जाता जाता एक नजर इथेही........

Friday, March 12, 2010

व्यक्ती तितक्या प्रकृती........

ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सोय म्हणून गावात नियमित जाणारी सोसायटीची बस आली आणि बसची वाट पाहणारे सगळे उठले. सासूबाईंनी म्हटल्याप्रमाणे अगदी बरोबर नवाच्या ठोक्याला बस आली होती. साधारण तीस जणांना बसता येईल इतपत मोठी. एक एक जण चढू लागले. त्यातच एक अपंग बाई व त्यांचे बंधूही होते. दोघेही बहिणभाऊ साठ-पासष्टच्या आसपासचे असावेत. बाईंची अवस्था फारच बिकट होती. परंतु मनात उत्साह होता. पहिली पायरी जरा अंमळ उंचच होती त्यामुळे त्यांच्या भावाने लाकडाची एक लहान पायरी बनवलेली. ती पटकन त्याने ठेवली आणि अगदी मुंगीच्या गतीने त्या प्रयत्न करीत होत्या. मी आणि अजून काही जण बाजूला उभे होतो.

बस येण्याआधीपासूनच सोसायटीतील एक ज्येष्ठ महिला मोठ्यामोठ्याने सारखी बडबड करीत होत्या. माझ्या बाजूलाच उभ्या असलेल्या एका काकूंच्या भाषेत, ’ पांडित्य ’ पाजळत होत्या. ज्यांच्याशी त्या बोलत होत्या त्यांचा नाईलाजच असल्याने एकाक्षरी प्रतिसाद चालू होता. बाकीचे..... कोणी वर्तमानपत्रात तर कोणी नोटीस बोर्डावरील नोटिसा वाचण्यात, कोणी नुसतेच डोळे मिटून....., थोडक्यात ही ’ बला ’ आपल्याकडे वळू नयेचा प्रयत्न करीत होते. या आधी दोनतीन वेळा याच बाईंना कधी माळ्याला तर कधी वॉचमनला झापताना पाहिले होते. त्रासिक-अनुनासिक स्वरात जोराजोरात तक्रारी आणि तुम्ही कश्या चुका करता याचाच पाढा जाहिरपणे वाचणे सुरू होते. तेव्हापासूनच माझे कुतूहल चाळवले गेलेले. तशात नेमक्या आज त्या समोर आलेल्या.

त्या अपंग बाईंचा थोडा तोल जाताच प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे त्यांच्या आसपास उभे असलेल्या आम्हा सगळ्यांच्या देहबोलीतून सावरण्यासाठी पुढे होण्याची क्रिया घडली. एक काका अगदी शेजारीच असल्याने ते पटकन त्यांच्यापर्यंत पोचले तोच या पंडिताबाई वसकन त्यांच्या अंगावर खेकसल्या, " आधी मागे सरका. कोणीही बसमध्ये चढायचे नाही. दिसत नाही का तुम्हाला. मागे व्हा म्हणते ना.... " अचानकपणे झालेल्या हल्ल्याने काका गांगरले आणि तेच पडता पडता वाचले. त्यांनी क्षीण प्रयत्न केला सांगण्याचा, " अहो, मी असाकसा चढायला जाईन. त्यांना हात देत होतो.... " " काही नकोय, आम्ही आहोत त्यासाठी. एखादा दिवस नाही खिडकी मिळाली तर काही बिघडणार नाही तुमचे. " आणि पुढेही अजून काही पुटपुटल्या. काका बिचारे कानकोंडे होऊन गेले.

काकांचा चेहरा अगदी पडला होता. मागे दोघे तिघे कुजबुजायला लागले, " या स्वत:ला समजतात तरी कोण? पाहावं तेव्हां ज्याला त्याला घालून पाडून बोलत असतात. सोसायटी सगळ्यांची आहे. यांचा तोरा असा जणू काही या मालकीण आणि आपण भाडेकरी. तेही उपकाराखाली दबलेले मिंधे भाडेकरी असल्यासारखे. पाहिलेत ना, बिचाऱ्या बर्वेंच्या वर कसे डाफरल्या ते. " प्रत्यक्षात त्यांना कोणीही काही म्हटले नाही. सगळे चुपचाप मागे सरकून उभे राहिले. त्या अपंग बाई चढल्या-ड्रायव्हरच्या मदतीने सीटवर बसल्यावर मग या पंडिता चढल्या आणि अगदी तोऱ्यात मागे वळून सगळ्यांकडे पाहून, " चढा की आता पटापट, आधीच किती उशीर झालाय. " असे म्हणत लगालगा खिडकीशी जाऊन बसल्या.

सगळेजण चढले, मी सगळ्य़ात शेवटी चढले. त्यांना ओलांडून मागच्या सीटकडे जायला निघाले तर त्यांनी मध्येच हात घालून रस्ता अडवला. भुवया उडवून," काय? कुठे " असे नजरेनेच विचारले. मी चेहरा शक्य तितका कोरा ठेवून स्थिर नजरेने फक्त त्यांच्याकडे पाहू लागले. मी काहीच बोलत नाहीये हे पाहून त्यांनी, " ही खाजगी बस सेवा आहे. पीएमटी बाहेर मिळेल. जा तिकडे. कोण कोण कुठून कुठून येतात. काय रे चव्हाण( ड्रायव्हरला ), तुला सांगायला काय होते लोकांना. ( पुन्हा माझ्याकडे नजर वळवून ) अहो, उतरा. उशीर होतोय आम्हाला. " मला ओळखणाऱ्या एका काकूंनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की अहो या आपल्या सोसायटीतल्याच आहेत. त्यांचे सासू-सासरे...... पण यांना ऐकू जाईल तर ना. " अग, मी तुलाच सांगितले ना.... उतर की. " हे ऐकल्यावर खरे तर माझ्या कपाळावरची शीर तडकलीच होती. त्यांना म्हटले, " ही बससेवा कोणासाठी आहे? या सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी. बरोबर ना? इथे आमच्या दोन जागा आहेत. ह्या बससेवेचा लाभ तुमच्याइतकाच मलाही घेण्याचा हक्क आहे. तेव्हां हात बाजूला घ्या म्हणजे मला बसता येईल आणि तुमच्यामुळे इतरांचा झालेल्या वेळेचा अपव्यय थोडा भरून काढण्याचा प्रयत्न करता येईल. " त्या थोड्या दचकल्या. हात बाजूला केला, मी बसले तशी ड्रायव्हरने गाडी सोडली.

त्यांच्या शेजारणीला मी कोण, नाव काय आहे, कुठल्या मजल्यावर राहते वगैरे विचारून घेऊ लागल्या. सगळी माहिती मिळाल्यावर माझ्याकडे वळून म्हणाल्या, " मग, हे आधीच सांगायचे ना. मला काय स्वप्न पडणार. तुम्ही कधीतरी येणार इथे, कळणार कसे मला. " हे ऐकल्यावर मात्र माझा आवाज तडकला, " म्हणजे मी काय तुमच्यापुढे हजेरी लावायला हवी का? माझ्या घरी मी कधी यायचे, किती राहायचे हे मी ठरवणार. तुम्ही हे सगळे बोलण्याआधी सत्य जाणून घ्यायला हवे होते आणि ते जर माहीत नसेल तर किमान सभ्य भाषेत विचारणा करायची होती. तुम्ही तर बस तुमच्या मालकीची असल्यागत मला खाली उतर म्हणून फर्मावत होतात. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायची राहिली बाजूलाच आणि वर मलाच सुनावताय? कमाल आहे. " त्यावर त्यांनी चक्क मान उडवली आणि जणू हे सारे काही घडलेच नाही अशा प्रकारे शेजारणीशी मोठ्यामोठ्याने गप्पा मारू लागल्या. संपूर्ण बसमध्ये फक्त त्यांचाच आवाज घुमत होता. डेक्कनपाशी त्या उतरून गेल्यावर, चव्हाणांनी बसद्वारे एक मोठा सुस्कारा सोडून निषेध नोंदवला तशी सगळेजण खोखो हसले. त्या गेल्या तरी सगळे त्यांच्याच विषयी आपापल्या इच्छित स्थळी उतरेस्तोवर बोलत होते.


हा प्रसंग मी विसरायच्या आतच एक दिवस संध्याकाळी सोसायटीच्या क्लबहॉउस च्या जीम मध्ये गेले असता पुन्हा यांचे दर्शन झाले. जीममध्ये एक ८५ वर्षांचे आजोबा अगदी हळूहळू सायकल चालवत होते. मला पाहताच त्यांनी म्हटले, " जरा दिवे लावतेस का गं? अंधारून येईल आता दहा मिनिटात. मग मला नीट दिसणार नाही. उतरताना तोल जायचा, म्हणून तुला सांगतोय. " मी हो म्हटले आणि दिवे लावून ट्रेडमीलवर धावायला सुरवात केली. जीममध्ये अजून एक काकू होत्या पण त्या सर्वांगसुंदर व्यायाम करीत होत्या. जरा पाच मिनिटे होत नाहीत तोच या पंडीताबाई जीम मध्ये आल्या. काकांची प्रतिक्रिया जबरीच होती. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि त्यांच्याकडे पाहून कपाळावर हात मारला. बटण बंद करतो तसे करून दाखवून आता ऐका बडबड असे बोटांनी खुणावले. कदाचित हे त्यांनी पण पाहिले असावे, असा माझा कयास.

नेहमीप्रमाणे त्यांनी नाकात बोलत विचारले, " हे दिवे कोणी लावले? बाहेर अजून टळटळीत उजेड असताना हा नास कशाला करायचा मी म्हणते. पण कोणाला पडलेली नाही. कुठे कुठे मी लक्ष ठेवणार. अहो आपटेकाका, कोण लावून गेलेय हे दिवे? तुम्ही सांगायचे ना त्यांना बंद करून जा म्हणून. अहो सोसायटी सगळ्य़ांची आहे ना.... काय म्हणते मी. " हे बोलताना सगळे लक्ष माझ्याकडे. आपटेकाकांनी एक नाही की दोन नाही, संपूर्ण दुर्लक्ष केले....... शांतपणे हळू सायकलवरून उतरले आणि नजरेनेच मला टाटा करून जीममधून निघून गेले. यांची फुणफूण सुरूच होती. खरे तर अंधारून आलेच होते. यांची बडबड ऐकत बसण्यापेक्षा घरी जावे हे उत्तम असे म्हणत मीही आपटेकाकांचा कित्ता गिरवला आणि चालू पडले. यांचे डोळे माझा पाठपुरावा करत होते हे न पाहताही मला जाणवत होतेच.

काय योग होते कोण जाणे पण सारखी यांची आणी माझी समोरासमोर गाठ पडू लागली. सासूबाईंना यांच्या गंमती सांगत होते तेव्हां सासऱ्यांच्या कानावर पडताच ते पटकन म्हणाले, " अग, फार जहांबाज नमुना आहे हा. मीटिंगमध्ये पाहायला हवेस तू, कशी दादागिरी चालते ते. तुला जर काही म्हणाल्या ना तर सरळ उलट उत्तर दे. फार आगाऊ बाई आहे. गेल्याच आठवड्यात आपल्या ड्रायव्हरलाही झापलेय त्यांनी. " मी फक्त आठ दिवस होते तिथे पण तेवढ्या वेळात, एका डॉक्टरीण बाईंना व्याख्यानासाठी बोलावले होते. नवरात्रीच्या गरब्याच्या नाचाची तालीम सुरू होती. लायब्ररीत एका सुप्रसिद्ध लेखिकेशी गप्पांचा कार्यक्रम झाला. या सगळ्या वेळी यांनी कोणा न कोणाशी खडाष्टक केले. पाहुण्यांपेक्षा जास्त बडबड केली. समोरचा काय बोलतोय हे ऐकण्याची तयारीच नाही. मला जे वाटते तेच खरे आणि तेच बरोबर हा खाक्या. केवळ बाकीचे भिडस्तपणे काही बोलत नाहीत, विरोध करत नाहीत म्हणून किती वचवच करायची याचा काही धरबंदच नाही.

बरेचदा आपल्याला अशी माणसे कुठेना कुठे भेटतच असतात. समोरच्या माणसाच्या मनात काय चालले आहे हे स्वत: त्या माणसालाही कळत नसेल इतके अचूक यांना कळत असते. त्यामुळे जे तो बोलत नाहीये ते त्याच्या तोंडात घालून यांची गाडी सुसाट सुटते. पुन्हा आक्रस्ताळेपणा व वयाचा फायदा कसा उठवायचा ही कलाही बरोबर अवगत असते. ऐकणारा म्हणतो, जाऊ दे..... कुठे यांच्या तोंडी लागायचे. अजून दहा वाक्ये ऐकण्यापेक्षा लोक पळ काढतात. जे काढू शकत नाहीत ते बिचारे गरीबासारखे खाली मान घालून ऐकतात. आणि मग एखादा ताडकन तोडणारा भेटला की त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या सगळ्यांचा जाहीर उद्धार ठरलेला. असे करण्याने काय साध्य होते हे त्यांनाच माहीत पण असे लोक माणसात असूनही नेहमीच एकाकी असतात. का भेडसावणाऱ्या एकटेपणावर अशा प्रकारे मात करण्याचा हा त्रासदायक मंत्रजळेपणा मुद्दाम करतात?

17 comments:

  1. खरंच असे हलक्या स्वभावाचे आणि चढ्या आवाजाचे नमुने बरेच असतात. उद्धटपणा म्हणा किंवा काहीही पण आमच्या सोसायटीतल्या अशा अनेक नमुन्यांना सरळ करायची वेळ आली होती आमच्या ग्रुपवर. आणि आम्ही ते काम अगदी चोखपाने पार पाडलं होतं :D

    ReplyDelete
  2. तर काय रे..... निष्कारण लोकांचा छ्ळ करायचा. अती अरेरावी अंगात. लहान मुलांना तर नको जीव करतात असे लोक.पुन्हा ती उलटून बोलली की आईबापालाच शिस्त नाही तिथे पोरांना कुठून असणार इथून सुरवात....

    ReplyDelete
  3. श्री अगदी खरे गं...कशी असतात ना विचीत्र माणसे..कोणाचे ऐकुन घ्यायचे हे जणु ह्यांना शिकवलेच नाही.सतत आपली ह्यांचीच अरेरावी...खुप ईरिटेट व्हायला होते..मग होळी ला ह्यांच्या नावाने जेंव्हा बोंबा लागतात ना तेंव्हा त्यांचे चेहरे बघण्यासारखे होतात..मस्त लिहीलेस....

    ReplyDelete
  4. हो गं माऊ, मग बसतात घरात दडी मारून. कुठलीही गोष्ट खेळीमेळीने घ्यावी, जरा हलका मूड ठेवावा....पण ते आम्हाला आवडतच नाही ना...

    ReplyDelete
  5. माझ्या तर नात्यातच असे काही नमुने आहेत... दुर्लक्ष करण्यावाचुन गत्यंतर नाही..

    ReplyDelete
  6. तू मात्र चांगलंच झापलंस की त्यांना...पण तुला माहित आहे ना जित्याची खोड...

    ReplyDelete
  7. हे असले नमुने स्वतः पण कधी मजा करत नाही अन् दुसर्‍या लोकांना पण करू देत नाही.....खूप वैताग देतात हे नमुने!!!

    ReplyDelete
  8. आनंद, ती तर अवघड जागेची दुखणी.:(

    ReplyDelete
  9. अगदी अगदी. अपर्णा, अग या घटनेनंतर दोनच दिवसात जीमचा प्रकार झालाच ना.....

    ReplyDelete
  10. मनमौजी, मला आधी वाटायचे... असे वागून निदान त्यांना तरी समाधान मिळत असावे. पण तसे होत नाही. आणि मग दुसरे आनंदाने जगताना पाहवत नाही.

    ReplyDelete
  11. हं..... व्यक्ती तितक्या प्रकृती गं!!! अगं पण निदान त्या काकू आधि तुला ऒळखत नव्हत्या गं, लोक जेव्हा ओळखीचे अगदी जवळचे असल्याचे ढोंग करतात आणि त्रास देतात तेव्हा आणि जास्त बोच वाटते...

    ReplyDelete
  12. अरे हो.... ब्लॉग हिट्स ५०,००० वर झाल्यात..
    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन....
    आणि अनेकोनेक शुभेच्छा!!!!

    ReplyDelete
  13. धटासि व्हावे धट। उद्धटासि उद्धट॥
    खटनटासि खटनट। अगत्यचि होय॥
    असे समर्थ सुद्धा सांगतात.
    पण काही वेळा नाईलाज होतो, जाम irritating असतात अशी माणसं.
    सोनाली

    ReplyDelete
  14. भाग्यश्री ताई ५०,००० हिट्स क्या बात है!!! अभिनंदन. . . . लवकर लक्षाधीश व्हा!!!!!

    ReplyDelete
  15. तन्वी,अश्या लोकांचे ढोंग ओळखून त्यांच्यापासून निक्षून लांब राहणे हाच पर्याय. आपल्यासारखे भिडस्त या लोकांची शिकार वारंवार होतात, हा दोष आपला आहे. :(

    धन्स गं.:)तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळेच....

    ReplyDelete
  16. सोनाली, फटकळपणा मुळातच अंगात असावा लागतो गं. म्हणजे तो निर्माण करता येतो पण मग मनाला लागून राहते. पण काही वेळा तोच मार्ग अवलंबणे गरजेचे असते.ओळखीचे-नातेवाईक यांच्याबाबतीत मात्र तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे झालं.....
    आभार.

    ReplyDelete
  17. अजूनही उत्साह आहे कारण तुम्हां सर्वांचा असलेला लोभ. मनमौजी,खूप खूप आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !