
एक एप्रिल, १९८४. प्रसिद्ध नट " दत्ता भट " यांचे दुःखद निधन झाले. दत्ता भट- माझे सगळ्यात मोठे मामा. एक सुंदर जीवन अचानकपणे काळाच्या पडद्याआड लुप्त झाले.
मामाचे बालपण ठीकठाक गेले. आजोबांचा फार लाडका होता. ते मामाला पंत म्हणत. दुर्दैवाने आजोबांना कॅन्सर झाल्याने ते तडकाफडकी गेले. त्यानंतरचे दिवस फारच खडतर होते. मला आठवणारा मामा एकदम खेळकर, भाचरांवर मनापासून प्रेम करणारा. महिन्यातून एकदा तरी आम्ही पार्ल्याला मामाकडे जात असू. त्याला खूप आनंद होई. लागलीच त्याचे बेत सुरू होत. कधी मुगाच्या डाळीची भजी करे, तर कधी बाहेरून गुलाबजाम, रसगुल्ले आणि. भजी त्याला फार प्रिय. आमचे घर दादरला होते. मामाचे शिवाजी मंदिर, रवींद्र नाट्यमंदिर किंवा दामोदर ला प्रयोग असले की हमखास मी डबा घेऊन जाई. माझ्या आईने केलेले सगळेच पदार्थ मामाच्या आवडीचे, तो खूश होत असे.
"पती गेले गं काठेवाडी, गरिबी हटाव', आणि बरीच आधीची नाटके मला पाहायला मिळाली नाहीत पण खूप चांगले एकले त्यांच्याबद्दल. त्याचे "नटसम्राट- अप्पा बेलवलकर " माझे सगळ्यात आवडते काम. हे काम मामा इतके अप्रतिम कोणीही केले नाही. अत्यंत प्रभावी आवाज, अचूक शब्दफेक आणि पाठांतर. हृदयाला हात घालणारा अभिनय. ही भूमिका मामा अक्षरशः जगला. "संघर्ष, विदूषक व नटसम्राट" ही नाटके जवळपास एकाच वेळी चालू होती. "भोवरा, भल्याकाका, मी जिंकलो मी हरलो, अखेरचा सवाल,बिऱ्हाड बाजलं, सूर्याची पिल्ले, मंतरलेली चैत्रवेल, बॅरिस्टर..... " आणिक कितीतरी. मंतरलेली चैत्रवेल च्या बसला भीषण अपघात झाला त्यावेळी मामा त्या काही प्रयोगात प्रकृती अस्वास्थ्यामुळे काम करीत नव्हता. तो जर त्यावेळी तिथे असता तर कदाचित अपघात टळला असता. तो कधीही रात्री प्रवासात झोपत नसे. ड्रायव्हरला सोबत करी. पण....
"सिंहासन मधील माणिकराव" एक अजरामर भूमिका. हा जब्बार पटेलांचा सिनेमा अप्रतिमच आहे. मामाचे काम एकदम झकास झालेय. सत्यनारायणासमोर साष्टांग दंडवत घालून मनातील विचार तो बोलतो त्यावेळचा मुद्राभिनय आणि आवाजाचा बाज व फेक जबरदस्त. मामाचा माणिकराव जबरीच होता. "आम्ही जातो आमच्या गावा, चूल आणि मूल, रामनगरी(हिंदी), गोलमाल( हिंदी).... अनेक सिनेमे. " मामाने बरीच नाटके दिग्दर्शितही केली. "तुझे आहे तुजपाशी, डॉक्टर लागू, फुलाला सुगंध मातीचा, वेडा वृंदावन, इत्यादी. "
मामाचे नाट्य-चित्र सृष्टीवर जीवापाड प्रेम होते. तो नेहमीच म्हणे, " रसिकांच्या अथांग प्रेमावर व उदार आश्रयावर मी घडलो, तुमचे आशीर्वाद नसते तर इथपर्यंतची वाटचाल अशक्यच होती. " मामाबद्दल पूजनीय तात्यासाहेब शिरवाडकर म्हणायचे, " सोन्याला भट्टीत घालतात त्याचं दुःख होत नाही. ऐरणीवर ठोकतात त्याचं दुःख होत नाही. त्याचं दागिन्यात रुपांतर करताना सोन्याला मनस्वी यातना होतात त्याचंही दुःख त्याला होत नाही. पण जेव्हा त्याची तुलना गुंजेबरोबर केली जाते तेव्हा मात्र सोन्याला अपार दुःख होतं. भटांना गुंजेबरोबर तोलून घ्यायचं नव्हतं आणि नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. "
अत्यंत गुणी, प्रेमळ व उत्तुंग व्यक्तिमत्त्व. आयुष्यात यशापेक्षा दुःख, वेदना, अपेक्षाभंग वाट्याला आले, तरीही पुर्नजन्म मिळालाच तर दत्ता भटाचाच मिळावा असे तो नेहमी म्हणे. खरेच आहे मामा, आम्हालाही असेच वाटते. आम्ही सगळ्यांनी तुझ्यावर अपरंपार प्रेम केले आणि आजही करत आहोत. नाट्य-चित्रसृष्टीवरील तुझा ठसा चिरंतन राहील. सलाम.
सगळ्या आठवणी जागा झाल्या. आयुष्यभर खूप खस्ता खाल्ल्या. सुखाचे दिवस कमीच पाहिले. हाडाचा कलावंत होते भटसाहेब.
ReplyDeleteधन्यवाद बाबा.
ReplyDelete