शनिवारी जवळ जवळ सहा-सात महिन्याने पहिल्यांदा तो भला मोठा कोट अंगावर न चढवता बाहेर जाता आले. मस्त वाटले. मोकळेमोकळे, हलकेही. सगळा सरंजाम, कोट-टोपी हातमोजे आणि मोठे बूट. एवढी जोखडे चढवल्यावर वजनही वाढतेच ना. कुठेतरी जावे लांब फिरायला म्हणून बाहेर पडलो अन एका खूप मोठ्या फॅक्टरी आउटलेट मॉल मध्ये पोचलो. शंभर-सव्वाशे दुकाने एकाच ठिकाणी पसरलेली. फिरणेही होईल अन थोडेसे विंडो शॉपिंग. गंमत म्हणजे तापमानाचा पहिला आनंद लुटायला आमच्यासारखी समस्त जनता लोटलेली. पार्किंगला जागाच नाही. (तरी म्हणे इकॉनॉमी इतकी खराब झालीय.) सगळेजण उत्साहाने उंडारत होते. दुकानात गर्दी यथातथाच होती. बाहेर मात्र अगदी एकमेकाला धक्के लागू नये याची खबरदारी घ्यावी लागत होती.
जवळजवळ चार तास मनसोक्त हुंदडून उगाच काहीतरी किडूकमिडूक खरेदून आम्ही प्रसन्न मनाने घरी आलो. सहा महिन्यांपेक्षा जास्ती दिवस प्रचंड थंडी, बर्फ झेलल्यानंतर हे असे फिरण्य़ाचे सुख सांगून समजणार नाही. ते अनुभवायलाच हवे. आता सप्टेंबर संपेतो धमाल. सूर्य अन मन यांचा पाठशिवणीचा खेळ काही काळ थांबेल. काड्या झालेली झाडे आठ दिवसांत इतकी भसाभसा वाढतात की बस. बिचारी करतील तरी काय, इतके महिने कोंडून पडलेली असतात. पक्षी अन अगदी बारीक कीटकांचा वावर सुरू झालाय. जो तो जणू एकमेकाला सांगतोय, "आला रे आला, समर आला."
आता दररोज पाऊस पडेल. म्हणजे पाऊस इथे तसा जवळजवळ वर्षभरच पडतो पण त्याच्या पडण्याची रूपे बदलतात ना. आता मात्र पाऊसच, तो ही कधी रिमझीम तर कधी धुवांधार. कधी नुसतेच विजांचे तांडव अन ढगांचा गडगडाट. कौलावर तडतड आवाज करणारे मोठाले थेंब. आठ दिवसात मागचे जंगल कोवळी लुसलुशीत पाने लेऊन लहान बाळासारखे खुदकन हसत राहील. जणू काही ते कधी वैराण नव्हतेच.
आज मस्त पाऊस लागलाय. पावसाळा खास जिव्हाळ्याचा. अनंत प्रसंग अंतरात दाटून आलेत. काही खास आठवणी तर काही गमतीशीर. लोकलचे आणि माझे अतूट नाते. पाऊस अन लोकल म्हणजे एक मोठे प्रकरण. त्यातून ती मध्यरेल्वे, पंधरा मिनिटे पाऊस झाला की आलेच हिच्या अंगात. पण ते किस्से पुन्हा केव्हातरी. आज मनभरून हा पावसाचा उत्सव साजरा करायला हवा. आले, गवती चहाची पात घालून केलेला वाफाळता चहा अन गरम गरम भजी.
Hey, thanks a lot.
ReplyDelete