साहेबांचे जाऊ दे, एक वेळ त्यांना अडचण सांगता येईल. ते मनाने चांगले आहेत, साहेब असल्याने थोडा वचक ठेवावाच लागतो त्यांना. नाहीतर गुंडेरावासारखे लोक तर विकून खातील की. डायरेक्ट पगारालाच गडी हजर होईल. वर म्हणेल कोणाचा बाप माझे काय बी वाकडे करू शकत नाही. मरो ते.......इकडे प्राण कंठाशी आलेत अगदी. पाणी तरी किती पिऊ. शिवाय सारखं पाणी पिऊन बाथरुमला जावे लागते तो एक डोक्याला ताप झालाय. वाजले बाई एकदाचे सव्वापाच. चला आवरावे आणि निघावे पटदिशी म्हणजे पाच चाळीस बोरिवली तरी मिळेलच.
" अग अगं, जरा दमानं घे पोरी. आता येवढे जोरात धावताना पाय घसरून कुठे पडली-झडलीस तर केवढा कहार होऊन बसेल. अग गाडी येक ग्येली तरी दुसरी येतीया मागनं.... हा दम खा वाईच." सुधाने पार ब्रिजवरून धावत येऊन कशीबशी गाडी पकडली होती. ते पाहून एक आजीबाई तिला समजावत होती. " आज्जे उद्यापासून नाही पळणार, अग खरेच सांगतेय. आत्ताच बघ ना केवढा श्वास लागलाय मला." आजीला असे म्हणत सुधा त्या खच्चून भरलेल्या गाडीत उभ्या उभ्या तरी पाठ टेकता येते का ते शोधू लागली. पाच-दहा मिनिटाने जरा जीव शांत झाला तो लागलीच भुकेने उचल खाल्ली. हो रे बाळा, आता अगदी थोडाचवेळ. तासाभरात घरी पोचलो ना की लगेच तुला खाऊ देईन हं. असे म्हणत ती पोटावरून हात फिरवू लागली. पण तसे होणार नव्हते. घरी जाऊन जेवण दिसेतो आठ नक्कीच.

तोच मागून आवाज आला, " अग मी किती वेळा तुला सांगितले. दोन जीवांची आहेस गं तू. कोणी खायला दिले तर खायचे वगैरे विसर आता. कोणी तुझ्याकडे लक्ष देवो न देवो तुला बाळाकडे व स्वत:कडे लक्ष द्यायला हवे. उद्या बाळाचे नीट पोषण नाही झाले आणि काहीतरी गोंधळ झाला तर जन्माचे नुकसान होईल. भूक लागली की जे मिळेल ते खावे. काही होत नाही. घरचे नाही देत तर दारचे-मोलाने तरी वाढतीलच ना? कोण काय म्हणेल याचा विचार तू करू नकोस. कळतेय का तुला मी काय सांगतेय? " सुधाला वाटले की जणू काही ही बाई तिलाच सांगते आहे सारे. स्टेशनवर उतरले की तो वड्याच्या फोडणीचा वास अगदी आतड्यांनपर्यंत पोहचे. असे वाटे बकाबका तीन-चार वडे खावेत. पण कुठले तेल व कसे केले असतील म्हणून ती कसेबसे पाय ओढत पुढे सरके.
आजही असाच जीव मारत ती स्टेशनबाहेर पडली. रस्त्यात भाजीबाजार लागे. आधी कधीही फारश्या लक्ष न गेलेल्या सगळ्या खाऊच्या गाड्या तिला हाका मारून मारून बोलावू लागत. बाळालाही कसे बरोबर कळते कोण जाणे ते लागलीच रेटे मारू लागे. गेले काही दिवस एका इडली-डोसावाल्याच्या गाडीवरचे वास सुधाला वेड लावत होते. एका दिवस तिने मनाचा हिय्या करून त्याच्या दिशेने पावले वळवली तोच समोरून बिल्डिंगमधल्या काळेकाकूंनी हाकारले. " अगोबाई! सुधा का? अग बरेच पोट दिसतेय की गं. सहावा का? जप हो. तिकडे कुठे निघाली होतीस? अग असे बाहेरचे अन्न खाऊ नको बाई. कसले मेले पाणी वापरतात व काय काय घालतात. सासूबाई करून ठेवत असतीलच की काहीतरी गरम गरम. जा हो घरी जा. " असे तिला सांगून स्वत: मात्र त्याच्या गाडीवरच खायला गेल्या.
जीव अगदी कंठाशी आला होता. पाच मिनिटातच ती गाडीपाशी पोचली. नकळत पावले रेंगाळू लागली. बाळही सारखे ढुशा मारत होते. आज एकदा तरी खाऊच या असे म्हणत ती भरभर जवळ गेली. आणि एकदम तिथेच थबकली. नुकतेच दोघेतिघे खाऊन गेले होते. त्यांच्या उष्ट्या बश्या एका बादलीत पोऱ्या बुचकळत होता. त्या बादलीतल्या पाण्याचा रंग पाहिला आणि सुधाला वाटले आता उलटीच होईल. तशीच ती मागे फिरली. दहा पावले जेमतेम चालली असेल तोच मागून आवाज आला, " ताई, अहो ताई. ऐका ना जरा. " कोण बोलावते आहे म्हणून मागे वळली तर तो इडलीवाला अण्णा हाकारत होता. " ताई, गेले पाच-सहा दिवस मी रोज पाहतो तुम्हाला. पेटसे हो ना? खूप भूक लागते ना शामच्या टायमाला? आज तुम्ही येतायेता थांबलात. मला आले ध्यानात. ताई थोडा भरवसा ठेवा या भावावर आणि या इकडे. " असे म्हणत हाताला धरून नेल्यासारखे तो इडलीवाला अण्णा सुधाला घेऊन गेला.
बाळही जोरदार हालचाल करून चल चल म्हणू लागले. सुधा भारावल्यासारखी गेली त्याच्यामागोमाग. अण्णाने एक खुर्ची देऊन तिला बसवले. मग एका पिशवीतून स्वच्छ घासलेली चकचकीत ताटली-वाटी-चमचा व पेला काढला. तिच्यासमोर इडली पात्रातून वाफाळणारी इडली काढली. एका वेगळ्या डब्यातून सांबार काढले. इडली त्यावर मोठ्ठा बटरचा गोळा आणि वाटीत सांबार ओतून तिला खायला दिले. त्या लुसलुशीत इडल्या आणि सांबारच्या वासाने सुधाच्या डोळ्यातून आसवे ओघळू लागली. ताई आरामशीर खा मी गिऱ्हाईक पाहतो जरा असे म्हणून त्याने तिला तिच्या तंद्रीत मग्न राहू दिले. पंचेद्रिये एकवटून सुधा खाऊ लागली. चार इडल्या पोटात गेल्या तशी सुधा निवली. शांत झाली. बाळ एकदम खूश झाले होते. " अण्णा, पोट भरले माझे. तू इतक्या प्रेमाने खायला दिलेस फार फार आनंद झाला. माझ्या पोटालाच नाही तर माझ्या मनालाही शांती मिळाली. " असे म्हणून सुधा पैसे देऊ लागली.
" अय्यो.....पापं. ताई, मी परमुलखातला माणूस. पोटापाण्याकरता आलो इथे. ना आई-बाप जवळ ना बहीण-भाऊ. माझी बहीण असती तर घेतले असते का मी पैसे? मग का माझ्या हातून पाप घडवतेस? आता बच्चा होईतो रोज तू या भावाच्या हातचे खाऊनच पुढे जाशील. अजिबात काळजी करू नकोस. एकदम स्वच्छ व रोज वेगवेगळा खाऊ देईन हा या माझ्या भाचराला. येशील ना ताई? " सुधाला काही बोलवेना.......घशातून आवाजच निघेना. डोळे पुसत हो नक्की येईन असे म्हणत सुधा निघाली. पुढे हा रोजचाच परिपाठ झाला. अण्णा रोज काहीतरी वेगळे खिलवी. सुधा तृप्त होत असे. नववा लागला. एक दिवस सुधा अण्णाला म्हणाली, " आता पंधरा दिवसात मी आईकडे जाईन. जाण्याआधी तुम्हाला सांगूनच जाईन. पण अचानक काही झाले आणि मला येता नाही आले तरी काळजी करू नका. गेले तीन महीने या बहिणीचे खूप लाड पुरवलेत तुम्ही. लोक म्हणतात देव दिसत नाही. वेडेच आहेत. माझ्या बाळाला विचारा तो सांगेल आम्हाला देव दिसलाय."
दोनच दिवसात डॉक्टरकडे चेकअपसाठी आई व सुधा गेल्या तर त्या म्हणे अग बरे झाले आलीस. ऍडमिटच हो लागली. आज फार तर उद्या पहाटे होशीलच बाळंतीण. मग एकदम धावपळ झाली. ऑफिसमध्ये फोन करून सांगितले, नवऱ्याला व घरच्यांना कल्पना दिली. आई तिला हॉस्पिटलामध्ये सोडून सगळी सोय करायला घरी धावली. पहाटे तिनाला सुधाने चांगल्या आठ पाउंडाच्या परीला जन्म दिला. बाळीने काही त्रास दिला नाही. दमलेल्या सुधाला सकाळी स्पेशल रूममध्ये हालवले व परीला आणून तिच्या मांडीवर ठेवले. डॉक्टरीणबाई आईला म्हणत होत्या, " बाळ अगदी निकोप आहे बरं का. नीट खाल्ले प्याले की मग कसे छान वाढ होते....." पुढचे काही सुधाला ऐकू आले नाही तिला दिसत होता अण्णा. तिने परीला हृदयाशी कवटाळले व हळूच परीला म्हणाली, " अग मामा वाट पाहत असेल ना? त्याला कळवायला हवे. "
पाहता पाहता तीन महिने लोटले. परीने चांगले बाळसे धरले होते. भोकऱ्या डोळ्यांनी सगळीकडे टुकटुक पाहत बसे. एकदोन वेळा आईने इडली केली होती तेव्हा परी अगदी त्यावर ओणवी पडून पडून हात मारायचा प्रयत्न करीत होती. सुधाला वाटले जणू परीला तो गंध व रूप कळलेय, ओळखीचे वाटतेय. परीला घेऊन सुधा सासरी परतली. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी, " आई, आलेच हं का जरा परीला बागेत फिरवून. " असे म्हणून सुधा खाली उतरली ती थेट अण्णासमोर जाऊन उभी राहिली.
अण्णाच्या गाडीपाशी खूप गर्दी होती. पाच मिनिटाने अण्णाचे लक्ष गेले, " हां बोलो जी, तुमको क्या माँगता......... ताई तू? सच में तुम हो? और बच्चीको भी लायी हो? अय्यो........ये ये. ए तंबी खुर्ची लाव रे. मेरी ताई आयी है. " अण्णाचा आनंद डोळ्यात मावत नव्हता. खाणारे काही लोकही थबकून पाहू लागले. सुधाने परीला अण्णाच्या हातात दिले. आधी तो नक्को नक्को ताई, माझे हात गंदे आहेत असे म्हणत होता. पण सुधाने बळजबरीने परीला दिलेच त्याच्या हातात. मोठ्ठे बोळके पसरून परी अण्णाकडे पाहून हसत होती. सुधा उठली अन नुकत्याच काढलेल्या पात्रातल्या एका इडलीचा उल्लूसा कण तिने परीला चाटवला. " अण्णा परीचे उष्टावण केले बघ. तो मान तुझाच होता. तीपण बघ कशी ओळख पटल्यासारखी चुटुचूटू आवाज करतेय आणि तुझ्याकडे पाहून हसतेय. अण्णा, अरे कोण कुठला तू. ना ओळखीचा ना नात्याचा पण या बहिणीसाठी खूप केलेस रे...." तिला मध्येच अडवत बोटांनी चूप चूप म्हणत अण्णा परीची नजर उतरवत राहिला.......
खुपच सेंटी झालंय पोस्ट.. :)
ReplyDeleteआवडलं..
sahi boss mast lihile aahe :) Ashwini
ReplyDeleteमहेंद्र अरे आहेस कुठे तू? हेहे....
ReplyDeleteअश्विनी...:)Thanks ga.
ReplyDeleteखूप मस्त लिहलयेस गं!!! मला आमचे औरंगाबादचे STD वाले काका येत राहिले सारखे डोळ्यासमोर.....मला ईशानच्या वेळेस असेच रोज संध्याकाळी खाउ घालायचे ग ते!!!!
ReplyDeleteलिहीत रहा तू!!!!!
तन्वी असे कोणीतरी कुठेतरी काळजी घेणारे योजलेले असतातच. फक्त ते ओळखता यायला हवेत...:)
ReplyDeleteफ़ारच मस्त लिहीले आहेस ग श्री...अशीच लिहीत रहा..
ReplyDeletesundar lihiley.
ReplyDeleteमाऊ, गौरी अनेक आभार.:)
ReplyDeleteअश्या अवस्थेत सारखी भुक लागते...कोणि गरम गरम खऊ घातलं की किती बरं वाटतं ना. खरेच उष्टावणाचा हक्क त्या मामाचाच होता. मस्त लिहिलय.
ReplyDeleteरोहिणी हो गं...:)
ReplyDeletemasta!! Chhanach lihiles...
ReplyDeleteधन्यवाद मुग्धा.
ReplyDeletemastach g ushtavan
ReplyDeleteसायो...:)
ReplyDeleteखूप सुंदर!
ReplyDeleteआनंद आपले स्वागत व आभार.:)
ReplyDeleteमागच्या वर्षीचे माझे दिवस आठवले...हे इथं परक्या देशात काय काय खायचं आणि देणार कोण?? पण माझी एक मैत्रीण नेमकीच संध्याकाळी नवर्याला फ़ोन करून बोलवुन अधेमधे तिच्याकडचं घरचं काय काय पाठवायची त्याची आणि इथल्या मैत्रीणींनी दिलेल्या सरप्राइज डोहाळे जेवणाची आठवण झाली....छान झालीये पोस्ट...
ReplyDeleteअपर्णा हो गं. इथे घरचे नाहीतच....पण मैत्रिणी मात्र अगदी मन:पूर्वक व प्रेमाने जे जे शक्य असेल ते आवर्जून करतात.सुखद अनुभव.:) आपल्याकडेही मैत्रिणी ट्रेनमधली, बागेतली, ऒफिसमधली...डोहाळजेवणे.....खूप मस्त लाड झाले होते माझे,:)
ReplyDeleteWa! mazyajawal shabdach urale nahit tumachi katha vachalyavar.Dolyat pani yet hote ani ghasa korda hot hota etaki hrudaysparshi vatali mala hi goshta. kadachit me sadhya maydeshapasun door asalyane ani sarakhyat paristhitit asalyane bhav kalala tumachya kathetala.khup sundar!
ReplyDeleteअनामिके, तुला कथा भावल्याचे ऐकून आनंद झाला. मायदेशापासून दूर असल्यामुळे अजूनच भिडली असेल. काळजी घे गं ! :)
ReplyDeleteआभार्स!
Khupach chan aahe article...vachatana dolyat pani aalyashivay rahat nahi...
ReplyDeleteKhupach chaan aahe article..dolyat pani aalyashivay rahat nahi..
ReplyDeleteavadali goshta..khup real hoti jashi ki ti aplyala pan koni asach anna bhetava...thanks for writing and sharing it
ReplyDeleteप्रेमा, अभिप्रायाबद्दल अनेक आभार! :)
ReplyDeleteगौतमी, ब्लॉगवर स्वागत आहे! :)
ReplyDeleteगोष्ट आवडल्याचे वाचून खूप छान वाटले. धन्यवाद!
छान लिहिलय :-)
ReplyDeleteअभिजीत, ब्लॉगवर स्वागत व धन्यवाद! :)
DeleteKhup chan lihilay very nice.
ReplyDelete