जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, April 4, 2009

एक थोतरीत ठेवून दिली पाहिजे...

आयुष्यात अनेक माणसे आपल्या संपर्कात येतात. काही तेवढ्यापुरती तर काही कायमची. स्मरणात सगळीच राहतात. काहींच्या आठवणीने हुरहुर लागते तर काही खो खो हसवतात. आज कशी कोण जाणे मला टोळेकाका व काकूंची राहून राहून आठवण येतेय. आम्ही काश्मीरच्या ट्रीपला जायला निघालो. एकूण चार फॅमिलीज. मी-नवरा, सासू-सासरे, जयवंत फॅमिली-नवरा-बायको व दोन जुळी मुले, टोळे फॅमिली-नवरा- बायको व आमचे संयोजक- ते माझ्या नवऱ्याचे लांबचे आजोबा. त्यांची ही बाविसावी ट्रीप होती. आजोबा मुंबईत राहतात की काश्मीरला असा प्रश्न पडावा इतके वेळा जाऊन आल्यामुळे आम्ही सगळे बिनधास्त होतो.

निघायचा दिवस उजाडला. आम्ही एकदम खुशीत होतो. स्टेशनवर सगळे जमा झाले. सामान-सुमान गाडीत ठेवून स्थानापन्न होतोय तोच कर्कश्य शिट्टीचा आवाज अगदी जवळच ऐकू आला. सगळे दचकले. कोण वाजवते म्हणून पाहिले तर टोळेकाकांच्या तोंडात शिट्टी होती. ती वाजवून ते त्यांच्या बायकोला काहीतरी सांगत होते. टोळेकाकू गरीबासारख्या काका सांगतील ते ऐकत होत्या. आम्हाला सगळ्यांना थोडे चमत्कारिकच वाटले. पुढे हे शिट्टी प्रकरण चालूच राहिले आणि आम्हीही हळूहळू सरावलो.

आमची ट्रीप पंधरा दिवसांची होती. दोन-तीन दिवसातच आम्ही एकमेकांशी चांगले रुळलो. टोळेकाका म्हणजे अतिशय आग्रही आणि घमेंडी आहेत हे लक्षात आले. त्याउलट काकू अगदी गरीब आणि खूप चांगल्या होत्या. काका त्यांना सारखे सगळ्यांसमोर जोरात ओरडत, बावळट-मूर्ख आहेस असे म्हणून अपमान करत. सगळ्यात त्रास देणारी गोष्ट होती ती म्हणजे त्यांची शिट्टी. काकूंना काहीही सांगायचे असले की जोरात ती वाजवत आणि मोठ्यामोठ्याने ओरडत. एकदोन वेळा काकूंना रडताना ही आम्ही पाहिले, पण करणार काय. काकांना कोण सांगणार असे वागू नका.

दिवस मस्त मजेत चालले होते. श्रीनगर, युसमर्ग, खिलनमर्ग, चार चिनार, बाजार आणि बरेच काही पाहून झाले होते. सोनमर्ग आणि पहेलगाम की घरी परतायचे. आम्ही सगळे पहाटे पहाटे सोनमर्गला निघालो. त्या वर्षी प्रचंड बर्फ पडला होता. दोनच दिवसांपूर्वी जेमतेम एक बस जाईल एवढाच रस्ता खोदून काढला होता. दोन्ही बाजूने पंधरा-वीस फुटाची भिंत तयार झाली होती. सोनमर्गला पोचलो. बर्फाचे ढिगारे रचल्यामुळे तिथे खूप उंच उंच स्लाईडस तयार झाल्या होत्या. सगळे जाता येईल तितके वर जात आणि घसरत खाली येत. खूपच मजा येत होती.

टोळेकाकूही खूश दिसत होत्या. घसरत येण्याची मजा लुटत होत्या. तेवढ्यात ती कर्णकटू शिट्टी ऐकू आली. मागोमाग टोळेकाकांचा आवाज आदळला, " कमे, खाली ये. आधी खाली ये, लहान मुलांसारखी काय खिदळते आहेस. " एक क्षण काकूंचा चेहरा बापुडवाणा झाला अन दुसऱ्याच क्षणाला त्या संतापून ओरडल्या, " चूप, एक थोतरीत ठेवून दिली पाहिजे. खबरदार पुन्हा मला ती दळभद्री शिट्टी वाजवून बोलावलेत तर. मी काय करायचे ते मी ठरवेन, तुम्ही मला काहीही सांगू नका. " आणि त्या पटापट वर चढून गेल्या अन जोरात स्लाईड करीत खाली आल्या. त्यांचा चेहरा आनंदाने फुलला होता.

आम्हाला सगळ्यांना खूपच बरे वाटले होते. काकांनी इतके अती केले की शेवट असा झाला. त्यानंतर कधीही ती शिट्टी वाजलेली कोणीही एकली नाही आणि काकूंना रडताना कुणी पाहिले नाही. अजूनही आम्हाला दोन्ही हात कमरेवर ठेवून, झाशीच्या राणीच्या आवेशात उभ्या टोळेकाकू अन खाली अविश्वासाने काकूकडे पाहत असलेल्या काकांचा चेहरा डोळ्यासमोर येतो अन हसू आवरत नाही.

5 comments:

 1. असतात काही माणसं अशी. माझ्याही पाहण्यात एक-दोन उदाहरणं आहेत.

  ReplyDelete
 2. धन्यवाद आदिती.

  ReplyDelete
 3. हो, मी पण अशी लोक पाहीली आहेत, इतका राग येतो ना, घमेंडी सा़x!
  छान केले काकुनी. तुमचे लेखन पण छान, डोळ्यासमोर चित्र उभे राहीले.

  ReplyDelete
 4. आभार,’माझ्या मना’.

  ReplyDelete
 5. नमस्कार,
  आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
  शेखर जोशी

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !