जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, June 30, 2009

उद्याची आशा नको आता......

कधी टीवीवर, कधी वर्तमानपत्रात, वॉलमार्ट, मायर, इथल्या अनेक ग्रोसरी स्टोअर्समध्ये, गॅस स्टेशनवर........ ज्युसच्या बॉक्सेसवर. जळीस्थळी, लहान-मोठे-म्हातारे चेहरे " मला पाहिलेत का? " चे आयष्याचे न सुटणारे मोठे प्रश्नचिन्ह घेऊन उभे दिसतात. वीस वर्षांपूर्वी हरवलेले बाळ आज कसे दिसत असेल....... बाळाचा फोटो बाजूलाच हा आजचा (कदाचित असा) फोटो. अल्झमायर झालेल्या आजोबांचा हरवलेला चेहरा......नक्की काय हरवलेय हेच शोधत असलेला आणि सापडत नसल्याने काहीतरी घोळ झालाय गं हे सांगणारा...... का आता मी कधीच सापडणार नाहीये गं. चांगले भव्य कपाळ, स्मार्ट, चटपटीत चेहरा असलेली ही तीशीची तरुणी अचानक कामावरून परत आलीच नाही. कुठे गेली? शेजारी जातानाही सांगून जाणारी आज न सांगता कायमची नाहीशी झाली....... दोन मुलांचा बाबा कामानिमित्त फ्लाईट पकडायला गेला.... आणि कधीच परत आला नाही. त्याची बायको व मुले दररोज उभारी धरतात अन दररोज रात्री आपला बाबा नक्की येणार असे एकमेकाला सांगत राहतात. नंतर आपापल्या अंथरुणात मूक रुदन करतात.

लहान बाळं स्वतः पळून जाऊ शकत नाहीत म्हणजेच ती पळवली जातात..... क्वचित काही चांगल्या घरातून वाढवली जातात. काही अत्याचाराला, विकृतीला बळी पडत दररोज मरत जगत राहतात. काही खंडणीसाठी तर काही अंधश्रद्धेतून, काही सेक्स विकृत.......कार्यभाग साधला की क्रूरपणे संपवले जातात. पळवले, हरवले किंवा निघून गेलेल्यांचे काय होते हा मोठा प्रश्न आहेच. परंतु यांच्या कुटुंबीयांचे उर्वरित जीवन अत्यंत दु:खी होते. माझे माणूस कुठे असेल कसे असेल हा प्रश्न एक क्षणही मनातून जात नाही. उत्तर कधीच मिळाले नाही तर संपलेच सारे. माणूस मेलाय हे कळले तर निदान पोटभर रडता तरी येईल. त्याच्या आठवणींना बरोबर घेऊन का होईना पुढे तर जाता येईल. पण हे सतत असंदिग्ध...... जिवंत असेल ना? असेल ना हो.... कोणीतरी सांगा ना? का कोणी जीवे मारले असेल? हाल केले असतील.............हे काळीज कुरतडणारे प्रश्न आणि त्याची फार क्वचितच-बहुतांशी कधीही न मिळणारी उत्तरे.

काल वॉलमार्टात असाच एका तरुण मुलाचा चेहरा पाहिला. ग्रॅज्युएशनचा फोटो होता. चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता...... कोणीतरी समोरून--मॉमने....भावाने, " हे चीज...... " म्हटले असेल........त्यामुळे मोठे स्माईल दिलेला........ काळजात कळ उठली. तारीख अगदी ताजी.......जूनच्या दुसऱ्या आठवड्याचीच होती.... जेमतेम पंधरा दिवस झाले होते त्याला हरवून. त्याला पाहता पाहता एकदम डोळ्यासमोर त्याचा चेहरा आला. ९१ - ९२ ची घटना असावी. ओळखीचे म्युझिक-व्हिडिओ स्टोअर्स वाले, स्नेह नुसता दुकानदार -गिऱ्हाईक एवढाच न राहता थोडासा घरगुतीही होता-आहे. छान कुटुंब होते. पती-पत्नी व एकुलता एक मुलगा.

इंजिनिअर झालेला अतिशय हुशार सरळ मार्गी मुलगा. नुकताच मोठ्या कंपनीत नोकरीला लागलेला. शनी-रवी दोन दिवसांची सुटी होती म्हणून पुण्याला मित्राकडे जाऊन येतो म्हणून घरातून निघाला. निघताना एक मित्र होता बरोबर. दोघेही दादरला एशियाड स्टँडवर गेले. तिकीट काढून हा बसमध्ये बसल्यावर बाय करून मित्र निघाला. काकूंनी सांगितले होते म्हणून मित्राने फोन करून कळवले.... हा निघाल्याचे. चार तासात पुण्याला पोचायला हवा असलेला मुलगा आज अठरा-वीस वर्षे झाली तरी पोचलाच नाहीये. ना घरी परत आलाय. दादर-पुणे या प्रवासात काय झाले असे की हा मुलगा गायब झाला.

पोलीस, नातेवाईक, मित्र, ओळखीचे.....स्नेही...... अनोळखी अश्या अनेक लोकांनी अनेक परीनं अनेक दिवस त्याचा शोध घेतला.... पण...... एकदा कोणीतरी म्हणाले लोणावळ्याला पाहिला त्याला..... भेलकांडल्या सारखा चालत होता. बरोबर कोणीतरी होते. खरे खोटे कोण जाणे तरीही पोलिसांनी, सगळ्या मित्रांनी अख्खा लोणावळा-खंडाळा पिंजून काढले पण काही उपयोग झाला नाही. त्याच्या आईकडे बघवत नाही. त्यांनी जगणेच सोडलेय. जरा खुट्ट वाजले की, आजही कोणी नुसता उल्लेख जरी केला तरी ती माउली डोळ्य़ात प्राण एकवटून चाहूल घेत राहते...... बोलत नाही...... नुसते डोळ्यांनी विचारत राहते.......सापडेल का हो माझा पोर? वडील..... शांत-स्तब्ध झालेत. देहधर्म सुटत नाहीत म्हणून सगळे काही सवयीने करतात खरे...... बापाला धाय मोकलून रडताही येत नाही हो...... जीवही चिवट, जाता जात नाही.

गेल्या वर्षी दुकानात गेले होते.......त्यांना भेटले....... तिथून बाहेर पडले आणि वाटले........मुलगा घरी तरी येऊ दे नाहीतर जिवंत नाहीये असे तरी त्यांना कळू दे. इतकी वर्षे दररोज तिळतीळ मरणारे हे दोन जीव एकदा पोटभर रडून घेतील रे. आता त्यांचे बरेच वय झालेय. एकमेकाच्या आधाराची खरी गरज आता सुरू होतेय. उद्याची आशा नको आता. देवा दया कर. हे अंधातरी, आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणे संपवून टाक.

Monday, June 29, 2009

आज बुलावा आया हैं........

माझ्या मैत्रिणीचे-राधेचे, लग्न ठरलेले. ( साधारण बावीस वर्षांपूर्वीची घटना आहे ही. ) नुकताच साखरपुडा झालेला. बाईसाहेब एकदम खुशीत होत्या. खरेदी जोरदार सुरू होतीच. ती वसईची आणि नवरा नालासोपाऱ्याचा. लग्नाला साधारण महिनाभर अवकाश होता. या दोघांना एकमेकांना भेटायची, लग्नाच्या आधी थोडं भटकण्याची सहजसुलभ इच्छा होती. पण दोघांचे ऑफिस अगदी उलट दिशांना असल्याने काही केल्या योग येत नव्हता. जसजसा लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला तसतशी दोघंही घायकुतीला आलेली. भेटायचेय....भेटायचेय......

आमचे साहेब एकदम राजामाणूस. स्टाफचा फोन नेहमीप्रमाणे बोंबललेला. त्यामुळे गेले काही दिवस साहेबांच्या केबिनमधला फोन सारखा खणखणत होता. त्यातले अर्धे फोन राधेच्या नवऱ्याचे. शेवटी साहेब म्हणाले, " राधाबाई इथेच खुर्ची टाकून बसा म्हणजे नवऱ्याला तुमचाच मंजूळ आवाज ऐकायला मिळेल..... बिचाऱ्याला दरवेळी माझा आवाज ऐकून अवघडल्यासारखे होतेय." राधा इतकी लाजली ... तशी साहेब म्हणाले, " अरे वा वा!! आजकालच्या पोरीही लाजतात का? " मग सगळ्या स्टाफला त्यादिवशी चहा मिळाला.

राधेचे आजकाल कामात लक्षच नसते, सारखी कुठेतरी नजर लावून खयालोंमे दंग असते....... येता जाता आम्ही सगळे चिडवत होतो. ती पण कधी लटके रागावून तर कधी लाजून चिडवण्याची मजा घेत असे. ऑफीस म्हणजे दुसरे घरच असते त्यातून सगळ्यांचे सूर बऱ्यापैकी जुळत असतील तर मग वातावरण झकास असते. एक दिवस राधा फार उदास होती. सारखी म्हणत होती, " शी बाई, हा नीतिन पण ना. मला नाही वाटत गं श्री आम्ही लग्नाआधी एकदा तरी भेटू. लाईफमध्ये इतके छोटेसेही थ्रिल नाही." सगळ्यांना वाईट वाटले. पण आम्ही काय करू शकत होतो.

तशातच एक एप्रिल उजाडला. ऑफिसमध्ये आल्यापासून एकमेकांना फूल करण्याची नुसती चढाओढ लागली होती. मी आल्या आल्या एकजण चॉकलेट घेऊन आला. सगळ्यांना वाटत होता मलाही दिले एक. एकतर मी नुकतीच आले होते त्यात इतर सगळे खात आहेत ते पाहून मीही टाकले तोंडात. तर काय निघाला लाकडाचा तुकडा
. गंमतजंमत चालू होती तोच साहेबांचा फोन वाजला. साहेब आतून जोरात ओरडले, " राधाबाई या पळत, आज तुमचाच आवाज ऐकू दे नीतिनला." राधा गेली फोन घ्यायला.

खरेच की नीतिनच होता. साहेबांच्या शेजारीच फोन असल्याने काही वेळा राधाचा फोन आला की साहेब शहाण्यासारखे उठून बाहेर येत. पण आज काहीतरी अर्जंट काम असल्याने ते तिथेच बसलेले. राधेची झाली पंचाईत, ती आपली हो... नाही..... बरं.... पाहते..... येते ...... शेवटी साहेब उठलेच. फोन संपला. राधा बाहेर आली... साहेबांकडे न पाहताच थॅंक्स म्हणाली. गाल अगदी लाल झाले होते. साहेब हसत केबिन मध्ये जाताच सगळ्यांनी राधेला घेरले. काय गं एवढे लाजायला काय झालेय? काय म्हणत होता नीतिन? आमचे एडीएम म्हणाले, " लगता हैं आज बुलावा आया हैं।" तशी लाजून राधा म्हणाली, " अय्या!! तुम्हाला कसे कळले? "

फायनली एकदाचे यांचे घोडे गंगेत नाहण्याच्या मार्गावर होते. नीतिन ने तिला रॉक्सीवर बोलावले होते दुपारी अडीचला. तिनाचा शो पाहून घरी जाऊ असे ठरले होते. साहेबांनी लागलीच परमिशन दिली. जा जा.... पळा राधाबाई. उगाच रुसवे-फुगवे करू नका बरं का. नाहीतर सगळा फियास्को होईल. साहेबांनी प्रेमाची ताकीद दिली. का कोण जाणे माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. एकतर सतत प्रयत्न करूनही राधा-नीतिन भेटू शकले नव्हते आणि आजच नेमके कसे बरे...... एप्रिल फूल असेल का हे. नको नको प्लीज देवा...... राधेला फार वाईट वाटेल असे झाले तर.

मी राधेला म्हटले चल गं जरा चहा घेऊ. सेक्शन बाहेर आल्या आल्या मी माझी शंका बोलून दाखवली. तिला म्हटले तू नीतिनला फोन कर आणि विचार खरेच त्याने बोलावले आहे का ते. ती म्हणाली की अगं आठवडाभर त्याची आपल्या बाजूलाच ड्यूटी आहे. त्यामुळे तो ऑफिसमध्ये असणार नाही. ( नीतिन फूड कंट्रोल ऑफिसर होता.....) तिला म्हटले तू नको जाऊस गं. फार तर काय होईल तो वैतागेल पण एप्रिल फूल वाटले म्हणून तू आली नाहीस असे कळले तर नाही रागावणार. पण आमच्या राधाबाई मनाने केव्हाच रॉक्सीला पोचलेल्या. ती काही ऐकेना.

शेवटी मी तिला म्हटले की एक काम कर.... रॉक्सीच्या गेटमध्ये तो उभा राहणार आहे ना? ते समोरच्या फुटपाथवरील बस स्टॉपवरूनही दिसते. तेव्हा तू बसस्टॉपवर उभी राहा. तो दिसलाच तर मग काय ....धमाल करा. पण जोवर तो दिसत नाही तोवर तू बिलकूल तिथे जाऊ नकोस. हे मात्र तिला पटले. दिडलाच राधा निघाली. त्यावेळी सेलफोनही नव्हते त्यामुळे ती गेल्यावर काय घडले हे दुसऱ्या दिवशी ती येईतो कळणारच नव्हते. इकडे सेक्शनमध्ये उरलेला दिवस कोणीही काम केले नाही. हे एप्रिल फूल आहे का नाही यावर बेट्स ही लागल्या

दुसऱ्या दिवशी राधा आली. एकदम हसरा चेहरा घेऊन. सगळ्यांनी तिला रिंगणात घेतले अगदी साहेबही सामील झाले. मग लाजत लाजत राधेने रिपोर्ट दिला. चहा उकळला तिच्याकडून आणि जोतो कामाला लागला. राधेने डोळ्यांनीच खुणावले मला, चल ना बाहेर. आम्ही दोघी कॉरीडॉर मध्ये आलो तशी राधेचे डोळे पाण्याने तुडुंब भरले. अरे देवा! माझी शंका खरी ठरली होती. नीतिनने कॉल केलाच नव्हता. राधा साडेचार पर्यंत बसस्टॉपवर वेड्या आशेत थांबली आणि शेवटी दु:खी होऊन घरी गेली होती.

मात्र आज सकाळी तिने एकदम बेमालूम ऍक्टींग करून खोखो हसायला टपलेल्यांचाच एप्रिल फूल करून टाकला होता. ज्यांनी कोणी ही गंमत केली होती ते शेवटपर्यंत गोंधळात राहिले की नीतिन आलाच कसा.... . राधेनेही नंतर हे मनाला लावून घेतले नाही त्यामुळे आम्हा दोघींनीही तिचे हे असे जाणे, उभे राहणे एंजॉय केले. परंतु राहून राहून मला नीतिनला भेटायला जायचेय या कल्पनेने फुललेला, मोहरलेला राधेचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि वाटत राहते काश हे एप्रिल फूल नसते........

Sunday, June 28, 2009

काळ आला होता पण वेळ.....

मायदेशात असताना बरेचदा तसेच आताही जेव्हा मायदेशात येतो त्या प्रत्येकवेळी आम्ही पुण्यात ' शंकर ' महाराजांच्या मठात जातोच. पुणे-सातारा रोडवर-धनकवडी येथे मठ आहे. महाराजांना पाहिले की एक वेगळीच अनुभूती मिळते. शांत, समाधान मनात भरून राहते. महाराज आपल्याकडे कधीतरी पाहतील याची ओढ सतत मनाला लागलेली असते. काही वेळा ती पूर्णही होते. आता हे मनाचे खेळ आहेत असेही काहीजण म्हणतील. असतीलही कदाचित. मात्र मला अतिशय आनंद होतो. साधारण तासभर थांबून, खिचडीचा प्रसाद घेऊन आम्ही महाराजांचा निरोप घेतो. २००१ साली असेच आम्ही सगळे महाराजांना भेट देण्यास निघालो.

मी व शौमित्र, माझे आई-बाबा, भाऊ-वहिनी व माझ्या दोन्ही भाच्या. धाकटी यशदा तेव्हा फक्त सात महिन्यांची होती. तिला अजून ठाण्याच्या बाहेर नेलेच नव्हते. तिचा पहिला प्रवास महाराजांच्या दर्शनाने व्हावा असे सगळ्यांनाच वाटत होते. आम्ही सुमो ठरवली व अगदी ठरल्यावेळी आवरून सकाळीच बाहेर पडलो. ठाणे-पुणे प्रवास मस्त मजेत झाला. गाणी, गप्पा, निघताना करून घेतलेली सॅंडविचेस, वेफर्स...खाऊन होईतो वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. शिवाय जुलै महिना होता त्यामुळे त्या दिवशी पाऊस कोसळत नसला तरी सगळीकडे हिरवळ, थोडा थंडावा, आल्हाददायक हवा होती. तापलेली धरणी निवली होती. हिरवाई डोळ्यांना सुखावत होती. एसी लावावा लागलाच नाही.

साधारण बाराच्या सुमारास आम्ही मठात पोचलो. आरती मिळाली. खूपच बरे वाटले. जवळजवळ तासभर मठात बसलो. यशला व आम्हा सगळ्यांनाच महाराजांचा आशीर्वाद मिळाला. मग प्रसाद खाऊन आम्ही तिथून निघालो. मठाला लागूनच असलेल्या हॉटेलमध्ये पोटपूजा झाली. आधीच्या बेताप्रमाणे थोडेसे पुण्यात भटकून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासास लागणार होतो. पण एवीतेवी इथवर आलोत आणी फक्त तीनच वाजलेत तर अजून कुठेतरी भटकावे असा विचार मनात डोकावला. झाले, चर्चा जोरात सुरू झाली. कुठे जावे..... महाबळेश्वर.... नको बुवा, अनेक वेळा झालेय...... शिवाय आपल्याला राहायचे नाहीये. अमुक तमुक करत करत माळशेज घाट पाहायला जायचे का? आमच्यापैकी कोणीही माळशेजला गेलेले नव्हते. पावसाळ्यात माळशेज घाट म्हणजे अप्रतिम सृष्टीसौंदर्य असे अनेक जणानं कडून ऐकलेले त्यामुळे सगळेजण टेम्प्ट झाले. ठरले.

आमचे ड्रायव्हर पाटील यांना विचारले की माळशेजला आपल्याला जाता येईल का? ते म्हणाले येईल की. अमुक अमुक फाटा घेऊन गेले की जवळ पडेल वगैरे.... किती वेळ लागेल अंदाजे...... तर म्हणाले साधारण सहा-साडेसहा पर्यंत पोचून जाऊ आपण. आमचे बाबा म्हणाले की साधारण १३०-१४० किलोमीटर इतके अंतर असेल तेव्हा जायला हरकत नाही. मला स्वत:ला असे अंदाज बिलकूल नाहीत. आमच्याकडे मॅपही नव्हता. त्यामुळे नुसते तर्क व आमचे बाबा व पाटील यांच्यावर सारी भिस्त. अगदी साताला जरी माळशेजला पोचलो तरी साधारण तास-दिडतास तिथे थांबू व निघू म्हणजे वेळेत घरी पोचता येईल. ठरले..... साडेतीनला पुणे सोडले. मुलांसाठी थोडा खाऊ व सगळ्यांसाठी पुरेसे पाणी होतेच. यश छान खेळत होती त्यामुळे उत्साह वाढला.

साडेपाच झाले तरीही आम्ही माळशेजच्या रस्त्याला लागलोय असे वाटेना. पाटील चाचपडत होते. आमचे बाबाही गोंधळलेले दिसत होते. आम्ही चुकलो होतो हे नक्की होते. पाहता पाहता सहा वाजले तेव्हा मात्र थोडे अस्वस्थ वाटायला लागले. पुण्यावरून माळशेज हा घोळ घालायला नको होता का? पण आता परत फिरणे शक्यच नव्हते. त्यात पाटील सारखे म्हणत की आता आपण पोचूच. भावाला त्यांचा थोडा राग येऊ लागला होता..... नीट माहीत नव्हते तर आधीच सांगायचे ना.....लहान बाळ बरोबर आहे. म्हणणे बरोबरच होते पण आता उशीर झाला होता. शेवटी एकदाचे कसेतरी चुकत चुकत आम्ही आठच्या आसपास माळशेजला पोचलो. इतका घोळ होऊनही आम्ही सगळे खूश झालो.

माळशेज घाटात खूप छोटे धबधबे आहेत. सृष्टीसौंदर्य अप्रतिम आहे वगैरे अनेक गोष्टी ऐकलेल्या........पण कसले काय हो. हे सगळे कधी दिसेल...... उजेड असेल तर ना? आम्ही पोचलो तेव्हा अंधार पडलेला. त्यात इतके प्रचंड धुके होते की घाटात पोचण्या आधीच ते चांगलेच जाणवत होते. मुंबईकडे जायचे म्हणजे घाट पार करायलाच लागणार दुसरा मार्ग नाही म्हणजे जवळचा मार्ग नाही. त्यामुळे आम्ही तसेच पुढे निघालो. थोडे अंतर गेलो नाही तोच बरीच गर्दी दिसू लागली. अनेक गाड्या उभ्या होत्या. सगळीकडे मुले... मोठे.. ..... गाड्यांवर चढून बसलेले. बरेच जण सकाळपासून आलेले असावे. भरपूर मजा..... दारू प्यायलेले होते. मोठ्यामोठ्याने ओरडणे, दंगा...... गाणी लावून नाचणे वगैरे सुरू होते. धबधब्यांखालीही बरेच जण बसले होते.

ह्या सगळ्यांनाही घाट पार करायचा होताच पण ह्या प्रचंड धुक्यामुळे सगळे अडकून पडले होते. आम्ही या गोंधळातही एकीकडे माळशेज घाटाचे सौंदर्य पाहण्याचा प्रयत्न करत होतो. हळूहळू करत अगदी पहिली गाडी जिथे होती तिथवर आम्ही येऊन पोचलो. साडेनऊ वाजले होते. आतापर्यंत इतर गाड्यांचे दिवे असल्याने थोडे दिसत होते खरे. पण धुके इतके प्रचंड दाट होते की पहिल्या गाडीपासून एक फुटावरचेही दिसेना. पाटील म्हणाले आपण इथे थांबूया मी जरा उतरून विचारतो. त्या गाडीतल्या पोरांशी बोलून आले आणि म्हणाले, " या लोकांचा काही उपयोग नाही. गेले दोन-तीन तास हे सगळे इथेच अडकून पडलेत. एकतर सगळे फार दारू प्यायलेत आणि आता त्यांची हिंमतच नाहीये गाडी पुढे नेण्याची. ( त्यांनी हे वाक्य थोडे वेगळ्याच पद्धतीने सांगितले......
)

पाटील यांचे ड्रायव्हिंग उत्तम होते. एकदाही आम्हाला भिती वाटली नव्हती. पण हा प्रसंग बाका होता. दरी कुठल्या बाजूला आहे हे कळणे सोडाच फुटावर कोणी उभे असेल तर तेही दिसत नव्हते. थोडी जरी चूक झाली असती तर आम्ही सगळे दरीत कोसळलो असतो. अजून अर्धा तास गेला. गाडीत एकूण माणसे नऊ. त्यात तीन लहान मुले. रात्रभर इथे थांबणे शक्यच नव्हते. यशचे दूध संपत आले होते. काय करावे.... शेवटी मी म्हटले की मी गाडीच्या पुढे चालते. बॅटरी आहेच तुम्ही माझ्या मागेमागे गाडी आणा. पण असा फार वेळ लागला असता..... शेवटी पाटलांच्या काय मनात आले कोण जाणे. ते म्हणाले, " मी आधीही बरेचदा ह्या घाटातून गेलोय. रेडीयमच्या पट्ट्यांवरून अंदाज घेत घेत गाडी नेतो. घाबरू नका.

नको असे करायला हा पर्याय नव्हताच.... आम्ही निघालो. अतिशय हळूहळू........ तोच मागे बरेच आवाज ऐकू येऊ लागले म्हणून थांबून उतरून पाहिले तर खोळंबून राहिलेले सगळे आमच्या गाडीचे टेललाईट्स पकडून निघालेले. पाटील म्हणाले, " पाहा..... कोणात दम नाही..... आता आपल्या मागे निघालेत. " मी मनात म्हटले, " देवा, निभावून ने रे. " हे इतके सगळे घडत असताना आश्चर्य म्हणजे बाळ यशदा बिलकूल रडली नाही. तिचे हसणे, वेगवेगळे आवाज काढणे--उड्या मारणे अव्याहत सुरू होते. शौमित्र व शारिवाही अजिबात रडले-घाबरले नाहीत. उतरायला सुरवात केली तसे आईने स्वामी समर्थांचा जप सुरू केला..... दोनच मिनिटांत आम्ही सगळे स्वामींचे नाव मोठ्याने घेऊ लागलो. आमचा आवाज मागच्या गाडीतही जात होता. त्यांनीही आवाज मिळवला. अवघ्या दहा मिनिटांत जवळजवळ तीस-पस्तीस गाड्यांत असलेल्या दीडशे-दोनशे लोकांनी नाम:स्मरण सुरू केले.

पंधरा मिनिटे गेली.......... आणि काय आश्चर्य धुक्यात किंचित फरक दिसू लागला. दोन-तीन मीटरवरचे दिसू लागले. अवघ्या पंचवीस मिनिटात आम्ही सुखरूप घाट उतरलो. हा सगळा वेळ घाटात स्वामींच्या नामाचा गजर स्पष्ट ऐकू येत होता. सगळी भरपूर दारू प्यायलेली पोरे, माणसे........ यातील एरवी किती जण असे नाम:स्मरण करत असतील कोण जाणे पण त्या जीवघेण्या धुक्यात सापडून मनापासून देवाला हाका मारत होती.
मुंबईच्या रस्त्याला लागलो. तसे मागच्या गाड्या आमच्या पुढे निघाल्या. प्रत्येकजण आम्हाला थॅंक्स देत स्वामींचे नाव घेत घेत जात होते. कुठलीही भयंकर घटना न घडता इतके सगळे लोक सुखरूप घाट उतरले होते.

दोन तासात आम्ही घरी पोचलो. पाटील यांचे आभार मानले. प्रसंग मोठा बिकट ओढवला होता खरा....... स्वामींनी निभावून नेले. अजूनही मी माळशेज घाट पाहिला नाहीये. आता पुढच्या मायदेशाच्या भेटीत जायचा विचार आहे...... यावेळी मात्र सकाळी निघून डायरेक्ट माळशेजच गाठणार........
.


Saturday, June 27, 2009

समज...

आता आठ दिवसात दिवाळी येणार...... मग खूप मजा. जुई स्वत:शीच बडबडत होती. शाळेला सुटी लागलीच होती. पहिलीत होती जुई. आई-बाबा व धाकटा भाऊ. चौकोनी कुटुंब. मध्यमवर्गीय. आमदनीपेक्षा खर्च जास्त होता नये. पगाराचा पाचवा भाग शिल्लक ठेवायचा म्हणजे अडीअडचणीला उपयोगी येतो अशा शिकवणीतले. सणवार, असेल त्यात आनंदाने साजरे करायचे.

जिकडून तिकडून फराळाचे वास येत होते. खमंग बेसन भाजल्याचा तर त्याला छेदणारा भाजणीच्या चकल्यांचा वास. लहान मुले एकमेकाला आणलेले फटाके नवीन कपडे दाखवत आनंदाने खेळत होती. जुईही आता बाबा कधी आपल्याला कपडे फटाके आणायला घेऊन जातात याची वाट पाहत होती. दोन दिवस गेले, पण बाबांनी काही जाऊया म्हटले नाही. तिने बाबांच्या मागे थोडी भुणभूण केली.... जाऊ हं लवकर असे म्हणून बाबांनी तिला खेळायला पाठविले. दिवसभराच्या खेळण्याने दमून जुई व भाऊ गाढ झोपले होते. केव्हातरी रात्री दचकून जुई जागी झाली. पाहिले तर आई दिसली नाही. एवढ्या रात्री आई कुठे गेली......

तेवढ्यात आई-बाबांच्या बोलण्याचा आवाज कानावर आला. आई म्हणत होती, " अहो, कशी हो दिवाळी साजरी होणार आता? आपले जाऊ दे. पण पोरं किती लहान आहेत. शिवाय आजूबाजूची सगळी मुले टिकल्या, फुलबाज्या वाजवूही लागलीत. जुई आणि विनीतला एखादा तरी कपडा आणायला हवा ना? घरात जे काही आहे त्यातून मी थोडे थोडे फराळाचे पदार्थ करेनच हो. पण......... " हे ऐकून बाबांनी कपाळ चोळले, " अग, तूच सांग आता लागोपाठ दोन्ही महिने माझे पगाराचे पाकीट मारले गेलेय. लक्ष ठेवून असणार गं कोणीतरी. तरी तू फार काटकसरी आणि निभावून नेणारी आहेस म्हणून कोणापुढे हात नाही पसरावे लागले. नाहीतर हे असे सणासुदीचे कोणाकडेतरी जाऊन उसने पैसे......... "

जुईला हे ऐकून एवढेच कळले की बाबांकडे पैसे नाहीयेत. तेव्हा आता आपण हट्ट करता नये. दिवाळीची पहिली पहाट आली. आईने कणकेचे दिवे केले होते. सगळ्यांना तेल उटणे लावून अभ्यंग स्नान घातले मग ह्या दिव्यांनी ओवाळले. जुईला त्या कणकेच्या दिव्यांचे खूप आकर्षण होते. खूप वाती असत त्यात. ओवाळून झाले की आई ते दिवे खिडकीत ठेवी. मग त्या उजेडात बादलीत गरम पाण्यात डुंबायला तिला खूप आवडे. नंतर बहुतेक एकाच वेळी ते विझत. त्यांचा विझताना येणारा वास ती भरभरून घेत राही.

आईने विनीतला नवीन शर्ट-पँट घातली. आणि जुईला हाक मारून सुंदर लेमन कलरचा फ्रील असलेला फ्रॉक घातला. केसांचे दोन बो घालून मोठ्या पिवळ्या ठिपक्यांच्या रिबीनी बांधल्या. खूप गोड दिसत होती जुई. जुईला फ्रॉक खूप आवडला. " आई, अग हा फ्रॉक कधी गं आणलास तू मला? " जुईच्या बालमनात प्रश्नच प्रश्न उभे राहिले. बाबांकडे तर पैसे नाहीयेत मग...... तेवढ्यात आईने जुईला फ्रॉकची गंमत सांगितली. मग विचारले, " जुई, अग तुझे आवडते काम करणार ना आज तू? हे ताट घे अन समोरच्या दळवी काकूंकडे घेऊन जा गं सोने. " कोणाला काही नेऊन द्यायला आईने सांगितले की जुई खूश.

आताही तिने ताट घेतले आणि ती निघाली काकूंकडे. काकूंचे दार वाजवले..... " कोण आहे? अगं जुई तू. ये ये आत ये. फराळाचे ताट आणलेय का? ठेव ते. किती गोड दिसतेय गं पोर. नवीन फ्रीलचा फ्रॉक आणला का यावेळी दिवाळीला? आईला सांग हो दृष्ट काढायला. " " काकू, अहो हा फ्रॉक नवीन नाहीये. काय झाले ना, आमच्या बाबांचे ना गेले दोन महीने पगाराचे पाकीट मारले. मग पैसे कसे असणार? विनीत छोटा आहे ना.... तो रडेल म्हणून आईने ना त्याला नवीन शर्ट-पँट आणली. आणि माझा वाढदिवसाचा फ्रॉक होता ना त्यालाच हा लेमन कलर देऊन आणला. पण किती छान दिसतोय ना? मला खूप आवडला. " हे ऐकले आणि काकूंचे डोळे पाणावले.

जुईला बोटाशी धरले आणि जुईच्या आईकडे आल्या. " जुईच्या आई पोरीची दृष्ट काढा हो आज. एवढूसा जीव पण केवढी समज आहे तिला. अहो मोठ्यांना पण कळत नाही अशा प्रसंगात कसे वागावे. आणि ही चिमुरडी, अगदी सहजपणे सांगतेय की फ्रॉकला कलर करून आणलाय आणि तो मला खूप आवडलाय. जुई, पोरी सुखी राहा. " जुईला आपण असे काय केलेय की आई आणि काकू आपल्याला गुड गर्ल म्हणत रडता आहेत हे कळलेच नाही. फक्त त्या दुःखाने रडत नाहीयेत हे पाहून ती बाबांनी आणलेल्या टिकल्या एक एक करून फोडण्यात रमून गेली.

Friday, June 26, 2009

बोले तैसा चाले.......

प्रसंग १

रोहनः मॉम,.... मॉम... ऐक ना गं. ( वय: आठ )
सुनिताः रोहन, अरे काय आहे रे? तू ना एकदा का सुरवात केलीस की थांबतच नाहीस .... मी काम करतेय ना?
रोहनः मॉम, हो गं. काम तर तू सारखीच करत असतेस. ए ऐक ना... आज ना आमच्या नीलिमा टीचरने ना खूप मस्त गोष्ट सांगितली.
सुनिताः झाले का तुझे नीलिमा टीचरचे गुणगान सुरू? बरं बरं, लागली फुगा नकोय. हे बघ ठेवले काम बाजूला, आता सांग तुझी नीलिमा टीचर काय म्हणत होती ते.
रोहनः मॉम, अग एका आजीची गोष्ट आहे. तिच्याकडे घरातले फार काही लक्ष देत नसतात. पण मग घरात सून येते आणि ती सगळ्यांना आजीवर प्रेम करायला लावते. नीलिमा टीचरला ना गोष्ट सांगताना रडूही आले. ते पाहून आम्ही सगळे रडलो. नीलिमा टीचर म्हणत होती सगळ्यांवर प्रेम करा, मदत करा.
सुनिताः बरोबर. तुमची नीलिमा टीचर म्हणते ना तसेच कर तू.
रोहनः मॉम, माझा ना फार गोंधळ होतो गं. मी नीलिमा टीचरला मावशी म्हणू की टीचर? ती आपल्याच बिल्डिंग मध्ये राहते, मग मी घरी असतो तेव्हा तिला मावशी म्हणतो अन स्कूल मध्ये मात्र.....
सुनिताः तुला नीलिमा मावशी फार आवडते ना रोहन?
रोहनः यस, मॉम. नीलिमा मावशी एकदम बेस्ट. ती कधी खोटे बोलत नाही. ती सांगेल ते Trueच असते. आता मी जातो खेळायला. तू कर तुझे काम. टाटा......

प्रसंग २

रोहनः मॉम ... मॉम..... मॉम....
सुनिताः रोहन ... रोहन.. रोहन... स्टॉप. मला ऐकू आले आहे... काय झाले एवढे ओरडायला?
रोहनः ( खिडकीतून डोकावत..... मॉमला खुणा करतो इकडे ये .... ) मॉम, तुला ऐकू येतेय का?
सुनिताः ( कानोसा घेत..... खिडकीतून वाकून पाहते ... ) कोणाचा तरी ओरडण्याचा..... रडण्याचा आवाज येतोय ना रोहन?
रोहनः मॉम, मी आत्ता वर येत होतो ना तेव्हा मीनल म्हणाली की नीलिमा मावशीच्या आजी रडत आहेत.
सुनिताः रोहन त्या मावशीच्या आजी नाहीत रे .... सासूबाई आहेत. पण त्या का रडत होत्या?
रोहनः मीनल आणि मी गेलो होतो पाहायला आजी का रडतात ते. मॉम, आजी ना बाहेरच्या जिन्यात बसून रडताहेत गं. आम्ही आजींना विचारलं, का रडताय........ पण त्यांनी सांगितलेच नाही.
सुनिताः ( हा काय प्रकार आहे...? नीलिमा तर घरात आहे मग सासूबाई का बाहेर बसून.... आता ह्या रोहनला काय सांगायचे? ) रोहन अरे मावशी घरात नसेल आणि दार लागले असेल. मग आजी ना घाबरल्या असतील.
रोहनः नाही नाही मॉम, नीलिमा मावशी घरात आहे.

प्रसंग : ३

सुनिताः रोहन, काय रे झालं बाळा? आज एकदम गप्प आहेस. खेळायला गेलास पण तुमचा नेहमीचा आरडा ओरडा नाही ऐकू आला. कसला एवढा विचार चाललाय? शाळेत आज काय मज्जा झाली? नीलिमा टीचरने नवीन कुठली गोष्ट सांगितली ती सांगणार नाही का मॉमला?
रोहनः ( एकदम रागाने.... ) मला नीलिमा टीचर आवडत नाही. ती खोटारडी आहे. मी आत्ता खाली खेळायला गेलो ना तेव्हा मीनल म्हणाली की तिची आई बाबांना सांगत होती, " बिचाऱ्या आजी. ह्या निलीमाला वेड लागलेय का? चार तास काल त्यांना उपाशीतापाशी बाहेर बसवून ठेवले हो. असे कोणी करतं का? कारण काय तर संध्याकाळचे जेवण तयार ठेवले नाही. किती मोठ्याने ओरडत होती त्यांच्यावर. " मॉम, कालच तर आम्हाला स्कूलमध्ये म्हणाली की सगळ्यांवर प्रेम करा, मदत करा ......... आणि आता........ आजीला अशी शिक्षा केली. खोटारडी आहे अगदी. आजीवर प्रेम करायला हवे ना..... मग? मी नीलिमा मावशीला माझी फ़्रेंड.... एकदम True बोलणारी फ़्रेंड समजत होतो पण ती तर..... I hate her....
सुनिताः ( रोहन, बाळा....... कसे समजावू राजा तुला.......... जगात अनेक मुखवटे घेऊन माणसे जगत असतात. खायचे दात अन दाखवायचे दात हे नेहमीच एकच असतील असे नाही रे. तुझ्या भावविश्वाला आज पहिला धक्का बसलाय..... असे अजून कितीक........ ) रोहन, असे बोलू नये. तू यातून काय शिकलास सांग बरं? तू कधी कधी आजोबांना म्हणताना एकले असशील ना...... ' बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले ' .... म्हणजेच.... तुझे ते True बोलणे आणि तसेच खरे वागणे....... ठेवशील ना लक्षात?
रोहनः होय मॉम.... मी नक्की लक्षात ठेवीन.

Thursday, June 25, 2009

महान पॉप गायक - मायकल जॅक्सनचे आकस्मिक निधन.....




महान पॉप गायकाचे आकस्मिक निधन: मायकल जॅक्सन अनंतात विलीन झाला.

आज दुपारी त्याच्या राहत्या घरीच कार्डियाक अरेस्टने मायकल जॅक्सन कोलॅप्स झाला. त्याला त्वरित लॉस अजेंलिस येथील UCLA Medical Center येथे नेण्यात आले. परंतु उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही अन मायकल जॅक्सन अनंतात विलीन झाला. एका महान पॉप गायकाचे आकस्मिक निधन झाले हे ऐकून अत्यंत दुःख झालेय. लॅरी किंग शो मध्ये आत्ताच असे म्हटले की हा धक्का " जेएफके आणि एल्विस प्रिस्टले च्या निधनाने लोकांना जेवढा धक्का बसला होता तेवढाच जोरदार आहे. आपण एका युग कलाकाराला मुकलो. या महान कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली.


मायकल जॅक्सन थ्रीलर : http://www.youtube.com/watch?v=AtyJbIOZjS8

Wednesday, June 24, 2009

कतरा कतरा मरत राहतो.....

अव्याहत लोकलने प्रवास करणाऱ्या विविध वयोगटात लहान मुलेही असतातच. काही मुले अगदी वयाच्या पाच-सहा वर्षापासून वस्तू विकतात काही गाणी म्हणतात तर काही भीक मागतात. सकाळपासून रात्रीपर्यंत लोकल हेच त्यांचे जीवन असल्याने लवकरच ही सगळी मुले अनेक वाईट प्रसंगांना सतत सामोरे जाऊन जाऊन मुर्दाड बनतात. सगळ्यांचाच जीवनप्रवाह अतिशय वेगाने चाललेला असल्याने धड स्वतःकडे, स्वतःच्या घरच्या माणसांकडेही पाहायला पुरेसा वेळ नसलेले आपण अशा मुला-मुलींकडे पाहून जीव कितीही तुटला तरी हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. शिवाय ह्यांची संख्या इतकी प्रचंड आहे की तुम्ही धुळीच्या लाखांश कणाइतक्या जीवांना मदत करायचे ठरवले तरीही ते जमणार नाही. मग कधीतरी उगाच गरज नसतानाही त्यांच्यातल्या कोणाकडून काही विकत घे. गाणाऱ्या पोराला पैसे दे किंवा दररोज स्टेशनवर दिसणाऱ्या बहीण-भावंडांना कधीतरी खायला दे.... बस. आपली धाव इथपर्यंतच.

सतत लोकांकडून उपेक्षा, अपमान, मारहाण सहन करत करत साधारण दहा ते सोळा वर्षे वयात जेव्हा ही मुले पोचतात तेव्हा यांच्यात एक लक्षणीय बदल दिसून येतो. कमालीची बेफिकिरी, उद्दामपणा, जगाला फाट्यावर मारण्याची वृत्ती. चुकून जर कोणी त्यांना थोडी जरी आपुलकी दाखवायचा प्रयत्न केलाच तर ते त्यांना सोसत नाही. त्रास होतो. मनात असंख्य भोगाचे ज्वालामुखी धुमसत असणारी ही पोरे याच वयात दुसऱ्यांना त्रास कसा देता येईल हे शोधत राहतात व त्याची मजा घेतात. क्रिया-प्रतिक्रिया या नियमाने ह्या क्रियेचे पुढचे परिणामही असतातच...

संध्याकाळच्या स्लो लोकलच्या प्रवासात असाच एक अनुभव घेतला. साधारण चौदा-पंधरा वर्षाचा पोरगा दररोज आमच्या ट्रेनला परेलला चढायचा. परेलला गाडी पोचेतो लेडीज डबा ठासून भरलेला असतो. त्यात दरवाज्यातच उभे राहणाऱ्या काही ठराविक मुली-बायका असतात. दादरच्या तुफान गर्दीला तोंड देण्यासाठीची स्ट्रॅटेजी परेलपासूनच आखलेली असते. दररोजचे प्रवासी हे अलिखित चढण्या-उतरण्याचे नियम कधीच मोडत नाहीत. पण कधी कधी या अशा मुलांमुळे घोळ होतात. गेले काही दिवस दररोज हा घोळ सुरू होता.

परेलहून गाडी सुटली जरासा वेग पकडला की हा मुलगा कुठूनतरी धावत यायचा व तीन पैकी एक दरवाजा पकडायचा. तीनही दरवाज्यातील बायकांना हे माहीत झालेले असल्याने त्याला चढायला न देण्याचा जोरदार प्रयत्न त्या करत पण तो सगळ्यांना पुरून उरे. कारण एकच.... त्याला त्याच्या जीवाची क्षिती नव्हती पण बायकांना होती, एका निर्णायक क्षणी तो पडेल असे वाटून त्या त्याला आत घेत. तो हे बरोबर जाणून होता. हे जोवर इथवर होते तोवर बरे होते. हळूहळू त्याने खोड्या काढायला सुरवात केली. मुद्दामहून घाणेरडे बोलायचा, भांडण काढायचा.... कधी उतरताना-चढताना कोणाला तरी मारायचा......

काही बायकांनी त्याला ताकीद देऊन पाहिली, एकदोन जणींनी पोलिसांना सांगू म्हटले. दररोज भांडण होत होते. या साऱ्या प्रकाराची तो मजा घेत असे आणि ती स्पष्ट चेहऱ्यावर दिसत असे. मी तुम्हाला इतका छळतोय पण तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकत नाही.... असे आठदहा दिवस गेले. एक दिवस तो असाच चढला..... दरवाज्यात उभे असलेल्या एकीशी भांडण उकरून काढले. ती पटकन त्याला म्हणाली, " तू फार माजला आहेस. अजूनही वेळ गेली नाहीये. हे चाळे बंद कर. नाहीतर फार महागात पडेल. " हे ऐकून त्याने अजूनच उद्दामपणे... जा जा क्या करोगी तुम..... वगैरे बडबड सुरू केली. त्यादिवशी तेवढ्यावरच भागले.

दुसऱ्या दिवशी परेलला हा चढला. लटकत होताच. एकीकडे कुठलेतरी हिंदी गाणे म्हणत होता..... सायन स्टेशन दिसू लागले..... आणि अचानक याचा चेहरा वेदनेने पिळवटल्यासारखा झाला. मधल्या पॅसेजमध्ये आम्ही बऱ्याच जणी त्याच्या समोर उभो होतो आम्हाला कळेचना की याला काय होतेय. अन तो जोरात खेचला गेला. तो प्लॅटफॉर्मवर जोरात आपटल्याचा आवाज आला. पाच सेकंदात गाडी थांबली. पाहिले तर एक जबरदस्त दणकट स्पेशलवाला अक्षरशः लाथांनी ह्याला तुडवीत होता. या मुलांना हे असे स्पेशलवाले, पोलीस लांबूनच ओळखता येतात. याने त्याला पाहिले पण एकतर हा बाहेर लटकत होता शिवाय गाडीचा स्पीड जास्त असल्याने उडी मारणे शक्यच नव्हते.

दररोजच्या त्रासाला कंटाळून कोणीतरी कंप्लेट केली होती. असेही पोलिसांचे लक्ष असते असे ऐकून होते..... हा स्पेशलवाला दोन-तीन दिवस याच्या मागावरच होता. या मुलाचा बंदोबस्त करायला हवा होताच हे खरे असले तरी सिंगल फसली असलेल्या पोराचे एकही हाड जागेवर राहिले नाही इतका मारलेला पाहून फार त्रास झाला. पुढे किती महीने..... हा मुलगा अंथरुणावर.... रस्त्यावर खितपत पडला असेल.. जन्माचे पंगूपण आले असेल..... याच्या जन्मापासून सुरू झालेले असे बेवारस जिणे आता अजूनच लाचार झाले...... हे असे करोडो जीव..... वर्तुळ कुठे-कसे सुरू होते..... मात्र सुरू झाले की त्यातला प्रत्येक बिंदू ठसठसत राहतो...... कतरा कतरा मरत राहतो.....

Tuesday, June 23, 2009

मनःपूर्वक आभार....

दोन वर्षांपूर्वी मायदेशात श्री.अरुण वडुलेकर मला भेटले. गप्पांच्या ओघामध्ये त्यांनी मला त्यांच्या ' मालतीनंदन ' ब्लॉगबद्दल सांगितले. मायदेशात आल्यावर एकंदरीतच कॉंप्यूशी भेट रोज होत असली तरी फार वेळ मिळत नाही. मेल्स क्वचित कधीतरी मैत्रिणींशी गप्पा एवढेच. त्यामुळे इथे परत आल्यावर मी त्यांच्या ब्लॉगला निवांत भेट दिली. मला अतिशय कौतुक वाटले. नंतर मनोगतवर मी काही वर्षे असल्याने झालेल्या ओळखीतून सौ. रोहिणीशी ओळख झाली, वाढली... गट्टी जमली..

गप्पांच्या ओघात एक दिवस तिने मला तिच्या ब्लॉग्ज बद्दल सांगितले व तू का नाही ब्लॉग ओपन करत .... असे विचारले. तोवर मला अमिताभ, अमिरखान वगैरेंच्या ब्लॉग्ज बद्दल थोडे कुतूहल निर्माण झाले होते. पुन्हा आठ दिवसांनी रोहिणीने परत विचारले, " केलास का गं? " तेव्हा मात्र मनात आले की खरेच काय हरकत आहे प्रयत्न करायला. मग थोडी शोधाशोध, चाचपडत १८ फेब्रुवारी,२००९ ला मी ' सरदेसाईज ' ब्लॉग ओपन केला. मनोगतवर थोडे लिखाण केलेले असल्याने व मुळातच लिहायची ओढ असल्याने मनाने मागे ओढले नाही. विचार केला फार तर काय होईल..... बंद पडेल. सुरवातीलाच नकारात्मक विचार नको असे ठरवून, पाहू... जमेल तोवर करूच
.

ब्लॉगचा पहिला वाचक.. सौ. सासूबाई. त्यांना खूपच आनंद वाटला. पहिली टिपणीही त्यांचीच व पहिला फॉलोवरही त्याच. वेळोवेळी त्यांनी प्रोत्साहन दिले... देत आहेतच. माझे सौ. आई व बाबांनीही आत्मविश्वास वाढवला. नंतरकाही दिवसांनी मी ब्लॉग ' मराठीविश्वला ' जोडला. अनोळखी ( आता ओळखीचे ) वाचकात श्री. महेंद्र व यशोधरा हे माझे पहिले वाचक असावेत. त्यांच्याच पहिल्या टिपण्याही आहेत. महेंद्रने मार्गदर्शनही केले. ( आभारी आहे
) हळूहळू वाचक ब्लॉगवर येऊ लागले. त्यांच्या चाहुलीने माझा हुरूप वाढला.

जवळजवळ महिनाभराने इतरांच्या ब्लॉगवरचे निरनिराळे कॉउंटर्स पाहून मार्चच्या शेवटास मॅप, ट्रॅफिक वगैरे गॅझेट्स जोडली . एखादी गोष्ट करायला घेतल्यावर मन लावून करायची ह्या स्वभावाने मी कासवाच्या गतीने परंतु नियमीतपणे लिहीण्याचा प्रयत्न करीत आहे. आज चार महिने होऊन गेलेत.... सगळ्या वाचकांचे, वेळोवेळी आवर्जून लेख कसा वाटला हे सांगणारे वाचक, प्रत्यक्ष ब्लॉगवर टिपणी न टाकता मेलमध्ये कळवणाऱ्या वाचकांची संख्या मोठी आहे ..... अनेक मूक वाचक, जे नियमीतपणे ब्लॉगला भेट देतातच. लिहिलेले आवडले नाही तर जरूर सांगणारे वाचक. माझ्या असंख्य मैत्रिणी-मित्र...... सरतेशेवटी माझा नवरा व मुलगा..... या सगळ्यांनी मला दिलेल्या प्रोत्साहनाने माझे प्रयत्न चालू आहेत. आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. लोभ असू द्यात.........

मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा !
स्वप्नातिल पदर धुक्याचा
हातास कसा लागावा?

मन थेंबांचे आकाश
लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान
अवकाशी अवघडलेले
मन गरगरते आवर्त
मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत
हा सूर्य कसा झेलावा ?

चेहरा-मोहरा ह्याचा
कुणि कधी पाहिला नाही
धनि अस्तित्वाचा तरिही
ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा
कुणि कसा भरवसा द्यावा ?

Monday, June 22, 2009

बाबांची खिचडी

माझी आजी ( आईची आई ) मी सहावीत असताना खूप आजारी होती. बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये होती. आजीला बरं नसल्याचे पत्र आले शिवाय मोठा मामाही ( ति. दत्ता भट- पार्ल्याला राहत होता. ) आला आईला सांगायला. तो तसाच तडक नाशिकला गेला. आम्ही दोघेही लहान त्यात बाबांचा साईट जॉब. सकाळी आठला जात पण येण्याचे टाईमींग नव्हते. रात्री आठपासून दहापर्यंत कधीही येत. तेही मुंबईतच काम सुरू असेल तर, बाहेर असेल तर मग ते गायबच असत. सुदैवाने बाबा मुंबईतच होते. आईचा जीव काही राहीना. तेव्हा पोस्टात जाऊनच फोन लावावा लागत असे त्यामुळे फक्त पत्रांचा आधार. आजीची प्रकृती बिघडली. ती कोणालाही ओळखेनाशी झालीय हे कळले आणि आईने तडकाफडकी चार कपडे बॅगेत कोंबले. बाबांना चिठ्ठी लिहून ठेवली व मला बाबा व भावाकडे लक्ष दे असे सांगून ती निघाली.

आम्ही त्यावेळी चाळीत राहत होतो. शेजार पाजारच्या मावश्या-काकूंनी धीर दिला. आम्ही आहोतच गं, घाबरू नका. मी व भाऊ नेहमीप्रमाणे शाळेत गेलो, प्रथमच असे कुलूप लावून किल्ली बरोबर घेऊन मी शाळेत गेल्याने आपण एकदम जबाबदार-मोठ्ठे झाल्यासारखे वाटले मला.
संध्याकाळी घरी आल्यावर शेजारच्या काकूंनी चहा व खारी दिली ती खाऊन मस्त खेळलो. मग सात-साडेसातला आई लावते तसा देवाला दिवा लावला. उदबत्तीही लावली. ओळीने चार श्लोक व बे ते तीस पाढे म्हटले. बाबांचा पत्ता नव्हता. पोटात आता कावळे ओरडायला लागले होते. याआधी मी कधी स्वयंपाक केला नव्हता. आईच्या हाताखाली चिरणे-वाटणे, वरकाम मी नेहमी करत असे. पण गॅसशी मात्र झटापट केली नव्हती. काहीतरी करावे.... पण काय?

तेवढ्यात बाबा आले. आई गेल्याचे त्यांना माहीत नसल्याने आल्या आल्या आई न दिसल्याने, " काय गं, आई कुठेय? " असे त्यांनी विचारताच मी अगदी मोठ्या गंभीरपणे त्यांना सगळे सांगून आईची चिठ्ठी दिली. त्यांनी वाचली, मग आम्हा दोघांकडे पाहिले आणि हसून म्हणाले, " हात्तिच्या एवढेच ना? चला आता आठ दिवस आपले तिघांचे राज्य. आई आजीला जरा बरं नाही म्हणून गेलीय ना.... घाबरू नका. आजीला काही होणार नाही. ती लवकर बरी होऊन घरी येईल की तुमची आईही येईल. आता मला सांगा, कोणाला भूक लागलीये? " आम्ही दोघांनीही हात वर केला. तसे बाबांनीही हात वर केला. आम्हाला खूप मज्जा वाटली.

कपडे बदलून हातपाय धुऊन बाबा किचनच्या ओट्याशी उभे राहिले. " चला रे पोरांनो, काय बनवूयात? कांदे, बटाटे, टोमॅटो, कोबी दिसतोय इथे. आज खिचडी बनवतो. अरे तुमची आई काय बनवेल अशी झकास करतो. अक्कू ( घरात सगळे मला अक्कूच म्हणतात ) चल, मदत कर थोडी. बोट न कापून घेता कांदा, टोमॅटो चिरायला घे. तोवर मी डाळ-तांदूळ धुतो. " आम्ही सगळे मिळून खिचडीच्या तयारीला लागलो. भाऊ बसला बटाट्याशी झटापट करायला.... बाबांनी मोठ्या कढईत खिचडी करायला घेतली. भूतो न भविष्यती प्रकारा सारखे त्या खिचडीत काय काय टाकले कोण जाणे..... थोड्याच वेळात सुंदर वास घरभर दरवळायला सुरवात झाली. पोटातले कावळे आता फारच कावकाव करू लागले.


खिचडी होईतो मी पाने घेतली. तूप, लोणचे घेतले. मी आणि भाऊ एकदम तयार पोझ मध्ये बसलो. झाली एकदाची खिचडी तयार. एकदम गुरगुट . बाबांनी तिघांचीही पाने वाढली त्यावर लोणकढी तुपाची धार सोडली आणि, " हं, होऊन जाऊ दे जोरात " असे म्हणून खायला सुरवात केली. आमची आई सुगरण, अप्रतिम स्वयंपाक करते. पण ह्या खिचडीची बातच न्यारी होती. चविष्ट....
. मोठे मोठे कोबीचे, बटाट्याचे तुकडे, कुठले कुठले मसाले, बाबांनी अक्षरशः हाताला लागले ते घातले होते त्यात तरीही सुंदर चव झालेली. मोठ्ठी कढईभरून केलेल्या खिचडीचे शीतही शिल्लक उरले नाही.

आजी बरी झाली. घरी आली मग आमची आई आनंदाने परत आली. ती येईतो बाबा व आम्ही दोघे मिळून एकच पदार्थ-पूर्णानं ज्याला म्हणू शकतो असे निरनिराळे प्रकार शोधून शोधून करत होतो. कसलेही प्रमाण नाही जे हाताला सापडेल ते घालावे पण शेवटी गोळाबेरीज मस्त जमून जाई व सुंदर जेवण होई. आईला वाटले लेकरांची-बाबांची किती आबाळ झाली असेल. ती आल्या आल्या म्हणाली, " आठ दिवस फार हाल झाले असतील ना? आत्ता पटकन करते तुमच्या आवडीचे . " तसे आम्ही दोघे जोरात म्हणालो," नाही नाही आज तूच आराम कर.... काय बाबा, होऊन जाऊ दे आज पुन्हा. " तसे बाबा खूशीत आले ..... गालातल्या गालात हसत म्हणाले, " खरंच गं, हे मासिक घे-आरामात लोळ जरा. आम्ही बोलावले की ये जेवायला. आज तुला ट्रीट आमच्यातर्फे. "

आता अगदी हातखंडा झाल्यासारखी पर्फेक्ट खिचडी बाबांनी बनविली आणि आईला वाढली. आम्ही तिघेही श्वास रोखून आईची प्रतिक्रिया पाहत होतो. आईने घास घेतला, खाल्ला. मग आम्हा तिघांकडे पाहून " सुंदर " अशा तीन बोटे नाचवत खुणा करत ती चवीचवीने ते अमृत खात राहिली. काल फादर्स डे होता. बाबांना फोन केला - मला राहून राहून खिचडीची आठवण येत होती. " बाबा, पुढच्या वेळी मी येईन ना तेव्हा पुन्हा एकदा मला तुमची ऑल टाइम फेवरेट खिचडी खायची आहे, कराल ना? " हे बोलताना कंठ दाटून आला होता.... बाबांनाही ते पोचले असावे..... त्यांचाही आवाज जरासा हळवा-वेगळाच भासला.... " अग तू फक्त सांग, आत्ताच करतो नि फेडेक्सने देतो पाठवून. काय...? "

बाबांची अनेक रूपे डोळ्यासमोर आली. सुतारकाम करणारे बाबा--आमच्याकडे कपड्याचे कपाट नव्हते. महिनाभर खपून चार खणांचे एक मोठे कपाट बाबांनी तयार केले. आमची अभ्यासाची डेस्क, आईसाठी किचनचे मोठे कपाट. आजसारखी साधनेही नव्हती त्यावेळी, करवतीने कापताना किती कष्ट होत..... तासनतास आमचे बाबा मन लावून करत असत. आमच्या बरोबर घरात क्रिकेट खेळणारे बाबा, गवा आला गवा आला म्हणत आमच्या एवढे होऊन अंगमस्ती करणारे बाबा. तल्लीनतेने शास्त्रीय संगीत गाणारे .... ताना फेकणारे, मध्येच खर्जात जाणारे बाबा. फार थोडे दिवस ते पवईला ऑफिसमध्ये होते तेव्हा न चुकता शनिवारी अर्धा दिवस सुटी झाली की ऑफिसच्या कँटिन मधून पट्टीचे समोसे आणणारे, वार्षिक परीक्षा संपली की त्याच दिवशी संध्याकाळी कींगसर्कल ला एका बिल्डिंगमध्ये असलेल्या गाडीवर आम्ही नको नको म्हणेतो फालुदा-आइसक्रीम खाऊ घालणारे बाबा.......

शोमू बाळ असताना किती किती वेळ कडेवर फिरवणारे बाबा.... इथे आले तेव्हा अग तुमचे मिशिनग तळे आहे ना........... नचिकेत (माझा नवरा ) नेहमी चिडवतो बाबांना, " मग काय बाबा... जायचे का मिशिगन तळ्यावर....? अहो तळे कसले गोड्या पाण्याचा समुद्र आहे तो. " बाबांना काही पटत नाही..... त्यांचे चालूच, " तू काहीही म्हण रे.... पण तो लेक आहे ना? म्हणजे तळेच ....
" नचिकेत कोपरापासून हात जोडतो आणि खो खो हसतो...... मेनार्ड, लोज, होम डेपो ( जिथे घर बांधण्याचे सामान मिळते ) सारख्या दुकानात लहान मुलासारखे आनंदाने बागडणारे बाबा, अख्खा गाव पायी पिंजून काढणारे..... सदैव हसतमुख, मिष्किल, स्वतःचा जीव रमवणारे. आनंदी राहणारे व आनंद वाटणारे आमचे बाबा, सगळ्याच बाबांसारखे, तरीही खास. अगदी त्यांच्या हातच्या खिचडीसारखे खासं-खास.

Sunday, June 21, 2009

नेमके सत्य काय.......

गेल्या वर्षी आई-बाबांबरोबर नाशिकच्या डोंगरे मैदानावर भरलेले गृहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन पाहावयास आम्ही गेलो होतो. नेहमीप्रमाणे आज जाऊ उद्या जाऊ करता करता जेव्हा शेवटचे दोन दिवस उरले तेव्हा एकदाचा आम्हाला मुहूर्त लागला. नेमका शनिवार होता. रिक्षा सोडली तेव्हाच जाणवले की इतक्या मोठ्या परिसरात प्रदर्शन भरलेले असूनही प्रचंड गर्दीमुळे जागा अपुरी पडत होती. आता आलोय तर पाहूनच जावे, गर्दी तर गर्दी असे म्हणून आम्ही तिघेही त्याचा भाग होऊन गेलो.

हे बघ ते बघ, उगाच किडूकमिडूक खरेदी कर असे करत आम्ही तिघे मजा करत चाललो होतो. गर्दीमुळे थोडा त्रास होत होता परंतु जास्ती करून बायका,पोरी, फॅमिलीवाले लोकच होते. क्वचित थोडीशी जाणीवपूर्वक धक्काबुक्कीही होताना पाहिली. पण एकंदरीत सारे ठीक चालले होते. खूप सारी लोणची ठेवलेला एक राजस्थानी स्टॉल होता.... तिथे बरेच लोक टेस्ट करत होते. आम्ही त्याला वगळून पुढे गेलो आणि पुढच्या स्टॉलवरच्या सोयाबीनच्या गोष्टी पाहायला सुरवात केली तोच........

"XXX, XXXXXX क्योंरे मेरी घरवालीको छेडता हे..... XXXX , XX, XXX क्या समजता हैं भीड का फायदा उठाके भागेगा.... साला, मैं नही छोडनेवाला। " पाठोपाठ दोन जोरदार आवाज आले. मुस्कटात मारल्यासारखे. आधीच गर्दी त्यात इतक्या मोठ्या आवाजातले ओरडणे व लागोपाठ मारल्याचा आवाज ... त्या सगळ्यांच्या भोवती बरेच लोक जमा झाले. आम्हीही होतो त्यात. ज्याला मारले होते त्याच्याकडे लक्ष गेले ... मध्यमवर्गीय मराठी माणूस होता. बरोबर बायको व दोन मुली होत्या. अचानक झालेल्या आघाताने त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. बायको, मुली भेदरून गेलेल्या. तो एकदम गयावया केल्यासारखे म्हणाला, " अरे मी कशाला मारू तुझ्या बायकोला धक्का? ही बघ माझी बायको-पोरी बरोबर आहेत. तुझा गैरसमज झालाय. अग तू तरी सांग ह्याला. "

त्याची बायकोही घाबरलेली होती.. तिनेही विनवणीच्या सुरात म्हटले, " नाही हो, ह्यांनी नाही धक्का मारला. कशाला मारताय उगाच .... " अन ती रडायलाच लागली. तसेच नवऱ्याकडे वळून त्याच्या गालाला हात लावून धीर द्यायचा प्रयत्न करीत होती. कोणाला धक्का लागलाय ते पाहावे म्हणून नजर वळवली तर एक भैय्या फॅमिली होती. नुकतेच लग्न झाले असावे. भैय्यीण दिसायला चांगली होती. आपली बायको अप्सरा आहे असे भैय्याचे मत असावे. ( असू दे बापडे. चांगलेच आहे असे वाटणे. ) ती बरीच नटलीही होती. भैय्याला तिने सांगितले असावे की ह्याने मला धक्का मारला. तो एकदम ह्या माणसावर धावून आला होता.

बाचाबाची सुरू झाली. मराठी नवरा-बायको अतिशय गयावया करत होते. तो तो भैय्या जास्तच चवताळत होता. गर्दीत ८०% लोकांना भैय्याचे म्हणणे बिलकुल पटलेले दिसले नाही. टिपीकल, " ए चल चल, अभी जाने दे. इतनी भीड मैं थोडाबहोत धक्का लग सकता हैं. और इतना तेरेको लगता हैं तो आनेका नही ना गर्दी में और औरत को तो बिलकूल नही लानेका. " असे लोक बोलायला लागले तसे हे ऐकून भैय्या अजूनच अंगावर धावत ओरडायला लागला, " क्यों नही आनेका? तुम कौन हमको बोलनेवाला, और घरवालीकोभी लाऊगा. देखता हूं कौन उसको धक्का मारताय.... " मी त्याच्या बायकोकडे पाहिले तर ती हे सगळे मस्त एन्जॉय करत होती. तिने एकदाही भैय्याला अडवायचा प्रयत्न केला नाही की तिथून बाजूलाही झाली नाही.

मी आणि आई थक्क झालो. आम्हाला वाटले ह्या भैय्या कपल चा हा नेहमीचा उद्योग असावा. करमणुकीचा प्रकार. तीतर उघड मजा घेत होती. शिवाय मी कशी सुंदर आहे याचाही गर्व होताच. भैय्याला असे त्या बिचाऱ्याला चारचौघात त्याच्याच बायकोपोरींसमोर मारण्यात व अशी शोभा करण्यात आनंद मिळत होता. माझे चुकीचेही असेल कदाचित पण आम्हाला व गर्दीतल्या अनेक लोकांना मुळीच वाटले नाही ह्या माणसाने तिला धक्का मारला असेल. गर्दीच इतकी होती की .... शेवटी तिघाचौघांनी भैय्याला थोपवले. चल चल बहोत हो गया.... असे म्हणून प्रकरण निवळवले.

मला ह्या घटनेचा फार त्रास झाला. जर खरेच त्याने धक्का मारलेला नसेल तर इतके गयावया का करावे? समजा तो गांगरला असेल, अशा प्रकरणांत मॉबला डोळे नसतात असेही आपण गृहीत धरू पण त्याच्या बायकोने का झाशीच्या राणीचा पवित्रा घेतला नाही? तिला तर तिचा नवरा नक्कीच माहीत असावा.....तो असे कधीच करणार नाही..... (का या आधीही असे तिच्या पाहण्यात आले असेल? ) किमान बायकोपोरी बरोबर असताना तरी तो अशी हिंमत करणार नाही. ( का तिला माहीत असावे आपला नवरा कसा आहे ते? म्हणूनच.......
) कुठलीही बायको असे ऐकून घेणार नाही.

आम्ही बाहेर पडलो तेव्हा भैय्या व बायको चाट खाताना दिसले. दोघेही खिदळत होते. दोघांच्याही चेहऱ्यावर कशी मज्जा आली असेच भाव होते. ( निदान आम्हाला तरी वाटले तसे. ) आजही मला ते मराठी कुटुंब दिसते. ह्या घटनेने त्या चौघांवर एकाचवेळी भावनिक आघात झाला. मुलींच्या मनात भीती, बापाची अशी अवहेलना... कदाचित कुठेतरी खोल मनात तळाशी खरेच का बाबांनी....... बापाला- बायको-पोरींना काय वाटले असेल? जगासमोर असा अपमान..... उद्या ऑफिसमध्ये, शेजारीपाजारी..... कोणाकोणाला स्पष्टीकरण देणार..... मला अजूनही त्रास होतोय तर त्या सगळ्यांना............... किती झाला.... होत असेल........


इथे तो माणूस भैय्या होता म्हणून हे लिहिलेले नसून.... ही एक अतिशय चमत्कारिक प्रवृत्ती आहे. नंगेसे खुदा भी डरता हैं। याप्रमाणे काही लोक नेहमीच असे वागतात अन मुळात स्वभावाने गरीब लोक भरडले जातात. दुर्दैवाने मला या भैय्या-भैय्यीणी मध्ये एक छुपी दर्पोक्तीही दिसली.

Saturday, June 20, 2009

आयुष्यात एक क्षण भाळण्याचा..... शेवट......

नीताचे लग्न झाले. नवरा, त्याच्या घरचे सगळे चांगले होते. निनाद मनात आयुष्यभर जिवंत राहणारच होता. त्याला बरोबर घेऊनच नीताने संसार-नवऱ्यावर लक्ष केंद्रित केले. पाहता पाहता तीन वर्षे लग्नाला झाली. नीताला दिवस राहिले. माहेरचे-सासरचे, नवरा सगळे कोडकौतुक करत होते. नीताही मातृत्वाच्या चाहुलीने हरकली. सातव्याचे डोहाळजेवण घाटत होते अन एक दिवस संध्याकाळी नवरा थोडा उदास चेहऱ्याने घरी आला. " नीता, अग थोडा घोळ झालाय गं. मला कळतेय तुला खूप वाईट वाटणार आहे पण हे टाळता येणार नाही. " " अहो आधी काय झालेय ते सांगा ना? मेला माझा जीव टांगणीवर..... " " अग, मला प्रमोशन मिळालेय. " नीताला कळेचना की प्रमोशन मिळालेय ही तर आनंदाची गोष्ट आहे मग ह्याला का नको झालेय ते? " अहो, मग यात वाईट कशाला वाटेल? उलट पाहा बाळ येण्याआधीच तुम्हाला प्रमोशन मिळाले. म्हणजे दोन दोन प्रमोशन्स होणार तर. "

तिच्या ह्या आनंदाने नवराही खुशीने हसला, पण " अग, हो ते आहेच गं. पण माझी बदली होणार आहे. ती ही पंधरा दिवसात. म्हणजे तुला आई-बाबांकडे नेहमीच जाता येणार नाही शिवाय आपल्याला घरही सोडावे लागेल. त्यात तुझे दिवस भरत आलेत. कसे होणार गं सगळे मॅनेज ? " " अहो एवढेच ना? होईल सगळे नीट. बरं बदली कुठे होणार आहे ते नाही सांगितलेत, फार कुठेतरी आडरानात तर नाही ना? " " ती तर गंमतच आहे बघ, तुमच्याच गावी होतेय. मी तुझ्या बाबांना फोन केला होता, ते म्हणाले अजिबात काळजी करू नका. जागेचा प्रश्न सोडवतो लागलीच. खूप ओळखी आहेत तिथे. " नवरा बोलत होता..... नीताचे लक्ष कधीचेच उडाले होते. पुन्हा आपण ....... अरे देवा! निनाद..... निनाद तिथे भेटला तर.......

पुढचे सगळे भरभर झाले. नीताच्या डॉक्टरने लागलीच आपल्या मित्राला एक पेशंट पाठवतोय तुझ्याकडे, नीट काळजी घे रे असे सांगून मोठ्ठा प्रश्न सोडवला. जागाही मिळाली. बस्तान बसले. हे होईतो आठवा महिना संपत आला होता. नीता चांगलीच जडावलेली. घरातही हळूहळू कामे करत होती. पहिले बाळंतपण माहेरीच पण नीताने ठाम नकार दिला. आईलाच ये म्हटले, त्यानिमित्ताने तुझ्याही जुन्या आठवणींना उजाळा मिळेल गं. शेवटी हो नाही करता करता आईचेच येणे ठरले. आता सगळे बाळाची वाट पाहू लागले.

एक दिवस नवऱ्याने ऑफिसमधून फोन करून सांगितले, संध्याकाळी एका कलीगला घेऊन येतोय. अचानक काही प्रसंग उदभवला तर कोणीतरी हाताशी हवे शिवाय हा मित्र एकदम हसमुख, मस्त आहे. नीता बरं म्हणाली. तिच्याने फार काही करवत नव्हते तरी तिने साबुदाणा खिचडी व शिरा असा बेत केला. बेल वाजली, नीताने दार उघडले अन समोर निनाद उभा. दोघेही फक्त बेशुद्ध पडायची राहिली. तेवढ्यात नवऱ्याचा आवाज आला, " अग हाच माझा मित्र आहे. मी जरा टपाल घेऊन येत होतो ह्याला म्हटले हो पुढे. ये रे, आता ओळख करून देतो. निनाद ही माझी बायको नीता. अन बाळराजे आहेतच रस्त्यात...... काय? (जोरात हसून ) नीता हा माझा इथला एकमेव मित्र, निनाद. जिंदादील आहे एकदम. किती हँडसम आहे हे तू पाहतेच आहेस, पण अजून आम्ही most eligible bachelor बरं का. आता तूच विचार त्याला कशी पोरगी हवीय ते. "

नीता कसनुसे हसली, डोळ्यांनीच क्षमा मागत राहिली. निनाद व नीता दोघांनीही कलाकारांना लाजवेल असा अभिनय करून वेळ साजरी केली खरी पण किमान एकदा तरी भेटायलाच हवे असे मन म्हणतच राहिले. दोन दिवसांनी दुपारी फोन वाजला. आता या वेळेला कोण म्हणत नीताने फोन घेतला, तर निनाद होता. दोघेही खूप वेळ बोलले. परंतु नऊ वर्षांची कसर कशी निघावी. म्हणावे तर त्या दोघांमध्ये प्रत्यक्ष काहीच घडले नव्हते. तरीही जीव पूर्णपणे गुंतला होता. नीता निनादला विनवत राहिली लवकर लग्न कर म्हणून. निनादने हसण्यावारी घालवून तिच्या प्रकृतीबद्दल विचारत विषय बदलून टाकला. हळूहळू फोन सिलसीला चालू झाला.

निनाद - नीता आपल्या आपल्या मर्यादा जाणून होते. त्यामुळे आता डायरेक्ट अपेक्षा संपल्या होत्या. संवादात नकळत जास्त मोकळेपणा येत गेला. दिवस जवळ येत होते तेव्हा आता आईनेही यावे म्हणजे बरे असे म्हणून नवऱ्याने सासूबाईंना बोलावले. ती येण्याआधीच नीताला अचानक त्रास होऊ लागला. नवरा एकटा थोडं घाबरला त्याने निनादला फोन केला आणि गाडी घेऊन ये असे सांगितले. निनाद पळतच आला. नीताला सांभाळून दोघेही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. रात्रीतच नीताला गोंडस मुलगी झाली. दोघीही मायलेकी खुशाल होत्या. रात्रभर निनादही तिथेच बसून होता.

आठ दिवसांनी बाळाला घेऊन नीता घरी आली. आई-बाबाही बरोबर होतेच. खुशीत तीन महीने कसे गेले कळलेच नाही. निनाद दोनदा चक्कर मारून गेला. आता बाळाचे बारसे झाले की आम्ही जातो असा धोशा आईने लावला. आई जाणार याचे वाईट वाटले तरी केव्हातरी आईला जावेच लागणार होते. मग थाटात बारसे झाले. निनाद अगदी घरच्यासारखा वावरला. एकीकडे नीताला त्याचे असे जवळपास राहणे आवडत होते पण कुठेतरी अपराधी भावही डोकावत होते. जे त्या न कळत्या वयातही निनादने सांभाळले ते आता उधळले जाऊ नये...

आईबाबा गेले. पुन्हा नीता- निनादचे फोन सुरू झाले. संवादात आक्षेपार्ह काहीही नसले तरीही मनाच्या तळाशी प्रेम तसेच तिष्ठत होते. एक दिवस नवरा घरी आला...... बूट काढतानाच म्हणाला, " अग नीता, दुपारी ना बराच वेळ मी तुला फोन लावत होतो गं. चांगला २०% बोनस मिळणार आहे मला. ही आनंदाची बातमी कधी तुला सांगेन असे झालेले .... पण फोन सारखा एंगेज लागत होता. कोणाशी बोलत होतीस एवढा वेळ? " नीताचा ठोकाच चुकला, पण वरकरणी.... " नाही हो मी कोणाशी बोलणार? कदाचित सकाळी फोन पुसत होते ना तेव्हा चुकून नीट ठेवला नसेल गेला. " तो विषय तिथेच संपला.

नवरा दमल्याने पटकन झोपून गेला. बाळाला मांडीवर घेऊन झोपवताना नीता फार अस्वस्थ झाली. नवऱ्यावर तिचे प्रेम होते. त्याने तिला नेहमीच आनंदी ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता हेही तिला ठळकपणे दिसत असे. निनाद अजूनही लग्नाबद्दल काही बोलत नव्हता ह्याचाही तिला त्रास होऊ लागला होता. विचार करता करता कधीतरी तिला झोप लागून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मनाशी ठरविले की आज निनादचा फोन आला की कालचा संवाद सांगायचा. नेमका आज निनादचा फोन जरासा उशिराच आला.

" का रे? कामात होतास का खूप? मी कधी पासून वाट पाहत होते. " " अग हो, होतो जरा कामात. पण तू का एवढी वाट पाहत होतीस ते सांग. " मग नीताने काल संध्याकाळी झालेला तिचा व नवऱ्याचा संवाद निनादला ऐकवला. " निनाद, तुझे-माझे नाते आता मित्र-मैत्रिणीचे आहे तरी मी नवऱ्याशी खोटे बोलले. का? मला ह्याचा फार त्रास होतोय रे. आपल्या नात्याचाही अपमान आहे हा आणि उद्या असेच सारखे काहीतरी घडत राहिले तर नवऱ्याचा गैरसमज होईल अन मोठ्ठा अनर्थ ओढवेल. मी फार गोंधळून गेलेय. तू काहीच बोलत नाहीयेस...... मग मला कसे कळेल तुला काय वाटतेय ते? बोल ना? " " अग हो हो.... तू एकदम अपमान, अनर्थ असे मोठे मोठे शब्द बोलू लागलीस ना मी घाबरलोच गं. तुला आठवते ना मी तेव्हाही तुला घाबरायचोच. म्हणून तर बाईसाहेबांना म्हणावे लागले ना....... " असे म्हणून निनाद मोठ्याने हसला.

नीताला वाटले हा काय वेडाबिडा झालाय की काय? मी इतके गंभीर बोलतेय आणि...... " हे बघ, उगाच डोके शिणवू नकोस. बाळाकडे लक्ष दे. मी पाहतो काय ते. वेडाबाई, परत स्वतःला कधी दोष देऊ नकोस हं का. चल मी फोन ठेवतो आता. तू जप गं स्वतःला. " नीताला खूप हलके हलके वाटले. पंधरा दिवस गेले. निनादने फोन केला नाही मात्र एकदा संध्याकाळी सहज चक्कर मारून गेला. एके संध्याकाळी नवरा म्हणाला, " अग आजकाल हा निनाद ना सारखा साहेबाच्या केबिनमध्ये घुसलेला असतो. काय खलबतं चाललीत कोण जाणे. "

रविवार सकाळचे नऊ वाजले होते. नीताने सुंदर कांदेपोहे केले अन कोथिंबीर, खोबरे घालून लिंबू पिळत होती तोच दाराची बेल वाजली. एवढ्या सकाळी कोण आले असा विचार करत नवऱ्याने दार उघडले, " अग नीता, पाहिलेस का कोण आहे ते? आता दुसरी प्लेट भर गं. खूप दिवसांनी दर्शन झालेय साहेबांचे. " कोण आहे एवढे म्हणून नीता डोकावली तर निनाद. ती हसली, " खरेच की. काय कुठे गुंतला आहात आजकाल? " " सांगतो सांगतो. पण आधी पोहे. अग ह्याने तुझ्या पोह्यांची इतकी तारीफ केलेली की आज सकाळीच ठरवले तुमच्याकडे दत्त म्हणून थडकायचेच. चल आण लवकर. "

नीताने दोघांच्याही प्लेटस आणल्या. जरा जिभेची चव भागल्यावर नवरा म्हणाला, " आता बोल, इतक्या सकाळी सकाळी? काय बातमी आहे? गुड न्यूज आहे का? " " यस्स्स..... गुड न्यूजच आहे. ( अय्या, लग्न ठरले का ह्याचे? नीताचे मन खूश झाले ) पण पहिल्यांदा, नीता पोहे अप्रतिम. मला अजून हवेत बरं का." " अरे मुलगी कुठली? कशी दिसते? कधी आणतोस दाखवायला? " नवरा आता घायकुतीला आलेला " अरे अरे थांब जरा. तुला मुलीशिवाय काही दिसत नाही का? तर मी एवढ्या सकाळी का आलोय......... ?(निनादने एक मोठा पॊझ घेतला......... नीता व मित्राकडे पाहीले तशी उत्सुकता अनावर होऊन नीताने डोळे मोठ्ठे केले..... ते पाहून हसत हसत ) अरे गेले काही दिवस ऐकून होतो, चंद्रपूरला टेरेटरी मॅनेजरची पोस्ट ओपन झालीयं. पण कोणीच जायला तयार नाहीये. मोठे प्रमोशन आहे ना रे हे. मी सडाफटिंग माणूस. विचार केला आपणच घ्यावे ना प्रमोशन. मग काय साहेबांच्या केबिनमध्ये धरणे धरून बसलो होतो. काम फत्ते. आज दुपारीच निघायचेय म्हणजे उद्या सकाळी रिपोर्ट करता येईल. "

नीता-नवरा दोघेही अवाक झाले. नवरा म्हणाला, " निनाद, अभिनंदन! पण इतक्या तडकाफडकी....... आता जेवल्याशिवाय जायचे नाही. नीता पटकन काहीतरी छान कर गं. " नीता हो म्हणत आत गेली. भिंतीशी टेकून डोळे मिटून उभी राहिली. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. माझा निनाद कधीही वेड्यासारखे वागणार नाही. तिने भरभर उकडलेल्या बटाट्याची भाजी, पोळ्या व शेवयांची खीर केली. तोवर निनाद व नवरा बाळाला खेळवत गप्पा मारत, हसत होते. बाराच्या ठोक्याला नीताने जेवण वाढले. मनापासून निनाद जेवला. डोळ्यांनीच नीताला मी तृप्त झालोय हे सांगत राहिला.

निरोपाची वेळ झाली. नवऱ्याचा हात हातात घेऊन निनाद म्हणाला, " मी गेलो की पत्ता-फोन कळवीनच. दररोज इथे नसलो तरीही मी तुमचाच आहे. ( नीताकडे पाहत म्हणाला... ) कधीही हाक मारा मी धावत येईन. जपा स्वतःला-बाळाला, येतो आता. "

Friday, June 19, 2009

आयुष्यात एक क्षण भाळण्याचा........पुढे.....

निनाद दुखावला गेला. इतके वैतागण्यासारखे काय केलेय मी हेच त्याला समजेना. कोण समजते स्वतःला. जाऊ दे ना..... मी तरी कशाला केअर करतोय इतकी. पण तिचे डोळे तर काहीतरी वेगळेच सांगत होते. ह्या पोरींच्या मनात काय आहे हे देवालाही कळणे कठीण आहे. असे म्हणून खांदे उडवत निनाद निघून गेला.

पुढच्या महिनाभरात बरेचदा नीता-निनाद एकमेकासमोर आले. पण ना हसले ना बोलले.... मात्र एक दुसऱ्याला नजरेच्या टप्प्यात ठेवत राहिले. एक दिवस नीता लायब्ररीत पुस्तक बदलत असताना, निनादचा ग्रुप तिथे उभा होता. निनाद काही दिसत नव्हता. खट्टू होत ती जायला वळणार तोच निनादचे नाव कानावर आले. कोणीतरी म्हणत होते, " अरे तुम्हाला कळले ना, निनाद पुढच्या वर्षी कॉलेज चेंज करतोय ते. " काय? निनाद हे कॉलेज सोडून जाणार. नीताला खरेच वाटेना. अजून पंधरा दिवसात कॉलेजही बंद होईल. म्हणजे मग आपली कधीच भेट होणार नाही? काय हा असा, मला सांगावेसेही वाटले नाही का? दुसरे मन लागलीच आले भांडायला.... का.. का सांगेल तुला तो, जणू काही हे सांगितल्यावर तुला वाईट वाटलेय हे दाखवणारच होतीस तू त्याला. नीता उदास होऊन गेली.

निनाद आता बोलायला येईल असे नीताला वाटत नव्हते. उद्याचा शेवटचा दिवस.... काय करू मी? जाऊ का बोलायला... तेवढ्यात समोरून तिची मैत्रीण येताना दिसली. ती जवळ येताच नीताने विचारले, " साधना, अग निनादला पाहिलेस का आज? " " हो, आत्ताच तर भेटला मला गेटमध्ये. विचारत होता तू आली आहेस का ते. का गं? " " प्लीज, माझे एक काम करशील? निनादला जाऊन सांग मी त्याला लायब्ररीत बोलावलेय. अगदी असशील तस्सा ये म्हणावं. प्लीज. " साधनाला समजेचना काय चाललेय, " अग पण काही सांगशील का नाही कशाला ते... " " ते सगळे नंतर .... तू आधी जा पाहू. " बरं म्हणत चकीत होऊन साधना गेली.

धडधडणारे हृदय घेऊन नीता लायब्ररीच्या दारातच उभी होती अन तिला पळत येणारा निनाद दिसला. आता पळून जाणेही शक्य नव्हते. मनही माघार नको घेऊस, सांगून टाक असे सांगत होते. पण काय सांगू मी त्याला.... " नीता, काय गं? साधना म्हणाली तू असशील तस्सा ये असे सांगितले आहेस. म्हणून आलो पळत चहा टाकून. बोल आता. पुन्हा भांडायचेय का माझ्याशी? घे भांडून असेही मी पुन्हा सापडणार नाहीच तुला आता. पुढच्या वर्षी मी दुसऱ्या कॉलेजमध्ये जाणार आहे. " आता खुद्द निनादच्या तोंडून हे ऐकून नीताचे डोळे अश्रूंनी तुडुंब भरले. ते पाहून निनाद कावराबावरा झाला. तो काही बोलणार तोच, " निनाद, मी इंटरेस्टेड आहे तुझ्यात. आवडतोस मला खूप. " असे म्हणून नीता चक्क पळून गेली तिकडून. निनाद हक्काबक्का तिथेच वेड्यासारखा उभा राहिला.

हे ऐकले ते खरे आहे ह्यावर निनादचा विश्वास बसलाच नाही. पुन्हा एकदा ऐकायला हवे नीताला काय म्हणायचेय ते. त्यातून उद्याचा शेवटचा दिवस आणि ही मूर्ख मुलगी आज मला सांगतेय हे. तो तडक आत गेला, नीता कोपऱ्यात मोठ्या जाड बाडात डोळे खुपसून बसलेली दिसली. जवळ गेला तर पुस्तक उलटे. छान छान... " काय, आजकाल उलट्या पुस्तकात सुलटी अक्षरे दिसतात वाटते? " " अय्या! तू पण ना... कशाला आला आहेस इथे? जा न प्लीज." " बरं बरं जातो, पण आज चार वाजता बस स्टॉपवर भेट मला. खूप महत्त्वाचे बोलायचेय. बाय. " हो नाही काही न ऐकताच तो गेलाही.

जीव खाऊन शेवटी एकदाचे चार वाजले. नीता बसस्टॉपवर गेली तेव्हा निनाद वाट पाहत होताच. दोघेही चालू लागली. " नीता, जे म्हणालीस ते खरेच ना? गंमत तर करत नव्हतीस ना माझी? " नीताने डोळे मोठे केले, " अशी भलतीच गंमत मी करेन का तुझी? पण तुला काय वाटते ते मला.... " " अग मला पण तू आवडतेसच. फक्त तुला घाबरून बोललो नाही. पण हे बघ आपली परीक्षा अगदी दोन आठवड्यांवर आलीये तेव्हा आधी अभ्यास करूयात. चांगले मार्क्स मिळवूयात. मी जरी कॉलेज सोडून जाणार असलो ना तरीही तुला भेटेनच येऊन. मग ठरवू काय करायचे ते. पटतेय का तुला? " नीताने मान डोलवली. दोघांनी एकदाच एकेमेकाचा हात घट्ट धरला.... कधीही न सोडण्यासाठी. अन ते आपापल्या रस्त्याने गेले.

परीक्षा झाली. जेमतेम आठवडा झाला अन नीताच्या बाबांनी सांगितले, त्यांना प्रमोशन देत आहेत पण बदली होणार. काय करावे यावर बरीच चर्चा होऊन शेवटी ठरले की प्रमोशन घ्यावे. दोन वर्षांचा तर प्रश्न आहे ना. पुढे पाहू काय होईल ते. चला सामान बांधायला घ्या. नीताला समजेचना आता निनादला कसे कळवायचे. नीताच्या घरी फोन नव्हताच. निनादचा नंबर घ्यावा हे तिला सुचलेच नव्हते. साधनाही गावाला गेलेली. शेवटी निनादला न कळवताच नीता आई-बाबांबरोबर गेली.

पुन्हा कॉलेज सुरू झाले. निनाद पळतच आला, साधना दिसताच नीता कुठेय विचारताच.... गावच सोडून नीता गेलीये हे कळले अन तो वेडाच झाला. नीता सुरतेला गेलीये याव्यतिरिक्त साधनालाही काहीच माहीत नव्हते. आता संपूर्ण सुरतभर का शोधत फिरणार. तरीही निनाद दोनदा जाऊन आला. पण..... अशीच सहा वर्षे गेली. निनादने मास्टर्स केले. चांगल्या कंपनीत नोकरी लागली. इकडे नीताही बँकेत लागली. दोन वर्षांसाठी आलेले नीताचे बाबा सुरतेतच रमले. नीताला मागण्या येऊ लागल्या. निनाद कुठे राहतो हे जरी माहीत असते तरीही नीता शोधत गेली असती. पण कुठलाच मार्ग दिसत नसल्याने आईबाबांना काही सांगू शकत नव्हती. शेवटी वाढत्या दडपणाने एका चांगल्या स्थळाला तिने होकार दिला. आणि नीताचे लग्न झाले.

क्रमशः

Thursday, June 18, 2009

आयुष्यात एक क्षण भाळण्याचा........ उरलेले सांभाळण्याचा

लायब्ररीमध्ये आजकाल फारच गर्दी होऊ लागलेली. वर्षभर उनाडणारी पोरेही पुस्तकात डोके घालून बसली होती. बारावीची परीक्षा अगदी दोन महिन्यावर आलेली. जोतो जीव आय मीन वर्ष वाचवायच्या खटपटीला लागलेला. प्रथमपासून अभ्यास करणारी, स्कॉलर पोरेपोरी थोडीशी शांत होती. बाकीची त्यांच्या मागेमागे. नोटस माग तर कुठे अडलेले समजावून घे. नीता.... शांत, सरळ मुलगी. मध्यमवर्गीय. आपण बरे आपला अभ्यास बरा ह्या प्रकारात मोडणारी. शाळेपासूनची मैत्रीण इथेही बरोबरच असल्याने नीताला नवीन ओळखी झाल्या असल्या तरी गुंतण्याची गरज वाटलीच नाही. सगळे आलबेल चालले होते. अन एक दिवस....

नीताने क्लासच्या दारात पाऊल ठेवले तोच कपाळावर... ठपाक..... " आई गं..... कोणी..... कोणी मारला बॉल? डोळे फुटलेत का? जरा समोर पाहा...... हा क्लास आहे खेळाचे मैदान नाहीये. स्स्स्स्स..... आता हे टेंगूळ ...... " नीताच्या कपाळावर टेबल टेनिसचा बॉल फाडकन बसला होता. दररोजच क्लास सुरू होण्याआधी निनाद व त्याचे मित्र सरांच्या टेबलालाच टेबल टेनिसचे टेबल बनवून खेळत असत. निनाद एका साइडने परमनंट मेंबर... तो हरतच नसे. दुसऱ्या बाजूचे प्लेअर्स बदलत राहत. वर्गातली खूप पोरे-पोरी ह्याचे फॅन्स. तसा हँडसम होताच. प्रचंड गोरा, धारदार नाक, चांगली सहा फुटापर्यंत उंची. किंचित बेफिकिरी...... केसांची झुलपे उडवताना ती जाणवत असे. वागणे-बोलणे मात्र एकदम सिंपल. पटकन कोणालाही स्वतःकडे खेचून घेणारी, आरपार जाणारी नजर. त्याच्याकडे फारसे कधीही न बघता नीताने केलेले हे त्याचे निरीक्षण होते.

तो दररोज एकदातरी दिसावा असे नेहमी तिला वाटे. पण ही भावना तिने इतर कोणाशी तर सोडाच स्वतःच्या मनाशीही शेअर केली नव्हती. वरकरणी मात्र ती त्याला बदमाश म्हणत असे. नेमका आज बॉल बसल्याने तिचा पारा तडकला होता. निनादने पाहिले, टेंगूळ तर आले होतेच. त्यालाही थोडे वाईट वाटले, तो सॉरी म्हणणार होता परंतु नीताने राग देताच तोही नकळत भडकला. " अहो मॅडम, काय.... तोंड चालूच ठेवणार का? मी बॅकहँड मारेतो तू दरवाज्याच्या आसपासही नव्हतीस . त्यात हा माझा मित्र तो उचलणार नाही हे माहीत होते का? नेमके तुलाच त्या बॉलसमोर कपाळ आणायची काय गरज होती? आणि काय गं, कधी पडली नाहीस का? एवढूसे टेंगूळ काय आलेय तर किती ओरडा आरडा करत्येस? अगदी रडूबाईच आहेस तू तर...."

तेवढ्यात बेल वाजली. क्लास जवळ जवळ भरलेला. इतक्या मुलामुलींसमोर सॉरी तर नाहीच म्हणाला उलट मलाच झापतोय ... नीताच्या डोळ्यात पाणी आले. इकडे एवढ्या पोरापोरींसमोर सरळ सरळ इन्सल्ट करतेय म्हणून निनाद वैतागलेला. नीताच्या डोळ्यातले पाणी पाहून मात्र कुठेतरी खोलवर दुखले त्याच्या. तो काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यात सर आले, तशी ती दोघेही आपापल्या जागेवर जाऊन बसली. पूर्ण तासभर निनाद मधूनमधून नीताकडे पाहत डोळ्यांनीच सॉरी म्हणत राहिला पण नीताने कळत असूनही संपूर्ण दुर्लक्ष केले. क्लास संपला. पुढे पंधरा मिनिटांची रिसेस होती. नीता मैत्रिणींबरोबर लेडीज रूममध्ये जी पळाली ती बेल वाजेपर्यंत बाहेर आलीच नाही. त्या दिवशी निनादला संधी मिळालीच नाही. नंतर रविवारला जोडून कुठलासा बँक हॉलिडे आला मग कॉलेजची इलेक्शन्स होती. त्या धामधुमीत संपूर्ण आठ दिवस निघून गेले.

दहा-बारा दिवसांनंतर निनाद दुसऱ्या मजल्यावरून कॉलेजच्या गोल जिन्यावरून खाली उतरत होता तर त्याला तळात नीता दिसली. पांढरा शुभ्र लेसवाला मेगास्लीव्हजचा टॉप, खाली प्लीटेड शेवाळी रंगाचा स्कर्ट... नीताचे लांब केस हा चर्चेचा विषय होताच कॉलेजमध्ये. तिने दोन वेण्या घालून त्या पुढे घेतल्या होत्या. दिसायला सुंदर असूनही नीताला त्याची जाणीव आहे असेही दिसत नसे त्यामुळे ती अजूनच देखणी, निरागस दिसत असे. निनाद भरभर उतरून आला तोवर नीता पहिल्या मजल्यावर पोचली होती. अचानक निनादला समोर पाहून ती थबकली.

" नीता...... एक मिनिट गं..... " तशी भुवया उंचावत तिने खुणेनेच काय?
" अजून राग गेला नाही का तुझा? अग मी काय मुद्दाम मारला का तुला बॉल? तरीही मी सॉरी म्हणत होतो पण तू बसलीस तोंड फुगवून... मग मी कशी तुझी समजूत काढणार? " " निनाद , उगाच आव आणू नकोस. तुला काही वाईट वगैरे वाटलेले नाहीये. आताही मित्रांशी पैज मारून आला असशील काहीतरी..... चल, मी जाते. तूही जरा अभ्यास कर. नाहीतर होशील नापास. "

असे म्हणून नीता भरभर पायऱ्या चढू लागली.... मनातल्या मनात स्वतःलाच कोसत होती. बापरे! कशाला मी त्याला असे बोलले? आता हा अजूनच भडकेल. पण मला दिसतेय ना माझे मन त्याच्याकडे ओढतेय ते. एवढ्या जवळून आज प्रथमच पाहिले त्याला, भुवईवर खोक पडल्याची निशाणी दिसत होती. कपाळाला.... त्या.....खोकेला कुरवाळणारी झुलपं, धारदार नाकाच्या शेंड्यावरचा तीळ, थोडेसे जाड-भरलेले ओठ, संपूर्ण चेहऱ्यावर आलेला किंचित घाम ...... शर्टाची दोन बटन्स उघडी ..... त्यातून दिसणारी छाती अन तुरळक केसांची रेघ.......... अवघ्या दोन मिनिटांत मला व्यापून गेला हा. बाई गं, कळले असेल का त्याला माझे असे नजरेने............ नीता लाजेने अर्धमेली झाली. शब्द इतके कोरडे, फटकारणारे अन डोळ्यातून सांडणारे............... मज हवास तू......... काय खुळेपणा करतेय मी.....

निनाद दुखावला गेला......

क्रमशः

Wednesday, June 17, 2009

हम भी आपके जहन मे बस गये...

गेल्या दोन वर्षात चार वेळा एकटीने विमानप्रवास केला. मुळात प्रवासाला जायचेय ह्या नुसत्या विचारानेच मी रस्त्याला लागते. त्यात बरोबर कोणीही नाही म्हणजे पर्वणीच. त्यातून विमानप्रवास म्हणजे घरातून निघून घरात पोचेतो चोवीस पासून तीस तासांपर्यंतचा मुबलक वेळ पूर्णतः माझ्या मालकीचा ... खरे तर मनाच्या ताब्यात. मी त्याला मुक्त सोडून देते.... जिथे ते नेईल तिथे मी पिसासारखी हलकी होत होत घरंगळत राहते. अंतरंगात कुठेतरी खोलवर गाडलेल्या काही नोंदी, एकेकाळी जीवाभावाची असलेली माझी माणसे. आता हाकेच्या अंतरापलीकडे गेलेले बालपण. कॉलेजमधली धमाल... आणि बरेच काही. ज्यांच्यावाचून मला जगणे कठीण आहे अशी, माझ्यासाठी जीवही देणारी प्रेमाची माणसे. सारे सारे मोकळा श्वास घ्यायला, पुन्हा एकदा भरभरून माझ्या अंतरंगात जगायला अहमिकेने पृष्ठभागावर येतात.

अशीच एकदा नवऱ्याला टाटा करून डेट्रॉईट वरून निघाले. बाबांना बरे नाहीये हे कळल्याने घाईघाईतच मायदेशी निघाल्याने वाचायला छानसे काहीतरी घ्यायला विसरले. त्यात माझ्या समोरच्या पर्सनल टीवीच्या अंगात आलेले. असहकार पुकारून त्याने ताणून दिलेली. नॉर्थवेस्टने जेवण बरे दिले, विचार केला एक झोप काढावी.

किंचित गुंगी चढायला लागली तोच पुढून आवाज ऐकू येऊ लागले, " नमस्ते स्वामीजी। आप को कोई कष्ट तो नही?" जरा नजर उंचावून पाहिले तर एक मायावतीची सख्खी बहीण शोभावी अशी अंमळ जास्तच तंदुरुस्त संन्यासिनी दिसली. गळ्यात ह्या मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा. केसांचा नारदमुनी. ती इतकी गोलमटोल होती ना की तिचा गरगरीत कलिंगडांसारखा चंद्रमा व त्यावर हा नारदमुनी बुचडा त्याला गुंडाळलेल्या रुद्राक्षाच्या माळा... खासंच दिसत होती. अंगावर भगवी कफनी, अन पायात चक्क हाय हिल्स. हे काय भलतेच.

आता ह्या वेषाला साजेसे म्हणजे खडावा असताना हिने हिल्स घातलेल्या. मला उगाच मोह झाला हिची कफनी जरा उचलून पाहावी. नक्की सांगते कफनीच्या आत मस्त पंजाबी किंवा पँट-टॉप असेल. स्वतःच्या हाताला थप्पड मारून गप्प बसवले. तेवढ्यात स्वामीजींचा आवाज ऐकू आला, " बालीके हम संतुष्ट, प्रसन्न हैं। आप चिंता न करे। " अरे वा! स्वामीजींचा आवाज धीरगंभीर होता. पण जरा तरुणच वाटला. ते दिसत नसल्याने उगाच उत्सुकता वाढली. नंतर त्यांचे काहीच संभाषण ऐकू आले नाही. म्हणजे बहुतेक दोघांची समाधी लागलेली असावी. मग नकळत मीही केव्हानूक झोपून गेले.

अमस्टरडॅमला फक्त एक तास वीस मिनिटांचा हॉल्ट होता. त्यामुळे पुढे मुंबईला जाणाऱ्या लोकांना जेमतेम रेस्टरूम मध्ये जाऊन फ्रेश होण्याचा वेळही कसाबसा मिळाला. लागलीच आम्ही सगळे सिक्युरिटीच्या रांगेत उभारलो. आठ-नऊ तास एका जागी बसून पाय अवघडलेले फार वाटत होते किमान पंधरा मिनिटे चालावे पण इलाजच नव्हता. सारखा प्रवास करून करून कुठल्या विमानतळावर काय प्रश्न विचारतात हे आताशा तोंडपाठ झाले आहे. म्हटले चला आता पुन्हा एकदा नऊ तासांची खिंड लढवली की आमच्या मुंबईचे दर्शन होणार. रांग बरीच मोठी होती शिवाय उद्योग काही नव्हता म्हणून आजूबाजूला नजर गेलीच. आणि स्वामिजी दिसले...

कालची उत्सुकता शमली नव्हतीच त्यामुळे.... अंदाज बरोबर होता. स्वामिजी अगदीच तरुण... खरंतर पोरगेलेसेच होते. जवळ जवळ पावणेसहा फूट उंच. अतिशय गौर वर्ण, चकाकती त्वचा ( उगाचच वाटून गेले, फारच साजूक पदार्थ सेवन करत असावेत. ). खांद्यावर रुळणारे कुरळे, लाटांसारखे केस. अंगावर कफनी, रुद्राक्षाच्या दोनच माळा, पायात खडावा. अंगकाठी कृश पण तुडतुडीत. डोळे पिंगट-तेज असलेले. चेहऱ्यावर अतिशय प्रसन्न, निर्मळ हास्य. आवाज संतुलित होता. त्यांच्या हालचाली, बोलणे , हावभाव पाहून सारखे वाटत राहिले हे सगळे आरशासमोर उभे राहून घोटले आहे.
स्वामिजी व शिष्या दोघेही लाईनीत उभे होतेच.

रांग सरकत सरकत एकदाचा ह्या दोघांचा नंबर आला. तुम्ही दोघेही बरोबर आहात का? असे चेकिंग करणाऱ्याने विचारताच, स्वामिजी म्हणाले, " श्रीमान संपूर्ण जगच माझ्याबरोबर आहे. " ( हे सगळे संवाद आंग्ल भाषेत चाललेले होते. ) तो नेदरलँडचा माणूस हे ऐकताच एकदम बावचळलाच. त्याचे इतरही चार-पाच सहकारी कान टवकारून ऐकू लागले. रांगेत उभे असलेली ८०% माणसे आपलीच त्यांच्याही नजरा व कान आता स्वामीजींना चिकटले.
चेकींगवाल्याने आता स्वामिजी व शिष्या यांना त्याच्या डेस्कपाशी नेले. ( छोटी छोटी स्टँडीग डेस्क तिथेच बनविलेली असतात. तिथे प्रश्न विचारले जातात. ह्यांवर मॉनिटरींग करण्यासाठी एक चीफ ऑफिसर फिरत असतो. )

चेकींगवाल्याला आपण जॉन म्हणूयात....

जॉनः कुठल्या विमानाने आपण आलात?
स्वामीजी: 747 ने आलो.
जॉनः नो नो... म्हणजे कुठून आलात असे विचारतोय?
स्वामीजी: डेट्रॉईट वरून आलो.
जॉनः किती वेळ झाला? इथे आल्यावर सगळा वेळ काय केलेत?
स्वामीजी: तू इथला कर्मचारी ना? म्हणजे आमचे विमान कधी आले ते तुला माहीत असेलच. इथे आल्या आल्या तुझ्या रांगेत उभे राहिलोत.
जॉनः हे सामान तुमचे आहे का? रेस्टरुम मध्ये गेला होता का? जर गेला असाल तर सामान कुठे ठेवले होते त्यावेळी?
स्वामीजी: मी दुसऱ्याचे सामान कशाला घेऊ? असेही सामान हा मोह आहे. तो कमीतकमी असावा माणसाला. ( आता सगळे गालातल्या गालात हसू लागले होते. ) रेस्टरूम मध्ये गेलो होतो तर. शरीराची हाक प्रथम ऐकायला हवी . सामान ह्या माझ्या शिष्येजवळ ठेवले होते.
शिष्या गडबडीने काहीतरी बोलू पाहत होती. तर जॉन ने तोंडावर बोट ठेवत तिला चूप केले. ( स्वतःच्या तोंडावर बोट ठेवून....
)
जॉनः बरं महोदय आता आपण कुठे जाणार आहात?
स्वामीजी: तू कुठल्या विमानात जाणाऱ्या माणसांची तपासणी करतो आहेस त्या विमानात. ( आता सगळ्यांची खात्री पटत चालली होती की स्वामी मिश्किल आहेच, ते व जॉन एकमेकांची खेचत आहेत व लोकांची करमणूक होतेय हेही त्यांना कळतेय. कारण उत्तर दिले की स्वामिजी एक नजर आम्हा सगळ्यांकडे टाकत व हसत. )
जॉन: आता शेवटचा प्रश्न..... ह्या बॅगेत काय आहे?
स्वामीजी: माझे सामान आहे.
जॉनः म्हणजे काय ते सांगू शकाल का? ते बॅगेत तुम्हीच भरले आहे का?
स्वामीजी: मी अंदाजे सांगू शकतो. पण ते मी भरलेले नाहीये. माझ्या सेवेसाठी असलेल्या शिष्यांनी भरले आहे. ( इथे त्यांच्या शिष्येने कपाळावर हात मारून घेतला. स्वामीजींचे सत्य कथन आता महागात पडणार की काय ह्या शंकेने तिने पुन्हा तोंड उघडले. लागलीच जॉनचे बोट ओठांवर गेले, डोळे मोठे झाले. )
जॉनः ओह.... म्हणजे किती जणांनी? ते तुमची बॅग भरत असताना तुम्ही कुठे होतात व काय करत होतात?
स्वामीजी: दोघींनी..... ( शिष्येकडे वळून का तिघींनी गं? त्यावर तिने खुणेनेच दोन बोटे दाखवली. जॉनच्या दटावणीने आता तिने ओठांची हालचालही केली नाही. ) भरलेय. मी ना होतो त्यांच्या जवळपासच.
जॉनः किती वेळ लागला सामान भरायला?
स्वामीजी: दोन दिवस. ( केबिन लगेजची बॅग भरायला दोन दिवस लागले म्हटल्यावरच बरेच जण फुसकन हसले. )
जॉनः मग ते दोन दिवस तुम्ही रूम मधून कुठेच गेला नाहीत?
स्वामीजी: अरे तू वेडा आहेस का? दोन दिवस मी कसा बरे राहणार त्या रूममध्ये? कमीतकमी बार-पंधरा वेळा रेस्टरूम मध्ये गेलो. चार वेळा जेवलो. प्रार्थनेला गेलो..... वगैरे बरीच यादी वाचली स्वामीजींनी.
जॉनः ( त्याला आता हसू दाबता येत नव्हते. सहकारी तर मस्त एन्जॉय करत होते. पण वेळ फार कमी होता व रांगेत अजून बरीच लोकं होती. त्यामुळे त्याने आवरते घ्यावे ह्या विचाराने .... ) बरं स्वामिजी आता पटकन सांगा बरे बॅगेत काय आहे?
स्वामीजी: सांगू? त्यापेक्षा असे करतो, सगळी बॅगच इथे उपडी करतो मग तूच घे पाहून. असे म्हणत स्वामीजींनी खरेच बॅगेची चेन काढली आणि आता ते बॅग ओतणार तोच.....
जॉन चा साहेब पळत आला. म्हणाला....., " You are good to go. Have a nice trip and enjoy our hospitality. " आणि त्याने स्वामीजींना चक्क नमस्कार केला.

आम्ही सगळे सोपस्कार पार पाडून एकदाचे शेवटच्या लॉऊंज मध्ये आलो तसे स्वामिजी पटकन म्हणाले, " देवीयों और सज्जनो आशा हैं आपका समय आनंदमय व्यतीत हुआ होगा. इस बहाने आप थोडा हस लियें और हम भी आपके जहन मे बस गए. शुभं भवतु॥ " गंमत म्हणजे सगळ्यांनी उस्फुर्तपणे हलक्याश्या टाळ्या वाजवल्या. स्वामीजींचे म्हणणे खरेच होते.... सगळ्यांच्या स्मरणात.......

Tuesday, June 16, 2009

ओपन चॅलेंज देऊन तो गेला......


आज सकाळी सकाळी नवऱ्याने मला म्हटले तर ओपन म्हटले तर छुपा चॅलेंज दिला. झाले काय.... नेहमीप्रमाणे पोराला सकाळी सहाला फोन करून उठवले. माझे एक चांगले आहे, कितीही वेळा झोपेतून उठावे लागले तरीही क्षणात निद्रादेवी प्रसन्न. पुन्हा एक मस्त डुलकी काढली. ही अशी डुलकी म्हणजे हमखास स्वप्नांचा कहर... कमीत कमी दोन-चार हवीच. रेस लावल्यासारखी , मी पहिला मी पहिला करीत एकमेकाला ढकलत घुसत राहतात. गंमत म्हणजे ह्या गुंगीतून जागे झाले ना की जशीच्या तशी आठवतही राहतात. मग दिवसभर माझा मूड त्यांच्या तालावर नाचत राहतो.

उठून खाली किचनमध्ये आले. कॉफी केली आणि नवऱ्याला हाकारले. पहिल्या दोन-तीन हाका वरपर्यंत पोचतच नाहीत.
मग जरा उंच आवाजात.... की लागलीच, " हो आलो, ऐकू येतेय मला. अजूनतरी बहिरा नाही झालोय." चला दिवसाची सुरवात दररोजसारखी झाली म्हणत कामाला लागले. पण आजचा नूर वेगळाच होता ( हे नंतर मला कळले. ) चहा घेता घेता पटकन ब्लॉगवर एक नजर टाकावी म्हणून कॉंप्यू लावला. रोहनची नवीन खाण्याची पोस्ट दिसली मग लागलीच त्याच्या ब्लॉगवर गेले तोच नवरा डोकावला.

सकाळी सकाळी काय वाचते आहेस? स्लाईड शोचे फोटो पाहत पाहत एक मोठा सुस्कारा टाकत ( सॉलिड ड्रामा केलान आज नवऱ्याने ) , " काय लकी आहेत ना? तुला आठवते, घाटकोपरला असताना आणि ठाण्यात आल्यावरही आठवड्यातून चार वेळा मी ऑफिसला जाताना उडप्याकडे जायचो. अहाहा... काय दिवस होते साला........ 8-> ( नवरा गेला खयालोमें.......) एक उपमा-चटणी (संपूर्ण लुसलुशीत ओल्या खोबऱ्याची ) एक्स्ट्रा सांबार. ते आले की लागलीच पुढची ऑर्डर देऊन टाकायची...खंड नको पडायला तल्लीनतेत. नरम साधा डोसा, एक्स्ट्रा चटणी. तृप्त... मग ऑफिसचा विचार करायचा. " नवरा इतका रमला होता की मला त्याची तंद्री मोडायचे अगदी जीवावर आले होते पण....

" अहो साहेब, चला आता. उडप्याला टाटा करा आणि सिरीयलकडे वळा." म्हणतात ना विनाश काले विपरीत बुद्धी..... अगदी तसेच झाले. हे असे डिवचून सकाळी सकाळी मी पायावर मोठठा धोंडा पाडून घेतला. सिरियलचे नांव काढताच नवरा भडकला. एकतर तो खयालोमें चवीचवीने खात होता तिथून त्याला ओढून मी कॉर्नफ्लेक्स खा म्हटले.... " हो बरं का, खातो आता तेच. आलीया भोगासी.... तुम्हाला नाही जमणार कधी हे... वैताग साला. " असे बडबडत तो गेला आवरायला.

असा राग आला मला. काय समजतो काय मला, हे काय हॉटेल आहे? काल रात्री म्हणाला असता तरी मी..... अशी फणफण करत होते पण एकीकडे मलाही उडप्याची फार आठवण येऊ लागली होती. सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान उडप्याकडेही थोडे शांत, प्रसन्न वातावरण असते. देवाच्या मोठ्या फोटोला भरगच्च मोगऱ्याचा किंवा मल्लीगेंचा ( बहुतेक हेच नाव असावे त्या फुलांचे ) सुवास दरवळत असतो. तो घेत घेत टेबलवर बसलो की ताज्या ताज्या इडल्या, डोसा, उपमा..... काहीतरी करायलाच हवेय. त्यात नवरा चक्क ओपन चॅलेंज देऊन गेलाय. कॉम्प्यूला रामराम ठोकला. पटकन फ्रीज उघडला. आणि...

नेहमीच्या सवयीने शिजवलेली डाळ पटकन, आमटी/सांबार करता यावे म्हणून वेगळी ठेवलेली दिसली.
इडल्या कराव्यात ह्या विचाराने पीठ कालच केले होते. अरे वा! इतके अवघड नाहीये. स्वत:चीच पाठ थोपटून घेतली. लागले भरभर कामाला. पस्तीस मिनिटे मिळाली. आवरून नवरा आला खाली. तोवर मी " देखा हैं पहिली बार... " हे टिपीकल उडप्याचे गाणे जरा मोठ्या आवाजात लावलेले. ते पाहून मला झटका आलाय सकाळी सकाळी असे वाटून नवरा म्हणाला, " काय आज दिवसभर तबकडी का? " एकीकडे मोठे श्वास घेत," काय गं, खयालोंमे गेले की असे सुंदर वासही येतात का? मोगरा-जाईचा तोच वास........ अहाहा.... सांबारच्या तडक्याचा, तुपाचा.....डोसा...."

माझ्या जाई व मोगऱ्याची होती नव्हती तेवढी फुले काढून एका बॉउल मध्ये ठेवली. त्याचा सुवास दरवळत होताच. डायनिंग टेबलवर ठेवलेले ताट पाहून पुढचे शब्द घशातच...... डायरेक्ट तुटूनच पडला. " अरे सांगशील का नाही कसे झालेय ते? " हातानेच आता वेळ नाही मला, आधी खाऊ दे अशा खुणा करीत डोळे, नाक, जीभ व मनाने तो खात राहिला. त्याला इतके खूश झालेले पाहून भरून पावले. मग त्याच्या आवडीचा अगदी उडपी स्टाइल मसाला चाय दिला.... तसे जवळ घेत म्हणाला, " अन्नपूर्णा सुखी भव! माझे सकाळचे शब्द परत घेतो. उडप्याएवढे नाही पण सुंदरच झालेय सगळे...
. जीयो! " आणि तो पळाला.

Monday, June 15, 2009

जे जाणवतं ते नेहमीच सत्य नसतं....

गेला महिनाभर नीलिमा हळूहळू परंतु पद्धतशीर चाललेला प्रयत्न पाहत होती. पहिले काही दिवस तिला काहीतरी वेगळे आहे असे जाणवले असले तरी छे! उगाच शंका घेते आहेस, असे स्वतःलाच ती सांगत होती. कालच्या घटनेने तर स्पष्ट दिसलेच. तातडीने यावर बोलायला हवेय हे कळतही होते पण कसे हे समजत नव्हते. नेहाशी आज मनमोकळे बोलून पाहावे, कदाचित ती मार्ग सुचवील म्हणून ती तिच्याकडे निघाली होती.

" अग, किती उशीर? मला वाटले आता येतच नाहीस. " नेहाने नेहमीप्रमाणे गोंधळ सुरू केला. " काय बाईसाहेब, फारच गंभीर दिसता आहात. कोणी प्रपोज केलेय का? घरी सगळे ठीक आहे ना? तू आजारी तर दिसत नाहीस. चेहरा का कोमेजला आहे? मन आजारी पडलेले दिसतेय..... as usual. " नेहाची सरबत्ती चालूच होती. निलीमाने एकदा तिच्याकडे पाहिले आणि क्षणात सांगून टाकले, " नेहा, मधू माझ्या प्रेमात पडलाय. म्हणजे तसे त्याने मला सांगितले नाहीये. पण स्पष्ट दिसतेय. अग दिवसातून किमान दोनदा तरी माझ्या केबिन मध्ये येऊन अर्धा अर्धा तास बसतो. बोलत नाही फारसे, नुसता बघत राहतो. बरं, एकदम offensive काही करत नाही गं. मी हल्ली त्याला टाळतेय हेही कळतंय त्याला. पण तो येणे काही थांबवत नाहीये. उगाच चर्चा होत राहते अशाने. दररोज सकाळी ऑफिसला जायचेय ह्या विचारानेच डोके दुखायला लागतेय. काय करू काही समजत नाही. तुला काही मार्ग दिसतो का?"

नेहाही मधूला ओळखत होती. चांगला मुलगा आहे. निलीमावर त्याचा जीव आहे हे आताशा बऱ्याच जणांना कळले होते. निलीमाने कधीही नेहाला किंवा इतर कोणालाही सांगितले नसले तरी तिला शशांक आवडतो हेही नेहा जाणून होती. नेहमी भावनांना control मध्ये ठेवणारी नीलिमा शशांक आजूबाजूला आहे हे पाहताच वेगळीच होऊन जाई. चेहऱ्यावर असोशी स्पष्ट दिसे. डोळे त्याचा पाठलाग करत राहत. शशांकला हे कळत होते असे नेहाचे मत झालेले. पण तो निलीमाकडे पाहणेही टाळत असे. बोलणे तर दूरच राहिले. मात्र मुद्दामहून तिच्या समोर इतर मुलींबरोबर हसत खिदळत राही. नेहाला वाटे, हा निलीमाला खेळवतोय. लुच्चा आहे.

निलीमाच्या प्रश्नाला नेहाकडे उत्तर नव्हतेच. बरे हे सगळे शशांकचे वागणे तिला सांगून पटणार नव्हतेच. त्यामुळे उघडपणे नेहा म्हणाली, " नीलिमे, मधू तुझ्या प्रेमात पडलाय, मान्य. जोवर तुला तो विचारत नाही तोवर तूही जरा शांत राहा. कदाचित चांगली मैत्रीण म्हणूनच तो तुझ्याकडे पाहत असेल. दुसरे कधी कधी जे आपल्याला आवडते असे वाटते ते फक्त वरवरचे आकर्षण असू शकते. तेव्हा तू स्वतःलाही थोडा वेळ दे. आता विसर सारे. चल, पापडी चाट केलेय मी आज. भूक लागलीये कधीची. मस्त पुदिना चटणी..... चल गं, आधी भरपेट खाऊ अन मग भरल्यापोटी विचार करू. काय?
" खो खो हसत नेहाने ताण हलका करायचा प्रयत्न केला आणि नीलिमाही छान हसली.

असाच आठवडा गेला. मधू येतच होता. शशांक फारसे लक्ष देत नव्हता. ऑफिसमध्ये काही नवीन अपाँइटमेंटस झाल्या त्यात नीलिमा गुंतली होती. शनी-रवीच्या सुटीला लागून सोमवारीही कुठलासा बँक हॉलीडे आल्याने गुरवारपासूनच चर्चा सुरू होती. ट्रेक्स, ट्रिप्स..... कोणी गावी जाणार होते. सगळे उत्साहात होते. निलीमालाही वाटत होते, शनीवारी शशांकला भेटावे. बोलावे, मनीचे गूज सांगावे. पण कसे? तेवढ्यात मधू आला. बसला. " मग, काय प्लॅन्स आहेत तीन दिवसाचे? जाणार आहेस का कुठे? नसशील तर आपण धमाल करायची का? " कधीही मोकळेपणाने न बोलणाऱ्या मधूने आल्या आल्या सुरवात केली. निलीमाचे डोळे लकाकले. मधूलाच हाताशी धरून......

" हो चालेल की. मी नेहालाही सांगते तू शशांकला बोलाव. आपण चौघे मिळून दोन दिवस मस्त मजा करूयात." नीलिमा अगदी बारकाईने मधूकडे पाहत हे बोलत होती. मधूच्या चेहऱ्यावर क्षणभर वेदना तरळल्याचा भास तिला झाला. पण तिने त्याकडे काणाडोळा केला. आता एकच लक्ष्य....., मधूचे बोट धरून शशांक पर्यंत पोचायचे. मधूने निलीमाचा उत्साह पाहून होकार दिला. शशांकला घेऊन यायची जबाबदारी घेतली आणि शनीवारी सकाळी नऊ वाजता भेटूयात. ठरले तर. नीलिमा खूश झाली. संध्याकाळी तिला क्रॉफड मार्केटला जायचे होते शिवाय मधूलाही थोडे खूश करावे ह्या विचाराने तिने त्याला कंपनी देतोस का असे विचारताच मधू हो म्हणाला.

संध्याकाळी मधू-नीलिमा बससाठी उभे असताना अचानक शशांक समोरून आला. " हाय नीलिमा! कशी आहेस? शनीवारी नऊ वाजता भेटतोच मी. तुझा सिल्कचा गुलाबी पंजाबी.... चल रे, बाय मधू. " गेलाही. म्हणजे ह्याचे माझ्याकडे लक्ष असते तर. नीलिमा थरथरली. हृदय इतके जोरात धडधडत होते की मधूलाही ऐकू जाईल की काय. तेवढ्यात बस आली. खूप गर्दी होती. ती चढली तेव्हा तिला जाणवले की मधूने दोन्ही हात तिच्या बाजूने तिला स्पर्श न करता असे काही वेढले होते की इतर कोणाचाही धक्का तिला लागू नये. म्हटले तर साधीच गोष्ट होती. पण भावना पोचली तिच्यापर्यंत. नंतर खरेदी झाली, मधूने तिला घरापर्यंत सोबत केली व तो गेला.

रात्री फक्त सूप घेऊन नीलिमा अंथरुणावर पडली. मन शशांक भोवती घुटमळत होते. दिवास्वप्न पाहत... शशांक आपल्याला जवळ घेईल, चुंबन घेईल...... तिला झोप लागून गेली. मध्यरात्री नंतर तिला स्वप्न पडले, आई दिसत होती. नीलिमा व आई गप्पा मारत होत्या अन आई अचानक म्हणाली, " नीलिमे, अग आपणही त्याच धारेला लागायची चूक करू नये. नेहमी मन आपल्याला जे हवेय त्याच्या मागे धावते अन त्या धुंदीत समोर असलेले सुख दिसतच नाही. जो तुझ्यावर प्रेम करतो त्याला डावलण्याची चूक करू नकोस हो. डोळे उघड, स्वतःचे मन आधी शोध. उगाच भ्रमात जगू नकोस." झोपेतही निलीमाला अस्वस्थपणा आला. सकाळी उठल्यावरही आईचे हे शब्द तसेच तिच्या कानात घुमत होते. आजच का हे आईने सांगावे? काही नाही माझ्या मनाचे खेळ आहेत सारे. असे म्हणत ती तयारीला लागली.

ठरल्याप्रमाणे चौघेही भेटले. शशांकने म्हटल्याप्रमाणे गुलाबी सिल्कचा पंजाबी, हलकासा मेक अप करून नीलिमा आली होती. शशांकने तिच्याकडे पाहिले परंतु कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. जणू काही तो हे बोललाच नव्हता. नेहा आणि मधूला निलीमाचा पडलेला चेहरा पाहून वाईट वाटले पण ते दोघे काहीच बोलले नाहीत. शशांकने सगळी सूत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली. " चला लोणावळ्याला जाऊयात. माझ्या मित्राचा बंगला आहे. सगळी सोयही आहे." सगळे निघाले.

शशांक मुद्दामहून निलीमाच्या जवळ बसला. आजवर कधीही चार वाक्येही न बोललेला शशांक निलीमाला अगदी खेटून बसला होता. मध्येच तिच्या खांद्यावर हात टाकत, कधी तिच्या अगदी कानाशी लागत उगाच काहीतरी जोक्स मारत हसत होता. निलीमाला सुरवातीला छान वाटले असले तरी नंतर त्याची ही सलगी खटकू लागली. पण मनात ओढ होती त्यामुळे तिने त्याला प्रतिसाद दिला. मधू व नेहा गप्पा करत होते. त्यावेळीही शशांक तिच्या अंगचटीला जातच होता. एकदाचा प्रवास संपला. लोणावळ्यात वातावरण छान होते. लॉनवर सकाळचे दव अजूनही जाणवत होते. सगळे लोळले. जेवणाचे काय करावे ही चर्चा सुरू झाली तसे शशांकने शिताफीने मधू व नेहाला चांगले ठिकाण शोधायला पिटाळले. ते दोघे निघाले तशी निलीमाला कापरे भरले.

ती पटकन रूममध्ये गेली. तिच्या मागोमाग शशांकही गेला. फ्रेश व्हावे असा विचार करत तिने बॅग उघडली तोच मागून शंशाकने तिला मिठीत घेतले. इतके अनपेक्षित हे घडल्याने नीलिमा सावरायच्या आतच शशांकने तिची चुंबने घ्यायला सुरवात केली. निलीमाने हे स्वप्न अनेक वेळा पाहिले होते ते सत्यात उतरतेय की भास ह्या गोंधळात तिनेही त्याला आसुसून साथ दिली. अन तिला जाणवले , शशांकचे हात सगळीकडे फिरत आहेत. धसमुसळेपणे. ओरबाडल्यासारखे. तिच्या स्वप्नातला शशांक तर असा नव्हता. ती घाबरली. तोवर शशांकने तिच्या कपड्यांना हात घालत म्हटले, " कधीपासून वाट पाहत होतो. कसली सुंदर आहेस तू. तुला असे तडपताना पाहून मजा आला मला. आता आज सोडणार नाही. "

नीलिमा उमजली. आईचे बोल किती खरे होते. शशांकची झटापट वाढतच होती. मधू कसा रे गेलास मला टाकून ह्या हलकटाच्या तावडीत. निलीमाने जिवाच्या आकांताने शशांकला ढकलले. बेसावध शशांक तोल जाऊन पडताच कसेबसे कपडे सावरत नीलिमा बंगल्याबाहेर पळाली. तेवढ्यात तिने पाहिले मधू व नेहा परत येत होते. नीलिमा सावरली. ते जवळ येताच म्हणाली, " आलातही एवढ्यात? बरं झालं. मी खूप कंटाळले होते. " " अग मधूचे पाकीट राहिले टेबलवर म्हणून ते घ्याय..... शशांक, असा काय अवतार झालाय तुझा? कुठे पडलास की कोणी पाडले तुला? खोक कशी पडली? " निलीमाने ढकलले तेव्हा नाईटस्टँडचा कोपरा लागला होता कपाळाला. वरकरणी हसत म्हणाला, " अग काही नाही. मांजरीला पकडत होतो. पळाली. तिला वाटतेय मी सोडीन तिला. आत्ता नाही तर नंतर सही, ओरबाडीनच. ती ओळखत नाही मला. काय नीलिमा? "

त्याची नजर व हसण्यातले विखारीपण निलीमाला जाणवून ती शहारलीच. त्याच्याकडे दुर्लक्ष करीत ती मधू व नेहाला म्हणाली, " मधू, अरे माझे डोके फारच दुखायला लागलेय. नेहा, मी गोळ्याही आणल्या नाहीत. मला वाटते आपण जेवून निघूयात. नाहीतर असे करूयात मी निघते. तुमची ट्रीप नको खराब व्ह्यायला." तिला मनोमन माहीत होते नेहा व मधू एक मिनिटही थांबणार नाहीत. तसेच झाले. परत येताना ती मधूबरोबर बसली. नेहा व शशांक वेगवेगळ्या खिडक्यांत बसलेले. मधूला जाणवले होते, आपल्या पश्व्यात काहीतरी विपरीत घडण्याच्या बेतात होते.

निलीमाला मधूच्या सहवासात नेहमीसारखेच आश्वासक वाटत होते. शी! किती मूर्ख आहे मी. आई, नेहा म्हणत होत्या तेच खरे होते. मला भुरळ पडली होती शशांकची. त्याचे इतर मुलींशी चाललेले चाळे दिसत असूनही मी पाहू शकत नव्हते. आज केवळ नशिबाने वाचलेय नाहीतर त्याने...... निलीमाला हुंदकाच आला. मधूने त्या आवाजाने तिच्याकडे पाहिले. काठोकाठ भरलेले डोळे पाहून हळूच निलीमाच्या हातावर थोपटले व रुमाल दिला. तशी नीलिमा हात धरत पटकन त्याच्या कुशीत शिरली. छातीवर डोके ठेवीत विसावली. शांत शांत झाली. मधूने तिच्या केसावरून हात फिरवत विचारले, " नीलिमा, लग्न करशील माझ्याशी? " तशी अस्फुट हूकांरत नीलिमा अजूनच बिलगली.

हे सारे पाहून नेहाने सुस्कारा सोडला. निलीमाला वेळीच कुठला मार्ग आपला आहे हे उमगले होते. आता लग्नाच्या तयारीला लागा असे काकूंना सांगायला हवे. मधूला डोळा मारत तिने थम्स अप ची खूण केली. शशांकचा मात्र अगदी तिळपापड झाला होता. पण तोंड दाबून बुक्क्याचा मार......, मांजर तावडीतून निसटली होती.

ह्या कथेचे दोन शेवट मनात घोळत होते. दुसरा असा....

मधूने तिच्या केसावरून हात फिरवत विचारले, " नीलिमा, लग्न करशील माझ्याशी? " तशी अस्फुट हूकांरत नीलिमा अजूनच बिलगली.

नीलिमाचा होकार ऐकताच मधूने शशांककडे पाहिले. काम फत्ते असे खुणावत शशांकला डोळा मारला, मग दोघेही खुनशी हसत राहिले. त्या दोघांचा हा बनाव होता हे नेहाच्या लक्षात आले अन तिच्या हृदयाचा ठोका चुकला. आता तिने कितीही जीव तोडून नीलिमाला सांगितले असते तरी उपयोग नव्हता. नीलिमा सहजपणे आपल्या प्रेमाला प्रतिसाद देणार नाही हे जाणवून शशांकच्या मदतीने मधूने त्याला हवे ते साधले होते.

Sunday, June 14, 2009

आणि ते मला सोडून गेले...

सकाळी सकाळी फारच गडबड झाली होती. बाई उशिरा आली. तिची वाट पाहत निष्कारण मी पंधरा-वीस मिनिटे फुकट घालवली होती. कणीक भिजवून पहिली पोळी तव्यावर पडली तोच बयाबाई उगवल्या. तिच्या हातात लाटणे देऊन मी भाजीकडे वळले. शेवटी उशीर झालाच. लेडीज स्पेशल जाणार हे दिसतच होते. मन खट्टू होऊन गेले. आज एकीचे डोहाळजेवण होते गाडीत. मला ढोकळा घेऊन जायचे होते. आता कसला ढोकळा आणि कसले डोहाळजेवण. मैत्रिणींना समजेल माझी अडचण पण मी मात्र आनंदसोहळ्याला मुकले.

ऑफिसला तर जायचे होतेच. आवरून निघाले. पाचपाखडीवरून रिक्षा घेऊन नौपाड्याच्या बी-केबिन पाशी आत रिक्षा सोडायची मग तिथून पुढे चालत एक नंबरवर हा परिपाठ. तशीच आजही जात होते. अचानक ठाणे जनता सहकारी बँकेच्या पुढेच असलेल्या होमिओपॅथीच्या (गेल्या वर्षी मायदेशात गेले असताना हे दुकान दिसले नाही. नवीनच कोणीतरी बस्तान बसविले होते.) दुकानाच्या पायऱ्यांच्या बाजूला एक साधारण पासष्ट्च्या आसपास वय असलेले गृहस्थ दोन्ही गुडघे छातीशी घेऊन शून्यात नजर लावून बसलेले. डोळ्यात बिलकूल जीव नाही. काळजात लक्ककन हालले. अरे देवा! हा जिवंत आहे ना? मी अगदी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिले, पण नजर काही हालली नाही.

गुडघ्याला जरासा कळत नकळत स्पर्श केला, " बाबा, बरं नाहीये का? " जरा बुबूळ हालली. आहे, आहे. बरं वाटलं. एकीकडे गाडी पकडायला हवी नाहीतर ऑफिसला लेट मार्क लागणार. पण का कोण जाणे पायच निघेना. अंगावरचे कपडे बरे दिसत होते. एखादे वेळी चक्कर आली म्हणून इथे टेकले असतील तर. " बाबा, घरचा नंबर सांगता का? नाहीतर कुठे राहता ते सांगा, मी नेऊन घालते. " हे ऐकले मात्र, डोळ्यात एकदम राग उतरला, हात झटकत म्हणाले, " तू? तू नेऊन घालणार मला माझ्या घरी? जा, जा तुझ्या रस्त्याने चालू लाग. माझ्या घरचा रस्ता झेपायचा नाही तुला. "

शरीराच्या प्रतिक्षिप्त क्रियेने मी जरासे घाबरून मागे सरले. डोके फिरलेले असले तर माराबिरायचे. हळूच विचारले, " बरं राहू दे. तुम्हाला भूक लागलीये का? " मान जरा जोरातच हो हो म्हणत हालली. मी माझा डबा काढून त्यांच्या हातात ठेवला, " बाबा, मला उशीर होतोय. तुम्ही शांतपणे डबा खा. हे पन्नास रुपये ठेवा जवळ, चहा घ्या आणि रिक्षा करून घरी जा. मी निघते आता. " त्यांनी डबा जवळ जवळ ओढूनच घेतला. हातानेच वर बघता मला नीघ नीघ तू अश्या खुणा करत डबा उघडून पोळीभाजीकडे पाहत नाकाजवळ नेऊन मोठा श्वास घेतला. ते पाहिले आणि मी निघाले.

दिवसभर ऑफिसमध्ये डिपार्टमेंटल परीक्षा असल्याने एक मिनिटही फुरसत नव्हती. डबा नसल्याने सँडविच मागवून खाल्ले. ते खाताना, डबा आधाशीपणे नाकाशी धरणारे बाबा आठवले. कुठेतरी आत बरे वाटले. भ्रमिष्ट झालेले असतील किंवा रागावले असतील तर जरा शांत झाले की जातील स्वतःच्या घरी. नेहमीप्रमाणे दिवस भरभर संपला, संध्याकाळ-गाडीची पकडापकडी, घरचे सगळे आटोपून दहाच्या सुमारास जरा उसंत मिळाली. आईला फोन लावला आणि सकाळी काय झाले ते सांगितले. आई म्हणाली, " बरं केलंस, भूकेजला असेल जीव. गेलेही असतील आता स्वतःच्या घरी. तू नको काळजी करत राहूस. " फोन ठेवला. मनात आलं, तसंच असू दे गं.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठले. आवरून दोन डबे घेऊन निघाले. मनात सारखे देवाला सांगत होते, " आज मला ते दिसू दे नकोत. " रिक्षा सोडली. लांबूनच ते तिथेच बसलेले मला दिसले. म्हणजे गडबड आहे. ह्यांना घरदार नाहीये किंवा आठवत नाहीये. त्यांच्याजवळ जाऊन पोचते तोच, " वाटच पाहत होतो. हा तुझा डबा. घासून ठेवलाय. पोट निवले माझे. त्या तुझ्या डब्याचे ओझे नकोय मला. जीव शिणलाय ओझी वाहून. " एकदम ते गप्पच झाले. डोळे जणू कसलातरी वेध घेत असल्यासारखे. मी डबा पुढे केला, " बाबा, हे घ्या. रात्रभर इथेच होतात का? घर सापडत नाहीये? फोन नंबर?" पुन्हा कालचेच हातवारे करत डबा घेऊन मला त्यांनी जवळजवळ हाकलूनच काढले.

हे सारे बोलणे होत असताना काही ओळखीच्या लोकांनी थांबून विचारले होते, काय? इथे काय करतेस? गाडीही दिसत होतीच, उद्या पाहू असा विचार करत निघाले. आता मला खात्री होती, बाबा उद्या तिथेच सापडतील. तिसऱ्या दिवशी, मी पोचताच त्यांनी डबा दिला हात पुढे केला. " आतड्याची भूक मरतच नाही. सदा वखवखलेली. तुझ्या हाताला चव आहे गं. माझी सुमती..... " आवाज गुदमरला. मी घाईघाईने त्यांना म्हटले, " बाबा , चला उठा इथून. दोन मिनिटांवर एक छोटेसे हॉटेल आहे तिथे बसून कॉफी घेऊया. तुम्हाला बरे वाटेल. मग शांतपणे सांगा मला सगळे. "

त्यांनी ऐकले माझे, आम्ही बसलो जाऊन. हॉटेलवाला थोडासा वैतागला होता त्यांच्याकडे पाहून पण नशिबाने काही बोलला नाही. कॉफी आली. " बाबा, घ्या ना? बरं वाटेल. " त्यांच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागले. त्यांना म्हटले, " मी तुमच्या मुलीसारखी आहे ना? मला सांगा सगळे, काहीतरी मार्ग निघेल. सांगितलेच नाहीत तर मग कसे बरं.... " " मुलीसारखी असशील गं पण मुलगी नाहीस. तेव्हा उगाच नाती जोडू नकोस. सगळे एका फटक्यात गमावून बसलोय मी, जीव द्यायची हिंमत नाही म्हणून दररोज मरत जगतोय. तू नाते जोडून जीवाची काहिली शमणार नाहीच आहे. तेव्हा दूर राहा. पोटाला घातलेस, उपकार झाले. जातो मी." तरातरा चालूही पडले. मी हतबुद्ध तिथेच खिळले.

असेच अजून तीन दिवस गेले. उद्या रविवार. मी कशी जाणार डबा द्यायला. म्हणजे जाऊ शकत नाही असे नसले तरी नेमकी वेळ शक्यच नव्हते. फार बैचेनीत दिवस गेला. सोमवारी पोचले तेव्हा बाबा डबा हातात घेऊन उभेच होते. डब्यांची देवाणघेवाण झाली. आज मुळाशी पोचायचेच असे मी ठरवले होते. " बाबा, काल मला नाही हो जमले यायला. हा डबा घ्या. मी तुमची मुलगी नाही, बरोबर. पण तुमच्या सुमतीकडे मी घेऊन जाईन ना. सांगता का रिक्षावाल्याला पत्ता? "

चक्क हसले, " मला गंडवायला पाहतेस होय. बरं..... चल कॉफी पाज मला." आम्ही गेलो हॉटेलमध्ये. बसताच त्यांनी सुरवात केली, " मी लातूरचा गं. बँकेत ऑफिसर होतो. दोन पोरी, बायको. चांगले हसते खेळते घर होते आमचे. सुमती मोठी पोर हो माझी. असती तर तुझ्याएवढीच ...... भूकंप होतो काय, संपूर्ण घरच गाडले जाते काय. तिघी जणी दगड-विटांत चिणून मेल्या गं. मी नेमका पुण्याला गेलेलो. जगलो. पेपरमध्ये वाचून धावत सुटलो. शवही सापडेनात पटकन. काय सांगायचे पोरी...., अग गेलेल्या जीवाचेही इतके हाल व्हावेत? सभोवताली सगळ्यांची तिच कथा. कोण कोणाचे सांत्वन करणार? टाळके जे सटकले ते दोन वर्षे वेडाच झालो होतो. घर सुटलेच होते आता त्या सरकारने उपकार दाखवत दिलेल्या दाराचा मला काय गं उपयोग? देऊन टाकले एका कुटुंबाला. तेव्हापासून गावोगाव फिरतोय, मरणाच्या शोधात जगतोय. बँकेतून सुटका करून घेतली, होते नव्हते ते पैसे दिले अनाथ आश्रमाला. माझ्या पोरी नाही तर नाही पण दुसऱ्यांच्या टाकलेल्या पोरींना थोडीशी मदत होईल. आता कशाचा मोह राहिला नाही. तू दोन घटका थांबतेस, जेवू घालतेस. मी वाट पाहू लागलो तुझी आताशा. हे बरे नाही पोरी, हे बरे नाही. " पुन्हा तेच, उठले आणि तरातरा निघून गेले.

मी दिवसभरात काही जणांशी बोलून त्यांना कुठे ठेवता येईल का ह्याचा शोध घेत राहिले. माझ्या घरी मी नेऊ शकत नव्हते. पण असे रस्त्यावर सोडूही शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी डबा देताना पाहिले तर बाबा, चांगलेच तापाने फणफणले होते. हे होमिओपॅथिचे दुकान ज्यांचे होते त्या बाई ओळखीच्या होत्या. त्यांच्याकडून औषध घेऊन त्यांना दिले. थोडे लक्ष द्या हो दिवसभरात, पाणी लागले तर जरा...... त्या बरं म्हणाल्या. " बाबा, झोपून राहा बरं का. संध्याकाळी येताना येतेच मी तुमच्याकडे. " विझलेल्या डोळ्यांनी त्यांनी एकटक माझ्याकडे पाहिले आणि हात जोडून कपाळाशी नेत नमस्कार केला. तोंडाने सुखी राहा असे पुटपुटले. " येतेच हं का " असे म्हणत मी निघाले खरी पण मन सांगत राहिले नको जाऊ.

संध्याकाळी येईतो मला साडेसात झाले. बाबा नव्हते तिथे. दुकानात विचारले तर बाई नव्हत्या पण काम करणाऱ्या पोराने डबा एक चिठ्ठी हातात दिली. तिथेच पायरीवर बसून मी चिठ्ठी उघडली. " चि. पोरी, पंधरा दिवस माझ्यासाठी धावलीस. मी खूप प्रयत्न केला गं तुला झिडकारण्याचा पण तू चिवट, पोर झालीस माझी. आज आजारी बाबाला टाकून जाताना तुझी घालमेल पाहिली आणि जाणवले, वेळ आली आता. माझ्या काळजीची भर तुझ्या आयुष्यात नको. तुझ्या हातात अन्नपूर्णा आहे पोरी. जीव सुखावला माझा. आता पुरे. फार दिवस नाही जगायाचो, तुझे देणे होते ते तुझेच खाऊन तुला दुःख देऊन फेडण्याचा करंटेपणा नको आता. सांभाळ, सुखी राहा. "

पुन्हा कधीही भेटण्यासाठी बाबा दूर निघून गेले होते. रिकामा स्वच्छ डबा हातात घेऊन घरचा रस्ता धरला. एक अनोळखी बंध पायाचा आवाजही होऊ देता निघून गेला..... अज्ञाताच्या प्रवासाला.......

(
१९९३ ला झालेल्या किल्लारी-लातूर भूकंपाचा अप्रत्यक्ष बळी, ९८ साली मला भेटले. आता कुठे असतील कोण जाणे.)