जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, April 29, 2009

अहाहा!!! वासानेच मन वेडे झाले .


स्थळ: मुंबई विमानतळ, रात्रीचे बारा वाजत आलेत. नुकतेच आम्ही एकूण तीस तासाच्या प्रवासातून सुटलो आहोत. सगळ्या प्रकारच्या प्रदूषणाने जोरदार हल्ला बोल केला असला तरी आम्हाला मायदेशात आल्याच्या आनंदापुढे तो जाणवतही नाहीये. तीच चिरपरिचित ओळखीची हवा, हॉर्नचे, माणसांच्या जोरजोरात ओरडण्याचे आवाज, मुख्य म्हणजे जिकडेतिकडे माणसेच माणसे. हेच अंगात भिनलेले, हवेहवेसे चित्र. पटकन पासपोर्टावर छप्पे मारून घेतले. त्या ऑफिसरशी मराठीतून बोलण्याचा आनंद घेतला. पुढे सामानाच्या पट्ट्याकडे जायचे म्हणून वळलो तोच नवऱ्याने मी आलोच तू जा तिकडे म्हणून कलटी मारली. मला काही बोलायची संधी देता तो गुल झाला.

मी सामानाच्या पट्ट्याकडे आले. नुसता सावळा गोंधळ माजलेला पण मला अतिशय छान वाटत होते. मी माझ्या घरी आले होते. माझ्या प्रिय घरी. एक बॅग काढली ओढून तेवढ्यात नवरा आला. " अरे कुठे गेला होतास? बॅग्ज आल्यात बघ. " इति मी. नवरा एकदम खुशीत होता. बॅग्ज काढल्या आणि निघालो कस्टम्सकडे तेव्हा म्हणाला, " अग बाबांना फोन करून आलो. आम्ही उतरलो आहोत. तासाभरात पोचतो घरी. तुम्ही लागा बंदोबस्ताला. "

सगळे सोपस्कार पटापट पार पडले. असे पण अमेरिकेवरून येणारे लोक हे कस्टम्सच्या लोकांना फारसे दखल घेण्यासारखे नसतातच. एकदा तर आम्हाला ग्रीन चॅनल मधून सरळ बाहेर सोडले होते. मित्राने पाठविलेली गाडी होतीच बाहेर उभी. लागलोही रस्त्याला. तीन वर्षात काय काय बदलले आहे ह्याची नोंदणी आणि काही आठवणी ह्यात घर आलेसुद्धा.

माझे आई-बाबा वाट पाहत उभे होतेच खिडकीत. घरात आलो, भेटलो दोघांनाही, आईने जवळ घेतले अन जे भरून आले ते बरसल्यावरच थोडे कमी झाले. मग घरभर फिरून पाहिले. तोच नवऱ्याने विचारले, " बाबा, आणले ना?" त्यावर बाबा म्हणाले, " अरे जय्यत तयारी आहे. चला हातपाय धुऊन घ्या. " मी अजूनही गोंधळलेली. आई अन बाबा हसत होते.

हातपायतोंड धुतले अन डायनिंग टेबलाशीच गेलो. पाहते तो काय, गरम गरम पावभाजी, मसाला पाव कांदा असे पान वाढलेले. " आता कळाले का मी उतरल्या उतरल्या कलटी का मारली होती ते. " इति नवरा. नवऱ्याचा फोन आल्या आल्या बाबांनी शिवसागरला फोन करून पावभाजी मागविली होती. त्यानेही एवढ्या रात्री घरपोच पाठविली होती. अहाहा!!! वासानेच मन वेडे झाले. रात्री दोन वाजता आम्ही दोघांनी सणसणीत तिखट, मनापासून बटर मारलेली पावभाजी खाल्ली तेव्हा कुठे जीव शांत झाला. आता महिनाभर नुसती धमाल.

8 comments:

  1. सुस्वागतम.. खुप दिवसांनी परत आलात वाटतंय!

    ReplyDelete
  2. विमानतळावर उतरल्या उतरल्या एवढे लिहायला कुठले जमतेय? हा अनुभव गेल्या वर्षी ऒक्टोबरमध्ये आलो ना तेव्हाचा. मन सारखे मुंबईत धावते. आज पुन्हा एकदा फेरफटका मारून आले म्हणून ही पोस्ट.

    महेंद्र, आपाल्या स्वागतासाठी धन्यवाद.पुन्हा येऊ तेव्हासाठी आहेतच ते. नागपूरचेही काही लागेबांधे, टाकेन कधीतरी.

    ReplyDelete
  3. addhIch shivsagarachya pavbhajicha phoTo , var itke varnan! kaa jaLavataay !! :((

    1.5 varsh indiala jau nahi shakle.. hopefully lawkarch yeil to diwas! :)

    ReplyDelete
  4. अग भाग्यश्री लवकरच येणार तो दिवस नक्की. प्रतिसादाबद्दल आभार.

    ReplyDelete
  5. हे...भारी..पाव भाजी ला तोड नाही...
    माझी ताई जेव्हा आली त्यावेळी आम्ही भेळ घेउन गेलो होतो विमानतळावर..

    http://www.pune-marathi-blog.blogspot.com/

    ReplyDelete
  6. ओंकार धन्यवाद. भेळ...मस्त. ताई एकदम खूश झाली असेल ना?

    ReplyDelete
  7. mast ch lihilay..... 1dum nostalgic zalo :D

    ReplyDelete
  8. प्रसन्न धन्यवाद.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !