जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, April 2, 2009

भारतीय डाक ...अर्ररर डाकू घर...

गेल्या वर्षीचा दसरा खूप आनंदाचा होता. नऊ वर्षांनंतर आम्ही मायदेशात दसरा व मी दिवाळी साजरी केली. नातेवाईकांचे एकत्र जमणे, मित्र-मैत्रिणींचा गोंधळ. खूपच धमाल आली. दसरा झाल्या झाल्या नवरा ऑफिसचे कामामुळे चेन्नईला गेला. चेन्नईचे काम आटोपून पॅरिस आणि नंतर घर गाठायचे होते. आजकाल सेलफोन हा सतत लागतोच. इथले फोन मायदेशी चालत नसल्याने आम्ही तिथले सेलफोन नंबर चालूच ठेवलेत. म्हणजे मग गेल्यावर कटकट होत नाही. नवरा सेलफोन घेऊन चेन्नई ला गेला. निघताना तिथून कुरियर करतो म्हणाला. मीही बरं म्हटले. ह्या आधीही मी कुरियरने सेलफोन आईला नाशिकला पाठविला होता. तेव्हा मनात कुठलीही शंका डोकावली नाही.

ठरल्याप्रमाणे नवरा भारतातून निघाला. मित्राकडे सेल दिला व पाठवायला सांगितले. तीन दिवसांनी नवऱ्याचा फोन आला, सुखरूप पोहोचलो. पॅरिस ट्रीप चांगली झाली. थोडे बोलणे झाल्यावर मी विचारले सेलफोन चे काय झाले. त्यावर म्हणाला, " अग, चेन्नई मध्ये काय गोंधळ आहे माहीत नाही. कोणीही कुरियर वाला सेलफोन पाठवायला तयार नाही. विकत घेतल्याचे बील दाखवा तरच पाठवतो असे सांगत आहेत. म्हणून मग भारतीय पोस्ट खात्यातून कुरियर केले आहे. दोन दिवसात मिळेल तुला. " हे एकल्याक्षणी माझ्या तोंडातून गेले, " गेला तो सेलफोन, आता कधीच आपल्याला मिळणार नाही. " नवरा रागावलाच. म्हणाला, " अग, असे काय करतेस. आपले भारतीय डाक खाते आहे ते. नक्की मिळेल. " असे म्हणून त्याने फोन ठेवला. मला फारच अस्वस्थपणा आला. एवढी वर्षे आपला असलेला फोन आता माझ्यापर्यंत नक्की पोचत नाही असे माझे मन सारखे सांगत होते. पुढचे दोन दिवस फारच बैचेनीत गेले.

शेवटी चौथ्या दिवशी दुपारी बाराच्या दरम्यान बेल वाजली आणि मी दार उघडले. पोस्टमन आला होता. पॅकेट आलेय चेन्नईवरून सही करा असे म्हणाला. मी नीट पाहिले, चेन्नई वरूनच आलेले होते. व्यवस्थित दिसत होते. कुठेही टॅंपरींग झाल्याचे काहीही चिन्ह नव्हते. मी आनंदाने सही करून पॅकेट घेतले. तो गेला. घाईघाईने फोडले, आत ब्राऊन पेपरचे आणिक एक पॅकेट होते. तेही उघडले तो काय, आत बबलपेपर मध्ये गुंडाळलेली चिकटवण्याचे सोल्युशन असलेली भडक गुलाबी रंगाची बाटली आम्हाला वाकुल्या दाखवून खिजवत होती. माझी शंका खरीच ठरली होती. चेन्नई ते नाशिक ह्या ट्रेनच्या भारतीय डाक खात्याच्या प्रवासात ही अफरातफरी घडलेली होती.

चेन्नई च्या पोस्टात जाऊन विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही सेलफोनच पाठविला होता. नाशिकचे पोस्टवाले म्हणतात आम्हाला काय माहीत आत काय आहे ते. आम्ही पॅकेट आले तसे लागलीच तुमच्यापर्यंत पोहोचवले. थोडक्यात दोष त्यांचा दोघांचाही नव्हताच, असलाच तर आमचा होता. आम्ही इतका विश्वास त्यांच्यावर ठेवला त्यांनी तो त्यांच्या ठरलेल्या पदधतीने सार्थ केला होता. आम्ही तक्रारही केली पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही असे त्यांनी तेव्हाच सांगितले. केवळ तुमच्या समाधानासाठी करा असेही म्हटले. माझ्यासारखे कित्येक लोक ह्या पद्धतशीर रॅकेट चे बळी पडले असतील आणि पडतील. हे दुष्टचक्र कसे व कधी थांबणार?

3 comments:

  1. पण पॅकिंग तसंच ठेउन कसा काय चोरला असेल तो फोन ? पण असं होऊ शकतं !

    ReplyDelete
  2. Are are. Asa vhayla nako hota. Pan Chennai madhech navhe tar bharatat kuthehi cellphone ghet nahit courier vale. Ata kaay karana shakya nahi pan amchya barobar anubhav share kelya baddal dhanyavaad.

    ReplyDelete
  3. Kayvatelte, Spacer manapasun dhanyawad!
    Packing itke perfect hote ki aamhalahi ha prashna ajunahi satavato aahe. Mumbait khajgi courier co cellphone ghetat, me swata pathavila aahe. Postkhaate mhanate ki transporting hotana he sare ghadate. Aamcha kahi sambandha nahi.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !