जाता जाता एक नजर इथेही........

Friday, April 3, 2009

लोकलच्या गमतीजमती...

अनेक गोष्टीशी आपले नाते चिरंतन टिकणारे असते. त्यातली एक, मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेली ' लोकल '. मुंबईकरांना आपल्या तालावर नाचवणारी पण इमानी सखी. सोळा वर्षे मी ह्याने प्रवास केला आहे दररोज सकाळ-संध्याकाळ. ह्या अव्याहत प्रवासात अनेक घटना घडल्यात. काही गमतीशीर, तर काही फजिती करणाऱ्या. त्यातलाच एक मजेशीर प्रसंग....

बहुतांशी मी सीएसटीला उलट जाऊन ठाणा स्लो लोकल पकडत असे. एकतर उलट बसून गेलेली गाडीच ठाणा लोकल लागे. अगदी नाहीच लागली तरी बाजूच्या प्लॅटफॉर्मला लागलेली नक्की ठाणा असे. त्यामुळे छान खिडकीची जागा अन मस्त वारा खात किमान अर्धा तास झोप. हा रोजचा ठरलेला कार्यक्रम. ठाण्याला जायला जरी तासभर लागत असला तरी आपल्या समोर उभ्या असलेल्या एक-दोन जणींना थोडा थोडा वेळ बसायला दिल्यामुळे अर्धा तास त्यात जाई. ह्यामागे थोडा स्वार्थ आणि थोडा परमार्थ. स्वार्थ हा की जेव्हा माझ्यावर उभे राहून जायची वेळ येई तेव्हा असेच कोणीतरी मलाही जागा देईल, आणि त्याबरोबर कणाएवढे पुण्य पदरात पडेल.

तर एकदा अशीच मी उलट गेलेली. मस्त खिडकीची जागा मिळाली होतीच. गाडी निघायला चांगली पंधरा मिनिटे होती. तुरळक गर्दी होती. प्लॅटफॉर्मवर माझा मित्र दिसला, नेमके त्याचेही लक्ष गेले माझ्याकडे. मी खिडकीत आत आणि तो बाहेर असे गप्पा मारू लागलो. अजूनही म्हणावी तशी गाडी भरली नव्हती. तो म्हणाला, पर्स ठेव आणि ये की दरवाज्यात. गाडी सुटायला दहा मिनिटे होती. मी उठले, पर्स ठेवली. शेजारच्या बाईला, मी दरवाज्यातच आहे असे सांगून दार गाठले. गप्पा करता करता एकीकडे हळूहळू गर्दी वाढू लागल्याचे माझ्या लक्षात आले होते. मित्राला म्हटले, " चल तूही पळ आता, मी जाते सीटवर, नाहीतर बसेल कोणीतरी. " तो गेला.

मी दारातून आत आले आणि पाहते तो काय, माझी पर्स खिडकीला समांतर ठेवून जेमतेम सहा इंच जागा शिल्लक ठेवली होती. आठच्या जागेवर नऊ बसतातच हो, पण नववी मध्ये बसते त्यामुळे मावून जाते. आता ह्या लबाड बायकांनी माझ्या तिथे नसण्याचा फायदा असा उठवला होता. सगळ्या डोळ्याच्या कोपऱ्यातून माझ्याकडे पाहत होत्या. मी एकदा त्या सगळ्यांकडे पाहीले आणि एकदा खिडकीकडे. आणि मस्त खो खो करून हसले. मग जो काही स्फोट झाला सगळ्यांच्या हसण्याचा की बस. मी पर्स उचलली आणि हसतच मधली नववी जागा घेतली. मनातून प्रथम मला खूप राग आला होता. वाईटही वाटले होते, किती दुष्ट वृत्ती ह्यांची. पण हे सगळे दाखवून त्रागा करून फायदा काहीच नव्हता उलट जास्तीच हसे झाले असते. त्यामुळे हसून साजरे करणेच योग्य होते. थोड्याचवेळात दादरला एक जण उतरून गेली आणि मला व्यवस्थित बसायलाही मिळाले.

आजही त्यातले काही चेहरे आणि त्यांचे मी आत येताक्षणीचे मिस्कील भाव मला आठवतात. त्याक्षणी त्रास झाला खरा पण नंतर माझी झालेली फजिती आठवून खूप हसूही आले. पुन्हा कधीही मी जागा सोडून गेले नाही हे वेगळे सांगायला नकोच.

4 comments:

 1. मी तुझ्या ब्लोगला परत भेट दिली. तु लिहीलेले चांगलेच आहे. माणसाने आपले अनुभव आणि विचार जरुर व्यक्त करावेत.कारण प्रत्येकाकडे आवर्जुन सांगावे असे काहिसे संचित असतेच नाही का?.आपल्या भल्या वाईट अनुभवांचा कोणाला फ़ायदा होवो ना होवो, पण आपले मनतर मोकळे होते. अनेक वेळा आपल्याला जे म्हणायचे असते ते संगतवार बोलता येतेच असे नाही. पण लिहीताना ते शक्य होऊन जात........सहजपणे.
  परस्पर संवाद ही माणसाची गरज आहे.. तर सुसंवाद ही माणसान मधिल नाती टिकण्यासाठी आवश्यक गोष्ट .असो.
  तु तुला व्यक्त करतेस ही चांगली बाब.
  त्यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा.
  मैत्रेय१९६४

  ReplyDelete
 2. मैत्रेय, मनापासून आभार. समोरासमोर संवाद घडतो हे मला जास्त महत्वाचे वाटते. सुसंगत का विसंगत हा नंतरचा भाग. ह्या जालामुळे हजारो मैलांनचे अंतर पार करून मला हा संवाद साधता येतोय. तुझे आपलकीने लिहीलेले दोन शब्द खूप आनंद देऊन गेले.

  ReplyDelete
 3. मस्त. अगदी खुसखुशीत किस्सा लिहिलाय तुम्ही.

  ReplyDelete
 4. मस्त लेख. अगदी खुसखुशीत लिहिलयस.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !