जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, March 31, 2010

सायनचा बसस्टॉप, तो आणि ती........

कथेची सुरवात येथे वाचता येईल

त्या हव्याहव्याश्या वाटणाऱ्या चिडवाचिडवीतून सुटका करून घेत ती साहेबांकडे वळली तसे........

पुढे........

या चिडवाचिडवीमुळे साहेबांना फार काही सांगावेच लागले नाही. साडेचार होऊन गेलेच होते. त्यांनी हसत परवानगी दिली तसे पटकन प्रसाधन गृहात जाऊन तोंड धुऊन हलकासा पावडरचा हात फिरवून फ्रेश होऊन शमाने पाचला ऑफिस सोडले. चांगला दीड तास आहे अजून..... सहज पोचून जाऊ आपण. अभी तसा शहाणा आहे. नेहमी वेळेवरच येतो. असे बसस्टॉपवर एकट्या मुलीने वाट पाहत उभे राहणे म्हणजे किती दिव्य आहे......... नेमक्या मेल्या बसस्टॉपवरच्या सगळ्या नंबरच्या बसेसनाही अगदी उत येतो अशावेळी. लागोपाठ येतच राहतात..... आणि मग सगळे टकमका पाहत बसतात.

असे झाले की वाटते, नकोच ते भेटणे.... कोणीतरी घरी जाऊन चुगलखोरी करायचे. सारखी छातीत धडधड. आईला माहीत असले तरी कधी आणि कुठे भेटतोय याचा हिशेब थोडाच ना देतेय मी...... बुरखावाल्यांचे बरे आहे नाही..... निदान तेवढा तरी फायदा बुरख्याचा......... " अचानक बसला जोरात ब्रेक लागला तशी शमा भानावर आली. आत्ता या क्षणाला अभीशी बोलायलाच हवे या अनावर ऊर्मीने तिने पर्स मधून सेल काढला. अभीचा नंबर लावला...... तिच्या लाडक्या गाण्याचे सूर ओघळू लागले....... रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन....... अभी, अभी... घे ना रे फोन..... आज, आत्ता या क्षणी मला तुझा आवाज ऐकायचा आहे. हा आपला क्षण तुझ्याबरोबर पुन्हा अनुभवायचा आहे....... अभी..... सूर संपले..... सेलचा नेहमीचा मेसेज वाजू लागला तसे तिने चिडचिडून फोनचा गळा दाबला. अभी कुठे आहेस रे तू.......... काळाच्या ओघात तूही हरवून जावेस..... बस तोवर प्रियदर्शनीला पोहोचली होती. तिच्या सीटला काहीसे खेटूनच कोणी उभे होते. त्याची कटकट होऊन तिने वर पाहिले, तर बुरखावालीच होती.......... तिला हसूच आले. नकळत शमा पुन्हा भूतकाळात रममाण झाली.

आजची त्यांची भेट शमेसाठी खासंखास होती. गेल्याच आठवड्यात- रवीवारी, दोघांच्याही घरचे भेटले होते. लग्नाची बोलणी सुरू झाली होती. साखरपुड्याची तारीखही जवळपास निश्चित झाली होती. त्यामुळे आज कसे अगदी, सीना तानके भेटता येणार होते. उगाच कोणी पाहील का.... ची भिती नाही की उशीर झाला म्हणून, आई ओरडेल ची चिंता नाही. आज अगदी राजरोसपणे सगळ्यांना सांगून-सवरून ते दोघे भेटणार होते. एकदम वेगळेच फिलिंग आलेले. तिला आठवले....... रवीवारी निघताना अभी म्हणाला होता, " शमे, पुढच्या भेटीत तुझ्यासाठी मस्त साडी घेऊ गं. आपल्या या भेटीची खास आठवण राहायला हवी. " आनंदातच शमेने आईला फोन करून भरभर सगळे सांगितले. अभी येईल गं मला घरी सोडायला.... तेव्हां उशीर झाला तरी तू मुळीच काळजी करू नकोस असेही वर सांगून तिने फोन ठेवला आणि निघाली. बसही पटकन मिळाली आणि चक्क खिडकीही मिळाली. आज सगळेच कसे मनासारखे घडतेय नं असे म्हणत आनंद स्वरातून ओघळत, गुणगुणत राहिली.

बरोब्बर सहा पंचविसाला सायन हॉस्पिटलपाशी बस पोहोचली. शमा पटकन उतरली. उतरतानाच तिची नजर अभीला शोधत भिरभिरली........ हे काय....... हा अजून पोहोचलाच नाही का? बास का महाराजा........ म्हणे मी तुझी वाट पाहत असेनच........ बस गेली तशी बसस्टॉप जरासा निवांत झाला. शमेने आजूबाजूला नजर टाकली पण कुठेही अभी दिसेना. मन थोडे खट्टू झाले खरे...... पण मान उडवून तिने नाराजी झटकली. येईलच दोन-पाच मिनिटात. खरे तर त्याला कधीच उशीर होत नाही. नेहमी आपली वाट पाहत असतो. तेव्हां आजच्या उशीराचा उगाच बाऊ नको करायला. फार तर काय एखादी बस येईल आणि लोकं पाहतील....... इथे चांगल्या चार पाच नंबरांच्या बसेस येतात. तुमची बस नकोय मला....., स्वत:शीच ती बडबडत होती. नजर मात्र अभीची चाहूल घेत राहिली. बरे फोनवर अभीने अमुक एका नंबरच्या बस स्टॉपवर असेही म्हटले नव्हते..... तसाही इथे हे लागून दोनच तर बस स्टॉप आहेत. म्हणजे कुठेही तो असला तरी मला दिसेलच की. येईलच इतक्यात.......

पंधरा मिनिटे झाली..... अभीचा पत्ताच नाही. नेमके शेवटच्या मिनिटाला काहीतरी काम आले असेल....... ट्रेन चुकली असेल....... सायन स्टेशनवरून चालत येईल ना तो...... जरा लांबच आहे तसे इथून..... अर्धा तास...... पाहता पाहता साडेसात वाजले. आता मात्र शमेचा धीर खचला...... डोळे अश्रूंनी काठोकाठ भरले. नेमके आजच अभीने न यावे...... का? बरा असेल ना तो? अपघात .... काही बरेवाईट तर घडले नसेल नं...... अग आईगं....... छे! काहीतरीच..... हे काय वेड्यासारखे विचार करतेय मी........ इथे जवळपास कुठेही पब्लिक फोनही नाही. नाहीतर निदान त्याच्या घरी तरी फोन केला असता. रडवेली होऊन शमा अजून पंधरा मिनिटे थांबली...... अभी आलाच नाही. हळूहळू कुठेतरी रागही आलेला होताच........ आता तर ती जामच उखडली. दुष्ट कुठला........ आता पुन्हा भेटायला बोलाव तर मला...... मुळीच येणार नाही मी. किती आनंदात होते आज ......... छानशी साडी घेऊ, मस्त काहीतरी चटकमटक चापू...... मधूनच हात हातात घेऊन रस्त्यातून चालू...... सगळे मांडे मनातच राहिले...... गालावर खळकन अश्रू ओघळले तशी ते पुसून टाकत, घरी जावे असा विचार करून ती निघाली.

रोड क्रॉस करून समोर जावे लागणार होते...... तिथून बस घेऊन घरी....... गाड्या जाईतो थांबावे लागले तेव्हां सहजच तिची नजर सायन हॉस्पिटलच्या गेटकडे आणि बसस्टॉपकडे गेली. हे सायन हॉस्पिटलचे इकडून पहिले गेट आणि पहिला बस स्टॉप असला तरी हॉस्पिटलचे दुसरे गेट आहेच आणि तिथेही बसस्टॉप आहेतच की. घातला वाटते मी घोळ......... अक्षरशः पळतच ती निघाली. जेमतेम पंधरावीस पावले गेली असेल तोच समोरून घाईघाईने येणारा अभी तिला दिसला. चेहरा चांगलाच तापलेला होता..... तिच्याकडे लक्ष गेले आणि तो तटकन तिथेच थांबला. भर्रर्रकन शमेने त्याला गाठले...... जणूकाही आता पुन्हा तो गायबच होणार होता. त्याला काही बोलायची संधी न देताच, " अभी, अरे किती हा उशीर केलास तू? बरोब्बर सहावीसला मी पोहोचलेय इथे. तेव्हांपासून तुझी वाट पाहतेय. तुला यायला जमणार नव्हते तर कशाला बोलावलेस मला........ सव्वा तास मी एकटी इतक्या नजरा आणि लोकांचे शोधक प्रश्न झेलत कशी उभी होते ते मलाच माहीत. " असे म्हणताना पुन्हा तिचे डोळे त्या जीवघेण्या वाट पाहण्याच्या आठवणीने भरले आणि ती मुसमुसू लागली.


इकडे अभीचा स्फोटच व्हायचा बाकी होता. शमेसारखा तोही आज खूप खूश होता. नेहमीसारखी शमेची भुणभूण असणार नाही...... घरी जाते रे आता... उशीर होतोय, असे ती मुळीच म्हणणारं नाही. मस्त फिरू जरा, तिला पहिली साडी घेऊ..... मग छान कॅंडल लाइट डिनर करू........ पण बाईसाहेबांचा पत्ताच नाही. आता मी इथे शोधायला आलो तर वर ही माझ्यावरच डाफरतेय.... त्यात भरीला रडतेही आहे. तो रागाने तिला झापणारच होता खरा... पण असे अगदी लहान मुलासारखे ओठ काढून मुसमुसणाऱ्या... तशातही गोड दिसणाऱ्या शमेला पाहून, तिच्या जवळिकीने त्याचा राग विरघळून गेला........ असेच पटकन पुढे झुकावे आणि हलकेच हे ओघळणारे अश्रू, नाकाचा लाल झालेला शेंडा आणि थरथरणारे तिचे ओठ टिपून घ्यावेत...... मोह अनावर होऊन नकळत तो पुढेही सरकला.... तशी शमाने डोळे मोठ्ठे केले........

तोवर दोघांनाही काय घोळ झाला होता हे लक्षात आलेच होते. चूक कोणाचीच नव्हती. आता अजून वेळ फुकट घालवण्याचा मूर्खपणा तरी नको असे म्हणून अभीने टॅक्सी थांबवली. दोघे बसून टॅक्सी निघताच तिचे डोळे पुसून तिच्या टपलीत मारत अभी म्हणाला, " पुढच्या वेळी अगदी रेखांश अक्षांशही सांगेन, आजूबाजूला असलेल्या दुकानाच्या पाट्या- खुणाही सांगेन. म्हणजे आमच्या महामायेच्या कोपाला निमित्त नको मिळायला...... ये पण तू कसली गोड दिसत होतीस गं.... खास करून मुसमुसताना पुढे काढलेले ओठ..... मला तर हा एपिसोड परत पण आवडेल........ " तसे खुदकन हसत शमा म्हणाली, " हे रे काय अभी....... आम्ही नाही जा....... त्यासाठी इतका वेळ एकटीने उभे राहायची माझी तयारी नाही. आज माझी मुळीच चूक नाहीये आणि काय रे शहाण्या, इतका वेळ तिथे माझी वाट पाहात उभे राहण्यापेक्षा आधीच का नाही मला पाहायला आलास...... हा सारा वेळ फुकट गेलाच नसता.... तू पण ना....... जरा लेटच आहेस.... "

उशीर होऊनही प्लाझाच्या समोरच्या रेमंडस व इतरही काही कंपनीचा माल असलेल्या दुकानातून अभीने शमेला चामुंडा सिल्कची सुंदर साडी घेतली. शमा तर हरखूनच गेली होती. चांगली साडेपाचशेची साडी होती. त्यावेळेच्या मानाने भारीच होती. तिचा पगार मुळी साडेआठशे होता. नुसती किमतीने महाग म्हणून नाही पण खरेच अप्रतिम साडी होती. मग दोघांनी जिप्सीत मस्त हादडले आणि दहाच्या आसपास दोघे घरी पोचली. आई-बाबा जरासे चिंतेत वाटले तरी त्या दोघांना पाहताच एकदम खूश झाले. कॉफी घेऊन अभी गेला. कितीतरी वेळ ती आईला साडी दाखवून दाखवून आपल्याच नादात बडबडत होती........

" अहो बाई, तुम्हाला गरोडीयला उतरायचेय ना........ मग उठा की आता........ ग्लास फॅक्टरीपासून हाका देतोय..... पण तुमचे लक्षच नाही...... " कंडक्टर तिला हाका मारत होता...... त्याला थॅंक्स म्हणत ती पटकन उठली...... उतरली. जणू काही बावीस-तेवीस वर्षांपूर्वीची अल्लड-अवखळ शमाच उतरली होती. मनाने पुन्हा एकवार ती ते सगळे क्षण-वैताग-आनंद तसाच्या तसा जगली होती. अभीला विचारायलाच हवे आज....... माझा पूर्वीचा अभी कुठे हरवलाय........... सारखे काम काम....... वेडा झालाय अगदी. कुठेही लक्ष नाही...... थट्टा नाही की रोमांन्सही नाही. पाहावे तेव्हां क्लाएंट, प्रपोजल आणि टूर्स यात अडकलेला. एखादे प्रपोजल फिसकटले की आठवडाभर घर डोक्यावर घेतोय...... पण, आयुष्य चाललेय हातातून निसटून त्याचे काही नाही. किती बदलला आहेस अभी तू......... ते काही नाही. आज लेकही गेलाय मित्राकडे स्लिप ओव्हरला...... फक्त तू आणि मी, मस्त कॅंडल लाइट डिनर करू आणि दोघे मिळून सायनच्या बस स्टॉपवर उभ्या असलेल्या त्या शमा-अभीमध्ये विरघळून जाऊ........... असे मनाशी ठरवत सोसायटीच्या गेटच्या दिशेने ती भरभर चालू लागली...........

समाप्त.... .

Tuesday, March 30, 2010

सायनचा बसस्टॉप, तो आणि ती........

बस दादरला पोहोचली तसे नेहमीप्रमाणे शमेचे लक्ष खोदादाद सर्कलकडे गेले. ओव्हरब्रीज, प्रचंड वाढलेला...... आवरेनासा झालेला ट्रॅफिक अन त्यात केविलवाणे झालेले, आहे का नाही असा प्रश्नच पडावा असे भासणारे खोदादाद सर्कल. एके काळी काय शान होती, किती मोठे वाटायचे सर्कल आणि आंबेडकर रोड क्रॉस करायचा म्हणजे भीतीच वाटायची. अगदी शाळेपासून मग कॉलेज - पुढे नोकरी..... आणि आपल्या गोड आठवणीही याच्या आसपासच गुंतलेल्या........

पाहता पाहता बसने किंग्जसर्कल गाठले अन त्या चिरपरीचीत फालुदाची तीव्रतेने आठवण आली. न चुकता प्रत्येक वर्षी वार्षिक परीक्षा संपली की बाबा सगळ्यांना नको नको होईल इतका फालुदा खाऊ घालत. आता कुठे बरे गेला असेल तो फालुदावाला....... एकदा तरी लेकाला त्याच्याकडचा फालुदा खिलवायची इच्छा होती. रसभरित वर्णने ऐकून लेकही फार उत्सुक होताच. दोन चार वेळा लेकाला बरोबर घेऊन तिने किंग्जसर्कलला चकराही मारल्या होत्या. पण लकने साथ दिलीच नाही. अशी कितीतरी माणसे मनावर छाप सोडून जातात........ कितीही काळ मध्ये गेला तरी ठळक आठवतात......मनात रेंगाळतच राहतात........

बस पुढे सरकत होतीच. सायन हॉस्पिटल आले आणि बस, स्टॉपवर थांबली. शमेचे हृदयही थांबले. अगदी डोळेभरून तिने त्या बसस्टॉपकडे पाहिले. लोक चढत होते-उतरत होते...... बस गच्च भरली होती. कंडक्टरचा आवाज, लोकांचे आपसातले बोलणे, कोलाहल काहीही ऐकू येईनासे झाले....... जणू सगळे कुठेसे अदृश्यच झाले होते..... दिसत होता फक्त तो बसस्टॉप अन अतिशय आतुरतेने, काळजात उडणारी फुलपाखरे घेऊन, खुशीच्या लाटेवर आरूढ झालेली ’ त्याची ’ वाट पाहणारी एक गोडशी मुलगी..........

" भिडेबाई..... अहो भिडेबाई...... शमा, तुझ्या अहोंचा फोन आहे....... येतेस घ्यायला, की ठेवून देऊ? " अहिरेसाहेबांनी हाकांचा सपाटा लावला होता. अय्या! अभीचा फोन..... आत्ता... यावेळी...... साहेब पण ना....... किती जोरात ओरडताहेत...... सगळ्या सेक्शनला कळले....... शमेचा चेहरा अगदी लाल लाल होऊन गेला. अहोंचा फोन..... अभिषेक आणि अहो...... मोहरून गेली शमा. तोच पुन्हा साहेबांनी जोरात हाकारले, " शमा, अगं येऊ नकोस आता..... मी त्याला सांगितले...... आमच्या भिडेबाईंना अजिबात वेळ नाहीये तुझ्याशी बोलायला. त्या त्यांच्या मनोराज्यात रममाण आहेत. तेव्हां उगाच पुन्हा फोन करून त्यांच्या तंद्रीचा.... आय मीन दिवास्वप्नांचा भंग करू नये. "

तोवर शमा साहेबांच्या केबिनच्या दरवाज्यात पोचली होतीच. तिने पाहिले तर काय, साहेबांनी खरंच फोन ठेवून दिलेला होता. ते पाहून शमा अगदी रडकुंडी आली......, " साहेब, असं काय हो....... तुम्ही पण नं...... येतच होते नं मी...... आता अभिषेक कित्ती रागावेल मला. म्हणेल यापुढे तुला कधीच फोन करणार नाही......... " तिचा रडवेला चेहरा पाहून मोठ्याने हसत साहेब म्हणाले, " शमाबाई, अहो इतका काही खडूस नाहीये मी........ आता तो रडका मूड हसरा करा आणि घ्या तिकडून फोन...... अगं होल्डवर ठेवलाय ना त्याला ...... बाहेरून घे, म्हणजे तुला मोकळेपणे बोलता येईल. बघत काय उभी राहिलीस. घे पटकन, अभिषेक वाट पाहतोय ना..........., चालू दे तुमचे..... " तशी लाजून शमा पटकन स्टेनोच्या रूममध्ये पळाली.

साहेबही, हल्ली फारच खेचत असतात आपली...... असा विचार करत धडधडत्या मनाने तिने रिसीव्हर उचलला आणि....... हॅलो म्हणताच पलीकडून अगदी गंभीर आवाजात अभीने, " हॅल्लो..... मी अभिषेक बोलतोय...... " अशी सुरवात केली. ते ऐकून त्याला मध्येच तोडत ती चिवचिवली, " हो का! अभिषेक बोलतोय का? अभिषेक म्हणजे.....? मी नाही बाई ओळखत कोणा अभिषेकला. ( मग त्याला वेडावून दाखवल्यासारखे करत....... ) काय रे, एकदम फॉर्मल...... म्हणे मी अभिषेक बोलतोय...... अभ्या, सरळ बोल की नेहमीसारखा..... "

तसा अभी वैतागला. " च्याय...... सॉरी....... जाऊ दे..... ए पण त्याशिवाय जोर येत नाही ना......... तू सवय करून घे गं बाई...... तर काय म्हणत होतो.......हां..... च्यायला...... मागच्या वेळी, मी फोन केला होता..... तेव्हां, तू फोन घेतल्यावर....... हम्म्म्म्म, बोला.......... असे केले तर काय म्हणाली होतीस? आठवं आठवं. हे, हम्म्म्म्म...... म्हणजे काय? हॅल्लो करावे, मी अभी बोलतोय.... काही म्हणशील का नाही? नुसतेच म्हणे हम्म्म्म्म्म, बोला........... , म्हणून आज स्वत:ची ओळख करून दिली आधी...... न जाणो बाईसाहेब गरीबाला विसरल्या असतील तर.........त्याचे जरा कवतिक करायचे सोडून पुन्हा काहीतरी खुसपट काढलेसच का तू........... बये, अजून आपले लग्न झालेले नाही..... आत्तापासूनच तू मिऱ्या वाटायला लागली आहेस. ये ना चालबे.......नो नो...... ये ना चालबे........ "

" नो नो, ये ना चालबे काय......, बरं. मग काय करायचा विचार आहे......... नको करूयात का लग्न? सांगून टाक पटकन....... अजूनही तो तळेगावचा सर्जन..... तोच रे...... चांगले चार मजल्याचे, चाळीस खाटांचे हॉस्पिटल आहे बरं का त्याचे....... पंचक्रोशीत बक्कळ नाव कमावलेय इतक्या तरुण वयातच...... आणि त्याची आई....... ती तर अगदी फिदाच झाली होती माझ्यावर....... वाट पाहतोय माझ्या उत्तराची. देऊन टाकू का होकार त्याला? मग बस तू खुंट वाढवून देवदास बनून गाणी म्हणत......... काय? " त्या हरामखोर सर्जनला, त्याच्याच हास्पिटलात जायबंदी करून भरती करतोच बघ आता....... अगं तो माणसांचा नाही काही, गुरांचा डागदर असेल....... बसशील जन्मभर त्याच्या मागे मागे शेणाची पाटी घेऊन फिरत..... निघाली लागली तळेगावला. " अभी आता जाम भडकला होता. तो तो शमा हसून हसून त्याला अजूनच भडकवत होती.

कोणीतरी मागून खाकरले तशी पटकन भानावर येत तिने म्हटले, " ये अभी, सोड त्या डॉक्टरला....... सध्या त्याला साईडींगला ठेवलाय. उचक्या लागून लागून बेजार झाला असेल बघ तो. आधी तू सांग, कशाला फोन केला होतास? सहजच ना? " " बरे झाले विचारलेस, नाहीतर त्या तुझ्या गुरांच्या- आणि नऊवार नेसून, हात बरबटून त्यांचे शेण गोळा करत कशी अगदी शिफ्तर दिसशील तू हे पाहण्याच्या नादात मी मेन गोष्ट विसरूनच गेलो असतो....... तर ऐक शेणमाये.........अर्रर्रर्र..... महामाये....... आता मला बरेच पिडून झालेय आधीच तेव्हां बिलकूल खळखळ न करता आज संध्याकाळी साडेसहाला सायन हॉस्पिटलच्या बस स्टॉपवर भेट. मी वाट पाहीन तुझी."

हे ऐकताच शमा खूश झाली, वरकरणी मात्र, " अरे पण...... आधी तरी सांगायचेस. आता आईला कळवायला हवे...... नाहीतर ती काळजी करत बसेल. आज नको रे..... प्लीज.... उद्या भेटूयात नं. प्रॉमिस. " " शमे..... उद्या नाही आजच. उगाच लाडात येऊ नकोस. आणि आईला एक फोन करून सांग की अभिषेकचा फोन आला होता आणि त्याने भेटायला बोलावले आहे. काय? अगं आपले लग्न ठरलेय आता........ विसरलीस? चल मग, ये गं वेळेवर. बाय. " " अरे अरे अभी..... ऐक तर......... "

कमालच केलीन याने. चक्क फोन ठेवूनही दिलानं पाहा......... आता आईला सांगायला हवे. शिवाय साहेबांनाही सांगून पंधरा मिनिटे लवकर निघायला हवे....... कुठे भायखळा आणि कुठे सायन....... चेहरा मात्र वेगळेच बोलत होता........ आनंदाने तिने स्वत:भोवतीच एक गिरकी मारली तसे नुकत्याच रूममध्ये शिरलेल्या स्टेनोने अगदी खास त्याचा दक्षिणी-मराठी हेल काढून सगळ्यांना हाकारून तिची फिरकी ताणायला सुरवात केली. त्या हव्याहव्याश्या वाटणाऱ्या चिडवाचिडवीतून सुटका करून घेत ती साहेबांकडे वळली तसे........

क्रमश:

Saturday, March 27, 2010

श्रीखंड

नवीन वर्षाचा पहिला दिवस, गुढीपाडवा. म्हणजे श्रीखंड पुरी हवीच. त्याचदिवशी खरे तर शुभेच्छांबरोबर श्रीखंडही द्यायचे होतेच. आनंदला म्हटलेही होते. पण लेकाने तुझे फोटूबिटू नंतर आधी आम्हाला वाढ असे फर्मान सोडले आणि बापलेकाने मिळून मनसोक्त हाणले मग इतके आहारले की ताटावरच पेंगायची वेळ आली. कालच तन्वीने फर्मावले, " तायडे, काहीतरी खादाडी येऊ दे गं. " तशातच खादाड राज्याच्या सेनापतीने, " खाण्यासाठी जन्म आपुला " ची आठवण करून दिली. मग काय, आज पुन्हा बनविले. लगेहाथ फोटोही काढले. अक्षय तृतीया येतेच आहे तेव्हां करता येईलच.

जिन्नस

  • दोन लिटर दूध/ तयार दही एक किलो
  • साखर
  • वेलदोडा पूड छोटा चमचा, आवडत असल्यास चारोळी व जायफळ
  • केशर/ खाण्याचा केशरी रंग

मार्गदर्शन

दूध प्रथम तापवून घ्यावे. कोमट झाले की विरजण लावावे. व्यवस्थित दही लागले की पातळ फडक्यावर घालून, बांधून ८ ते १० तास टांगून ठेवावे. जेणेकरून त्यातले सगळे पाणी निघून जाईल. पाणी निघून गेल्यावर फडक्यात जे घट्ट दही उरेल ते म्हणजेच चक्का. हा चक्का एका भांड्यात काढून घेऊन त्यात जेवढा चक्का असेल तितकीच साखर घालून एकजीव करावी. हे मिश्रण पुरण यंत्रातून किंवा श्रीखंड गाळण्याच्या यंत्राने किंवा बारीक छिद्राच्या गाळणीने गाळून घ्यावे . चमचाभर दुधात केशराच्या काड्या खलून घेऊन ते या गाळून तयार झालेल्या श्रीखंडावर टाकावे व वेलचीपूड टाकून सगळे मिश्रण एकदा नीट एकत्र करावे. वाढताना दोनतीन चारोळ्या पेरून वाढावे.

इथे जे डॅननचे तयार दही मिळते त्याचेही श्रीखंड वरील प्रमाणेच करावे. पुरण यंत्र-श्रीखंड गाळावयाचे यंत्र किंवा गाळणीही नसली तर मोठ्या डावाने/चमच्याने मिश्रण पंधरा मिनिटे चांगले फेसावे. बहुतेक सगळ्या गुठळ्या मोडतील. डॅननच्या दह्याचे श्रीखंड करणार असल्यास ते लो-फॅट, फॅट फ्रीही बनवता येईलच. परंतु श्रीखंड कसे शाहीच करावे. डाएटचा विचारही मनात आणू नये. आंबटगोड श्रीखंड, टुमटुमीत फुगलेल्या पुऱ्या व उकडलेल्या बटाट्याच्या पितळेच्या पातेल्यातील भाजी बरोबर आहारले जाईल इथवर आकंठ हाणावे आणि मस्त ताणून द्यावी.




टीपा

श्रीखंड किंचित आंबट लागायला हवे. एकदम गोडमिट्ट श्रीखंडाला ती मजा नाही. खाल्ले की जिभ टाळूला चिकटून मस्त मिटक्या मारल्या गेल्या की समजावे एकदम पर्फेक्ट झालेय. श्रीखंड आदल्या दिवशी बनवून ठेवल्यास जास्त चांगले लागते. घट्ट दह्यात साखर मुरली की ते चढत जाते. दह्याचा आंबटपणा व साखरेची गोडी दोन्ही एकमेकाचे पूरक बनून अप्रतिम श्रीखंड तयार होते. जेवढा चक्का असेल तेवढीच सर्वसाधारणपणे साखर घ्यावी. आपल्या आवडीनुसार थोडी कमी जास्त करावी. चारोळ्या बरेचदा खवटच निघतात. तेव्हा शक्यतो घालूच नये. त्याऐवजी बदाम-पिस्त्याचे पातळ काप आवडत असल्यास घालावेत.

Friday, March 26, 2010

मराठी माणसाला काय येतं ???

मंडळी, हा विरोप आपल्या सगळ्यांना आला असेल - आपणही अनेकांना धाडला असेलच. तरीही मला ब्लॉगवर टाकायचा मोह आवरलाच नाही. या सगळ्या व अशा अनेकांनी आपल्याला सार्थ अभिमान वाटावा असेच उत्तूंग कार्य केले आहे. अनेक महत्वाची नावे यात नसली तरी ती मनात आहेतच. अशी महान व्यक्तिमत्वे व त्यांचे असामान्य कार्य काळाच्या ओघात हरवत चालले आहे. केवळ मराठी मराठी म्हणून हा गवगवा नसून जे ठळक सत्य आहे तेच दर्शविलेयं.


मराठी माणसाला काय येतं ....











Tuesday, March 23, 2010

ज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत!!!


भगतसिंग-राजगुरू-सुखदेव
ज्ञात - अज्ञात अनाम विरांना कोटी कोटी दंडवत!!!

भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची आज ८७वी पुण्यतिथी. २३ मार्च १९२३ रोजी या तिघांना फाशी दिले गेले. इंग्रजांचा अधिकारी सँडर्स याच्या हत्येचा आरोप या तिघांवर होता. हे तिघे यांच्या जहाल ( इंग्रजांच्या मते ) देशभक्ती-देशप्रेम व निधड्या वृत्तीमुळे इंग्रजांना अतिशय डोईजड झालेच होते. संपूर्ण हिंदुस्तानात जहाल क्रांतीची धगधगती मशाल पेटली होती. कुठल्या न कुठल्या आरोपाखाली लवकरात लवकर यांचा बंदोबस्त इंग्रजांनी केलाच असता. हे तिघे व अनेक क्रांतिकारी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहत होते. इंग्रजांच्या गुलामीतून तर भारत मुक्त झाला. हजारो वीरांनी आपल्या प्राणांची-घरादाराची आहुती देऊन पारतंत्र्यातला भारत देश गुलामगिरीच्या जोखडातून सोडवून येणाऱ्या पिढीला एक खुशहाल आपला भारत देश, मोकळा श्वास घेण्यासाठी दिला. त्यावेळी इंग्रज हे एकमेव व संपूर्ण हिंदुस्तानाचे शत्रू होते. परंतु ज्या कारणांमुळे इंग्रजांनी आपली पावले इथे रोवली आणि राज्य केले तीच कारणे, अंतर्गत कलह-बंडाळ्य़ा-स्वार्थ मात्र आजही तशीच आहेत. शहीदांना सलाम ठोकले-उगाच दोनचार कार्यक्रम केले ( तेही कोणाला आठवण राहिली तरच .....), यानिमित्ते मिडियासमोर मिरवले......." अहो, म्हणून तर केला ना हा दिखावा.... नाहीतर आम्हाला काय घेणं देणं हो.... ते देशासाठी बलिदान वगैरे आम्हाला काही समजत नाही...... आणि गरजही नाही. " खरेच आहे ना...... जी गोष्ट आयती ताटात फुकट वाढून मिळते त्याची किंमत नसतेच. इंग्रजांच्या तावडीतून देश स्वतंत्र झाला आणि भ्रष्टाचार- नेतेगिरी-गुंडगिरी यांच्या तावडीत अडकला, अडकतच गेला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे व तमाम क्रांतिकारी फक्त इतिहासाच्या पानातच राहिले. त्यातही काही ठिकाणी चक्क ते आतंकवादी होते असेही म्हटले आहे. इंग्रजांनी आतंकवादी म्हटले तर समजून घेता येईल पण चक्क आपल्यातील काही लोक त्यांना आतंकवादी म्हणतात म्हणजे........... तर कुठे गांधीजींनी या तिघांची फाशी थांबविण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत हा वाद. परंतु भगतसिंग-राजगुरू-सुखदेव यांच्या विचारसरणीचा, देश स्वतंत्र का व कशातून झाला पाहिजे या दृष्टिकोनाचा कोणीही विचारच करत नाही. समोर दिसणाऱ्या शत्रूशी निदान निकराने व एकमुखाने लढता तरी येते. परंतु या न दिसणाऱ्या व तहहयात पोखरणाऱ्या आपल्यातील स्वार्थाशी - स्वार्थी प्रवृत्तींशी कसे लढायचे? आजकाल तर अनेक मुलांना हे क्रांतिकारी माहीत तरी असतील का, अशी शंका येते. पाठ्यपुस्तकातून धडेच्या धडे - हा इतिहासच इतिहासजमा करून टाकला जात आहे. उरलासुरला एकमेव मार्गही उखडून टाकला जाताना दिसतो. निदान एखादी लाट यावी तसे ते चार-पाच सिनेमे आले म्हणून तरी बऱ्याच मुलांना यांनी केलेले महान कार्य-त्याग समजला. ( दुर्दैव सिनेमे पाहून समजला पण समजला हे जास्त महत्त्वाचे . ) फक्त स्वकेंद्रित होऊन जगण्याने आपण सारेच देशाला कुठे घेऊन गेलो आहोत आणि जात आहोत हे पाहिले की भीती वाटते. या सगळ्या वीरांचे बलिदान सार्थकी लागलेय का? याला आपणही जबाबदार आहोतच. मूठभर शोषण करणाऱ्यांना आपण आपले शोषण करू देतो म्हणजे आपणही तितकेच दोषी. भगतसिंग शेजाऱ्याच्या घरी जन्माला यावा आपण मात्र सुखनैव राहावे ..... नाही. भगतसिंग आपल्या प्रत्येकाच्या घरी जन्माला यायला हवा तरच कदाचित.......

समुद्रकिनारा....


Sunday, March 21, 2010

सकाळने घेतली दखल....

दोन तीन दिवस नेटवर जवळजवळ नव्हतेच. घरात गडबड-प्रवास, त्यामुळे ब्लॉगवरही खूपच कमी आले. काल मध्यरात्री फोनवर टुंग झाले. गाढ झोपेतच मी विरोप उघडला. दोघा-तिघांच्या टिपण्या दिसल्या त्यातच आल्हादची टिपणी होती. एक एक टिपणी वाचत त्याचीही उघडली, वाचली आणि एकदम दिल खूश झाला. त्याने म्हटले होते, " सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आपल्या ब्लॉगचा उल्लेख आलाय... याच लेखाच्या संदर्भात! अभिनंदन....... " आल्हाद धन्यवाद. तुम्ही सांगितलेत म्हणून लगेच कळले.

बारा तासांच्या प्रवासाने अतिशय शिणले असूनही ' सकाळच्या लेखावर ' जाण्याचा मोह आवरला नाही. सम्राट फडणीसने दिलेले वृत्त वाचले. माझ्या पोस्टची-ब्लॉगची घेतलेली दखल मनाला आनंद देऊन गेली. ' सकाळ व सम्राटचे ' अनेक आभार. त्याचबरोबर संपूर्ण ब्लॉगविश्वातील मित्र-मैत्रिणी-ओळखीचे व अनोळखीही ब्लॉगधारकांचे अभिनंदन! सकाळने व अनेक वृत्तपत्रांनी, स्टार माझाने या आधीही ब्लॉगविश्वाची दखल अनेकदा घेतलेली आहेच. आज पुन्हा एकवार ब्लॉगिंगच्या अनेकविध मुद्द्यावर विस्तृत लिहून या सशक्त माध्यमाचे चांगले-उपयुक्त गुण आवर्जून मांडले आहेत. धन्यवाद.

त्याचबरोबर आवडीने व नेमाने ब्लॉग वाचणाऱ्या वाचकांचे मन:पूर्वक आभार. वेळोवेळी व आवर्जून आपण दिलेल्या प्रोत्साहनामुळेच लिहिण्याचा उत्साह टिकून आहे.

सकाळच्या वृत्तातील काही मजकूर खाली देत आहे.

प्रतिबिंब समाजमूल्यांचं

मराठी ब्लॉगवर प्रसिद्ध होणाऱ्या लिखाणाचा दर्जा हा अत्यंत उच्च आहे, असा अजिबात दावा नाही. तसा तो कोणत्याही लिखाणाबाबत सरसकट करताही येत नसतो; मात्र प्रस्थापित मराठी साहित्याला समकक्ष किंवा समांतर अशी ही निर्मिती आहे, हे नक्की. हा दावा नाकारणं म्हणजे साहित्यनिर्मितीच्या मूलभूत प्रेरणेशी प्रतारणा ठरू शकेल; कारण साहित्यनिर्मितीची मूलभूत प्रेरणा ही आत्यंतिक व्यक्तिगत असते. रोजच्या जीवनातल्या अनुभवांपासून या मूलभूत प्रेरणेला प्रारंभ होतो. तो अनुभव घेऊन कल्पनाशक्तीच्या भरारीवर उच्चकोटीचे साहित्य निर्माण झाल्याचे दाखले मराठी साहित्यात ढीगभर आहेत. हीच मूलभूत प्रेरणा ब्लॉगर्समध्ये आणि त्यांच्या ब्लॉग्जवरील साहित्यात आहे. किंबहुना प्रस्थापित मराठी साहित्यात जेवढे नव्या पिढीचे, बदललेल्या समाजमूल्यांचे प्रतिबिंब येत नाही, त्याहून अधिक ते मराठी ब्लॉग्जमध्ये येते आहे. आणि हे मान्य केले पाहिजे.

त्यामुळेच नोकरीच्या रोजच्या धबगड्यासाठी होणाऱ्या प्रवासात भेटलेला एक भिकारी मुलगा लिखाणाचा (संदर्भ -
http://sardesaies.blogspot.com/) विषय होऊ शकतो. "टिपूर तारे साक्षीला अन्‌ चंद्रकोरही लोभसवाणी... रात-दिनाच्या संयोगातून जन्मा येते उषा देखणी,' असं तरल काव्य (संदर्भ -http://www.misalpav.com/node/10662) ब्लॉगर्सच्या व्यासपीठावर जन्म घेतं. "नसतेस ऑनलाइन जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जीटॉकचे विरती धागे, ऑरकूट फाटका होतो...', असं विडंबन ब्लॉगवर (संदर्भ -http://vikrantdeshmukh.blogspot.com/) धमाल उडवतं. एड्‌सनं आई-बाबा हिरावले गेलेल्या दोघा चिमुरड्या भावांची दीर्घकथा (संदर्भ - http://ffive.in/journy/1259) ऑनलाइन नवसाहित्यविश्‍व विलक्षण अनुभवानं समृद्ध करते. "गाढव आयुष्यभर ओझं वाहतं, म्हणून काय ते ट्रान्स्पोर्टर बनतं का?', असा खोचक सवाल अनुभवांचं विश्‍व उलगडताना ब्लॉगवर (संदर्भ - http://kayvatelte.wordpress.com/) सहजपणे व्यक्त होतो.

सकाळचे संपूर्ण वृत्त
येथे वाचता येईल.

Wednesday, March 17, 2010

टोचणी.......

भरभर आवरून नेहमीप्रमाणे ८.५३ ची जलद लोकल मिळावी म्हणून ८.२० ला घर सोडले. नशिबाने रिक्षाही अगदी सोसायटीच्या दारातच मिळाली. " चल रे बाबा लवकर, नाहीतर आज लेटमार्क लागेल. " असे पुटपुटतच मी रिक्षात बसत होते तोच तो म्हणाला, " मॅडम, तुम्हाला कळले नाही का? काहीतरी लोचा झालाय डोंबिवलीला. ठाणा स्टेशनवर ही गर्दी झाली्ये. " रोजचा मेला वैताग आहे. कधी गाड्या लेट तर कधी रिक्षाच नाही. तर कधी दोन्हीही नाहीत. एक दिवस वाहनसुख लाभेल तर शपथ.

पण पेपरमध्ये तर काहीच आलेले नाही. ह्म्म्म...., सकाळी सकाळी झाले असेल काहीतरी. ऑफिसच्या वेळातच नेमके हे का घडते? थोडक्यात आजच्या मस्टरची आशाच सोडा. एका मिनिटात हजार विचार मनात वर्णी लावून गेले. आता स्टेशनवर जावे का बस पकडावी तिनहात नाक्याला जाऊन या दोलायमान अवस्थेत मी होते तोच सोसायटीमधलीच एक मैत्रीण धावतपळत येताना दिसली. तिचीही अवस्था माझ्यासारखीच. काय करूया.... यावर उहापोह होऊन शेवटी तिनहात नाक्यालाच जाऊ असे ठरले. रिक्षावाला ऐकत होताच, निघालो.

नीतिन कंपनीपासून मधल्या तीन-चार सिग्नलवरील धूर मन मानेल तसा व तितका आमच्या फुफ्फुसात शिरून आम्हाला पावन करून गेला. रुमाल नाका-तोंडावर धरत-खोकत एकदाची आमची वरात तिनहात नाक्याला पोचली. तिला व मला वेगवेगळी बस हवी होती. त्यात लोकलच्या घोळामुळे भल्या मोठ्या रांगा आधीच लागलेल्या. ऊन डोक्यावर तापलेले अन घामाच्या धारांनी मनाच्या वैतागात अजूनच भर टाकली. पण इलाज नव्हता, चडफडत रांगेत उभी राहिले.

मैत्रिणीची बस आली आणि चक्क तिला चढायलाही मिळाले. तिला पटकन बस मिळाली याचे दु:ख नाही पण आपल्याला मात्र असे चटकन काही मिळत नाही याची कटकट झाली. जाऊ दे. आता ह्यात नवीन काय आहे. मनाला पण अजूनही सवय कशी होत नाही, याचा अजूनच राग आला. तेवढ्यात एक बस आली आणि रांगेतली तीन चथुर्तांश माणसे तित गेली. चला निदान शेड मध्ये तरी उभे राहायला मिळाले या आनंदात ( अश्या छोट्याछोट्या गोष्टींचाही अशावेळी जीवाला आनंद होतोच....., आणि त्यांची नोंदही घेतली जाते, ) मी आजची पुरवणी काढून वाचायला सुरवात केली.


दोन मिनिटेही गेली नसतील तोच एका लहान मुलाचा अजिजीचा सुर कानावर आला, " मॉंजी, सुबू से कुछ नही गया पेट मे......, बहोत भूख लगी है। पचास पैसा - रुपया दे दो ना.....। ए मॉं, आपके घरवाले जीये-सुखी रहे, बच्चे फले-फुले । दे दो ना मॉं........ " आवाजातल्या अजिजीने मी कोण पोर आहे ते पाहावे म्हणून पुरवणीमधून नजर हटवली. पाहते तर, चांगला तरतरीत दहा-बारा वर्षांचा एक मुलगा होता. सकाळपासूनची झालेली तकतक त्यात ह्याचे भीक मागणे पाहून डोके सटकले.

रागाने त्याला जरा सुनावतच म्हटले, " काय रे, शरम वाटत नाही का तुला अशी भीक मागताना? चांगला तर दिसतो आहेस. जरा काम कर की. पण नाही, तुम्हाला कष्ट नकोत. आयते गिळायला हवे. निर्लज्जपणे भीक मागायची की भागतेय ना. " असे म्हणत मी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि पुन्हा पुरवणीत लक्ष घातले. सहसा मी कोणालाही भीक देत नाही. एकतर यांचे दादालोक ती हडपतात किंवा हेच गांजा-दारू, कशात तरी उडवतात. यांच्या या फालतू गोष्टींसाठी माझा कष्टाचा पैसा गमवायची माझी बिलकूल तयारी नाही. पण अगदीच असहाय जीवाला खायला मात्र मी बरेचदा देते. वाटले हा मुलगाही खरोखरच उपाशी असेल. पैसे देण्यापेक्षा काहीतरी खायलाच द्यावे का? असे मी मनाशी म्हणतेय तोच,

" मॅडमजी, शरम तो बहोत आती हैं। पन मेरे जैसे सडक पे रहनेवाले को कोई काम देताच नई । " मी त्याच्याकडे पाठ फिरवली असली तरी तो अजूनही चिवट आशेवर तिथेच उभा होता. " का, का नाही देणार कोणी काम तुला? उगाच खोटे बोलू नकोस. तू मेहनत व प्रामाणीकपणे पडेल ते काम करीन असे म्हणालास तर कोणीही तुला काम देईल. आजकाल किती जणांना घरातले काम करण्यासाठी नोकर मिळत नाहीत. पण तुला सवय लागली आहे ती फुकटचे गिळायची. मग कष्ट कशाला करशील तू? चल पळ इथून. आधीच सकाळपासून कावलेय मी, त्यात तुझी भर नको. जा म्हणते ना...... "

तो मुलगा तरीही हलला नाही. आजूबाजूला उभे असलेल्या एक-दोघांनीही त्याला हाकलायचा प्रयत्न केला पण त्याने दुर्लक्ष केले. माझ्या उपेक्षेने असेल किंवा हेटाळणी केली म्हणून असेल, तो थोडासा दुखावला गेला होता. अचानक त्याने मला विचारले, " मॅडमजी, आपके पास काम हैं ? जो बोलोगे मै करूंगा । सचमुच । " " मला गरज तर आहेच एका नोक........." मला मध्येच तोडत, " तो चलो, अपुन है ना । अपुन को रख लो । चोरीमारी की बुरी आदत बिलकुल नही है । मॉं, तुम जो कहोगी मे सब कर देगा । रातको एक कोने मे पडा रहेगा..... बोलो, रखोगी मुझे? "

त्याचे हे उत्तर मला अपेक्षित नव्हतेच. मी विचारात पडले. खरे तर मला घर-ऑफिस, लेक, त्याचा अभ्यास, येणीजाणी या सगळ्याचा खूप ताण येत होता. कोणीतरी असे हाताशी मिळाले तर हवेच होते. चुणचुणीत दिसतोय. पुन्हा लहान आहे. डोक्यावर बसणार नाही. खाऊनपिऊन असा फार पगारही द्यावा लागणार नाही. शोमूला खेळवेल, शाळेत पोचवेल-आणेल, बराच उपयोगी पडेल.

" काय रे, तुझे आई-वडील कुठे आहेत? तुम्ही राहता कुठे? "

" मॉंजी, अपुन का मॉं तर कभीच मर गया । मेरेकू तो याद भी नई उसका चेहरा..... और बाप... हां है ना । पर मॉं के मरने के बाद उसने दुसरा शादी बनाया, वो और उसकी बिवी धारावी का झोपडपट्टी मे रैता । "

" बरं. मग उद्या तुझ्या आई-बापाला घेऊन ये मी बोलते त्याच्याशी आणि तुला घेऊन जाईन. "

" अरे मॉंजी, क्या आप भी । वो कैसी मॉं और उससे क्या पुछना..... उसनेही तो बापके कान भरभरके मुझे घरसे हकाल दिया नं...... "

" म्हणजे............? "

" एक नंबर की टुच्ची औरत हैं वो । दिनभर मुझे भुक्का मारती थी, और ढेर सारा काम करवा लेती थी । एक दिन पेट की आगसे झुंझलाकर मै कभी वडा उठा तो कभी पाव, कभी जो हाथ लगे वो चुराने लगा । करते करते एक दिन पकडा गया । वो हरामी शेठ ने बहोत मारा और पुलिसमे दे दिया । उपरसे घरमेंभी बोल दिया । पुलिसको मॉंने
सीधा बोल दिया, इसको हम नही जानता । फिर क्या जेल मे रहा, छुटने के बाद कुर्ला ठेसन पे बुटपॉलीश करने को चालू किया । पर वो पहले से बुटपॉलिस करते लोग ने मारके वहासें भगाया । फिर एक दादा ने पकडा और भीख मांगने के धंदे मे डाल दिया । अगर पैसा मिलेगा तो वो हडप लेता हैं । पर दोन वक्त पेट को तो डालता हैं.... मॉंजी, ये सुनके घबरा नको । मैं बुरा नही.... पेट के वास्ते चोरी किया था । तुमको कभी धोका नही देगा..... एक बार रखके तो देखो नं मुझे । "

हे ऐकले आणि मन कचरले. मी तर याला ओळखतही नाही. कोण कुठचा, चोरीमारी करून सजा काटून आलेला आणि याला घरात घेऊन जाऊ? म्हणजे स्वतःहून चोराला निमंत्रण देण्यासारखेच की . नको बाई या भलत्याच भानगडीत पडायला. दया-उपकार करावेत, काम द्यावे-सुधारण्याची संधी द्यावी हे सगळे बोलण्यापुरतेच असते. कुठून याला फुकटचा उपदेश पाजायला गेले असे मला झाले.

" अरे, मी तुला ठेवूनही घेतले असते रे. पण सध्यातरी माझ्याकडे एक बाई आहे. ती सगळे काम नीट करते. मग तू काय करणार आणखी. त्यापेक्षा, हे घे वीस रुपये आणि पुन्हा बुटपॉलीशचा धंदा सुरू कर. नाहीतर काहीतरी वीक ना लोकलमध्ये. तुझ्यासारखी बरीच छोटी छोटी मुले विकत असतातच की . घे. त्या तुझ्या दादाच्या हाती लागू देऊ नकोस. घे न. " असे म्हणत मी विसाची नोट पुढे केली.

मी त्याला घरी घेऊन जाईन या त्याच्या आशेलाच असा सुरुंग लागलेला पाहून तो चिडला. इतका वेळ आपल्याला झापणारी, वर डोस पाजणारी ही बाई स्वत: मात्र मला कामाला ठेवून घ्यायला तयार नाही हे त्याच्या जीवाला लागले. विसाची नोट माझ्या अंगावर फेकून तडकून म्हणाला, " वो मॅडम, खालीफोकट साला मेरा टाइम बरबाद कर डाला । उपरसे इत्ती सारी फालतू की सीख झाड दी । खुद पे आयी तो तुम कलटी मार
गई । इत्ता तो सच बोल दिया मैं पर तुमको तो अपुनपे भरौसाच नही । ये तेरा बीस रुपया और पाठ नई मांगता । पचास पैसा-रुपया भीख दे दो मुझको, मै जाताय । अपुन के पास ये बकवास सुनने का टाइम नई हैं । साला, जो उठता हैं अपुनकोच जुते मारता है। मदत कोई नई करता । " असे म्हणून मला आरसा दाखवून तो आला तसा गर्दीत हरवून गेला.

सगळा दिवस मी स्वत:चा छळ करून घेतला. कोणालाही फुकटचा सल्ला देण्याआधी मी त्या समस्येवर उपाय देऊ शकते का? सोडवणूक करू शकते का, याचा विचार करायला हवा. आणि तसे करू शकत नसेन तर किमान हिणवणे, झापणे तरी करता नये. मुळात अडचण समजून घ्यायला हवी, त्यासाठी तेवढा वेळ हवा. शिवाय, ती समजली तरी तिचे समाधान- निराकरण करणे आपल्याला शक्य असेलच असे नाही . तेव्हा ही उपदेशाची पोकळ ढोंगबाजी बंद. असे ठरवून मी त्या संवादावर पडदा टाकला खरा पण मनात कुठेतरी स्वत:च्या दुट्ट्पीपणाची - दांभिकपणाची टोचणी लागली . आज बारा-तेरा वर्षे झाली तरीही ती सलतेच आहे.

( फोटो जालावरून )

Tuesday, March 16, 2010

सत्य.....

सकाळपासूनच काही ना काही उलटसुलट घडत होते. त्यात नेमकी मोलकरणीने दांडी मारली. चडफडत वासंती आवरत होती. लेकाचे आवरून त्याला पाळणाघरात सोडून शाळेचा पहिला तास गाठणे आज जमणारच नाही. गेल्याच आठवड्यात मुख्याधापकांनी ताकीद दिली होतीच त्यात आज उशीर झाला तर...... " अरे, चल रे पटकन. किती चेंगटपणा करतोस. आवर ना. " पण छोटा आदी त्याच्याच नादात होता. कसेबसे त्याचे आवरून, डबे भरून घेतले. ढिगाने वह्या आणल्या होत्या घरी तपासायला त्या बॅगेत कोंबल्या, उरलेल्या हातात घेतल्या.

लोकांना वाटते, " शिक्षकाचे काम किती छान. मुलांना सुट्टी की तुम्हालाही सुट्टी. मज्जाच मज्जा. पण ह्या वह्या, पेपर तपासणे चालूच असते सुट्टीतही ते दिसत नाही कोणला. कारटी इतका उच्छाद मांडतात वर्गात की कधी कधी तर कसे आवरावे हेही कळत नाही. आणि या वह्या-पेपरातले अक्षर लावता लावता जीव मेटाकुटीला येतोय. अगदी सगळ्यांनाच जणू पुढे डॉक्टर व्हायचेय, त्याची जोरदार तयारी आतापासूनच चालू केलीये. अरे पण मी कुठे केमिस्ट आहे. काल डोके दुखलेय तेच अजून थांबले नाही तो पुन्हा भर नको. आदी, चला निघा आता. "

आदीला सोडून त्याच रिक्षाने वासंतीने शाळा गाठली. पहिली घंटा होऊनच गेली होती. अगदी बालबाल बचावले बाई आज. असे म्हणत वह्यांचा ढिगारा व बॅग सांभाळत ती तिसरीच्या वर्गात पोचली. प्रार्थना होईतोही पोरांना दम कुठे होता. त्यातही चुळबूळ, खुसखुस सुरू होतीच. सकाळी सकाळी उगाच ओरडायला नको म्हणून थोडे दुर्लक्ष करून ती खुर्चीत टेकली. चला आता पोरांच्या वह्या वाटून टाकाव्यात, असे म्हणत हाताला आली ती पहिलीच वही तिने उचलली आणि उघडली. किती गुण मिळालेत हे पाहावे म्हणून जरा चाळली आणि ती सटकलीच.

" ही माझी सही नाही आणि हे मार्कही मी तुला दिलेले नाहीत. खरे सांग तू केलीस ना माझी सही. " तरातरा रियापाशी जात चिडून वासंतीने विचारले. " नाही मॅडम, मी नाही केली सही. " तिसरीत शिकणारी रिया घाबरून म्हणाली. " किती खोटे बोलतेस गं, हेच शिकवले वाटते आईने तुला? आधी हात पुढे कर. कर म्हणते ना..... " रियाने कसाबसा हात पुढे केला तोच ’ फटाक-फटाक " वासंतीने चांगले दोन रट्टे मारले. रिया रडू लागली. " रिया, खरं सांग. खरं सांगितलेस तर मी माफ करेन तुला. अग काय विचारतेय मी. खोटे रडू नकोस. " " मॅडम, मी खरं सांगतेय. मी नाही हो सही केली. नका ना मारू मला. दुखतेय खूप. "

इतका खोटेपणा तोही या लहान वयात. वासंतीचा राग अनावर झाला, तिने खसकन रियाचा चिमुकला हात पुढे ओढून घेतला आणि सटासट मारतच सुटली. ताड, ताड, ताड,...... रियाला सहन होईना, डोळ्यातून अखंड पाणी ओघळू लागले. ती घाबरून गेली आणि मारही सहन होईना, शेवटी तिने कबूल करून टाकले की हो मी सही केली. हे ऐकताच वासंती मारायची थांबली. आसुरी विजयी मुद्रेने तिने म्हटले, " शेवटी सत्य आलेच ना बाहेर. मग हे आधीच कबूल केले असतेस तर.... " संपूर्ण वर्गाकडे एक नजर टाकून तिने रियाच्या वहीवर एक मोठी फुली मारून शून्य काढले आणि वही तिच्या बेंचवर आपटली.

दिवस फार धावपळीत गेला. संध्याकाळी थकून घरी पोचली. आजही पाचवीच्या वह्यांचा एक भला मोठ्ठा गठ्ठा होताच सोबत. वैतागून तिने टेबलवर तो आदळला तोच छोटा आदी पळत आला व वासंतीला बिलगला. तिने त्याला उचलून घेतले तोच त्याची नजर वह्यांवर पडली. " आई, मला ना तुझ्या वह्या तपासायला खूप आवडते. मलाही तुझ्यासारखे काम करायचेय. आजही देशील ना मला एक वही, प्लीज ना ममा...... " हे ऐकले आणि वासंती हबकली, " आदी, तू काल ही इथून वही घेतली होतीस का? " " हो..., अग खूप मज्जा आली. मी अगदी तुझ्यासारखीच चेक केली आणि तू कशी सही करतेस ना तशीच सही पण केली. दे ना ममा, आज पण एकच वही दे ना.... " हे ऐकले आणि वासंतीने बसकणच मारली. काय केले मी आज..... रिया.......

इकडे, रियाच्या आई-बाबांनी तिचा इतका लाल झालेला-सुजलेला हात पाहिला आणि त्यांना काहीच समजेना. पोर रडून रडून अर्धमेली झालेली. रियाचे आई-बाबा फार गरीब होते. आई चार घरची धुणीभांडी करी आणि बाबा वॉचमन होते शिवाय एका गॅरेजमध्येही काम करत होते. लेकीला चांगल्या मोठ्या नाव असलेल्या महागड्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलेले. तिने खूप शिकावे मोठे व्हावे यासाठी दोघे ढोर मेहनत करत होते. आणि आज सुजलेला हात व मुसमुसणाऱ्या रियाला जवळ घेऊन तिच्या कोवळ्या हातावर मलम लावत आई करवादली, " जळ्ळली मेली ती शाळा आणि शिक्षण. काही नको. बस झालं. उद्यापासून माझ्याबरोबर चल मुकाट भांडी घासायला. मोठी आलीये शिकणारी. " रियाला छातीशी कवटाळून माय रडत राहिली.

Friday, March 12, 2010

व्यक्ती तितक्या प्रकृती........

ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सोय म्हणून गावात नियमित जाणारी सोसायटीची बस आली आणि बसची वाट पाहणारे सगळे उठले. सासूबाईंनी म्हटल्याप्रमाणे अगदी बरोबर नवाच्या ठोक्याला बस आली होती. साधारण तीस जणांना बसता येईल इतपत मोठी. एक एक जण चढू लागले. त्यातच एक अपंग बाई व त्यांचे बंधूही होते. दोघेही बहिणभाऊ साठ-पासष्टच्या आसपासचे असावेत. बाईंची अवस्था फारच बिकट होती. परंतु मनात उत्साह होता. पहिली पायरी जरा अंमळ उंचच होती त्यामुळे त्यांच्या भावाने लाकडाची एक लहान पायरी बनवलेली. ती पटकन त्याने ठेवली आणि अगदी मुंगीच्या गतीने त्या प्रयत्न करीत होत्या. मी आणि अजून काही जण बाजूला उभे होतो.

बस येण्याआधीपासूनच सोसायटीतील एक ज्येष्ठ महिला मोठ्यामोठ्याने सारखी बडबड करीत होत्या. माझ्या बाजूलाच उभ्या असलेल्या एका काकूंच्या भाषेत, ’ पांडित्य ’ पाजळत होत्या. ज्यांच्याशी त्या बोलत होत्या त्यांचा नाईलाजच असल्याने एकाक्षरी प्रतिसाद चालू होता. बाकीचे..... कोणी वर्तमानपत्रात तर कोणी नोटीस बोर्डावरील नोटिसा वाचण्यात, कोणी नुसतेच डोळे मिटून....., थोडक्यात ही ’ बला ’ आपल्याकडे वळू नयेचा प्रयत्न करीत होते. या आधी दोनतीन वेळा याच बाईंना कधी माळ्याला तर कधी वॉचमनला झापताना पाहिले होते. त्रासिक-अनुनासिक स्वरात जोराजोरात तक्रारी आणि तुम्ही कश्या चुका करता याचाच पाढा जाहिरपणे वाचणे सुरू होते. तेव्हापासूनच माझे कुतूहल चाळवले गेलेले. तशात नेमक्या आज त्या समोर आलेल्या.

त्या अपंग बाईंचा थोडा तोल जाताच प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे त्यांच्या आसपास उभे असलेल्या आम्हा सगळ्यांच्या देहबोलीतून सावरण्यासाठी पुढे होण्याची क्रिया घडली. एक काका अगदी शेजारीच असल्याने ते पटकन त्यांच्यापर्यंत पोचले तोच या पंडिताबाई वसकन त्यांच्या अंगावर खेकसल्या, " आधी मागे सरका. कोणीही बसमध्ये चढायचे नाही. दिसत नाही का तुम्हाला. मागे व्हा म्हणते ना.... " अचानकपणे झालेल्या हल्ल्याने काका गांगरले आणि तेच पडता पडता वाचले. त्यांनी क्षीण प्रयत्न केला सांगण्याचा, " अहो, मी असाकसा चढायला जाईन. त्यांना हात देत होतो.... " " काही नकोय, आम्ही आहोत त्यासाठी. एखादा दिवस नाही खिडकी मिळाली तर काही बिघडणार नाही तुमचे. " आणि पुढेही अजून काही पुटपुटल्या. काका बिचारे कानकोंडे होऊन गेले.

काकांचा चेहरा अगदी पडला होता. मागे दोघे तिघे कुजबुजायला लागले, " या स्वत:ला समजतात तरी कोण? पाहावं तेव्हां ज्याला त्याला घालून पाडून बोलत असतात. सोसायटी सगळ्यांची आहे. यांचा तोरा असा जणू काही या मालकीण आणि आपण भाडेकरी. तेही उपकाराखाली दबलेले मिंधे भाडेकरी असल्यासारखे. पाहिलेत ना, बिचाऱ्या बर्वेंच्या वर कसे डाफरल्या ते. " प्रत्यक्षात त्यांना कोणीही काही म्हटले नाही. सगळे चुपचाप मागे सरकून उभे राहिले. त्या अपंग बाई चढल्या-ड्रायव्हरच्या मदतीने सीटवर बसल्यावर मग या पंडिता चढल्या आणि अगदी तोऱ्यात मागे वळून सगळ्यांकडे पाहून, " चढा की आता पटापट, आधीच किती उशीर झालाय. " असे म्हणत लगालगा खिडकीशी जाऊन बसल्या.

सगळेजण चढले, मी सगळ्य़ात शेवटी चढले. त्यांना ओलांडून मागच्या सीटकडे जायला निघाले तर त्यांनी मध्येच हात घालून रस्ता अडवला. भुवया उडवून," काय? कुठे " असे नजरेनेच विचारले. मी चेहरा शक्य तितका कोरा ठेवून स्थिर नजरेने फक्त त्यांच्याकडे पाहू लागले. मी काहीच बोलत नाहीये हे पाहून त्यांनी, " ही खाजगी बस सेवा आहे. पीएमटी बाहेर मिळेल. जा तिकडे. कोण कोण कुठून कुठून येतात. काय रे चव्हाण( ड्रायव्हरला ), तुला सांगायला काय होते लोकांना. ( पुन्हा माझ्याकडे नजर वळवून ) अहो, उतरा. उशीर होतोय आम्हाला. " मला ओळखणाऱ्या एका काकूंनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की अहो या आपल्या सोसायटीतल्याच आहेत. त्यांचे सासू-सासरे...... पण यांना ऐकू जाईल तर ना. " अग, मी तुलाच सांगितले ना.... उतर की. " हे ऐकल्यावर खरे तर माझ्या कपाळावरची शीर तडकलीच होती. त्यांना म्हटले, " ही बससेवा कोणासाठी आहे? या सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी. बरोबर ना? इथे आमच्या दोन जागा आहेत. ह्या बससेवेचा लाभ तुमच्याइतकाच मलाही घेण्याचा हक्क आहे. तेव्हां हात बाजूला घ्या म्हणजे मला बसता येईल आणि तुमच्यामुळे इतरांचा झालेल्या वेळेचा अपव्यय थोडा भरून काढण्याचा प्रयत्न करता येईल. " त्या थोड्या दचकल्या. हात बाजूला केला, मी बसले तशी ड्रायव्हरने गाडी सोडली.

त्यांच्या शेजारणीला मी कोण, नाव काय आहे, कुठल्या मजल्यावर राहते वगैरे विचारून घेऊ लागल्या. सगळी माहिती मिळाल्यावर माझ्याकडे वळून म्हणाल्या, " मग, हे आधीच सांगायचे ना. मला काय स्वप्न पडणार. तुम्ही कधीतरी येणार इथे, कळणार कसे मला. " हे ऐकल्यावर मात्र माझा आवाज तडकला, " म्हणजे मी काय तुमच्यापुढे हजेरी लावायला हवी का? माझ्या घरी मी कधी यायचे, किती राहायचे हे मी ठरवणार. तुम्ही हे सगळे बोलण्याआधी सत्य जाणून घ्यायला हवे होते आणि ते जर माहीत नसेल तर किमान सभ्य भाषेत विचारणा करायची होती. तुम्ही तर बस तुमच्या मालकीची असल्यागत मला खाली उतर म्हणून फर्मावत होतात. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायची राहिली बाजूलाच आणि वर मलाच सुनावताय? कमाल आहे. " त्यावर त्यांनी चक्क मान उडवली आणि जणू हे सारे काही घडलेच नाही अशा प्रकारे शेजारणीशी मोठ्यामोठ्याने गप्पा मारू लागल्या. संपूर्ण बसमध्ये फक्त त्यांचाच आवाज घुमत होता. डेक्कनपाशी त्या उतरून गेल्यावर, चव्हाणांनी बसद्वारे एक मोठा सुस्कारा सोडून निषेध नोंदवला तशी सगळेजण खोखो हसले. त्या गेल्या तरी सगळे त्यांच्याच विषयी आपापल्या इच्छित स्थळी उतरेस्तोवर बोलत होते.


हा प्रसंग मी विसरायच्या आतच एक दिवस संध्याकाळी सोसायटीच्या क्लबहॉउस च्या जीम मध्ये गेले असता पुन्हा यांचे दर्शन झाले. जीममध्ये एक ८५ वर्षांचे आजोबा अगदी हळूहळू सायकल चालवत होते. मला पाहताच त्यांनी म्हटले, " जरा दिवे लावतेस का गं? अंधारून येईल आता दहा मिनिटात. मग मला नीट दिसणार नाही. उतरताना तोल जायचा, म्हणून तुला सांगतोय. " मी हो म्हटले आणि दिवे लावून ट्रेडमीलवर धावायला सुरवात केली. जीममध्ये अजून एक काकू होत्या पण त्या सर्वांगसुंदर व्यायाम करीत होत्या. जरा पाच मिनिटे होत नाहीत तोच या पंडीताबाई जीम मध्ये आल्या. काकांची प्रतिक्रिया जबरीच होती. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि त्यांच्याकडे पाहून कपाळावर हात मारला. बटण बंद करतो तसे करून दाखवून आता ऐका बडबड असे बोटांनी खुणावले. कदाचित हे त्यांनी पण पाहिले असावे, असा माझा कयास.

नेहमीप्रमाणे त्यांनी नाकात बोलत विचारले, " हे दिवे कोणी लावले? बाहेर अजून टळटळीत उजेड असताना हा नास कशाला करायचा मी म्हणते. पण कोणाला पडलेली नाही. कुठे कुठे मी लक्ष ठेवणार. अहो आपटेकाका, कोण लावून गेलेय हे दिवे? तुम्ही सांगायचे ना त्यांना बंद करून जा म्हणून. अहो सोसायटी सगळ्य़ांची आहे ना.... काय म्हणते मी. " हे बोलताना सगळे लक्ष माझ्याकडे. आपटेकाकांनी एक नाही की दोन नाही, संपूर्ण दुर्लक्ष केले....... शांतपणे हळू सायकलवरून उतरले आणि नजरेनेच मला टाटा करून जीममधून निघून गेले. यांची फुणफूण सुरूच होती. खरे तर अंधारून आलेच होते. यांची बडबड ऐकत बसण्यापेक्षा घरी जावे हे उत्तम असे म्हणत मीही आपटेकाकांचा कित्ता गिरवला आणि चालू पडले. यांचे डोळे माझा पाठपुरावा करत होते हे न पाहताही मला जाणवत होतेच.

काय योग होते कोण जाणे पण सारखी यांची आणी माझी समोरासमोर गाठ पडू लागली. सासूबाईंना यांच्या गंमती सांगत होते तेव्हां सासऱ्यांच्या कानावर पडताच ते पटकन म्हणाले, " अग, फार जहांबाज नमुना आहे हा. मीटिंगमध्ये पाहायला हवेस तू, कशी दादागिरी चालते ते. तुला जर काही म्हणाल्या ना तर सरळ उलट उत्तर दे. फार आगाऊ बाई आहे. गेल्याच आठवड्यात आपल्या ड्रायव्हरलाही झापलेय त्यांनी. " मी फक्त आठ दिवस होते तिथे पण तेवढ्या वेळात, एका डॉक्टरीण बाईंना व्याख्यानासाठी बोलावले होते. नवरात्रीच्या गरब्याच्या नाचाची तालीम सुरू होती. लायब्ररीत एका सुप्रसिद्ध लेखिकेशी गप्पांचा कार्यक्रम झाला. या सगळ्या वेळी यांनी कोणा न कोणाशी खडाष्टक केले. पाहुण्यांपेक्षा जास्त बडबड केली. समोरचा काय बोलतोय हे ऐकण्याची तयारीच नाही. मला जे वाटते तेच खरे आणि तेच बरोबर हा खाक्या. केवळ बाकीचे भिडस्तपणे काही बोलत नाहीत, विरोध करत नाहीत म्हणून किती वचवच करायची याचा काही धरबंदच नाही.

बरेचदा आपल्याला अशी माणसे कुठेना कुठे भेटतच असतात. समोरच्या माणसाच्या मनात काय चालले आहे हे स्वत: त्या माणसालाही कळत नसेल इतके अचूक यांना कळत असते. त्यामुळे जे तो बोलत नाहीये ते त्याच्या तोंडात घालून यांची गाडी सुसाट सुटते. पुन्हा आक्रस्ताळेपणा व वयाचा फायदा कसा उठवायचा ही कलाही बरोबर अवगत असते. ऐकणारा म्हणतो, जाऊ दे..... कुठे यांच्या तोंडी लागायचे. अजून दहा वाक्ये ऐकण्यापेक्षा लोक पळ काढतात. जे काढू शकत नाहीत ते बिचारे गरीबासारखे खाली मान घालून ऐकतात. आणि मग एखादा ताडकन तोडणारा भेटला की त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या सगळ्यांचा जाहीर उद्धार ठरलेला. असे करण्याने काय साध्य होते हे त्यांनाच माहीत पण असे लोक माणसात असूनही नेहमीच एकाकी असतात. का भेडसावणाऱ्या एकटेपणावर अशा प्रकारे मात करण्याचा हा त्रासदायक मंत्रजळेपणा मुद्दाम करतात?

Tuesday, March 9, 2010

व्हेज मान्चुरिअन

चायनीज फूडला आपण व ते आपल्याकडे आता चांगलेच रूळलेत. गाडीवरचे असो किंवा चांगल्या हॉटेल मधले असो, प्रत्येकाची स्वत:ची खासियत आहे. इथे जागोजागी चायनीज जॉइंट्स आहेत. पण इथले चायनीज एकतर गोडाकडे झुकणारे किंवा तिखट करा म्हटले की हमखास आंबटढोक लागणारे. सुरवातीला तर आपल्याकडच्या गाडीवरच्या चायनिजच्या आठवणी काढून काढून खायचो..... आता हळूहळू इतक्या वर्षात हेही आनंदाने खाऊ लागलोत पण मनात मात्र अजूनही ती चव रेंगाळतेच. कधीकधी फारच इच्छा झाली की मग मात्र खटाटोप करतेच. चायनीज मग ते मान्चुरिअन असो, पनीर चिली वा चायनीज राईस- न्यूडल्स काहीही करा आधीच्या तयारीलाच वेळ जास्त. प्रत्यक्ष पदार्थ पंधरा मिनिटात तयार आणि पुढच्या पंधरा मिनिटात चट्टामट्टा.....

जिन्नस

  • एक मध्यम गाजर किसून, किसलेला कोबी दोन वाट्या, किसलेला फ्लॉवर एक वाटी
  • प्रत्येकी अर्धी वाटी मटार व मका दाणे
  • अर्धी वाटी चिरलेली कांद्याची पात व पातीचे कांदे
  • एक मोठी सिमला मिरची व एक मध्यम कांदा चौकोनी तुकडे करून
  • चार-पाच लाल सुक्या मिरच्या, तीन चार हिरव्या मिरच्या
  • दहा-बारा लसूण पाकळ्या व बोटभर आले बारीक चिरून
  • मशरूम्स, बेबी कॉर्न, वॉटर चेसनटस, बांबूच्या पातळ पट्ट्या ( ऐच्छिक )
  • एक मोठा चमचा व्हिनीगर, दोन मोठे चमचे सोया सॉस, चार मोठे चमचे तेल व तळण्याकरीता तेल
  • चार मोठे चमचे कॉर्न स्टार्च , तीन कप पाणी व चवीनुसार मीठ

मार्गदर्शन

फ्लॉवर, कोबी, गाजर किसून घ्यावे. मटार व मक्याचे दाणे फार टचटचीत असतील तर मिनिटभर मायक्रोव्हेव मध्ये ठेवून वाफवून घ्यावेत किंवा उकळते पाणी त्यावर ओतून संपूर्ण निथळून घ्यावेत. कांद्याची पात बारीक चिरून घ्यावी. एका भांड्यात हे सगळे घालून हाताने कुस्करून घ्यावे. मग चवीपुरते मीठ घालू पुन्हा कुस्करावे. मिठामुळे पाणी सुटेल. आता त्यात दोन चमचे लाल तिखट व दोन चमचे मैदा, एक चमचा तांदुळाचे पीठ घालून एकत्र करावे. नंतर त्यात दोन मोठे चमचे कॉर्न स्टार्च घालावे, जेणेकरून मिश्रण बांधले जाईल. मग छोटे छोटे गोळे वळून मध्यम आचेवर लालसर रंगावर तळून घ्यावेत.

भोपळी मिरची व कांद्याचे चौकोनी तुकडे करावेत. हिरव्या मिरचीचे पोट फोडून घ्यावे. बेबी कॉर्न, वॉटर चेसनटस, बांबू पट्ट्या, मशरूम्स यातले जे उपलब्ध असेल व आवडत असेल ते प्रत्येकी अर्धी वाटी चकत्या करून घ्यावे. पातीचा कांदा मुळे काढून संपूर्णच ठेवावा. लसूण व आले अगदी बारीक चिरावे. किसून अथवा मिक्सरला वाटून घेऊ नये. एका पसरट कढईत चार चमचे तेल घालून मोठ्या आचेवर ठेवावी. तेल तापले की त्यात आले लसूण टाकून मिनिटभर परतावे. त्यावर हिरव्या मिरच्या व लाल मिरच्या टाकून पुन्हा मिनिटभर परतावे. घेतलेल्या सगळ्या भाज्या आता त्यावर टाकाव्यात व पाच ते सात मिनिटे परतत राहावे. आच कमी करू नये. भाज्या अर्धवट शिजतील की मग व्हिनीगर व सोया सॉस घालावे. चवीनुसार मीठ व दोन भांडी पाणी घालून आच मध्यम करावी. झाकण ठेवू नये. साधारण पाच-सहा मिनिटात उकळी फुटली की तळून ठेवलेले गोळे घालावेत. लगेचच अर्धी वाटी गार पाण्यात कॉर्न स्टार्च विरघळवून घेऊन या मिश्रणाला लावावे व हालवत राहावे. कॉर्न स्टार्चमुळे मिश्रण थोडेसे घट्ट होऊ लागले की नीट ढवळून तीनचार मिनिटात बंद करावे. साध्या गरम भाताबरोबर, चायनीज फ्राईड राईसबरोबर किंवा नुसतेच......, आवडेल तसे परंतु गरम गरम खावे.


टीपा

मान्चुरिअन चे गोळे करताना तिखट आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करावे. मिठामुळे पाणी सुटतेच तेव्हा वरून आणखी पाणी चुकूनही घालू नये. ग्रेव्हीत मीठ घालताना, गोळ्यात मीठ घातलेले आहेच व सोया सॉसमध्येही मीठ असते हे लक्षात घेऊन घालावे. नाहीतर हमखास खारट होण्याची शक्यता असते. ग्रेव्ही कोरडी हवी असल्यास कॉर्न स्टार्च लावून झाल्यावर जरा जास्त वेळ आचेवर ठेवावे. आणि जास्त पातळ हवी असल्यास त्यानुसार पाणी वाढवावे. ग्रेव्हीला जास्त तिखटपणा हवा असेल तर लाल व हिरवी मिरची जरा जास्त वेळ तेलात परतावी. अती तिखट हवे असेल तर ओली लाल मिरची दोन चमचे पाण्यात किंचितसे मीठ घालून वाटून घेऊन आले-लसणाबरोबर परतावी. ग्रेव्ही अगदी खडखडीत कोरडी हवी असेल तर अर्धा चमचा कॉर्न स्टार्च पाव वाटी पाण्यात कालवून मिश्रणाला लावून मोठ्या आचेवर परतून लागलीच वेगळ्या भांड्यात काढून घ्यावे. मान्चुरिअन उरल्यास पुन्हा खाताना अर्धी वाटी पाणी घालून उकळी आणून खावे. कॉर्न स्टार्चमुळे खूपच घट्ट झालेले असते.

Sunday, March 7, 2010

गोठलेला नायगारा - चित्रफिती

शब्दातीत आहे सारेच. डोळ्यांचे पारणे फेडणारे वर्णनातीत निसर्गाचे एक आगळेच रूप. जिकडेतिकडे चकाकणारे हिमाचे शुभ्र ढीग व झिरपणारा थंडावा. नायगारा नदीच्या कोसळण्यासाठी झेपावणाऱ्या पाण्याला मधूनमधून अडथळा करू पाहणारे लहानमोठे बर्फाचे खडक. कड्यावरून आवेगाने स्वत:ला झोकून देऊन समर्पित झाल्यावर काहीसे शांत होऊ पाहणारे पाणी अन लागलीच त्याचा हिमाने घेतलेला कब्जा. थोडासा उशीरच झालाय या चित्रफिती टाकायला, त्याबद्दल दिलगीर आहे.

गोठलेला नायगारा



Saturday, March 6, 2010

प्रिटी वूमन......



प्रिटी वूमन........

आत्ताच पाहिला...... कितव्यांदा.... पंचवीस-तीस..... जाऊ दे ना, कशाला मोजायचे. कधीही आणि कितीही वेळा पाहावा इतका सहज सुंदर सिनेमा. चित्तवृत्ती प्रफुल्लित करणारा. नाही नाही मी त्याचे रसग्रहण-समीक्षा काहीही करणार नाहीये. माझा अत्यंत आवडता सिनेमा. जूलिया रॉबर्टसचा नितांत सुंदर-पारदर्शी -बोलका चेहरा व जीवघेणे हसू आणि देखणा- काहीसा अबोल- स्वतःच्या कोशात मग्न रुबाबदार रिचर्ड गेर व या दोघांचा काळजात उतरत जाणारा अभिनय, तितकेच समर्थ संवाद व गॅरी मार्शलचे दिग्दर्शन. आजही व्हॅलेंटाइन डे साठीच्या सिनेमा पसंतीत प्रिटी वूमनचाच नंबर पहिला आहे. अतिशय हलकीफुलकी नर्मविनोदी लव्हस्टोरी. जूलिया आणि रिचर्ड यांच्या प्रेमात न पडणारी माणसे विरळाच. १९९० साली आलेला प्रिटी वूमनची या आठवड्यातील आवडीचे प्रमाण: ३६%, हे आकडेच किती बोलके आहेत. आनंदाची लागण करणारा ऑल टाइम फेवरेट असा प्रिटी वूमन चुकून कोणी पाहिला नसेल तर
येथे पाहता येईल.

Wednesday, March 3, 2010

तेज : रक्षक की भक्षक?

मिल जळून भस्मसात या घटनेची भीषणता व आलेली विषण्णता अजूनही मनातून जात नाही. तसे पाहिले तर आजकाल ही तशी काही अघटित घटनाही नाही. अशा अनेक गोष्टी जाणूनबुजून घडवल्या जात होत्या-आहेत आणि घडत राहतील. आग मग ती अपघाताने-आपसूक लागलेली असो किंवा मुद्दामहून लावलेली असो, परिणाम तोच. राख. मालमत्तेची, आशा-आकांक्षांची, संसाराची, भविष्याची, कोसळलेल्या मनांची....... आगीत अतिशय सामर्थ्य असते. तिच्या वाटेत जे जे येईल ते सारे स्वाहा होऊन जाते. आगीचे असणे आणि नसणे हे दोन्हीही घातकच.

पोटाची आग जन्मापासूनच आपल्याला चिकटलेली असते ती अगदी मृत्यूपर्यंत. त्याहीनंतर आग आपली सोबत सोडत नाही. पाण्याने आग विझते खरी पण पाण्यात ती सामावलेलीही असते. जंगलात लागणारे वणवे अन धुमसणारी राने पाहिली की मला सतत माणसाचे आयुष्यभर धुमसणारे-जळणारे अंतरंग दिसते. जंगलातले वणवे बरेचदा माणसाच्या बेपर्वा वृत्तीने लागतात. एकदा लागले की मग ते कोणालाही आवरत नाहीत. मनाचेही असेच आहे. हे जळितं त्याचे संपूर्ण आयुष्य राख करत असते, अगदी त्याच्या डोळ्यासमोर. परंतु ही होरपळ स्वत:च करून घेतलेली आणि म्हणूनच न थांबवता येणारी. ” आग लावणे ’ चांगले नव्हेच. मग ती कुठली का असेना आणि कशी का लागेना.

पोटाची - उदरभरणासाठीची आग, निरनिराळ्या कारखान्यातील-भट्टीतील आग, दोहोंचे कार्य समान आहे. होळीची आगही स्वाहा करणारीच. या आगीत अनेकदा मनातील दुष्टता-स्वार्थ जळून जाण्याऐवजी नव्यानेच बखेडेही निर्माण होताना दिसतात. हृदयी जागी झालेली आग, एकतर प्रेमामुळे किंवा दुश्मनीमुळे. साध्या साध्या गोष्टींवरूनही अनेकदा आपला तोल जातो. चिडचिड, जिभेला हाड नसतेच त्यामुळे तिचा मनसोक्त वापर केला जातो. डोळे अंगार ओकू लागतात, शब्द तिरासारखे घुसतात-घायाळ करतात. बरेचदा हलके कान आणि होणारे गैरसमज आगीत तेल ओतत राहून अतिशय उग्र रूप धारण करतात. आजूबाजूचे स्वार्थी-कपटी लोक त्याला हवा देऊन ती अजूनच भडकवतात.

आग कधीच कोणालाही सोडत नाही. एकदा लागली की सारे काही भस्म केल्याशिवाय ती शमत नाही. समजूतदार लोकं नेहमीच आग कशी लागणार नाही याकडे लक्ष देतात. कारण एकदा का तीच्या ज्वाला आसमंताला भिडल्या की मग पाण्याचा शोध घेणे म्हणजे मूर्खपणाच आणि दांभिकताही. अनेकदा आपण पाहतो, जीवनाचा नाश करणाऱ्या आगीवरच काही लोक आपली पोळी भाजून घेतात. आता हे मिलचेच उदाहरण आहेच की ताजे. त्यांना ना कोणाबद्दल आस्था, ना सहानुभूती की कोणाच्या दु:खाची जाणीव. मी आणि माझा स्वार्थ, बास. आग लावून स्वत:च तमाशाई बनणारे हे लोक समाजासाठी-जीवनासाठी अत्यंत घातक आहेत. उजळ माथ्याने वावरणारे समाजकंटक-अतिरेकीच. आपल्यातच वावरणारे छुपे मानवी विध्वंसक बॉम्बंच.

अनेकदा आपण पाहतो, अगदी क्षुल्लक गोष्ट असते परंतु काही लोक राईचा पर्वत करतात. चार कानात एकदा का अफवा गेली की ती कधी चार हजार-चार लाख मनात पोचते हे कळतच नाही. जंगलाच्या आडव्यातिडव्या पसरत जाणाऱ्या वणव्या सारखी अफवा वाढत जाते. कोणा माहीत नसलेल्या व्यक्तीबद्दल सर्रास चर्चा, खुलेआम निंदा, चारित्र्यावर घाला घातला जातो. याच लोकांना चार दिवसांनी हेच पुन्हा विचारा त्यांना काहीच आठवत नसते. समोरचा बोलतोय मग मीही त्यापुढे जाऊन बोलले पाहिजे, त्यासाठी ती व्यक्ती माहीत असण्याची गरज काय. वाईट बोलायला विचार करावाच लागत नाही. सत्यताही पडताळून पाहावी लागत नाही. परंतु या अशा अफवांमुळे एखाद्याचे जीवन मात्र नष्ट होते. ही अफवांची आग बळी घेऊनच थांबते. कधी जीवाचा तर कधी संपूर्ण कुटुंबाचा - मनस्वास्थ्याचा, भविष्याचा.

माणसाला ताप आला की शरिरी आगीचा दाह त्याला जाळतो पण त्यावर औषध घेता येते, ते त्याला बरेही करते. परंतु मनावर झालेल्या खोल आघातांचे काय? अपमानाने पेटलेली आग सूडचक्र जागवते. सूडाला डोळे नसतात. असतो तो फक्त आंधळा प्रपाती दिशाहीन आवेग. निष्पत्ती फक्त विनाशच. खैरलांजी येथील भोतमांगे कुटुंबीयांचे हत्याकांड हे मानवतेला काळिमा फासणारे. या हत्या व महिलांची विटंबना हे अशाच एका आंधळ्या सूडाचे द्योतक आहेत.

एखादा प्रेमात पडला की नेहमी विचारणा होते, " काय रे, दोन्ही बाजूने प्रेमाची लागण झाली आहे ना? का मामला एकतर्फीच आहे? " दोघेही एकमेकांवर प्रेम करत असतील तर मग, अगदी चंद्राची शीतलता आणि चांदण्याची मोहकताही विरहाची आग जागवतात. कित्येक रात्री तळमळून चंद्राला दूषणे लावत काढल्या जातात. अनेक सिनेमात, कथा-कादंबऱ्यांत याची रसभरित वर्णने-प्रसंग आपण पाहतोच. ' चांद फिर निकला, मगर तुम ना आयें..... जला फिर मेरा दिल, करू क्या मै हायें......', ही अशी आर्तता जीवाला जाळीत असते. पण जर हे प्रेम एकतर्फी असेल तर भर दिवसा अनेक लोकांच्या साक्षीने रिंकू पाटील धडधडा पेटते- अत्यंत क्रूरपणे बळी जाते. अशा अनेक रिंकू पाटील समाजात सारख्या जळत असतात. ही प्रेमाच्या आगीची दाहकता तिचा-प्रेमाचाच बळी घेऊनही थांबत नाहीच.

पोटाची आग ही सगळ्यात भयंकर व घातकी. ही माणसाकडून काहीही करवून घेऊ शकते. उचित-अनुचित, चूक-बरोबर, सारासार विचार करण्याची शक्तीच खुंटवणारी पोटाची आग माणसाला मान-अपमान-स्वाभिमान साऱ्यांच्या पार घेऊन जाते. जोवर पोटात अन्न जात नाही तोवर माणूस त्याव्यतिरिक्त कसलाही विचार करू शकत नाही. ना त्याला घर चांगले वाटत ना दुनिया. उपाशी पोटी देवाचे नावही तो घेऊ शकत नाही. त्याचे सारे चित्त एकवटून तो ही आग कशी शमवता येईल याचाच फक्त ध्यास घेतो. पोटाची आग माणसाला असावीच, त्याशिवाय तो स्वत:ची व कुटुंबाची उन्नती करू शकत नाही. परंतु बरेचदा पोटाची आग तितकीच मर्यादित न राहता हव्यासाची, लालसेची भुकी होऊन विवेकहीन होते, कुमार्गाला लागते.

माहेराची लाडकी लेक सून होऊन दिल्या घरात लक्ष्मीचे रूप घेऊन येते. तिचे प्रेमाने आनंदाने स्वागत करण्याऐवजी हुंड्यांची लालसा जागते. आणि सुरू होतो अव्याहत छळ. मग एके दिवशी उडतो स्टोव्हचा भडका अन जळते एक भरभरून जीवन जगण्याचे स्वप्न. असहाय-लाचार-अबला अन तितकेच लाचार-दुर्बल आई-बाप. का? का? आज एकविसाव्या शतकातही ही आग तितकीच किंबहुना काहिशी जास्तच पेटलेली आहे. नेमाने घडणाऱ्या हुंडाबळीच्या घटना टाहो फोडून हेच दर्शवतात. वय-शिक्षण-रूप-धर्म-जात-गरीब-श्रीमंत या साऱ्यांना पुरून उरणारी हुंड्याची आग. अन विशेष म्हणजे या आगीची सूत्रधार - हवा देणारी बरेचदा स्त्रीच असते. एक सबला एका अबलेची जिवंतपणी चिता रचते.

लोकांच्या तोंडचे घास- जमिनी गिळंकृत करून, हजारो कोटीची मालमत्ता गोळा झाली तरीही भूक भागतच नाही असे आमचे नेते-उद्योगपती. आजचे राजकारण, अर्थकारण व समाजकारण हे याच भुकेचे बळी आहेत. खुर्चीचा-सत्तेचा हव्यास कोणाचेही व कुठल्याही थराला जाऊन लांगूलचालन करावयास यांना भाग पाडीत आहे. त्यापायी सामान्य जनता महागाईच्या - भ्रष्टाचाराच्या - मूठभर मदांध दुर्जनाच्या अतिरेकाचे बळी होऊन या रोजच वाढणाऱ्या आगीत होरपळून निघत आहेत. मरताना यातले काहीच बरोबर नेता येणार नाही याचा विसर तर कधीचाच पडलेला आहेच आणि मनाची नव्हतीच कधी पण जनाचीही लाज राहिलेली नाही.

आजचे राजकारणी पाहा, स्वत: आलिशान महालात-थंड हवेत बसून कार्यकर्त्यांना आपसात झुंजवत आहेत. पाच पन्नास लोक मेल्याशिवाय यांची प्रतिमा कशी उजळणार? मग मरणारा आपलाच का असेना. अशी बेअक्कल मेंढरे कितीही मिळतीलच. तेवढीच खाणारी तोंडे कमी होतील. लाख मेले तरी बेहत्तर पण लाखांचा पोशिंदा मरता नये ’हे वाक्य आजच्या काळात सार्थ करावे असा एकतरी पोशिंदा कुठे उरलाय का?

एक वेळ अशी होती की सगळ्या मनांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची आग चेतलेली होती. क्रांतिकारी बेधडक व शूरपणे या आगीच्या ज्वालांमध्ये स्वत:ला झोकत होते. त्यांच्या निर्भय व वीर बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात जन्म घेऊ शकलो. त्यांनी कधीच लोकांना भडकवले नाही, स्वत:ऐवजी बळी दिले नाही. उलट स्वातंत्र्यप्राप्तीचा ध्यास घेऊन स्वत: संग्रामात प्रथम उडी टाकून लोकांना प्रेरणा दिली. ' सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है ', आधी स्वत: केले मग लोकांसी सांगितले. त्यांना लोकांना पटवावे लागलेच नाही. ही खरी आग. ज्या मनामध्ये देशाप्रती स्वाभिमान, राष्ट्रप्रेम नाही त्यांचे जीवन व्यर्थच. देशाला स्वातंत्र्य तर मिळाले पण खरेच का देश स्वतंत्र झाला आहे? त्यावेळी निदान दुश्मन कोण हे तरी ज्ञात होते आज सगळीकडूनच हल्ला होतोय आणि नेमकी कुठली आग विझवायला हवी व ती कशाने विझेल हेही समजत नाही.

अंतरात्म्याची, आतल्या आवाजाची आग ही माणसाला बलवान आणि सर्वशक्तीनीशी सामना करण्यास शिकवते. आणि यासाठीच आतल्या आवाजाची आग सदैव चेतलेलीच ठेवायला हवी. ही आग जर विझली तर जीवनच संपले. जगण्याचे प्रयोजनच नाहीसे झाले. या आगीला जे भिडतात, जिगर ठेवून आत्मविश्वासाने तिच्याशी लढतात तेच जीवनात अलौकिक कार्य करून जातात. विचारी, संतुलित, साधकबाधक परिणामांची शक्यता पडताळून ध्येयाचा पाठपुरावा करणे नेहमीच यशदायी असते. हृदयात हे ’ तेज ’ जागृत ठेवायला हवे आणि त्याला हवाही द्यायला हवी.

Tuesday, March 2, 2010

कटाची आमटी

जिन्नस

  • चण्याच्या डाळीचा कट सहा वाट्या/ चण्याची शिजवलेली डाळ एक वाटी
  • चिंचेचा घट्ट कोळ एक चमचा
  • गूळाचे चार मोठे खडे ( चिरलेला गूळ चार ते पाच चमचे )
  • चार चमचे कोरडे खोबरे व एक चमचा जिरे
  • एक चमचा काळा मसाला, दोन चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ
  • फोडणीसाठी दोन चमचे तेल व मोहरी- हिंग- हळद प्रत्येकी एक चमचा
  • तीन चार लवंगा, दालचिनीचे मोठे दोन तुकडे, तमालपत्राची चार पाने व पाच सहा कडीपत्त्याची पाने

मार्गदर्शन

पुरणपोळी करताना शिजलेली डाळ चाळणीवर टाकल्यावर खाली जे पाणी उरते त्यालाच कट असे म्हणतात. चण्याची डाळ खास शिजवून चांगली घोटून त्यात पाणी टाकूनही कट तयार करता येतो. एक वाटी शिजवून घोटलेल्या डाळीत सहा वाट्या पाणी टाकून चांगले एकजीव करून घ्यावे. त्यात कोळलेली चिंच, तिखट व चवीनुसार मीठ घालून मध्यम आचेवर ठेवावे. दुसरीकडे कढईत कोरडे खोबरे व जिरे खमंग भाजून घेऊन त्याची पूड तयार करून घ्यावी. डाळीला उकळी फुटू लागली की खोबरेजिऱ्याची पूड त्याला लावावी. गूळ व काळा मसालाही घालावा. फोडणीच्या पळीत तेल घेऊन चांगले तापले की नेहमीची फोडणी करून त्यात लवंगा, दालचिनी, तमालपत्र व कडीपत्ता घालून ही फोडणी डाळीवर घालावी. मिश्रण चांगले हालवून एक सणसणीत उकळी आणून उतरावे. ही चविष्ट कटाची आमटी पुरणपोळीच्या जेवणाबरोबर फारच छान लागते.

टीपा

चण्याच्या डाळीमुळे या आमटीचा एक खास स्वाद असून नेहमीच्या जेवणातही आवडते. शिवाय पटकन होणारी व रोजच्याच वापरातले सारे जिन्नस असल्याने खास तयारी करावी लागत नाही. काळा मसाला/गोडा मसाला यातले काहीही चालते. आवडत असल्यास शेवग्याच्या शेंगाही घालतात. शेंगा घालायच्या असतील तर डाळ घोटून पाणी घालून शिजायला ठेवतानाच घालाव्यात व त्या शिजल्या की मग वरीलप्रमाणेच आमटी करावी.