जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, June 14, 2011

उकडलेल्या बटाट्यांची भाजी

लहानपणापासून तहहयात जवळपास सगळ्यांनाच ' बटाटे - बटाटे वापरून केलेले पदार्थ ' धावतात. बऱ्याच लहानमुलांचे व काही मोठ्या माणसांचेही हे प्रमुख अन्न आहे असे दिसून येते. सर्वसाधारण पणे सर्रास सगळ्या सोडाच पण हाताच्या बोटांवरही मोजायला गेल्यास बोटे उरतील इतक्या कमी इतर भाज्या, मुले व काही मोठी खाताना दिसतात. अश्या सगळ्यांसाठी बटाटे वरदान ठरलेय.

बटाटे वापरून केलेले बहुतांशी पदार्थ तसे सोपेच आणि सहजी करण्यासारखेच. त्यातून ते वारंवार केले जात असल्याने तोंडपाठ झालेले असतात. अगदी झोपेतही न चुकता करता येतील इतके सोप्पे. मग ती उकडून घेतलेल्या बटाट्याची भाजी असो की काचऱ्या. कीस असो की थालीपिठे. बटाटेवडे असो की आलू परोठे. कांदा बटाट्याचा रस्सा तर फटाफट होतो. त्यातल्या त्यात दमालूला थोडीशी खटपट करावी लागते. आणि बटाट्यांचे पापड. म्हणजे करायला हे सोपेच आहेत फक्त जरा वेळ काढून करायला हवेत.

काचऱ्या किंवा उकडलेल्या बटाट्यांची भाजी, कोणाचीही छानच होत असणार यात माझे दुमत नव्हते. पण काही मैत्रिणींनी " बरेचदा या दोन्ही भाज्या पटकन होतात व करायला सोप्या म्हणून करतो खऱ्या आम्ही, पण काही मजा येत नाही गं." असे वारंवार म्हटल्याने उगाचच या भाजीची कृती टाकायचा मोह झालाय. कदाचित थोडासा फायदा होईल की काय. एकतर बरीच मोठ्ठी( मला तर वाटू लागलेले की मी डोहाच्या तळाशी दडी मारली आहे. कुठूनही उजेडाची तिरीप दिसेना का सूक्ष्मसा तरंग उठेना असे झालेले गेले काही दिवस. अर्थात इतरही भौतिक कारणांनी मोठ्ठा हातभार लावलेला होताच. ) सुट्टी झाली आहे आणि त्यानंतरची सुरवात, " बटाट्याच्या भाजीने " म्हणजे... ( जणूकाही बरेच जण माझ्या पोस्टची वाट पाहत आहेत... भ्रामक भास... ही ही... ) कोणीतरी म्हणाले वाटते मनात, " किती तेल ओतलेय नमनाला, इतक्या वेळात मी किलोभर बटाट्यांची भाजी करून, खिलवून पार झाले/झालो असतो. " हा हा...

वाढणी : दोन माणसांना पुरावी

साहित्य:

चार मध्यम बटाटे उकडून घ्यावेत

एक कांदा मध्यम बारीक चिरून ( फार बारीक चिरू नये )

तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून

एक पेर आले बारीक तुकडे करून

सात/आठ कडिपत्त्याची पाने

मूठभर कोथिंबीर बारीक चिरून

चार चमचे तेल

नेहमीची फोडणी

चवीनुसार मीठ व दीड चमचा साखर

दोन चमचे लिंबाचा रस

कृती:

बटाटे स्वच्छ धुऊन त्याचे दोन तुकडे करून कुकरला ( किंवा पातेल्यात बटाटे बुडतील इतके पाणी ठेवून साधारण दहा ते बारा मिनिटे ठेवावे. सुरीने शिजलेय ची खात्री करून उतरावेत. ) लावावेत. दोन शिट्ट्या झाल्या की आचेवरून कुकर उतरवून ठेवावा. थोडी वाफ कमी झाली की लगेच बटाटे कुकरमधून काढून निवण्यास ठेवावेत.

एकीकडे कांदा, मिरची, आले, चिरून घ्यावेत.

पितळेचे पातेले असल्यास ते घ्यावे, नसल्यास कुठलेही जाड बुडाचे पातेले/पॅन घेऊन त्यात चार चमचे तेल घालावे. तेल चांगले तापले की मोहरी घालून ती व्यवस्थित तडतडल्यावर हिंग( नेहमीपेक्षा किंचित जास्त हिंग घालावा ) घालून हालवावे. हिंग तेलात नीट विरघळला की हळद घालून त्यावर मिरची व आल्याचे तुकडे, कडिपत्त्याची पाने घालून मिनिटभर हालवावे. मिरची किंचित फुटली की कांदा घालून परतावे. आच मध्यमच ठेवावी.

बटाटे आता किंचित निवले असतील. भरभर साले काढून हलक्या हाताने सगळ्या बटाट्यांच्या एकसारख्या फोडी करून घ्याव्यात. बटाट्यांचा भुगा होणार नाही अशा बेताने फोडी कराव्यात.

आता कांदा जरासा लालसर होऊ लागलेला असेल. त्यावर या बटाट्यांच्या फोडी हलकेच घालून सगळे मिश्रण हळुवार परतावे. तीन चार मिनिटांनंतर त्यात स्वादानुसार मीठ व साखर घालून पुन्हा परतावे. परतून झाले की आच थोडी वाढवावी. तीन ते चार मिनिटे न ढवळता शिजू द्यावे. छान खमंग वास दरवळू लागलेला असेलच. बटाट्यांचा रंग पालटायला लागलेला दिसू लागेल. पुन्हा एकदा मिश्रण अलवार हालवून चार ते पाच मिनिटे मध्यम मोठ्या आचेवरच शिजू द्यावे. खरपुडी दिसू लागली की आचेवरून काढावे. कोथिंबीर भुरभुरवून लिंबू पिळावे. पानात वाढताना उचटणे ( कालथा/ उलथणे ) पातेल्याच्या तळाशी घालून खरपुडीसहित भाजी वाढावी. दही, आंब्याचे लोणचे( लिंबूही धावेल ), गरम गरम पोळ्या आणि ही जठराग्नी खवळणारी भाजी. म्हटले तर अतिशय साधेच जेवण असूनही तृप्ती देणारे. पोट भरलेय. भाजीही संपली आहे तरीही तळाशी चिकटलेली खरपुडी खाण्याचा मोह आवरत नाहीच. आणि तीही या सगळ्या एकत्रित तृप्तीच्याही वर एक तुरा खोवेल.

टीपा :

मायक्रोव्हेवला ठेवणार असल्यास बटाट्याचे दोन तुकडे करून किंचित किंचित चिरा पाडून प्रथम एक मिनिट व नंतर ४० सेकंद तीनदा ठेवावे. मध्यभागी दडस आहे असे वाटल्यास पुन्हा ३० सेकंद दोनदा ठेवावे. ( हे अंदाज घेऊन करायला हवे. बरेचदा बटाट्याच्या जातीवरही अवलंबून असते. ) थोडेसे कोमट झाल्यावर सोलून हलकेच एकसारखे तुकडे करून ताटात पसरून ठेवावेत.

जिरे, मेथी फोडणीत घालू नये. जिऱ्यांनी या भाजीचा स्वादच बदलून जातो. नीटशी कुठलीच चव येत नाही.

लिंबू आच सुरू असताना पिळू नये. शक्यतो लिंबू पिळल्यावर भाजी गरम करण्याचे टाळावे. कोथिंबीर फोडणीत घालू नये. यानेही भाजीची चव बदलून जाते.

भाजी सुरवातीला मध्यम आचेवर व नंतर मध्यम मोठ्या आचेवर करावी. आच मोठ्ठी ठेवू नये. जळून जाईल. अतिशय चविष्ट खरपुडी खायला मिळणार नाही. भाजीचा रंग वरून पिवळसर सोनेरी व तुकतुकीत दिसायला हवा. व तळाशी किंचित करपल्याचा भास देणारी कांदा, बटाट्याच्या एकत्रीकरणाची खरपुडी.

नॉनस्टीक पॅन किंवा कढईत करण्यापेक्षा पितळेच्या पातेल्यात ही भाजी केल्यास चव खासच लागते.

22 comments:

  1. मस्त ग !! खायला घालणार कधी ते सांग आता ! :D

    ReplyDelete
  2. आता पुढल्या भेटीत दोन दिवस राहायलाच ये गं बयो तू. मस्त मजा करु. इथेही मला न भेटता गेलीस ना... :(. चल माफ कर दिया। :)

    ReplyDelete
  3. चोराच्या......!!! :)
    इथे येऊन न भेटता गेलीस शहाणे आणि तिथे तुम्ही सर्व इतके कोसों दूर रहाता की एकाला भेटता भेटता नाकी दम ! :)

    ReplyDelete
  4. हा हा... हे ’एक चोरच बोलतोय म्हणून बरय.
    अगं, तू कु्ठे येणार आहेस हे आधी सांगितले असतेस ना तर मी तिथेच बस्तान मांडले असते. आता च्यामारिकेतले दोघे मला धोपटतील बघ कसे. :D:D

    अजून आम्ही तिघे खो खो खेळतो आहोतच. बहुतेक आम्ही मायदेशीच भेटणार. :)

    ReplyDelete
  5. tumhi mahnta tase postchi wat pahat hoto aani asli khamang post ghewoon aalat mast. aslya pawsali watawrnat batata bhaji aani tumhi dakhwlyapramane....tondala pani sutle....khup diwsane aalyane tumche khamang swagt aso.....yewoo det aata asha jiva trupt karnarya post....

    ReplyDelete
  6. मस्त गं श्री...उद्याच करुन बघते...
    ब्लॉगचं नविन रुप सुंदर दिसतयं...

    ReplyDelete
  7. ब ची भा म्हणजे मला पटकन सहल आठवते...आणि पुरी....:)
    तुझी भाजी तर मस्तच दिसतेय...खरपुडी माझी जाम फेवरीट आणि अगं टीपासाठी एकदा जोरदार टाळ्या..
    किती दिवसांनी आलीस...तो टपोरा गुलाब मस्तच आहे....:)

    ReplyDelete
  8. मस्तच ग.. बटाट्याची भाजी सगळ्यात आवडती असणार्‍रे लोक आम्ही.

    >> किती तेल ओतलेय नमनाला, इतक्या वेळात मी किलोभर बटाट्यांची भाजी करून, खिलवून पार झाले/झालो असतो.

    हाहाहाहाहाहा :P

    ReplyDelete
  9. श्रीताई.. प्रचंड सुंदर लिहिलंय... तोंडाला नेहमीप्रमाणेच पाणी सुटलंय... आता खावीच लागेल... :)

    ReplyDelete
  10. आता मेहीकोच्या इतकी जवळ घुसली आहेस तर त्या पण रेसिप्या टाक... :D
    पोटोबा पार्ट २ कधी येतंय???? ;)

    ReplyDelete
  11. प्रसाद, अनेक धन्यवाद. तुझ्या शब्दांनी पुन्हा हुरूप आला बघ. :)

    कोल्हापुरात पावसाने धमाल उडवली आहे का? गरमागरम कांदाभजी आणि चहा... !!!

    ReplyDelete
  12. उमा, धन्यू गं. :)

    ReplyDelete
  13. हो ना. सहल म्हटली हटकून ब ची भा आणि तिखटमिठाच्या पुर्‍या. :) अपर्णा, तो गुलाब मुन्नारचा.

    आभार्स!

    ReplyDelete
  14. हेरंब, आमच्याकडे पण तोच प्रकार आहे. नचिकेतला ’ प्र चं ड” आवडतो.

    हेहे... त्या तेलात मस्त बटाटाभजी तळून होतील ना? :D:D

    धन्स.

    ReplyDelete
  15. आप, आता काय हक्काचे माणुस आहे घरात.नुसते तोंडातून निघायचा अवकाश... काय? :)

    आभार्स रे.

    ReplyDelete
  16. रोहना, आता तू एवढा म्हणतो आहेस तर... :)
    ’ पोटोबा-२ " भुंग्याला विचारायला हवे.

    काय मग, चंगळवाद सुरू आहे ना सध्या? :D

    ReplyDelete
  17. kolhapurat sadhya jordar pawoos suru aahe....wafalta chaha...garam bhaji...yammi....

    ReplyDelete
  18. वाह सुंदर... मी सगळ्यांत पहिल्यांदा बनवलेली भाजी आणि सगळ्यांत जास्त प्रयोग केलेली भाजीसुद्धा हिचं.... :)

    कसली जबरी दिसतेय ती भरलेली डिश, काश भविष्यात अशी भाजी फोटोवर क्लिककरून डाऊनलोड करता आली तर काय मज्जा येईल नाही ;-)

    ReplyDelete
  19. सुहास, खरेच अजून काही वर्षांनी डायरेक्ट डिश हातातच पडेल. पण मग कोणी हॉटेलात जाईल काय? आणि हे असे फोटूही दिसायचे नाहीत नाहितर पहिला येऊन पळवून घेऊन जाईल आणि मागाहून येणार्‍यांची फर्माईश पुरी करता करता नाकीनऊ येतील. :D:D

    आभार्स! :)

    ReplyDelete
  20. ब.ची भा. मस्तच.बटाटे राईस कुकर मधे छान उकदले जातात.आणी उमलत पण नाहीत.
    भाजीपेक्षा खरवड नक्कीच चांगली लागते!

    ReplyDelete
  21. अरुणाताई, माझ्या घरी आपले मन:पूर्वक स्वागत आहे. आनंद झाला तुम्ही आवर्जून प्रतिक्रिया दिलीत. धन्यवाद. :)

    ReplyDelete
  22. इतक्या पोस्ट्सचा बॅकलॉग आहे... आता वाचतोय एक एक करून! :)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !