जाता जाता एक नजर इथेही........

Monday, November 11, 2013

आनंदोत्सव! दीपोत्सव! फराळोत्सव! फटाकेत्सव!


यंदाची दिवाळी संपताक्षणी पुढच्या दिवाळीचे वेध लागावेत इतका, हा आवडीचा नि खासमखास असा सण. नवरात्र सुरू झाले की दिवाळीची चाहूल लागते. मनात आपसूकच उत्साहाचे वारे जोमाने वाहू लागतात. आपल्याकडे एक वेगळेच भारलेपण, माहोल तयार होऊ लागतो. जिकडे पाहावे तिकडे एक नवेपण, कोरेपण, चकाकी दिसू लागते. घरोघरी नवीन खरेदीचे बेत घाटू लागतात. आजकाल आपण बाराही महिने खरेदी करत असतो. त्यासाठी वेगळे असे काहीही कारण लागत नसले तरीही दिवाळीत आवर्जून खरेदी होतेच. खरे तर दिवाळी हा काही गणेशोत्सवासारखा ऑफिशियली सार्वजनिक सणांमध्ये मोडणारा सण नाही. आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करण्याचा उत्सव. पण त्याची लागण मात्र सार्वजनिक आहे. अगदी महालापासून झोपडीपर्यंत आनंदाचे भरते सहजी घेऊन येणारा उत्सव. 

हे झाले मायदेशाचे. जे पोटापाण्याकरिता, शिक्षणाकरिता परदेशी राहतात त्यांच्यासाठी दिवाळी हे एक आगळे-वेगळे प्रकरण आहे. दिवाळीचा सण म्हणजे आनंदी आनंद. मायदेशातील दिवाळी मनात घेऊनच जो तो जिथे असेल तिथे दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही परदेशी आलो ते एका छोट्याशा गावात. सुदैवाने तिथे इतक्‍या प्रचंड मराठी फॅमिलीज होत्या, की खरोखरच आपण मुंबईबाहेर आहोत असे वाटलेच नाही. दिवाळी अतिशय उत्साहात साजरी होत असे. अगदी रांगोळ्या, तोरणे, फराळाची देवाण-घेवाण, विकेंडला सकाळी एकत्र जमून केलेला फराळ, पाडवा व भाऊबीजेचे ओवाळणे, मुलांचे-मोठ्यांचे फुलबाज्या, भुईचक्र व नळे उडवणे, आम्हा बायकांची पैठण्या, दागिने घालून चाललेली टिपिकल लगबग. आपल्यासारखा रस्तोरस्ती माहोल नसला तरी मनात व विकेंडला जमून दिवाळीची मजा लुटली जात होती. बेसमेंटमध्ये छोटेखानी गाण्याची मैफलही झडत असे. 

हे सुख सुरवातीची सात वर्षे छान साजरे झाले. मग दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाले. तिथे आजूबाजूला कोणीही भारतीय दिसेना. कुठलाही सण हा फक्त कालनिर्णय व जालावरच कळू लागला. आता हेच पाहा नं, बाहेर पारा उतरला ४० फॅरनाईटवर. जाडे जाडे कोट चढवायला सुरवातही झाली. बरे शेजार-पाजार आपला देशी असावा तर तोही नाही. अगदी सख्खा शेजारी आफ्रिकन अमेरिकन. त्याच्या पलीकडे हिस्पॅनिक आणि अलीकडे चायनीज. एकही देशी जवळपास नाही. तरीही विचार केला या सख्ख्या शेजाऱ्यांना फराळ नेऊन द्यावा. त्यांनाही आपल्या या आनंदाची तोंडओळख करून द्यावी. पण फराळामागोमाग प्रत्येकाला हे कशापासून बनविले आहे हे सांगून सांगून तोंड दुखेल, वर त्यांना कितपत समजेल आणि आवडेल कोण जाणे. म्हणून मग विचार कॅन्सल. त्यापेक्षा त्यांना डिसेंमध्ये केक द्यावा ते उत्तम व सेफ. 

मग काय, घरातल्या घरातच आम्ही दिवाळी साजरी करायची ठरवलीये. हरकत नाही. दिवाळी मनात इतकी भिनलेली आहे की अगदी दोघेच असलो तरी साजरी होईलच. ओघाने फराळही आलाच की. घराघरातून खमंग वास येऊ लागलेत असे इथे नसले तरी आपल्या स्वत:च्या घरात हे असे वास दरवळायला हवेतच. दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी जोरावर आहे. हल्ली गोडधोड डाएटिंगमुळे मागेच पडलेय. वर्षभर काय ते डाएट-बिएट तब्येतीत करावे आणि दिवाळीत मनाचे लाड करावेत. म्हणूनच निदान दिवाळीच्या मंगलमयी पहाटे... सकाळीही चालेल....(का ते कळले नं... "लाडू खायला नरकात पडलेले असलो तरी नो प्रॉब्लेम...') लाडू खायचेच. तशात लेक म्हणाला, " आई, डबा भरून पाठव. सगळे मित्र वाट पाहत आहेत. लवकर पाठव.'' मग दुप्पट उत्साह आला व त्याच्या डब्याबरोबरच माझ्या मित्र-मैत्रिणींचेही डबे कुरियरकडे गेले. प्रत्यक्ष शुभेच्छा न देता आल्या तरी स्काईपवर मैफल जमवता येईल, फटाक्‍यांची आतषबाजीही लुटता येईल. दिवाळीचा प्रकाशोत्सव मनभर साजरा होईल. 


तुम्हालाही शुभेच्छा द्यायच्यात. चला तर मित्र-मैत्रिणींनो, कंदील, फटाके, पणत्या, फराळाचे ताट व अनेक शुभेच्छा तुमच्यासाठी घेऊन आलेय. " !!! ही दिवाळी व नवीन वर्ष तुम्हा-आम्हाला सुखसमाधानाचे व समृद्धीचे जावो. सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत !!! " 

( इसकाळ मधे छापून आलेला लेख )

Monday, November 4, 2013

* !!! दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!! *

                           
                        माझ्या सगळ्या वाचकांना व मित्रमैत्रिणींना 

                         * !!! दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा !!! *  


                                                   

                                           क्रोशे कमळ