जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, April 19, 2009

तुला मी अन मला तू

आजकाल बरेच आजीआजोबा एकटे राहतात. काहींना मुलेबाळे नाहीत म्हणून तर काहींची नोकरी निमित्ते परगावी, परदेशी राहत आहेत म्हणून. त्यांना पैशाचे पाठबळ नक्की असते पण या वयात दररोज लागणारे प्रेमाचे आणि आपुलकीचे बंध प्रत्यक्ष समोर नसतात. ज्या काळात मायेच्या स्पर्शाची, आधाराची अत्यंत गरज असते त्या सगळ्या भावना फोनवर, चॅटींग, वर्षा दोन वर्षात एक धावती थोड्या दिवसांची भेट यांतून व्यक्त करण्याची धडपड दोन्ही बाजूने होते. हे चांगले असले तरी पुरेसे मात्र नक्कीच नसते.

काहींची मुले त्यांना विचारीत नाहीत त्यामुळे त्यांना एकटे राहावे लागते. त्यात त्यांनी स्वतःच्या म्हातारपणाची तजवीज केलेली नसेल तर परिस्थिती फारच बिकट बनते. प्रकृतीची कुरबूर सुरू असते. कधी मोठे दुखणे झालेलेअसते, औषधांचा खर्च वाढणाराच असतो. अशात मन संपूर्णपणे निराश, दुःखी झालेले असते. तुला मी अन मला तू ह्या जाणीवेत कुठेतरी अचानक जोडीदाराची साथ सुटणार तर नाही ना ही जीवघेणी भावना सतत पाठपुरावा करत राहते. अशाच एका आजीआजोबांचे सत्य हे ....

दोन चिमण्या भेदरलेल्या,
वादळ वाऱ्याला घाबरलेल्या
थरथरणारं काळीज घेऊन,
वळचणीला बसलेल्या
चिमणी म्हणाली चिमण्याला,
कशी तोंड देऊ या तुफानाला
वाटते मज भीती आता,
होणार काहीतरी जिवाला
चिमणा म्हणाला चिमणीला,
भिऊ नको घाबरू नको
मी आहे ना,
तुझ्या संगतीला सोबतीला
पुन्हा पंखांत बळ येईल,
दुबळं का होईना
थोडंसं उडता येईल
तुला मला लागेल इतका
चिमणचारा मला
नक्कीच आणता येईल
पुन्हा सांगतो दु: करू नको
जे तुझं नाही त्याकडे पाहू नको
मी तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी
हे कधी विसरू नको...

1 comment:

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !