जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, September 15, 2010

तो....

काठाशी निष्प्राण पडलेले दगड उचलून उचलून तो तळ्यात फेकत होता
एका मागून एक.... यंत्रवत,
हात - दगड - पाणी - डुबुक..... तडफड,
पाण्याचे ते तडफडणे निरखत होता...... पुन्हा पुन्हा.....

आजकाल बरेचदा तो इथे येतो, वेळी.... अवेळी,
तडफडणार्‍या पाण्यात प्रत्येकवेळी त्याला तोच दिसतो,
एकाकी.... घुसमटलेला

ऊन रणरणते तापलेय रे, जरासा सावलीत थांब की
रस्त्यावर अजूनही जीव बचावून उभे ते झाड, त्याला रोज अडवते
सावली देण्याचा त्याचा तो अट्टाहास, त्याचा जीव गुदमरून टाकते

मुसळधार पावसात भिजणारे ते गरीबाचे पोर
कोरड्या डोळ्यांनी लोकांच्या छत्र्या निरखत होते
त्याला इतके निर्विकार पाहून त्याचे डोळे का भरत होते....

आशेचा किरण ही नसलेल्या मार्गावर तो पुढे पुढे निघालाय खरा
शाश्वत सोडून पळत्याच्या मागे....
कशाची ही अगम्य ओढ? का नुसतीच फरफट?
उत्तर नाही....
तरीही, त्याचं नशीब त्याच्यामागे धापा टाकत येतच राहिले,
त्या बिचार्‍याला पर्यायच नाही.....

ही कुठली ’ भूक? ’
’ अन्न ’ हा केवळ एक शब्द आहे की, अन्न आहे आनंद
का कोण जाणे आजकाल वारंवार हा प्रश्न त्याच्या ’ भुकेला ’ तो विचारत असतो
ती फक्त हसते, तिचे ते हसणे त्याला उगीचच कुत्सित भासते....

जेव्हां उमजले त्याला की, ’ तो ’ आरसा ही आहे
स्वत:पासूनच चेहरा लपवत, स्वत:लाच चुकवत तो कुठेसा पळतो आहे
वेडाच नाहीतर काय....
काळ्या रंगाला अंधारापासून हिरावून घेता येईल का कधी...

कुठले भविष्य, कोण दिशेला...
पलीकडे मायबापाचा श्वास कोंडला
अस्वस्थ टाहो आभाळास भेदूनी गेला
मायेचा हुंदका मुक्यानेच जळून गेला

आता व्यर्थ आहे हिशेब सारा....
सांजवेळी फुटे प्राणांत गलबला
उरलाय फक्त तो आणि त्याचा नि:शब्द आत्मदाह
अन सोबतीला वर्तमानाचा एक भयाण पुंजका,

संपूर्ण रिता......

Saturday, September 11, 2010

गणपती बाप्पा मोरया ! ! !


गणपती बाप्पा मोरया ॥

Friday, September 10, 2010

कधी कुठल्या क्षणी कोण कुठे कसे....

त्यादिवशी नेहमीसारखीच धावतपळत ट्रेन पकडली. लेडीज स्पेशल असल्यामुळे सगळे डबे आपलेच म्हणून मिळाली. अन्यथा दहा मिनिटांची फोडणी होतीच. चला आजच्या दिवसाची सुरवात छान झाली या आनंदात मी डब्यात वळले आणि खिडकीजवळची एकजण खुणावू लागली. ये इकडे. मी लगेच तिच्या दिशेने सरकले. मनात मांडे खात होतेच. घाटकोपरला उतरेल तरी किती छान होईल. अगदीच नाही नाही तर दादर नक्कीच, तरीही चालेलच की. तोच ती उठून उभी राहिली. मी एकदम चकित. तिने नजरेनेच खुणावले, " बस की आता. " मी लगेच स्वत:ला खिडकीशी झोकून दिले. तिची पर्स मांडीवर घ्यावी म्हणून तिच्याकडे पाहत पर्सला हात लावला. तशी ती म्हणाली, " अगं मी उतरतेय मुलूंडला. तू बस आरामात. " असे म्हणून ती दाराजवळ सरकली. चक्क विंडो सीट, तीही अशी अचानक लॉटरी लागल्यासारखी. पावसाचे दिवस होते. मधूनच हलकी हलकी सर येई. थोडासा शिडकावा अंगावर करत हुंदडून जाई. त्या तुषारांशी मग वार्‍याची झुळूक लगट करू लागे. थोडेसे कुंद तरीही आल्हाददायक वातावरण पसरले होते. नजर हळूहळू डब्यात फिरू लागली.

सगळ्या बायकाच असल्याने लेडीज स्पेशलमध्ये नेहमीच एक मोकळेपणा, क्वचित थोडा बिनधास्तपणाही पाहायला मिळे. आपल्याकडे कोणी रोखून पाहत असेल अशी पुसटशी शंकाही जेव्हां मनात डोकावत नाही तेव्हा आपण इतके सहज वागत असतो, त्याचा प्रत्यय हमखास लेडीज स्पेशलमध्ये पाहावयास मिळतो. मला समांतरच परंतु विरुद्ध बाजूस चौघींचा ग्रुप बसला होता. सगळ्या पस्तीस-चाळिशीच्या असाव्यात. डब्यात इतका चिवचिवाट, खिदळणे, टिकल्या-पिनांच्या डब्यांची देवाणघेवाण, मधूनच कोणीतरी खास करून आणलेला ढोकळा, इडली चटणी चा समाचार तर कोणाची क्रोशांची लढाई. या सार्‍या कोलाहलात त्या चौघींची स्तब्धता फार जाणवू लागली. काहीतरी बिनसले होते. थोडे निरखून पाहिल्यावर जाणवले, प्रत्येक जण एकमेकीची नजर चुकवतोय. आणि त्यातही खास करून एकीची तर फारच. आता मला अस्वस्थ वाटू लागले. इतकी मस्त खिडकी मिळालेली. तशात किंचितश्या गारव्याने अंगावर छान शिराशिरी उठत होती. खयालोंमे जायचे सोडून नेमके यांच्याकडे का लक्ष गेले म्हणून मी स्वत:लाच कोसायला सुरवात केली. त्यांचे काय बिनसलेय हे मी त्यांना जाऊन विचारू शकत नव्हते आणि आता हा विचार किती काळ ( ??? ) माझा पिच्छा पुरवेल या विचारानेच मी चिडचिडू लागले.

तोच नेमकी ' ती ' उठली. विक्रोळीला उतरायचे असावे तिला. उरलेल्या तिघींना तिने टाटाही केला नाही की त्यांनीही निरोपाची कुठलीच चिन्हे दाखवली नाहीत. डब्यातून मधल्या पॅसेजच्या गर्दीत मिसळताना अचानक ती म्हणाली, " नेमके काय सांगायचे असेल गं त्याला? तो गेला नं तेव्हापासून हा विचार मला सोडतच नाही. चांगलं दारात उभा राहून मला सांगू पाहत होता, तर मी चक्क दुर्लक्ष करून उद्याच्या ऑफिसची तयारी करायला घेतली. ते पाहून तो हसला आणि म्हणाला, " बरं, बरं. तू आवर, मी आलोच पान खाऊन. मग सांगतो गंमत. " आणि गेला तो गेलाच. जर मी ऐकून घेतले असते तर कदाचित आलेली ’ ती ’ वेळ टळली असती. कदाचित ’ तो ’ खालीच गेला नसता. आता सारेच संपलेय. तो गेलाय, त्याची अव्याहत बडबड शांत झाली आहे. काळ जातोय तसतसे सगळे रुळतील, मार्गस्थ होतील. सत्य स्वीकारून, पचवून पुन्हा उभारी धरतील. मीही धरेनच पण प्रश्न अनुत्तरितच राहील. काय करू गं या प्रश्नाचे आता? " त्या तिघीचे डोळे काठोकाठ भरलेले. आम्हा ऐकणार्‍यांचेही. डब्यात एक चमत्कारिक शांतता पसरली. दोन क्षणातच स्टेशन आले, ती उतरून गेली. नवी फौज ताज्या दमाने आत घुसली, भरभर स्थिरावली. आपापल्या मैत्रिणी शोधून हल्लागुल्ला सुरू झाला.

वाटले, डब्यानेही नकळत एक सुस्कारा सोडला असावा. त्या तिघी व आम्ही आजूबाजूच्या काही जणींनी आवंढा गिळला, डोळ्यातले कढ डोळ्यातच जिरवले. सामान्य अवस्थेत येण्याचा आपल्या परीने प्रयत्न करू लागलो. मन मात्र तिच्या प्रश्नात अडकून पडले. खरेच अनेकदा आपणही असे वागतो. समोरचा उत्साहाने, आवेगात काहीतरी सांगायला येतो आणि केवळ कामे समोर दिसतात म्हणून आपण त्याचा हिरमोड करतो. कधी टीव्हीवर फालतू काही चालू असते त्यात अडकून ( खरे तर अनेकदा हे डेली सोपच सुरू असतात. कोणीतरी कोणाचा कपाटाने छळ करत असते नाहीतर कोणीतरी भेकत असते.... तद्दन फालतूपणा समजत असूनही चिडचिडून आपण टक लावून पाहत बसतो. ) मुलं काही सांगायला आली/ नवरा/बायको महत्त्वाचं बोलत असली तरी आपण दुर्लक्ष करतो किंवा त्यांच्यावर अकारण खेकसतो. तो विषय तिथेच थांबतो. कधीकधी असा कायमचाच थांबतो.

थोडेसे आत्मपरीक्षण केले तर जाणवते, की मी स्वत:च अश्या अनेक गोष्टी थांबवून - थोपवून ठेवल्यात. मीच काय आपण सगळेच करतो आहोत हे. असेच ऑफिसमधले ओळखीचे एक जण. मी लागले तेव्हा असतील पन्नाशीचे. मुलांची शिक्षणं होत होती. मुलीचे लग्न तीन चार वर्षात करायचे होते. सरकारी पगार तो कितीसा, त्यात सगळी मोट बांधायचा उरापोटी प्रयत्न. कटिंग घेताघेता एकदा म्हणाले, " श्री, अगं तुला सांगतो. फार फार इच्छा आहे मला एकदातरी सगळ्यांना घेऊन काश्मीरला जायची. आणि हसू नकोस बरं का पण डोक्यात एक विषय कधीपासून घुमतोय. जरा फुरसत मिळाली ना की कादंबरी लिहिणार आहे. बघशीलच तू. एकदम पर्फेक्ट प्लॉट आहे. सगळी जुळणी झालेली आहे आता फक्त झरझर कागदावर उतरवायचे. " हे लिहितेय मी आत्ता..... अंगावर शहारा आला. डोळ्यासमोर ते जसेच्यातसे आजही दिसतात मला. हे सांगताना त्यांचे लकाकणारे डोळे, भारलेला चेहरा, त्या प्लॉटमधली त्यांची गुंतवणूक ..... सारे सारे दिसतेय.

पगाराच्या दिवसाची वाट पाहणे आणि मिळाल्यावर तीस दिवसांच्या तक्त्यावर मेटाकुटीने त्याचा ताळमेळ जुळवणे यातच जीव हलका होऊ लागला. दुखणी-बहाणी, मुलांच्या मागण्या रोजचे नवीन काही होतच होते. तरीही मधूनमधून काश्मीर आणि प्लॉट यांना संजीवनी मिळत होती. एक दिवस सकाळी नेहमी माझ्या आधी येणारे ' ते ' दिसले नाहीत. दुपार झाली फोनही आला नाही. साहेबांनाही थोडे चमत्कारिक वाटले. असे कधी झालेच नव्हते. दिवस कलला, घरी जायचे वेध लागले आणि फोन वाजला...... आमचे ऑफिस तिथेच थिजले. महिन्याचा तक्ता जुळवताना आयुष्याचा आलेख ढासळला होता. एक लेखक जन्माला येण्याआधीच संपला. आजही माझे विचार त्या प्लॉटशी येऊन अडकतात. काय असेल त्यांच्या मनात?

अनेकवेळा क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीही आपण उगाचच पुढे ढकलत राहतो. ज्या सहज शक्य असतात पण वेळ कमी या एकमेव सबबीखाली छोटेछोटे संवाद, आनंद, भेटी, एखादी वस्तू राहून जाते अन मग ती राहूनच जाते. वेळेची किंमत कधी समजेल, वेळ निघून गेल्यावर.... मग तेव्हा ती समजून तरी काय फायदा. आपण सगळे हे टोक समजूनही थोडीशी सवड मिळाली की करूच या आशेवर-दिलाशावर स्वत:ला मागे टाकत जातो. सवड काही मिळत नाही, ती कधी मिळणारही नसते कारण ती काढावी लागते. हे सत्य समजून अमलात येण्या आधीच अवचित बोलावणेच येते. न टाळता येणारे बोलावणे.

अनेकदा समाज, रुढी, कर्तव्ये, लोकं काय म्हणतील हे आपल्या मनानेच उभे केलेले बागुलवु्वांचे दोर आपल्याला नाचवत असतात. कळूनसवरून आपण त्यांच्या तालावर घुसमटलेल्या मनाने नाचत राहतो. रात्री गादीवर पडलो की या छोट्या छोट्या इच्छाआकांक्षाची भूत छतावर डोकी वर काढतात. पाहता पाहता छत भरून भिंतीवर सरकतात. अन आनंदचा डायलॉग सारखा समोर येत राहतो, " ज़िंदगी और मौत ऊपर वाले के हाथ है जहांपनाह, उसे न आप बदल सकते हैं और न मैं, हम सब रंगमंच की कठपुतलियां हैं, जिनकी डोर ऊपर वाले की उंगलियों में बंधी है, कब, कौन, कैसे उठेगा कोई नहीं बता सकता... " खरेच आपण सगळेच केवळ बाहुल्या आहोत. तो शक्तिशाली बाहुल्यांमध्ये प्राण फुंकतो अन माप भरले की क्षणात दोर कापून टाकतो. आपण म्हणतो मी हे केलं मी ते केलं, मी अमुक करेन - तमुक करेन.... खरंच का? कधी कुठल्या क्षणी कोण कुठे कसे....

Saturday, September 4, 2010

कच्छी दाबेली

" खूप दिवस झाले कच्छी दाबेली कर गं ", नचिकेतची फर्माइश सारखी सुरू होती. मे मध्ये शोमू आला होता तेव्हां केली होती. त्याने आणि त्याच्या मित्रांनी ताव मारला. दुसर्‍या दिवशी सहजच अपर्णाला फोन केला आणि बोलता बोलता तिला सांगितले. आधी ती वैतागली ( प्रेमाने ), नुसते सांगून जळव तू मला. खिलवणार कधी? मग म्हणाली, " अगं निदान कृती तरी टाक म्हणजे मी करेन ना. " पण आदल्या दिवशी शोमूने आधीच जाहीर केलेले, दाबेली झाल्या झाल्या लगेच आम्हाला खायला दे. नुसत्या वासानेच जठराग्नी खवळला आहे. तुझे फोटोबिटो काय ते पुढच्या वेळी करशील तेव्हां काढ. ती पुढची वेळ यायला तीन महीने जावे लागल्याने अपर्णाची इच्छा आज पुरी करतेय. ( सॉरी ) अर्थात हे फोटो पाहून ती जाम भडकणार आहेच तेव्हां आधीच माफीनामा लिहून ठेवलाय गं. जवळ असतीस तर नक्कीच खिलवली असती.

वाढणी : चार माणसांकरिता ( प्रत्येकी दोन या अंदाजाने...... करताना दीडपट प्रमाणाने करा बरं का, म्हणजे कमी का केलीची भुणभूण होणार नाही )

साहित्य :

चार मध्यम-मोठे बटाटे उकडून + कुस्करून

एक मोठा कांदा बारीक चिरून

एका मोठ्या डाळिंबाचे दाणे
( डाळिंब न मिळाल्यास लाल/काळी द्राक्षे मध्ये चिरून घ्यावी.
तीही नसतील तर मनुका घ्याव्यात. )

चिंचगुळाची चटणी एक वाटी

मूठभर कोथिंबीर चिरून

बारीक शेव वरून भुरभुरायला

चवीनुसार मीठ

पाच चमचे कच्छी दाबेली मसाला

चार/पाच चमचे बटर/तूप ( वितळवलेले )

मसाला शेंगदाणे एक मोठी वाटी भरून

दोन वाट्या पाणी

आठ पाव ( आपल्याकडचे बेकरीतले पाव असतील तर अजूनच मस्त )
( किमान आठ हवेतच. शक्यतो दोन लाद्या आणाव्यात. )



कृती:

चिंचगुळाची चटणी :

दहा-बारा खजूर ( बिया काढून कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून घ्या )
एक टेबल स्पून चिंचेचा घट्ट कोळ
तीन टेबल स्पून किसलेला/भुगा केलेला गूळ
अर्धा चमचा धणेजिरे पूड
अर्धा चमचा लाल तिखट
चवीनुसार मीठ घालून लागेल तितके पाणी घालून चटणी करावी.
( अती घटटही नको व पाणीदारही नसावी )

मसाला शेंगदाणे करताना......

दोन वाट्या कच्चे शेंगदाणे
दीड वाटी पाणी
तीन चमचे मीठ
तीन चमचे तिखट ( आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करावे )
चिमूटभर गरम मसाला
एक मोठा चमचा बटर किंवा तूप
दोन चमचे लिंबाचा रस ( ऐच्छिक )

शेंगदाणे, पाणी, मीठ व तिखट एकत्र करून उकडून घ्यावे. मुळात आपण पाणी कमीच ठेवले असल्याने जे उरले असेल ते काढून टाकायचे नाही. एका पसरट पॅनमध्ये एक चमचा तूप किंवा बटर घालावे. ते वितळले की हे उकडलेले शेंगदाणे शिल्लक असलेल्या पाण्यासकट त्यावर घालावेत. आच मध्यम ठेवावी व परतत राहावे. पाणी थोडेसे कमी झाले की गरम मसाला भुरभुरून लिंबाचा रस घालावा. शेंगदाणे जोवर कोरडे होत नाहीत तोवर परतत राहावे. तूप-तिखट-मसाला व लिंबाच्या एकत्रीकरणाने मस्त खमंग वास सुटतो व शेंगदाणे तुकतुकीत दिसू लागतात. साधारण दहा ते बारा मिनिटाने आच बंद करावी. गरम गार कसेही छानच लागतात.




मसाला बनविताना :

उकडलेले बटाटे साल काढून कुस्करून/किसून घ्यावे. एका पसरट पातेल्यात तीन चमचे तूप टाकावे. गरम झाले की लगेच कुस्करलेले बटाटे, मीठ व दोन वाट्या पाणी घालून मध्यम आचेवर झाकण ठेवून पाच मिनिटे ठेवावे. एक वाफ आली की कच्छी दाबेली मसाला घालून हालवावे. मिश्रण कोरडे होते आहे असे वाटल्यास अर्धी वाटी पाणी घालावे. पुन्हा पाच मिनिटे ठेवून आचेवरून उतरवावे.

सगळे साहित्य तयार झाल्यानंतर पाव मधून कापून त्याचे दोन भाग करावेत. तव्यावर दोन चमचे बटर टाकून सगळे पाव खालून वरून शेकून घ्यावेत. नंतर लगेचच एकेका पावाच्या तळच्या भागावर बटाट्याचा मसाला पसरावा. ( दोन चमचे तरी हवाच. आवडीनुसार कमी जास्त प्रमाण घ्यावे ) त्यावर मसाला शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे, कांदा, कोथिंबीर व शेव घालावी. पावाच्या वरच्या भागावरही हलकासा बटाट्याच्या मसाल्याचा थर लावून चिंचगुळाची चटणी घालून तळच्या भागावर किंचितसे दाबून ठेवावे व गरम गरमच खायला द्यावे.

टीपा :
कच्छी दाबेली तसा वेळखाऊ पदार्थ मुळीच नाही. तयार मसाला शेंगदाणे, एखादा दिवस आधी चिंचगुळाची चटणी तयार करून ठेवली तर अक्षरशः: अर्ध्या तासात काम तमाम होऊ शकेल.
कच्छी दाबेलीचा तयार मसालाच वापरावा. मी टिट-बीट दाबेली मसाला वापरला आहे. बर्‍याच कंपन्यांनाचा मिळतो पण त्यातल्या त्यात हा जास्त छान वाटला. खाताना पावही गरम हवेत व आतला बटाट्याचा मसालाही गरम हवा, त्यामुळे अजूनच मजा येते.
कच्छी दाबेली अतिरेक तिखट नसते. खट्टामीठा व थोडा तिखा अशी लागायला हवी.

लहान-मोठ्या मुलांच्या पार्टीसाठी हिट व पोटभरीचा पदार्थ.

Friday, September 3, 2010

वाटणी...

" अगं, एकटीने खाऊ नकोस. वाटून खावे नेहमी. किती वेळा सांगायची तीच गोष्ट? राणू, असा अप्पलपोटेपणा कधी करायचा नसतो बरं. आपल्याला कितीही थोडंसं जरी मिळालं नं तरीही त्यातला काही भाग दुसर्‍याला द्यावा. त्यामुळे काय होतं माहीत आहे तुला? असं बघ, एक लाडू मी तुला दिला तर तुला त्या क्षणापासून तो पोटात गडप होईतो किती छान वाटतं. पण एकदा का तो खाऊन संपला की पुढच्या पाच मिनिटात त्याचं मनातलं अस्तित्वही पुसलं जातं. बरोबर? पण हेच जर त्या लाडूतला अर्धा भाग तू मनीला किंवा दादाला दिलास तर त्यांच्या चेहर्‍यावरचे आनंदी भाव बरेच दिवस तुझ्या मनात राहतील. त्या एवढुश्या लाडवातून एक तात्कालिक आनंद व एक दूरगामी आनंद मिळेल. खरं नं? मग, आता ह्या लाडवाचे दोन तुकडे होणार की..... अगं, काय कारटी आहे पाहा. खाऊनही टाकलास. छान. म्हणजे घागर पालथीच होती का नेहमीप्रमाणे. मुलखाची अप्पलपोटी आहेस बघ तू. आता दात काढत कशाला उभी आहेस? पळ इथून. "

" बाई बाई, कसं होणार या पोरीचं पुढे.... पोरीच्या जातीला इतका अप्पलपोटेपणा बरा नाही. सूनबाई, तुझी फूस आहे तिला म्हणून ही अशी सारखी मन मानेल तसे वागत असते. मी पदोपदी तिला टोकते मग मी वाईट. पण तूच सांग, अशाने निभेल का गं या जगात? वेळ प्रसंगी कशाकशाची वाटणी आणि तीही कोणाबरोबर करावी लागेल हे सांगता येईल का? मग तेव्हां मन खट्टू करून नाईलाजाने करण्यापेक्षा लहानपणीच मनाला मुरड घालावी. म्हणजे मग उन्मळून पडायची वेळ येत नाही हो. "

राणू...... रागिणी, फक्त पाच वर्षांची तर आहे माझी पोर. नाही म्हणजे एक तीळ वाटून खावा वगैरे सगळं ठीकच आहे पण ते कधी? एकच तीळ असेल तेव्हां नं... आत्ता प्रत्येकाला चांगले चार चार मिळतील इतके लाडू डब्यात आहेत तरीही राणूला सांगायचे की अर्धा दादाला दे..... तिच्या बालबुद्धीलाही लाडवांची रास दिसतेय ना.... मग तिने हे गणित कसे जुळवावे. आणि किती जड शब्द वापरायचे. तिला अर्थ तरी कळतो का त्याचा.... इतकुश्या जीवाकडून नको तिथे नको त्या अपेक्षा करायच्याच कशासाठी? ते जाऊदे, पण त्यापुढची ती चार वाक्ये..... सासूबाईंनी इतक्या क्षुल्लक गोष्टीवरून बोलावीत? घाव इतका जिव्हारी लागला असून वाटणीच्या दीक्षा आजही द्याव्यात. का? पुन्हा पुन्हा हे घाव सोसण्याकरता मनाला तयार करायचे, तेही स्वत:च?

बाकी, वाटणी बरेचदा आपल्या हातात नसतेच. कुशीत घेणारा नवरा जेव्हां मनातून कोणा दुसरीचाच विचार करत असतो.... तेव्हाही वाटणी होतेच. कधी उमजून तर कधी दृष्टीआड.... कोणी आपल्याच हाताने बायकोला स्वार्थासाठी बॉसच्या हाती सोपवतो तेव्हाही वाटणी होतेच. तीही बळजोरीने. अंगाला चिकटलेल्या अनेक नजरा ओरबाडतात तेव्हाही अप्रत्यक्ष वाटणी होतेच. जीवाभावाची सखी डोळ्यादेखत आपला प्रियकर पळवते, आणि तो ही तिला साथ देतो....... तेव्हाही वाटणीच होते. शरीराची वाटणी तात्कालिक, मनाची चिरकाल. एकदा भोगलं की शरीराचा भोग संपला आणि मनाचा सुरू झाला. आपलेच मन आपल्यावर पुन्हा पुन्हा बलात्कार करत राहते. दु:ख नेमके कशाचे करायचे? वाटणीचे..... भोगाचे की माझ्याच वाट्याला का याचे? लाडवासारखे मनाचेही तुकडे तोडून वाटून टाकता आले असते तर.....

Wednesday, September 1, 2010

' पहिला खो '

विभीने, ' पहिला खो ' देऊन जवळपास महिना किंवा जास्तच दिवस लोटले. अनेक गाणी, कविता, गझला अगदी मनाच्या जवळ असूनही अनुवाद करायला गेल्यावर जीव घाबरा होऊ लागला. इतक्या सुंदर शब्दांची, त्यांच्यातल्या भावार्थाची तोडफोड तर होत नसेल....... बऱ्याच गाण्यांचे अर्धवट अनुवाद झाले पण मनात कायमचे घर करून गेलेली एक कविता सारखी समोर येऊ लागली. सरतेशेवटी हार मानून मी तिच आज टाकतेय. कवितेतला आशय तितकाच भिडावा म्हणून उगाचच शब्दबंबाळता टाळली आहे. या कवितेचे सत्य अत्यंत विदारक आहे. आजच्याच पेपरात पुन्हा एकवार या सत्यावर शिक्कामोर्तब झाले आहेच. कदाचित त्यामुळेच इतके दिवस मी न लिहिलेला हा, ' पहिला खो ' मला न जुमानता कागदावर उतरला आहे. माझ्या परीने-कुवतीने केलेला एक क्षीण प्रयत्न...... कदाचित मूळ कविता वाचून कोणी एखादा, " जबाबदार " होईल.

मूळ कविता सोबत देत आहे। कोणा अनामिक कवीने लिहिलेली असून एक जळजळीत सत्य व असहाय वेदना व्यापून टाकणारी. ही कविता खूप वर्षांपूर्वी मला विरोपातून आली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या मनात घर करून गेली आहे. तुम्हीही वाचली असेलच आणि तितकीच असहाय घुसमटही जाणवली असेल....


एका निरपराध जीवाचा मृत्यू.....

आई, एका पार्टीला गेलो होतो गं

तुझे बोल मला आठवले,

" मद्यपान करू नकोस बाळा "
म्हणून, मी फक्त सोडा प्यायलो



आई, मला खूप छान वाटलं
तुला जसं हवं होतं तसंच मी केलं,
आई, मी दारू पिऊन गाडी नाही चालवली

इतर सारे म्हणाले होते तरीही नाही


आई, मी योग्य तेच केले गं

तू मला नेहमीच हिताचेच सांगतेस,

आई, आता पार्टी संपत आली आहे

आणि सगळे निघालेत परतीला



आई, मी ही माझ्या गाडीत बसलोय

मी घरी सुखरूप येईन याची मला खात्री आहे,

आई, तू मला असेच वाढवले आहेस गं

एकदम चांगला आणि जबाबदार


आई, मी गाडी चालवत निघालो
जशी मी गाडी रस्त्यावर घेतली,
येणार्‍या दुसर्‍या गाडीने मला पाहिलेच नाही

आणि दाणकन
माझ्यावर येऊन आदळली


आई, मी फुटपाथवर पडलोय गं

पोलिसाचे शब्द मला ऐकू येत आहेत,

आई, तो दुसरा मुलगा दारू प्यायलाय
आणि आता त्याच्या कर्माची फळे मी भोगतोय


आई, मी इथे मरणाच्या दारी पडलोय

ये ना गं माझ्याजवळ लवकर.....

आई, माझ्याच बाबतीत असं का गं घडावं

माझं आयुष्यच अचानक असं संपावं....


आई, रक्ताने मी माखलोय गं
आणि ते सारं माझंच रक्त आहे
आई, डॉक्टर म्हणत होते,

आता मी लवकरच मरेन


आई, मला तुला सांगायचे आहे की,
तुझी शपथ मी दारू प्यायलो नाही

आई, इतर सगळे प्यायले गं....
त्यांनी मुळी विचारच केला नाही



आई, अगं तो बहुतेक माझ्याच पार्टीत होता

फरक इतकाच आहे,
की तो दारू प्यायला

आणि मी मरणार आहे...


आई, लोकं कशाला गं दारू पितात?
तुमचे संपूर्ण आयुष्य जी बरबाद करू शकते
आई माझ्या वेदना फार तीव्र झाल्यात
धारदार, टोकदार, जिव्हारी वेदना, दुखतंय गं...


आई, ज्याने मला ठोकले तो चालतोय
हे अतिशय चुकीचे आहे, अन्याय आहे हा....

मी इथे असहाय तडफडत मरतोय

आणि तो फक्त माझ्याकडे पाहतोय



आई, दादाला सांग रडू नकोस

बाबांना सांग धीराने घ्या

आई, मी जेव्हां देवाघरी जाईन ना

माझ्या थडग्यावर लिहा, "बाबाचा लेक "


आई, कोणीतरी त्याला सांगायला हवे होते ना

दारू पिऊन गाडी चालवू नकोस

आई, अगं त्याला तसं कोणी सांगितले असतं
तर मी आज जिवंत असतो गं...


आई, माझे श्वास संपत चाललेत

मला फार फार भिती वाटतेय गं
आई, तू रडू नकोस....
जेव्हां जेव्हां मला गरज होती
त्या प्रत्येक वेळी तू माझ्यासाठी होतीसच



आई, एक शेवटचा प्रश्न पडलाय गं

तुझा निरोप घेण्याआधी सांगशील का मला

मी दारू पिऊन गाडी चालवलीच नाही
मग तरीही मीच का गं मरतोय????


मूळ कविता :

death of an Innocent

I went to a party, Mom,
I remembered what you said.
You told me not to drink, Mom,
So I drank soda instead.

I really felt proud inside, Mom,
The way you said I would.
I didn't drink and drive, Mom,
Even though the others said I should.

I know I did the right thing, Mom,
I know you are always right.
Now the party is finally ending, Mom,
As everyone is driving out of sight.

As I got into my car, Mom,
I knew I'd get home in one piece.
Because of the way you raised me,
So responsible and sweet.

I started to drive away, Mom,
But as I pulled out into the road,
The other car didn't see me, Mom,
And hit me like a load.

As I lay there on the pavement, Mom,
I hear the policeman say,
"The other guy is drunk," Mom,
And now I'm the one who will pay.

I'm lying here dying, Mom...
I wish you'd get here soon.
How could this happen to me, Mom?
My life just burst like a balloon.

There is blood all around me, Mom,
And most of it is mine.
I hear the medic say, Mom,
I'll die in a short time.

I just wanted to tell you, Mom,
I swear I didn't drink.
It was the others, Mom.
The others didn't think.

He was probably at the same party as I.
The only difference is, he drank
And I will die.

Why do people drink, Mom?
It can ruin your whole life.
I'm feeling sharp pains now.
Pains just like a knife.

The guy who hit me is walking, Mom,
And I don't think it's fair.
I'm lying here dying
And all he can do is stare.

Tell my brother not to cry, Mom.
Tell Daddy to be brave.
And when I go to heaven, Mom,
Put "Daddy's Girl" on my grave.

Someone should have told him, Mom,
Not to drink and drive.
If only they had told him, Mom,
I would still be alive.

My breath is getting shorter, Mom.
I'm becoming very scared.
Please don't cry for me, Mom.
When I needed you,
you were always there.

I have one last question, Mom.
Before I say good bye.
I didn't drink and drive,
So why am I the one to die?