जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, November 24, 2009

नगण्यतेत समावलेले जीवन.......

मानवी मनाची सगळ्यात आवश्यक गरज म्हणा, इच्छा म्हणा....." कोणीतरी माझी विचारपूस करेल, आठवण काढेल. आवर्जून तू कसा आहेस हे विचारेल. मनापासून मी जसा आहे तसा माझा स्वीकार करेल. " जोवर ही चाहत-इच्छा पुरवली जात नाही तोवर तो सतत प्रयत्नशील असतो. जाणूनबुजून त्याकरिता झटतो. सामान्यपणे प्रत्येक माणूस जीवनात यासाठी झगडताना दिसतो. क्षेत्र कुठलेही असू देत, स्वीकाराच्या मागे माणूस हात धुऊन लागतो. तसे मागे लागणे आवश्यक आहेच. पण त्याचा अतिरेक झाला की लक्ष्य भरकटते.

शब्द हे जितके धारदार असतात तितकीच किंबहुना थोडी जास्तच उपेक्षा खोलवर आघात करते. ’ अनुल्लेखाने मारणे ’ हा आजकाल सार्वत्रिक बोकाळलेला एक प्रवाह आहे. जाणीवपूर्वक व संगनमताने एखाद्याला वगळायचे, टाळायचे. काही वेळा व काही माणसांकरिता हा मार्ग स्वीकारावाच लागतो. नाहीतर त्या अतिरेकी प्रवृत्ती आपला ताबा घेऊन गुलाम बनवू पाहतात. परंतु बरेचदा हा मंत्र सरसकट वापरला जातो व याचे बळी वारंवार बदलत असतात. या प्रवृत्तीचा सर्रास आधार घेणारे स्वत: मात्र त्याचीच शिकार असतात. माणूस एकवेळ टोचरे बोल सहन करेल....कारण त्यांना प्रत्युत्तर करता येते. किमान संवाद होतो.

परंतु उपेक्षा मनाला ढासळवते. तुमचे अस्तित्वच जेव्हां नाकारले जाते तेव्हां मन कोसळते. कोणालाही माझी कदर नाही. मी येथे असूनही साधी माझी दखलही त्यांनी घेतली नाही. मला टाळले, का? पुन्हा या ’ का ’ चे नेमके उत्तर मिळत नसतेच. वारंवार असे झाले की असंतोष खदखदू लागतो. मग हे दुखावलेले मन स्वत:चे अस्तित्व दाखवण्याच्या मागे लागते. कधी कष्टाने-त्यागाने, कधी सामान्य मार्गाने तर कधी वाम मार्गाने. प्रत्येक माणूस समाजात राहू इच्छितो-केंद्रस्थानी राहू पाहतो. हे सगळ्यांना जमतेच असे नाही. मग असंतुष्ट मने उदास होतात, तक्रारखोर होतात, धुमसत राहतात. स्वतः सोबत जवळच्यांचाही छळ करतात.

याचे कारण शोधण्याचा आपल्याच मनात प्रयत्न केला तर जाणवते की माझे जीवन हे लोकांधीन आहे. दुसऱ्याने मला आपले म्हणावे असे जोवर मला सारखे वाटत राहते तोवर खरे तर मीच स्वतःला त्यांच्या स्वाधीन करून टाकलेय हे मला समजतच नाही. इतरांनी मला आपले म्हणावे किंवा नाकारावे हेच जर माझ्या जगण्याचे बळ-आधार असेल तर मग अश्या जगण्याने ' मला ' काय मिळेल? थोडी तारीफ, माफक प्रसिद्धी, कदाचित थोडे पैसे, त्याहून पुढे अगदी गेलोच तर सत्ता-बक्षिसे, पुरस्कार-मानचिन्हे..... बस. या सगळ्यांनी त्या त्या क्षणांपुरता आनंद मिळेलही परंतु यावर अवलंबून राहत जीवन जगण्याचे वरपांगी प्रयत्न म्हणजे केवळ दु:खाची सुरवात. या मानपत्रांनी मनातला असंतोष दूर होईल का? का आजच्या पूर्णतः व्यावहारिक बनलेल्या जगाची सौख्याची हीच मानदंडे आहेत व ती मिळवणे हीच जीवनाची इतिकर्तव्यता.

रोजच पहाटे आभाळ सोन्याची उधळण करते. एक विलक्षण प्रसन्न अनुभूती चराचरांत भरून राहते. किरणांकिरणांतून जीवनरस सूर्य ओतत राहतो. पक्षी पंखात नवा दम घेऊन भरारी घेतात. प्राजक्त दवासारखां डवरून सुगंध पसरवत टपटपत राहतो. मुक्या कळ्या मनमोकळ्या उत्फुल्ल हसू लागतात. झाडे-वेली हिरव्या-पोपटी पानांमधून जीवनाचा रंग दाखवत राहतात. फुलाफुलावर गुंजारव करणारे भुंगे-मोहक फुलपाखरे नाचत-बागडत राहतात, परागकण पेरत राहतात. सगळ्यांमध्ये जीवन मनापासून जगण्याची असोशी दिसते. या सगळ्यांच्या केंद्रभागी निसर्ग आहे. उडणे हा पक्षांचा केंद्रबिंदू तर उमलणे हा फुलाचा. कोणी नोंद घेवो न घेवो फुले फुलतीलच, पक्षी उडतीलच. निसर्गाची ही मुक्त उधळण सतत आपल्या समोर असते. पण त्याची नोंद किती जण घेतात? यांतील कोणी कधी संपावर जाते का? पक्षांचे कूजन बेसूरा आलाप गाते का? खरे तर यांची हेळसांड/अहवेलनाच जास्त केली जाते तरीही हे आपला मूळ गुणधर्म सोडत-बदलत नाहीत. निसर्गाचा हा देखणा उत्सव रोजचाच म्हणत आपण त्याची उपेक्षाच करतो. त्याचा तोल ढासळवत राहतो अन मग जेव्हां तो आपली उपेक्षा करतो तेव्हां त्याच्या रौद्ररूपाने बोटे मोडत राहतो.

मग आपल्या वाट्याला आलेल्या उपेक्षांचा आपण इतका का बाऊ करत बसतो? आठवून् आठवून दु:ख ताजे करत राहतो....डोळ्यांवाटे सांडत खंतावत राहतो. ते सारे क्षण जीवन बरबाद.... पुन्हा पुन्हा बरबाद. इतके फुकट घालवण्याएवढे क्षण आपल्यापाशी आहेत का हा विचारही डोकावत नाही. दुःखाचा उत्सव एकदाच काय तो मनवून त्याला संपवून टाकणे म्हणजे स्वतःला लोकांकडून कुरवाळून घेण्याचे थांबवणे. इतका त्याग मग तो स्वतःच्या जगण्यासाठी आवश्यक असला तरी तो सहजी/कळूनही नजरअंदाज केला जातो. ह्या कुरवाळून घेण्याचीच हाव वाढते. अरेरे! बिचारा! यासारखे शब्द सुखावू लागतात. हळहळण्याकरीता तरी लोक आपली आठवण काढतात म्हणून वारंवार दु:ख मांडले जाते. जळवेसारखे जीवनाला चिकटलेले स्वनिर्मित दु:ख.

जगातले सर्वश्रेष्ठ मानपत्र कुठल्याही पक्षाला द्या, दुसऱ्याच दिवशी तो आपले घरटे सोडून जाईल. त्या पुरस्काराने त्याचे उडणेच जखडले गेले तर राहिलेच काय त्याच्यापाशी? सागरात प्रत्येक क्षणी एक लाट जन्म घेते......पाहता पाहता उच्चतम बिंदूवर आरूढ होते....अन निमिषार्धात किनाऱ्याशी ती फुटलेली असते. अशा असंख्य नगण्य लाटा वर्षोंनवर्षे तितक्याच ओढीने उठत आहेत -विरत आहेत. ह्या लाटा किती तरल आहेत. आपण का इतके जडशीळ बनू पाहतो आहोत?

कोणी माझी आठवण ठेवली आहे...कोणी मला त्यांच्या वर्तुळात घेतले आहे याने नेमके ’ मला ’ काय सुख मिळते? का ह्यातच जगण्याचे सुख सामावलेले आहे ही आपल्या मनाची पक्की समजूतच आपण करून स्वत:ला जखडून ठेवले आहे. जीवनपथावर खरे तर आपण थोडेसे रांगतो.......थोडीशी धूळ उडते. त्यातच आपले मन रमून जाते. अजून चालायला सुरवातही केली नाही तोच ते खुंटते. कालांतराने धूळ बसते पण आपण तिथेच, रुतलेले. चालणेच संपले मग नवीन धूळ उडणारच कशी? तोवर अनेक अपराधही आपण करून चुकलेले असतोच. मग त्या अपराधांच्या सावलीत बसून आपल्यासारख्याच आत्ममग्न जीवांशी या थिजलेल्या धुळीची चर्चा करत बसतो-संपून जातो. हेच, जर मुळातच या धुळीने माखण्यास आतूर असलेली आपली नजर आपण वारंवार स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित जीवन जगण्याचा मार्ग सापडू शकेल. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी व चाल लाभेल. किमान नको ते दु:ख ओढवून घेण्याची प्रक्रिया थांबेल.

21 comments:

  1. खुपच प्रगल्भ लिखाण ... इतका विचार नाही करत मी ... कदाचित असा विचार करायची वेळ आली नाही कधी हे खरे असावे ... :) पण "कधी कष्टाने-त्यागाने, कधी सामान्य मार्गाने तर कधी वाम मार्गाने. प्रत्येक माणूस समाजात राहू इच्छितो-केंद्रस्थानी राहू पाहतो." हे १०० टक्के पटले.

    ReplyDelete
  2. ताई मस्त लिहलयेस...हळूवार फुंकर घालत, मायेने म्हण किंवा खूप साध्या शब्दात तू खुप काही बोलतेस....U have the power to heal....

    ReplyDelete
  3. aaj sakalpasun asach kahitari dokyat chaalala hota... :)
    chhan lihilays..

    ReplyDelete
  4. रोहन हो ना..आणि ते हवेच की...फक्त जुनी गाठोडी उतरवायला हवीत. कळतं पण वळत नाही अशी माझी अवस्था बरेचदा असतेच.असो.:)

    ReplyDelete
  5. तन्वी ...हरभ~याचे झाड तुटले अन माझे कंबरडे मोडले.....हा..हा...

    ReplyDelete
  6. मुग्धा अग,
    चैन नसे जीवा
    उमगोनी त्यांचा कावा.... अशी स्थिती गं,:)
    आभार.

    ReplyDelete
  7. नाण्याची दुसरी बाजू इतकी सुंदरपणे मांडली आहेस की काय म्हणू? इतका खोलवर विचार करून पुन्हा ते दुस-याला समजतील अशा त-हेने आपल्या लेखणीतून मांडणं म्हणजे केवळ अप्रतिम! तुझ्या विचारांच्या कक्षा किती विस्तारलेल्या आहेत, हे आज समजलं.

    ReplyDelete
  8. मनापासुन आवडलं आणि पटलं देखिल. वाचताना सतत माझ्या नवर्‍याचे शब्द आठवत राहिले. तो नेहेमी म्हणतो आपला स्विच आपल्या हातात असावा की दुसर्‍याच्या हे पुर्णपणे आपल्या हातात असतं. तुमची वैचारीक प्रगल्भता छान आणि नेमक्या शब्दांत व्यक्त झाली आहे. अभिनंदन.

    ReplyDelete
  9. उत्तम ....मी फक्त हेच म्हनेल ....कुठे तरी मी मलाच ह्या लेखात पाहीले...खूपवेला अनुभवली आहे अशी उपेक्षा...
    मनताले विचार शब्दात मांडलेस...

    ReplyDelete
  10. अनुल्लेखाने मारणे.. काय सुंदर कल्पना आहे . नेहेमी च अनुभव घेतो, पण ..कधी लक्षात आलं नव्हतं की ही पण बाजु आहे म्हणुन. अनुल्लेख झाला, की एक तर पुर्णपणे मोडुन जातो, सगळ्या गोष्टीतला आनंद निघुन जातो.. किवा, माझ्या सारखा , सरळ दुर्लक्ष करुन आपल्या मार्गाने चालत रहातो.
    खुप सुंदर झालाय लेख. तुझ्या सगळ्या लेखांमधअला वन ऑफ द बेस्ट!!!!!

    ReplyDelete
  11. कांचन प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.:)

    ReplyDelete
  12. रोहिणी, हो ना. आहारी जाणे ही प्रक्रिया कुठल्याही नात्यात, गोष्टीत सुरू झाली की गोडी संपली व गुलामी सुरू झाली.

    ReplyDelete
  13. गणेश प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

    ReplyDelete
  14. महेंद्र, दुर्लक्ष करून पुढे निघून गेलो तरी शल्य राहतेच....आपल्या असलेल्या गुंतवणूकीमूळे.समोरचा त्याचाच (गैर)फायदा उठवत असतो अन आपण त्याला मोकळे रान उपलब्ध करून दिलेले असते.

    ReplyDelete
  15. भानस : कधीकधी लोक जास्त वगैरे झाली की एकदम वेगळ्याच विषयावर अंतर्मुख होऊन बोलतात. तशी ती भरली केळी इतरांना मत्सर वाटवून आणि तुम्हाला नशा चढवून गेल्यासारखी दिसताहेत. चमचमीत मिठाईच्या फोटोनंतर अनपेक्षित वेगळं वाचायला मिळालं. महेंद्र कुलकर्णींनी म्हटल्याप्रमाणे या लेखाचा एकदमच दर्जा उंच आहे. 'अनुल्लेख, उपेक्षा', 'मानमरातबासाठी धडपड' आणि 'समृद्‌ध निसर्गाची चाललेली उपेक्षा' ही तीन वेगवेगळी सूत्रं उगीच एकात गोवलीत असं वाटतंय. या एका पोस्टमधे तीन वेगळ्या विषयांचं बीज आहे, जे स्वतंत्र वाढवता येईल.

    पण 'तीन सूत्र एकांत' हा एक किरकोळ भाग आहे. एकूण पोस्ट मस्त जमलेली आहे.

    ReplyDelete
  16. vichar karayala lavanyasarakha lekh aahe ha...tumache vichar patataat.

    ReplyDelete
  17. खूप आवडली ही पोस्ट...विचार करायला लावणारी. आणि तन्वीने म्हटल्याप्रमाणे हळूवार फुंकर घालणारी.

    ReplyDelete
  18. धनंजय प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  19. देवेंद्र, श्यामली आवर्जून लिहीलेत बरे वाटले. आभार.

    ReplyDelete
  20. खुप छान लिहिलयं, मनापासुन आवडलं.

    ReplyDelete
  21. अजित किल्लेदार, ब्लॉगवर स्वागत व अभिप्रायाबद्दल अनेक आभार.
    माफी! पोच द्यायला बराच विलंब झालाय.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !