जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, December 6, 2012

होशियार ! सेलिब्रेटी भक्तिभाव येतोय हो!

 
सगळ्या वृत्तपत्रात मोठ्या मोठ्या मथळ्यात व्हिडिओ-फोटोसहित झळकलेल्या पॅरिस हिल्टनच्या सिध्दिविनायकवारीचा वृत्तांन्त वाचून-पाहून कपाळावरची शीर अशी काही तडतडू लागली. चिडचिड झाली. नक्की कोण कोणाच्या भेटीला गेलेय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती पाहून, या नेमेची चाललेल्या या देवभेटीच्या तमाशाचा उबग आला.

तशी अलीकडचीच गोष्ट..... एक वेळ अशी  होती  कि रोज सकाळी कॉन्ट्रॅक्ट बस येण्याआधी मी धावत धावत गाभार्‍यात जात असे. पटकन देवाला नमस्कार करुन ऑफिसला पळायचे. संध्याकाळी उतरल्यावर शांतपणे देवळात जाऊन प्रसाद घेऊन घरी. पुढे शोमू झाल्यावर त्याला प्रथम सिध्दिविनायकाच्याच दर्शनाला नेलेले. कसलीही पळापळ नाही की चलाचलाचा हाकारा नाही. सिध्दिविनायकाला लागूनच डॉक्टर पेंडसेचा दवाखाना आहे. ( आताही असावा ) बाळ शोमूचा तोच डॉक. दर पंधरा दिवसांनी डॉकचे मग बाप्पाचे दर्शन ठरलेले. कधी लाईन लावलेलीही आठवत नाही. तेच आता गेल्यावेळी जिद्द करुन गेले तर दोन तास लाईन लावल्यावर माझा नंबर आल्यावर माझ्यापाशी मूठीत मावेल इतकुसा कॅमेरा होता म्हणून सुरक्षारक्षकाने मला आत सोडले नाही. त्याला म्हटले बाबा रे, फार लांबून आलेय रे. तुझ्याकडे ठेव कॅमेरा. मी नमस्कार करुन येते आणि घेऊन जाईन. जमणार नाही म्हणाला. शेवटी एका फुलवाल्याकडे चक्क रुपये ५०/- देऊन कॅमेरा ठेवायला दिला. लोकंही काय काय धंदे शोधून काढतील तेवढे थोडेच आहे. शिवाय ही  मिलीभगतही  असू शकेल. कोणाकोणाचे कट यात असतील ते तेच जाणोत.

पॅरिसबाईंची थोरवी काय ती वर्णावी. नेसूचे सोडून डोसक्याला गुंडाळून बागडून झाले. अंमली पदार्थांच्या अमलाखाली दे धमाल, कर कमाल अव्याहत चालूच. बापजाद्यांच्या पुण्याईवर फसफसून उतूनमातून झाले. दारू ढोसून गाडी चालवू नको गं राजकन्ये... हा मोलाचा सल्ला बिचारीला कोणीच दिला नाही मग ती काय करणार... बिचारीला त्यामुळे जेलच्या वार्‍या झाल्या. वेगवेगळे धंदे करूनही आताशा कोणी विचारीना झाले म्हणूनशान हे अचानक भारतभेटीचे फ्याड निघाले. आता निघालोच आहोत तर ममईला जायचेच हो राया. ’ यारायांचे बरे फावलेय. तर, ममईमधे मस्ट यादीत टॉपलादेव ’. या या... आय नो. चर्च मध्ये जाते नं मी. स्ट्रेट चालेन. उगाच तुमचे अगाऊ सल्ले नकोत. असेही तिथे आजूबाजूला आपलेच लोकं असणार नं. सो नो वरीज. लेट मी फ्रिकआऊट.


तसे हे तमाशे काही नवीन नाहीच म्हणा. एकेकाळी साधेसुधे खरेखुरे देऊळ असलेल्या देवळात अचानकपणे सेलिब्रेटींनी उपटसुंभासारख्या भेटी देऊन देऊन पुन्हा नव्याने नावारूपाला आणलेल्या मंदिरांनमधे त्यांच्या प्रचंड बिझी शेड्यूलमधून वेळातवेळ काढून जाणे. दर वारीला रात्रभर बंदुकी अवतीभोवती घेऊन अनवाणी चालणे काय. राजकारण्यांची थोरवी ती काय वर्णावी...! सध्या कोणी भाव देत नाहीये चला गवगवा करा वारीचा.... जणू देवावरच उपकार. त्यांच्या वरातींची चर्चा देवापेक्षा महान. बिचारा देव राहिला कोपर्‍यात कुठेतरी. त्यालाही आताशा सवय झाली असेल म्हणा. अश्या थोर व्यक्तींच्या चरणांची धूळ समारंभपूर्वक त्याच्या गाभार्‍याला लागणार. त्यासाठी पंधरादिवस चाललेली मंदिरप्रशासनाची धावपळ. गाभार्‍यात त्यावेळी कोण कोण असणार. गेल्यावेळी याचा नंबर लागलेला मग आता यावेळी माझा.... सारख्या चर्चा. सुरक्षिततेची चाचपणी. देवाच्या वाटली का? छे हो ! देव सुरक्षित असणार हे गृहीतकच ! त्याला चोरण्याव्यतिरिक्त काहीही करण्याचे यवनांचे/ब्रिटिशांचे थोडेच नं दिवस आहेत हे. अन चोराची काय बिशादआजदेवाला चोरण्याची.

तर....

... पडद्यामागे जोरदार तयारी होऊन एकदाचातोदिवस उजाडणार. आजची भूपाळी अंमळ लवकरच झाली का असं म्हणत देवही तयारीला लागणार. लवकर आटपा रे बाबांनो ही शाही भक्तभेट. ’ सोसवेना रे तुझी प्रार्थना आता अंमळ द्या हो शांतता ’, म्हणत देव पटापट छान तेलमाखून, शुचिर्भूत होऊन, भरजरी वस्त्रे लेऊन तय्यार. आत्ता येणार मग येणार म्हणत म्हणत देवालाच चांगले चार तास तिष्ठत ठेवून प्रत्यक्ष सोकॉल्ड फेमभक्त अवतरला की ही धावाधाव. पुढेपुढे करणार्‍यांची अहमिका पाहून देवाचा वासलेला ’. सीसीटीव्हीवर दिसत असलेला अगदी मंदिराच्या प्रवेशदारी गाडी थांबल्यापासूनच सुरू झालेला चकचकाट पाहून देवाचे डोळे दिपून विस्फारलेले. आले आलेची खात्रीशीर आवई उठताच पुजार्‍यांनी सावरलेले देवाचे वस्त्र, हार. सारे काही नेटकेची चाणाक्ष नजरांनी केलेली खातरजमा. बाजूला व्हा, बाजूला व्हा असे हातातोंडाने म्हणत बंदुकींसोबत या महान भक्ताचे गाभार्‍यात पाऊल पडताच देवाने स्वत:ला आक्रसून घेतलेले. घाबरून पाय शक्य तितके पोटाशी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या देवाच्या चरणी चकचकाटाच्या, शूटिंगच्या मनासारख्या पोझ जमताच या थोर भक्ताचे मस्तक देवाच्या चरणी टेकलेले.

बोंबला! देव बुचकळ्यात... आता मस्तक तर चरणावर टेकलेय म्हटल्यावर आशीर्वाद देणे क्रमप्राप्त म्हणून आपसूक सवयीने देवबाप्पाचा हात आशीर्वाद देण्याच्या इराद्यात.... पण... आशीर्वाद तर आहेच की याच्याकडे. आता नव्याने काय बरे द्यावे याला... यक्ष प्रश्न? काय नाहीये या भक्ताकडे? फेम, पैसा, जलसा... शिवाय हा कुठे मन्नत मागतोय? त्यातून कोण अमरपट्टा घेऊन तुपकट मिरवणारे तर कोणी पूर्वजांच्या कमाईवर पोसलेल्या देहाच्या कमनीय रेघांवर तमाशाई. असाही हा निव्वळ दिखावाच तर करतोय. हम्म...पण मी देव आहे नं..! म्हणजे दिखाव्यासाठी ठेवलेला असलो तरी अजूनतरी देव्हार्‍यात आहे. उद्याचे उद्या पाहू, आत्ता भक्त दारी उभा आहे म्हणजे आशीर्वाद देणे भाग आहे. असं वाटून देव चरणावरल्या मस्तकाचे अवघ्राण करावे म्हणतोय तर चरणच रिकामे. मस्तक गायब. गाभारा चक्क रिकामा. पुजारीही गायब. सिनड्रॉप शांतता. देव अचंबित ! सवय असूनही देवाची जिद्द सुटत नाहीच. सिन ’ पोटात घ्या म्हणायला येण्याचाच भक्तांनी केलेला सीन पाहून देवाचीच  धडकन ड्रॉप.


अरेच्च्या ! आत्ता पायाशी होता आता कुठे गेला म्हणून देवाची नकळत दुखावलेली नजर पुन्हा सीसीटीव्हीवर. गाभार्‍याबाहेर हा गलका. हातांच्या सुरक्षित साखळीत गळ्यात उपरणे, कपाळाला गंध लावून भक्तिभावाने ओथंबलेल्या चेहर्‍यावर पुन्हा विजांचा लखलखाट. अहाहा ! काय ती पवित्रता वर्णावी महाराजा.... भंपक पुण्याईचा  सारा  माझ्यादारीच दिखावा .  आदल्या रात्री हा कुठे बरं खा-प्याला होता ... सीसीटीव्ही... गो बॅक प्लीज... हां... ओबेराय! चेपून प्याला, खाऊन तडसला. नेमका माझ्या पायावर करपट उसासला. उगाच नको तेव्हां पुसापुशी करणारा पुजारी कोणीतरी स्टॅच्यू केल्यासारखा डोळे खिळवून याला चिकटलेला. स्वत: उदबत्ती जवळ ओढावी म्हणून देव हात पुढे करतोय तेवढ्यात या कडेकोट सुरक्षेला भेदून सेलिब्रेटीला पाहायला घुसलेले मागल्याच वाडीतले दहा बाय दहाच्या तुकड्यात राहणार्‍या दहा जणांच्या गरीब कुटुंबातले केविलवाणे पोर. त्याला पाहून पवित्रतेला आलेला खास कमावलेला कळवळा. लगेच पोर कडेवर, कणव चेहर्‍यावर, हात पोराच्या शेंबूड भरल्या गालांवर. देमार चकचकाट! अगदी पोटात तुटले हो बिचार्‍या पोराला पाहून. दत्तक दत्तक...! आश्वासन आश्वासन! चोहीकडूनमहान महानचा घुमत्कार!

वा! काय महान भक्त आहे माझा. नेमेची झालेले असूनही देवालाच उगाच चिवट आशा. असेल थोडा दिखाऊ, माजलेलाही असेल, बापकमाई हा काय त्याचा दोष थोडाच आहे. माणूस आहे नं चुकायचाच.... पण अजून जमिनीवर आहे नं. हेही नसे थोडके. म्हणून देवाची नजर पुन्हा सीसीटीव्हीवर. आं ! हे काय? पोर गायब.... हातात ओला टिश्य़ूपेपर.... खसखसून पुसलेली बोटं, भरभर स्वब्रँडचा फवारा. देवाला उगाच प्रश्न... तो पोरगाहीपेडअसेल का? कलियुग रे देवा कलियुग!


झाला  इतका दिखावा पुरेसा आहे याची नीट खात्री करून निघालेला गाड्यांचा ताफा. काळ्याकाचांआड काहीही दिसत नसूनही बाय बाय चे जोरदार हालणारे हात. शेवटच्या गाडीचे टेललाईट अदृश्य झाल्याक्षणी गडाचे दरवाजे बंद. दोन्हीबाजूने एक एक बारकुसे गेट किलकिले. सीसीटीव्हीवर दिसणारी तुडुंब वाहत असलेली भक्तांची रांग पार महाराष्ट्र हायस्कूल युनायटेड वेस्टर्न पर्यंत पोचलेली. सकाळपासून कुठूनकुठून आलेले गरीब भक्त तिष्ठून, उपासून, दमूनभागून गेलेले. गेट उघडलेले पाहून त्यांची उडालेली लगबग. आता देवाचे दर्शन होणार म्हणून सुकलेल्या ओठांवर फुललेले हसू. एकीकडे मनात दर्शन घेऊन घरी जायला किती वेळ लागेलची चाचपणी सुरू. साध्या भक्तांचे बिचारे साधे साधे प्रश्न. आता कंटाळलेल्या सुरक्षारक्षकांची वैतागलेली व जणू समोरचा प्रत्येक अतिरेकीच आहे... ची नजर. देहाची, पर्सची यथासांग चाचपणी झेलून भक्त गाभार्‍यात ढकलला गेलेला. पहाटे पाचपासून निघालेल्या जीवाला मोजून तीस सेकंद गाभार्‍यात वास्तव्य. तेही सतत ढोसकून ढोसकून. पहिली दहा सेकंद ढकलले गेल्याने सावरण्यात, पुढल्याला नजरेनेच माफ कराची विनवणी करण्यात जातात. पुढले दहा सेकंद देवासमोर जिद्द ठेवून उभे राहण्याचा प्रयत्न करण्यात पुजार्‍याचा हात शोधून त्याला सोबत आणलेला चढावा देण्यात आणि शेवटल्या दहा सेकंदात देह पुढे अन डोळे शक्य तितके देवावर खिळवून ठेवण्याचा आटापिटा करणारा भक्त गाभार्‍याच्या बाहेर फेकला जातो.


मनगटावरील घड्याळात सहा वाजलेले असतात. देवा याचसाठी केला होता का हो हा अट्टाहास! धरीला तुझ्या चरणांचा ध्यास! तुला प्रिय सेलिब्रेटींचा सहवास! यापुढे पाहीन तुला जालावर! असा निश्चय मनोमनी करत भक्त स्टेशनचा रस्ता धरतो. देव गालातल्या गालात हसतो. कारण त्यालाही मनोमन माहीत आहेच, पुन्हा आपला वार येईल पुन्हा ही रांग लागेल. शेवटी हे बिचारे साधेसुधे भक्तगण देवावर प्रेम करणारे नसून देवाला घाबरणारेच आहेत. तितक्यात सीसीटीव्हीवर विश्वस्तांच्या खोलीतला गलका देवाचे लक्ष वेधतो. " पुढल्या आठवड्यात अंगारिकेला जलसा कुटुंबीय अनवाणी येतेय. तयारीला लागा.... "

 " लंबोदराचे उदर आज अंमळ जास्तीच मोठे दिसतेय का? " पुजार्‍याच्या मनात प्रश्न. त्याला कुठे दिसतोय देवाच्या पोटात उठलेला गोळा... चला देवा, लागा तयारीला ! होशियार ! सेलिब्रेटी भक्तिभाव येतोय हो!