथ घेत पहुडलेल्या. तलाव रिकामाच. अगदी बापुडवाणा दिसायचा. एक डुबकी तरी कोणी मारेल पण नाही. अक्षरशः एक तरंगही उठत नसे. संपूर्णपणे पाण्याने भरलेला असूनही कायम तहानलेला भासायचा. आशेने कधी तारुण्याच्या उंबरठ्यावरील पोरींकडे पाही तर कधी आज्यांचे अखंड संवाद निमूट ऐकत राही. मात्र संध्याकाळी तलाव आनंदाने ओसंडून वाहत असे. धडाधड उड्या घेत डुंबणारी लहान मुले, त्यांची किंचाळाकिंचाळी, बारबेक्यू करणारे निरनिराळ्या वयोगटातील पुरुष, त्यांच्या मोठ्यामोठ्याने चाललेल्या निरनिराळ्या विषयांवरील गप्पा. मधूनच तलावात बुडी मारून पुन्हा बारबेक्युशी झटापट करण्यातली त्यांची लगबग. क्वचित गॅलऱ्यांमध्ये उभे राहून कॉफीचा घोट घेत घेत या सगळ्यांचा आस्वाद घेणारी मंडळी. तलावाची खुशी झलकत असे.

रोज ठराविक वेळी गेल्याने हळूहळू चेहरे ओळखीचे होऊ लागलेले. " हाय! हाव आर या? टेक इट ईझी मॅन... स्टे कूल." सारख्या संवादांची देवाणघेवाण होऊ लागलेली. एक दिवस गेले नाही तर लगेच येऊन दोघीतिघी विचारून गेल्या, " काय गं बरी आहेस ना? काल दिसली नाहीस? " हो. हो मी बरी आहे. काल जरा कामात होते नं म्हणून नाही आले. असे सांगून मी जीममध्ये आले. त्यांची ती विचारपूस मनाला आनंद देऊन गेली. मन एकदम गणेशवाडीत जाऊन पोहोचले. सकाळी ८.१५ ला घर सोडल्यावर कोण कुठल्या वळणावर भेटेल याचे गणित पक्के होऊन गेलेले होते. ज्या दिवशी कोणीच भेटणार नाही त्यादिवशी अक्षम्य उशीर झालेला असे. कुठली गाडी नक्की मिळेल याचेही गणित या साऱ्यांच्या टप्प्यातच गुंफलेले असायचे. पण ही नोंद बरेचदा मुकीच असायची. नजरानजर, हात उंचावून नोंद घेतल्याची पावती देणे, क्वचित दोन शब्द. पण जो तो स्वतःच्या नादात व घाईत असल्याने वर्षोनवर्षे रोज पाहिलेल्या कित्येकांची नावेही मला कधीच कळली नाहीत. कधी कधी ओळीने पंधरा दिवस एखादी गायब असायची. अचानक एक दिवस उत्फुल्ल चेहरा घेऊन समोर यायची. तिला पाहताच नकळत भुवया उंचावल्या जात. डोळे लकाकत. आपसूक हात, " काय गं? कशी आहेस? " विचारून जाई. तिही तितक्याच सहजपणे, " छान आहे सारे. " असे सांगून पुढे सरके. बरेच दिवसांनी कोटा पूर्ण झाल्यासारखा वाटे.

सातत्याने अनेक चेहरे पाहून पाहून ते आपल्या व आपण त्यांच्या ओळखीचे होऊन जातो. मग अवचित ते चेहरे अचानक नव्याच जागेवर दिसले तरी ओळख पटून जाते. असे असूनही मुद्दामहून कोणीही संभाषणाचा धागा छेडत नाही. खरे तर अगदी सहज जी प्रतिक्रिया मनात उमटते, " अय्या! इथे कुठे? " किंवा " अरे, काय म्हणताय? " ती गळ्यातून बाहेर येत नाही. नजरेतून, चेहऱ्यावरील हावभाव हे सगळे आधीच व्यक्त करून गेलेले असतातच, म्हणूनही असेल कदाचित. किंवा, आपण ओळख दाखवलेली आवडेल का नाही? उगाच खेटायला येते/येतोय असे तर वाटणार नाही. रोज तर आपण एकमेकांसमोरून जातो येतो पण अजूनपर्यंत एकदातरी संवाद झालाय का? नाही ना, मग आता कसा करावा? अश्या अनेक शंकाकुशंका मनाला मागे खेचतात. म्हटले तर ओळखीचे म्हटले तर अनोळखी असे हे धागे.

आज सकाळी नेहमीप्रमाणे जीम गाठले. बहुतांशी सकाळी नऊ ते दहा/साडेदहा जणू ते फक्त माझ्याच मालकीचे असल्यासारखे असते. क्वचित दोन तीन आज्या उगाच पाच मिनिटे सायकल पळवून पसार होतात. कधीतरी एक मुलगा वेटस करतो. मधून मधून डोकावून पंधरा मिनिटात गायब होणारे दोघे तिघे आज धडपडून गेले होते. धावपट्ट्याला दोन मैल दमवले. तिसऱ्याची सुरवात केली आणि जीमचे दार जोरात ढकलल्याचा आवाज आला. मागे वळून पाहिले तर चांगली साडेसहा फुटापेक्षा जास्त उंची व सहजी तीनशे पाउंड वजन असेल असा एक पस्तिशीचा गोरा धाडकन जीम मध्ये घुसला. मी त्याच्याकडे पाहायला आणि त्यानेही माझ्याकडे पाहायला एकच गाठ झाल्याने त्याने ' हाय ' केले. प्रत्युत्तर म्हणून मीही हाय म्हणायला जात होते तोवर तो माझ्या ट्रेडमिलशी येऊन पोहोचला. मी ३.८ चा स्पीड पकडलेला असल्याने चटकन घशातून आवाज निघाला नव्हता. त्यात तो माझ्या इतका जवळ का आलाय, या विचाराने मी गोंधळून गेले. एकतर मी एकटीच होते जीममध्ये त्यात असे कोणाच्या स्पेसमध्ये ढवळाढवळ करायला कोणीच कधी येत नसल्याने थोडी अस्वस्थही झाले होते.

माझ्या ट्रेडमिल शेजारीच अजून एक ट्रेडमिल आहे. पण ते बरेच दिवस झाले बंद पडलेय. तो त्याच्यावर उभा राहिला आणि त्याने पुन्हा मला, " हाय ! " केले. मी नुसते एक स्मित केले आणि पुन्हा नजर ट्रेडमिलच्या स्क्रीनवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करत डोळ्याच्या कोपऱ्यातून तो काय करतोय त्याचा अंदाज घेत असतानाच, " अगं, मी आज फार फार चिडलोय. ही माझी गर्लफ्रेंड ना मला जगूच देत नाही. " हे बोलून तो वाकून माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागला. अर्थातच, मी यावर काहीतरी बोलावे या अपेक्षेनेच. एकतर मी त्याला आयुष्यात प्रथम पाहत होते. त्यात त्याचा स्वर अतिशय गंभीर होता. नाहीतर इथे बरेचदा थट्टेने आपापल्या जीएफ/ बॉयएफ बद्दल बोलणारे खूप जण सापडतात. पण त्यांना कुठल्याच संवादाची अपेक्षा नसते.

त्याचे वाकून अपेक्षेने पाहणे थांबेना म्हणून मी त्याला म्हटले, " अरे, असे प्रत्येकालाच वाटते. तीही हेच म्हणत असेल बघ. " मला मध्येच तोडत तो म्हणाला, " तुझ्या लग्नाला किती वर्षे झाली गं? तू इंडियन आहेस ना? माझे काही इंडियन मित्र आहेत. त्यांची लग्ने होऊन दहा दहा वर्षे झालीत पण अजूनही किती आनंदाने एकत्र राहतात. मला खरेच खूप हेवा वाटतो त्यांचा. माझेच बघ ना... माझा ' एक ' घटस्फोट झालाय. एक मुलगीही आहे. पाच वर्षांची आहे ती. खूप गोड आहे. पण आता ती तिच्या आईबरोबर असते. ती तिच्या आईच्या नव्या बॉयफ्रेंडबरोबर राहते. लहान असताना मीही अश्याच वातावरणातून गेलो असल्याने किती त्रास होतो अश्या विभक्तीचा हे एकदा नव्हे तीनदा अनुभवले आहे. मूल झाले तर त्याला माझ्यासारखे अखंड फरफट होणारे बालपण देणार नाही असे प्रॉमिस मी, " स्वतःला व त्या न झालेल्या बाळाला केले होते. " पण प्रत्यक्षात झाले अगदी तेच. माझ्या लेकीचा उदास चेहरा पाहिला की स्वतःचीच घृणा वाटते. का नाही मी तुम्हा इंडियन सारखी तडजोड करू शकलो? कित्येकदा माझ्या मित्रांना, त्यांच्या बायकांना चिडताना, भांडताना पाहिलेय. अगदी कड्याच्या टोकावर पोचलेलेही पाहिलेय पण असे असूनही ते आजही एकत्र आहेत. केवळ मुलांसाठी तडजोड करावीच लागली असे त्यांनी कितीही म्हटले तरीही कुठेतरी त्यांचे एकमेकांवरचे प्रेम अजूनही संपलेले नाही. मी माझ्या गर्लफ्रेंडला म्हणत होतो की तू तुझ्या मुलाला आण मी माझ्या लेकीला आणतो आणि आपण त्यांना एक सुरक्षित, सुंदर बालपण, तारुण्य देण्याचा प्रयत्न करूयात. आश्वासक, उबदार भीतीरहीत घर. जिथे ते कुठल्याही ताणाखाली वावरणार नाहीत. पण माझी जीएफ अजिबात तयार नाही. ती फक्त तिचाच स्वार्थ पाहण्यात दंग आहे. तिला ना तिच्या मुलाला आणायचे आहे ना माझ्या लेकीला आणू द्यायचे आहे. बिनधास्त, कुठल्याही जबाबदाऱ्यांशिवाय मुक्त जगायचे आहे. "

एका दमात सगळी मळमळ त्याने भडाभडा ओकून टाकली. त्याच्या या सगळ्या बोलण्यातून, मधून मधून शेव्ह केलेल्या डोक्यावर, कपाळावर तळवे घासण्यातून, त्याची असहायता, लेकीची आठवण, अपराधीपण, सारे सारे माझ्यापर्यंत पोचत होते. तो अजूनही बरेच काही बोलत होता. मैत्रीण आणि एक्स वाइफही कश्या स्वार्थी आहेत याची उदाहरणे देत होता. मला तर वाटतेय की मी मैत्रिणी बरोबर आता राहूच नये... या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला होता. अचानक त्याला जाणीव झाली की आपण बराच वेळ बोलतोय आणि ही तर आपल्या ओळखीचीही नाही. तरीही इतका वेळ शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल दहा वेळा माझे आभार मानून व मला आता खूप हलकं वाटतंय. फार फार गरज होती गं कोणीतरी ऐकून घेण्याची. तू किती चांगली आहेस. भेटू पुन्हा. तुझा दिवस शुभ जावो, असे म्हणून तो आला तसा निघून गेला. माझीही साडेतीन मैलाची तंगडतोड झालेली होतीच. मी ही घरी आले.

त्याच्या बोलण्याने माझे विचारचक्र धावू लागले होतेच. किती सहजपणे त्याने त्याच्या खाजगी गोष्टी माझ्याशी शेअर केल्या होत्या. हिने कधी कोणाला हे सांगितले तर... किंवा आपण एकाच सोसायटीत राहतो म्हणजे जीएफ सोबत कदाचित आपली पुन्हा भेट होऊ शकते. त्याला कुठलेच प्रश्न पडलेले नव्हते. त्याला थोडेसे सबुरीने घ्यावेस व कूल डाउन करण्याव्यतिरिक्त मी कुठलाही सल्ला त्याला दिला नव्हता की उगाच नाकही खुपसले नव्हते.

आपल्या समाजातील तडजोडी करण्याबद्दल, सहनशीलतेवर त्याने बरेच भाष्य केले होते. त्याला दिसलेले, जाणवलेले चित्र चांगले होते. वाटले, खरेच का या चांगल्या चित्रामागे फक्त तडजोड, प्रेम, सहनशीलताच दडलेली आहे? का निव्वळ अपरिहार्यता, नाईलाज व एकाचा अव्याहत सोशिकपणा आहे.का केवळ मुलांमुळे व फक्त मुलांसाठी दिवसागणिक विरत चाललेल्या चादरीला ठिगळं लावत जगायचे. जर तसे नसते तर चाळीस-पन्नास वर्षे संसार करून वयाच्या सत्तरीत आजींना घटस्फोट घ्यावासा का वाटतो? मला आता तरी जगायचे आहे असे त्या ठामपणे सांगतात आणि नुसत्या सांगतच नाही तर तो निर्णय त्या अमलातही आणतात. ऐंशी वर्षाचे आजोबा पंचावन्न वर्षांनी दुसरे लग्न करतात तेही मुलासुना-नातवंडांना सोबत घेऊन. आता कुठे आनंदात जगायला लागलो असेही नमूद करायला विसरत नाहीत. सहन करण्यालाही मर्यादा असायला हव्यात.पती-पत्नीमधले सामंजस्य सहवासाने, मानसिक गुंतवणुकीमुळे वाढत नसेल तर केवळ संसार रेटला इतकेच करावे का? केलेच तर किती काळ.कधीतरी निव्वळ साधेसरळ जगावे.

आज आपल्याकडे विभक्त कुटुंब बरीच दिसू लागलीत असे सारखे ऐकू येतेय, काही अवतींभोवती दिसतातही. पूर्वीपेक्षा जास्त आणि निर्णयाप्रती ठाम व सशक्त. पण समाज, घरचे-दारचे, मुलं आणि जोडीदाराची वाटणारी भीती यामुळे आहे तेच जीवन मरेस्तोवर रेटणारीच घरेच जास्त आहेत. ' नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन ' हेही खरेच. शहर आणि गावं अशी तुलनेची तफावत या बाबतीत फारशी दिसून येत नाही. घटस्फोट घ्यावा असे कधीच कोणीच म्हणणार नाही. मात्र जेव्हा जगण्यापेक्षा मरण्याकडे कल वाढू लागतो तेव्हा तरी स्वतःला अन्यायापासून सोडवायला हवे. माणसाचा एकदाच मिळणारा जन्म कश्या पद्धतीने जगावा याचा हक्क तरी प्रत्येकाला असायला हवा. का तो हक्क फक्त जोडीदाराचा, मुलांचा असे म्हणत आयुष्य खंतावयाचे. जसा अन्याय करणे हा गुन्हा आहे तसेच अन्याय सहन करत राहणे हाही गुन्हाच आहे. आणि तो अखंड करत राहून ' त्याग ' या गोंडस भावनेतून स्वतःची फसवणूक करणे हा त्याहूनही अक्षम्य गुन्हा आहे. कधीकाळी एकमेकांवर भरभरून प्रेम केले होते, अत्यंत ओढ होती म्हणूनच लग्नही केले. म्हणून केवळ ते टिकवण्याचा अट्टाहास स्वत:चे आस्तित्व मिटवून करावा का? समपर्ण हे दोन्हीबाजूने व्हायला लागते. स्वभावानुसार त्याचे प्रमाण कमीजास्त असू शकेल. जात्याच झोकून देणारी वृत्ती व मुलत: आत्मकेंद्रित प्रवृत्ती एकत्र आल्या की एक जण भरडला जाणारच.

या नात्याचे एक अधिक एक बरोबर दोन इतके सोपे गणित नक्कीच नाही. या नात्याची व नात्यातून निर्माण होणार्‍या गुंतागुंतीची व त्यातून निर्माण होणार्‍या प्रश्नांची व्याप्ती फारच मोठी आहे. संसार म्हटला की तडजोड,त्याग,सहनशीलता हवीच. तीही दोन्हीबाजूने. अनेकविध बाबी यात गुंतलेल्या आहेत. कडेलोट होईतो सामंजस्याने एकत्र राहण्याचाच प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला जातो हेही खरेच. परंतु अश्या घरामधला धुमसता तणाव सगळ्यांचेच मानसिक स्वास्थ्य उध्वस्त करत असतो. विभक्तीच्या निर्णयाच्या परिणामांपेक्षाही याचा असर दूरगामी व खोलवर रुतून राहतो. मग स्वतःचा बळी देऊन नेमके काय साधले हा प्रश्न जर आयुष्याच्या संध्याकाळी पडला तर बोल कोणाला लावावा....

Tuesday, June 14, 2011

उकडलेल्या बटाट्यांची भाजी

लहानपणापासून तहहयात जवळपास सगळ्यांनाच ' बटाटे - बटाटे वापरून केलेले पदार्थ ' धावतात. बऱ्याच लहानमुलांचे व काही मोठ्या माणसांचेही हे प्रमुख अन्न आहे असे दिसून येते. सर्वसाधारण पणे सर्रास सगळ्या सोडाच पण हाताच्या बोटांवरही मोजायला गेल्यास बोटे उरतील इतक्या कमी इतर भाज्या, मुले व काही मोठी खाताना दिसतात. अश्या सगळ्यांसाठी बटाटे वरदान ठरलेय.

बटाटे वापरून केलेले बहुतांशी पदार्थ तसे सोपेच आणि सहजी करण्यासारखेच. त्यातून ते वारंवार केले जात असल्याने तोंडपाठ झालेले असतात. अगदी झोपेतही न चुकता करता येतील इतके सोप्पे. मग ती उकडून घेतलेल्या बटाट्याची भाजी असो की काचऱ्या. कीस असो की थालीपिठे. बटाटेवडे असो की आलू परोठे. कांदा बटाट्याचा रस्सा तर फटाफट होतो. त्यातल्या त्यात दमालूला थोडीशी खटपट करावी लागते. आणि बटाट्यांचे पापड. म्हणजे करायला हे सोपेच आहेत फक्त जरा वेळ काढून करायला हवेत.

काचऱ्या किंवा उकडलेल्या बटाट्यांची भाजी, कोणाचीही छानच होत असणार यात माझे दुमत नव्हते. पण काही मैत्रिणींनी " बरेचदा या दोन्ही भाज्या पटकन होतात व करायला सोप्या म्हणून करतो खऱ्या आम्ही, पण काही मजा येत नाही गं." असे वारंवार म्हटल्याने उगाचच या भाजीची कृती टाकायचा मोह झालाय. कदाचित थोडासा फायदा होईल की काय. एकतर बरीच मोठ्ठी( मला तर वाटू लागलेले की मी डोहाच्या तळाशी दडी मारली आहे. कुठूनही उजेडाची तिरीप दिसेना का सूक्ष्मसा तरंग उठेना असे झालेले गेले काही दिवस. अर्थात इतरही भौतिक कारणांनी मोठ्ठा हातभार लावलेला होताच. ) सुट्टी झाली आहे आणि त्यानंतरची सुरवात, " बटाट्याच्या भाजीने " म्हणजे... ( जणूकाही बरेच जण माझ्या पोस्टची वाट पाहत आहेत... भ्रामक भास... ही ही... ) कोणीतरी म्हणाले वाटते मनात, " किती तेल ओतलेय नमनाला, इतक्या वेळात मी किलोभर बटाट्यांची भाजी करून, खिलवून पार झाले/झालो असतो. " हा हा...

वाढणी : दोन माणसांना पुरावी

साहित्य:

चार मध्यम बटाटे उकडून घ्यावेत

एक कांदा मध्यम बारीक चिरून ( फार बारीक चिरू नये )

तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून

एक पेर आले बारीक तुकडे करून

सात/आठ कडिपत्त्याची पाने

मूठभर कोथिंबीर बारीक चिरून

चार चमचे तेल

नेहमीची फोडणी

चवीनुसार मीठ व दीड चमचा साखर

दोन चमचे लिंबाचा रस

कृती:

बटाटे स्वच्छ धुऊन त्याचे दोन तुकडे करून कुकरला ( किंवा पातेल्यात बटाटे बुडतील इतके पाणी ठेवून साधारण दहा ते बारा मिनिटे ठेवावे. सुरीने शिजलेय ची खात्री करून उतरावेत. ) लावावेत. दोन शिट्ट्या झाल्या की आचेवरून कुकर उतरवून ठेवावा. थोडी वाफ कमी झाली की लगेच बटाटे कुकरमधून काढून निवण्यास ठेवावेत.

एकीकडे कांदा, मिरची, आले, चिरून घ्यावेत.

पितळेचे पातेले असल्यास ते घ्यावे, नसल्यास कुठलेही जाड बुडाचे पातेले/पॅन घेऊन त्यात चार चमचे तेल घालावे. तेल चांगले तापले की मोहरी घालून ती व्यवस्थित तडतडल्यावर हिंग( नेहमीपेक्षा किंचित जास्त हिंग घालावा ) घालून हालवावे. हिंग तेलात नीट विरघळला की हळद घालून त्यावर मिरची व आल्याचे तुकडे, कडिपत्त्याची पाने घालून मिनिटभर हालवावे. मिरची किंचित फुटली की कांदा घालून परतावे. आच मध्यमच ठेवावी.

बटाटे आता किंचित निवले असतील. भरभर साले काढून हलक्या हाताने सगळ्या बटाट्यांच्या एकसारख्या फोडी करून घ्याव्यात. बटाट्यांचा भुगा होणार नाही अशा बेताने फोडी कराव्यात.

आता कांदा जरासा लालसर होऊ लागलेला असेल. त्यावर या बटाट्यांच्या फोडी हलकेच घालून सगळे मिश्रण हळुवार परतावे. तीन चार मिनिटांनंतर त्यात स्वादानुसार मीठ व साखर घालून पुन्हा परतावे. परतून झाले की आच थोडी वाढवावी. तीन ते चार मिनिटे न ढवळता शिजू द्यावे. छान खमंग वास दरवळू लागलेला असेलच. बटाट्यांचा रंग पालटायला लागलेला दिसू लागेल. पुन्हा एकदा मिश्रण अलवार हालवून चार ते पाच मिनिटे मध्यम मोठ्या आचेवरच शिजू द्यावे. खरपुडी दिसू लागली की आचेवरून काढावे. कोथिंबीर भुरभुरवून लिंबू पिळावे. पानात वाढताना उचटणे ( कालथा/ उलथणे ) पातेल्याच्या तळाशी घालून खरपुडीसहित भाजी वाढावी. दही, आंब्याचे लोणचे( लिंबूही धावेल ), गरम गरम पोळ्या आणि ही जठराग्नी खवळणारी भाजी. म्हटले तर अतिशय साधेच जेवण असूनही तृप्ती देणारे. पोट भरलेय. भाजीही संपली आहे तरीही तळाशी चिकटलेली खरपुडी खाण्याचा मोह आवरत नाहीच. आणि तीही या सगळ्या एकत्रित तृप्तीच्याही वर एक तुरा खोवेल.

टीपा :

मायक्रोव्हेवला ठेवणार असल्यास बटाट्याचे दोन तुकडे करून किंचित किंचित चिरा पाडून प्रथम एक मिनिट व नंतर ४० सेकंद तीनदा ठेवावे. मध्यभागी दडस आहे असे वाटल्यास पुन्हा ३० सेकंद दोनदा ठेवावे. ( हे अंदाज घेऊन करायला हवे. बरेचदा बटाट्याच्या जातीवरही अवलंबून असते. ) थोडेसे कोमट झाल्यावर सोलून हलकेच एकसारखे तुकडे करून ताटात पसरून ठेवावेत.

जिरे, मेथी फोडणीत घालू नये. जिऱ्यांनी या भाजीचा स्वादच बदलून जातो. नीटशी कुठलीच चव येत नाही.

लिंबू आच सुरू असताना पिळू नये. शक्यतो लिंबू पिळल्यावर भाजी गरम करण्याचे टाळावे. कोथिंबीर फोडणीत घालू नये. यानेही भाजीची चव बदलून जाते.

भाजी सुरवातीला मध्यम आचेवर व नंतर मध्यम मोठ्या आचेवर करावी. आच मोठ्ठी ठेवू नये. जळून जाईल. अतिशय चविष्ट खरपुडी खायला मिळणार नाही. भाजीचा रंग वरून पिवळसर सोनेरी व तुकतुकीत दिसायला हवा. व तळाशी किंचित करपल्याचा भास देणारी कांदा, बटाट्याच्या एकत्रीकरणाची खरपुडी.

नॉनस्टीक पॅन किंवा कढईत करण्यापेक्षा पितळेच्या पातेल्यात ही भाजी केल्यास चव खासच लागते.