जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, February 27, 2010

होळी रे होळी, पुरणाची पोळी......

आमची आई अगदी न चुकता दर वर्षी होळीला पुरणाची पोळी करत असे. तिने केलेल्या पोळ्या अगदी एक सारख्या, तब्येतीत पुरण भरलेल्या अजिबात कुठूनही न उकललेल्या. आईच्या हातच्या मऊसूत पुरणाच्या पोळ्या म्हणजे पर्वणीच. जेव्हां जेव्हां ती त्या करत असे त्या प्रत्येक वेळी मी निदान एक तरी पुरणाची पोळी करून पाही. पण जिकडून तिकडून पुरण बाहेर येऊन चिकटल्याशिवाय ती पोळी काही होत नसे. मी केलेली पोळी कशीही असली तरी मी ती आनंदाने खात असे पण मन मात्र खट्टू होई. आईच्या कश्या इतक्या सुंदर होतात, मलाच का जमत नाही याचे दुःख पुढे दोन चार दिवस त्रास देई की पुन्हा आई नव्याने त्या करायला घेईतो मी विसरून जाई.

लग्न झाल्यावर एकदा सासू-सासरे चार दिवस पुण्याला गेले असता मी मुद्दामहून अर्धा दिवसाची रजा टाकून आज पुरणाची पोळी करून नचिकेतला चकित करायचे असे ठरवून घरी गेले. आई करताना पाहिलेले आठवून आठवून सुरवात केली. डाळ शिजवून घेतली पण पाणी पूर्ण काढले गेले नाही. गूळ नेमका कमी भरला....., तर त्यात काय कमी तर कमी. अर्धा गूळ व अर्धी साखर घालून करू, पण आज मागे हटायचे नाही. पक्का निर्धार केलेला. एक डोळा घड्याळाकडे ठेवून भरभर कामाला लागले होते. मुळात डाळीत थोडे पाणी शिल्लक राहिलेले त्यात साखर व गूळ वितळून मिश्रणाला चक्क कटाच्या आमटीचे स्वरूप आले आणि माझा धीर खचला. तरी नेटाने पंधरा मिनिटे ते आटते का याचा प्रयत्न केला पण फारसा काही फरक पडला नाही. उलट आच वाढविल्याने तळशी करपू लागले. या मिश्रणाचे आता नक्की कशात रुपांतर होतेय तेच समजेना, जीव खालीवर होऊ लागला. चव मात्र खरेच बरी लागत होती.
हे काय वाटीत घालून का देऊ खायला. म्हणजे तो नक्की हसेल आणि सगळ्यांना माझी फजिती सांगेल. या नुसत्या कल्पनेनेच वैतागून मी तो सगळा राडा उचलला, पिशवीत भरला. सोबत चार साध्या पोळ्याही घेतल्या आणि चक्क घराशेजारच्या बागेपाशी बसणाऱ्या आजीला देऊन आले. मनात सारखे वाटत होते ती आजीपण म्हणत असेल, काय ही पोर आहे. साधी पुरणपोळीही जमेना होय.

पुरणपोळी जमलीच नाही ती नाहीच वर अर्धा दिवसाची सुटीही फुकट गेली.
माझ्या फजितीचा नचिकेतला मी मुळीच पत्ता लागू दिला नाही. संध्याकाळी बाहेर जाऊन मस्त हादडून आलो. पण कुठेतरी मनात सल राहिलाच. पुढे बरीच वर्षे मी या पुरणपोळीच्या वाटेला गेलेच नाही. वेळ कुठे आहे इतका या सबबीखाली टाळत आले. होळीला बिल्डिंगमधलीच एक मैत्रीण बनवून देत असे तेव्हा तिच्याकडूनच आणत असल्याने तसे अडलेही नाही. पण २००० साली अमेरिकेत आलो आणि आता आपण जर पुरणपोळी केली नाही तर खायला मिळणारच नाही हे जाणवले. मनाचा हिय्या करून पुन्हा एकदा होळी नसताना पुरणपोळीचा घाट घातला आणि वल्ला! जमल्या. शोमूने अगदी आडवा हात मारला ते पाहून इतक्या वर्षांचे खट्टू मन आनंदून गेले. लागलीच फोन करून आईच्या कानाशी लागले. तिला ही बातमी देऊन थोडी कॉलर ताठ करून घेतली.

आता वर्षातून दोन-तीनदा तरी होतातच म्हणजे करतेच. हो ना, नाहीतर पुन्हा काहीतरी चुकायचे. उद्याच होळी तेव्हा आज केल्यात. लगे हाथ कृतीही टाकतेय.

सगळ्यांना होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


जिन्नस
  • चार वाट्या चण्याची डाळ
  • चार वाट्या चिरलेला/किसलेला गूळ ( शक्यतो पिवळा गूळ घ्यावा )
  • कणीक दोन वाट्या, तांदळाची पिठी दोन वाट्या
  • दोन चमचे वेलदोडा पूड, एक चमचा जायफळ पूड ( आवडत असल्यास ) थोडे केशर (वासापुरते)
  • अर्धी वाटी तेल व दोन चिमूट मीठ व तीन-चार चमचे तूप
मार्गदर्शन
चण्याची डाळ स्वच्छ धुऊन एका मध्यम भांड्यात जरा जास्तच पाणी घेऊन त्यात डाळ व चार थेंब तेलाचे घालून प्रेशरकुकरमध्ये ठेवावे. मध्यम आचेवर तीन शिट्ट्या करून घ्याव्यात. प्रेशर गेले की लागलीच काढून चाळणीवर डाळ ओतावी. डाळीतले सगळे पाणी निथळून घेऊन एका भांड्यात ठेवावे. या पाण्याचीच कटाची आमटी करता येते. या गरम डाळीतच गूळ व केशराच्या काड्या घालून मध्यम आचेवर पुरण शिजवून घ्यावे. साधारण दहा मिनिटात शिजते.शिजत आले की चमचाभर तूप त्यात टाकून मिनिटभर शिजवून आच बंद करावी. आचेवरून काढून पुरण जरा निवले की वेलदोड्याची व जायफळाची पूड घालून पुरण मिक्सरमधून/ पुरणयंत्रातून/ पाट्यावर वाटून एकसंध गोळा करावा.

गव्हाची कणीक प्रथम पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावी. थोड्या पाण्यात अगदी घट्ट भिजवून साधारण तास-दिडतास झाकून ठेवावी. नंतर पाणी व मीठ लावून खूप वेळ मळून मऊ परंतु ताणता येईल अशी करून घेऊन एका भांड्यात अर्धी वाटी तेल घेऊन त्यात बुडवून ठेवावी. थोडी कणीक घेऊन त्याचा मोठ्या लिंबाएवढा गोळा करावा. कणकेच्या गोळ्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा घेऊन कणकेच्या गोळ्यात घालून त्याचा उंडा करावा. तांदुळाच्या पिठीवर अतिशय हलक्या हाताने परंतु पुरण अगदी पोळीच्या कडेपर्यंत नीट पसरेल असे लाटावे. शक्यतो न चिकटणाऱ्या तव्यावर टाकून नाजूकपणे भाजावी. उलटताना ती फुटणार नाही याची काळजी घ्यावी. बदामी रंगावर भाजून घ्यावी व तूप घालून खायला द्यावी. आवडत असल्यास सोबत दूधही द्यावे.

टीपा
ताजी पुरणाची पोळी तूप-दुधाबरोबर सुंदर लागतेच परंतु शिळी पुरणाची पोळी ( दुसऱ्या दिवशी ) जरा जास्तच छान लागते. तेव्हा करताना हमखास पाचसहा तरी पोळ्या दुसऱ्या दिवशीसाठी राहतील या हिशोबाने कराव्यात. मी पुरण शिजत आले की त्यात एक चमचा तूप टाकते. त्यामुळे पुरणाची खुमारी हमखास वाढते. पुरण मऊ झाले पाहिजे. गूळ किंवा डाळ राहू देऊ नये अन्यथा लाटताना पोळी फुटत राहण्याची शक्यता असते. अशी पोळी फुटली की भाजताना त्रास होतो.

Friday, February 26, 2010

अशी आमुची माय मराठी......

( वरील पुस्तकांची मुखपृष्ठे श्री. प्रकाश ढवळे व संकलन श्री. नचिकेत यांच्या सौजन्याने )

संत वाड्मय हा मराठी साहित्याचा प्राण आहे. ज्ञानेश्वरांनी जिच्या द्वारे अमृताशी पैजा जिंकायची भाषा केली अश्या आपल्या मराठीतले संत साहित्य लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत नेहमीच वाचले जाते. मराठी साहित्यसंपदा ही तशी प्राचीन. इतिहासकारांच्या मते मराठीचा वापर असणारे शिलालेख इ.स.च्या १० व्या आणि ११ व्या शतकातले आहेत तर मराठीतली पहिली ग्रंथरचना १३ व्या शतकातली आहे. १९ व्या शतकापासून हिंदी, उर्दू आणि इंग्रजीशी देवाणघेवाण वाढल्यामुळे मराठी भाषाही बदलत गेली.

संस्कृत-प्राकृत- मराठी हा तिचा प्रवासही मोठा लक्षणीय आहे. आपल्याला लाभलेली ही वैभवशाली मराठी भाषा प्राचीन आहे. मराठीची गंगा प्राकृताच्या पर्वतातून निघाली; पण तिला तीर्थाचे स्वरूप ज्ञानेश्वरांनी आणले. "माझा मराठाचि बोलू कवतुके परि अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन'' या शब्दांत संत ज्ञानेश्वरांनी मायमाउली मराठी भाषेची अशी थोरवी गायली आहे. मातृभाषेतून आपले विचार रोखठोकपणे व विलक्षण तळमळीने व्यक्त करून तुकाराम महाराजांनी अभंगरचना केली; जी इंद्रायणीत बुडूनही अमर राहिली. समर्थरामदासांचे `मनाचे श्लोक' आणि `दासबोध' या ग्रंथांनी भक्तिमार्गाबरोबरच संसाराची शिकवण दिली. असे प्राचीन संत, वाड्मय आपल्या मराठी भाषेचे अनमोल लेणं आहे.

पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने ’ विवेक सिंधुया ’ काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तिपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली आहे. सर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा सातारा येथे विजयादित्य-काळातील ताम्रपट्टीवर आहे (इ. स. ७३९) येथे आहे.श्रावणबेळगोळ, कर्नाटक येथे सर्वात प्राचीन मराठी शिलालेख आहे. या शिलालेखात राजा गंगराय व त्याचा सेनापती चामुंडराय यांचे उल्लेख आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. पहिले साहित्य संमेलन इ.स.१८७८ साली पुण्याला झाले व माननीय न्यायमूर्ती रानडे त्याचे अधक्ष होते. त्यानंतर १९२१ पर्यंत साधारणपणे दर पाच वर्षातून एकदा होत होते. १९२६ ते १९५० सालामध्ये १९३७, १९४५,१९४८ हे अपवाद वगळता वर्षातून एकदा झालेच. इचलकरंजी येथे १९७४ साली भरलेल्या ५० वे म्हणजेच सुवर्णमहोत्सवी संमेलनाचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु. ल. होते.

पहिल्या विश्व मराठी संमेलनात जागतिक मराठी भाषा दिनाची संकल्पना आकारास आली . ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार व कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांना मानवंदना देण्यासाठी २७ फेब्रुवारीला या कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाला जागतिक मराठी भाषा दिनाचे कोंदण लाभले.
जागतिक मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा !!!

( माहिती जालावरून )

Thursday, February 25, 2010

मोडी


काही आवडी उपजतच असतात. स्वच्छता-नीटनेटकेपणाची, बोलघेवडेपणा, संगीताची, वाचनाची, अभ्यासाची, खेळाची, चित्रकलेची...... इत्यादी. काही आवडी-कल हळूहळू लक्षात येतात. तर काही ठरवून जोपासता येतात. पाटीवर गमभन गिरवण्यापासून आईने प्रयत्नपूर्वक वळणदार व एकसारखे अक्षर काढण्यावर व स्वच्छ-शुद्ध लिहिण्यावर भर दिला व सरावही करायला लावला. रोज संध्याकाळी देवापाशी दिवा लावला की शुभंकरोती, शांताकारम ही स्तोत्रे, २ ते ३० पाढे व दहा ओळी शुद्ध नेटके लेखन हा परिपाठ होता. जोवर हे पूर्ण होत नाही तोवर ती जेवत नसे आणि आम्हालाही वाढत नसे. सुरवातीला खूप कंटाळा-राग येई. काय ही कटकट आहे असे वाटे. पण अगदी थोड्याच दिवसात आम्हाला सवय लागली. अगदी तिसरीपासून हस्ताक्षराच्या स्पर्धेत पहिला नंबर कधी चुकला नाही. त्यामुळे काही कामेही अंगावर ओढवून घेतली. बोर्डावर सुविचार लिहिणे. फलक बनविणे. स्क्रॅपबुकचे बरेचसे कामही कायम गळ्यात पडत असे. कॉलेजमध्येही ही कामे सुरू होतीच. पुढे तर ऑफिसमध्येही हे सत्र चालूच राहिले. असे असले तरी अक्षर अजून कसे चांगले होईल, कितीतरी निरनिराळ्या प्रकारे काढता येईल हे प्रयत्न करत होते.

कॉलेजमध्ये असताना एकदा अर्धमागधी, मोडी लिपी यावर बरीच चर्चा झाली. कोणालाही ना वाचता येत होती ना लिहिता. हातात कागद असून निरक्षर असल्यासारखे वाटले. लिहिलेले अतिशय वळणदार दिसत होते. एका लयीत हात न उचलता अक्षरे जणू घरंगळत आहेत असा भास होत होता. या अतिशय आकर्षक उलगडत जाणाऱ्या लडिवाळ अक्षरांना आपलेसे करायचेच हे मनाने घेतले. पण हे प्रत्यक्षात उतरायला मात्र १९९२ साल उजाडावे लागले.

जयहिंद प्रकाशनाचे मालक, श्री. ग.का.रायकर यांनी ’ मोडी लिपी शिक्षण प्रसारक मंडळ " नावाची संस्था काढली व १८ जानेवारी १९९१ रोजी ठाकुरद्वार येथील कमला हायस्कूल येथे पहिला वर्ग सुरू केला. नंतर म्हणजे १९९२ मेमध्ये दादर-ठाणे येथेही वर्ग सुरू झाले. एक दिवस मॅजेस्टीकमध्ये गेले असता न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दर रविवारी मोडी लिपीचे वर्ग भरतील, इच्छुकांनी नावे नोंदवावी हा फलक लिहून ठेवलेला पाहताच लगेच नाव नोंदवून टाकले.

आणि श्री. मनोहर जागुष्टे म्हणजेच आमच्या प्रिय जागुष्टेसरांचा परिचय झाला-स्नेह वाढला- सर,जणू घरातलेच झाले. अत्यंत तळमळीने मोडी लिपी रुजावी-वाढावी-टिकावी याचा सतत प्रयत्न सर करीत असत. सरांनी मोडी लिपीचा ध्यास घेतला होता. पंच्याहत्तरी झाली तरी रोज ठाण्याची वारी करत. प्रत्येक मायदेशाच्या भेटीत एकदा तरी सरांशी बोलायचेच हे ठरलेले. २००७ च्या मे मध्ये मॅजेस्टीकमध्ये गेले आणि धक्काच बसला. सरांचे निधन झालेले. अत्यंत हसमुख, शिकवण्यास सदैव तत्पर अशा आमच्या सरांच्या निधनाने एका मोडी-ध्यास पर्वाचा अंत झाला.

महाराष्ट्रात मोडी लिपी सहाशे सातशे वर्षे तरी सुरू असून यादवांच्या राजवटीपासून सरकारी दप्तर व लोकांचाही पत्रव्यवहार याच लिपीतून होत असे. इंग्रजीत जशी लघुलिपी झरझर लिहिता येते तशीच मोडी लिपी ही हात न उचलता लिहिता येत असल्यामुळे वेगाने लिहिता येते. पेशवेकालीन दस्तऐवज, पत्रे, मोहर, समर्थांची पत्रे, महाराजांचे खलिते-राज्यकारभार, इत्यादी मोडी लिपीतूनच लिहिलेले आहे. मोडी लिपी फारशी अवगत नसल्यामुळे ही बाडे नुसतीच पडून आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही लिपी दुर्लक्षिलीच गेली आहे. तिचा पुन्हा प्रसार व्हावा यासाठीचा हा सारा खटाटोप होता. वर्षभरात ’ जागतिक मराठी परिषदेच्या ’ दोन्ही परीक्षा देऊन प्रथम क्रमांकाने उत्तीर्णही झाले. त्याच दरम्यान तंजावर ची सहल आयोजित झाली. ही संधी दवडणे शक्यच नव्हते.

तंजावरातील ’ सरस्वती महाल ’ येथे गेलो. अतिशय भव्य दिव्य महाल. बाहेरून याच्या भव्यतेचा मुळीच अंदाज येत नाही. अतिशय प्रसन्न वातावरण व प्रशस्त जागेत अंतरा अंतरावर टेबले व पंडित बसलेले होते. तिथे विवेकानंद गोपाळ या अधिकाऱ्यांना भेटलो. ग्रंथालयात संस्कृत, मराठी, तमिळ, तेलगू इत्यादी भाषांचे तज्ञ काम करत होते. स्वच्छ पांढऱ्या फडक्यांत मोडी लिपीचे कागद बांधलेले होते. या फडक्यांना रूमाल असे संबोधले जाते. या सर्व प्राचीन कागदपत्रांची निगा घेणारा विभागही पाहिला. फाटलेली कागदपत्र, ताडपत्रे यांची दुरुस्ती. ’ विट्रेनेल्ला ’ नावाने ओळखले जाणारे तेल ताडपत्रावर लावून त्यांची जपणूक केली जाते. नंतर या मजकुराची चित्रफीत घेतात.

भोसलेकालीन मोडी लिपीतील १००० रुमाल येथे पूर्वी होते. १९९३ साली त्यातील ८५० सरस्वती महालात होते. आम्ही त्यातील काही रुमालातील दस्तऐवजांचे भाषांतर करण्याचे काम केले. एक अतिशय वेगळाच रोमांचकारी अनुभव होता. अहिल्याबाई होळकरांच्या हस्ताक्षरातील पत्र, मातोश्री राधाबाईंचे माधवरावांना लिहिलेले पत्र, उदाजी चव्हाणांचे चिमाजी अप्पांना पत्र, समर्थ रामदासांनी शिवाजीराजेंना लिहिलेले खलिते, समर्थांनी त्यांच्या पुतण्यांना लिहिलेली पत्रे, पाहून डोळे भरून आले. इतिहासाच्या जिवंत खुणा, हस्तलिखिते पाहण्याचे भाग्य लाभल्यामुळे अतिशय आनंद झाला.


जाता जाता मी मोडी लिपीत लिहिलेले दोन नमुने देत आहे.

काव्यपंक्ती:
श्रीहरी मथुरानगरी गेले, गोकूळ मागे तळमळते ।
प्राणिमात्र नच केवळ परि ते यमुनेचे जळही जळते ॥
कळे सकळ हे श्रीगोपाळा कळवळूनी मनि आणि दया।
धाडुनि दिधला प्रजांत उद्धव प्रियजनसांत्वन करावया ॥
सत्वर हरिचा निरोप घेऊनि उद्धव भेटे सकळांते ।
वृत्तश्रवणा क्षणांत जमले गोकूळ सारे त्या भंवते ॥
हे नंदाला, यशोदेस हे, कोणाला काही काही ।
निरोप सांगे सांत्वनपर तो; सुने कुणी उरले नाही ॥
या गोपीला, त्या गोपीला, गोड शब्द दे वाटुनियां ।
राधेला तर बहाल केली हरिने जिवाची दुनिया ॥

उतारा :

आजच्या युगात खेळांचे महत्त्व लोकांना पटू लागले आहे. कारण यशस्वी खेळाडूंना लौकिक आणि लक्ष्मी दोन्हीही प्राप्त होताना दिसतात. पण असे यश संपादण्यासाठी भरपूर तपश्चर्या करावी लागते. खेळामुळे मेहनत आणि चिकाटी या दोन्ही गुणांची जोपासना होते. खेळाडू मोठ्या चुरशीने खेळून यशश्री खेचून आणतात. अशा या चुरशीतून खेळाडू जिद्दी बनतो. हीच जिद्द खेळाडूंना त्याच्या जीवनात अन्यत्रही उपयोगी पडते. ( उतारा बराच मोठा आहे. म्हणून नमुना देत आहे. )

Monday, February 22, 2010

सहज घडलेला संवाद अन रेंगाळणारे प्रश्न ....

मायदेशी जाताना एकदा अ‍ॅमस्टरडॅमवर साडेचार तासांचा हॉल्ट होता. पहाटे साडेपाचला विमान पोहोचले तेव्हा विमानतळावर जरासा शुकशुकाटच होता. आमच्या फ्लाईटमधलेच बावीस-पंचवीस प्रवासी, ज्यांना पुढे मुंबईला जायचे होते त्यांचीच काय ती गर्दी आमच्या व आसपासच्या चार गेट्स मिळून होती. हळूहळू विमानतळ जागा होऊ लागला तोवर थोड्या ओळखी करून घेऊन तीनचार ग्रुप्स तयार झाले. गप्पांना रंग चढू लागला.

प्रत्येक जण मनात जाणून असतो, आज भेटलेली माणसे पुन्हा भेटण्याची शक्यता फारच कमी आहे. आधीपासून ओळख नसते आणि पुढे फारशी टिकणार-वाढणार नसते. क्वचित एखादा अपवाद. त्यामुळे व नुसते बसून वेळ कसा जाणार म्हणूनही बोलण्यात खंड पडत नव्हता. तसे विषय नेहमीचेच. कुठे राहता, काय करता, घरी कोण कोण आहे, कुणाकडे चालला आहात? वगैरे. म्हटले तर साधे-निरुपद्रवी म्हटले तर ओघाओघात बरीच माहिती मिळू शकेल असे. कोणी सावध पवित्रा घेऊन बोलत होते. काही जण, प्रश्नांना सहजी बगल देत होते. तर काही विचारणाऱ्यालाच प्रतिप्रश्न विचारत होते.

मी ज्या ग्रुपमध्ये बसले होते त्यात मुंबई - पुण्याचेच, वेगवेगळ्या वयाचे लोक होते. तीन जोडपी होती. एक अगदी तरुण होते. लग्नाला दोनच वर्षे झालेली होती. आल्यापासून प्रथमच मायदेशी जात होते त्यामुळे कधी एकदा पुण्याला आपापल्या घरी पोहोचतो असे त्या दोघांनाही झाले होते. बरोबरच वाचलेत, " आपापल्या " च लिहिलेय. ते दोघे पुण्याला पोचताच तो त्याच्या आईकडे व ती तिच्या आईकडे जाणार होती. तिचा नुसता चिवचिवाट चालला होता. तोही मित्रांबरोबर कसा पूर्वीसारखी धमाल करेन च्या नादात होता. दोघांनीही जोरदार प्लॅन्स आखलेले. ट्रेकिंग, सिनेमे, रात्र रात्र कट्ट्यावर जागरणे, खादू-पिदू पार्ट्या. गोव्याला मात्र दोघे मिळून चार दिवस जाणार होते. बोलता बोलता त्यांनी प्रेम कसे जमले- हिने कसे मला तंगवले, मग दोघेजण सहा महिने कसे बोलत नव्हतो पासून अगदी हनीमूनच्याही गंमती सांगून मोकळे झाले. त्यावर आम्ही सगळ्यांनी जाम खेचली त्यांची. खूपच मजा आली.

दुसरे जोडपे ' आजी-आजोबा ' होते. लेकाकडे सहा महिने राहून परत निघाले होते. मुंबईतच-सायनला राहणारे. दोघांनाही आपल्या घरी पोचून कधी एकदा गोकुळच्या दुधाचा आले घालून केलेला चहा पितो असे झाले होते. आजींचे सारखे चालू होते, " कसला गं तुमच्या त्या नीळ्या बुचाचा पांचट चहा, शी.... अगं, लाल बुचाचे दूधही आणून पाहिले हो. उगाच तोळामासा फरक. समाधानच नाही. आपल्या गोकूळच्या दाट दुधाचा चहा म्हणजे अमृत आहे बघ. " अमेरिका त्यांना आवडली होती पण फक्त थोड्या वास्तव्यासाठी. कायमचे राहण्याची त्यांची बिलकुल तयारी नव्हती. आजोबा तर जास्तच वैतागले होते. त्यांना एकट्याला फारसे कुठे जाता येत नसल्याने सारखे मुलावर नाहीतर सुनेवर अवलंबून राहावे लागत होते. त्याची त्यांना फार कटकट झाली होती. वैताग आहे नुसता, साधा पब्लिक ट्रान्स्पोर्ट नाही या अमेरिकेत. आमच्या मुंबईत या म्हणावं, हात दाखवला की रिक्षा थांबतेय. बस-ट्रेन्स नुसता सुळसुळाट. अग, कुठून कुठेही कसे पटकन जाता येते. जीव उबला माझा. आता गेलो ना घरी की पहिला बाहेर पडेन आणि एकटाच मस्त चक्कर मारून येईन.


तिसरे जोडपेही ज्येष्ठ नागरिकच होते पण साठीतले. अजून नोकऱ्या सुरू होत्या. महिनाभरासाठीच लेकीकडे आले होते. दोघांनाही ऑफिसचे वेध लागले होते. रोटरी, जॉगिंग क्लब, मित्रमंडळ, विकांताच्या मैफिली सगळ्यांची आठवण काढत होते. मी आणि अजून दोन माझ्यासारखेच एकटे प्रवास करणारे. त्यातला एक एम.एस. करत होता आणि दुसरा पस्तिशीचा, लग्न करण्यासाठी निघालेला. म्हणत होता, " निघायच्या आधीच आईने मोठी यादीच तयार ठेवली आहे आणि पुढच्या पंधरा दिवसात त्याचा फडशा पाडून, मुलगी पसंत करून शक्य झाल्यास लग्नही उरकायचेय. " आता लग्न ही काय उरकायची बाब आहे का? त्यातून ते उरकून लगेच अमेरिकेत येण्यासाठीच्या तिच्या सोपस्काराला लागायचे. म्हणजे या दोघांना एकमेकांची मने जुळणे वगैरे सोडाच पण साधी जुजबी माहितीही होणार नव्हती. पंधरा दिवसापूर्वी न पाहिलेल्या-माहीत असलेल्या दोन माणसांचे झटपट उरकलेले लग्न.

दोन्ही ज्येष्ठ जोडपी या लग्नाळू तरुणाची गंमत करत होते. आजींनी कशी मुलगी हवी आहे? इतका उशीर का केला? हेही ओघात विचारून घेतले. त्याचा फोन नंबरही घेतला. तरुण जोडप्यातला नवरा या लग्नाळूला सारखा सांगत होता, " अरे चांगला सुखी जीव आहेस कशाला नको त्या खोड्यात स्वत:ला अडकवून घेतोस. माझ्याकडेच बघ, काय होतो मी आणि काय झालोय मी. मित्रा अजूनही विचार बदल. वेळ गेलेली नाही. मात्र एकदा का गळ्यात हार पडला की जीवनभर बस ' हार ही हार ' सोच लो. " असे म्हणत बायकोकडे पाहून डोळे मिचकावत होता. ती पण, " असं काय बच्चमजी, महिनाभर मजा करून घे मग दाखवते तुला माझा प्र-हार. " असे म्हणत वेडावत होती.

हे सगळे ऐकताना मध्येच एमएस करणारा पोरगा, " लग्न कशासाठी करायला हवे? आणि न करणेच कसे उत्तम " याचे तावातावाने विश्लेषण करू लागला. आठदहा मिनिटे त्याची तात्त्विक बडबड कशीबशी ऐकल्यावर सीनियर आजोबा ताडकन उठले आणि त्याला खाजगीत नेऊन काहीतरी असे सांगितले की तो गप्पच बसला. मग एकएक करून सगळे पुरूष आजोबांच्या कानाला लागून आले आणि खोखो हसत होते. आजींनी, यांची नेहमीचीच काहीतरी पाचकळ कोटी असेल असे म्हणत नाक मुरडले. उरलेल्या आम्हा तिघींना मात्र जाम उत्सुकता लागली. त्या दोघींच्या नवऱ्यांना कळल्यामुळे विमानात बसल्या बसल्या या दोघी त्यांच्याकडून वदवून घेणार होत्याच पण माझे काय...... आजोबांनी काय सांगितले असेल हा प्रश्न अनुत्तरितच आहे आणि अजूनही मला छळतो आहे. किती हा अत्याचार.

गेटवरही फार गजबजाट झाला होताच. चेक-ईनची लाइन लागली तसे आम्ही सगळे उठलो. सोपस्कार पार पाडून आतल्या लॉउंजमध्ये आल्यावर फोन नंबर्सची देवाण घेवाण झाली आणि बोर्डिंगला सुरवात झाली तसे सगळे पांगले. मुंबईला पुन्हा इमिग्रेशनच्या वेळी आम्ही सगळे भेटलो. निरोप घेऊन जोतो मार्गाला लागला. तसे पाहिले तर फक्त चार तासांची ओळख. पण त्यात आम्ही सगळेच अगदी मोकळेपणाने एकमेकांशी बोललो, थोड्या टवाळक्या केल्या - टर उडवली. आजींनी आजोबांच्या घोरण्याच्या सुरस कथा ऐकवून ऐकवून मस्त करमणूक केली. आजी- आजोबांनी एकदोन वेळा वडिलकीच्या अधिकाराने आम्हाला झापलेही.

हे साडेचार तास इतके सहजी आणि आनंदात गेले की घरातून निघताना याच तासांचा का वैताग वाटत होता आपल्याला, असे वाटून गेले. तसे पाहिले तर काही खास घडलेच नव्हते तरीही वेळ मजेत गेला. मस्त अड्डा जमला होता आमचा. अनेकदा अश्या काही तासांपुरत्याच ओळखी-सहवास घडतो. माणसे मनात छाप सोडून जातात.

आता हेच पाहा ना, त्या लग्नाळूचे लग्न जमून लागलीच झाले असेल का? आवडले असतील का ते एकमेकांना? का घाई घाई झाली असे वाटत असेल मनातून. आता दोन वर्षांनंतर ती दोघे कशी असतील? नवीनच लग्न झालेल्यांचा उत्साहाने ओसंडून जाणारा प्रकार आजही तसाच तितकाच ताजा-भरभरून वाहणारा असेल ना? दोनाचे तीन झाले असतील कदाचित. डायपर आणि जागरणे जोरावर असतील. एमएस करणाऱ्याचे लग्नही झाले असेल ( क्रेडीट आजोबांना ) आणि आजोबांची आठवण त्याने नक्कीच काढली असेल. बायकोला किस्सा ऐकवून दोघे खोखो हसले असतील. आजी-आजोबा आपल्या विश्वात-गोकुळच्या दुधाच्या अमृततुल्य चहात-स्वातंत्र्यात रममाण असतील. एकदा त्यांना भेटायला जायलाच हवे. त्यानिमित्ते आजींच्या हातचा मस्त चहा व गेले इतके दिवस छळणारा प्रश्न तरी सुटेल.

( ऍमस्टरडॅम मधल्या ए ऐवजी अ कसा लिहिता येईल? मला जमतच नाहीये.... )

Thursday, February 18, 2010

वर्षपूर्ती.......

चक्क ब्लॉग सुरू होऊन एक वर्ष झालं. खरंच वाटत नाही. नेमकी मी दोन दिवस प्रवासात आहे. नशीब हॉटेलचे नेट सुरू आहे. फारसे काहीच माहीत नसताना - म्हणजे अगदी ब्लॉग कसा बनवायचा पासून..... अनेक तांत्रिक गोष्टी नव्यानेच पाहत होते, अडखळत-शिकत ब्लॉग सुरू केला. नियमित लिखाण करायचे असे मनात असले तरी, मुळात लिहायला जमेल का? हा प्रश्न होताच. विचार केला निदान सुरवात तर करू, नाहीच जमले तर...... पण मी विक्रमदित्याची बहीण आहे. वेताळ कितीही वेळा निसटून गेला तरी हट्ट सोडायचा नाही. प्रयत्न करीत राहायचे. कासवाच्या गतीने का होईना चार शब्द लिहीत राहीन निदान ते समाधान तरी नक्कीच मिळेल.

हळूहळू इतरांचे ब्लॉग्ज, त्यावरचे लिखाण, त्यांनी जोडलेली गॅझेट्स..... अशा बऱ्याच गोष्टींचे अवलोकन करत सुधारणा करत होते. मग ब्लॉग
मराठीब्लॉगविश्व ला जोडला. माझ्या ब्लॉगवर त्यामुळे वाचक येऊ लागले. त्यासाठी म. ब्लॉ. वि. चे खूप खूप आभार. कोणीतरी आपण लिहिलेले वाचतेय, एखाद-दुसरी टिपणीही येतेय हे पाहून उत्साह वाढला. रोज दहा वेळा ब्लॉगवर जाऊन नवीन टिपणी आली का ते पाहण्याचा एक नवीनच चाळा सुरू झाला. मग कॉउंटर मीटर लावले. जगाच्या प्रचंड पसाऱ्यात व इतक्या धावपळीच्या जीवनातही लोक पाच मिनिटे मी खरडलेले वाचतात याचा मला अतिशय आनंद होत असे आणि आजही होतो.

वर्षभरात सातत्याने लिहिण्याचा प्रयत्न होता. किमान ३०० पोस्ट तरी लिहाव्यात. शेवटी काही विशिष्ट उद्दिष्ट असायला हवेच अन्यथा आळस नावाचा शत्रू अंगात शिरायला कधीही तयार असतोच. पण दोन पोस्ट कमी पडल्या.
ही पोस्ट २९८ वी. मनात अनेक घटना- वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी त्यांना कागदावर उतरवणे हे सोपे नाही याची पदोपदी जाणीव होऊ लागली. स्मरणशक्तीवरच सारी मदार ठेवून लिहीत राहिले. आणि लक्षात आले की नकळत किती गोष्टी आपण टिपत असतो, विचार करत असतो. रोजच्या हाणामारीतही मनाच्या तळाशी या संवेदना-शोषलेल्या अनेकविध घटना जिवंत असतात आणि आपल्या मनावर त्याचा झालेला परिणामही.

लहानपणापासूनच, " माणूस - त्याचे अंतरंग, वागणे, भावजीवन-स्वार्थ, प्रेम, स्वभावाच्या निरनिराळ्या छटा " हे सारे मला मोहवत आले आहे. त्यामुळे आपसूकच त्यावरच जास्त लिहीत गेले. प्रवासाचेही मला जबरदस्त वेड, साहजिकच ती वर्णने-फोटोही आलेच. अनेकदा वाटे हे काय लिहिलेय, अगदीच सुमार-टाकाऊ वाटतेय..... डिलटून टाकावे. एकदा सासूबाईंना हे सांगितले. त्यावर त्या म्हणाल्या की , "अग अशीच सुधारणा होत जाते. उत्साह कमी करू नकोस. लिहीत राहा. " आजवर दोन पोस्ट डिलीट केल्या व एक टिपणी. अरे! म्हणजे त्या डिलीट केल्या नसत्या तर ३०० वी असती की ही.

गेल्या वर्षभरात अगणित मित्र-मैत्रिणी जोडले, जिव्हाळ्याचे झाले. आताशा रोज बोलल्याशिवाय चैन पडत नाही इतके घरातले-आपलेसे झाले. लवकरच प्रत्यक्ष भेटीगाठीचा योगही येईलच. वाचकांनी खूप प्रोत्साहन दिले त्यामुळेच मी लिहीत राहिले. मुलगा दूरच्या राज्यात त्याच्या कॉलेजच्या व्यापात आणि नवरा त्याच्या उद्योगात व सध्या मी नोकरी करत नसल्याने तशी निवांत काहीशी एकटीच झालेय. ब्लॉगमुळे या एकटेपणाची झळ खूपच कमी झाली ही मोठी जमेची बाजू. १५३५ हून अधिक वाचकांनी
भूंगाने काढलेल्या माझ्या पाककृतींचे पुस्तक " पोटोबा " डाउनलोड केलेय हे पाहून खूप आनंद झाला. वाचकांचे व भूंगाचे मनःपूर्वक आभार. एकेकाळी आईला सारखे काय गं स्वयंपाकघरात गुंतून पडतेस असे नेहमी म्हणणारी आणि केवळ सांगकाम्यासारखे काम करणारी मी, कधी इतका रस घेऊन पदार्थ बनवू लागले याचे मलाच नवल वाटते. नेटभेटच्या मासिकामध्ये काही लेख छापून आले. नेटभेट टिमचे खूप खूप आभार.

कौतुक हे सगळ्यांनाच आवडते. अगदी लहान बाळापासून ते आजोबांपर्यंत, ते वयातीत आहे. असे हे कौतुकाचे चार शब्द वाचक आवर्जून लिहितात कधी टिकाही करतात, सूचना-सुधारणा सांगतात. त्याचा खूप फायदा झाला. वाचकांनी- घरच्यांनी - मित्र-मैत्रिणींनी आवर्जून वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादामुळे- प्रोत्साहनामुळे- प्रेमामुळेच मी इतपत लिहू शकले त्याबद्दल सगळ्यांचे मनः पूर्वक आभार. यापुढेही असेच प्रेम-प्रोत्साहन-प्रतिसाद मिळत राहतील. खास बेसन-बर्फी केली आहे ती घ्यायला विसरू नका बर का. आता हॉटेलचे नेट बंड करायच्या आत पोस्टून टाकते नाहीतर वाढदिवस एकटीनेच साजरा करावा लागेल.

Tuesday, February 16, 2010

माणुसकीचे आकाश.......


' माणुसकीचे आकाश ' हे ' कुसुमाग्रजांचे ' त्यांना देवाज्ञा झाल्यानंतर आलेले पहिले पुस्तक.

माननीय ति.स्व. कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलेले परंतु अप्रकाशित असलेले बरेच साहित्य आहे. ते संकलित करून प्रसिद्ध करण्याचे कामही सुरू आहेच. १० मार्च, २००० साली आलेल्या ' माणुसकीचे आकाश ' मध्ये एकंदरीत सतरा लेख असून माननीय न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. प्रस्तावनेत ते म्हणतात, " हे पुस्तक आकाराने लहान आहे. पण, आकारसौंदर्यापेक्षा विचारसौंदर्य मनाला अधिक मोहिनी घालते. असे सॉक्रेटिसने बँक्वेट ( Banquet )- मध्ये म्हटले आहे. त्याचा अर्थ हे पुस्तक वाचताना समजेल अशी माझी धारणा आहे.' हे पुस्तक वाचताना ह्या वाक्याचा पदोपदी प्रत्यय येतो.

कुसुमाग्रजांच्या साहित्यातील महानतेचा आपण सगळेच कायमच अनुभव घेत आहोत आणि घेतच राहू. परंतु त्याव्यतिरिक्त ते कित्येक माणसांचे प्रेरणास्त्रोत, प्रेरणाशक्ती होते. मराठीतील श्रेष्ठ साहित्यिकाला दिला जाणारा, प्रतिष्ठित असा " जनस्थान पुरस्कार " व भारताच्या सांस्कृतिक व सामाजिक विकासात मोलाची भर घालणाऱ्या सहा क्षेत्रांतील नामवंतांना सन्मान म्हणून दिला जाणारा, " गोदावरी गौरव " पुरस्कार, जो चित्रपट-नाट्य, समाजसेवा, संगीत-नृत्य-ज्ञान-विज्ञान, क्रीडा-साहस, चित्र-शिल्पकला यासाठी देण्यात येतो, त्या मागची प्रेरणाही कुसुमाग्रजच होते. त्यांची या पुरस्कारांमागची भूमिकाही विनम्रतेची होती. ते म्हणत, " हा पुरस्कार नसून नमस्कार आहे. आपल्या क्षेत्रात स्मरणीय कामगिरी करून देशाच्या सांस्कृतिक जीवनाची उंची ज्यांनी वाढविली, अशा थोर श्रेष्ठांना केलेले हे कृतज्ञतेचे अभिवादन आहे. "

तळागाळातही वाचनसंस्कृती रुजावी-वाढावी म्हणून मागास भागातही बालवाचकांसाठी वाचनालये, फिरती वाचनालये, सामाजिक समस्यांचा वेध घेणारी चर्चासत्रे, व्याख्यानमाला, कविसंमेलने, विज्ञानविषयक व आकाशदर्शन, तसेच हुंड्यासारख्या समाजातील अनिष्ट रूढीला विरोध करणारे उपक्रम यांसारख्या सगळ्या कार्यक्रमांची रूपरेषाही ते स्वत:चा आखत. " जी मंडळी आज सावलीत आहेत, त्यांनी उन्हात तिष्ठत रहाव्या लागणाऱ्या लोकांसाठी काही केले पाहिजे. ज्यांचे पोट भरलेले आहे, त्यांनी ज्यांच्या ताटात काही नाही अशांच्यासाठी काही केलेच पाहिजे, ती आपणा सर्वांची जबाबदारी आहे. " असे ते मानीत.

पुस्तकाची सुरवातच, " ती सोनेरी मध्यरात्र " या लेखाने होते. त्यात कुसुमाग्रज म्हणतात, " नऊ ऒगस्ट १९४२ रोजीचा स्वातंत्र्याच्या ऐतिहासिक दिवसाचा उष:काल पाहण्याचे सदभाग्य, तोही मुंबईत पाहण्याचे भाग्य मला लाभले. मध्यरात्रीपासून मध्यरात्रीपर्यंत असा हा स्वातंत्र्यसंपादनाचा प्रवास होता. त्याकाळी मी धनुर्धारी मध्ये सहसंपादक म्हणून काम करीत होतो. नंतर पाच दिवसांनी एक अनोखा दिमाख मनाला जाणवत असतानाच पंधरा ऑगस्टचा सुवर्णदिन उगवला. देशातील कोट्यावधी लोक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण सूर्य होऊनच क्षितिजाअवर अवतरला होता. मात्र स्वातंत्र्याचा प्रमुख शिल्पकार दिल्लीतील उत्सवाकडे पाठ फिरवून, म्हाताऱ्या काठीचा आधार घेऊन बंगालमधील रस्त्यांवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकाकी वाटचाल करीत होता. ही एकच अणकुचीदार सळई वारंवार घुसत होती व रक्त काढत होती. "

" माणुसकीची भिंत " मध्ये अण्वस्त्र व त्यामुळे होणारा विनाश याचे विश्लेषण करून केवळ संस्कृतीची, माणुसकीची आणि सतधर्माची ही भिंत भक्कम व अभेद्य असेल तर हा संहार पुढे कधीच होणार नाही याची दक्षता सगळ्याच देशांनी कशी घ्यायला हवी त्याची उकल करतात. सातपुड्याच्या परिसरातील " एक प्रकाशाचे बेट " मध्ये माननीय व्यंकटअण्णा रणधीर ( आडनाव धोबी ) यांच्या महान कार्याची ओळख करून देतात तर " यशवंतराव: काही आठवणी " त माननीय यशवंतरावांची एक वेगळीच छबी पाहायला मिळते. " मातीची मागणी आकाशापर्यंत पोचविणारा महामानव "यात, पूजनीय बाबा आमटे या महान माणसाची व कार्याची ओळख व दाद देतात.

" नानासाहेब आणि नटसम्राट ", " माननीय प्रबोधनकार ठाकरे ", ठसठशीत नावाची मुद्रा लखलखणारे वसंत कानेटकर-" एकाग्र तपश्चर्येचा गौरव ", " अभिजात साहित्याकडे नेणारी पायवाट " श्री. मुरलीधर सायनेकर या अंध व्यक्तीने अतिशय एकात्म निष्ठेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही केलेला साहित्याचा व्यासंग व निर्मिती याचे भारलेपणाने केलेले वर्णन असून " सुवर्णाच्या प्रदेशात " या मुरलीधर सायनेकरांच्या पुस्तकाची प्रस्तावनाही लिहितात.

आज गेले दोन महिने जो प्रश्न ऐरणीवर आला आहे. सगळ्यांच्या हृदयात खोलवर घाव घालतो आहे तोच प्रश्न, " थांबवा ही कत्तल! " मध्ये कुसुमाग्रजांनी अतिशय मुद्देसूद व कळकळीने मांडला आहे, त्याचा परामर्ष घेताना ते म्हणतात, " शालान्त परीक्षा झाली. निकाल लागले. साधारण दहा-बरा लाख मुलं नापास होतात. म्हणजेच त्यांचे खच्चीकरण होते. प्रतिष्ठित जीवनासाठी नालायक ठरतात. भवितव्याच्या दृष्टीनं काळोखाच्या अंतहीन दरीत लोटली जातात. आणि हे सगळे कशासाठी? शिक्षणमहर्षींच्या अथवा या शासनाच्या हे ध्यानात येत नाही का? "

या पुस्तकातील सर्वच्या सर्व लेख म्हणजे त्या प्रत्येक महान व्यक्तिमत्त्वांबद्दल तात्यासाहेबांना वाटणारे आत्यंतिक प्रेम दर्शविणारे एक एक सोनेरी पानच आहे. जरूर वाचण्यासारखे व संग्रही ठेवण्यासारखे कुसुमाग्रजांचे अंत:करण उलगडून दाखविणारे सुंदर पुस्तक. ते नेहमी म्हणत, " नदीप्रमाणेच साहित्य उगमापाशी थांबत नाही. नदीप्रमाणेच आत्मतेची शीव ओलांडून ते लोकजीवनात प्रवेश करते. हा सफल प्रवेश होणे म्हणजेच जे एकाचे आहे ते अनेकांचे होते, आत्मविष्काराचे रुपांतर सामाजिक संवादामध्ये होते. " असा सामाजिक संवादच या पुस्तकांतील लेखांमुळे साधला जातो याचाच प्रत्यय वाचताना येतो.


( पुस्तकातील व प्रस्तावनेतील काही भाग येथे नमूद केला आहे. )

अननस - स्ट्रॉबेरी - चॉकलेट सुफले


जिन्नस
  • कूल व्हिप - ८ औंस (फॅट फ्री/लाईट/रेग्युलर जे आवडेल ते)
  • क्रीम चीज- ८ औंस (फॅट फ्री/लाइट/रेग्युलर जे आवडेल ते)
  • जेलो चे एक पाकीट-३ औंसाचे -अननस फ्लेवरचे ( ज्या फळाचे सुफले करणार असू त्याच फ्लेवरचे घ्यावे )
  • एक मोठी वाटी भरून अननसाचे तुकडे ( ज्या फळाचे सुफले करणार असू ते फळ - शक्यतो टीन मधले घ्यावे )
  • अक्रोड-बदामाचे तुकडे / चॉकलेट चिप्स अर्धी वाटी

मार्गदर्शन

काचेच्या भांड्यात क्रीम चीज व कूल व्हिप घेऊन एकजीव करून घ्यावे. टीन मधली फळे वेगळी काढून ठेवावीत. उरलेला रस (सिरप ) साधारण एक कप भरेल. कमी पडल्यास तितके पाणी मिसळून गरम करावे. ( एक कपापेक्षा जास्त भरल्यास दुसऱ्या कपात काढून ठेवावे. व थंड पाणी मिसळताना यातच भर घालून मिसळावे ) किंचित बुडबुडे आले की लागलीच जेलो ( जिलेटीन ) टाकून संपूर्ण विरघळेपर्यंत ढवळावे. साधारण दोन मिनिटातच विरघळते. गॅसवरून उतरवून त्यात एक कप थंड पाणी घालून ढवळून कोमट (रूम टेंपरेचर ) आले की क्रीम चीज व कूल व्हिपच्या मिश्रणात मिसळावे. वेगळी काढून ठेवलेली फळे त्यात मिसळून सहा तास फ्रीजमध्ये सेट होण्यास ठेवावे. वाढण्यापूर्वी वरून बदाम-आक्रोडचे तुकडे व ताज्या फळाने सजावट करावी. ताजे फळ नसल्यास टीन मधलेच वापरावे. तसे करावयाचे असल्यास मिश्रणात फळे मिसळण्यापूर्वी थोडी बाजूला काढून ठेवण्यास विसरू नये. वाढताना थंड वाढावे. लहान मुलांची बर्थ डे पार्टी असो की मोठ्यांचे गेट-टू-गेदर असो, सगळ्यांना आवडेल असेच हे सुफले.

टीपा

आपण जे फळ घेणार असू त्याच फ्लेवरचे जेलो घ्यावे. अननस असेल तर अननसाचे, चॉकलेट असेल तर चॉकलेटचे. आपल्याला जर साधे ( प्लेन ) जिलेटीन वापरायचे असेल तरीही चालू शकेल. कृतीत काहीच फरक नाही. ताजी फळेच व साधे जिलेटीन वापरणार असू तर जमल्यास जिलेटीन तयार करताना त्या त्या फळाचा रस घ्यावा. यामुळे चव नक्कीच वाढते. सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये किमान सहा तास ठेवणे गरजेचे आहे. घाई करून काढू नये. संत्री, अननस, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, पीच, आंबा, इत्यादींचे जास्त चांगले लागते. सजावट करताना चॉकलेट सुफले केल्यास वरून चॉकलेट किसून भुरभुरावे व छोटे तुकडेही वापरावे. अतिशय आकर्षक दिसते. लहान मुलांना खूप आवडते. यात अक्रोड-बदाम घालू नयेत. पूर्णपणे फॅट फ्री बनवता येत असल्याने मनसोक्त खाता येईल. चवीत अजिबात फरक पडत नाही. हमखास यशस्वी , अजिबात न चुकणारे व वेळखाऊ नसलेले सुफले.

Monday, February 15, 2010

आजी, सून आणि बागबान.........

( वय साधारण ८२-८३ असावे, आजी एकटीच गॅलरीत उभी राहून विचार करतेय........ )

गेले किती दिवस सांगतेय, माझी चप्पल अगदीच झिजलीये. तळव्यांना सहन होत नाही तिचा रखरखीत स्पर्श आताशा. जाऊन नवीन चप्पल आणूयात. पण कोणालाही वेळ नाही. एक आठवडा उलटला सूनबाई माझ्याकडून चपलेसाठी पैसे घेऊन गेलीये पण अजून चप्पल काही आली नाही. ( आजोबांच्या फोटोसमोर जाऊन उभी राहते )
" पाहताय ना तुम्ही? आपल्याकडे सुटीला आले की दरवर्षी नवीन बूट-चप्पल, साड्या-शर्ट-पॅन्ट, धान्यधुन्य-वाळवणं, हळद-तिखट-मसाले, लाडू.... डबेच्या डबे भरून जात होते. अहो रागावून कशाला पाहताय? मी काही काढून दाखवत नाहीये की हिशेबही घालत नाहीये. पण आईकडून चपलेसाठी पैसे कसे घेववतात....., जाऊ दे. अडचण आहे त्यांची. आपणच समजून मदत करायला हवी. आता हेच पाहा ना, मी दिवसाकाठी तीन पोळ्या खाते. घरात आम्ही सात माणसे. ते पिल्लू तर तान्हेच आहे म्हणा अजून. आता माझ्या म्हातारीच्या तीन पोळ्या जडच की हो. त्यातून त्यांची अडचण. पोळीवाली व भांडीवालीचे पैसे मी द्यायचे असा फतवा जारी केला चार महिन्यांपूर्वी आणि हा आपला लेक, नंदीबैल आहे नुसता. अगदी न चुकता दोन तारखेला पोळीवालीचे व भांडीवालीचे पैसे वसूल करतो माझ्याकडून. देवपूजेला फुले मला लागतात मग त्याचे पैसे मीच द्यायला हवे, बरोबरच आहे हो. चांगल्या संस्कारातली, श्रीमंत घरातली सून हवी होती ना आपल्याला. आता दाखवतेय ती संस्कार आणि मनाची श्रीमंती. "

" तुमचे बरं चाललंय ना वर? का तिथेही आहेतच अडचणी? एकाला दोघे होतो तेव्हा निदान एकमेकांसाठी जगावेसे वाटत होते. तुम्ही गेलात, मी राहिलेय. ह्म्म..... देवा हातीपायी धड ने रे बाबा. आत्ता आहे तर पुढच्या क्षणी नाही. ऐकशील ना तेवढं माझं? "( सुस्कारा टाकते...... )
-------------------------------------------------------------------------------------
( आठ दिवसांनी, संध्याकाळची दिवेलागणीची वेळ....... आजी मुलाला हाक मारतेय..... )

" अरे, ऐकतोस का? "
" काय आहे गं आई? सारखं तुझं काहीतरी चालूच असतं? आता आणखी काय हवंय तुला? सांग पटकन, कामे पडलीत खूप. "
" हो रे बाबा. खरेय तुझे. पण, गेले आठ-दहा दिवस रोज ताप येतोय. १०० च्या पुढे जातोय पुन्हा उतरतोय. कोरडा खोकलाही वाढलाय, छातीत-पोटात दुखतं रे खोकून खोकून. डॉक्टरकडे जायला हवे. नेतोस का?"
" अग, कशाला डॉक्टरकडे जायला हवे. काही झालेले नाही तुला. उगाच उठसूट काय डॉक्टर-डॉक्टर करत असतेस. क्रोसीन घे, होशील बरी. "( निघून जातो )
" अरे निदान आईच्या अंगाला हात लावून ताप पाहायचास तरी. सूनबाई आठ दिवसांपासून सारखी क्रोसीन देऊनच झोपवतेय हो. आई गं.......सहन होत नाही..... " ( आजोबांच्या फोटोकडे पाहत गरम वाफारे येत असलेल्या डोळ्यातून झरणारे मनाचे कढ असह्य होऊन केविलवाणी हाक मारते..... ) " अहो, तुम्ही जरा जवळ बसा नं माझ्या. पूर्वी कसे मी आजारी असले की बसायचात. वाचून दाखवायचात, थोपटून झोपवायचात. घशाला कोरड पडलीये हो माझ्या. पाणी कुठे गेले...... पाणी, पाणी....... " ( ग्लानी येऊन आजी तशीच कण्हत पडून राहते )
------------------------------------------------------------------------------------

( दहा-बारा दिवसांनी सकाळी सकाळी सून व मुलगा बोलत असतात )
" अहो, उद्या त्यांना भावोजींकडे द्या पोचवून. जरा मेली सुटका नाही. सारखा जाच चालू. कितीही करा तक्रारी आहेतच. "
" अग, काहीतरीच काय बोलतेस? महिना झाला तिला ताप येतोय. निदान ताप तरी उतरू देत, मग पोचवतो. क्रोसीन देते आहेस ना?"
" चांगल्या ढीगभर क्रोसीन खाऊन झाल्यात. अहो, काही ताप-बीप आलेलाच नाही तर उतरणार कुठून? पांघरूण घेऊन पडून राहायचे नुसते दिवसभर, तापाच्या नावाखाली. एक काम करायला नको. आजकाल देवाची पूजाही करत नाहीत.म्हणतात, बसवत नाही गं मला. ऐका. आता दिवसभर लोळायची सवय लागलीये मग पूजेसाठीही बसवत नाही हो त्यांना. ते काही नाही, उद्या पहाटेच निघा म्हातारीला घेऊन आणि द्या पोचवून. "
" अग पण ........ "
" अग नाही आणि पण नाही...... उद्या म्हणजे उद्याच.... कळलं?"
( फणकाऱ्याने निघून जाते. )

" आई, झोपली आहेस का? मी काय म्हणत होतो......... ऐकतेस ना?"
" हो, ऐकतेय मी. काय सांगत होतास? "
" दादाकडे नेऊन घालतो तुला. बरेच दिवस झाले गेली नाहीस ना. उद्या पहाटेच निघू. तयारी करून ठेव. उगाच उशीर नको. "
" अरे, इतकी काय घाई आहे? जरा ताप तरी हटू दे, खूप अशक्तपणा आलाय. प्रवास झेपायचा नाही मला. आणि उद्या तर सणाचा दिवस. नातू-पणतू बरोबर राहू दे हो. ती अगदीच हटून बसली असेल तर परवा नेऊन घाल, पण उद्या नको हो. "
( आई-लेकाचे बोलणे ऐकत उभी असलेली सून तरातरा येते....... )
" अहो, सण काय रोजच चालू असतात. ते काही नाही, उद्याच नेऊन घाला. काय? यात बदल होणार नाही सांगून ठेवत्येयं. "
(तणतणत निघून जाते. आजी डोळ्यात जीव एकवटून मुलाकडे पाहत राहते. मुलगा नुसतेच खांदे उडवतो आणि तोही निघून जातो. आजीच्या डोळ्यात पाणी येते.... पाहता पाहता आजी हसू लागते. हसता हसता आजोबांकडे पाहून म्हणते....... )
" चला, गाशा गुंडाळायला हवा हो आता. नाहीतर ही उद्या पहाटे माझ्या हाताला धरून बाहेर काढायला कमी करणार नाही. तुम्ही पण चला माझ्याबरोबर. उगाच या घराला तुमच्या फोटोचेही ओझे नको. जिथे मी तिथे तुम्ही. "
( बॅग भरते. फोटो काढून तोही बॅगेत भरते. रात्री पुन्हा क्रोसीन देऊन आजीला झोपवतात. पहाटे सहालाच आईला घेऊन मुलगा निघत असतो........ )

" सूनबाई, येते हो. जपून राहा. "
" येतो गं मी आईला पोचवून. उद्या रात्री येईन परत. "( दोघे जातात. )
-----------------------------------------------------------------------------------

( दुसरा दिवस उजाडतच असतो आणि फोन वाजतो...... नातू उठतो. पहाटेच्या सहा वाजता कोण फोन करतेय..... वैतागून फोन घेतो. )

" कोण अवी का? अरे, मी काकू बोलतेय. "
" काकू, अग इतक्या पहाटे फोन केलास? काय झाले? सगळे बरे आहेत ना? आणि बाबा तर आजीला घेऊन तुमच्याकडेच आलेत की."
" हो हो, तू ऐक आधी मी काय सांगते ते. आजींना बहुतेक ऍटॅक आलाय. पहाटे चारला बाथरुमला गेल्या आणि तिथेच डोके ठेवून पडल्या. आधी कळलेच नाही आम्हाला. बराच वेळ झाला बाहेर का आल्या नाही म्हणून पाहिले तर आजी बेशुद्ध झालेल्या. आता हॉस्पिटल मध्ये नेलेय. कळवते पुन्हा डॉक्टर काय म्हणतात ते. तुझ्या आईला सांग हे सगळे. ठेवते रे. "
" अग आई, आई..... ऐकलेस का? " ( आई आणि त्याची बायको येतात...... )
" काय झाले रे? पहाटे पहाटे कशाला बोंबलतो आहेस? आज जरा झोपावे म्हटले....... त्यांची नाही तर याची कटकट.... काय झालेय इतके आग लागल्यासारखे ओरडायला? "
" अग, आजीला ऍटॅक आलाय बहुतेक. तरी मी तुला सांगत होतो, तिला तापाची पाठवू नकोस. चक्क हुसकलीस आजीला तू घराबाहेर. त्यात लाल डब्याने बाबा घेऊन गेला. ती लाल डब्बाही नेमकी दुपारी बाराच्या उन्हात फेल झाली. दोन तास आजी तळपली बिचारी. महिनाभर क्रोसीन देऊन झोपवलीत तिला. आता पाहिले ना काय झाले ते. आला ना ऍटॅक."
( त्याला मध्येच थांबवत ..... ) " काही झाले नसेल रे इतके. जरासे छातीत दुखले असेल. उगाच सगळ्यांना घाबरवून सोडायचे. सोडतील घरी त्यांना दुपारपर्यंत. तू तणतणू नकोस. झोप जरा. "

( जाऊन झोपते. नातू अस्वस्थपणे फे~या घालत राहतो. सकाळ होते. अकराला पुन्हा फोन वाजतो......धडधडत्या मनाने नातूच फोन घेतो.... )

" हॅलो.... कोण, कोण बोलतेय? "
" मी बोलतोय......, बाबा."
" बाबा, बाबा...... आजी ... आजी, कशी आहे आता? डॉक्टर काय म्हणाले? घरी कधी पाठवणार आहेत? मी निघू का लागलीच? "
" नको. तू निघू नकोस. आता कशाचाही उपयोग नाही. आई गेलीये. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर पुन्हा एक ऍटॅक आला आणि गेलीच. आम्हीच इथून दुपारी निघू तिला घेऊन. ऐकतोस ना? आई, गेलीये. हिला निरोप दे. संध्याकाळी बरीच गडबड होणार आहे. "

( बाबा फोन ठेवतो. नातू वेड्यासारखा तसाच फोन हातात घेऊन उभा असतो, तोच आतून आई येते....... )

" अवी, कोणाचा फोन होता? आणि असा काय शॉक लागल्यासारखा उभा आहेस? अरे बोल की काहीतरी. फोन कोणाचा होता? "
आईकडे वळून त्वेषाने , " तू, तू मारलीस तिला. हाताला धरून बाहेर काढलीस तिला, तिच्याच घरातून. विनवून सांगत होती, अग, परवा जाईन हो मी. नको मला बळजोरीने पाठवूस. पण नाही. कैदाशीण आहेस नुसती. माझ्या आजीला तू मारलीस. " ( मोठ्याने हंबरडा फोडून रडू लागतो. नातसून तिथेच भिंतीशी बसकण मारते आणि असहायपणे रडू लागते. अचानक आजीच्या जाण्याने सून एकदम घाबरून जाते. मला काय स्वप्न पडले होते का असे होईल म्हणून...... आता हा पोरगा जर हे असे बडबडला सगळ्यांच्या समोर तर जोतो शेण घालेल तोंडात माझ्या......, या भीतीने एकदम कोलमडते आणि तीही जोराजोरात रडू लागते. )

-----------------------------------------------------------------------------------

( आजीला जाऊन सहा महिने होऊन गेलेत. टीवीवर बागबान लागतो. कितव्यांदा कोण जाणे. लागलीच आई टीवीसमोर हातात मोठ्ठा टॉवेल घेऊन बसते. एकटक सिनेमा पाहू लागते आणि एकीकडे तोंडाने बडबड चालू....... )

" बाई बाई, काय जमाना आलाय? किती नालायक मुले आहेत ही. आई-बापाला म्हातार वयात वेगळे केलेन. आता बापाचा चष्मा फुटला तर नको का नवीन आणून द्यायला? त्यांचे कर्तव्यच नाही का? एवढे जन्माला घातले, शिकवले, वाढवले, लग्नेकार्ये केली. आता आईबापाला सांभाळायचे काम नाही का त्यांचे? ( उमाळ्यावर उमाळे येऊन रडते.... टॉवेलने सारखे डोळे पुसते. पुन्हा रडते..... ) कुठे फेडतील ही पापं. देवा असल्या नालायक मुलांना चांगली शिक्षा कर रे. मेल्यांचं वाट्टोळं होऊ दे. आईबापाला घराबाहेर काढतात........, मोलकरणीच्या खोलीत झोपवतात. खायला घालत नाहीत. निदान जनाची तरी लाज ठेवाल का नाही. "

( बडबड-रडारडीतही एकीकडे कान सगळे स्वयंपाकघरात लागलेले......... नातवाच्या रडण्याचा आवाज येतो तशी, सुनेला हाक मारते...... )

" अग, का गं तो रडतोय? मी काय म्हणते, तू त्याला ग्लास भरून दूध देतेसच कशाला? नास नुसता. मग त्याने टाकले की तुला मटकावायला आयतेच मिळतेय की. सासू-सासरा आहे बरं का अजून जिवंत. जरा त्यांच्या तोंडात घास घाला आधी मग गिळा स्वत: ताटं भरभरून...... ( पुन्हा सिनेमात गुंगून....... ) बघा हो, आईला मायाच फार लेकराची. गेली बिचारी डबा घेऊन...... आणि हा करंटा बाईलबुद्धी मुलगा, बायकोच्या नादाने आला तणतणत आईला दोष द्यायला......... देवा! अरे किती वाईट दिवस दाखवतोस. त्या मेल्या सुनेला इतक्या वर्षात सासूची जराही माया कशी नाही लागत म्हणते मी ........... खरेच, कलियुग आहे हो हे कलियुग."

तिची सून अवाक होऊन ऐकत राहते. " किती दुटप्पी वागणे आहे सासूचे, आजींना दोन वेळचे जेवण देतांनाही कटकट करणारी. आदल्या रात्रीच्या भाताचे तडतडीत ढेकूळ त्या माउलीच्या ताटात आपटणारी ही बाई दर वेळेला तो बागबान पाहून अशी ढसढसा रडतेय आणि आम्हाला बोल लावतेय.. ......." हळूहळू गालावर अश्रू ओघळतात.

तशीच धावत आजींच्या फोटोपुढे जाऊन उभी राहते........ ओठावर ओठ गच्च दाबून मुकपणे रडत राहते. अचानक नातसुनेला भास होतो. जणू आजी हसून तिला सांगतेय, " नातसुने सांभाळ गं बाई. दुसरा अध्याय सुरू झालाय बरं का. रोल मात्र उलटे आहेत हो यातले. अग मी त्र्याऐशीं वर्षाची म्हातारी आयते बसून गिळत होते. आजारपणाचे ढोंग करून पडून राहत होते-कामे टाळत होते. पण तुझी सासू मात्र साठाव्या वर्षीच म्हातारी झालीये हो. तुला सुटका नाही गं बायो, किमान अजून तीस वर्षे तरी तुला सुटका नाही. बागबानची सीडी घासून गुळगुळीत झाली तरी हिचे मगरीचे अश्रू थांबणार नाहीत. तेव्हा स्वतःला सांभाळ पोरी स्वत:ला सांभाळ. "

Sunday, February 14, 2010

चंदेरी दुनियेत.....

सतत अत्यंत प्रेमळ आईच्या, ओढग्रस्तीने गांजलेल्या, मुलांसाठी वाटेल तो अन्याय व त्याग करणाऱ्या भूमिकेत पाहिलेल्या व मनात आईच्या-आजीच्या जागी अढळ स्थान मिळवलेल्या लीला चिटणीस यांचे, ' चंदेरी दुनियेत ' हे पारदर्शी आत्मचरित्र वाचले. सिनेमात काम करणे तर फार दूरची बाब परंतु कुलीन-घरंदाज स्त्रियांना सिनेमाला जाण्याचीही मुभा नसलेल्या काळात स्वत:च्या पोरांच्या तोंडात घास पडावा-अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सिनेमात काम करण्याचा एक धारिष्ट्याचा निर्णय घेऊन, स्वत:तील अभिनय सामर्थ्याने व प्रचंड मेहनतीने सिनेमासृष्टीत मानाचे व उच्च स्थान मिळवणाऱ्या अभिनेत्रीची ही आत्मकथा.

हे कथन अतिशय प्रामाणिक-प्रांजळ व काहीसे बेधडक तरीही भावणारे आहे. ९ सप्टेंबर, १९०९ रोजी धारवाड येथे जन्मलेल्या लीला चिटणीस मुळातच स्वत:च्या लहरीनुसार वागणाऱ्या, हेकट-हेकेखोर होत्या. मनस्वी बंडखोर व भावनेच्या भरात वाहून मनमानेल तसे करण्याच्या-वागण्याच्या स्वभावामुळे त्यांना अतिशय त्रास सहन करावा लागलेला. चित्रपटसृष्टीतील पहिली उच्चशिक्षित नटी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या लीला चिटणीस, तिथल्या दिखावू-बेगडी चकचकाटाला भुलून व तारुण्याच्या उन्मादात-मोहाला बळी पडून हातून घडलेल्या अनेक चुकीच्या निर्णयांमुळे पुढे तहहयात झालेल्या फरपटीचे सत्यकथन करतात.

आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या चिटणिसांशी लहान वयातच लग्नाचा आततायीपणा करतात. त्यावेळी चिटणिसांची समाजातील प्रतिमा, प्रार्थना समाजाचे मोठे कार्य, सतत अवतीभोवती असणारे उच्चविचारसरणींचे-बुद्धिमान-लोक यामुळे भारून जाऊन घेतलेला हा निर्णय पुढे चिटणिसांचे घराप्रती केलेले संपूर्ण दुर्लक्ष व लागोपाठ लादलेली तीन बाळंतपणे यामुळे काहीशा हताश होतात. कोसळतात. आर्थिक ओढाताण वाढू लागल्याने केवळ आपल्या मुलांसाठी घराबाहेर पडून अर्थार्जन करण्याचा निर्णय घेतात आणि अचानक चित्रपटसृष्टीत प्रवेश करतात. या मोहमयी दुनियेत मेहनतीने, अभिनयक्षमतेच्या व जिद्दीच्या जोरावर उत्तम यश मिळवतात. भूमिकेत झोकून देऊन काम करण्याची वृत्ती व मुलांच्या भवितव्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी यामुळे काही काळ या चित्रनगरीच्या शिखरावरही पोचतात. परंतु मुळचा बेबंद व मोही स्वभाव इथेही घात करतो. स्वैर वागण्याचे परिणाम सतत भोगावे लागत असूनही त्यावर मात करता येत नाही. आपण आई आहोत आणि आपल्या मुलांसाठी अक्षरश: स्वत:च्या जीवाचे रान करणाऱ्या या गुणी अभिनेत्रीचे हे आत्मचरित्र.

कितीही बंडखोरी-स्वैरपणा असला तरी माझी मुले हेच माझे विश्व आणि माझा प्राण फक्त त्यांच्यासाठीच आहे हेच या साऱ्या कथनातून जाणवत राहते, भिडत राहते. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणार्‍या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता. क्षणिक मोहाच्या-ऊर्मीच्या मागे जाणाऱ्या, सातत्याने मोहाला बळी पडणाऱ्या लीला चिटणीस, मुलांच्या अव्याहत काळजीने, त्यांच्या भावनिक समस्यांमुळे हवालदिल होत असत. त्याचे केलेले अतिशय अकृत्रिम वर्णन मन हेलावून टाकते. चित्रपट सृष्टीतील अनेक अनुभव, मानहानी, मोठ्या मोठ्या नावाजलेल्या लोकांचे खरे- अतिशय घाणेरडे रूप, पुरषी सत्ता, स्त्रियांची फरफट-शोषण, बळजोरी याचे सत्य कथन केले आहे. बडी बडी, आदराचे स्थान असलेली माणसे किती नीच पातळीचे वर्तन करतात हे वाचून धक्का बसतो.

चिटणिसांशी घेतलेल्या घटस्फोटानंतर बरेच चढउतार - अध:पतन होऊन शेवटी गजानन जहागिरदारांबरोबर जुळलेली मैत्री व लग्न करण्याची इच्छा व यामुळे बाबूराव पेंढारकरांच्या पुरषी अहंकाराला बसलेल्या धक्क्याने त्यांनी लीला चिटणीस यांच्याशी केलेले असभ्य वर्तन. जणू काही त्या त्यांची मालकीची-हक्काची वस्तू असल्याची जाणीव अतिशय पाशवीपणे करून देणे.....याने त्या हताश होतात. कोलमडतात. शेवटी स्त्री कुठल्याही काळातली व कुठल्याही क्षेत्रातली असू देत, हे चुकत नाहीच.

लीला चिटणीस यांचे वडील त्याकाळी गाजलेल्या नाट्यमन्वतर या मराठी नाट्यसंस्थे मध्ये होते. लीला यांनी हास्यप्रधान चित्रपट, ' उसना नवरा ' यात काम केले. नंतर काही काळ स्टंट अभिनेत्रीच्या रूपात व एक्स्ट्रॉ म्हणूनही कामे केली. लवकरच मास्टर विनायक यांच्याबरोबर, ' छाया- साल, १९३६ ' व प्रभात चे केशव नारायण काळे यांच्याबरोबर, ' वहाँ -१९३७ ' आणि सोहराब मोदी यांच्याबरोबर, ' जेलर -१९३८ ' या त्यावेळी टॉप वर असलेल्या कलाकारांबरोबर संधी मिळाली. १९३९ साली लीला चिटणीस यांना अमाप प्रसिद्धी मिळाली ती विष्णूपंत पागनीस यांच्या जोडीने पागनीसांची बायको म्हणून ' संत तुलसीदास' यातील कामामुळे. पुढे अशोक कुमारबरोबर त्यांची जोडी अतिशय गाजली. लागोपाठ आलेल्या, ' कंगन, बंधन व झुला ' या तीन सिनेमांनी हॅटट्रिक करून त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवले. लीला चिटणीस यांनी जवळपास शंभरएक चित्रपट केले.

अशोक कुमार यांनी त्यांच्यातील अभिनयकौशल्याची अतिशय तारीफ केलीच व अनेकांना त्यांचे नावही सुचविले. डोळ्यांनी कसे बोलायचे- एखाद्याच्या मनापर्यंत कसे पोचायचे हे कसब मी लीलाकडून शिकलो असेही अशोककुमार नेहमी म्हणत. लवकरच हे सारे वलय संपले. आणि हळूहळू लीला चिटणीस आईच्या भूमिकेत आल्या आणि तिथेच स्थिरावल्या. काला बाजार मधील त्यांची भूमिका- ' ना मैं धन चाहूं ना रतन चाहूं ' आणि साधना मधले, ' तोरा मनवा क्यों घबरायें रामजी के द्वारे ' ही भजने आजही तितकीच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आईच्या भूमिका अजरामर आहेत- अशी आई पुन्हा होणे नाही. स्वत: तरुण असतानाच ज्यांच्याबरोबर नायिकेची भूमिका केली त्यांच्यांच आईचे काम अतिशय ताकदीने वठवले.

जीवनात यश-अपयश, मानहानी व बेंबदपणा पुरेपूर जगलेल्या या गुणी अभिनेत्रीचे १४ जुलै, २००३ रोजी डॅनबरी-कनेक्टीकट येथे नर्सिंग होममध्ये निधन झाले. आयुष्याची शेवटची वर्षे अतिशय एकटेपणा व विकल मनस्थितीत गेली. आपल्या जीवनाचे सारसंचित- टोकाचा विरोधाभास दाखवणारे लीला चिटणीस यांचे, ’ चंदेरी दुनियेत ’ हे जीवनचरित्र मनाची पकड घेणारे आहे. या मोहमयी दुनियेची वाट किती निसरडी व घातक आहे याचे यथार्थ चित्रण. कुठलाही आडपडदा न ठेवता स्वत:च्या जीवनातील अतिशय खाजगी व उन्मादाने भरकटलेल्या घटना लीला चिटणीस यांनी तितक्याच मनस्वीपणे मांडल्यात. स्वत: केलेल्या अक्षम्य चुकांचे अजिबात समर्थन त्यांनी केलेले नाही. चरित्र वाचून संपल्यावरही माझ्या मनात त्यांची, ' आईची त्यागग्रस्त छबीच ' फक्त तितक्याच भारलेपणाने उरलेली आहे ह्यातच त्यांच्यातील ’ आईची ’ ताकद दिसून येते.

Wednesday, February 10, 2010

हिमाच्छादित नायगारा - अविस्मरणीय अनुभव - भाग २


जड झाले ओझे.....

पृष्ठभाग गोठलेली नायगारा नदी




कॅनडा साईड-नायगारा फॉल

अमेरिकन साईड - नायगारा फॉल






केव्ह ऑफ द विंड - अमेरिका साईड







जर्नी बिहाईंड द फॉल्स - कॅनडा साईड





रेनबो ब्रिज

हिमाच्छादित नायगारा - अविस्मरणीय अनुभव

इथे आल्यापासून पाच वेळा नायगारा फॉल्सला गेलो. पण प्रत्येक वेळी समरमध्येच. मे-जून-जुलै-ऑगस्ट, या प्रत्येक महिन्यातील सृष्टीचे बदलते रंग आणि नायगारा फॉल्सचे दृश्य मन-डोळेभरून साठवून घेतले. कितीही वेळा हे पाहिले-अनुभवले तरीही तृप्ती होतच नाही. समाधी लावून तासनतास बसून राहावे. मिशिगन मध्ये आल्यापासून घोकत होतो, एकदातरी जाने-फेब्रुवारी महिन्यातला संपूर्ण हिमाच्छादित नायगारा आणि नायगारा नदी-परिसर पाहायचेच. आमच्यापासून कॅनडा बॉर्डर तासभर अंतरावर. तिथून पुढे साधारण तीन-साडेतीन तासात नायगारा. परंतु २००८ मध्ये एका मागोमाग सात हिमवादळांनी जबरी दणका दिल्याने आम्ही थोडे मागे हटलो. २००९ मध्येही थंडीचा कहर होताच, योग जुळून आलाच नाही.

यावर्षी मात्र अगदी वाटेल ते झाले- अतिरेक स्नो होऊ देत, आपण गोठून गेलो तरी चालेल पण जायचेच असा निश्चय केला होता. पहिला प्रयत्न जानेवारीच्या तिसऱ्या शनीवारी केला पण फसला. साडेचारचा गजर लावला, उठले. जरा पाच मिनिटे पडावे म्हणून... जो डोळा लागला ते डायरेक्ट आठच. काय हे, आजवर तर असे कधीच झाले नव्हते. शी.... अगदी जीवाला चुटपूट लागली. दिवसभर नवऱ्याने चिडवून घेतले. पण त्यादिवशी गेलो नाही हे बरेच झाले. खूप वारा आणि ढगाळ हवा झाली होती दुपारनंतर. मग शेवटचा शनिवार तरी गाठावा पण हवामान खात्याने पुन्हा जाऊ नकाचा इशारा दिला. वाटले आता यावर्षीही होणारच नाही की काय अशाने शेवटी सारा स्नोही जाईल वितळून ही भीती सतावू लागली. आता शेंडी तुटो वा पारंबी, जायचे म्हणजे जायचेच असे म्हणत फेब्रुवारीच्या पहिल्या रविवारी सकाळी आठ वाजता घर सोडले. बरोबर १२ वाजून ३५ मिनिटांनी लांबून फॉलचे पहिले दर्शन घेतले. गाडी पार्किंग लॉट मध्ये लावण्याइतकाही दम निघेना. काय काय पाहावे आणि किती पाहावे.... हे सारे अवर्णनीय आहे. डोळ्यांचे पारणे फिटले. अविस्मरणीय अनुभव.

निघालो तेव्हा पारा ११ फॅरनाईट दाखवत होता. प्रत्यक्ष फॉलवर २१ तापमान होते. १५ ते २० माईल्स या वेगाने वारे वाहत होते. स्वतःचे वजन जास्ती का अंगावर चढवलेल्या कपड्यांचे असा प्रश्न पडावा इतके- चार चार लेअर्स, दोन दोन सॉक्स- हातमोजे, टोपी-कानाचे आवरण-मफलर आणि खूप जाड कोट घालूनही थंडीचा तडाखा जाणवत होताच. तरीही आम्ही चार तास फॉलवर होतो. पाय निघतच नव्हता तिथून. फोटो -चित्रफिती घेतल्याच आहेत. तुम्ही प्रत्यक्ष पाहाच.


काचेची झाडे


आमच्या समोरच यावरील गोठलेल्या काही तारा कडकड आवाज करत कोसळल्या



तुषारांनी भिजलेली

चकाकणारे लोलक



नायगारा नदी - वरून वाहात येणारी

वरचा किनारा-तुषार-दूरवर दिसणारा रेनबो ब्रिज व नायगारा नदी
(आवेगाने कोसळून काहिशी संयतपणे वाहणारी -सध्या गोठलेली )

कोसळती हिम-जलधारा

नायगारा नदीचे रूंद पात्र

क्रमश:
Camera: Nikon D80 & Sony Cyber-shot 7.2mp