जाता जाता एक नजर इथेही........

Friday, December 30, 2011

३६५ दिवसांचं कोरं दालन...

बापरे ! चार महिने होत आले काहीच लिहिले नाही. खरंच वाटत नाही. ब्लॉग शांत... सुस्त झालाय. हे सगळे महिने फार धावपळीत गेलेत. आपण ठरवतो खूपकाही पण ते सगळेच घडते असे नाही. अनेकदा गोष्टी आपल्या हातात नसतातच. आपल्याला मात्र वाटते की आपण कमी पडलो... पण मागे वळून त्रयस्थपणे पाहत अदमास घेतला की कळतं, हे काहीसं असंच होणार होतं. मग पुन्हा नवीन रुखरुख लागते.... हे आधीच का नाही समजलं - पटलं आपल्याला ? उगाच हा सगळा वेळ मी स्वत:ला कोसलं. मन दुखवून घेतलं... वेळही व्यर्थ दवडला..... !! आता या रुखरुखीत काहीही अर्थ नाही आणि तथ्यही नाही तरीही ती लागतेच. पुन्हा पुढल्यावेळी हे असंच चक्र घडेल याबद्दल तीळमात्रही शंका नाही. काय गंमत आहे नं... अगदी क्षुल्लक गोष्टीत मन शंकेखोर होत राहतं पण या मोठ्या गोष्टीत मात्र त्याला शंभर टक्के खात्री असावी. विरोधाभासाची कमाल !

मनात खूप काही साचलंय... परंतु कुठलीही गोष्ट बळजोरीने किंवा सक्तीने केली तर ती होईल पण त्यात जीव असणार नाही. आनंद मिळणार नाहीच उलट मनाला कटकटच जास्त होण्याची शक्यता दाट..... !!! असे असले तरी वरचेवर आपण सगळेच अनेक गोष्टी सक्तीने... स्वत:ला ढकलून... ढकलून करतो. कधी हे कसे अपरिहार्य आहे हे स्वत:ला सांगून तर कधी हेच कसे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे हे पटवून. आणि असे करणे चुकीचे नाहीच. तेचतेच करत राहण्याचा जितका कंटाळा येतो तितकीच त्या रोजच्या त्याचत्याच रूटीनची गरज नितांत असते. आता हेच पाहा नं... अगदी पहिलीतले लहान मूल असो की पदवी प्राप्तीच्या उंबरठ्यावर उभे असलेला विद्यार्थी... परीक्षा संपण्याची जितकी आतुरतेने तो वाट पाहतो तितक्याच त्वरेने परीक्षा संपताच आलेल्या रिकामपणाला तो कंटाळतो. अभ्यास, सबमिशन, होमवर्क, परीक्षा... मित्र-मैत्रिणी, टीचर्स... इतकेच काय अगदी रिक्षावाल्या काकांपासून सगळ्यांची त्याला आठवण येऊ .लागते. खरे तर लवकरच पुन्हा या चक्रात आपण अडकणार आहोत याची त्याला कल्पना असते तरीही... थोडक्यात काय सतत डोक्याला खाद्य हवे. रिकामपण जगणं कमी करतं..... ! जीवनाची अडगळ होऊन जाते.... !

दोन दिवसांच्या विकांताची आपण आतुरतेने वाट पाहतो पण सगळेच दिवस विकांतासारखे समोर आले की... नकोसे होतात. माझंही तसेच काहीसे झालेय. लिहिण्याच्या प्रवाही ओघातून गेले काही दिवस काठावर ओढली गेलेय. आता पुन्हा धारेला लागताना थोडी सक्ती करावीच म्हणतेय. वर्षही संपलंच आहे. आळस झटकून कामाला लागावं... पुन्हा एकवार ३६५ दिवसांचं कोरं दालन उघडलंय... जळमटं झटकून मनाचं नवं पान असोशीने उघडावं आणि जगणं सार्थकी लावायचा प्रयत्न मनापासून करायला घ्यावा.... हो नं ? या येणार्‍या दालनाला आपण वैयक्तिक जीवनांत व समाजात कसे सामोरे जातो हे महत्वाचं. अपेक्षा, आकांक्षा असणारच पण त्यासोबत काही उपेक्षा... हिरमुसलेपण, बराचसा त्रागा-वैताग... मीच का... नेहमीच माझ्याचबाबतीत का ? का? हे सगळे प्रश्नही सोबत असणारच. त्यांनी नाउमेद न होता नवं कोरं पान लिहायला घेऊया.... ज्याला आपण दु:ख म्हणतो ते खरंच दु:ख आहे का हे ही तपासून पाहू. केलेलं कर्म आपण विसरून जाऊही पण ’ तो ’ विसरत नाही... नवं रचताना याचं भान असावं !

मला माहीत आहे आपल्यातले बरेच जण यावर्षी कुठलेही संकल्प करणार नाहीत... कशाला करायचे ... नेहमीच ते फेल होतात. मग अजूनच अपराधी वाटत राहतं. वडा खायचा तो खाल्ला जातोच पण मेलं त्यातलं सुख मात्र हिरावलं जातं. हा हा ! अगदी अगदी ! असंच होतं पण तरीही रिझोल्युशन करणं जरूरीचं आहेच. त्यामुळे किमान आपल्याला काय ’ साध्य ’ करायचे आहे हे तरी विसरायला होत नाही. निदान काही दिवस जाणीवपूर्वक त्या ’ साध्याचा ध्यास ’ घेतला जातो... नेटाने प्रयत्न केला जातो. भले तो ध्यास महिनाभर टिकू दे... त्या महिनाभरात संध्याकाळचे जेवण टिवीसमोर बसून कोणाच्याही घरात न घडणार्‍या अतर्क्य नौटंक्या पाहत करण्यापेक्षा... हसतखेळत, एकमेकांची विचारपूस करत खेळीमेळीने केलेले जेवण पुढल्या सगळ्या महिन्यांमध्ये किमान चार आठ दिवस तरी आपसूक टिवीकडे पाठ फिरवते. हेही नसे थोडके !! महिन्याला इतके किलो वजन उतरवेनच या संकल्पापेक्षा महिन्याला फक्त एक किलो वजन उतरवेन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वर्षभरात एकही किलो वजन वाढू देणार नाही हा संकल्प करून तो तडीस न्यावा... पटतंय ना... :)

जपानच्या नैसर्गिक आपत्तीने आपल्याला खूप काही शिकवले. एकमेकांच्या जीवावर सतत उठलेली माणसे पाहणार्‍या जगाला माणुसकीचे एक आगळेवेगळे दर्शन घडले. ट्युनिशियातून सुरू झालेल्या स्वातंत्र्यक्रांतीने.... एका छोट्याश्या ठिणगीने धारण केलेले उग्र रूप विजयी सांगता घेत प्रेरणा देत पुढे सरकत राहिले, अन्यायमूक्त करत गेले।

दुसर्‍या बाजूला या संपलेल्या वर्षात जरा जास्तच अलौकिक अमूल्य रत्ने आपण गमावलीत. पंडित भीमसेन जोशी, भुपेन हजारिका, जगजित सिंग, शम्मी कपूर, देव आनंद, जगदीश खेबूडकर, श्रीनिवास खळे, प्रभाकर पणशीकर, गौतम राजाध्यक्ष, करुणा देव... अर्थात निलम प्रभू, मारिओ मिरांडा, पतौडी, सत्यदेव दुबे, इंदिरा गोस्वामी, डॉ. पी. के. अय्यंगार, स्टिव्ह जॉब्ज...... ओघात जी नावे समोर आली त्यांचा उल्लेख केला आहे. अनवधानाने सुटलेल्या सगळ्यांप्रतीही तितकेच तीव्र दु:ख आहेच.... !!

खेबूडकरांच्या शब्दात सांगायचे तर, " प्राजक्ताच्या फुलासारखे जगताना दुसऱ्याच्या ओंजळीत सुगंधाचा दरवळ दिला की, मागे वळून पाहण्याची गरजच नसते.... " या सगळ्यांनी प्राजक्ताच्या फुलासारखे जगताना आपल्या ओंजळीत सुगंधाचा दरवळ दिलाय... त्यांना मागे वळून पाहण्याची गरज उरलेलीच नाही..... आपल्या सगळ्यांच्या अंत:करणात ही रत्ने अखंड जिवंत राहतीलच.

सरत्या वर्षाचा निरोप घेताना येणार्‍या नव्या उद्याचे स्वागत जोमाने, उत्साहाने, आनंदाने - दंग्याने करूया. वर्षोनवर्षे एकमेकांना देत आलेल्या शुभेच्छा पुन्हा एकदा सगळ्यांना देऊयात... त्याचबरोबर या येऊ घातलेल्या वर्षात परस्परांकरिता व स्वत:करिताही रोजच्या धबडक्यातून किंचितसा पॉज घेऊन काही सुंदर, प्रेममय, आनंदी क्षणांची जाणीवपूर्वक गुंफण करूयात.

नववर्षातील प्रत्येक क्षण मनासारखा जावो !!!

Thursday, August 25, 2011

काजवे...

" जानू, अगं लक्ष कुठेय तुझे? काय सांगतोय मी... ऐकते आहेस का? "

" ह्म्म... "

" अगं ह्म्म काय... सांग बरं माझं शेवटचं वाक्य... "

" संध्याकाळी तयार राहा... गोसावींच्या नव्या फार्महाऊसची पार्टी आहे... हेच सांगत होतास नं? "

" जानू तू आणि तुझे मल्टिटास्किंग पुरे झाले. कानावर पडलेले रट्टा मारल्यासारखे माझ्या तोंडावर मारू नकोस... काय सारखी त्या खिडकीतून बाहेर पाहत असतेस गं? बरं ते सोड, आपल्याला... ऐकलेस नं... मला एकट्याला नाही तर दोघांनाही जायचेच आहे. तुझ्या सबबी चालणार नाहीत आज. मी शार्प सातला येईन. साडेसातला निघू आपण. तयार राहा. आणि ते तुझे जीन्स-खादी प्रकार नकोत. छानशी रेशमी साडी नेस. ती मोरपंखी नाहीतर कलकत्त्याहून आणलेली जांभळी... जानू, काय दिसतेस गं तू त्यात.... नुसते जळतील सगळे. अरे बापरे! आठ वाजत आले... चल मी पळतो. तयार राहा गं! "

खिडकीतून एकटक बाहेर पाहत जानू ऐकत होती. अजय घरात असला की एखाद्या धबधब्यासारखा अविरत कोसळत राहतो आपल्यावर. बरेच आहे म्हणा.... दिवसभर नुसत्या उसासत राहतात या भिंती.... आपल्यासारख्या. शांतता छेदायला उसना आवाजही सापडत नाही. फक्त सुरू असते ते घड्याळाचे एका लयीत श्वास घेणे... टिकटिक टिकटिक... तासागणिक लंबकावर पडणाऱ्या टोल्यांचे झंकारणे... काळाची लढाई अव्याहत सुरूच आहे. तो लढतोय म्हणून मला, अजयला, सगळ्यांनाच लढावे लागते. वेळेचे महत्त्व, गेलेला क्षण, प्रवाही काळ.... वर्तमान... या आत्ताच्या क्षणाचा भूतकाळ कसा असावा हे आपल्या हाती.... येणाऱ्याचे भविष्यही आपल्याच हाती..... टिकटिक टिकटिक.... आपल्यासाठी क्षण का क्षणांसाठी आपण.... भूत व वर्तमान नक्कीच आहेत पण भविष्य ही असेल हे चक्क गृहीत धरून चाललोय आपण. याची टिकटिक सगळी बॅटरीच्या जोरावर.... सेल संपला की नुसता शोपीस.... आपली धडधड कशाच्या जीवावर..... कोणासाठी.... कोण जाणे उद्या आपण फ्रेममध्ये.... आपलाही शोपीस.... त्यावर एक हार.... मागे उरेल तो फक्त भूतकाळ.... का आठवणींची भुतं... अजय घड्याळाचा सेल बदलेल... शेजारीच आपला मोरपंखी फोटो सुंदरश्या फ्रेममध्ये लावेल.... आणि मग सारखी या मेल्याची डोके उठवणारी टिकटिक.... दर तासागणिक ठाण ठाण.....

जान्हवी तिरमिरीत उठली. धुण्याची काठी घेऊन ताडताड पावले टाकत घड्याळासमोर येऊन उभी राहिली. कशाला सारखी टिकटिक... करत राहतोस? जरा म्हणून क्षणभर उसंत नाही कशी ती.... थांब तुला कायमचे गप्प करून टाकते. त्वेषाने तिने काठी उगारली तोच खाडकन दार उघडून हाती टोला घेऊन पाहरेदार बाहेर आला आणि त्याने पहिला घाव घातला... ठाण.. दुसरा... ठाण... एका मागोमाग एक घाव घालतच सुटला... तिच्या त्वेषाची लागण त्यालाही झालेली. आठवा घणाघाती घाव घालून आला तसाच तो खाडकन लुप्तही झाला. तिच्या हातातली काठी गळून पडलेली. त्या विरणाऱ्या आवाजासोबत तिचा आवेशही विरत गेला. स्वत:ला गोळा करत, सावरत ती किचनच्या खिडकीशी आली.

अजयने मुद्दामहून शहराच्या बाहेर दरीच्या टोकावर बंगली बांधली होती. तसे शहर फार लांब नव्हते... फार तर दहा मैल. कोणाला सांगून खरे वाटणार नाही इतके या दहा मैलात सृष्टी पटल बदलत असे. जणू एखाद्या कसलेल्या चित्रकाराने पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासवर दिवसभर निरनिराळ्या छटांचे मनोहरी चित्र रेखाटत राहावे! खिडकीतून दिसणाऱ्या परमेश्वराने चारी हातांनी मन लावून रंगवलेल्या निसर्गाचे प्रसन्न, उत्फुल्ल, पहाटेच्या पहिल्या प्रहराच्या हलक्या रेघा, झुंजूमुंजू, पक्ष्यांची अखंड किलबिल, नभ कधी खेळकर, कधी अवखळ.. उनाड, तर कधी भरून आलेले. गदगदलेले, कधी उदासवाणा पिवळसर संधिप्रकाश... कधी हिमटी काढलेले ओठ अन गालावर ओघळलेला एक अश्रू.... कधी अविरत कोसळणारा तुफानी पाऊस, तर कधी हसरा, नाचरा पाऊस, उन्हात चमचमणारा पाऊस, धरतीला कुरवाळणारा पाऊस, कौलावर ताडताड वाजत शांततेला भेदणारा आक्रमक पाऊस.... कधी चराचराला डोलवणारा आल्हाददायक वारा तर कधी झोडपवणारा बेभान वारा.... तिन्हीसांजेला दूर मावळणारा सूर्य आणि जवळच भासणारा चंद्र, रात्र जशीजशी चढत जाईल तसतसा पडत जाणारा चांदण्यांचा सडा.... अमावस्येच्या रात्रीचा गूढ अंधार.... खिडकीबाहेर निरनिराळी निसर्गाची रुपे अन आत जानू.... दोघांनाही समीप आणणारी जानूची आवडती चौकट... खिडकी !

शहराच्या कोलाहलापासून दूर ही बंगली तिला आवडत असे आणि नसेही. फार एकाकी वाटे. जणू ग्लोरिफाईड तुरुंगच ! तिथे तरी सोबतीला कैदी असतात. असेत का खुनी-दरोडेखोर पण जिवंत असतात. तसा तिचा गोतावळा खूप होता. पण ते सगळे शहरात. तिच्याकडे यायचे म्हणजे त्यांना खूप लांब वाटे. अजय म्हणे, दिवसभर त्यांच्यातच असतो गं मी... संध्याकाळी तरी शांतता हवीच ! त्याचे बरोबरच आहे.

जानू आता अजयला, घड्याळाला विसरली होती. खिडकीतून दिसणाऱ्या चिरपरिचित कॅनव्हासवर कोणाचीतरी चाहूल दिसत होती. तिने निरखून पाहिले... कोणीतरी बाई दिसत होती. एकटीच... तीही इतक्या लांब. बापरे! जीव तर द्यायला आली नसेल. जानूचा श्वास कोंडला. छे ! काहीतरीच ! ती पुन्हा पाहू लागली. साधारण सत्तरीची असावी. शेलाटा बांधा, रुपेरी लांब वेणी, छानशी झुळझुळीत साडी..... जीवनावर-स्वत:वर प्रेम करणारी वाटत होती. अजून तीसपस्तीस वर्षांनी आपण अशाच दिसू कदाचित. पण अशा उत्साही असू का? काय हे कुठून कुठे पोचलीस तू जानू... ' भविष्य आहे ' असे गृहीत धरून पुन्हा क्षण गुंफू लागलीस नं.... मान झटकून जानूने विचारांची गर्दी पांगवली. डोळे तिचा पाठलाग करत ती फिरेल तसे फिरत होते. जणू तिच्या जीवाची जबाबदारी जानूचीच झालेली.

तासभर तरी ती होतीच. दोन्ही हात पसरून निसर्गाला गोळा करत होती. काही वेळ दरीच्या टोकाशी जाऊनही उभी होती. तो सगळा वेळ जानूने पापणीही लववली नाही. हलके हलके पावले टाकत, तृणालाही आपले ओझे होणार नाही याची खबरदारी घेत ती आली तशीच कॅनव्हासवरून नाहीशी झाली. बेडरूमच्या खिडकीतून रस्ता दिसत असे... जानू धावली.... कुठे गेली.... या खिडकीतून पाहा त्या खिडकीतून... ती कुठेच दिसेना. जणू आलीच नव्हती. म्हणजे निव्वळ भास होता का.... आता जानू थकली. सोबतीचा एक किरण अचानक समोर आलेला.... उद्याची वाट पाहू लागली.

दुसऱ्या दिवशी कालच्या पार्टीबद्दल बोलून नेहमीसारखाच घर दणदणवून अजय गेला. जानूचे सगळे चित्त तिच्याकडे लागलेले. एकीकडे कामे करत करत ती सारखी खिडकीतून डोकावू लागली. बरोब्बर कालच्याच वेळेला ती आली.... झुळझुळीत साडी, प्रसन्न चेहरा... शालीन सौंदर्य ! तासाभराने दिसेनाशी झाली.... रोजच येत राहिली... एखाद्या अदृश्य बंधासारखी जानू तिच्यात पूर्णतः गुंतली होती. जानू खिडकीत असते हे काही दिवसांनी तिच्याही लक्षात आले होते.... दरीच्या टोकावर जाण्याआधी ती जानूकडे एकटक पाही... हलकेच हात उंचावे आणि चालू लागे. पाहता पाहता महिना उलटला. जानूला रोज वाटे खाली जाऊन तिच्याशी बोलावे.... पण तिची तंद्री मोडायचे जानूच्या जीवावर येई. शिवाय तिनेही कधी आपणहून जानूची ओळख करून घ्यायचा प्रयत्न केला नव्हता.

दोन दिवस सरले..... ती आली नाही. असे कसे झाले? अगदी धुवांधार पावसातही ती छत्री घेऊन आली होती. बरे नसेल का? घरी कोणी असेल का तिच्या? का एकटीच.... एकाकी? का नाही आपण ओळख करून घेतली... आता ती आलीच नाही कधी तर? प्रश्नांची मालिकाच फेर धरून नाचू लागली. पाहता पाहता चार दिवस उलटले. जानू मरगळून गेली. अजयने विचारलेही, " काही बिनसलेय का? डॉक्टरकडे जायचे का? " पाचव्या दिवशी दिवेलागणी होऊन गेलेली... अजय दोन दिवस टूरवर गेलेला. काहीतरी पोटात ढकलावे म्हणून जानू किचनमध्ये आली. चहाचा कप हाती घेऊन खिडकीशी आली... पाहतच राहिली.

ती, तीच होती. नेहमीसारखीच प्रसन्न, आज काळी खडीची साडी नेसलेली. एक तर इतके दिवस गायब होती आणि आता आली तर इतक्या रात्री... हातात काय धरलेय तिने..... काचेची बरणी दिसतेय..... त्यात सोनेरी चमचमता लोळ. काळ्याभोर आकाशावर लक्ष लक्ष चांदण्यांच्या ज्योती उजळलेल्या तश्यांत तिच्या काळ्या चंद्रकळेवरच्या चांदण्या हातातल्या सोनेरी तेजाने लखलखत होत्या. नेहमीसारखीच हलकी अल्लाद पावले टाकत ती दरीच्या टोकाशी जावून पाठमोरी उभी राहिली. खिडकीकडे पाहत हातातल्या बरणीचे झाकण उघडले.... असंख्य सोनेरी तेजःपुंज ठिपके आसमंत उजळू लागले. बरणी रिकामी झाली. आभाळातली नक्षत्रे, तिच्या चंद्रकळेवरच्या चांदण्या अन चहुबाजूने लपेटलेले लखलखते काजवे.... पाहता पाहता त्या सगळ्यांचे वेगळेपण संपले...... चांदण्यांनी ती मढली आणि आसमंत काजव्यांनी.... पुढच्याच क्षणी तिने स्वत:ला झोकून दिले....

जानू जीवाच्या आकांताने धावली. काजवे सैरावैरा उधळले होते. चांदण्याही भयाने दूरवर पांगलेल्या.... जानू दरीच्या टोकावर उभी राहून वेड्यासारखी हाकारत होती... खाली होता केवळ मिट्ट काळोख आणि भयाण शांतता.... या वर्तमानाचा अर्थच तिला लागत नव्हता.... काही क्षणांपूर्वी सर्वांगी तेजाचा लोळ बनून तळपणारी ती भुतकाळ झाली होती.... जानू वळली तोच कशालातरी अडखळली. खाली वाकून पाहिले तर रिकामी बरणी होती. तिथेच बसून जानूने बरणी हातात घेतली. तिचा - तिच्या मनाचा स्पर्श झालेली बरणी.... एकुलता एक काजवा बरणीत चमचमत होता..... जणू तिची वाटच पाहत होता. जानूने हळूच फुंकर घातली तशी पटकन तो बाहेर आला... थेट आसमंताच्या दिशेने झेपावला.

जानूला वाटले, तिचा वर्तमान हळूहळू विझत असावा, रिक्त विरक्त झाली असावी..... आता नव्याने देण्याघेण्यासारखे काही उरले नसावे.... भविष्याचे ओझे तिच्या कुडीला पेलायचे नव्हते.... तिच्या अनेक बऱ्या वाईट अनुभवांचे, नात्यांचे, बंधांचे, रेशमी स्पर्शाचे, समाधानाचे, अत्यानंदाचे, सुखद-दु:खद, बोचरे, एकाकी क्षण तिने पकडून पकडून बरणीत भरलेले. तिच्यालेखी तिच्या आत्म्याची वस्त्रे बदलायची घटिका भरलेली.... तसेच असावे, म्हणूनच या जीवनातले सगळे क्षण इथेच उधळून निर्मोही होऊन ती प्रसन्न निघून गेली..... पुढच्या प्रवासासाठी !

बरणीचे झाकण लावावे म्हणून जानूने ते उचलले... त्यावर लिहिले होते.... " ही तुझ्या क्षणांसाठी.... माझ्याकडून सप्रेम !!! "

Monday, August 22, 2011

प्रिय...

सगळीच जातात तसाच तूही उज्ज्वल भवितव्यासाठी दूर गेलास. मी मात्र तिथेच.... तशीच! तुझ्या आठवणीत रमलेली, सदाचीच ! तुझ्या किंचित मिसुरडं फुटलेल्या ओठांची, ' दाढी येत आहे हो ' ची निशाणी दाखवणारे उगाच तुरळक तांबूस मऊ केस, तुझा फुटलेला.... घोगरा किंचित खरजांत जाणारा आवाज. फसफसून उतू चाललेला अपार, अधीर उत्साह. सोळाव्या वर्षीच गाडीचे चक्र कायद्याने हाती आल्याने कधी कानात वारं शिरल्यागत वेगाशी स्पर्धा करण्याची ऊर्मी तर कधी माझ्याजवळ येऊन अगदी जबाबदारीने तुझे विचारणे. " ममा, तुला वॉलमार्ट मध्ये घेऊन जाऊ का? तू आरामात बस शेजारी. आणि पिशव्या उचलेन गं मी. " असे म्हणत व्यायाम करून पीळदार होऊ लागलेले दंड दाखवणारा तू. अखंड पडणाऱ्या बर्फाचे ढीग उपसण्यासाठी जामानिमा करून बाहेर पडताच, " वेडाबाई, हो घरात. तू संध्याकाळपर्यंत बसशील टुकूटुकू करीत. त्यापेक्षा मस्त तिखट काहीतरी खायला कर. मी फडशा पाडतो या चमचमणाऱ्या थंड भुशाचा. " असे म्हणून कानात सुंकली अडकवून एका लयीत स्नो उपसणारा तू.

जात्याच गोड व कसदार गळा तुझा. पाचव्या वर्षीच स्वत:हून गाणे शिकायला जाऊन बसलास. तल्लीन होऊन तुझे एक एक राग आळवणे, माझ्या शेपटाला धरून हेलकावे देत ताना घेणे. " स्वरगंगेच्या काठावरती " मुळात तसे अवघडच गायला, त्यात तुझा सुटलेला मराठी वाचनाचा हात.... तरीही शब्द न शब्द माझ्याकडून वदवून तो अचूक उच्चारण्यासाठी घोटून पक्का होण्याची दक्षता घेऊन केलेली गाण्याची प्रॅक्टिस. पुढे पुढे तर तू एकाग्र होत गेलास त्यात. एकलव्यासारखा !

एक ना दोन.... अगदी जन्मलास तेव्हांपासूनच्या अनंत आठवणी..... पोतडी भरभरून.... निगुतीने एकावर एक ठेवलेल्या. नुसती निरगाठ उकलायचा अवकाश, उसळी मारून पृष्ठावर येतात... येतच राहतात.... डोळ्यांवाटे सांडत राहतात. त्याही तुझ्याच सारख्या... कधी अवखळ तर कधी तरल. भोवती फेर धरून एकदा का घुमायला लागल्या की मी माझीच राहत नाही..... तुझ्यातली मी... माझ्यातला तू.... पाहता पाहता दोघेही तादात्म्य पावतात. उरते ती आश्वस्त जाणीव!

कधीकधी मला भीतीच वाटते माझ्यातल्या तुझ्यावरच्या ओनरशिपची. तुला बोलूनही दाखवलेय मी अनेकदा.... त्यावर तुझे खळखळून हसणे.... " ममा, तू पण नं वेडीच आहेस. भीती काय वाटायची आहे त्यात. अगं तुझी ओनरशिप सदाचीच आहे माझ्यावर. तो तुझा सार्वभौमिक हक्क आहे. त्या ध्रुवपदासारखी तू माझ्यासाठी अढळ आहेस, असणार आहेस. भितेस काय! उलट तुझ्या या ओनरशिपच्या दादागिरीने अनेकदा माझे पाय मार्गावरून ढळले नाहीत. आजीची तुझ्यावरची ओनरशिप अजून तरी सुटली आहे का? मग? आणि ती फक्त तिलाच नाही तर तुलाही हवीहवीशीच आहे. कधीतरी तात्पुरता त्रास होतो, अगदी कटकटही होते पण काही वेळ गेल्यावर लक्षात येते की आईचे सांगणे योग्यच होते. अगं, उलट तू जर मी मोठा होतोय म्हणून.. मला स्पेस देण्यासाठी अंतर राखू लागलीस ना तर मात्र मी कोलमडेन. " किती सहज शांत करून जातोस तू माझे मन.... ही हातोटी तुला नेमकी साधलेली ! मी तुझी नस न नस ओळखते की तू माझी.... आताशा हा प्रश्नच संपलेला !

तू जात्याच लाघवी. जीव लावणारा, हळवा, समंजस. तसा थोडासा मनस्वीही आहेस पण तापट नाहीस. तुला राग खूप येतो, पण तू कधीच तांडव केल्याचे मला आठवत नाही. सुतारपक्ष्यासारखे एकसुरात तुझे म्हणणे मांडत राहतोस. तासनतास.... न थकता..... टक टक.... टक टक.... कधी गंमत वाटते तर कधी तुझ्या या एकसुरी सपाट आवाजातल्या टकटकीचा मनस्वी राग येतो मला. तू मात्र आपला हेका सोडत नाहीस... वाद घालणे तुला मनापासून आवडते. चर्चेच्या एकामागोमाग एक फैरी, कुठलेही आवाजाचे चढउतार न करता... तुला पटलेला मुद्दा समोरच्याला पटेपर्यंत केलेला अथक प्रयत्न... आणि एकदा का समोरच्याला मनापासून ते समजले-पटले की तुझ्या चेहऱ्यावर उमटलेली कळतनकळतशी स्मितरेखा. वादासाठी वाद तू कितीही वेळ घालू शकतोस. पण त्यात आक्रस्ताळेपणा, चिडचिड कधीच नसते. नवल वाटते मला.... इतका संयम तोही तुझ्या वयाला... असाच राहा बरं बाळा! या जगात संयमाची नितांत गरज आहे.

या सुट्टीत तुला घरी यायला जमले नाही. आताशा तुझ्यामाझ्या सहवासाचे गणित फक्त उन्हाळा व नाताळाशीच निगडित झालेय. बाकी सगळा वेळ असतो तो रखरखाट. तुझी आठवण प्रत्येक क्षणी मी काढते असा माझा दावा नाही.... माझ्यातूनच आलेला तू माझ्यापासून वेगळा असू शकत नाहीस म्हणूनही असेल कदाचित! परंतु माझ्या प्रेमाचं, मायेचं तुला ओझं होऊ नये म्हणून तारतम्याची सोबत हवी... सुसंवादाचे मळे अखंड फुलत राहण्यासाठी ओनरशिप धुक्यासारखी विरायला हवी. तुला आवडत असली तरीही....!

आज सकाळपासूनच जीवाला हुरहुर लागली आहे. कळतं पण वळत नाही.... तगमग वाढू लागलेली... वाटले लिहावे तुला... खरं तर तुला माहीत नसलेले असे माझ्यापाशी काहीच नाही.... म्हणूनच तुझ्यासाठी नाहीच रे, माझ्यासाठी...!

बाळा, तू खूप दूरवर जा. अगदी जाता येईल तितकं! अनोळखी वाटा शोधण्यातला आनंद तुला अपरंपार मिळू दे. बळकट पाय आणि तरल मनाचे पंख यांची साथ तुला मिळू दे. माझे डोळे तुझ्या मागोमाग येतच राहणार, पण मागे वळून तू त्यांच्याकडे बघू नकोस. काळजीच्या काट्यानं, तुझ्या चैतन्यावर मला चरा देखील उमटवायचा नाहीये!

तू पुढे पुढे जा. तुझ्या आनंदाचं चांदणं वाटेवर पडलं असेल ते मी वेचत राहीन. तुझ्या यशाचा उत्सव माझ्या मनभर साजरा होईल. तू कितीही दूर असलास तरी माझा हात तुझी पाठ थोपटू शकेल. तेवढ्यापुरतीच माझी आठवण ठेव; कारण पराक्रमाच्या वाटेवर, अगदी जिवलगाच्या शाबासकीची सम फार आवश्यक असते. तेवढ्यापुरताच आठवणींच्या समेवर ये. मधल्या तलवलयांत तू मनमुक्त ताना घे. स्वत:ला कौल लावून.

स्वत:चा आतला आवाज, गर्दीच्या कोलाहलातही जपू शकलास, तर तुला स्वत:ची फार सुंदर सोबत मिळेल. त्यात मीही सामावलेली असेन. तुझा आवाज ही माझ्या आतल्या आवाजाची हाक असेल. तुझ्या माझ्या आवाजांच्या या दोन बिंदूंत एक आपलं दोघांचं आयुष्य सामावलेलं असेलं. हातामधली तेजाची ज्योत विझू न देता, उलट आपल्यातल्या सत्वाचं तेज त्यात ओतायचं. ज्वाला प्रज्वलित ठेवायची. वाट पुढे पुढे जातच असते; आणि त्या धुक्यात हरवलेल्या वाटेवर पळायला उत्सुक अशी तुझी दमदार पावलं आणि त्या पावलांच्या ठशात माझे पाय हलकेच ठेवत तुझ्या गतीला गाठायचा आटोकाट प्रयत्न करणारी माझी पावलं.

प्रिय, हे पत्र मी तुला उद्देशून लिहिलं असलं तरी ते मी तुला पाठवणार नाही. ते या कागदावर असंच पडून राहील. कोशात झोपलेल्या फुलपाखरासारखं. हे पत्र खरं तर मी माझ्यासाठीच लिहितेय. जे मी तुझ्याशी कधी बोलले नाही ते बोलण्यासाठी.

कधीमधी तू हे पत्र जाणू शकशील या कल्पनेनंच हा एकतर्फी संवाद मला दुतर्फी वाटायला लागतो. तू ऐकतो आहेस या भासानंच बंद दरवाज्याची कुलुपं निखळून पडायला लागतात.

ह्या ओळी तुझ्या डोळ्यांची खूप वाट पाहतील. डोळ्यांतून मनात झिरपायची वाट सापडली तर हे पत्र तुला पोहोचेल. पण हे पत्र तू कधी वाचलंच नाहीस, तर या बलाकमाला अनंत आकाशात उडून जातील. कागद रिकामा होईल. इथं हे पत्र नांदत होतं याचा पायरव सुद्धा कोणाला ऐकू येणार नाही!

Thursday, August 18, 2011

भरलेल्या लाल मिरचीचे लोणचे

पानात डाव्या बाजूला तोंडीलावणे म्हणून लोणचे, चटणी, कोशिंबीर प्रकार सगळ्या घरांमधे हटकून आढळतात. कोशिंबीरीचेही मी समजू शकते परंतु भाजीला पर्याय म्हणून भाजीसारखे लोणचे खाणारी बरीच जण आहेत. कच्च्या करकरीत कैरीचे ताजे लोणचे, करवंदाचे, भोकराचे, उसळी मिरची, लिंबू+मिरची, उपासाचे गोडाचे लिंबाचे लोणचे, आंबोशी आंब्याचे बेगमीचे लोणचे, ताज्या भाज्यांचे चटकन संपणारे फेसून मोहरी लावलेले लोणचे ( फारच सुंदर लागते हे चवीला... आणि मस्तकात चढतेही झकास ), मिठाच्या पाण्यात मुरवत घातलेल्या बाळकैर्‍या, आवळे अती उत्साही कोणी असल्यास व प्रचंड आवडते म्हणून कार्ल्याचे, माईनमुळ्याचे, अखंड रायआवळ्य़ांचेही. लहानपणी केव्हांतरी मामाने तिवारीकडच्या भरल्या लाल मिरच्यांचे लोणचे आणले होते. तसे माझे व लोणच्यांचे फारसे सख्य नाही. भाज्यांचे ताजे लोणचे वगळता आंबट लोणची प्रकार भावत नाही मला. कसे कोण जाणे पण या मिरच्या मात्र खूप आवडल्या, मनात घर करून राहील्या. गेल्यावेळी कोरम मॉल ( ठाणे ) मधे तिवारीचे ( गिरगावातल्या ) दुकान आले आहे कळताच धाव घेतली. बरीच गर्दी होती, नेहमीचे पदार्थ दिसत होते पण लोणची दिसेनात. म्हणून तिथे असलेल्या दोघांना विचारले तर त्यांनी कानावर हात ठेवले. खरे तर त्यांना फारशी माहीतीच नव्हती आणि इंटरेस्टही नव्हता. गिरगावात जाऊन आणायचा मोह होत होता पण तितका वेळ नव्हता. पुढच्यावेळी पाहू म्हणून नाद सोडला खरा पण इथे आल्यावर ’ एशियाना ’ ( एशियन मार्केट ) मधे अचानक लाल मिरच्या दिसल्यावर मात्र राहवले नाहीच.

साहित्य :
दहाबारा ताज्या लाल मिरच्या
चार चमचे बडिशोपेची पूड
तीन चमचे लाल तिखट
चार चमचे गरम मसाला
दोन चमचे मोहरीची पूड
दोन चमचे मेथीचे दाणे भाजून पूड करून
दोन चमचे धण्याची पूड
पाच चमचे मीठ ( कोरडे )
दोन मध्यम लिंबाचा रस
दोन चमचे आमचूर
गरम करून थंड केलेले तेल एक कप







कृती :

लाल मिरच्या स्वच्छ धुउन पुसून कोरड्या कराव्यात. देठ काढून चमच्याच्या मागच्या टोकाने आतल्या बियाही काढून टाकाव्या. एका ताटात बडिशोपेची पूड, लाल तिखट, गरम मसाला, मोहरी, मेथी, धण्याची पूड, मीठ, आमचूर घेऊन त्यात लिंबांचा रस व चमचाभर तेल घालून सगळे मिश्रण चांगले एकजीव करावे. नंतर मिश्रण मिरच्यांमधे घट्ट ( ठासून ) भरावे. एका कोरड्या बरणीत या भरलेल्या मिरच्या ठेवून वरून गरम करून थंड केलेले तेल ओतावे. मसाला थोडासा उरलेला असेल तर तोही वरून त्यात घालून बरणीचे झाकण लावून हलवून ठेवावे. दर दोन दिवसांनी बरणी हलवावी म्हणजे तेल चांगले मूरत जाईल. साधारणपणे महिनाभराने मिरच्या खाण्यायोग्य होतील. या मिरच्या करायला फारच कमी वेळ लागतो मात्र नंतर महिनाभर धीर धरायला हवा. अर्थात या धीराचा मोबदला पुरेपूर मिळतोच. अतिशय चविष्ट लागते हे लोणचे. बडिशोपेचा एक वेगळाच स्वाद, मधूनच मेथीचा किंचित कडवटपणा, आमचूर व लिंबामुळे आलेली चटकमटक चव... नेहमीच्या लोणच्यांपेक्षा एकदम हटके व चविष्ट.



टीपा :
कच्च्याचं बडीशोपेची पूड करावी. भाजून करू नये. लगेच स्वाद बदलून जाईल. मोहरीचीही पूड न भाजताच करावी. मात्र धण्याची पूड धणे भाजून घेऊनच करावी. मेथीची पूड चुकूनही न भाजता करू नये. प्रचंड कडू होते.
गरम मसाला आयत्यावेळी करून घालायचा झाल्यास लवंगा, मिरी, दालचिनी, तमालपत्र, दगडफूल, चक्रीफूल, जिरे, शहाजिरे वेगवेगळे भाजून घेऊन कोमट झाल्यावर त्याची पूड करावी.
संपूर्ण कृतीत पाण्याचा अंश बिलकूल असता नये. लोणच्याला त्यामुळे बुरशी धरू शकते.
सगळे जिन्नस हाताने कुस्करून चांगले एकजीव करावेत. दोन लिंबाचा रस या सगळ्यात जिरून जातो.
दोन तीन दिवसांनी बरणी हलवायला विसरू नये.
’ चहाचा चमचा ’ हे प्रमाण घ्यावे.

Sunday, July 31, 2011

कोबीच्या वड्या

मुळा, कोबी, फ्लॉवर, नवलकोल सारख्या उग्र वासाच्या भाज्या बरेच जण नाखुशीने खातात. कोबीची किंचित करपवलेली, चण्याची डाळ भिजवून घातलेली भाजी कढईतून डायरेक्ट पानात वाढायची व सोबत तुपाचे बोट लावलेले गरमगरम फुलके, सुंदरच लागते. मात्र थंड झाली की जरा कंटाळवाणी होते खरी. पुन्हा गरम करून खातांनाही त्याची मूळ चव बदलतेच. मग नकोशीच होते. कोबी हा बारा महीने व मुबलक मिळतो. त्यात भरपूर ' क ' जीवनसत्त्वं तसंच ' अ ' जीवनसत्त्वं , लोह आणि कॅल्शिअम असतं. करायला सोपी व चटकन होणारी भाजी असल्याने बर्‍याच घरात आठवड्यात एकदा तरी केली जातेच. कधी चण्याची भिजवलेली डाळ घालून तर कधी बटाटा घालून. कोरडी भाजी असल्याने डब्यासाठी सोयीची होते पण थंड खावी लागल्याने ढकलावी लागते. कोबीमध्ये मिळणारी जीवनसत्त्वे पाहता तो खायला हवा. मग कधीतरी छानश्या वड्या करून खाव्या. कोबीच्या भाजीला नाके मुरडणारेही अतिशय आवडीने वड्या खातात. करायलाही सोप्याच आहेत फक्त भाजीइतक्या झटपट होत नाहीत हेही खरेच. किंचितशी योजकता दाखवली तर अगदी संध्याकाळी कामावरून आल्यावरही होऊ शकतात. रोजच्या पोळीभाजीला फाटा देऊन कोबीच्या वड्या, सूप व पुलाव असा सुटसुटीत मेन्यू एखाद्या पावसाळी संध्याकाळची खुमारी नक्कीच वाढवेल.

वाढणी : तीन माणसांकरिता

साहित्य :


तीन वाट्या किसलेला कोबी
एक वाटी बारीक चिरलेला कांदा
सव्वा वाटी भिजवलेली चण्याची डाळ
दोन टेबलस्पून डाळीचे पीठ
दोन टेबलस्पून तांदुळाचे पीठ
अर्धी वाटी ब्रेडचा चुरा
सहासात ओल्या मिरच्या
मूठभर कोथिंबीर
अर्ध्या लिंबाचा रस
दोन चमचे तिखट, एक चमचा जिरेपूड, दीड चमचा धणेपूड, एक चमचा गरम मसाला, हिंग, हळद
दोन चमचे तीळ, एक चमचा साखर व स्वादानुसार मीठ
पाच ते सहा चमचे तेल ( शॅलोफ्रायसाठी )








कृती :
करकरीत ताजा कोबी किसून घ्यावा. कांदा बारीक चिरावा. ओल्या मिरच्या व भिजवलेली चण्याची डाळ वाटून घ्यावी. खोलगट भांड्यात किसलेला कोबी, कांदा, वाटलेली चण्याची डाळ, कोथिंबीर, लिंबाचा रस, तांदुळाचे व चण्याच्या डाळीचे पीठ, ब्रेडचा चुरा, हळद, हिंग, तिखट, धणेजिरेपूड, गरम मसाला, तीळ, साखर व मीठ घेऊन एकजीव करावे. पाण्याचा एकही थेंब घालू नये. गरज पडतच नाही. शक्य तितके घट्ट भिजवण्याचा प्रयत्न करावा.





कुकरच्या भांड्यात भिजवलेले पीठ घट्ट असल्यास मुटके करून किंवा सैल झाल्यास पसरून घालावे व इडली किंवा मोदकासाठी जसे वाफवतो ( शिट्टी न लावता ) तसेच वाफवून घ्यावे. मध्यम मोठ्या आचेवर साधारण पंधरा मिनिटात होतात.



जरा निवले की सारख्या आकाराच्या वड्या पाडून पसरट तव्यावर तेल सोडून शॉलोफ्राय कराव्यात. चटणी, सॉस बरोबर गरमगरम वाढाव्यात.



टीपा :


भिजवलेला गोळा सैल वाटल्यास एखाद दोन ब्रेडचे स्लाइस मिक्सरमधून काढून घालावेत. ब्रेडच्या चुर्‍यामुळे वड्या कुरकुरीत व्हायला मदत होते.
शक्यतो कोबी घट्ट व करकरीत असावा. कोबीची बाहेरील पाने अलगद सोडवून घेऊन त्यात भिजवलेला गोळा गुंडाळून वाफवल्यास कोबीच्या पानांचा वास लागतो. मी तशा पद्धतीने वाफवून घेतल्यात. परंतु नुसत्या वाफवून घेतल्यास फारसा फरक पडत नाही म्हणून कृतीमध्ये तसेच लिहिले आहे.
उकडलेला गोळा ओलसर असल्यामुळे वड्या नीट कापल्या न गेल्यास तळहातावर घेऊन त्यांना आकार द्यावा.
तीळ थोडे जास्ती घातले तर छान लागतात. हिरव्या मिरच्या सगळ्यांना झेपतील त्या प्रमाणात घालाव्यात.
लसूण व आलंही घालूनही कोबीच्या वड्या करता येतात व त्याही छानच लागतात.
चण्याची डाळ भिजवून घालावयाची नसेल किंवा तितका पुरेसा वेळ नसेल तर डाळीचे पीठ पाच ते सहा चमचे घ्यावे. तांदुळासोबत ज्वारीचेही पीठ असल्यास घालता येईल. ते दोन चमचे घालावे.


Thursday, July 28, 2011

रव्याचा केक

केक किंवा चॉकलेटमधले अंडे मला चालत असले तरी काही वेळा केक किंवा मफीन मधे अंड्याचा वास इतका प्रबळ असतो की आवडीने खाता येत नाही. बऱ्याच शाकाहारी लोकांना केक व तत्सम पदार्थामधले अंडे बिलकुल चालत नसल्याने खाता येत नाहीत. कधीकधी आपल्याकडे अचानक पाहुणे येतात. मग आग्रहाने जेवायला किंवा निदान पोटभरीचे चटकमटक असा बेत केला जातो. आयत्यावेळी ठरवल्याने एक तर शिरा किंवा खीर हेच पदार्थ गोडासाठी समोर येतात. शिरा नेहमीचाच असल्याने नको वाटतो आणि खीर ( शेवयांची - नेमक्या त्या संपलेल्या असतात ) किंवा पाहुण्यांपैकी एखाद्याला खीर हा प्रकारच आवडत नसतो. अशावेळी सगळ्यांना आवडेल असा व अतिशय हलका रव्याचा केक बेताचा चौथा कोपरा पुरा करतो. आंब्याचा मोसम असेल तर रव्याचा केक अजूनच अप्रतिम चव घेतो.

रवा केक ( अंडरहित )

साहित्य :

१ सपाट वाटी मध्यम रवा
१ सपाट वाटी साखर
सव्वा वाटी दही
काजू, बदामाचे काप, बेदाणे, इत्यादी आवडीनुसार ( सगळे मिळून दोन चमच्यापेक्षा जास्त घालू नये )
१ सपाट चहाचा चमचा वेलची पावडर
७/८ काड्या केशर (मिसळण्याआधी १५ मिनिटे चमचाभर दुधात भिजत घालून खलून घ्यावे.)
अर्धा चमचा खायचा सोडा
पाऊण चमचा तूप

कृती :

एका पातेल्यात रवा घ्यावा. त्यात साखर आणि दही मिसळावे. मिश्रण चांगले ढवळून ठेवावे. सुमारे अर्धा तास. तेव्हढ्या वेळात रवा चांगला उमलतो. हे मिश्रण साधारण श्रीखंडाइतपत घट्ट-सैल असायला हवे. त्याचा घट्ट-सैलपण मुख्यत: रव्यावर अवलंबून असतो. रवा जरा जास्त जाड असला तर मिश्रण घट्ट होऊ शकते. घट्ट झाले असेल तर थोडेसे पाणी घालायला हरकत नाही. मिश्रण बहुधा सैल होतच नाही. दहीच पातळ असेल तर मिश्रण पातळ होऊ शकते. मग अशा वेळी पुन्हा थोडा रवाच घालावा लागतो. आणि उमलू द्यावा लागतो. मिश्रण तयार झाल्यावर त्यात वेलची पावडर आणि खललेले केशर घालून चांगले मिसळून घ्यावे. त्यात खायचा सोडा घालावा आणि ५ मिनिटे ठेवावे. त्या ५ मिनिटात फ्राय पॅन तयार करून घ्यावे. फ्राय पॅनला तूप लावावे. हलक्या हाताने मिश्रण ढवळून संपूर्ण मिश्रण फ्राय पॅनमध्ये ओतावे. (आवड असल्यास केकमध्ये सुकी फळे घालावी. त्यामुळे मूळ चव बदलत नाही पण दिसायला चांगले दिसते. )

गॅसवर लहान लोखंडी तवा ठेवावा. (डब्याचे झाकण किंवा तत्सम काहीही चालेल.) त्याच्यावर फ्राय पॅन ठेवावे. म्हणजे गॅसची आच फ्राय पॅनला कमी प्रमाणात आणि सगळीकडे सारखी लागेल आणि केक करपणार नाही. साधारण १५ मिनिटांत केक तयार होतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. गॅसच्या शेगड्या आणि त्यांचे बर्नर लहान-मोठे असतात. अर्थात त्यांची आचही कमी-अधिक असते. त्यामुळे वेळेचा अंदाज प्रत्येकाला वेगळा घ्यायला हवा. फ्राय पॅनपेक्षा मोठ्या आकाराचे ताट त्याच्यावर उपडे घालून नंतर फ्राय पॅन त्यावर उपडे करावे म्हणजे केक अलगद निघून येईल. त्याची पहिली वाफ निघून जाईपर्यंत तो तसाच राहू द्यावा.

केकच्या चौकोनी किंवा आपल्याला पाहिजे असतील त्या आकाराच्या वड्या कापाव्या. समजा आपल्याला त्यावर काही नक्षी काढायची असेल किंवा कुणाचे नाव लिहायचे असेल तर केक पूर्ण गार होऊ द्यावा आणि नंतर नक्षी काढावी/ नाव लिहावे.




टीपा :

आंब्याचा रस घालायचा झाल्यास दही अर्धा भाग व आंब्याचा घट्ट रस अर्धा भाग असे घालावे. केक लगेचच खाऊन संपणार असेल तर आंब्याचे तुकडेही घालावेत. अप्रतिम लागतात!

केक थोडासा खरपुसच होऊ द्यावा. मात्र आचेकडे लक्ष द्यावे, पट्कन लागू शकतो. जर चुकून करपलाच तर तळाचा भाग अलगद कापून काढावा. केक करपला तरी वरच्या भागाला करपल्याचा वास लागत नसल्याने संपूर्ण केक फुकट जात नाही.
हा केक गरमगरम खायला फार चांगला लागतो किंवा गारही चांगला लागतो. केक ५/६ दिवस टिकावा म्हणून फ्रीजमध्येच ठेवावा. पण फ्रीजमध्ये ठेवलेला थंडगार मात्र खायला चांगला लागत नाही. म्हणून फ्रीजमधला केक किंचित ( अगदी किंचितच )पाणी शिंपडून मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खावा. अगदी ताज्या इतकाच चांगला लागतो.



( माझा हात केशराला जरा जास्तच सैल असल्याने थोडे जास्त घातले आहे. हा जो सोनसळी रंग दिसतोय तो त्याच्यामुळेच आला. वर लिहील्याप्रमाणे घातल्यास जरासा फिकट रंग येईल इतकाच काय तो फरक. )

Friday, July 22, 2011

वारली - एक शाश्वतकला

आपल्या भारतात अनेकविध पारंपरिक कला आढळून येतात. अगदी रोज दारी काढल्या जाणार्‍या रांगोळीपासून कलात्मकता व योजना दिसून येते. शिवाय परगणे, प्रांत, शहरे, राज्ये बदलत जातील तसतसा या कलांवरचा प्रभावही बदलत जातो. परंतु या पूर्वापार चालत आलेल्या कला दिवसेंदिवस लोप पावताना दिसत आहेत. सिंधुसंस्कृती, मोहंजदडो मध्ये मातीच्या भांड्यावर, मडक्यांवर काळपट रंगाने रंगवलेली चित्रे असोत, किंवा पूर्वापार सुरू असलेली बाटिक व लाकडी ठसे वापरून कापडांवर त्यांचे छाप उठवून तयार केलेली राजदरबारी आढळणारी जाजमे वगैरे कलांचा, र्‍हास झालेला आढळतो. त्यामानाने सावंतवाडीची लाकडी खेळणी, सौराष्ट्रामधले कशिदा काम - कच्छी वर्क, निरनिराळे मणी, मोती वापरून केलेली तोरणे, दागिने, हैदराबादचे मीनाकाम, बांगड्या, बिद्रीवर्क, राजस्थानी मांडणा इत्यादी अजूनही तग धरून आहेत. स्क्रीन प्रिटींगने सारा बाजार ताब्यात घेतला असला तरीही बांधणी कापडे व साड्याही आपला जम बसवून आहेत. मधुबनी, तंजावर शैलीही आपले अस्तित्व व स्थान टिकवून आहेत.

या सगळ्यात आपला वैशिष्ट्यपूर्ण प्रभाव टिकवून आहे ती महाराष्ट्रातील ' वारली जमातीने ' गेली ११०० वर्षे जपलेली आपली कला. वारली ही महाराष्ट्रातील आदिम जमात. श्री. भास्कर कुलकर्णी यांनी या साध्या, सुंदर, रेखीव केलेतील कलागुण हेरून ही कला समाजापुढे आणण्याचा अनन्य ध्यास घेतला. वारली कला ही स्वतंत्र असून अतिशय संयमाने रेखाटावी लागते. तेव्हा कुठे हा रेखीव व सुंदर आविष्कार जन्म घेतो. वारलींच्या मूलभूत गरजाच अतिशय कमी. जीवनाप्रती, जगण्याप्रती असलेला त्यांचा सरळ दृष्टिकोन त्यांच्या कलेतून पुरेपूर डोकावतो. ' वारली ' ही एक धर्म, प्रथा, श्रद्धा अश्या पारंपरिक गोष्टीत गुंफलेली कला. निरीक्षण, चिंतन व त्यानुसार आकलन होऊन केलेल्या प्रत्यक्ष कृतींचे प्रभावी एकत्रीकरण यांच्या आधारे कला आकार घेते.

निसर्गाच्या सान्निध्यात राहणारे आदिवासी जेव्हां निसर्गातील गोष्टींचा, वस्तूंचाच वापर करून निसर्गाइतकीच निखळ, मोकळी भावपूर्ण चित्रे काढतात तेव्हा त्यातली निर्मळता जाणवल्याशिवाय राहत नाही. ' वारलं ' म्हणजे नांगरलेल्या जमिनीचा भाग, तुकडा; ' वारली ' शब्द याच अर्थाचे समूहनाम/ विशेषनाम आहे. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संस्कृतीची वारली चित्रकला ही अविभाज्य अंग आहे. वारली चे चित्र काढताना सोपे आकार व पांढर्‍या रंगाचा आकर्षक व कल्पक वापर केलेला दिसतो. केवळ त्रिकोण, वर्तुळं, चौकोन, बिंदू, रेघा सारख्या बेसिक आकारांमधून अतिशय सहजसुंदर चित्रांचा होणारा जन्म. वारली लोकं अतिशय साधेपणाने व आनंदी वृत्तीने जगणारे असून त्यांची कलाही तितकीच साधी व आनंद देणारी. सुसंगत मांडणीतून समोर येणारे या कलासक्त समाजाचे चित्ररुपच.

वारली पाड्यात प्रत्येक घराच्या भिंतीवर आतून व बाहेरून चित्रे काढलेली दिसून येतात. शेणाने सारवलेल्या कुडाच्या भिंतीवर त्यांच्या जीवनाचे, सणांचे, देवदेवता, निसर्ग, चालीरीतींचे प्रतिबिंब मुक्तपणे चित्रित केलेले आढळते. होळी, दिवाळी, लग्ने, रोजच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी - अगदी सकाळी उठल्यापासूनच्या रोज घडणार्‍या घडामोडींची चित्रे दिसतात. पिकाची कापणी, मासेमारी, जत्रा, नृत्ये यांना त्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असल्यामुळे चित्रातून तेच व्यक्त केले जाते. पिकाची कापणी झाल्यावर आनंद व्यक्त करताना ' तारपा नृत्य ' केले जाते. सापा-नागाच्या वेटोळ्यासारखे दिसणारे हे नृत्य प्रसंगी आठदहा माणसांचे किंवा अगदी शंभरसव्वाशे जणांना घेऊन केले जाते. मध्यभागी तारपावादक असतो तो तारपा वाद्य वाजवत असतो. ' तारपा ' बांबूची किंवा माडाची पोकळ नळी, माडाची-ताडाची पाती, सुकलेला दुधीभोपळा, मेण व बांबूच्या चिपटीला छेद देऊन केलेल्या जिव्हाळीचा वापर करून बनवले जाते. तुतारीपेक्षा कमी बाक असलेले तारपा वाद्य देखणे आहे. उंबराचा चीक/मेण वापरून बांधणी केली जाते. दोन नळ्यांच्या मध्ये बारीकशी देवनळी असते. हे वाद्य तयार करणे व वाजवणे येर्‍यागबाळ्याचे काम नाही. वाद्य वाजवताना अगदी नाभीपासून हवा भरावी लागते. जराही श्वासावरचे नियंत्रण सुटता नये. तेव्हा कुठे सुरेल सुरावट घरंगळते. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत चालणार्‍या तारपा नृत्याचा प्रमुख तारपावादक असतो.

लग्न ठरले की प्रथम देवाच्या नावाने भिंतीवर रेघा ओढतात त्याला ' देवरेघ ' म्हणतात. नंतर नवरानवरीच्या नावाने रेघा ओढून घोड्यावर स्वार नवरानवरी दाखवून चौक लिहिला जातो. याला ' देव चौक ' म्हणतात. तसे पाहिले तर हे सामूहिकच चित्र असते. एकदा का देवचौक रेखाटून झाला की सगळे मिळून चित्र काढतात. वारली काढण्यासाठी वापरण्यात येणारा पांढरा रंग तांदळाच्या पेजेत डिंक मिसळून तयार केला जातो. गेरूने सारवलेल्या जमिनी, शेणाने सारवलेल्या भिंती व त्यावर पेजेच्या पांढर्‍या रंगाने बांबूच्या काड्या, चिंध्या इत्यादींचा वापर करून वारली त्यांचे जीवनच रेखाटतात. ही चित्रे साधे भूमितीचे आकार कल्पकरीत्या गुंफून जिवंत होतात. श्रद्धा, चालीरीती, रीतिरिवाज, प्रथा यांचे यथार्थदर्शन घडवणारी कला. चित्राखेरीज भिंत म्हणजे बिनकपड्याचा माणूसच. म्हणून अशा भिंतीला ' नागडी ' भिंत समजले जाते. ' पंचशिर्‍या ' हा देव पंचमहाभूतांचे प्रतीक असून त्याचा चौक कुटुंबाच्या रक्षणाकरिता चितारतात. तसेच कसलीही बाहेरची बाधा होऊ नये म्हणून ' सूर्यदेव व चंद्रदेवाची ' चित्रे काढली जातात. बहुतेकवेळी एकाच चित्रात सूर्य व चंद्र एकत्र दाखवले जातात.

पाऊस पडावा यासाठी ' कांबडी नाच ' करून वरुण देवाची प्रार्थना केली जाते. कांब म्हणजे काठी. ज्याच्या हाती घुंगरे लावलेली कांब असते तो कांबडी. पेरणीनंतर पंधरा दिवस म्हणजे साधारण नागपंचमीपर्यंत हा नाच केला जातो. ' मांदल नाच ' हा कोणत्याही दिवशी व कधीही केला जातो. मात्र यात स्त्रिया भाग घेत नाहीत. परंतु या नाचाचे प्रमाण कमी होते आहे. तसेच होळी पौर्णिमेच्या आधी माघी पौर्णिमेपासूनच रोज एक छोटी होळी पेटवून नाच केला जातो. ' घोर नाच किंवा टिपरी नाच ' हा दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत केला जातो. कितीतरी वेळा उपाशीतापाशी राहणारे वारली नृत्यांमध्ये मात्र स्वतःला झोकून देतात. अतिशय भक्तीभावे बेभान होऊन नृत्यात रममाण होऊन जातात.

माननीय ' जीवा सोमा म्हशे ' या प्रसिद्ध वारली चित्रकाराने ही कला सातासमुद्रापार पोहोचवली. अनेक देशांमध्ये जाऊन चित्रे काढली. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. वारलीने समृद्ध केलेल्या भिंती, दालने जगभर आढळून येतात. कलेच्या केलेल्या उत्कट सादरीकरणाचा सहजसुंदर आविष्कार जगभर आपला ठसा प्रभावीपणे उमटवत आहे. ही इतकी जुनी व सुंदर कला शिकण्याचा योग गेल्या दोन वेळच्या मायदेशाच्या भेटीत आला. पहिल्यावेळी केवळ दोन तासांची जुजबी ओळख झाली मात्र गेल्यावेळी माझ्या सुदैवाने श्री. संजय देवधर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. म्हणतात ना, ' चाह है तो राह आपोआप समोर येऊन उभी ठाकते '. तसेच काहीसे झाले. आठच दिवसांनी परतीचे तिकीट असताना अचानक गावकरीत दोन दिवसाच्या देवधर सरांच्या वारली शिबिराची माहिती मिळाली. लगेचच धाव घेतली. सरांनी वारली कलेची समग्र माहिती देऊन वारलींच्या जीवनाची ओळख करून दिली. वारली चित्र कशी काढावीत, ते कसा विचार करतात, त्यांच्या चित्रांमध्ये यथार्थदर्शनाचा विचार नसून भिंतीच्या आतलेही दृश्य कसे दिसेल ते काढले जाते हेही समजावून दिले. सरांच्या मार्गदर्शनाची शिदोरी बरोबर घेऊन घरी परतल्यावर चित्रे काढण्याचा व हा मौल्यवान ठेवा जपण्याचा, साखळीतील एक छोटीशी कडी होण्याचा प्रयत्न.

माझ्यासारख्या सर्वसामान्य परंतु कलासक्त मनांना थोडा नेट लावून प्रयत्न केल्यास सहजी अवगत होणारी निसर्गाचा, जीवनाचा कलाविष्कार प्रभावीपणे दर्शवणारी चित्रशैली सर्जनतेची अनुभूती देऊन जाते.












तारपा नृत्य








( उपरोक्त माहिती श्री संजयसर व जालावरून संकलित )

Monday, July 18, 2011

बळी...

जोराजोरात ओरडण्याचे, धावत येणाऱ्या पावलांचे आवाज जवळ येऊ लागले तसा मंग्या मारायचा थांबला. शांतपणे उभे राहत त्याने चाकुवरचे पोत्याचे रक्त त्याच्याच शर्टाला पुसले. चाकू बाजूला ठेवून खांबाला टेकून गुडघे पोटाशी घेऊन एकटक तो पोत्याच्या भयचकित डोळ्यांकडे पाहत राहिला. शकीच्या उघड्या, वेदनेने पिळवटलेल्या डोळ्यांमधून प्राण गेल्यावरही खिळून उरलेल्या अत्याचाराच्या भयाण खुणांचा बदला मंग्याने पुरा केला होता. चांदणीला दिलेले वचन पाळले होते.

" अरे खून खून....! बापरे! किती निर्घृण हत्या आहे ही. या पोराने केली आहे? एवढुसा तर दिसतोय. किती खुनशीपणे वार केलेत. ही हरामी अवलाद अशीच निपजायची. आईबाप पापं करतात आणि ही घाण उकिरड्यावर टाकून होतात मोकळे. पकड रे त्याला. कसा पाहतोय पाहा बेरड. पळूनही गेला नाही. किती वार केलेत. इतक्या लहान मनगटात इतकी ताकद आली कुठून... ? चल रे. त्याला घेऊन चल चौकीवर आणि या पोत्याची वासलात लावा. हरामखोर मेला ते बरे झाले. फार माजला होता साला. गेली चारपाच वर्षे शोधत होतो पण कुठे लपला होता कोण जाणे. कधीतरी असाच कोथळा बाहेर येऊन मरायचा होताच. पण इतक्या लहान पोराच्या हातून... ए, मारू नको रे त्या पोराला. मी बोलतो त्याच्याशी. चहा पाजा कोणीतरी त्याला." इन्स्पेक्टर ओरडत होता. " काय रे, आईबाप आहेत का? का उकिरड्याची अवलाद तू? " मंग्याला ऐकू येत होते... मायेला कोणीतरी सांगितले असावे. उर बडवत पळत येताना दिसत होती. आता काय उपयोग येऊन. त्यादिवशी कुठे होतीस माये तू? शकी हाकारत होती तेव्हा कुठे होतीस तू माये? कुठं होतीस?

दिवसाचा, कामाचा, माराचा कोटा जवळपास पुरा होत आला होता. गेले काही दिवस एकाच विचाराने मंग्या भारला गेलेला. त्यामुळे कामात चुका होत होत्या. मार वाढत होता. मंगेशचे मन, शरीर सरावलेले. कामाबद्दल, माराबद्दल त्याची तक्रार कधीच नव्हती. ते तर जन्मापासूनच त्याच्या मागे लागलेले. चार दिवसाच्या, धड डोळेही नीट उघडून पाहू न शकणाऱ्या मंगेशच्या हाडाचा सापळा सुपात घालून त्याला व त्याच्यापेक्षा आठ वर्षाने मोठ्या शकीच्या बखोटीला धरून माय त्या दोघांची बोचकी सिग्नलच्या चौकातल्या पुलाखाली आणून आपटे. तिने व बेवड्या बापसाने रोजचे बारा तासासाठी त्या निष्पाप जीवांना भाड्याने देऊन टाकलेले. शकूची आठवण आली तशी मंगेशच्या डोळ्यात टचकन पाणी आले. एखाद्या जीवाची कष्ट करण्याची एक सीमा असते पण शकूच्या बाबतीत सगळे नियम उरफाटेच होते.

रोज सकाळी सात वाजता सिग्नलपाशी माय सोडून गेली की ’ पोत्यादादाच्या ’ रागाच्या व चाळ्यांच्या तावडीत चुकूनही न सापडण्यासाठी ती जीव तोडून धावत राही. सिग्नल लागला रे लागला की सुपातल्या माझ्यासकट जराही न हिंदकळवता ती ते उचलून अतिशय निर्व्याज गोड हसू आणून गाडीवाल्यांपाशी जाई. इतरांसारखे लहानग्यांना चिमटे, चापट्या मारून रडवण्याचे पाप त्या निष्पाप जीवाने कधीच केले नाही. उलट माझ्या गालाला हात लावून ती खुदकन मला हसवण्याचा प्रयत्न करी. बरेचदा मी हसत असे. माझ्यासाठी तो जणू खेळच होता. माथ्यावर रणरणते ऊन, पोटात जेमतेम रडता येईल इतकेच दूध, पाणी मिळत असूनही शकूच्या मायेच्या सावलीत मी बोळकं पसरून, आ.. आ... करत हसत असे. मी असा हसलो की तीही तितकेच गोड हसत गाडीवाल्याकडे, कधी शेजारी बसलेल्या बाईसाहेबांकडे पाही. त्यांच्याही नकळत त्यांच्या खिशातून, पर्समधून रुपया, पन्नास पैसे कधीकधी तर पाच अगदी दहाही रुपये ते देऊन जात. वर किती गोड लेकरं आहेत हो. किती दुष्ट असतील यांचे आई-बाप, अशी अनेक प्रकारचे बोल, तर्क कानावर येत.

इतक्या लहान शकूला सिग्नलच्या लांबीची पुरेपूर कल्पना होती. तिचे त्या ९० सेकंदाचे गणित पक्के होते. एका गाडीपाशी चुकूनही ती पंचवीस सेकंदापेक्षा जास्त वेळ रेंगाळत नसे. पसरलेल्या तळव्यावर काही टेकवले जाणार असेलच तर त्याला २५ सेकंद वेळ पुरेसा आहे. माणसाचे मन द्रवणार असेल तर ते पहिल्या दहा सेकंदातच, आमचे हसू पाहून... नंतरचे १० सेकंद, शकूचे पाठीला चिकटलेले पोट व माझा सापळा पाहून कुठेतरी त्या गाडीवाल्याच्या पोटात तुटण्यासाठी व त्यापुढचे पाच हातावर नाण्याचा स्पर्श होण्यासाठी. त्यानंतर उगाच तिथे रेंगाळून हातावर काहीच पडणार नाही हा शकीचा अंदाज फारच क्वचित चुकत असे. जेव्हां तो चुके तेव्हाही ती कधीच गाडी सोडून पुढे गेलेली असे. गाडीवालाच हाका मारून पैसे टेकवी. बरेचदा रुपयाखाली नसतच ते.

तीन गाड्या झाल्या की शांतपणे ती पुलाच्या खाली सरके. सिग्नल सुटलाय, कर्कशं हॉर्न वाजता आहेत आणि मला घेऊन शकी धावतेय असे कधीच झाले नाही. मला मांडीवर घेऊन लगेच ती चार चमचे पाणी पाजी. स्वत:ही दोन घोट पिऊन घेई. शकीच्या आणि माझ्यामध्ये म्हणे दोन पोरं झाली होती मायेला. ती दोघंही गेली मरून याच सिग्नलवर. शकीच्याच सुपात. माय म्हणे दुसरं पोर मेलं तेव्हा शकी पंधरा दिवस तापली होती. तापात बरळत होती. मायेला वाटलेलं हीही ब्याद मरून जाणार आता. पण कशीबशी तगली. आठ दिवसात पुन्हा सिग्नलवर आली. तेव्हा मी नुकताच जन्मलो होतो. ती दोघे तिच्यामुळेच मेली असे शकी सारखी म्हणत असे. त्यामुळेही असेल, मायेला न सांगता थोड्याथोड्यावेळाने मला दूध पाजत असे. पैशाची विभागणी करून खिशात नीट ठेवी. दिवसभर रस्त्यावर धुळीचा, उन्हाचा, पावसाचा, मारा सोसूनही मी मजेत असे. मात्र माय न्यायला आली की ही मजा संपून जाई. आम्ही दोघं दिवसभराची वणवण करून दमलेली लेकरं नजरेस पडताच ती पहिले काय करी तर शकीच्या पाठीत सटकन एक रट्टा मारे. तिचे बखोटे धरून गदगदा हालवतं घाणेरड्या दोनचार शिव्या देऊन किती कमाई झाली हे विचारत सगळे पैसे काढून घेई. शकूच्या अखंड मेहनतीमुळे दिवसाकाठी बरेचवेळा तीस-चाळीस रुपये जमतच. कधीकधी तर पन्नासही मिळून जात. तरीही माय कधीच खूश होत नसे. शकीने आणि मी तिचे इतके कुठले घोडे मारले होते कोण जाणे पण तिने कधीच आम्हाला मायेने कुरवाळल्याचे आठवत नाही. कदाचित कदाचित तिच्यावर झालेल्या अत्याचाराची पापे असू आम्ही. जे काय असेल ते असो. फक्त जन्म दिलेला म्हणून माय म्हणायचे तिला.

झोपडीत गेल्यागेल्या बेवडा खाऊन दिवसभर झोपलेला बाप पैशाची वाट पाहत असे. सिग्नलवर तो कधीच येत नसे. एकदा पोलिसांनी त्याला तिकडून पकडून नेल्यापासून त्याने धसका घेतला होता. तिघांची वरात झोपडीत शिरताच मायेच्या मुस्कटात खाणकन भडकवत तिच्या हातातले पैसे तो हिसकून घेई. असे झाले की माय त्याला झोंबायला लागे. ती त्याला ओरबाडी, गुद्दे मारी. एकदोन वेळा तिचे हात झटकून बापूस तिच्या पेकाटात कचकन एक लाथ घाले. एखाद्या वाळवीने पोखरलेल्या लाकडासारखी माय उन्मळून पडे. की पुन्हा एक लाथ पाठीत घालून बाप गुत्त्याचा रस्ता धरे. मला घट्ट उराशी कवटाळून शकी कोपऱ्यात थरथरत उभी असे. बाप नक्की गेला याची खात्री पटली की ती मायेपाशी जाई. मला सुपातून काढून पटकुरावर हळूच ठेवून ती मायेला हाक मारे. तिच्या पाठीवरून पोटावरून, गालावरून हात फिरवत राही. दहापंधरा मिनिटाने माय सुबकत सुबकत उठून बसे. शकीच्या इवल्याश्या बंद मुठीत माझ्या चड्डीत लपवून ठेवलेली, कधी पाचाची कधी दहाची नोट असे. जगण्याची लढाई गनिमी काव्यानेच लढायला हवी हे कोणीही न शिकवता त्या बालजीवाला उमजले होते.

कोणाकोणाच्या घरून मिळालेले बरेचदा शिळे व कधीतरी ताजे अन्न मायेने आणलेले असे. त्यातले निवडक चांगले ती बापासाठी ताटात ठेवून देई. उरलेले ती दोघींच्या पानात घेई. बाटलीत दूध भरून मला पाजल्याशिवाय शकीने कधीच घास खाल्ला नाही. हे सगळे मायेकडूनच मला कळले. माय म्हणते, मी तुला फकस्त जन्म दिला पण ती तुझी खरी माय होती. तसेच असणार. तशी शकी मला आठवतेय ती त्या पांढऱ्या पांढऱ्या चादरीखाली झाकलेली रक्ताच्या काळपट लाल रंगाने माखलेली, डोळे सताड उघडे टाकून ताठरलेली. चार वर्षाचा होतो मी. माझ्या अंगात ताप होता म्हणून मला घरीच ठेवून त्यादिवशी ती एकटीच गेली होती सिग्नलवर. तेरा वर्षाची शकू आजकाल पोत्यादादाच्या नजरेत सारखी येऊ लागली होती. पण एकतर मी सतत बरोबर असे आणि शकूही खूप हुशार होती. जगाच्या थपडा खाऊन बेरकी झालीच होती. कुठे धोका आहे हे ती बरोबर हेरी आणि भराभर दुसरा रस्ता धरी. निसर्ग हळूहळू त्याचे काम करत होता. शकूचे गाल वर येऊ लागलेले. नजरेतील चमक वाढू लागली होती. हडकलेले शरीर किंचित भरत चालले होते. त्याची गोलाई वखवखलेल्या डोळ्यांना अचूक दिसू लागलेली. आजकाल भीक मागतानाही ती काहिशी लांबच उभी राही. पोत्यादादाला अनेकवेळा पोरांना अंगाखाली घेताना पाहिलेले असल्याने ती त्याच्यापासून कायम चार हात लांब राहत असे.

पण तो दिवसच उरफाटा निघाला. माझा ताप वाढलेला. मायेलाही बरं नव्हतं. सर्दीने ती हैराण झालेली. माय घरातच आहे हे पाहून शकू मला न घेताच सिग्नलवर निघाली. आज लवकर येते हा का रे मंगेशा. उगाच चळवळ करू नकोस. गपगार पडून राहा गुमान. येताना तुझ्यासाठी खारी घेऊन येईन. असे मला सांगून ती गेली ती चादरीत गुंडाळूनच परत आली. पोत्यादादाने माझ्या निरागस, निष्पाप शकूचा लचका तोडला होता. एकदा, दोनदा, तीनदा.... पोलिसांचे शब्द कानावर पडत होते, तिने ओरडू नये म्हणून त्याने तिच्या तोंडावर हाताचा पंजा इतका घट्ट दाबून धरला होता की ती कधी मेली तेही त्याला कळले नाही. तो तसाच तिला ओरबाडत असताना कोणाचेतरी लक्ष गेले आणि एकच कालवा झाला. त्याच्या वजनाने छातीचा पिंजरा पिचून गेला, इवलेसे शरीर फाटून तुटून गेले. पोलीस म्हणत होते की शकूचा प्राण लगेचच गेला असावा. बरे झाले, शकी लगेच मरून गेली ते. निदान मेल्यावर तिला वेदना जाणवल्या नसतील. पोत्यादादाच्या अंगाखाली असलेल्या तिच्या देहाचे हाल तिथेच शेजारी उभे राहून कदाचित तिने पाहिले असतील. ओठांची हिंपुटी करून हमसाहमशी ती रडली असेल. माये, वाचव गं तुझ्या लेकराला या राक्षसाच्या तावडीतून असे म्हणत तिने टाहो फोडला असेल. सगळेच कसे एकाएकी बहिरे झाले गं शके? क्षणाचीही उसंत नसलेल्या सिग्नलवरच्या एकालाही तुझी किंचाळी ऐकू जाऊ नये... ओरडणारा पोचेपर्यंत पोत्या पळून गेला तो गेलाच. पोलिसांनी बरेच शोधाशोध केली पण कोणी म्हणे तो आंध्रात कुठेशी असलेल्या त्याच्या गावी पळून गेला.

शकीचे उघडे, फाटलेले डोळे दिवसरात्र माझा पाठलाग करत राहतात. कधीकधी वाटे ती माझ्यावर नजर ठेवून आहे. कुठल्याही वाईट मार्गाला मी वळू नये म्हणून ती पापणी लवतच नाही. रात्री पोटाशी पाय घेऊन झोपडीतल्या छताच्या भोकातून दिसणारी ती एकच एक चांदणी शकीच आहे नक्की. आताशा चांदणी मधूनच लाल होते. शकूच्या उघड्या डोळ्यात रक्त उतरते.... शकूला डोळे मिटायचे आहेत. शांत निजायचे आहे. ती बदला मागते आहे? बदला. जायज बदला. तिचा हक्क आहे तो. तिचे हक्काचे एकमेव माणूस म्हणून ती माझ्याकडे आशेने पाहतेय. शकूला शांत निजायचे आहे. मला तिच्या ऋणातून उतराई व्हायचे आहे. पंधरा दिवसांपूर्वी सिग्नलवर दाढी वाढवलेला एक हाडाचा सापळा दिसला. आधी माझे लक्षच नव्हते. पण तो वारंवार शकी मेली त्या जागेकडे जाऊन उभे राहून वेड्यासारखे हातवारे करत काहीतरी ओठातल्या ओठात पुटपुटत राही. डोके बडवून घेई, थोबाड फोडून घेई. मला शंका येतेय. पोत्या मला आठवतच नाही. शके, उद्या मी त्याला हाक मारणार आहे. हाक ऐकून वळला तर उद्या रातीला चांदणी उगवेल ती धवल... कोमल... स्नेहल... शांत... निर्मळ...

सत्य घटनेवर आधारित कथा आहे ही. तुकड्यातुकड्याने माझ्यापर्यंत पोहोचली. शकू सोडून ज्याने त्याने आपापल्या कर्माची फळे भोगली. परंतु, अशा प्रसंगात खरा दोषी कोण? शकू, मंग्या, पोत्या, माय-बापूस का या प्रत्येकाची परिस्थिती....??? बळी सगळेच गेले. पण हकनाक बळी गेली ती शकू आणि अन्यायाचा बळी मंग्या. म्हणायला.... अन्यायाचा, शकूच्या प्रेमाचा बदला चुकवला त्याने. पण ते केवळ म्हणण्यापुरतेच. उभे आयुष्य नासले ते नासलेच. केवळ परिस्थिती कारणीभूत असते असे बरेचदा म्हटले जाते. काही अंशी खरेही आहे ते. जनावरेही निसर्गाचा नियम शक्यतो तोडताना आढळत नाहीत. मात्र दोन पायाचे माणूस नावाचे जनावर कधी कुठल्याक्षणी कसे वागेल याचा अंदाज बांधणे अशक्यच. एका जनावरातून दुसऱ्याचा जन्म.... त्यातून तिसऱ्याचा.... साखळी अहोरात्र वाढते आहे.... वाढतेच आहे.... शेवट नसलेली... बळी घेणारी... बळी पडणारी.... जीवघेणी....

( खरी नावे बदललेली आहेत )

Sunday, July 10, 2011

मोकळीक...

जोरदार पावसाची चिन्हे दुपारपासूनच दिसत होती. अर्धा जून उलटला तरी म्हणावी तशी झड एकदाही लागली नव्हती. मेच्या शेवटास वळीव गाजावाजा करत कोसळला. पाहता पाहता चहुबाजूने काळे ढग घेरून आले. उन्हाच्या काहिलीने तापलेला वारा अचानक अंगात येऊ घातलेल्या बाईसारखा वेडावाकडा घुमू लागला. शुष्क, हल्लक पानांची स्वत:ला तुटू न देण्याची तारांबळ उडवत, भुईवरल्या कोरड्याठाक धुळीला मन मानेल तसे वारा दौडवू लागला. जिथे जिथे घुसता येईल तिथे तिथे घुसून वळीवाची दवंडी पिटू लागला. अरे तारेवरचे कपडे काढा रे, वाळवणं उचला रे, चा हाकारा कानी पडून मनांनी त्याची नोंद घेईतो मोठे मोठे टपोरे थेंब एकमेकाची पाठ धरत धरेवर कोसळू लागले. जे जे धारांच्या सपाट्यात सापडले त्या सगळ्यांना सचैल न्हाऊ घालत स्वच्छ करून टाकले. डांबरी रस्ते, झाडे, घरांच्या भिंती, गाड्या, माणसे, सारे सारे आंर्तबाह्य धुतले गेले. उन्हाचे तडाखे न सोसून अगदी कोरडीठाक झालेली डबकी, धुळभरल्या पाण्याने गढूळ भरून गेली. चातकासारखी डोळ्यात प्राण आणून वाट पाहणारी धरा अचानक आलेल्या त्या टपोऱ्या थेंबांच्या लगटीने काहीशी सुखावली. पण धारा तिरप्या होत्या. धरेला ठाऊक होतं. हे सुखं काही काळाचंच आहे. चांगला पाचसहा तास दणकून धुमाकूळ घालून जसा आला तसाच पाहतापाहता वळीव बरसवणारे काळे ढग घेऊन वारा पसार झाला तो झालाच.

त्यानंतर पुन्हा सुरू झाला तो असह्य उकाडा. उगाच एक तुकडा टाकून तोंड चाळवल्यासारखे करून पावसाने पुन्हा सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळवले होते. शाळा सुरू होऊन आठवडा झाला. पोरांच्या रंगीबेरंगी छत्र्यांचे, पावसाळी चपलांचे कोरेपण संपेचना. गरगर फिरणाऱ्या पंख्याच्या पात्यांना माखलेली धुळीची पुटं कोरडीठाक झाल्याने पुंजक्यापुंजक्याने गळू लागलेली. भिंतीच्या सांध्याजवळ चुकून जरी टेकलं गेलं की गुदमरायला होऊ लागलं. भिंतीचे कोरडे फूत्कार सोसेना झाले. हवेतील संपूर्ण आद्रता शोषली गेल्याने हवेलाच हल्लकपण आलेले. आजची सकाळ उजाडली तीच एक गदगदलेपण घेऊन. सूर्याच्या तापाने कळस गाठला. वाटले सूर्यही करपलाय. अंगाचा दाह त्यालाही सोसवेना झाल्यासारखा. समोर सापडेल त्या ढगाच्या पुंजक्यानं मागे तो लपू लागला. ते विरळ पुंजके त्याच्या तापाने अजूनच फाटत जाऊन सैरावैरा पळू लागलेले.

सूर्य आणि ढगांची ती पकडापकडी डेस्कवरून एकटक पाहत रमा बसली होती. ’आसमंतातली शुष्कता मोठी की अंतरंगातली... ’ याची शोधाशोध गेले काही दिवस सुरू होतीच. ’ ओलावा ’ कसा झिरपत जातो. मग ती ’ ओल ’ भिंतीतली असो की मनातली. तिला भिनून जाणेच कळते आणि जमतेही. रमेच्या मनातही अश्याच काही तीव्रतेने भिनून तिला सर्वांगी ओलेती करून अचानक हात आखडता घेत घेत शुष्क झालेल्या ओलाव्यांच्या पडलेल्या भेगा, करपट होऊन करवडलेल्या.

पहिली भेग न कळत्या वयातली, मग दुसरी, मग तिसरी.... प्रत्येकवेळी नवी आशा, नवा ओलावा. प्रत्येकाचा शेवट मात्र ठरलेला. पुन्हा उभारी. नव्याने मांडलेले गणित. आधीच्या भेगांच्या अनुभवाची उजळणी करून आखलेला रस्ता. डोळ्यात तेल घालून दिलेला पहारा... इतकुशीही चूक होऊ नये म्हणून दक्ष राहून केलेल्या वेगळ्याच चुका. तरीही शेवट ठरलेलाच..... का? का? उत्तर शोधूनही मिळत नाही... समोर दिसत राहतात त्या कातडीवरच्या फाकत चाललेल्या चौकटी. डोळ्याखालची वर्तुळं..... आणि साचलेला, ओरबाडणारा असह्य एकांत!

दुपार तापू लागली तसतसे कुठुनसे काळेकुट्ट ढग एकामागोमाग एक जमू लागले. पाहता पाहता आभाळ गच्च भरून गेले. सूर्याची भेदकता निष्प्रभ झाली. काळ्या ढगांची आक्रमक दाटीवाटी, सौदामिनीचे त्यांना कडाडून छेदत लखलखणे, पाठोपाठ तिला दाद देत त्यांचे रोरावतं येणे. मधूनच एखाद्या काळ्याकुट्ट ढगाला सोनेरी किनार लावत धडपडत डोकावणारा सूर्य. जीवन घेऊन बरसणाऱ्या थेंबांच्या आगमनाची वर्दी देण्याचा लाडका खेळ या साऱ्यांनी मांडलेला. ढगांनमधून मोकळे होते होत थेंब बरसू लागले. खिडकीत उभे राहून पापणीही न लववता रमा सृष्टिची धडपड पाहत होती. आजूबाजूला चाललेल्या गडबड गोंधळाचे स्वर कानावर पडत होते पण त्यात ती कुठेच असणार नव्हती. असेही तिला कोणीही गृहीतही धरले नव्हते.

" अगं, रमा कधीपासून खिडकीला चिकटली आहे. पाहिलेस का? "

" हो. पाहतेय. तिचे बरे आहे गं. कोण आहे घरी वाट पाहणारं? नाही वेळेवर पोचली किंवा मी म्हणते अगदी एखादा दिवस गेलीच नाही घरी तरी कुठली चिल्लीपिल्ली रडणार आहेत का नवरा वाट पाहणार आहे? तिच्या मर्जीची ती मालक. नाही तर आमची कुतरओढ पाहा. या मेल्या पावसालाही आताच कोसळायला हवे का? जरा संध्याकाळची लोकं गाड्यांमध्ये चढू देऊन अर्ध्या रस्त्याला लागू देत म्हणावं मग काय तो पड रे. पण नाही. चल चल, रमेसारखी मोकळीक नाही आपल्याला. " मैत्रिणींचे म्हटले तर सत्य म्हटले तर कुचकट भाव दर्शवणारे स्वर कानावर पडत होते.

’मोकळीक’.... खरेच!

आपल्याला काय सगळीच मोकळीक.

ना विचारणारं कोणी ना वाट पाहणारं कोणी.

पाशच नाहीत.

जे होऊ घातलेले, त्यांची घट्ट वीण घालणं आपल्याला कधी साधलंच नाही.

पण हा दोष माझा एकटीचा कसा?

तेही तितकेच कारणीभूत असूनही पराभूत मीच.

असं कसं?

खोल खोल, ओढाळ डोह मनात काठोकाठ भरून वाहत असतानाही भेगा कश्या पडत होत्या त्याचं कोडं कधी सुटलंच नाही.

आज पुन्हा एकदा टपोरे थेंब आसुसून कोसळणार आहेत!

आज पुन्हा एकदा धरेला मोकळीक मिळणार आहे!

तप्त गात्रे सुखावतील. तरारतील.

माझं मन चातक पक्षी झालंय...

पुन्हा एक दान पडू दे पदरात. फाटलेल्या ओठांना मिळू दे ती ओढाळ ओलसर उष्ण उब...

माणसांच्या या अथांग समुद्रात कुठेसा हरवलेला, माझा असलेला एखादा धागा त्या उलगडत जाणाऱ्या थेंबांच्या लडीला धरून माझ्या केसांवरून ओघळत अलगद मनात उतरू दे!

या धरेसारखेच मलाही तृप्त होऊ दे!

मॅडम, सगळे गेले कधीच. तुम्हीही निघा म्हणजे कुलूप लावून मलाही सटकायला. गाड्या बंद पडतील आता कधीही. चला चला.

हो हो. निघालेच बघ! तूही नीघ. घरी बायकोपोरं वाट पाहत असतील.

लिफ्टची वाट न पाहता लगबगीने चार जीने उतरत तिने गेट गाठले. छत्र्यांची लगबग, चपलांची धावपळ. लोंढे येत होते, भरभर गेट रिकामे होत होते. छातीभरून रमाने एक मोठा श्वास घेतला. ओढणी सावरली, पर्स खांद्याला लावून तिने छत्रीच्या बटणावर बोट दाबले. फटकन आवाज करत मिटलेल्या तारा मोकळे होण्यासाठी झेपावल्या. रमेला त्यांनी छत्राखाली घेतले. क्षणार्धात प्रत्येक तारेतून मोती घरंगळू लागले. किंचित गारवा चढलेली हवा, रंगीबेरंगी छत्र्यांवर आपटत उडणारे इंद्रधनू तुषार.... रमेला रमवू लागले. बंद पिंजऱ्यात कोंडलेली रमा त्या कोसळणाऱ्या लडींना धरून वरवर जाऊ लागली. घट्ट मिटलेले, भेगाळलेले ओठ मुक्त हसू लागले. पुन्हा एकवार नव्या आशेच्या लाटेवर तिने स्वत:ला झोकून दिले....... अपरिचिताच्या दिशेने झेपावत धरेसारखी ती मोकळी मोकळी होत गेली.... पाशाच्या भिंतीत गुदमरण्यासाठी!

Monday, June 27, 2011

फणसाची भाजी

साकट्या फणसाची भाजी



वाढणी : आवडीनुसार व उपलब्धतेवर अवलंबून


साहीत्य:

साकट्या फणसाच्या फोडी किंवा मोठे तुकडे घ्यावेत.

फणसाच्या जोडीला घालण्यासाठी ओले वाल किंवा ओला मटार घालावा. ( साकट्याच्या फोडी चार वाट्या भरल्या तर एक वाटी किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्त वाल/मटार घ्यावेत. या दाण्यांमुळे चवीत भर पडते आणि मुख्य म्हणजे भाजी वाढते!! काहीही भर नाही घातली तरी चालते.),

फोडणीसाठी:

भरपूर गोडे तेल (नेहमीच्या भाज्यांपेक्षा ह्या भाजीला तेल जास्त लागते.) मोहरी, हिंग, हळद, सुक्या लाल मिरच्या.

भाजीसाठी:

थोडे लाल तिखट, मीठ, गूळ (हिला गूळ भरपूर लागतो. पण आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त घालावा. हिला कोणत्याही मसाल्याची गरज नसते पण पाहिजेच असेल तर आवडीप्रमाणे मसाला घालावा.)

कृती:

साकट्या फणसाच्या फोडी किंवा मोठे तुकडे कुकरमध्ये उकडून घ्यावे. वाल किंवा मटार असल्यास तेही उकडावे. उकडताना पाण्याचा हबका मारावा. साकट्याचे तुकडे मोठे असल्यास ठेचून घ्यावे. फोडीही थोड्या ठेचाव्या म्हणजे भाजी चांगली मिळून येते.

पातेल्यात/कढईत तेल घालून ते चांगले तापले की मोहरी-हिंग-हळद यांची फोडणी करावी. फणस आणि दाणे एकत्र करून फोडणीस टाकावे. थोडेसे पाणी घालून शिजू द्यावे. नंतर लाल तिखट, मीठ व गूळ घालून परत एक सणसणीत वाफ आणावी. आधीच फोडी उकडून घेतल्या असल्यामुळे भाजी पटकन शिजते.

वरून घालावयाची फोडणी :

लहान कढईत जरा जास्तच तेल घालून नेहमी करतो तशीच मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. (फोडणी जास्त झाली तरी ती ठेवता येते आणि दुसऱ्या कोणत्याही पदार्थावर घेता येते. फणसाच्या भाजीलाच संपली पाहिजे असे नाही.) त्यात सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालावे. किंचित काळसर रंग येऊ द्यावा. ही फोडणी अतिशय खमंग लागते. पानात भाजी घेतल्यावर आवडीप्रमाणे वरून फोडणी घालून घ्यावी.



साकट्या फणसाची भाजी


ही भाजी म्हणजे कोकणची खास देणगी आहे. कितीही केली तरी अपुरीच वाटणारी आहे. कारण सकाळी खाल्ली तरी पुन्हा रात्री किंवा दुपारीही नुसतीच वाटीत घेऊनही खावीशी वाटणारी आहे. फणसाच्या दिवसात कमीत कमी ४/५ वेळा तरी व्हायलाच हवी. तरच जीभ काहीशी तृप्त होते.

कोवळ्या फणसाची भाजी


साकट्या फणसाच्या भाजीप्रमाणेच भाजी करावी. लहानलहान कोवळे गरे आणि कोवळ्याच आठळा असल्याने थोडी वेगळी लागते. पण याचीही चव जिभेवर रेंगाळत राहणारीच आहे हे नक्की!!

कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी



वाढणी : आवडीनुसार व उपलब्धतेवर अवलंबून


साहित्य:

कच्च्या फणसाच्या आठळा काढलेल्या गऱ्यांचे १ इंच लांबीरुंदीचे तुकडे , ठेचलेले किंवा चिरलेले आठळांचे बारीक (शेंगदाण्याच्या आकाराचे) तुकडे, (या भाजीत भरीला काही घालत नाहीत.)

फोडणीसाठी:

भरपूर गोडे तेल (नेहमीच्या भाज्यांपेक्षा ह्या भाजीला तेल जास्त लागते.) मोहरी, हिंग, हळद, चारपाच सुक्या लाल मिरच्या.

भाजीसाठी:

थोडे लाल तिखट, मीठ, गूळ (हिला गूळ भरपूर लागतो. पण आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त घालावा. हिलाही कोणत्याही मसाल्याची गरज नसते पण पाहिजेच असेल तर आवडीप्रमाणे मसाला घालावा.)

कृती:

ठेचलेले किंवा चिरलेले आठळांचे बारीक तुकडे कुकरमध्ये थोडेसे पाणी घालून उकडून घ्यावे. गऱ्यांचे तुकडे उकडायची गरज नाही कारण ते लवकर शिजतात. पातेल्यात/कढईत मोहरी-हिंग-हळद यांची फोडणी करून त्यावर फणसाच्या गऱ्यांचे तुकडे आणि उकडलेले आठळांचे तुकडे एकत्र करून फोडणीस टाकावे. त्यावर लाल तिखट व थोडेसे पाणी घालून शिजू द्यावे. आठळा उकडून घेतल्या असल्या तरी काही वेळा टणक राहतात. त्या नीट शिजल्या तर काजूंसारख्या चवदार लागतात. अर्थात जास्त शिजून त्यांचे पीठ होणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर मीठ व गूळ घालून मंद आचेवर परत चांगली वाफ आणावी. भाजी तयार झाली.

वरून घालावयाची फोडणी :

लहान कढईत जरा जास्तच तेल घालून फोडणी करावी. (फोडणी जास्त झाली तरी ती दुसऱ्या कोणत्याही पदार्थावर घेता येते. फणसाच्या भाजीलाच संपली पाहिजे असे नाही.) त्यात सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालावे. किंचित काळसर रंग येऊ द्यावा. फोडणी खमंग लागते. पानात भाजी घेतल्यावर आवडीप्रमाणे वरून फोडणी घालून घ्यावी.

गरे आपल्या मूळ रंगामुळे आणि हळदीमुळे पिवळेपिवळे, आठळा मधूनच पांढऱ्या, मधूनच लालसर आणि मिरच्यांचे तुकडे लालचुटुक खमंग तळलेले असल्यामुळे ही भाजी दिसतेही अगदी देखणी! आणि चवीबद्दल काय सांगणार? मऊ लुसलुशीत गरे आणि काजूगरासारखे खमंग-गोड आठळाचे तुकडे!! पहिल्या दोन्ही भाज्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसणारी आणि वेगळी लागणारी फणसाच्या गऱ्यांची भाजी. कधीच संपू नये असे वाटणारी!!

टीपा:

कुठल्याही फणसाची भाजी करताना फोडी, तुकडे, अठळा ठेचायला विसरू नये. त्यामुळे त्या लवकर शिजतात व भाजी मिळूनही येते.

ही भाजी वर्षातून अगदीच एखाद दोनदाच होत असल्याने वरून घालावयाची फोडणी करताना तेल जरा तब्येतीतच घालावे. कमी तेल घालून फोडणी केल्यास ती तितकीशी चमचमीत लागत नाही.

ओला मटार/ वाल घालताना त्यांची चव पुढे येणार नाही इतपतच घालावेत. नाहीतर धड ना फणसाची चव धड ना वालाची चव.

या भाजीला कुठलाही मसाला शक्यतो घालूच नये. त्याने फणसाची मूळ चव मारली जाऊ शकते.

Thursday, June 23, 2011

फणस...

मायदेशी येणेजाणे हे नेहमीच हवेहवेसे असले तरी वर्षातील सगळ्याच ऋतूंची मजा लुटता येत नाही. म्हणजे ज्याला सहजी व पुन्हा पुन्हा जाणे शक्य आहे त्यांची बातच निराळी. पण सामन्यत: कुठलातरी एकच सीझन गाठू शकतो. आणि मग त्या अनुषंगाने येणारे सणवार व खादाडी. धमाल करता येते. इथे आपल्याकडचे आंबे, खास करून हापूस आणता येत नसल्याने मायदेशी जायचेच तर निदान या फळांच्या राजाला मनसोक्त खाता येईल तेव्हां तरी जावे. शिवाय शाळांना सुट्ट्याही त्याच दरम्यान असतात.

होळी संपल्यावर हळूहळू आंबे, फणस, काजूची बोंडे-ओले काजूगर, रातांबे, जांभळे, करवंद यांची चाहूल लागू लागते. आंबे तरी एकवेळ सगळीकडे मिळतील. मग भले ते मेक्सिकन असू देत नाहीतर अजून कुठल्या काशीतले. आता हापूसच्या मधुर चवीची, राजस रूपाची, तुकतुकीत सोनेरी अंगावर चढलेल्या केशरलालीची, नुसत्या गंधाने नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेचे पारणे फेडणार्‍या वासाची आठवणही मनात येऊ न देता, मिळतोय ना आंबा इथे, मग कुठला का असेना घ्या खाऊन, असे म्हणत दुधाची तहान पाण्यावर भागवता येण्याचा प्रयत्न तरी करता येतो. पण या राजसासोबत येणार्‍या अष्टमंडळाचा आस्वाद मात्र मिळत नाही. त्यातल्यात्यात फणसाचे तर नामोनिशाण नसते. हा आता टीन मधला फणस मिळतो म्हणा. पण त्याला कुठली असायला आपल्या दारच्या खासंखास फणसाची चव. चहुबाजूने फुटून लेकुरवाळ्या झालेल्या फणसाच्या झाडांभोवती घुटमळत, कुठे इटुकलेपिटुकले तर कुठे मोठे होऊ घातलेले आणि चांगले फोफावलेले फणस हेरत, त्यांच्या वरून खडबडीत भासणार्‍या अंगावरून प्रेमाने हात फिरवत फिरवत अंदाज घ्यायचा. कुठला भाजीचा, कुठला जरासा जून असला तरी अजूनही भाजीसाठी धावेल. फणस पिकू लागला की भाजीसाठी घेऊच नये. एकतर त्याचा वासही गोडसर होऊ लागलेला असतो आणि निबरही.

'कापा आणि बरका ' हे फणसाचे प्रकार. दोन्हीही मस्तच लागतात. दोघांची स्वत:ची खासियत आहे.' कापा ' कसा अगदी सुटसुटीत-खुटखुटीत-करकरीत. पाण्यात राहूनही कोरडा असल्यागत अचळ काढता येतो. अगदी न धुता तोंडात सोडला तरी फारसा चीक लागत नाही. ' बरका ' मात्र धमाल बुळबुळीत अन सुळसुळीत. जिकडून तिकडून तारा येत असतात, हातातून गरे सटकत राहतात, पाण्यात लगोलग टाकला तरीही चीक चिवटपणा सोडत नाही. पण चवीला काय लागतो महाराजा! काप्यालाही मागे टाकेल. दोघांचेही गरे पिवळसर सोनेरी. त्यावरील तकाकी पाहत राहावी. नुसता एकच एक फणस खाण्यात मजा नाही. या जोडगोळीचा आस्वाद जोडीनेच घ्यायला हवा. अगं, याचा गरा अजूनही तितकाच मधुर व करकरीत असतो बरं. आणि हा बरका असला ना तरी इतकी गोडी आहे ना त्याला. की कापतानाचा त्रास पुरेपूर भरून निघतो बघ. सासूबाई सांगत होत्या.



आमच्या शेतात प्रचंड आंबा, काजू, नारळ, फणस, रातांबे, बांधावर जिकडे तिकडे लावलेली करवंदाची जाळी, चिकू, पेरू... हळद, सूर्यफुले, केळी... नुसती धमाल आहे. यंदा मार्च-एप्रिल मध्ये येणे झाल्याने खूपच चंगळ झाली. वल्डकप जिंकून आम्ही शेताकडे प्रस्थान केले. चार दिवस कानात हवा भरलेल्या वासरासारखे नुसते हुंदडलो. शेतातूनच बावनदी जात असल्याने आंबा, काजू, नारळीच्या बागेतून, शेवरीखालून हुंदडून नदीच्या थंडगार पाण्यात झोकून दिले. स्वत:ला तिच्या स्वाधीन करून टाकल्यावर, " किती दिवसांनी आलात गं " असे म्हणत बाहु पसरून तिने आम्हाला अलगद मिठीत घेतले. पाहता पाहता तिच्या मायेच्या उबदार स्पर्शाने आम्ही अंर्तबाह्य पुलकित झालो. किती वेळ डुंबलो तरीही निघावेसेच वाटेना. शेवटी हाकारे आले, " बाजरीची भाकरी, झुणका, ओल्या खोबर्‍याची खास पाट्यावर वाटलेली लसणीची चटणी तयार आहे. चला पटापट. " डोंगर चढून, नदीच्या मायेत आकंठ डुंबून मन भरले असले तरी पोटात होमकुंड पेटले होते. त्यात हा खासा मेन्यू ऐकून क्षणात सगळे घराकडे पळत सुटलो. चुलीवरून पानात पडणार्‍या भाकरीचा खरपूस वास, लसणाची लुसलुशीत आणि झणझणीत चटणी... अहाहा... तडस लागेस्तोवर जेवलो. हातावर पाणी पडताच ज्याने त्याने सोयीस्कर जागा पकडून दिली ताणून.

आमचे घर

नारळ





यावर्षी दोनदा मोहोर आला पण दोन्ही वेळा गळून गेला
थोड्याश्या कैर्या लागलेल्या...


काजू

संध्याकाळी सूर्य अस्ताला जाऊ लागला तशी विलक्षण शांतता पसरली. दूरवर घरी परतणाऱ्या गायींच्या गळ्यातील घंटांचा किणकीण नाद या निरवतेला भेदत होता. नारळीच्या झाडांवर उतरत गेलेले निवलेल्या सूर्याचे किरण, चहूकडे पसरलेला संधिप्रकाश, रातकिड्यांची किरकिर, मधूनच येणारा बेडकांचा डरावं डरावं, अचानक टिवटिवत गेलेली एखादी चुकार टिटवी. अंगणात घराच्या पायऱ्यांवर बसून मूकपणे त्या वातावरणात विरून गेले.



किर्र अंधार पडला आणि भानावर आले. अंगण दुधाने उजळून निघालेले. नजर आसमंतावर गेली आणि तिथेच खिळली. काळ्याभोर आभाळात लाखो करोडो चांदण्यांचा अक्षरशः खच पडला होता. कित्येक वर्षात इतके विलोभनीय दृश्य पाहिले नव्हते. डोळ्यांचे पारणे फिटले. पळत गच्चीवर जाऊन त्या अथांग पसरलेल्या दूरस्थ विश्वाच्या भव्यतेत मनातल्या सगळ्या भावांना डोहाच्या तळाशी ढकलून स्वतःला संपूर्णपणे विलीन करून टाकले. तादात्म्य पावणे म्हणतात ते बहुदा हेच असावे.



दुसर्‍या दिवशी अगदी निवडून निवडून कच्चे फणस उतरवले, निगुतीने मन लावून त्याची भाजी केली. पंचेंद्रिये एकवटून अगदी टल्ली होऊन ती अग्रास खाल्ली. तरीही मनाची तृप्ती होईना म्हणून चार फणस घेऊन मुंबई गाठली. त्यांचीही भाजी करून पुढल्या दोन तीन वर्षांच्या समाधानाची बेगमी करून घेतली. निघता निघता १०० रुपयाला एक या भावाने का होईना चक्क हापुसाचीही चव चाखता आली. चला पावसाची मनोहरी रुपे नाही पण कोकणचा मेवा तर पदरी पडला.

यावेळची मायदेशवारी काही अंशी सार्थकी लागल्याचे समाधान घेऊन भरारी घेतली. इथे आले, येऊन जुनी झाले पण फणसाच्या भाजीची जिभेवर रेंगाळणारी चव काही कमी होईना. तशी अगदी येताजाता होणारी भाजी नसली तरी बहुतेकांच्या घरी निदान एकदातरी होतेच. केळफुलासारखेच फणसाचेही बाळंतपण बरेच करावे लागते खरे पण श्रमाचा पुरेपूर मोबदला मिळतोच मिळतो. आपल्याकडे सर्वसाधारणपणे बाजारात मिळणारा भाजीचा फणस काहीसा गरे होऊ लागलेलाच असतो. परंतु निरनिराळ्या रूपातल्या फणसाची भाजी करता येते व त्याची चवही त्यानुसार बदलते. बरीच वर्षे शेतावर जाऊन जाऊन, सासूबाईंकडून फणस व त्याची भाजी याविषयी बरीच माहिती गोळा केली. तुम्हालाही कदाचित माहीत असेल....


यात तिन्ही फणस अगदी नीट कळून येत आहेत


फणसाची भाजी

फणसाची भाजी करण्यासाठी सगळे ' कच्चे फणस ' उपयोगी पडतात. पण वेगवेगळ्या अवस्थेतील फणसाची भाजी वेगवेगळी होते आणि सर्व प्रकारच्या भाज्या चांगल्याच लागतात. अगदी कोवळा, मध्यम कोवळा आणि गरे झालेला. सर्वसाधारणपणे अशी विभागणी होऊ शकते. या तिन्ही भाज्यांची चव, स्वाद वेगवेगळा येतो पण प्रत्येक प्रकारची भाजी उत्तमच होते.

१. साकटा फणस म्हणजे अगदी कोवळा फणस. त्याच्यात अजिबात गरे झालेले नसतात. अशा फणसाची भाजी उत्कृष्ट होते. बाहेरून साकटा कसा ओळखायचा? ज्या फणसाचे काटे बारीक आणि अगदी जवळजवळ असतात तो बहुतेक साकटा निघतो. फणस विकणारेच फणसाचे काटे काढून त्याचे मोठेमोठे तुकडे करून देतात. त्याची पावही (म्हणजे मधला दांडा) कोवळी असते. तीही काढून टाकावी लागत नाही. जरासे काटे रुंदावले तरीही तो कोवळाच असतो. पण त्याची पाव जर जून झाली असेल तर ती काढावी लागते कारण ती शिजत नाही. भाजीवाल्याला ते समजते. तो पाव काढून टाकतो. ह्या फणसालाही साकटाच म्हणतात. फणस कापण्याचे प्राथमिक काम भाजीवाल्याने करून नाही दिले तर आपल्याला करावे लागते.


वर्तमानपत्राचा मोठा कागद पसरावा. त्याच्यावर विळी ठेवावी. सुरीने कापायचा असेल तर लाकडाचा किंवा प्लॅस्टिकचा तुकडा घ्यावा. एका रुंद भांड्यात पाणी घ्यावे. विळीच्या किंवा सुरीच्या पात्याला तेल (गोडे) लावावे. पाण्यात २/३ चमचे तेल घालावे. आपल्या हातांनाही तेल लावावे. प्रथम काटे काढून नंतर जरूर असल्यास पाव काढावी. १/२ इंच लांबीरूंदीचे तुकडे चिरून घ्यावे. ते पाण्यात टाकले की पाण्यात तेल असल्यामुळे फणसाचा चीक निघून जातो.

२. फणसात गरे व्हायला सुरुवात झाली तरीही तो सुरुवातीला कोवळा फणसच असतो. गऱ्यांच्या बाजूला बारीकबारीक पात्यांचे आवरण असते. ह्या पात्यांना सांगूळ म्हणतात. सांगळं कोवळी असेपर्यंत ह्या फणसाचीही साकट्यासारखीच भाजी करता येते. अर्थात त्याची पाव काढावी लागते. अगदी कोवळ्या साकट्यापेक्षा ही भाजी थोडी वेगळी लागते पण छानच लागते. आपण चिरायची असल्यास वर सांगितल्या प्रमाणेच चिरावी.

३. गरे झालेल्या फणसाची भाजी म्हणजे खरे तर ती गऱ्यांचीच भाजी असते. प्रथम फणसाचे गरे काढावे लागतात. भाजीवाल्याने काढून दिले तर उत्तमच. नाहीतर फणसाचे मोठे तुकडे करून त्यातील सांगळं बाजूला करण्यासाठी बोटांना तेल लावून मधला गरा काढायचा असतो. गरे काढल्यावर त्यांतील बिया म्हणजेच आठळा काढायच्या. त्यावर एक पापुद्र्यासारखे आवरण असते तेही काढून टाकावे लागते. थोडेसे किचकट काम आहे पण भाजीची चव आठवावी म्हणजे किचकट वाटणार नाही. गऱ्यांचे लहानलहान १ इंच लांबीरुंदीचे तुकडे करायचे. आठळाही ठेचून बारीक तुकडे करून घ्यायचे.

ह्या ३ प्रकारच्या फणसांच्या भाज्या करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. त्यांची कृती टाकतेच लगोलग.

Tuesday, June 21, 2011

तडजोड की अव्याहत चालणारी अपरिहार्यता...

आमच्या वसाहतीचे एक छोटेसे जीम व तरणतलाव आहे. गेले काही दिवस मी नित्यनेमाने जीम मध्ये जाते आहे. जीम व तलाव वसाहतीच्या मानाने फारच पिल्लू आहेत. पण आहेत हेही नसे थोडके या धरतीवर उपयोग करून घेण्याचा माझ्यासारखाच प्रयत्न इतरही करत असतात. सुरवातीला तरणतलावावर सकाळी व संध्याकाळी बराच गजबजाट असायचा. सकाळी भरणा असे तो बायकांचा. अगदी लहान पोरींपासून ते आज्यांपर्यंत. बराचश्या तेराचौदा ते वीसबावीशीतल्या पोरी स्वीमसूटमध्ये सनबाथ घेत पहुडलेल्या. तलाव रिकामाच. अगदी बापुडवाणा दिसायचा. एक डुबकी तरी कोणी मारेल पण नाही. अक्षरशः एक तरंगही उठत नसे. संपूर्णपणे पाण्याने भरलेला असूनही कायम तहानलेला भासायचा. आशेने कधी तारुण्याच्या उंबरठ्यावरील पोरींकडे पाही तर कधी आज्यांचे अखंड संवाद निमूट ऐकत राही. मात्र संध्याकाळी तलाव आनंदाने ओसंडून वाहत असे. धडाधड उड्या घेत डुंबणारी लहान मुले, त्यांची किंचाळाकिंचाळी, बारबेक्यू करणारे निरनिराळ्या वयोगटातील पुरुष, त्यांच्या मोठ्यामोठ्याने चाललेल्या निरनिराळ्या विषयांवरील गप्पा. मधूनच तलावात बुडी मारून पुन्हा बारबेक्युशी झटापट करण्यातली त्यांची लगबग. क्वचित गॅलऱ्यांमध्ये उभे राहून कॉफीचा घोट घेत घेत या सगळ्यांचा आस्वाद घेणारी मंडळी. तलावाची खुशी झलकत असे.

रोज ठराविक वेळी गेल्याने हळूहळू चेहरे ओळखीचे होऊ लागलेले. " हाय! हाव आर या? टेक इट ईझी मॅन... स्टे कूल." सारख्या संवादांची देवाणघेवाण होऊ लागलेली. एक दिवस गेले नाही तर लगेच येऊन दोघीतिघी विचारून गेल्या, " काय गं बरी आहेस ना? काल दिसली नाहीस? " हो. हो मी बरी आहे. काल जरा कामात होते नं म्हणून नाही आले. असे सांगून मी जीममध्ये आले. त्यांची ती विचारपूस मनाला आनंद देऊन गेली. मन एकदम गणेशवाडीत जाऊन पोहोचले. सकाळी ८.१५ ला घर सोडल्यावर कोण कुठल्या वळणावर भेटेल याचे गणित पक्के होऊन गेलेले होते. ज्या दिवशी कोणीच भेटणार नाही त्यादिवशी अक्षम्य उशीर झालेला असे. कुठली गाडी नक्की मिळेल याचेही गणित या साऱ्यांच्या टप्प्यातच गुंफलेले असायचे. पण ही नोंद बरेचदा मुकीच असायची. नजरानजर, हात उंचावून नोंद घेतल्याची पावती देणे, क्वचित दोन शब्द. पण जो तो स्वतःच्या नादात व घाईत असल्याने वर्षोनवर्षे रोज पाहिलेल्या कित्येकांची नावेही मला कधीच कळली नाहीत. कधी कधी ओळीने पंधरा दिवस एखादी गायब असायची. अचानक एक दिवस उत्फुल्ल चेहरा घेऊन समोर यायची. तिला पाहताच नकळत भुवया उंचावल्या जात. डोळे लकाकत. आपसूक हात, " काय गं? कशी आहेस? " विचारून जाई. तिही तितक्याच सहजपणे, " छान आहे सारे. " असे सांगून पुढे सरके. बरेच दिवसांनी कोटा पूर्ण झाल्यासारखा वाटे.

सातत्याने अनेक चेहरे पाहून पाहून ते आपल्या व आपण त्यांच्या ओळखीचे होऊन जातो. मग अवचित ते चेहरे अचानक नव्याच जागेवर दिसले तरी ओळख पटून जाते. असे असूनही मुद्दामहून कोणीही संभाषणाचा धागा छेडत नाही. खरे तर अगदी सहज जी प्रतिक्रिया मनात उमटते, " अय्या! इथे कुठे? " किंवा " अरे, काय म्हणताय? " ती गळ्यातून बाहेर येत नाही. नजरेतून, चेहऱ्यावरील हावभाव हे सगळे आधीच व्यक्त करून गेलेले असतातच, म्हणूनही असेल कदाचित. किंवा, आपण ओळख दाखवलेली आवडेल का नाही? उगाच खेटायला येते/येतोय असे तर वाटणार नाही. रोज तर आपण एकमेकांसमोरून जातो येतो पण अजूनपर्यंत एकदातरी संवाद झालाय का? नाही ना, मग आता कसा करावा? अश्या अनेक शंकाकुशंका मनाला मागे खेचतात. म्हटले तर ओळखीचे म्हटले तर अनोळखी असे हे धागे.

आज सकाळी नेहमीप्रमाणे जीम गाठले. बहुतांशी सकाळी नऊ ते दहा/साडेदहा जणू ते फक्त माझ्याच मालकीचे असल्यासारखे असते. क्वचित दोन तीन आज्या उगाच पाच मिनिटे सायकल पळवून पसार होतात. कधीतरी एक मुलगा वेटस करतो. मधून मधून डोकावून पंधरा मिनिटात गायब होणारे दोघे तिघे आज धडपडून गेले होते. धावपट्ट्याला दोन मैल दमवले. तिसऱ्याची सुरवात केली आणि जीमचे दार जोरात ढकलल्याचा आवाज आला. मागे वळून पाहिले तर चांगली साडेसहा फुटापेक्षा जास्त उंची व सहजी तीनशे पाउंड वजन असेल असा एक पस्तिशीचा गोरा धाडकन जीम मध्ये घुसला. मी त्याच्याकडे पाहायला आणि त्यानेही माझ्याकडे पाहायला एकच गाठ झाल्याने त्याने ' हाय ' केले. प्रत्युत्तर म्हणून मीही हाय म्हणायला जात होते तोवर तो माझ्या ट्रेडमिलशी येऊन पोहोचला. मी ३.८ चा स्पीड पकडलेला असल्याने चटकन घशातून आवाज निघाला नव्हता. त्यात तो माझ्या इतका जवळ का आलाय, या विचाराने मी गोंधळून गेले. एकतर मी एकटीच होते जीममध्ये त्यात असे कोणाच्या स्पेसमध्ये ढवळाढवळ करायला कोणीच कधी येत नसल्याने थोडी अस्वस्थही झाले होते.

माझ्या ट्रेडमिल शेजारीच अजून एक ट्रेडमिल आहे. पण ते बरेच दिवस झाले बंद पडलेय. तो त्याच्यावर उभा राहिला आणि त्याने पुन्हा मला, " हाय ! " केले. मी नुसते एक स्मित केले आणि पुन्हा नजर ट्रेडमिलच्या स्क्रीनवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करत डोळ्याच्या कोपऱ्यातून तो काय करतोय त्याचा अंदाज घेत असतानाच, " अगं, मी आज फार फार चिडलोय. ही माझी गर्लफ्रेंड ना मला जगूच देत नाही. " हे बोलून तो वाकून माझ्या चेहऱ्याकडे पाहू लागला. अर्थातच, मी यावर काहीतरी बोलावे या अपेक्षेनेच. एकतर मी त्याला आयुष्यात प्रथम पाहत होते. त्यात त्याचा स्वर अतिशय गंभीर होता. नाहीतर इथे बरेचदा थट्टेने आपापल्या जीएफ/ बॉयएफ बद्दल बोलणारे खूप जण सापडतात. पण त्यांना कुठल्याच संवादाची अपेक्षा नसते.

त्याचे वाकून अपेक्षेने पाहणे थांबेना म्हणून मी त्याला म्हटले, " अरे, असे प्रत्येकालाच वाटते. तीही हेच म्हणत असेल बघ. " मला मध्येच तोडत तो म्हणाला, " तुझ्या लग्नाला किती वर्षे झाली गं? तू इंडियन आहेस ना? माझे काही इंडियन मित्र आहेत. त्यांची लग्ने होऊन दहा दहा वर्षे झालीत पण अजूनही किती आनंदाने एकत्र राहतात. मला खरेच खूप हेवा वाटतो त्यांचा. माझेच बघ ना... माझा ' एक ' घटस्फोट झालाय. एक मुलगीही आहे. पाच वर्षांची आहे ती. खूप गोड आहे. पण आता ती तिच्या आईबरोबर असते. ती तिच्या आईच्या नव्या बॉयफ्रेंडबरोबर राहते. लहान असताना मीही अश्याच वातावरणातून गेलो असल्याने किती त्रास होतो अश्या विभक्तीचा हे एकदा नव्हे तीनदा अनुभवले आहे. मूल झाले तर त्याला माझ्यासारखे अखंड फरफट होणारे बालपण देणार नाही असे प्रॉमिस मी, " स्वतःला व त्या न झालेल्या बाळाला केले होते. " पण प्रत्यक्षात झाले अगदी तेच. माझ्या लेकीचा उदास चेहरा पाहिला की स्वतःचीच घृणा वाटते. का नाही मी तुम्हा इंडियन सारखी तडजोड करू शकलो? कित्येकदा माझ्या मित्रांना, त्यांच्या बायकांना चिडताना, भांडताना पाहिलेय. अगदी कड्याच्या टोकावर पोचलेलेही पाहिलेय पण असे असूनही ते आजही एकत्र आहेत. केवळ मुलांसाठी तडजोड करावीच लागली असे त्यांनी कितीही म्हटले तरीही कुठेतरी त्यांचे एकमेकांवरचे प्रेम अजूनही संपलेले नाही. मी माझ्या गर्लफ्रेंडला म्हणत होतो की तू तुझ्या मुलाला आण मी माझ्या लेकीला आणतो आणि आपण त्यांना एक सुरक्षित, सुंदर बालपण, तारुण्य देण्याचा प्रयत्न करूयात. आश्वासक, उबदार भीतीरहीत घर. जिथे ते कुठल्याही ताणाखाली वावरणार नाहीत. पण माझी जीएफ अजिबात तयार नाही. ती फक्त तिचाच स्वार्थ पाहण्यात दंग आहे. तिला ना तिच्या मुलाला आणायचे आहे ना माझ्या लेकीला आणू द्यायचे आहे. बिनधास्त, कुठल्याही जबाबदाऱ्यांशिवाय मुक्त जगायचे आहे. "

एका दमात सगळी मळमळ त्याने भडाभडा ओकून टाकली. त्याच्या या सगळ्या बोलण्यातून, मधून मधून शेव्ह केलेल्या डोक्यावर, कपाळावर तळवे घासण्यातून, त्याची असहायता, लेकीची आठवण, अपराधीपण, सारे सारे माझ्यापर्यंत पोचत होते. तो अजूनही बरेच काही बोलत होता. मैत्रीण आणि एक्स वाइफही कश्या स्वार्थी आहेत याची उदाहरणे देत होता. मला तर वाटतेय की मी मैत्रिणी बरोबर आता राहूच नये... या निर्णयापर्यंत येऊन पोहोचला होता. अचानक त्याला जाणीव झाली की आपण बराच वेळ बोलतोय आणि ही तर आपल्या ओळखीचीही नाही. तरीही इतका वेळ शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल दहा वेळा माझे आभार मानून व मला आता खूप हलकं वाटतंय. फार फार गरज होती गं कोणीतरी ऐकून घेण्याची. तू किती चांगली आहेस. भेटू पुन्हा. तुझा दिवस शुभ जावो, असे म्हणून तो आला तसा निघून गेला. माझीही साडेतीन मैलाची तंगडतोड झालेली होतीच. मी ही घरी आले.

त्याच्या बोलण्याने माझे विचारचक्र धावू लागले होतेच. किती सहजपणे त्याने त्याच्या खाजगी गोष्टी माझ्याशी शेअर केल्या होत्या. हिने कधी कोणाला हे सांगितले तर... किंवा आपण एकाच सोसायटीत राहतो म्हणजे जीएफ सोबत कदाचित आपली पुन्हा भेट होऊ शकते. त्याला कुठलेच प्रश्न पडलेले नव्हते. त्याला थोडेसे सबुरीने घ्यावेस व कूल डाउन करण्याव्यतिरिक्त मी कुठलाही सल्ला त्याला दिला नव्हता की उगाच नाकही खुपसले नव्हते.

आपल्या समाजातील तडजोडी करण्याबद्दल, सहनशीलतेवर त्याने बरेच भाष्य केले होते. त्याला दिसलेले, जाणवलेले चित्र चांगले होते. वाटले, खरेच का या चांगल्या चित्रामागे फक्त तडजोड, प्रेम, सहनशीलताच दडलेली आहे? का निव्वळ अपरिहार्यता, नाईलाज व एकाचा अव्याहत सोशिकपणा आहे.का केवळ मुलांमुळे व फक्त मुलांसाठी दिवसागणिक विरत चाललेल्या चादरीला ठिगळं लावत जगायचे. जर तसे नसते तर चाळीस-पन्नास वर्षे संसार करून वयाच्या सत्तरीत आजींना घटस्फोट घ्यावासा का वाटतो? मला आता तरी जगायचे आहे असे त्या ठामपणे सांगतात आणि नुसत्या सांगतच नाही तर तो निर्णय त्या अमलातही आणतात. ऐंशी वर्षाचे आजोबा पंचावन्न वर्षांनी दुसरे लग्न करतात तेही मुलासुना-नातवंडांना सोबत घेऊन. आता कुठे आनंदात जगायला लागलो असेही नमूद करायला विसरत नाहीत. सहन करण्यालाही मर्यादा असायला हव्यात.पती-पत्नीमधले सामंजस्य सहवासाने, मानसिक गुंतवणुकीमुळे वाढत नसेल तर केवळ संसार रेटला इतकेच करावे का? केलेच तर किती काळ.कधीतरी निव्वळ साधेसरळ जगावे.

आज आपल्याकडे विभक्त कुटुंब बरीच दिसू लागलीत असे सारखे ऐकू येतेय, काही अवतींभोवती दिसतातही. पूर्वीपेक्षा जास्त आणि निर्णयाप्रती ठाम व सशक्त. पण समाज, घरचे-दारचे, मुलं आणि जोडीदाराची वाटणारी भीती यामुळे आहे तेच जीवन मरेस्तोवर रेटणारीच घरेच जास्त आहेत. ' नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन ' हेही खरेच. शहर आणि गावं अशी तुलनेची तफावत या बाबतीत फारशी दिसून येत नाही. घटस्फोट घ्यावा असे कधीच कोणीच म्हणणार नाही. मात्र जेव्हा जगण्यापेक्षा मरण्याकडे कल वाढू लागतो तेव्हा तरी स्वतःला अन्यायापासून सोडवायला हवे. माणसाचा एकदाच मिळणारा जन्म कश्या पद्धतीने जगावा याचा हक्क तरी प्रत्येकाला असायला हवा. का तो हक्क फक्त जोडीदाराचा, मुलांचा असे म्हणत आयुष्य खंतावयाचे. जसा अन्याय करणे हा गुन्हा आहे तसेच अन्याय सहन करत राहणे हाही गुन्हाच आहे. आणि तो अखंड करत राहून ' त्याग ' या गोंडस भावनेतून स्वतःची फसवणूक करणे हा त्याहूनही अक्षम्य गुन्हा आहे. कधीकाळी एकमेकांवर भरभरून प्रेम केले होते, अत्यंत ओढ होती म्हणूनच लग्नही केले. म्हणून केवळ ते टिकवण्याचा अट्टाहास स्वत:चे आस्तित्व मिटवून करावा का? समपर्ण हे दोन्हीबाजूने व्हायला लागते. स्वभावानुसार त्याचे प्रमाण कमीजास्त असू शकेल. जात्याच झोकून देणारी वृत्ती व मुलत: आत्मकेंद्रित प्रवृत्ती एकत्र आल्या की एक जण भरडला जाणारच.

या नात्याचे एक अधिक एक बरोबर दोन इतके सोपे गणित नक्कीच नाही. या नात्याची व नात्यातून निर्माण होणार्‍या गुंतागुंतीची व त्यातून निर्माण होणार्‍या प्रश्नांची व्याप्ती फारच मोठी आहे. संसार म्हटला की तडजोड,त्याग,सहनशीलता हवीच. तीही दोन्हीबाजूने. अनेकविध बाबी यात गुंतलेल्या आहेत. कडेलोट होईतो सामंजस्याने एकत्र राहण्याचाच प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला जातो हेही खरेच. परंतु अश्या घरामधला धुमसता तणाव सगळ्यांचेच मानसिक स्वास्थ्य उध्वस्त करत असतो. विभक्तीच्या निर्णयाच्या परिणामांपेक्षाही याचा असर दूरगामी व खोलवर रुतून राहतो. मग स्वतःचा बळी देऊन नेमके काय साधले हा प्रश्न जर आयुष्याच्या संध्याकाळी पडला तर बोल कोणाला लावावा....

Tuesday, June 14, 2011

उकडलेल्या बटाट्यांची भाजी

लहानपणापासून तहहयात जवळपास सगळ्यांनाच ' बटाटे - बटाटे वापरून केलेले पदार्थ ' धावतात. बऱ्याच लहानमुलांचे व काही मोठ्या माणसांचेही हे प्रमुख अन्न आहे असे दिसून येते. सर्वसाधारण पणे सर्रास सगळ्या सोडाच पण हाताच्या बोटांवरही मोजायला गेल्यास बोटे उरतील इतक्या कमी इतर भाज्या, मुले व काही मोठी खाताना दिसतात. अश्या सगळ्यांसाठी बटाटे वरदान ठरलेय.

बटाटे वापरून केलेले बहुतांशी पदार्थ तसे सोपेच आणि सहजी करण्यासारखेच. त्यातून ते वारंवार केले जात असल्याने तोंडपाठ झालेले असतात. अगदी झोपेतही न चुकता करता येतील इतके सोप्पे. मग ती उकडून घेतलेल्या बटाट्याची भाजी असो की काचऱ्या. कीस असो की थालीपिठे. बटाटेवडे असो की आलू परोठे. कांदा बटाट्याचा रस्सा तर फटाफट होतो. त्यातल्या त्यात दमालूला थोडीशी खटपट करावी लागते. आणि बटाट्यांचे पापड. म्हणजे करायला हे सोपेच आहेत फक्त जरा वेळ काढून करायला हवेत.

काचऱ्या किंवा उकडलेल्या बटाट्यांची भाजी, कोणाचीही छानच होत असणार यात माझे दुमत नव्हते. पण काही मैत्रिणींनी " बरेचदा या दोन्ही भाज्या पटकन होतात व करायला सोप्या म्हणून करतो खऱ्या आम्ही, पण काही मजा येत नाही गं." असे वारंवार म्हटल्याने उगाचच या भाजीची कृती टाकायचा मोह झालाय. कदाचित थोडासा फायदा होईल की काय. एकतर बरीच मोठ्ठी( मला तर वाटू लागलेले की मी डोहाच्या तळाशी दडी मारली आहे. कुठूनही उजेडाची तिरीप दिसेना का सूक्ष्मसा तरंग उठेना असे झालेले गेले काही दिवस. अर्थात इतरही भौतिक कारणांनी मोठ्ठा हातभार लावलेला होताच. ) सुट्टी झाली आहे आणि त्यानंतरची सुरवात, " बटाट्याच्या भाजीने " म्हणजे... ( जणूकाही बरेच जण माझ्या पोस्टची वाट पाहत आहेत... भ्रामक भास... ही ही... ) कोणीतरी म्हणाले वाटते मनात, " किती तेल ओतलेय नमनाला, इतक्या वेळात मी किलोभर बटाट्यांची भाजी करून, खिलवून पार झाले/झालो असतो. " हा हा...

वाढणी : दोन माणसांना पुरावी

साहित्य:

चार मध्यम बटाटे उकडून घ्यावेत

एक कांदा मध्यम बारीक चिरून ( फार बारीक चिरू नये )

तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून

एक पेर आले बारीक तुकडे करून

सात/आठ कडिपत्त्याची पाने

मूठभर कोथिंबीर बारीक चिरून

चार चमचे तेल

नेहमीची फोडणी

चवीनुसार मीठ व दीड चमचा साखर

दोन चमचे लिंबाचा रस

कृती:

बटाटे स्वच्छ धुऊन त्याचे दोन तुकडे करून कुकरला ( किंवा पातेल्यात बटाटे बुडतील इतके पाणी ठेवून साधारण दहा ते बारा मिनिटे ठेवावे. सुरीने शिजलेय ची खात्री करून उतरावेत. ) लावावेत. दोन शिट्ट्या झाल्या की आचेवरून कुकर उतरवून ठेवावा. थोडी वाफ कमी झाली की लगेच बटाटे कुकरमधून काढून निवण्यास ठेवावेत.

एकीकडे कांदा, मिरची, आले, चिरून घ्यावेत.

पितळेचे पातेले असल्यास ते घ्यावे, नसल्यास कुठलेही जाड बुडाचे पातेले/पॅन घेऊन त्यात चार चमचे तेल घालावे. तेल चांगले तापले की मोहरी घालून ती व्यवस्थित तडतडल्यावर हिंग( नेहमीपेक्षा किंचित जास्त हिंग घालावा ) घालून हालवावे. हिंग तेलात नीट विरघळला की हळद घालून त्यावर मिरची व आल्याचे तुकडे, कडिपत्त्याची पाने घालून मिनिटभर हालवावे. मिरची किंचित फुटली की कांदा घालून परतावे. आच मध्यमच ठेवावी.

बटाटे आता किंचित निवले असतील. भरभर साले काढून हलक्या हाताने सगळ्या बटाट्यांच्या एकसारख्या फोडी करून घ्याव्यात. बटाट्यांचा भुगा होणार नाही अशा बेताने फोडी कराव्यात.

आता कांदा जरासा लालसर होऊ लागलेला असेल. त्यावर या बटाट्यांच्या फोडी हलकेच घालून सगळे मिश्रण हळुवार परतावे. तीन चार मिनिटांनंतर त्यात स्वादानुसार मीठ व साखर घालून पुन्हा परतावे. परतून झाले की आच थोडी वाढवावी. तीन ते चार मिनिटे न ढवळता शिजू द्यावे. छान खमंग वास दरवळू लागलेला असेलच. बटाट्यांचा रंग पालटायला लागलेला दिसू लागेल. पुन्हा एकदा मिश्रण अलवार हालवून चार ते पाच मिनिटे मध्यम मोठ्या आचेवरच शिजू द्यावे. खरपुडी दिसू लागली की आचेवरून काढावे. कोथिंबीर भुरभुरवून लिंबू पिळावे. पानात वाढताना उचटणे ( कालथा/ उलथणे ) पातेल्याच्या तळाशी घालून खरपुडीसहित भाजी वाढावी. दही, आंब्याचे लोणचे( लिंबूही धावेल ), गरम गरम पोळ्या आणि ही जठराग्नी खवळणारी भाजी. म्हटले तर अतिशय साधेच जेवण असूनही तृप्ती देणारे. पोट भरलेय. भाजीही संपली आहे तरीही तळाशी चिकटलेली खरपुडी खाण्याचा मोह आवरत नाहीच. आणि तीही या सगळ्या एकत्रित तृप्तीच्याही वर एक तुरा खोवेल.

टीपा :

मायक्रोव्हेवला ठेवणार असल्यास बटाट्याचे दोन तुकडे करून किंचित किंचित चिरा पाडून प्रथम एक मिनिट व नंतर ४० सेकंद तीनदा ठेवावे. मध्यभागी दडस आहे असे वाटल्यास पुन्हा ३० सेकंद दोनदा ठेवावे. ( हे अंदाज घेऊन करायला हवे. बरेचदा बटाट्याच्या जातीवरही अवलंबून असते. ) थोडेसे कोमट झाल्यावर सोलून हलकेच एकसारखे तुकडे करून ताटात पसरून ठेवावेत.

जिरे, मेथी फोडणीत घालू नये. जिऱ्यांनी या भाजीचा स्वादच बदलून जातो. नीटशी कुठलीच चव येत नाही.

लिंबू आच सुरू असताना पिळू नये. शक्यतो लिंबू पिळल्यावर भाजी गरम करण्याचे टाळावे. कोथिंबीर फोडणीत घालू नये. यानेही भाजीची चव बदलून जाते.

भाजी सुरवातीला मध्यम आचेवर व नंतर मध्यम मोठ्या आचेवर करावी. आच मोठ्ठी ठेवू नये. जळून जाईल. अतिशय चविष्ट खरपुडी खायला मिळणार नाही. भाजीचा रंग वरून पिवळसर सोनेरी व तुकतुकीत दिसायला हवा. व तळाशी किंचित करपल्याचा भास देणारी कांदा, बटाट्याच्या एकत्रीकरणाची खरपुडी.

नॉनस्टीक पॅन किंवा कढईत करण्यापेक्षा पितळेच्या पातेल्यात ही भाजी केल्यास चव खासच लागते.

Thursday, April 28, 2011

भाराभार चिंध्यांतली एक चिंधी....

सतत काहीतरी करत राहायचे, शिकत राहायचे या नादाने पछाडलेले असल्याने बरेचदा अनेक गोष्टी आत्मसात केल्या जातात. पण लगेच पुन्हा एखादे नवीन आकर्षण समोर येते आणि आधी शिकलेल्या कलेवर पुरेसे काम म्हणा, हात साफ करणे म्हणा होत नाही. मग आत्मसात तर केलेय पण त्यात तितकी नजाकत, सफाई न आल्याने मन खट्टू होते. गिरवणेच राहून गेले तर वळणदार अक्षर येईलच कसे? पुन्हा नुसतेच वळण नाही तर एकसंधपणा नितांत गरजेचा. अन्यथा लयच हरवायची. घाईघाईत केलेली कलाकृती मनासारखी जमणे कठीणच. त्यातून पुरेसा वेळ व पेशन्स याचेही गणित जमवणे दुरापास्त होऊन बसते. अशा अर्धवट, धेडगुजरी गोष्टी एकावर एक जमतच जातात. ' एक ना धड भाराभार चिंध्या ' सारखी गत.

छे! ये ना चालबे! असे म्हणत मनाचा हिय्या केला आणि गाठोड्याची निरगाठ उकलली. अनेक डोकी अहमिकेने, ' मी मी ' करत, एकमेकांना बाजूला सारून गलका माजवू लागली. आधीच मन दोलायमान त्यात नेमका कशाला हात घालावा हे चक्र भिरभिरत होतेच. भर्रकन गाठोडे बांधून टाकले. मात्र कोठीच्या खोलीत सारले नाही. दिसू देत समोर सारखे. ते ही बेटे आता ऐकेना. सारखी चळवळ सुरू झाली. आतला गलका वाढतच होता. त्यांनी आता एकोपा करून माझ्यावर हल्ला चढवलेला. मग सपशेल शरणागती पत्करली आणि गाठोडे थोडेसे किलकिले करून एक बाड बाहेर काढले.

जवळजवळ एक तप झालेले त्यामुळे बरीच धूळ जमली होती. जसे ड्रायव्हिंगचे, पोहण्याचे तसेच बहुतांशी इतरही कलांचे असते-असावे. पण मन साशंक होते. शोमूसाठी शेवटचा स्वेटर विणला होता तेव्हा तो प्रायमरीत होता. जमेल का? का उगाच कोठीच्या खोलीत लोकरीच्या गुंड्यांची भर होईल. नकारात्मक प्रश्नांची सरबत्ती सुरू होऊ लागलेली. सरळ उठले, गाडी काढली आणि दुकान गाठले. विलक्षण सुंदर दिसणारे निरनिराळे लोकरीचे रंग, पोत मोह घालू लागले. प्रत्येकाला गोंजारत, मऊमऊ स्पर्श अनुभवत कोणाकोणासाठी विणावे ची यादी गुंफू लागले. असेच करून ठेवू मग पाहू कोणाला होईल ते, हा प्रकार मला झेपत नाही. समोर चेहरा हवाच. म्हणजे मग रंग, वीण, पोत कसे आपसूक जुळतात. माझा मायदेशी जाण्याचा योग लगेच येणार नव्हता पण नचिकेतची धावती भेट ठरलेली. त्यामुळे त्याच्याबरोबर देऊ धाडून या होर्‍याने अंदाजे मापे योजली आणि धडाका लावला. इथेही ऋषांक-आरुष व आदितेय होतेच. गौराबाई ही मस्कत वरून खुणावत होत्या. दोन्ही हात कमरेवर घेऊन ठसक्यात उभी गौरा दिसत होती. " मावशे, माझी 'याद' आहे ना? " सुरवात जोरदार केली खरी पण भीती होतीच. लोकरीचे गुंडे जागोजागी दिसतील असे पेरून कोठीच्या खोलीला नो एन्ट्री चा बोर्ड लावून जय्यत तयारी केली. :) आणि चक्क आरंभशूर न ठरता बरीच मजल मारली. त्यातले काही नमुने सोबत जोडतेय.



बाबा


ध्रूव


गौराई


आदितेय


आदितेय


ऋषांक


आरुष


हेरंब

( अजूनही आहेत काही व विणकामाचा नाद जोरावर आहे... :) दुसर्‍या भागात टाकते )