जाता जाता एक नजर इथेही........

Monday, January 16, 2012

फिरणी

कोणालाही जेवायला बोलवायचे म्हटले की भाज्या- ओल्या-सुक्या, भाताचा प्रकार, डाव्या बाजूला तिखटमाखट, रायते, कोशिंबीर, चटण्या.... हे सगळे पटापट ठरते. एकदा का ' दिशा ' ठरली की मग एकमेकांना पूरक पदार्थ आपोआप समोर येतात. पण गोडाची गोची होते. श्रीखंड, बासुंदी, शिरा, शेवयांची खीर, गुलाबजाम, रसगुल्ले, सारखे पदार्थ सारखे सारखे होत असल्याने नकोसे होतात. त्यात एकंदरीतच गोडाचा कल अनेक कारणांनी कमी होऊ लागलाय. आधीच्या भरभक्कम जेवणानंतर काहींना गोड नकोसेच असते. किंवा जिभेवर रेंगाळणारी चटपटीत चव घालवायची नसते. किंवा गोड हवे असले तरी ते गोडमिट्ट व जड प्रकारात मोडणारे नको असते. त्यातून तीनचार कुटुंबे असतील तर घरातली धरून माणसे होतात पंधरा-सोळा. म्हणजे एकतर बाहेरून काहीतरी आणा नाहीतर मोठा घाट घाला. अशावेळी वारंवार न होणारी, करायला एकदम सोपी आणि पोटाला अजिबात तडस न लावणारी थंडगार फिरणी बाजी मारून जाईल. छानपैकी मडक्यात भरून, त्याचे तोंड फॉईलने बंद करून आदल्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवली की काम फत्ते.

वाढणी : सहा ते आठ मडकी ( कुल्फीचे मध्यम आकाराचे मटके मिळतात ते घेतल्यास आठ भरावीत )

साहित्य : दोन वाट्या तुकडा बासमती किंवा आंबेमोहोर। ( शक्यतो वासाचा तांदूळ घ्यावा ) सव्वा लिटर दूध, एक चमचा तूप, अडीच वाट्या साखर, बदामाचे -पिस्त्याचे पातळ काप, गुलाबपाणी, खस.

कृती : तांदूळ धुऊन रोळीत (गाळणीवर) थोडावेळ टाकून ठेवावे। खडखडीत कोरडे झाले की कढईत एक चमचा तुपावर मंद आचेवर पाच मिनिटे परतून घ्यावे. थंड झाले की मिक्सरमधून काढावे. बारीक रवा होईल इतपत वाटायला हवेत. एकीकडे जाड बुडाच्या पातेल्यात दूध तापत ठेवावे. दुधाला तीनचार उकळ्या आल्यावर वाटलेला तांदुळाचा बारीक रवा घालून चांगले ढवळावे. अजून एक उकळी फुटू लागली की साखर घालावी. मिश्रण हालवत राहावे. तळाला लागू देऊ नये. मिश्रण घट्ट होऊ लागले की ज्या भांड्यात किंवा मडक्यात काढावयाचे आहे त्यात ओतून त्यावर बदामाचे-पिस्त्याचे काप लावून गुलाबपाणी/खसाचे थेंब टाकावेत. मिश्रण जरा कोमट झाले की फ्रीजमध्ये ठेवावे. जसजसे थंड होईल तसे घट्ट होईल. जेवण झाले की ही सेट झालेली मडकी द्यावीत. मडक्यातली थंडगार शुभ्र फिरणी-आकर्षक सजावट पाहूनच मंडळी खूश होतील.

टीपा:
तांदूळ न भाजता नुसताच कोरडा करून बारीक वाटून घेऊन फिरणी करता येते. तीही चांगली लागते. परंतु भाजल्याने तांदूळ हलका होऊन जातो व पटकन शिजतो.
मात्र तांदूळ भाजताना मंद आचेवरच भाजायला हवा तोही अगदी पाच मिनिटेच. तांदळाचा पांढरा रंग बदलता नये. तूप एक चमचाच टाकावे. फिरणी तयार झाल्यानंतर त्यावर ओशट तवंग दिसता नये.

दूध आणि नंतर मिश्रण बुडाला अजिबात लागता नये. लागल्यास तो लागल्याचा जळका वास संपूर्ण मिश्रणाला येतो. म्हणून फिरणी करायला घेतल्यावर समांतर इतर कुठलीही कामे करू नयेत. गॅससमोरून हालू नये. अन्यथा एकतर सगळे परत करावे लागेल किंवा तसेच ढकलले तर प्रत्येक घासाला किंचितसा जळकट वास व चव जाणवत राहील. आधीच्या मस्त जेवणाचा बेरंग होईल.

चारोळीही घालतात पण मी घालत नाही, बरेचदा त्या कडूच असतात. गुलाबपाणी व खस हे दोन्ही मी एकत्र वापरलेत. चांगले लागतात. ज्यांना दोन फ्लेवर एकत्र करायचे नसतील त्यांनी फक्त एकच घालावा.

Tuesday, January 3, 2012

थोड्या कष्टाची तयारी - खुपसा पेशन्स आणि फक्त रुपये : एकशेपंचविस.....

रिक्षातून उतरून हातातल्या जड पिशव्या सांभाळत उकरून तथाकथित बुजवलेल्या रस्त्यावरची केविलवाणी ढेकळे आणि मुजोर खड्डे चुकवण्याची कसरत करत, तोल सांभाळत सोसायटीच्या गेटात शिरले. त्या दोन मिनिटात सगळी तीच तीच वाक्ये मनात उमटत गेलीच..... " या मेल्यांना एकाचवेळी खोदायला काय होते? काय टाकायच्या त्या लाइनी एकदाच टाका... पण नाही. अगदी जाणूनबुजून ठरवल्यासारखे एकमेकांना खो देत आळीपाळीने मनापासून रस्त्याला भगदाडे पाडत राहतील. बुजवताना मात्र कुणीकडून माती लोटून सुंबाल्या... तोही लगोलग ! कुत्री-मांजरी तरी चारवेळा माती टाकतील... पण यांना कशाचीच चाड नाही. त्यातून वरून दट्ट्या कधी याबाबतीत येतच नाही मग कशाला सामान्य जनतेची काळजी घ्यायची. कोणी पडू दे... लागू दे... हातपाय तुटू दे.... आपल्या बापाचे काय जातेय. तेच एखाद्याने चार पैसे दिले की त्याच्या दुकानासमोरचा भाग मात्र गुळगुळीत ! "

बरं तक्रार तरी कुठे आणि कितीवेळा करायची ? खोदणारे दहा जण.... सांगायला गेलं की लगेच टांगायला जातात. " मॅडम, अहो आम्हालाही काळजी आहेच की. आम्ही खोदतो तेव्हां अगदी नीट पूर्वीसारखा ( आँ... पूर्वीसारखा... ??? बॉस, म्हणजे पूर्वीइतकाच अडथळ्यांच्या शर्यतीसारखा म्हणताय होय...) करतो. आत्ता आम्ही खोदलेलाच नाही तर... पाणी नाहीतर टेलिफोनवाले असतील. कधी सुधारणार नाहीत. त्यांच्यामुळे आम्हाला फुकटचे ऐकायला लागते. " घ्या... म्हणजे तक्रार करायला गेलो की वर आणखी हे ऐकायचे. हा त्याच्यावर ढकलेल तो ह्याच्यावर ढकलेल... की पुन्हा खोदायला सगळे मोकळे आणि आपण तारेवरची आय मीन चावड्यांवरची कसरत करायला कायमचे तयार ! पण ' हा आजचा विषय ' नाहीये. डायरेक्ट मुद्द्यावर यायचं ठरवून बसले होते पण मन व त्याला तत्परेतेने साथ देणारी बोट ऐकतील तर नं... ती लगेच मोकाट सुटतात. जाऊ दे... असाही ब्लॉग आपलाच आणि तुम्हालाही सवय झालीये आताशा.... तरी सुद्धा ’ मोजक्या शब्दात मुद्दल ’ मांडायचा प्रयत्न अधुनमधुन करावाच म्हणतेय... झालंच तर त्यावरही ’ व्याजाची किंचित सूट " मिळून जाईलच की !

तर, स्वत:ला... पिशव्यांना... ढेकळांना सांभाळत व खड्ड्यांना चुकवत चवडा आणि चप्पल दोन्हींची काशी करत मी गेटमधून आत आले आणि जाधवकाकांची (चारसहा रखवालदारांपैकी एक) हाक आली. सरदेसाईमॅडम, जरा इकडे येता का? इतकी कटकट झाली होती की जाधवकाकांची हाक ऐकल्यावर कपाळावर एक बारीकशी आठी उमटलीच. कधी एकदा घरी जाऊन मस्तपैकी आलं-गवतीचहा-वेलदोड्याचा वाफाळता चहा घेते असं झालं होतं. पण ज्या अर्थी थांबवून ते बोलावत आहेत त्याअर्थी काहीतरी तसंच असेल म्हणून त्यांच्या केबिनमध्ये गेले.

हातातली १५-२० विजेची बिलं माझ्यासमोर धरत ते म्हणाले, " यातले तुमचे जे असेल ते घेऊन जा. " " काका नंबर असेल पाहा लिहिलेला डाव्या कोपर्‍यात आमच्या फ्लॅटचा... द्या नं काढून, मी घेऊन जाते. " " तो नंबर असता तर मीच तुमच्या पोस्टाच्या पेटीत टाकले असते नं नेहमीसारखे. सध्या सोसायटीचा क्लार्क नाहीये म्हणून सगळा घोळ झालाय. " आता मला काय आमचा ग्राहक क्रमांक पाठ थोडाच आहे की मी लगेच बिल शोधून घ्यायला. उद्या आधीचे बिल घेऊन येईन म्हणजे ग्राक्र जुळवून यातले घेऊन जाईन असे त्यांना सांगून मी एकदाची घरी गेले. जरा स्थिरस्थावर झाल्यावर आधीचे बिल शोधून ग्राहक क्रमांक सेलच्या नोटपॅडमध्ये महत्त्वाच्या यादीत टायपून टाकला.

तो टायपत असतानाच मालकाच्या नावाकडे नजर गेली. आता फ्लॅट माझा म्हणजे माझे किंवा नवर्‍याचे नाव हवे. पण सोसायटी बांधली त्या दिवसापासून आमच्या बिल्डरचे नाव फेविकॉलच्या जोडसारखे जे जुडलेय ते आजतागायत. कधी हा जोड तुटणार कोण जाणे. बिल्डर काही आमच्या नावावर करून देत नाही.... एमएसईबीत त्याने भरलेले डिपॉझिट त्याला परत हवे आहे.... आणि सोसायटीच्या ठरावानुसार बिल्डरने आधी हे सांगितलेले नव्हते तेव्हां पैसे का म्हणून द्यायचे ? परिणामी, हे घोंगडे असेच वर्षोनवर्षे भिजत पडलेय. बिल्डर म्हणतो मरा तिकडे... लोकं म्हणतात आम्हाला काय फरक पडतोय. फ्लॅट आमच्या नावावर आहे... अनेक ब्लॉक असेच विकले गेले... नवीन लोकं आले... पुन्हा ते विकून गेले. थोडक्यात काय कोणाचे काही थांबलेले नाही. तरीही केव्हांतरी हा प्रश्न धसास लागणे गरजेचे आहेच. एक हताश सुस्कारा सोडून खड्ड्यांप्रमाणे हाही विषय मी मिटला.

दुसर्‍या दिवशी सकाळीच बिल घ्यायला गेले असता सोसायटीतल्याच राऊतआजोबांनी हाकारले. कधी आलीस- शोमू -शोमूचे बाबाही आलेत का? कसे आहेत दोघे? वगैरे प्रश्न झाल्यावर माझ्या हातातले बिल घेत ते म्हणाले, " अजून तुझे नाव नाहीच का यावर ? " मी बुचकळ्यांत.... म्हणजे यांच्या बिलावर यांचे नाव येते की काय? (मनात ) " आजोबा कधी हा तिढा सुटायचा आता ?" " बहुतेक तुला कळले नसणार... अगं, हा तिढा कधीच सुटलाय. २००८ सालीच बिलं आपापल्या नावावर झालीत. मीच आपल्या सोसायटीच्या जवळपास १०० लोकांचे काम करून दिलेय. ( ह्म्म... नेमके अशावेळी आम्ही गायब.... ) आता तू आलीच आहेस तर टाक करून." असे म्हणून ते गेले.

आमचे संभाषण ऐकत अजून एकजण उभे होते. राउतआजोबा गेल्यावर ते म्हणे की अगं तू कुठे खेटे मारत बसणार बोर्डाच्या ऑफिसात, त्यापेक्षा एजंटला देऊन टाक. तो देईल आठ दिवसात तुला आणून. मला हे एजंट प्रकरण अजिबात मानवत नाही. आजवर मी कधीच कुठल्याही कामाकरिता यांच्या वाटेला गेलेली नाही. अगदी डोमिसाईलपासून सगळे स्वत:च केलेय. तरी म्हटंले विचारूया एजंट किती पैसे घेईल ते. कळाले की साधारण अडीच ते तीन हजाराच्या आसपास घेईल. शिवाय बिल्डरची सही मलाच आणावी लागेल आणि सोसायटीचे नाहरकत प्रमाणपत्रही मलाच घ्यावे लागेल. मला कळेना की मुळात इतके पैसे कशाला लागणार आहेत? इलेक्ट्रिक बिल आपल्या नावावर करण्यासाठी बोर्ड किती चार्ज लावते? फॉर्मला पैसे पडतात का? स्टॅंपपेपर चे काय... हे काहीच माहीत नसल्यामुळे तो सांगतो ते पैसे मुकाट द्यायचे किंवा आपण स्वत: बोर्डाचे ऑफिस गाठायचे.

एरवी अश्या कामात आपण हमखास चालढकल करतोच. आणि मला तर सबळ कारणही होते. एकतर घराचे काम काढलेले त्यामुळे ठाण्यात राहता येत नव्हते शिवाय दातांनी माझा जीव कडकड चावलेला... या दोन्ही आघाड्यांवर लढून लढून मी आधीच अर्धमेली झाले होते. तरीही संचारल्यासारखे मी तिथूनच ठाण्याचे एमएसईबीचे ऑफिस गाठले. आधी कधीच मी तिथे न गेल्याने रिक्षावाला आपल्याला घुमवतो आहे की काय.... म्हणून मधूनच त्याला अरे पासपोर्ट ऑफिसच्या शेजारी आहे नं... हा तेच सांगत होते. ( पासपोर्ट ऑफिसही पाहिलेले नव्हतेच तरीही उगाच... ) त्याने अगदी नीट गेटात नेऊन सोडले.

आत शिरतानाच एकदम छान वाटले. गावी आल्याचा भास व्हावा अशी मस्त झाडी... पारही आहे. थंडावाही जाणवतो. गेटपासून बाहेर अक्षरश: पन्नास पावलांवर प्रचंड गोंगाट, प्रदूषण आणि आत प्रसन्न शांतता. आश्चर्य म्हणजे वर्दळही नव्हती अजिबात. ऑफिसच्या आत असेल सावळागोंधळ असे मनाशी म्हणत मी आत शिरले तर आतही बाहेरची शांतता अजिबात ढवळली जाणार नाही इतकी शांतता. झरझर सगळ्या खिडक्यांवरून नजर फिरली. सगळी डोकी खाली मान घालून कामे करत होती. चटकन वाटून गेले की आपले काम होणार नक्की. तोच सकारात्मक भाव मनात घेऊन चौकशीकडे सरकले. मला काय हवे आहे हे सांगताच चौकशीने तत्परतेने एक चार कागदांचा स्टेपल केलेला गठ्ठा दिला. त्यावर काय कुठे भरावयाचे आहे व सोबत काय जोडावे लागेल हे सांगून अजून एक जादा सेटही आपणहून दिला. मी सगळे नीट पुन्हा एकदा समजावून घेऊन तिचे आभार मानून घर गाठले.

सोबत दिलेला फॉर्म संपूर्ण व बिनचूक भरणे. व
१. आपल्या खरेदीखताच्या बाडातल्या काही पानांची झेरॉक्स सोबत जोडणे.
२. सोसायटीचे नाहरकत प्रमाणपत्र.
३. रु. १०० च्या स्टॅंपपेपरवर अमुक अमुक टायपून नोटराईज्ड करून घेणे.
४. एमएसईबीने दिलेल्या चार पानी फॉर्मवर काही रकाने भरून बिल्डरची सही घेणे.
५. शेवटच्या विजेच्या भरलेल्या बिलाची झेरॉक्स.
६. ब्लॉक माझाच आहे हे साबीत करणारा कुठलाही एक कागद.... फोन बील, रेशन कार्ड, पॅनकार्ड इत्यादीची झेरॉक्स.

मी साडेसतरा वर्षे सरकारी नोकरी केलेली आहे. एकदा का तुम्ही न चिडचिडता ( सरकारी नियमांवर व कागदांवर ) जे काही मागितलेले असेल त्यांची पूर्तता केली तर काम सहसा अडत नाही. त्यातून मी स्वत: सरकारी नोकर पडल्याने संयमाने व चटचट कामे उरकायला घेतली. या सगळ्याची पूर्तता करून ( धावपळ + कधीमधी चिडचिडही झाली हे करताना.... ) चार दिवसांनी सकाळी सकाळी बोर्डाचे ऑफिस गाठले. आज मात्र गर्दी होती. महिन्याचा पहिला आठवडा होता तो. चौकशी चारी बाजूने घेरलेली. आत शिरल्या शिरल्या समोरच चार खिडक्या आहेत. प्रत्येकीवर काय काम येथे होते हेही लिहिलेले आहे. तरीही थोडासा गोंधळ होताच. तेवढा चालायचाच की. खिडकी नं ३ ने माझे बाड घेतले. तपासले. संगणकावर काही रकाने टंकले, प्रिंटरवर कार्बनसकट तीन कागद चढवले... करकर करत मिनिटभरात त्यावर काळे उमटून त्यातला एक कागद माझ्या हातात पडला. रजिस्टर मध्ये माझी सही घेऊन ती उद्गारली, " वीस दिवसांनी घरी फोन येईल. तो आला की रहेजा ला जाऊन रु. २५ किंवा ५० ( फोनवर यातली जी रक्कम सांगतील ती ) भरा आणि तिथेच त्या पावतीची झेरॉक्स देऊन टाका की पुढल्या महिन्याचे बिल तुमच्या नावावर येईल. नेक्स्ट.... "

मी स्तब्ध ! झाले ?? इतकेच ? फक्त इतकेच करायचे होते तर मग एजंट अडीच तीन हजार कशासाठी मागत होता... हा पहिला प्रश्न आला. पुन्हा विचार केला आधी ही काय म्हणतेय तसे होऊ तर दे. वीस दिवसांनी फोन येणार होता.... पण माझे घरच खाली आलेले.... फोन येणार कसा? म्हणून पावती घेऊन पुन्हा बोर्डाचे ऑफिस गाठले असता माझे काम झालेले होते. तिने रु. २५ रहेजाला जाऊन भरण्या करिताची दुसरी पावती हाती दिली. लगेच रहेजा गाठले. इथे मात्र थोडी कटकट झाली. या खिडकीवरचा बाबा फारच खडूस-किरकिरा होता. कदाचित त्याचा ' तो ' दिवस वाईट होता आणि नेमकी मी त्यादिवशी तडमडलेली. त्याचे खेकसणे मी हसून साजरे करून माझ्या आनंदावर अज्याबात विरजण पडू दिले नाही. पैसे भरून झेरॉक्स काढून पावती तिथेच दुसर्‍या मजल्यावरील योग्य त्या टेबलावर देऊन टाकली. काम फत्ते ! डिसेंबरचे बिल आस्मादिकांच्या नावावर हजर !!

एकंदरीत या सगळ्याला लागलेला वेळ : दोन महिने.
बोर्डाच्या ऑफिसात खेपा तिनवेळा.
एकूण खर्च : रु. १०० ( स्टॅंपपेपर )+ रु. २५ बोर्डाची फी = रु. १२५ /-
इतर कारणिक खर्च :रु.२१५ रिक्षा (कोर्ट+बोर्डाचे ऑफिस तीन वेळा+ बिल्डरचे ऑफिस दोनदा + रहेजा ) रु.१५ झेरॉक्स = रु. २३० /-.
बचत : रु. २,१४५ /-

हुर्रेर्रे... !!!