जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, April 14, 2009

स्प्रिंग उत्तपा





जिन्नस

  • इडली-डोसा चे तयार पीठ (अर्धा किलो, अगदी पातळ नसावे)
  • दोन गाजरे पातळ उभी चिरून
  • दोन पातीचे कांदे- पात बारीक चिरुन, कांद्याचे पातळ उभे काप करून
  • दोन वाट्या बारीक चिरलेला कोबी
  • अर्धी वाटी पातळ तिरकी चिरलेली फरसबी
  • एक सिमला मिरची पातळ उभी चिरून
  • अर्धी वाटी मक्याचे कोवळे दाणे
  • अर्धी वाटी सोललेले मटार
  • दोन चमचे सोया सॉस, थोडी मिरी पावडर, दोन चमचे तिखट व चवीपुरते मीठ
  • दोन चमचे तेल.

मार्गदर्शन

कढईत दोन चमचे तेल टाकून मोठ्या आंचेवर ठेवावे। तेल चांगले तापले की बारिक चिरलेला कोबी, गाजर,सिमला मिरची, कांद्याची पात, मक्याचे दाणे, मटार अन फरसबी त्यावर टाकावे. आंच कमी करू नये मात्र सारखे परतत राहावे. पाच मिनीटांनी त्यात सोया सॉस, मिरी पावडर आणि तिखट घालावे. परतणे चालूच ठेवावे. थोड्याच वेळात भाज्यांना चकाकी दिसू लागेल तसेच अर्धवट शिजल्यात हे जाणवेल. मग त्यात अंदाजाने मीठ घाला. सोया सॉस मध्ये मीठ असते हे लक्षात घेउन घालावे. म्हणजे जास्त होणार नाही. अजून तीन-चार मिनीटांत हे सारण तयार होईल. कढईतून काढून घ्यावे. (थोडेसे कमी शिजलेले असले पाहिजे. )

डोसापॅन मोठ्या आंचेवर तापत ठेवावा. ( पॅन चिकटत असेल तर त्यावर आधी अर्धे भांडे पाणी घालून बुडबुडे येईतो तापवावे, मग ते पाणी फेकून द्यावे. आता पॅनवर उत्तपे चिकटणार नाहीत. ) एकदा का तवा नीट तापला की आंच मध्यम ठेवावी. डो्श्याचे पीठ डावाने पुऱ्यांच्या आकाराएवढे घालावे. ( सहा ईंच व्यास इतपत ) एकावेळी चार घालता येतात. त्यातील दोनांवर तयार केलेले सारण थोडे थोडे घालावे. सगळ्या उत्तप्यांच्या बाजूने तेल सोडावे. सोनेरी रंग आला की सारण नसलेले उत्तपे असलेल्यांवर टाकून थोडेसे दाबावेत. लागलीच प्लेट मध्ये काढावेत. हवे असल्यास मध्ये कापावेत. चटणी, टोमॅटो सॉस, जे आवडेल त्याबरोबर उत्तपे गरम गरम खावेत.

टीपा

सारण रंगीबेरंगी सुंदर दिसते अन चवही खूप छान लागते. डोश्याचे पीठ हवे तितकेच आंबलेले असेल तर अजूनच मजा येते. ज्यांना तळलेले स्प्रींग रोल खाता येत नाहीत किंवा खाताना खूप तेलकट आहे असे वाटते त्यावर हे स्प्रींग उत्तपे एकदम धावतील. करायलाही सोपे आहेत. भारतात कुठल्याही किराणावाल्याकडे आजकाल तयार डोसा पीठ नेहमीच मिळते. शिवाय गिटस इत्यादींची पाकीटेही मिळतात. घरात भाज्या थोड्या थोड्या उरल्या की काय करायचे ह्यावर उत्तम उपाय. घरातल्या सगळ्यांना आवडेलच. बटाट्याच्या भाजीचेही करता येतील. ( बऱ्याच वेळा बटाट्याची भाजीही उरते. ) इडलीचे पीठ घरात तयार केल्यास नक्कीच जास्त चांगले होतात.

No comments:

Post a Comment

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !