कोपऱ्यात पणती तेवत होती. ज्योत स्थिर, शांत होती. मावशीचे काल रात्री निधन झाले होते. थोडीशी आजारी होतीपण खास काही झालेले नव्हते. नेहमीचेच म्हातारपणीचे आजार. एक्क्यांशी नुकतीच पार झाली होती. मावशी वकाका दोघेच राहात होते. दोन मुली गावातच होत्या. नातवंडे, मुली, जावई आलटून पालटून चक्कर मारीतच. घरहीअगदीच आडवाटेवर नव्हते त्यामुळे आला गेला, पै पाव्हणा डोकावत असत. मावशी कायम हसतमुख, अगत्यशीलअसे. वर्षोनवर्षांची जोडलेली माणसे तिने प्रेमाने जपली होती.
सगळेजण जमले होते. तिच्या आठवणी निघत होत्या. आपापले अनुभव सांगत तिला श्रद्धांजली वाहत होते. प्रत्येकाला घरचे व्याप होतेच त्यामुळे हळूहळू जोतो निघाला. मीही बहिणींचे निरोप घेऊन पुन्हा एकदा काकांनाभेटून निघाले. काही दिवस लोटले. दहावा-बारावा झाला. सगळे सोपस्कार झाले. जगराहटी सुरू होतीच. महिन्याभराने माझ्या बहिणीचा फोन आला. तिने मला मावशीच्याच घरी संध्याकाळी बोलावले. येतेच असे सांगूनमी दिवसभराच्या कामांना जुंपून घेतले खरे पण, मनात मात्र तर्क सुरू झाले. शेवटी एकदाची संध्याकाळ झालीआणि ऑफिसमधूनच मी मावशीकडे जाऊन पोहोचले.
दार तिनेच उघडले. चेहरा चांगला होता. मोकळे हसून तिने माझा हात धरूनच मावशीच्या रूम मध्ये नेले. खोलीमध्ये बराच पसारा दिसत होता. मी म्हटले, " काय गं, आवराआवरी चालू आहे वाटते. " त्यावर तिने, " अग, हो ना. आईच्या छान जपलेल्या काही गोष्टी आणि साड्या, इतर सामान पाहत होते. किती आवडीने जमा केले होते तिने हेसारे. वेळ आली की माणूस जातो गं पटकन निघून अन मागे राहतात ह्या सगळ्या आठवणी. " खरेच आहे. पुढे तीम्हणाली, " पण तुला हे दाखवायला नाही बोलावले. बस इथे. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुला दाखवायची आहे. " असे म्हणून तिने मावशीची एक साडी हातात घेऊन तिच्या घडीतून फोटो काढला. मला त्याची पाठ दिसत होती. त्यावरून तो बराच जुना व ब्लॅक ऍड व्हाईट दिसत होता. त्याकडे निरखून पाहून तिने तो माझ्या हातात दिला वम्हणाली, " कोणाचा आहे माहीत आहे का तुला? " मी नकारार्थी मान हालवली खरी पण मला अंधुक शंका आलीहोती. त्यावर तिने सांगितले, " आईच्या पहिल्या नवऱ्याचा. " असे म्हणून तिने त्यांना नमस्कार केला. आमच्यादोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हातात हात घेऊन आम्ही दोघी मावशीच्या मनाला मुकपणे स्पर्श करण्याचाप्रयत्न करीत राहिलो.
थोड्यावेळाने मी घरी आले. मनात मावशी भरून राहिली होती. नकळत बरेच काही ऐकलेले डोळ्यासमोर तरळूलागले. ही माझी मावशी दहा भावंडामध्ये नंबर दोन. वडील ती पंधरा-सोळा वर्षाची असताना अकाली गेले. तोवरवैभवात राहिलेली वडिलांची अत्यंत लाडाची लेक एकदम मोठी झाली. वर्षाच्या आत लग्न लावायलाच हवे ह्यापूर्वीच्या पद्धतीनुसार वर संशोधन सुरू झाले. मुलीला काही विचारण्याचा काळ नव्हताच तो. एक स्थळ सांगूनआले. नवरा मुलगा बीए ची परीक्षा देत होता. खातेपीते घर होते. लगेच लग्न ठरले आणि झालेही. नवऱ्याचीफायनलची परीक्षा होती त्यामुळे तो अभ्यासात गढलेला होता. मावशी घरात रुळायचा प्रयत्न करीत होती अनएकाएकी सुदृढ, देखणा नवरा विषमज्वराने आजारी पडला अन तडकाफडकी गेलाही. अवघा सात आठवड्यांचासंसार. संसार काय असतो हे कळायच्या आत मावशी विधवा झाली.
त्या काळी बहुतांशी मुलीला माहेरीच घेऊन येत. त्याप्रमाणे मावशीही माहेरी आली. माहेरी अत्यंत हलाखीचीपरिस्थिती होती, मावशीला त्याची जाण होतीच. तिने स्वतःचे दुःख बाजूला सारले. भविष्याचा विचारही मनात येऊदिला नाही. कंबर कसून ती आईच्या मदतीला उभी राहिली. स्वतःचे शिक्षण पूर्ण केले ते करताना नोकरी करून घरचालवले. लहान बहीण-भावंडांना शिकवले. तीन बहिणींची लग्न करून दिल्यावर मात्र सगळ्यांनी तिला दुसऱ्यालग्नासाठी खुप प्रयत्न करून तयार केले. हे माझे काकाही बीजवरच होते. त्यांना आधीच्या तीन मुली होत्या. मावशीने सगळे समजून घेतले. त्यांच्या मुलींना आईचे प्रेम दिले. मावशी त्यांची सावत्र आई आहे हे त्या स्वत:हीविसरून गेल्या. तिला स्वतःला एकच मुलगी झाली, तिच ही माझी बहीण. आयुष्यभर जे जे जीवनाने दिले त्यासगळ्या गोष्टी स्वीकारून कायम दुसऱ्याचा विचार करीत ती जगली. आनंद वाटत राहिली.
मावशीच्या मनात तिच्या पहिल्या नवऱ्याची आठवण खोलवर दडलेली होती. तिने कधीही कोणाकडेही बोलूनदाखवले नाही. त्यांची आठवण ठेवणारी ती एकटीच. जीवनावर भरभरून प्रेम करणारे तिचे माणूस अकाली गेलेहोते. फक्त तिच्या स्मरणात जगले ते. हे अलौकिक प्रेम शब्दातीत आहे.
No comments:
Post a Comment
आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !