गेल्या महिन्यात पाहुण्यांना घेऊन, " मॅकिनॉव आयलंड, सूलॉक्स, टकमिनॉव फॉल्स व पिक्चर्ड रॉक्स " असा एक मस्त दौरा केला. यावेळी पिक्चर्ड रॉक्सपासून सुरवात करून उलटे मागे येतेय. मॅकिनॉवचा वृत्तांत काही दिवसांपूर्वी इथे दिलाच आहे. यावेळी नवीन काही फोटोंची भर पडली असल्याने शेवटी ते फोटो टाकेनच.
जगप्रसिद्ध असलेल्या पिक्चर्ड रॉक्सना कितीही वेळ व कितीही वेळा पाहिले तरीही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटेल. अगदी नायगारा सारखेच. पाहिलेत नं, माझे नायगारा प्रेम लगेच उफाळले. यावर्षी उन्हाळ्यात गेलो नाही आम्ही. अजून रुखरुख लागलीये. अर्थात हातात दोन महिने तर नक्कीच आहेत तेव्हां कधीही भूर्रर्रर्रकन उडेनही.
तर जणू हे खरेखुरे दृश्य नसून चित्रेच पाहतोय की काय असे वाटायला लावणारे, वेड लावणारे हे ' चित्रदगड ’. लेक सुपिरिअरच्या दक्षिण किनाऱ्यावर साधारण ४२ मैलाच्या परिसरात पसरलेले, वाळूचे बनलेले हे दगड व त्यातून घडलेल्या कडे-कपारी, उंचउंच कपचे कपचे काढल्यासारख्या अवाढव्य भिंती, मधूनच अगदी टोकदार सुळके, तर कुठे चक्क नेटीव इंडियन्सच्या चेहऱ्याचा भास व्हावा, ( अगदी खराच चेहराच आहे असे वाटावे इतका भास होतो. ) लवर्स पॉईंट, इंद्रधनुष्यी गुहा, जणू युद्धासाठी उभ्या आहेत असे भासणाऱ्या युद्धनौका, लवर्स लिप, चॅपेल रॉक. हे सारे ज्ञात आकार. परंतु खरे तर जितके गुंगून आपण पाहू लागतो तितके अनेकविध आकार आपल्याला दिसू लागतात. हा मनाचा खेळ पुढे पुढे इतका वाढतो की मग बोटीतले अनेक अनोळखी सहप्रवासीही एकमेकांना, " अरे, ते पाहिलेस का? किती खराखुरा वाटतोय नं?" असे प्रश्न विचारू लागतात.
वाळूच्या दगडांवर गेली हजारो वर्षे पाणी, वारा - वादळे, पडणारा प्रचंड बर्फ व त्याचा या दगडांवर चढलेला जबर थर व कधी हलक्या तर कधी सपकारे ओढणाऱ्या, कधी प्रचंड उसळी घेऊन या दगडांवर फुटणाऱ्या मोठ्याला लाटांमुळे या दगडांचा आकार बदलत गेला व बदलतो आहे. काही कपारी तर खूपच खोल आहेत. काही ठिकाणी कमानी झाल्यात. या ३७ मैलात नानाविध प्रकार आपल्या डोळ्यांना सुखावतात. हे सारे विविधाआकार धारण केलेले दगड नैसर्गिकरीत्या अत्यंत मनोहरी रंगांनी मढवलेले आहेत. पाण्यातली निरनिराळ्या खनिजांमुळे चॉकलेटी, तांबूस, रापलेला सोनेरी रंग, मँगनीज, तांबे, चुनकळी, लोखंडामुळे चढलेली हिरवट छटा..... या दगडांवरून अनेक ठिकाणी कोसळणारे छोटेमोठे धबधबे - एकंदरीत सात मोठे धबधबे व अगणित छोटे ओहोळ, सुपिरिअर लेकचे नितळ, स्वच्छ - कुठे हिरवेगार तर कुठे निळेशार पाणी..... या साऱ्यावर जेव्हां अस्तास जाणाऱ्या सूर्याची किरणे उन्हाळ्यात पडतात तेव्हां ते तीन-चार तास अवर्णनिय़ आनंदाचे. डोळ्यांचे पारणे फिटते. एका ठिकाणी तिन्ही बाजूंनी प्रचंड उंच कपच्यांच्या भिंती, त्यावर अक्षरशः पाचूच मढवलेत असे वाटावे इतका गडद हिरव्या रंगाचा राप व खाली हिरवेकंच पाणी.... वेडे झालो होतो आम्ही सगळेच. निसर्गाची किमया अगाध आहे, तो अनंत करांनी उधळतोय आपल्यावर..... आपण त्याच्या स्वाधीन होऊन जायचे. बस.
वर्षातील सगळ्या ऋतूंत वेगवेगळे सौंदर्य पाहायला मिळेल असे हे ठिकाण. आवर्जून निदान एकदा तरी भेट द्यावीच असेच हे ठिकाण. जेव्हां पीक विंटर असतो त्यावेळी पुन्हा भेट द्यायची असे आजतरी मी ठरवलेय. साधारण १४० इंच बर्फ पडतो. लेक सुपिरिअरचा वरचा १३ इंचाचा लेअर या परिसरात गोठतो. हा संपूर्ण ४२ मैलांचा किनारा व चित्रदगड हिमाने माखलेले असतात. त्यातून निर्माण होणारे आकार, हिमावर पडलेली सूर्याची किरणे, लकाकणारे हिमं, इंद्रधनू लोलक.... जीवघेणी थंडी असली तरी त्याहून जीवाला पिसे लावणारे दृश्य पाहायला जायचेच.
सोबत नचिकेतने कॅमेऱ्यात बंदिस्त केलेली विलोभनीय दृश्ये दोन भागात टाकतेय. चित्रफितीही मला टाकायच्यात. परंतु मॅकिनॉवचे प्रॉमिस अजून पुरे केले गेलेले नाही - सॉरी. नाईलाज झालाय अगदी. पण ते माझ्या हातात नाहीये नं..... नचिकेतच्या नाकदुऱ्या काढणे चालू आहे.... कधीतरी यश मिळेलच. तेव्हां पिक्चर रॉकच्याही चित्रफिती लवकर टाकेन अशी आशा मनाशी बाळगून आहे.
मस्त भटकंती सुरु आहे हा... :) आणि 'हातात दोन महिने तर नक्कीच आहेत' ह्या वाक्याचा अर्थ काय घ्यायचा ताय??? ठरले का नक्की? फोटो मस्तच.. कधीतरी यायला हवे तिकडे... :) २०११ मध्ये...
ReplyDeleteवाह...अप्रतिम...फ़ोटू तर भन्नाट आहेत!!
ReplyDelete(श्री ताइ तुझ्याकडे येइन तेव्हा आपण नक्की जाउ या.:) :) )
हो तर...अरे हे चारपाच महिनेच काय ते मिळतात नं. थंडीची चाहूल लागायला दोन महिने आणि मायदेशी यायलाही (बहुतेक-अजून तिकीटाचा पत्ता नाहीये... :( ). रोहणा, तू तर सारखा येतजात असतोसच ना, फक्त पर्फेक्ट वेळ साधायला हवी.:)
ReplyDeleteधन्यू रे योगेश. ( जाऊ रे आपण... :) )
ReplyDeleteWilobhneey !
ReplyDeleteवाह...अप्रतिम...फ़ोटू तर भन्नाट आहेत!!
ReplyDelete(श्री ताइ तुझ्याकडे येइन तेव्हा आपण नक्की जाउ या.:) :) )
मी पण मी पण... योगेश बरोबरच जाऊ या रे सगळे!!
धन्यवाद आशाताई.
ReplyDeleteतन्वे, अगं तुला तर कधीचेच बोलावतेय नं मी... आधी या तर खरं मग पुढचे पुढे... खादाडी करायची का फिरस्ती. :)
ReplyDeleteएकसे एक फोटू आहेत...
ReplyDeleteअप्रतिम!
nice color combination...specially blue water.
ReplyDeletekharech water ani wind khup kahi karu shaktat
ani me ga..?????mala nahi na bolavale...mala visarlat doghi...
ReplyDeletefotuj apratim...ajun ahet na mah lavakar taka...wat baghing..
मस्त! वर्णन खूप छान जमून गेलंय...'एका ठिकाणी तिन्ही बाजूंनी प्रचंड उंच कपच्यांच्या भिंती, त्यावर अक्षरशः पाचूच मढवलेत असे वाटावे इतका गडद हिरव्या रंगाचा राप व खाली हिरवेकंच पाणी'....बहिणीला सांगते आता मी तिथे पोचायला! फोटो पण खूप छान आहेत! आणि नायगारा मला पण खूप भावला होता...इतका प्रचंड अविरत धबधबा कसा काय असू शकतो, असं वाटलेलं... आणि आपण किती लहान!
ReplyDeleteवॉव.. कसले सॉलिड फोटोज आहेत ग !! पहिल्या फोटोत नेटिव्ह इंडियनचा अगदी स्पष्ट भास होतो..
ReplyDeleteव्हिडीओज पण टाक लवकर लवकर..
धन्यवाद विभी.
ReplyDeleteमाधुरी, अगं एका ठिकाण तर असे आहे की तिन्ही बाजूने पाचूच्या भिंती व खाली तितकेच हिरवेकंच पाणी.... तो रंग क्रुजमधून पकडता येत नाही गं. त्यासाठी १३ मैलांचा ट्रेलच करायला हवा. अन्यथा उडायला हवे. पाहू कदाचित लगेचच पुन्हा जायला जमले तर यावेळी मात्र आम्ही कॅम्पिंग करू म्हणजे तोच काय एकंदरीत २७ मैलाचा ट्रेल करता येईल. :)
ReplyDeleteधन्यवाद माधुरी.
उमा, अगं तुला घेतल्याशिवाय जाईन का मी?? तुम्ही आधी या प्रेमाच्या गावी या मग आपण मस्त बस करून जाऊ. :D
ReplyDeleteअनघा, आपले सूर मस्त जुळतात गं. हे पाहा इथे जाऊन जरा माझे नायगारा पागलपण. फोटो आणि चित्रफितीही आहेत. तीनचार पोस्ट आहेत गं लागोपाठ.
ReplyDeletehttp://sardesaies.blogspot.com/2010/02/blog-post_10.html
हेरंब, तरी हा फोटो थोडा लांबूनच घेतलेला. जरा अजून जवळ गेलो नं की स्पष्ट कळतो चेहरा. जवळून घेतलेला फोटो असायलाच हवा. शोधते आता.
ReplyDeleteधन्यवाद. :)
मी हे फोटो पाहिले तेव्हा मला खरच ही कुठच्या तरी मासिकातली चित्रे असल्यासारखी वाटली.छानच हा!!
ReplyDeleteलय भारी!!
ReplyDeleteविस्कॉंसीन डेल्सच्या इथे पण असे नदीमुळे झालेले खडकातले आकार पाहिले होते ते आठवलं...हे मात्र अप्रतिम आहेत...आता मात्र तुझ्याकडे यावंच लागेल...:)
ReplyDeleteगेला आठवडा साईट्वरच पडीक होतो, त्यामुळे आजच पाहिले हे पोस्ट. फोटो तर नितांत सुंदर आहेत. प्रोफेशनली काढलेले वाटतात.
ReplyDeleteव्हिडीओ टाक लवकर यु ट्य़ुबवर..आणि पोस्टचं शिर्षक पण छान आहे.
धन्सं श्रीराज.
ReplyDeleteआनंदा, धन्यवाद रे.
ReplyDeleteअपर्णा, अगं किती चुकल्यासारखे वाटत होते मला तू दिसत नव्हतीस तर... :)
ReplyDeleteधन्य़ू गं.
महेंद्र, धन्यवाद. कशाबद्दल माहितीये का.... तुझी कमेंट वाचून नचिकेतला थोडा उत्साह संचारलायं... आता लवकर व्हिडिओज मिळण्याची आशा बळावली. :)
ReplyDeleteसुंदर :)
ReplyDeleteजेव्हा शब्द सुचत नाहीत तेव्हा डोळे बरच काही व्यक्त करतात. कॅमेरा म्हणजे जणु दुसरा डोळाच. निसर्ग कितीही छान असला तरी तो ईतक्या अप्रतीमपणे टीपायला सौंदर्य दृष्टी हवीच. ही दृष्टी या फोटों मधुन नक्कीच दिसते.तेव्हा या अप्रतीम बोलक्या फ़ोटोंना शब्दात व्यक्त करताना खुपच कसरत करावी लागली असेल नाही?. ही कसरत कमीत कमी शब्द वापरुन तु छान पार पाडली आहेस.
ReplyDeleteदेवेंद्र, वा! मनापासून दिलेल्या अभिप्रायाबद्दल अनेक आभार.
ReplyDeleteधन्यवाद मंदार.
ReplyDeleteसुभानल्लाह... क्या अदाकारी है कुदरत की. और हम आपकाभी शुक्रगुजार करना चाहते है की आपने ईस खुबसुरती को इतनी नजाकतसे पेश करके उसके साथ पुरा पुरा इन्साफ किया है... बोहोत खुब...
ReplyDelete