कुठेही तुम्ही राहा काही गोष्टी तुमची पाठ सोडतच नाहीत. प्रमाण कमीजास्त एवढाच काय तो फरक. त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही अन त्यांना सामावूनही घेता येत नाही. त्याही पुढे जाऊन एखाद्याने ठरवलेच, तुम्ही काय हवा तो धिंगाणा घाला फक्त माझ्या स्पेस मध्ये लुडबुड करू नका. पण त्यांना मिनिटभरही चैन नसते अन ते तुम्हाला त्यांना कुठल्यातरी पद्धतीने घराबाहेर काढल्याशिवाय चैन पडू देत नाही. आले ना लक्षात? हो हो तेच. घराघरात नांदणारी झुरळे, मुंग्या अन मूषकराजे-उंदरडे. गणेशाचे वाहन वगैरे ठीक आहे पण एवढा मान ते ठेवून घेतील तर ना.
गेले चारपाच दिवस ड्रॉवर मध्ये अगदी छोट्या लेंड्या दिसू लागल्यात. त्या पाहताच नवऱ्याला म्हटले, " आपल्या घरात पिल्ल आलीत वस्तीला. आता त्यांना शोधून काढेतो मला शांती नाही. " नवरा म्हणे," काही झाले तरी मारायचे नाही. पकडून बाहेर दे टाकून." कमाल आहे, आता ह्या पिटुकल्यांना कसे पकडणार? जणू काही मी हाकारले की पटापट बाहेर येऊन माझ्यासमोर रांग लावणार होते. किती आहेत तेही माहीत नाही. बऱ्याच गोष्टी कुरतडून ठेवलेल्या दिसत होत्या. दिवसागणिक माझ्या नाकात दम आणत होते.
काल कचरा टाकून आले अन ट्रॅशकॅन ला नवीन पिशवी लावायला गेले तर आत दोन पोरे हुंदडत होती. मला कोण आनंद झाला. दबकत ट्रॅशकॅन उचलला अन घरापासून दूर जंगलात सोडून आले. रस्ताभर वळून वळून पाहत होते मागे तर येत नाहीत ना. वाईटही वाटत होते, अगदीच छोटी आहेत पिल्ल. पक्षी, ससे, खारी कोणीतरी नक्की मटकावून टाकेल. पण माझा अगदी नाईलाज होता. नवऱ्याने सांगितले होते मारायचे नाही. मी ते एकले होते. असे पण मी शूर नाही अन मुंगीलाही मारणे मला जमत नाही.
आज सकाळी उठल्या उठल्या ड्रॉवर गाठला. काय आश्चर्य त्यांना खायला ठेवलेली कुकी तशीच आहे. म्हणजे दोनच होती? असे कसे होईल, एकावेळी सहा-सात नक्कीच असतात. कदाचित उरलेली पिल्ल स्वतःहून आम्हाला सोडून गेली असावीत. ते काहीही असो निदान ह्या क्षणाला तरी मी खूश आहे. उद्या ड्रॉवर काय चित्र दाखवेल ते..., उद्या पाहू. आज मुक्तीचा आनंद मनवायला हवाच.
No comments:
Post a Comment
आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !