जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, April 8, 2009

सांग सांग, माझे नाव सांग?

काल दिवसभर डोकं अगदी भणभणून गेले होते. सकाळी उठल्यापासून फक्त एकच भुंगा लागला होता. त्याचे कायझालं, चारपाच वर्षांपूर्वीचे संक्रातीनिमित्ते भरविलेल्या फोटोग्राफी प्रदर्शनातले नवऱ्याचे फोटो पाहत होते. काहीअप्रतिमच आहेत. चाळता चाळता ग्रुप फोटो दिसले, त्यात मैत्रिणीचा छोटा मुलगा एका फोटोत दिसला. अग बाई, आता मोठा झाला असेल ना......, बोंबला. मला तो डोळ्यासमोर दिसतोय, कसा बोलतो-चालतो, मैत्रीण कसे लाडकरते, सगळे काही. पण नाव समोर येईना. हँ, असे कसे होईल असे मनात म्हणत मी चक्क मोठ्याने मैत्रिणीचे, तिच्या नवऱ्याचे नाव घेतले. बरे तर बरे घरात कोणी नव्हते, नाहीतर नवऱ्याने आणि मुलाने वेड्यात काढलेअसतेच. तर त्या दोघांच्या पाठोपाठ त्यांच्या मुलाचे नावही असेच सहज येईल तोंडात असा माझा ठाम समजहोता. पण कसचे काय, पठ्ठ्याचे नाव आठवेचना. अनेक प्रकार करून पाहिले, वेगवेगळे संवाद म्हटले, अगदीकोलांट्या उड्याही मारून पाहिल्या. पण डोक्यात पूर्ण असहकार. मिशिगनमध्ये आल्यापासून जरा एकटेपणाआलाय खरा, म्हणून हा परिणाम?

असेच दोन-तीन तास गेले, कुठचे लक्ष लागेना. आपले वय झाले की काय? नाही म्हणजे आजकाल चाळिशीतच हाआजार होतोय? अर्रर्र.... वय जाहीर झाले की, जाऊ दे. पहिला हा भुंगा तर हटू दे. पुन्हा एकदा त्यालापाहिल्यापासूनच्या प्रसंगाची उजळणी सुरू केली. चलचित्र छान दिसतेय पण मेले कोणीही त्याचे नाव घेऊन हाकमारीत नाहीये. आता काय करावे? एक मार्ग होता तो म्हणजे मैत्रिणीलाच फोन करून विचारायचे, तुझ्या पोराचेनाव सांग. पण मनाला काही पटेना, म्हणजे हार मानायची. मग असे तर डोके रिकामेच होऊन जाईल. ( आधीचकिती भरलेय हा प्रश्न सुटला नाहीये ) दुसरा पर्याय होता, माझ्या मुलाला फोन करून विचारायचे. त्याच्या परीक्षाचालू आहेत, तो म्हणेल, " आई तुला हे नसते रिकामे उद्योग कुणी सांगितले? मला अभ्यास करू दे." आता एवढेबोलण्यापेक्षा नांव एका शब्दात सांगून होईल पण तो नक्की सांगणार नाही. मग नाहीच विचारले त्याला.

पाहता पाहता संध्याकाळ झाली. दिवसभर बॅकस्टेज वर्कर्स सारखे डोके गुंतलेलेच राहिले. जेवणेही झाली. झोपलागणे शक्यच नव्हते. मग चंगच बांधला, हे काही चालायचे नाही. बाबांना ओरडत असते मी, आजकाल तुम्हालाफार विस्मरण होतेय, उद्या मलाही विसरून जाल. त्यावर तेही अगदी लहान मुलासारखे मला सांगतात, " काहीतरीच काय बोलतेस गं, तुला कसा मी विसरेन? " आणि माझीही गाडी त्या रस्त्याकडे वळणार ह्याकल्पनेतल्या भितीनेच मी अर्धमेली झाले होते. पुन्हा एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या मुलांची नावे घ्यायलासुरवात केली. अन जणू काही मी विसरले नव्हतेच अशा थाटात त्याचे नाव सहज तोंडातून घरंगळले. हे एवढे सोपेनाव अन मला दिवसभर मेला इतका मनस्ताप व्हावा. सुटले बाई ह्या विस्मरणाच्या तावडीतून म्हणत मी आनंदानेझोपायला गेले. स्वप्नातही ते पोर मला विचारीत होते, " सांग सांग, माझे नाव सांग? "

2 comments:

  1. हा हा हा .... माझ्याबाबतीत खूपदा होतं असं... त्या नावाच्या संबधित अनेक आजूबाजूच्या गोष्टी आठवत असतात पण बेटं ते नांव काही आठवत नसतं. मग स्वतःलाच कुरतडणं चालू होतं.. जोपर्यंत ते नांव आठवत नाही तोपर्यंत जिवाला काही शांतता मिळत नाही.
    बरं ते नांव आठवणे अगदी महत्वाचं असतं असंही नाही.... पण उगाचच मनाला, डोक्याला नसतं काम मिळते...

    ReplyDelete
  2. प्रज्ञा, आवर्जून प्रतिक्रिया नोंदवलीस... खुप आनंद झाला. आभार्स! :)

    हो नं... आठवत नाही म्हटलं की जीवाला मुळी चैनच नसते... :D:D

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !