जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, April 28, 2011

भाराभार चिंध्यांतली एक चिंधी....

सतत काहीतरी करत राहायचे, शिकत राहायचे या नादाने पछाडलेले असल्याने बरेचदा अनेक गोष्टी आत्मसात केल्या जातात. पण लगेच पुन्हा एखादे नवीन आकर्षण समोर येते आणि आधी शिकलेल्या कलेवर पुरेसे काम म्हणा, हात साफ करणे म्हणा होत नाही. मग आत्मसात तर केलेय पण त्यात तितकी नजाकत, सफाई न आल्याने मन खट्टू होते. गिरवणेच राहून गेले तर वळणदार अक्षर येईलच कसे? पुन्हा नुसतेच वळण नाही तर एकसंधपणा नितांत गरजेचा. अन्यथा लयच हरवायची. घाईघाईत केलेली कलाकृती मनासारखी जमणे कठीणच. त्यातून पुरेसा वेळ व पेशन्स याचेही गणित जमवणे दुरापास्त होऊन बसते. अशा अर्धवट, धेडगुजरी गोष्टी एकावर एक जमतच जातात. ' एक ना धड भाराभार चिंध्या ' सारखी गत.

छे! ये ना चालबे! असे म्हणत मनाचा हिय्या केला आणि गाठोड्याची निरगाठ उकलली. अनेक डोकी अहमिकेने, ' मी मी ' करत, एकमेकांना बाजूला सारून गलका माजवू लागली. आधीच मन दोलायमान त्यात नेमका कशाला हात घालावा हे चक्र भिरभिरत होतेच. भर्रकन गाठोडे बांधून टाकले. मात्र कोठीच्या खोलीत सारले नाही. दिसू देत समोर सारखे. ते ही बेटे आता ऐकेना. सारखी चळवळ सुरू झाली. आतला गलका वाढतच होता. त्यांनी आता एकोपा करून माझ्यावर हल्ला चढवलेला. मग सपशेल शरणागती पत्करली आणि गाठोडे थोडेसे किलकिले करून एक बाड बाहेर काढले.

जवळजवळ एक तप झालेले त्यामुळे बरीच धूळ जमली होती. जसे ड्रायव्हिंगचे, पोहण्याचे तसेच बहुतांशी इतरही कलांचे असते-असावे. पण मन साशंक होते. शोमूसाठी शेवटचा स्वेटर विणला होता तेव्हा तो प्रायमरीत होता. जमेल का? का उगाच कोठीच्या खोलीत लोकरीच्या गुंड्यांची भर होईल. नकारात्मक प्रश्नांची सरबत्ती सुरू होऊ लागलेली. सरळ उठले, गाडी काढली आणि दुकान गाठले. विलक्षण सुंदर दिसणारे निरनिराळे लोकरीचे रंग, पोत मोह घालू लागले. प्रत्येकाला गोंजारत, मऊमऊ स्पर्श अनुभवत कोणाकोणासाठी विणावे ची यादी गुंफू लागले. असेच करून ठेवू मग पाहू कोणाला होईल ते, हा प्रकार मला झेपत नाही. समोर चेहरा हवाच. म्हणजे मग रंग, वीण, पोत कसे आपसूक जुळतात. माझा मायदेशी जाण्याचा योग लगेच येणार नव्हता पण नचिकेतची धावती भेट ठरलेली. त्यामुळे त्याच्याबरोबर देऊ धाडून या होर्‍याने अंदाजे मापे योजली आणि धडाका लावला. इथेही ऋषांक-आरुष व आदितेय होतेच. गौराबाई ही मस्कत वरून खुणावत होत्या. दोन्ही हात कमरेवर घेऊन ठसक्यात उभी गौरा दिसत होती. " मावशे, माझी 'याद' आहे ना? " सुरवात जोरदार केली खरी पण भीती होतीच. लोकरीचे गुंडे जागोजागी दिसतील असे पेरून कोठीच्या खोलीला नो एन्ट्री चा बोर्ड लावून जय्यत तयारी केली. :) आणि चक्क आरंभशूर न ठरता बरीच मजल मारली. त्यातले काही नमुने सोबत जोडतेय.



बाबा


ध्रूव


गौराई


आदितेय


आदितेय


ऋषांक


आरुष


हेरंब

( अजूनही आहेत काही व विणकामाचा नाद जोरावर आहे... :) दुसर्‍या भागात टाकते )

Wednesday, April 27, 2011

स्वत:साठीही जग गं .....

तू नेहमीच मनस्वी वागायचीस. स्वत:वर आसुसून प्रेम करायचीस. अगदी लहान होतीस तेव्हांही आणि आता ’ सरलं किती - उरलं किती ’ चा हिशोब स्वत:च वारंवार मांडू लागलीस, तरीही. तुझा अट्टाहासी, झोकून देण्याचा स्वभाव तसाच किंबहुना जास्तीच मनस्वी झालाय. मनात एखादी गोष्ट आली की त्याक्षणापासूनच तू स्वत:ला त्या गोष्टीस समर्पित करून टाकायचीस. योग्य-अयोग्य, गरज, शक्य-अशक्य, यासारख्या माझ्या मध्यमवर्गीय शंकाकुशंका कधीच तुला पडल्या नाहीत. चुकून कधी मी त्या तुझ्या डोक्यात भरवण्यात कणमात्र यशस्वी झालेच तर, तू ते कधीच मला दाखवले नाहीस आणि त्या कणमात्र शंकांना लगेचच कचऱ्याची टोपली दाखवायला चुकलीही नाहीस.

परिणामांची तुला कधीच भीती नव्हती आणि क्षितीही. एखाद्या गोष्टीला किती वाहून घ्यायचं हे परिमाणात तू मोजलं नाहीस की त्या वेड्या ध्यासातून तुला सुखाची-दु:खाची-प्रेमाची-अवहेलनेची-तिरस्काराची-रागाची आणि शब्दात न मांडता येणाऱ्या ’ त्या ’ काही जिव्हारी भावांची प्राप्ती होईल याचीही फिकीर केली नाहीस. मोजके, अगदी बोटावर मोजण्या इतकेच अपवाद वगळता हा मनस्वी अट्टाहास तुला अपयशच देऊन गेला. तरीही तू थांबलीच नाहीस.

नक्की काय शोधत होतीस गं तू? का कोण जाणे, ’ खरंच का काही शोधत होतीस तू? ’ या प्रश्नातून मी कधीच बाहेर आले नाही. आजही हा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. अर्थात मी तुला कधीच उत्तर विचारले नाही. जे तुझ्याकडे नाही ते विचारण्यात काय मतलब गं? उगाच तुझ्या डोळ्यात त्या प्रश्नाने क्षणमात्र उठणारी वेदनेची लहर, कुठेशी लागलेली बोच, ठसठसणारी ठेच उघडी पडायची अन मीच त्यात जखमी व्हायची. नेहमीसारखीच. पुन्हा पुन्हा:.... आताशा तुझ्या वेदनांची-ठेचांची दुखरी ठणठण सोसायची ताकद नाही गं माझ्यात. म्हणून बये, वारंवार तुला सावरायचा फोल प्रयत्न मी सोडत नाही. तुला आवडो न आवडो, पटो न पटो... तू माझीच... माझ्यातच सामावलेली आहेस ना बयो.... म्हणून माझा हा दुबळा अट्टाहास सोडत नाही. त्या विक्रमादित्यासारखीच मी ही सदैव प्रयत्न... प्रयत्न आणि प्रयत्न करते आहे. पाहू कोण जिंकते ते. कुठेतरी, कधीतरी तू थकशील.... थांबशील.... शांत बसशील..... मी वाट पाहीन. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत..... मात्र जिंकेन नक्की.

ही आयुष्यभर अशीच सामान्य... नाही नाही, मध्यमवर्गीयच राहणार. अगदी लाडका शब्द आहे तिचा हा. या मध्यमवर्गाचे चांगलेच फावले आहे. काही जमले नाही, काही मिळाले नाही... अहं... मिळवता आले नाही की लगेच याच्यावर खापर फोडून मोकळे व्हायचे. जरा चौकटीच्या बाहेर जायची वेळ आली की लगेच याची ढाल पुढे करायची.

मनात कितीही भराऱ्या मारायची ऊर्मी उसळली तरी, " छे! हे कुठले आपल्या आवाक्यात... " असे म्हणत तेच तेच घिसेपिटे, मागल्या पानावरून पुढच्या पानावर मिळमिळीत आयुष्य उलटत राहायचे. बदल गं जरा स्वत:ला. हे बागुलबुवे तूच उभारलेस, तेही अनाकारण. अगं, इथे स्वत:चे झालेय जड तिथे दुसऱ्याच्या आयुष्याची उठाठेव करायला कोणाला वेळ आहे?

काय म्हणतेस? स्वत:च्या पायाखाली काय जळतेय हे पाहायला वेळ नसेल पण लोकांच्या घरची खडानखडा माहिती आहे.

बरं. समजा असेलही तू म्हणतेस तसे. त्याने तुला काय गं फरक पडतो. मुळात तुझा स्वत:कडे पाहण्याचा चष्मा बदल. लोक काय म्हणतील.... हे शब्दच तुझ्या कोशातून हद्दपार कर. आणि लोकांचे काय घेऊन बसलीस, त्यांना स्वत:च्या टोचणीतून सुटका हवी असते ना. मग करतात हा दुसर्‍याच्या जीवनात डोकावण्याचा टाईमपास. तू कधीपासून लोकांच्या या छंदाला भीक घालू लागलीस? अगं ते तुला जगायला देत आहेत/नाहीत हा संभ्रम का पडावा? एकेक नवलच ऐकते आहे मी हे. जरा जग गं मनापासून.... मनसोक्त! इच्छा, ओढ, आस फक्त मारण्यासाठीच नसते गं. उद्या तू फटदिशी मरून गेलीस ना, तर लोकं त्यांना म्हणायचे तेच म्हणतील फक्त तुझा जीव मात्र गेलेला असेल. मग ही भावनांची आसुसलेली भुतं धड ना तुला मरू देतील धड ना दुसऱ्या जीवात जगू देतील.

अजूनही वेळ गेलेली नाही. जगायचे, का रोज... अव्याहत कणाकणाने कुढत मरायचे..... निवड तुलाच करायची आहे. निदान ती तरी मोकळी होऊन.... निर्भयपणे कर..... करशील ना?

चला. आजचा एपिसोड संपला रे. आताशा ही प्रतिबिंबांची लढाई वारंवार होऊ लागली आहे. का? भुवया का उंचावल्या तुझ्या? ’ प्रतिबिंब ’ म्हटले म्हणून? मग काय म्हणू? खरं सांग, ’ तुला तरी कळतेय का, खरी कुठली आणि छबी कुठली? ’ भेसळ इतकी बेमालूम आहे की माझा पाराही ओळखू शकत नाही आताशा. म्हणा, मी ही काहीसा जीर्ण, विदीर्ण झालोय. कुठे कुठे पारा उडलाय... विरलाय.... त्या विरलेल्या तुकड्यात दिसणारी तिची तडफड पाहवत नाही. वाटतं, सांगावं तिला.... इतरांसाठी जगच गं बयो पण त्याचबरोबर स्वत:साठीही जग गं..... स्वत:साठीही जग.....

( फोटो जालावरून साभार )