जाता जाता एक नजर इथेही........

Friday, July 31, 2009

सुरणाचा रस्सा


जिन्नस

  • ४०० ग्रॅम सुरण.
  • दोन मध्यम कांदे- एक बारीक चिरून व एक उभा पातळ चिरून.
  • दोन टेस्पून ओले खोबरे, दोन टेस्पून कोरडे खोबरे.
  • तीन हिरव्या मिरच्या, पेरभर आले, मूठभर कोथिंबीर, पाच/सहा लसूण पाकळ्या.
  • तीन टेस्पून तेल, एक टेस्पून तूप, एक टिस्पून गरम मसाला. दोन चमचे तिखट.
  • खडा मसाला- चारपाच मिरे, लवंगा, बोटभर दालचिनी, चार तमालपत्रे, एक मसाला वेलची, एक चमचा शहाजिरे, अर्धे चक्रीफूल
  • चवीपुरते मीठ व पाऊण चमचा साखर

मार्गदर्शन

सुरणाची पाठ काढून मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. कढईत तेल टाकावे. पुरेसे तापले की त्यावर खडा मसाला दोन मिनिटे परतावा. मसाला परतला गेला की त्याचा सुवास सुटतो. लागलीच त्यावर बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे. आच मध्यम ठेवावी. दुसऱ्या गॅसवर पॅनमध्ये उभा चिरलेला कांदा दोन थेंब तेलावर चांगला लालसर( गडद लालसर ) परतून काढून घ्यावा, त्याच पॅनवर ओले खोबरे व कोरडे खोबरेही वेगवेगळे परतून घ्यावे. कढईत टाकलेला कांदा व खडा मसाला यावर सुरण टाकून परतावे. दोन भांडी पाणी टाकून झाकण ठेवावे.

आले, मिरची, कोथिंबीर, लसूण व हा भाजलेला कांदा व खोबरे हे सगळे एकत्र गंधासारखे वाटून घ्यावे. साधारण दहा मिनिटे झाली की झाकण काढून हे वाटण सुरणाला लावावे व तिखट हवे असल्यास वरून दोन चमचे लाल तिखट घालावे. तसेच एक भांडे पाणी घालावे. दहा मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे. मग त्यात चवीनुसार मीठ, साखर, गरम मसाला व तूप घालून सगळे मिश्रण एकजीव करावे व आवश्यकता वाटल्यास पुन्हा अर्धे भांडे पाणी घालून झाकण ठेवून पुन्हा पाच मिनिटे शिजू द्यावे. सुरण मोडून पाहावे. शिजले आहे असे वाटले की गॅस बंद करावा. सुरणाचा गाळ होऊ देऊ नये. रस्सा दाट नको पण फुळ्ळूक पाणीही नको असा ठेवावा.

हा गरम गरम रस्सा भाकरी, पाव अथवा फुलके व भाताबरोबर सुंदर लागतो.
सुरण शिजणार नाही असे वाटल्यास कुकरमध्ये एक शिटी करून काढावे किंवा मायक्रोव्हेव मध्ये झाकण ठेवून चार मिनिटे ठेवावे. असे केल्यास हा रस्सा अजूनच झटपट होतो. जे मटण-चिकन खात नाहीत मात्र त्याचा रस्सा आवडतो अशांसाठी हा सुरणाचा रस्सा खासच ..... .

Wednesday, July 29, 2009

कुल्फी - मिक्स नटस/ बदाम/पिस्ता


जिन्नस
  • होल मिल्क एक लिटर/ हाफ अँड हाफ मिल्क ( फॅट फ्री-४७३ मीली )
  • स्वीटंड कंडेन्स मील्क ( फॅट फ्री ८ ओंस-२२५ ग्रॅम )
  • दोन टेबल स्पून लोफॅट/फॅट फ्री रिकोटा चीज ( खवा )
  • दोन चमचे साखर.
  • मिक्स किंवा एक कुठलेही-बदाम/काजू/पिस्ते..... पाऊण वाटी.
  • दोन टेस्पून थंड दूध व एक टेस्पून कॉर्न स्टार्च.
  • एक चमचा वेलची पूड व चिमूटभर केशर.

मार्गदर्शन

होल मिल्क घेतल्यास साधारण अर्धे होईतो आटवावे. हाफ अँड हाफ घेतल्यास चांगले गरम झाले की त्यात साखर व कंडेन्स मिल्क घालावे. सारखे ढवळत राहावे. ( दूध पटकन लागते तेव्हा जपावे. ) साधारण दहा मिनिटांनी रिकोटा चीज घालून सगळे चांगले एकजीव करावे. दहा मिनिटाने कॉर्न स्टार्च घातलेले दूध घालून पुन्हा नीट एकजीव करावे. दोन-तीन मिनिटातच दूध थोडेसे घट्ट होऊ लागल्यासारखे वाटेल. लागलीच त्यात बदाम ( नटस पूड ) वेलची पावडर व केशर घालून ढवळावे. पाच मिनिटांनी ऍल्यूमिनियमाच्या कुल्फी पॉटस मध्ये किंवा भांड्यात काढून कोमट झाले की आठ तास फ्रीजर मध्ये सेट करावे.

टीपा

संपूर्ण फॅट फ्री करता येते शिवाय मनसोक्त खाता येते. जर सांगितले नाही तर फॅट फ्री आहे हे कळतही नाही.

माहितीचा स्रोत

चकली.ब्लॉगस्पॉट.कॊम वरील बदाम कुल्फीचा आधार घेऊन संपूर्ण फॅट फ्री करण्याचा प्रयत्न केला आहे.

Monday, July 27, 2009

भरली कारली


जिन्नस

  • पाच सहा मध्यम कारली
  • एक मध्यम कांदा बारीक चिरून
  • चार टेस्पून कोरडे खोबरे भाजून पूड करून , दोन टेस्पून तीळ भाजून कुटून
  • अर्धी वाटी बेसन भाजून (किंचितसे तेल टाकून भाजल्यास जास्त खमंग भाजले जाईल)
  • दोन चमचे धणेजिरे पूड, दोन चमचे लाल तिखट, चवीपुरते मीठ, दीड चमचा साखर,
  • मूठभर कोथिंबीर चिरून, अर्ध्या लिंबाचा रस
  • शॅलो फ्राय करण्याकरीता तेल.

मार्गदर्शन

कारल्याची डेखं काढून मधोमध चीर देउन आतील बिया काढून टाकाव्यात तसेच वरचे आवरण कोवळे नसल्यास थोडेसे तेही तासावे. नंतर मीठ लावून त्यावर वजन ठेवून वीस मिनिटे ठेवावे. म्हणजे कडू पाणी निघून जाईल. एकीकडे कांदा, खोबरे, तिळकूट, भाजलेले बेसन, धणेजिरे पूड, लाल तिखट, मीठ, साखर, कोथिंबीर व लिंबू हे सगळे चांगले कालवून मसाला तयार करावा. तो कारल्यांमध्ये भरून पुडीचा किंवा बारीक दोरा त्याभोवती गुंडाळावा म्हणजे मसाला बाहेर येणार नाही. मध्यम आचेवर तेलावर खरपूस शॅलोफ्राय करावीत. वाढताना गुंडाळलेला दोरा सोडवून वाढावीत.

टीपा

कडूपणा बराच कमी करायचा असेल तर मिठाच्या पाण्यात थोडीशी वाफवून घ्यावीत. साखरेएवजी गूळ घातला तरीही चालते.

Sunday, July 26, 2009

बारात रखनी हैं की लौटानी हैं

" बारात रखनी हैं की लौटानी हैं " ह्या वाक्याचा अर्थ बहुतेक सगळ्यांनाच माहीत आहेच. बिहार-उत्तरप्रदेश व आणिकही काही प्रदेशातले हे हृदय शतशः विदीर्ण करणारे सत्य. मुलगी होणे ..... हा गुन्हा आहेच त्यावर तिला प्रचंड हुंडा द्यावा लागणार.... तेव्हा तिला मारूनच टाका. हे असे इतके क्रूर कोणी वागू शकते का? स्वतःच्या नवजात पोरीच्या गळ्याला नख लावणे ही नीचपणाची परिसीमा आहे, हे खरे असूच शकत नाही. असा विचार आपण केला तरीही ते असत्यात बदलणार नाही.

जेव्हा बारात लौटानी आहे असे उत्तर मिळते तेव्हा नवजात बाळीला दुधाच्या घंघाळात बुडवून मारले जाते. ही इतकी क्रूर, नीच, तामसी कृती राजस गुणात गणले जाणाऱ्या दुधाचा आधार घेऊन पार पाडली जाते. का? दुध हे पारदर्शक नसते म्हणून.....?? तिच्या जीवनाचा अंत करणाऱ्यांना तिची धडपड पाहायची नसते म्हणून......??

आज पुन्हा एकदा या कायमच्या भळभळत्या जखमेवरची खपली निघालीय. थांबते इथेच.

Saturday, July 25, 2009

कातरवेळी बेघर प्राण घरांचे

शब्दांच्या वेशीवर मौन थांबले
नियतीचा चकवा प्राणांत गलबले

बेचैन जीव प्रवास घाबरा
कोण दिशेस वर्तमानास आसरा

मोहभूलीचा सर्वत्र संचार मुक्त
जाणीवांनो व्हा यातून रिक्त

पायांना भोवरा चालतो दशदिशा
शोधत डोळ्यातील हळव्या भाषा

काळजात तेवती व्रण व्याकुळते
कातरवेळी बेघर प्राण घरांचे

Friday, July 24, 2009

उर्मिले असे का केलेस गं तू?

दुसरा शनिवार होता. ऑफिसला सुट्टी असल्याने सकाळी शोमूला शाळेत पाठवून मी जरा रिलॅक्स मूडमध्ये चहा घेत पेपर चाळत होते. नेहमीच साधारण याच वेळेला येणारी माझी बाई आली नव्हती. सुट्टी असल्याने मीही फार चिंतेत पडले नाही. पाहू....... नाहीच आली तर करू आपणच ही तयारी ठेवल्याने मनालाही शांती होती. आजकाल मी हे स्वतःला शिकवून टाकलेय. छोट्या छोट्या गोष्टींनी उगाच जीवाची चिडचिड करून घ्यायची नाही. पटापट मार्ग शोधायचा........ नाहीतर काही वर्षातच बिपी हिसका दाखवायचे.

चहा संपला..... पण पेपर काही चाळून झाला नाही. म्हणून पुन्हा अर्धा कप चहा घेतला आणि दिवाणावर बैठक मारणार तोच बेल वाजली. ह्म्म्म्म, आली वाटतं. कितीही तयारी केलेली मनाची तरी खरं सांगते, खूप बरे वाटले. आधीच दोन शनिवार मिळतात त्यात अनेक गोष्टी अहमिकेने वर्णी लावून मनात रेंगाळत असतात. बाई आली नाही तर मग........... आनंदाने दार उघडले तर बाई तिच्या मोठ्या लेकीसकट दारात उभी. तिला एकूण चार पोरे. ही मोठी--उर्मिला--चौदा वर्षांची. गोड मुलगी. खरे तर पोर अभ्यासात हुशार होती. पण अजून तीन भावंडे, बाईच्या नवऱ्याने ह्यांना सोडून दुसऱ्याच कोणाशी तरी घरोबा केलेला. त्यामुळे आईला हातभार म्हणून दहाव्या वर्षापासून उर्मिला एका ठिकाणी छोट्या बाळाला सांभाळत असे. आठवडाभर त्यांच्याकडेच राही. दुसरा व चौथा शनिवार व त्याला जोडून येणारा रविवार घरी येई.

तिला पाहून मी म्हटले, " अरे वा! आज उर्मिलाही आलीय का? ये गं कशी आहेस? " पण दोघीही काही नेहमीप्रमाणे बोलल्या नाहीत. माझ्याकडे पाहत बाई चाचरत म्हणाली, " ताई, रागावू नका हो. तुम्ही नेहमी मला सांगता राग आवर तुझा पण मला काय होते कोण जाणे. आजही उगाच धाकट्याचा राग या पोरीवर निघालाय. ताई, चुकलं माझं पण बघा हो जरा... " असे म्हणत तिने उर्मिलाचा हात पुढे केला. पाहते तो काय, पंजा आणि अंगठा व तर्जनीतला भाग चक्क फाटला होता. रक्त गळत होतं. चांगले सहा इंचाची जखम दिसत होती. ते पाहिलं, पोरीच्या डोळ्यातले कळवळलेले भाव ...... इतका संताप झाला माझा. " अगदी शर्थ झाली तुमची. हे काय करून ठेवलं? आता उगाच रडण्याची नाटकं नकोत आधी काय लागलं ते सांगा. " तेव्हा कळले की ह्या मूर्ख बाईने राग अनावर होऊन विळी फेकून मारली होती.

खालीच डॉक्टर आहेत त्यांच्याकडे घेऊन गेले. ते आधी फार ओरडले. म्हणाले हिचे नेहमीचेच आहे हे, एखादा दिवस जीव घेईल पोरांचा अशाने. पोरीला टाके घातले, बँडेज बांधून घरी पाठवले. बाई आली माझ्याबरोबर वर. त्यादिवशी मी फार बोलले तिला. ही तिसरी वेळ होती. आधीही दोनदा मधल्या पोरीला व उर्मिलालाच तिने जोरात डोके धरून आपटल्याने मोठ्या जखमा -खोक पडल्या होत्या. तिला पोराचा फार कळवळा..... टिपीकल मुलगा म्हणजे जन्माचे सार्थक प्रकार होता. त्यावरून तर मी नेहमी तिला चिडवत असे. पोरीच तुला पाहणार आहेत , वगैरे..... तिला चांगला दम दिला, जर पुन्हा असा प्रकार घडला तर मीच तुला दोन फटके मारेन आणि पोलिसांना बोलवेन. ( मी यातले खरेच काय करू शकत होते... पण निदान थोडा धाक तरी वाटेल तिला. )

ह्या घटनेला जेमतेम दोन-अडीच महिने झाले असतील. एक दिवस सकाळी पावणेसातला पोराची रिक्षा आली. मी बाईंचा आवाज ऐकला त्याला टाटा केलेला..... मनात म्हटले चला आता लेडीज स्पेशल मिळणार. ती वर आली, भांडी घासायला घेतली. पाच मिनिटातच पुन्हा बेल वाजली. आता कोण आले बाई, असा विचार करत दार उघडले तर बाईंची धाकटी पोर ( वय वर्षे १० ) दारात उभी होती. " आई, आई कुठेय? " ती घाबरलेली आणि धापा टाकत होती. " अग आधी आत तर ये. आई आहे ना. काय झाले तू का पळत आलीस? " ती रडायलाच लागली. तेवढ्यात हात धुऊन बाईही आल्या.... तिला पाहून म्हणाल्या, " काय गं, काय झालं? आत्ताच तर आले ना मी घरून? " तसे ती थरथरत, स्फूंदतस्फूंदत म्हणाली, " ताई, ताईने फास लावून घेतला. "

मला व बाईंना क्षणभर काहीच कळले नाही. बाई प्रथम भानावर आल्या. पोरीचा हात धरून, " काय मूर्खासारखे बडबडतेस? मी आले तेव्हा उर्मिला अंघोळीला जात होती ना? चल.... " असे म्हणत त्या जीना उतरू लागल्या. माझे सासूसासरे, नवरा सगळे तोवर हॉलमध्ये आले होते. मी नवऱ्याला म्हटले तू डॉक्टरांना घेऊन पोच मी जाते पुढे. तशीच मीही पळत बाईंच्या घरी पोचले. पाहते तो काय, खरोखरच उर्मिलाने ओढणीचा फास लावून घेतला होता. कोयत्याने ओढणी कापून बाईंनी तोवर तिला खाली काढली होती. पण ते करताना तिचे डोके धाडकन तिथेच ठेवलेल्या मोठ्या ट्रंकेवर आपटले होते अन मोठी खोक पडलेली, त्यातून रक्त गळत होते.

ते रक्त पाहिले तर मला वाटले, असेल थोडी तरी धुगधुगी. पोर पळत येऊन आम्हाला सांगून बाई पोचेतो किमान दहा मिनिटे गेली होती. ओढणी तिच्या गळ्यात काचली होती. खाली काढल्यावरही शेवटपर्यंत तिची गाठ सुटलीच नाही. मी तिला हात लावला तर अंग गरम लागले. माझ्यापरीने मी तिला वाचवण्याचा प्रयत्न करीत होते तोच डॉक्टरांना घेऊन नवराही येऊन पोचला. त्यांनी खूप प्रयत्न केला पण उर्मिला सगळ्या पलीकडे कधीच निघून गेली होती. फक्त चौदा वर्षांची ही पोर.... अचानक आत्महत्या करून मोकळी झाली.

अर्थात पोलीसकेस झाली. दोन दिवस बराच तपास झाला. पण काहीच निष्कर्ष निघाला नाही. हे घडले तेव्हा घरात फक्त चार भावंडे होती. खरे तर आठवडाभर उर्मिला घरात नसेच. नेमकी ती जिथे काम करत होती ते सगळेजण गावाला गेले होते. हिलाही चल म्हणत होते पण आमची बाई नको म्हणाली म्हणून पोर घरी आली होती आदल्याच रात्री. तीनही भावंडे... दहा, आठ व पाच. उर्मिला अंघोळीला निघालेली म्हणून झोपडीतले मधले दार लावून घेतलेले. बाई आमच्या घरी होती. पोलीसही चक्रावून गेले. शेवटी आत्महत्या म्हणून केस क्लोज केली.

कोणीतरी म्हणाले की रात्री बाई जोरजोरात ओरडत होत्या व ऊर्मीचा रडण्याचा आवाज येत होता. पंधरा दिवसांनी बाई आल्या. मी स्पष्टच तिला विचारले, खरे सांग, " पोरीला मारलेस का तू? असे काय गं तिला बोललीस की ती चौदा वर्षाची पोर घाबरली ...... जीव देऊन बसली. " " नाही हो ताई, मी तिला ओरडले हे खरेयं. माझे डोके फार तापट आहे, पण ती असे काही करेल असे मला कधी वाटलेच नाही. " ती रडत होती. पण आता काय उपयोग पोर तर जीवानिशी गेली होती.

जितका विचार करते तितका अजूनच त्रास होतो. असे काय झाले की हा एवढा धाडसी निर्णय तिने घेतला असावा? का, कदाचित ती आईला जरा धडा शिकवावा---थोडे घाबरवावे म्हणून ड्रामा करायला गेली आणि ओढणीचा फास इतका घट्ट बसला की तिला स्वतःला वाचवता आले नाही. हे कोडे उलगडणे शक्यच नाही आता. फक्त वाईटात एकच थोडे बरे झाले, बाईंनी पुन्हा मुलांना मारले नाही. तापटपणाही कमी झाला. मात्र ह्यासाठी उर्मिलाला जीवानिशी जावे लागले.
( ह्या घटनेला जवळजवळ चौदा-पंधरा वर्षे झालीत. )

Thursday, July 23, 2009

डांगराचे भरीत


जिन्नस

  • पाव किलो डांगर( लाल भोपळा )
  • एक वाटी घट्ट दही.
  • एक चमचा साखर, चवीनुसार मीठ.
  • फोडणीकरताः दोन चमचे तूप, एक चमचा जिरे, हिंग, दहा-बारा मेथीचे दाणे.
  • दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून, चार कडिपत्ता पाने

मार्गदर्शन

भोपळ्याची पाठ काढून त्याचे चार तुकडे करून कुकरला लावावे. एक शिटी झाली की गॅस बंद करून प्रेशर गेले की काढावे. डावाने भोपळा स्मॅश करून त्यात साखर, मीठ व दही घालून सगळे एकत्र करावे. पळी गॅसवर ठेवून तापली की तूप घालावे. नंतर नेहमीसारखी जिरे, हिंग, मिरच्या, मेथीचे दाणे व कडीपत्ता घालून फोडणी करून भोपळ्याच्या मिश्रणावर घालून मिश्रण एकजीव करावे. कोमट वा गार जसे आवडत असेल तसे वाढावे.

Wednesday, July 22, 2009

आशीर्वाद

मायेचे पंख पसरून
बाळा मी तुला जवळ घेते
तुझ्या वाढदिवशी तुला
अनंत आशीर्वाद देते

अंतराचे बंधन प्रेमाला नसते
म्हणूनच मी सदैव तुझ्याजवळ असते
ही जवळीक तुलाही जाणवते का?
माझे अस्तित्व तुलाही कळते का?

नवा देश नवी भाषा तुला
आत्मसात करायची आहे
थोडे कठीण असले तरी
नेटाने पुढे जायचे आहे

निश्चय असला की
सारे काही जमतेच ना
चिखलातही सुंदरसे
कमळ उमलतेच ना?

तुझ्या गुणांचे कमळ
असेच सदा उमलू दे
तुझ्यासवे आमचेही
मन अभिमानाने भरू दे

आई बाबांचे प्रेम
सदैव तुला मिळावे
आजी आजोबांचे आशीर्वाद
नेहमीच पाठीशी असावे

असा आमचा बाळ
सदा सदगुणी राहावा
सगळ्यांसवे तो नेहमी
सुखी आनंदी राहावा.


Tuesday, July 21, 2009

डाळवडा


जिन्नस
  • चणा डाळ पाऊण वाटी
  • मूग डाल अर्धी वाटी, मसूर, तूर व उडीद डाळ प्रत्यकी पाव वाटी
  • एक मोठा कांदा, चार-पाच लसूण पाकळ्या, चार-पाच हिरव्या मिरच्या, एक पेर आले, मूठभर कोथिंबीर, पाच-सहा कडीपत्ता पाने
  • दहा-बारा मिरीचे तुकडे, दोन चमचे धणेजिरे पूड, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरते मीठ
  • तळण्यासाठी तेल

मार्गदर्शन

सगळ्या डाळी धुऊन सहा ते सात तास भिजत घालाव्यात. चांगल्या भिजल्या की कमीतकमी पाणी घालून किंचित जाडसर वाटावे. वाटतानाच त्यात लसूण, मिरची, आलेही वाटावे म्हणजे सगळे चांगले एकजीव होईल. चमच्याने हे वाटलेले मिश्रण साधारण दहा मिनिटे एकाच दिशेने फेटावे. मग त्यात कडीपत्त्याचे तुकडे, चिरलेली कोथिंबीर, मीठ, धणेजिरे पूड, मिरीचे तुकडे, गरम मसाला पूड व लाल तिखट घालून हलक्या हाताने एकत्र करावे. वडे करायला घेताना उभा पातळ चिरलेला कांदा घालून लागलीच प्लॅस्टिक पेपरवर थापून वडे तळावेत. मध्यम आचेवर लालसर रंग येताच काढावेत. सॉस, पुदीना चटणी बरोबर गरम गरम डाळवडे सर्व्ह करावेत.


टीपा

वडे तळायला घेण्याआधी कांदा घालावा. खूप आधीपासून घालून ठेवू नये. कांद्याने पाणी सुटते व मिश्रण पातळ होऊन जाते.

Monday, July 20, 2009

तू तर माझी बायको, शारदा.....

गेल्या वर्षी पुण्याला सासूबाईकडे गेले होते. एक दिवस संध्याकाळी सोसायटीच्या सुंदर मोठ्या गार्डन-क्लबहॉऊस मध्ये फिरत होते. बरेच सीनियर सिटिझन्स एका राउंड टेबल भोवती बसून ब्रिज, पोकर खेळत होते. टेबल टेनिस भोवती तर खूपच गर्दी होती. अगदी लहान मुले जसे ओरडाआरडा करत खेळतात तसेच दृश्य होते. काही आज्या साड्या खोचून तर काही पंजाबी ड्रेसमध्ये ..... काही आजोबा अगदी इरेला पेटून जिंकायचेच असे खेळत होते. दोघेतिघे स्विमिंग पूल मध्ये थोडावेळ एक्सरसाईज करून आभाळाकडे पाहत रिलॅक्स फ्लोट करत पडून होते. एका कोपऱ्यात कॅरमचा अड्डा जमला होता. चौघेजण अटीतटीचा सामना लढत होते. दोघे बुद्धिजीवी मन लावून बुद्धिबळाचा डाव मांडून पाइप ओढत तल्लीन झाले होते.

गार्डनमध्ये चार कोपऱ्यात असलेल्या राउंड बेंचेस पैकी एका कोपऱ्यात काही आज्यांचे हास्यविनोद-गप्पा रंगात आल्या होत्या तर दुसऱ्या कोपऱ्यात सहा जणांचा ग्रुप हार्मोनियम वर येऊ घातलेल्या प्रोग्रॅमची रंगीत तालीम करत होता. तिसऱ्या कोपऱ्यात मे-जून चे सुटीचे दिवस असल्याने आजी-आजोबांकडे आलेल्या नातवंडानी आपला अड्डा जमवला होता. त्यांचा गलका, मस्ती.... पकडापकडी रंगात आली होती. या सिनियर्समध्ये- नव्वदीपर्यंत पोचलेल्या व अगदी तीन-चार वर्षांच्या नातवंडापर्यंत एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे हे सगळे, जीवन भरभरून उपभोगत होते. यातील अनेक जणांना पर्सनल प्रॉब्लेम्स होतेच. काहींच्या तब्यती अत्यंत नाजूक होत्या. काही जण आयुष्याच्या संध्याकाळी संपूर्णपणे एकटे-एकाकी होते. काहींचे जोडीदार अर्ध्यात साथ सोडून गेलेले, मुले दूरदेशात किंवा कामामुळे देशात असूनही जवळ नव्हती. दुःख, विरह, मनस्ताप सगळ्यांनाच घेरून असूनही या क्षणाला ही सगळी माणसे एका आनंदाच्या लाटेवर आरूढ होऊन हसत-खेळत होती. मी एका बेंचवर बसून सगळ्यांचा आनंद पाहत होते. अन जरासे द्ऱ असलेल्या चौथ्या कोपऱ्यात ती दोघे मला दिसली.

काका (आजोबा) पंचाऐशीच्या आसपास तर काकू ( आजी ) सत्त्यात्तर -अठ्ठ्यातर..... काकांच्या हातात काठी होती. किंचित गोंधळलेली, हरवलेली नजर वाटली. मात्र काकू शिडशिडीत बांध्याच्या, छोटासा अंबाडा, हलक्या गुलाबी रंगाची कलकत्ता साडी त्याला मॅचिंग ब्लाऊज व छोटीशी गोल टिकली, प्रसन्न मुद्रा..... स्मार्ट चालणे-बोलणे अशा होत्या. अरे, कालच तर मी यांना चौथ्या मजल्यावर पाहिले होते.... थोडेसे जुजबी बोलणेही झालेले. नेमके काकूंचेही माझ्याकडे लक्ष गेले. मी हसून हात हालवला तसे त्यांनीही.... ओळखलेय, काय म्हणतेस असे खुणेनेच विचारले. तसे मी उठून त्यांच्याजवळ गेले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. मी बेंचशी पोचताच त्यांनी पटकन माझा हात हातात घट्ट पकडून मला जवळ बसवून घेतले.

त्या हाताच्या स्पर्शात अनेक भाव होते. सलगी होती...... अचानक कोणीतरी आपल्याशी आपणहून बोलायला आलेय याचा आनंद होता. हाताच्या घट्ट पकडीत न जाणो मी पटकन निघून गेले तरचे हिरमुसलेपण टाळण्याचा प्रयत्न होता...... मला थोडासा वेळ त्यांच्यापाशी पकडून ठेवण्याची आंतरिक ऊर्मी होती. किती आणि काय काय बोलू असे त्यांना झाले होते. हे सगळे मला नेमके पोचवलेही होते त्या स्पर्शाने. आमच्या गप्पा सुरू झाल्या. पाच मिनिटातच माझ्या लक्षात आले की मी आलेय, बसलेय, आम्ही जरा मोठ्यानेच बोलतोय पण काकांचा चेहरा अगदी कोरा होता. ते आमच्याकडे पाहतही नव्हते. काठीची मूठ दोन्ही हाताने धरून त्यावर हनुवटी टेकवून कुठेतरी दूरवर संपूर्ण रिकाम्या नजरेने पाहत होते.

माझे काकांकडे पाहणे काकूंच्या लक्षात आले. त्यांनी जरासे माझ्या हातावर थोपटले आणि मग काकांच्या खांद्याला स्पर्श केला तसे काकांनी काकूंकडे वळून पाहिले. डोळ्यात थोडीशी ओळखीची झाक तरळली. दोन मिनिटे टक लावून काकूंकडे पाहून मग काका आपले माणूस दिसल्याच्या आनंदाने हसले. मग काकूंनी त्यांना हळूहळू फेऱ्या मारता का असे विचारले. तशी बरं, तू म्हणतेस तर मारतो फेऱ्या असे म्हणत काका उठले. ते जरासे म्हणजे दहा पावले गेल्यावर काकू म्हणाल्या, " अग, गेली सात-आठ वर्षे हळूहळू करत यांची स्मरणशक्ती क्षीण होते आहे. आताशा विस्मृतीने जवळजवळ संपूर्णच कब्जा घेतला आहे गं. प्रकृती चांगली आहे त्यांची. थोडेसे बिपी आणि जरासे डाव्या कानाने कमी ऐकू येते एवढाच काय तो त्रास आहे. पण या काहीही न आठवण्याने सगळी कसर भरून काढलीये बघ. तुला गंमत दाखवते थांब. " असे म्हणत फिरताना आमच्यापाशी आलेल्या काकांना त्यांनी हाताला धरून थांबवले.

काकांनी त्यांच्याकडे पाहिले.... नजरेत कुठेही ओळख दिसत नव्हती. खरं सांगते माझ्या छातीत धडधडले, आता जर काकांनी यांना ओळखलेच नाही तर? तेवढ्यात काकू म्हणाल्या, " अहो, सांगा बरे मी कोण आहे? नीट माझ्याकडे पाहा आणि आठवा..... काय, कोण आहे मी? " श्वास रोखून मी काकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. दोन -तीन मिनिटे स्थिर नजरेने काकूंकडे काका पाहत होते. काकू मध्येच त्यांच्याकडे तर मध्येच माझ्याकडे पाहत होत्या. नजरेनेच मला बघ तर ते आत्ता मला ओळखतील असे सांगत होत्या. मी मनात देवाचा धावा करत होते. तोच काकांनी मिस्कील( तसे मला तरी भासले ) हसत काकूंना म्हटले, " तू ना.... अग तू तर माझी बायको, शारदा. " अन अगदी लहान मूल जसे आईच्या हाताला धरून झोके घेते ना तसे काका काकूंचा हात घट्ट धरून हालवत होते. काकूंनी माझ्याकडे पाहत म्हटले, " चला आज तरी बायकोला ओळखले गं त्यांनी. अग दिवसातून दहा वेळा ही रीहर्सल चालते. तसे इतरही अनेक गोष्टी मी विचारते पण उत्तरे कधी बरोबर आणि बरेचवेळा चुकीचीच येतात. मात्र बायकोची ओळख अचूक आहे हो. "

मग थोड्या अजून गप्पा करून उद्या येशील ना गं बागेत... नक्की ये बरं का , चे प्रॉमिस घेऊन काकू काकांना घेऊन घरी गेल्या. दिवेलागणी झालेली. सगळे आजी-आजोबा आपापल्या घरी गेले होते. घराघरातून टिवीचे आवाज येऊ लागले. मीही उठले.... पण राहून राहून मनात येत होते, काकांचे बरेच वय झाले आहेच. तशात हा असा आजार. उद्या जर काकूंना ओळखण्याचा तंतूही तुटला तर शरिरी भावनांव्यतिरिक्त संवेदना, गुंतवणूक..... संभाषण या सगळ्याच्या परे काका पोचतील. समोरून पाहणाऱ्याला काकांची ही अवस्था वेदनादायक वाटली तरी त्यांना तिचे दुःख, त्रास वाटण्याच्या पलीकडे ते पोचलेले असतील. कशाचाच काहीही फरक पडत नाही अशी निर्वात पोकळी. परंतु काकूंचे काय होईल? काका अजूनही काकूंना ओळखतात हा एकमेव तंतू काकूंना जगवतो आहे. दररोज अनेकदा विचारून त्या खात्री करून घेत आहेत. जर काका विस्मृतीच्या काळोखात बुडाले तर काकूंच्या जगण्याचे प्रयोजनच संपेल. नाही नाही असे होता नये. कदापिही होता नये.

दुसरे काकांच्या आधी काकू गेल्या तर फारच मोठी गडबड होऊ शकेल. आपल्यामागे यांचे कसे होईल याविचाराने काकूंच्या जिवाला कुठेही शांती मिळणारच नाही. शिवाय काकांचेही काय होईल कोण जाणे.... त्यापेक्षा काकाच आधी....... काय हे विचार मी करतेय.... फार वाईट वाटले. अगदी खरं सांगते, राहून राहून मला वाटतेय की काकूही देवाकडे फक्त एवढेच मागत असतील. " देवा शेवटच्या दिवसापर्यंत हे मला ओळखू देत व ह्यांना माझ्याआधी ने रे बाबा. माझ्यामागे यांचे हाल नकोत. त्यांना समजत नसले तरी मला समजतेय ना. देवा, ऐकशील ना एवढे माझे....

Saturday, July 18, 2009

फक्त एका सेकंदाने....

तो: " देवा....?"
देव: " काय रे?"
तो: " मी तुला एक प्रश्न विचारू?’
देव: " हो, विचार ना.”
तो: " देवा, मिलियन वर्षे म्हणजे तुझ्यासाठी किती रे?"
देव: " मिलियन वर्षे म्हणजे माझ्यासाठी फक्त एक सेकंद."
तो: " ह्म्म्म्म.....( नवलच आहे ) देवा, मिलियन डॊलर्स म्हणजे तुझ्यासाठी किती रे?"
देव: " मिलियन डॊलर्स म्हणजे निव्वळ एक पेनी आहे माझ्यासाठी."
तो: " देवा, मला एक पेनी देशील का रे?"
देव: ( हसत हसत ) " हो हो नक्कीच देईन ..... फक्त एक सेकंदाने."


राबडीदेवी मरते व स्वर्गात जाते. ( हसू नका..... ) स्वर्गात गेल्यावर एका मोठ्या भिंतीवर खूपसारी घड्याळे टांगलेली असतात.

ते पाहून ती विचारते, " ही एवढी घड्याळे कसली आहेत? "
" ती असत्याची घड्याळे आहेत. पृथ्वीवर राहणाऱ्या सगळ्यांच्या असत्याची घड्याळे आहेत ती. जेव्हां जेव्हां तुम्ही खोटे बोलता तुमच्या घड्याळाचा काटा फिरतो. " यमराज उत्तरतो.
" ओह! असे आहे का? बरं मग ते घड्याळ कोणाचे आहे?" राबडी विचारते.
" ते ना, गौतम बुद्धाचे आहे. त्याच्या घड्याळाचे काटे कधीच फिरले नाहीत. म्हणजेच तो कधीच असत्य बोलला नाही. " यमराज उतरतो.
" आणि ते कोणाचे आहे? " राबडी विचारते.
" ते अब्राहम लिंकनचे आहे. त्याच्या घड्याळाचे काटे केवळ दोनदाच फिरलेत. कारण संपूर्ण आयुष्यात तो फक्त दोनदाच खोटे बोलला आहे. " इति यमराज.
" माझ्या लालूचे घड्याळ कुठे आहे यमराज? " राबडी मोठ्या उत्सुकतेने विचारते.
" लालूचे घड्याळना माझ्या ऑफिसमध्ये आहे. मी ते सिलींग फॅन म्हणून वापरतोय. " इति यमराज.

(संकलनांचे रुपांतरण)


Friday, July 17, 2009

फ्लॉवर-बटाट्याचा हिरवा रस्सा.



जिन्नस

  • पाव किलो फ्लॉवरचे छोटे तुरे, आठ-दहा छोटे बटाटे व एक वाटी ओला मटार.
  • एक कांदा बारीक चिरून.
  • चार चमचे ओले खोबरे, एक चमचा जिरे व पाव चमचा गरम मसाला.
  • सहा/सात हिरव्या मिरच्या, एक पेर आले, मूठभर कोथिंबीर व चार लसूण पाकळ्या.
  • चार चमचे तेल. अर्धा/पाऊण चमचा साखर व चवीनुसार मिठ.

मार्गदर्शन

पातेल्यात तेल घालून नेहमीसारखी मोहरी, हिंग, हळद व धणेजिरे पूड घालून फोडणी करावी. त्यावर कांदा घालून मध्यम आचेवर चार मिनिटे परतावे. त्यावर फ्लॉवर, बटाटे व मटार घालून चांगले परतून दोन वाट्या पाणी घालून झाकण ठेवून दहा मिनिटे शिजू द्यावे. ते शिजत असताना ओले खोबरे, मिरच्या, आले, लसूण, जिरे, गरम मसाला व कोथिंबीर याचा मसाला वाटून घ्यावा. शक्य तितका गंधासारखे वाटून घ्यावे. भाजी शिजत आली असे वाटताच हा वाटलेला मसाला, मीठ व अर्धा/पाऊण चमचा साखर घालून ढवळावे. अजून एक वाटी पाणी घालून झाकण ठेवावे. साधारण दहा मिनिटाने भाजी तयार होईल. गरम फुलके किंवा पावाबरोबर हा हिरवा रस्सा अप्रतिम लागतो.

टीपा

किंचित आंबटपणा हवा असल्यास वाढताना थोडेसे लिंबू पिळावे.

Thursday, July 16, 2009

आमचा ब्रह्मराक्षस....

आमच्या ब्रम्हराक्षसाचे सुंदरसे ब्रम्हकमळ

नाजूक जाई


हासरा मोगरा

फुले-कळ्यांनी डवरलेला मोगरा

अनंत-विशेष आवडता

डबल तगर

कडीपत्ता


फुलझाडांचे विशेषतः सुवासिक फुलांचे मला आत्यंतिक वेड आहे. बिया रुजवून डोकावणारे कोंब लुभावतात मला. तयार, मोठ्या झालेल्या रोपांपेक्षा आपण लावलेल्या अगदी नाजूक रोपांना दररोज किंचित किंचित वाढताना पाहून जास्त आनंद मिळतो. इथे सात महिने कडक थंडी त्यातले -पाच महिने स्नो त्यामुळे जमिनीत आपली सुवासिक फुले लावून ती जगणे शक्यच नसल्याने मी सारी कुंडीत लावलीत. गेली सात-आठ वर्षे नाजूक नाजूक फुले ती नित्यनेमाने देत आहेत. गेल्या वर्षी सुंदर ब्रह्मकमळही आले अन बहार आली. ब्रह्मकमळाचे वेडेवाकडे वाढणारे झाड पाहून माझा लेक त्याला ब्रह्मराक्षस म्हणतो.. समर सुरू झालेला आहेच, माझी फुलेही बहराला आलीत. वाटले तुम्हालाही दाखवावीत.

Wednesday, July 15, 2009

हलकेच जाग मज आली.....

माणसाच्या जीवनात अगदी लहानपणापासून असे अनेक प्रसंग येतात ज्यावेळी काही निर्णय विचार न करता घेतले जातात तर काही नाईलाज म्हणून, काही मला वाटते तेच बरोबर आहे ह्या समजुतीतून. कालांतराने ती समजूत योग्य होती की गैर होती ते कळून येतेच. काही दिवस उलटले की त्या प्रसंगांची तीव्रता काळाच्या प्रवाहात कमी होते व अगदी सहजपणे योग्य निर्णय समोर येतो. अर्थात तोवर वेळ कधीच निघून गेलेली असते. राहून राहून मन म्हणते, खरे तर हे इतके सरळ सोपे होते तरी पण मला त्यावेळी का बरे नाही सुचले. इतका मनः स्ताप मी का बरे करून घेतला? वाटले इतके हे टोकाचे नव्हतेच मुळी.

हे असे प्रसंग व नंतर त्या प्रसंगाकडे आपले मागे वळून पाहणे आपल्या आयुष्यात वारंवार येत असते. मागच्या प्रसंगी न सुचलेले पुढच्या प्रसंगीही सुचत नाहीच. कारण तेव्हा ती वेळच तशी असते. म्हणजे त्यावेळी आपल्याला तसे वाटत असते. म्हणजे या सगळ्याचे मूळ ती वेळ हेच आहे का? काळ कोणासाठीही कधीच थांबत नाही. तो थांबत नाही हेच चांगले आहे. नाहीतर आपण सगळेच डबक्यातल्या शेवाळे धरलेल्या पाण्यासारखे साचलेले असतो. तरीही सगळेच काळाला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतात. कोणी त्याला आपल्या आठवणींमध्ये जखडून ठेवतात. तर कोणी त्याच्याबरोबर त्याच्या गतीने धावत राहतात. पण त्या धावण्यात आजचा दिवस जगायला मात्र विसरतात.

जवळ असलेल्या सुखांकडे न पाहता उद्याच्या सुखावर नजर ठेवून आज ला रटाळ, ओढग्रस्त, स्वतःसाठी व स्वतःच्या माणसांसाठी दोन मिनिटेही वेळ नाही असे जुंपून घेतात. दुर्दैवाने अशा आपल्यातल्या काही जणांचा काळ पूर्णविराम बनून येतो. बाहेर पडलेली आई-कामाला गेलेला बाबा-मुलगा, सगळ्या जाणीव पार करून दूर निघून जातात. आजही जीवन मनासारखे घालवले नाही अन उद्या उरलाच नाही.

अशा अचानक जाणाऱ्या माणसांचा ह्या जगातला काळ गोठला. अगदी साध्यासाध्या गोष्टीही करायच्या राहून गेल्या. लेक कधी पासून मागे लागली होती, चौपाटीवर जाऊयात. दररोज उशीर होतो यायला, लेकाला प्रॉमिस केलेय क्रिकेट खेळेन ...... आईबरोबर बसून निवांत गप्पा किती वर्षात केल्या नाहीत. चार दिवस सुटी काढून गणपतीला सगळ्यांना गावी घेऊन जाईन जाईन असे किती वर्षे घोकतोय पण अजून मुहूर्त सापडत नाही. बायकोला घरात झोपाळा बसवून हवाय, गॅलरीत नक्की लावता येईल. फार हौस आहे तिला, रात्री वेलची घातलेली कॉफी अन एकमेकाला बिलगून जगजितच्या सुरात विरघळून जायचे. ते विरघळणे वगैरे होईल की नाही माहीत नाही परंतु त्या झोपाळ्यामुळे तिला जे हे सुख मिळणार आहे ते मला पाहायचे आहे. कधी जमणार आहे हे सारे कोण जाणे..... उद्या उद्या करू म्हणता म्हणता उद्या राहिलाच नाही.

अपघाताने अथवा अचानक उद्भवलेल्या शारीरिक दुखण्याने माणसे जातात ते कालांतराने अपरिहार्यपणे मन स्वीकारते. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करते त्यावेळी तिची मानसिक परिस्थिती तिच्यापुढे फक्त हाच पर्याय आहे व तोच स्वीकारणे भाग आहे हे निक्षून सांगत असेल का? जीवन स्वतःच्या हाताने संपवणे हे फार कठीण आहे असे मला तरी वाटते. एखाद्या कीडामुंगीला मारणे सुद्धा नकोसे वाटते. आपण सगळेच म्हणू की दुसऱ्या माणसाला जीवानिशी मारणे मला कदापिही शक्य नाही एकवेळ मी स्वतः जीव देऊ शकेन. हे म्हणणे योग्यच वाटते कारण कोणा दुसऱ्या माणसाचे जीवन संपविण्याचा विचार आपण करू शकतच नाही. तरीही कुठल्याही परिस्थितीत जीव देण्यासाठी स्वतःला तयार करणे आणि तेही अपरिहार्य पर्याय म्हणून, फार हिंमत हवी. जिवंत राहण्याची आसक्ती माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत असते तरीही माणसे जीव देतात.

खिडकीशी बसून लिहीत होते आणि वाऱ्याच्या झुळकीबरोबर मोगऱ्याचा गंध आला, येतच राहिला. अतिशय मंद सुगंध माझ्या अंतरात विरघळू लागला. फुलांचे सुवास हे मला अतिशय वेड लावतात. वर लिहीत असलेले विचार या गंधापुढे विरून गेले.जर हे विचार या सुवासात लुप्त झाले तर त्या जीव देणाऱ्या माणसांना त्यांच्या कुठल्याच सुगंधी, आश्वासक, मी तुझ्यासाठी सदैव आहेच अशा जवळच्या नात्याने तेवढा विश्वास देऊ केला नसेल का? दुःख ऐकून घेऊन काहीतरी मार्ग नक्कीच निघेल, असा धीर देऊ शकेल अशी एकही व्यक्ती जोडली नव्हती, की त्या जोडलेल्या माणसांनीही पाठ फिरवली असेल?

मनातले सगळेच सल दाखवता येत नाहीत. पूर्ण आयुष्यभर ते त्यांच्या नखांनी पुन्हा पुन्हा सुकलेली क्षते ओरबाडतच असतात. त्यांना बरोबर घेऊनच जगावे लागते. प्रत्येक मनाला वाटत असते हे माझे दुःख फार मोठे आहे, कालांतराने ते कुरवाळणे त्यातच रमणेही आवडू लागते. काही जणांना लोकांकडून सहानुभूती मिळवणेही आवडत असते. पण खरेच का दुःख वाटता येऊ शकते? वाटून ते हलके होऊ शकते? ऐकून चुकचुकणारे बरेच मिळतील पण ते कमी व्हावे असा प्रयत्न करणारे कीती असतील? आनंद हाच खरे म्हणजे वाटता येऊ शकतो. कारण समोरच्या माणसाने तो कौतुकाने स्वीकारला नाही तरीही कमी होणार नसतो. तो सर्वदूर तुमच्या मनभर साजरा होत असतो. त्याची लागण समोरच्यालाही थोडीफार होतेच.

पण दुःखाचे मात्र तसे होऊ शकत नाही. जाणीवा बोथट होतात म्हणून अश्रू सुकतात हे वरकरणी सत्य असेल पण त्यांचे दबले हुंदके मात्र त्याच हृदयाला ऐकू येतात ज्याने सारे भोगले आहे. म्हणूनच कवी ग्रेस म्हणत असावेत,

हलकेच जाग मज आली

दुःखाच्या मंद स्वराने,

कारण कितीही वाटू म्हटले तरी ते ना कोणी घेऊ शकत ना कोणाबरोबर शेअर केले की हलके झाले असे होऊ शकत. तात्पुरता निचरा होत असेलही. जेव्हा दुःख होते तेव्हा ते कायमस्वरूपी होते. ते हलके फक्त आपले स्वतः चे मनच करू शकते. आणि तेही काळाच्या प्रवाहीत राहण्यामुळेच घडू शकते. दु:खाला आठवणींच्या साम्राज्यात कैद करून ठेवू नये. शक्य तितक्या लवकर त्याला मागे टाकायचा प्रयत्न करायला हवा. याचा अर्थ ते संपते असे नाही. पण त्यात ’ आज व उद्याही ’गोठवून ठेवू नये. मनाच्या खोल अंधारकप्प्यात त्याला ढकलून द्यावे. पुन्हा नव्या उभारीने मनाची कवाडे उघडी ठेवून आसक्तीने जगावे. सुख-दु:खाच्या पाठशिवणीच्या खेळाशी समरसून खेळण्यास सिद्ध व्हावे.

Tuesday, July 14, 2009

समर ट्रीट




समर आता जाणवायला लागलाय. वर्षाचे सात महिने थंडीची सवय झाल्याने तापमान ७०च्या आसपास घोटाळू लागले की या रसदार मधुर फळांची आठवण येऊ लागते. आपल्या सारखे हापूस आंब्याचे सुख नसले तरी मेस्किकन आंबे खाऊन संपायच्या आतच ही सारी सुंदर बहुतांशी सायट्रीक फळे नजरेला खुणावतात व तहानेला शमवतात.

Monday, July 13, 2009

एक अभिजात कलावंत पंचत्वात विलीन झाला.


गेली पन्नास-साठ वर्षे चित्रपटसृष्टीवर खलनायकी, विनोदी, गंभीर वळणाच्या अभिनयाने अधिराज्य गाजविलेले समर्थ अभिनेते नीळकंठ कृष्णाजी तथा निळू फुले यांचे आज पहाटे अन्ननलिकेच्या कर्करोगाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. एक अभिजात कलावंत पंचत्वात विलीन झाला.

निळू फुले यांनी हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकांनाही ‌संपूर्ण भारतातील लोकांनी नावाजले होते. रंगभूमीवर विविधढंगी भूमिका जिवंत करणारे अभिजात, हाडाचे कलावंत अशा निळू फुलेंनी चित्रपटांत चांगले यश मिळवूनही रंगभूमीची साथ सोडली नाही. त्यांनी नाटकांमध्ये साकारलेल्या सखाराम बाईंडरने नाटय़सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेले आणि मराठी रंगभूमीला एक नवा आयाम मिळाला. सिंहासनमध्ये त्यांनी केलेली दिगू या पत्रकाराची भूमिका म्हणजे सत्तेच्या बळावर स्थापित लोकांच्या निंदनीय, स्वार्थी कृत्यांचा माहीत असूनही प्रतिकार न करता येणाऱ्या माणसाच्या असहायतेचे दर्शन घडवते. दिगूला अजरामर बनविले त्यांनी. सामनामधील त्यांनी पाटलाची भूमिका रंगवितानाचा त्यांचा अभिनय डॉ. श्रीराम लागू यांच्या समर्थ अभिनयाच्या तोडीस तोड होता. सरपंच-आमदार-साखर कारखान्याचे अध्यक्ष अशा विविध पदांवरील धनदांडग्यांची मस्ती ते सही सही रंगवत असत. अनेकदा त्यांना पाहिले तरी संताप येत असे. कलाकाराचे सारे यश यात सामावलेले असते.


' सामना', 'सिंहासन', 'जैत रे जैत' यासारखे मराठी चित्रपट असोत, 'कुली', 'सारांश', 'मशाल', 'नरम गरम'सारखे हिंदी चित्रपट असोत वा सूर्यास्त, सखाराम बाईंडरसारखी नाटके असो, निळू फुले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा प्रत्येक ठिकाणी उमटवला. त्यामुळे हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील निळू फुले यांना आदराचे स्थान होते. मराठी नाटकांबरोबरच मराठी चित्रपटांवरही त्यांनी आपला ठसा उमटवला. 'सिंहासन' चित्रपटातील पत्रकार दिगू टिपणीस असो की 'सामना'मधील हिंदूराव पाटील असो, त्यांचा अभिनय सर्वांनाच भावला. अमिताभ बच्चनसारख्या अभिनेत्याच्या 'कुली' चित्रपटामध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचे वेगळेपण दाखवून दिले. त्यामुळे हा चित्रपट अमिताभबरोबरच निळू फुले यांच्यासाठीही लक्षात राहिला.

अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करणारे निळू फुले प्रत्यक्षात मात्र अत्यंत नम्र आणि शांत स्वभावाचे होते. पांढरा पायजमा आणि वर झब्बा, खांद्यावर कापडी झोळी हाच त्यांचा कायमचा वेष. मामाकडे कधीकधी त्यांच्या झालेल्या भेटींची आठवण होते आहे. या महान कलाकाराला दंडवत. तुमच्यावर आमचे प्रेम होतेच ते असेच अखंड राहीलच.

त्यांचे बरोबरच होते....


प्रवास मग तो कुठल्याही वाहनाने करायची आम्हा सगळ्यांची तयारी असते. त्यातल्या त्यात सगळ्यात त्रासदायक व कंटाळवाणा म्हणजे विमानप्रवास व आनंददायी म्हणजे ट्रेनचा प्रवास. मायदेशात आल्यावर जितके शक्य असेल तितके आम्ही ट्रेनने प्रवास करतोच. दोन वर्षांपूर्वी मी व लेक असेच मुंबई-पुणे-मुंबई प्रवास करायला निघालो. नाशिक किंवा पुणा प्रवासासाठी शक्यतो आपला सेकंडचा डब्बाच मस्त वाटतो. अनेकविध गोष्टी आजूबाजूला घडत असतात. शिवाय दरवाज्यात जाऊन उभे राहता येते. उघड्या खिडक्यांमधून मस्त वारा येत असतो. आमचे येणे पावसाळ्यातच होते त्यामुळे घाटातले आल्हाददायक वातावरण, पावसाचा मधूनच शिडकावा-क्वचित सपकारे.

मुंबईहून सुटल्यापासून नॉनस्टॉप चाय... चाय.... कॉफी, टोमॅटो सूप- या सगळ्या गाड्यांमधले टोमॅटो सूप खास वेगळेच असते. पुन्हा चव तीच. अनेक प्रकारचे नाश्ता... काही मिळत नाही असे नाहीच. चिक्की, चॉकलेट्स , काही वेळा तर फिरणी व गुलाबजामही पाहिलेत. मुख्य म्हणजे एकदम प्यारा ' बटाटेवडा '. मग तो गाडीतला असू दे, कर्जतचा असू दे... केवळ अप्रतिम. आठवणीनेही तोंडाला पाणी सुटले. त्याच्याबरोबर जराशी तळलेली / कच्ची हिरवी मिरची, लसणाची लाल कोरडी चटणी. आता कधी बरे मिळणार हे खायला...... , वातावरणनिर्मिती फार महत्त्वाची आहे हो. नुसताच वडापाव तर काय घरातही आपण बनवतोच. पण एकीकडे पाऊस, गाडीतला कोलाहल, विकणाऱ्यांचे निरनिराळे भसाडे, टीपेला पोचलेले आवाज, सहप्रवाशांची आणि आपलीही गडबड, मध्येच लहान मुलांची पळापळ, रडणे, हट्ट-रूसवेफुगवे..... त्याची लज्जत काही औरच असते ना.

गाडी ठाण्याहून निघाली. मी व लेकाने समोरासमोरच्या खिडक्यांचे आरक्षण दोन महीने आधीपासून करून ठेवले होते. गाडीत प्रचंड गर्दी होतीच. दोनदोन व तीनतीन अशा सीटसपैकी दोनदोन च्या खिडक्यांत आम्ही दोघे होतो. अगदी गाडी सुटता सुटता एक बाई दोन लहान मुलांना घेऊन चढली. एक वय वर्षे सात दुसरे चार. आमच्याच इथे परंतु तीनतीन मध्ये तीच्या सीटस होत्या. धावतपळतच गाडी तिने पकडली होती. त्यामुळे तिला चांगलीच धाप लागलेली. शिवाय दोन्ही लहान पोरे व सामान होते. पोरे आली तीच डायरेक्ट खिडकीत गेली. साहजिकच आहे. बॅग्ज वर ठेवायला गेली तर जागा आधीच इतरांच्या बॅग्जने भरली होती. मग ही माझी जागा आहे तर मग कोणी बॅग्ज ठेवल्या, काढा इथून.... वगैरे बडबड सुरू झाली. कोणीही फारसे लक्ष दिले नाही शेवटी एक आमच्या डोक्यावर, एक पायाशी करत बॅगा सुस्थळी पडल्या.

तिच्या तीन सीटस मध्ये एकही खिडकी नव्हती. एकाबाजूची कॉर्नर तर समोरची कॉर्नर व मधली अश्या सीटस होत्या. मुलांना खिडक्या हव्या होत्या. नुकतेच आल्याने मुले आधी खूप एक्साईटेड होती. वीस-पंचवीस मिनिटे खिडकीत उभे राहिली. पण मग त्यांचेही पाय दुखले असावेत. दोन्ही खिडक्यांत साधारण पन्नासच्या आसपासचे दोघे बसले होते. त्यांना या मुलांच्या सारख्या चाललेल्या चुळबुळीने , एकमेकांशी थोडीफार भांडणे, मध्येच आईकडे वळून बोलणे-तिच्याकडे जाणे ( सगळ्यांचे पाय तुडवीत ) परत खिडकीत येणे या सगळ्यांची कटकट होऊ लागली. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसू लागली.

मुले उभे राहून दमली तशी त्यांनी भुणभूण थोडीशी रडारड सुरू केली, मला खिडकी पाहिजे... मला खिडकीत बसायचे. प्रथम ही मागणी हळू आवाजात व मधूनच होत होती. दहा-पंधरा मिनिटात अगदी टीपेला पोचली. खिडकीत बसलेले दोघेही जाम वैतागले होते. त्यांनी दुर्लक्ष करण्याचा मार्ग अवलंबला होता. पोरे काही भेकायची थांबेनात. आईही फार काही समजूत काढत नव्हतीच. पण शेवटी तिला दखल घेणे भागच असल्याने तिने खिडकीतल्या दोघांनाही म्हटले, " दोनो बच्चे रो रहे ना, उनको बैठने दो जरा खिडकीमे. आप लोग तो बडे हो ना. ' त्या दोघांनीही एकदा तिच्याकडे पाहिले आणि सरळ खिडकीतून बाहेर पाहायला सुरवात केली. पोरे हा संवाद ऐकत होतीच. त्यांना वाटले आता आपल्याला बसायला मिळणार परंतु तसे न झाल्याने त्यांनी एकदम मोठा गळा काढला.

आसपासची सगळी माणसे या दोघा खिडकीत बसलेल्यांकडे पाहत होती. कदाचित मनात म्हणतही असतील, कमाल आहे, एवढे मोठे झाले तरी खिडकीचा मोह सुटत नाही. ती लहान पोरे इतकी रडताहेत जरा द्यावे की बसायला. थोडक्यात बऱ्याच जणांना ती दोघे भावनाशून्य, माणुसकीच नाही, वगैरे वगैरे प्रकारातली वाटत होती. (स्वत:वर वेळ येत नाही तोवर दुसऱ्याला बोलणे सोपे असतेच.) त्यांनी केलेले दुर्लक्ष आईला फारच डाचले शिवाय पोरांच्या गळा काढण्यानेही ती भयंकर वैतागली. तिने डायरेक्ट त्यातल्या एकाला म्हटले, " क्या रे कबसे बच्चे रो रहे, तुमको दिखता नही क्या? अभी इत्ते बडे होके भी तुमको खिडकी माँगती है, तो मेरे बच्चे तो छोटेछोटे हैं ना. थोडा खिसको औरे उनको जगा दे दो. " हे सगळे अरेरावीने. जणू हिची मुले ही त्यांची जबाबदारी असल्यासारखी.

तरीही ती दोघेही संयम राखून होती. त्यातल्या एकाने अतिशय शांतपणे तिला सांगितले, " आम्हालाही दिसतेय तुझी मुले रडता आहेत, परंतु त्यांना खिडकी हवीशी वाटणारच हे माहीत असूनही ती मिळण्याची खबरदारी तू घेतली नाहीस. पावसाचा आनंद लुटण्यासाठी आम्ही महिनाभर आधी तिकिटे बुक करून ठेवलीत. मुले सारखी आमच्या पायावर पाय देत आहेत, पण तू एकदाही त्यांना तसे करू नका असे सांगितले नाहीस. उलट आल्यापासून त्यांना सोडूनच दिले आहेस. तेव्हा कृपया त्यांना आवर घाल व जागेवर बसव. " हे ऐकले मात्र तिने जो काही तोंडाचा पट्टा सुरू केला...... त्या दोघांना पूर्ण व्हिलनच ठरवून टाकले.

मला फारच वाईट वाटले व रागही आला. माणूस वयाने कितीही मोठा झाला तरी खिडकीत बसण्याचे सुख प्रत्येकाला हवेच असते ना? बरे त्यांनी हे सुख मिळावे म्हणून आधीपासून त्याची तजवीज करून ठेवली होती. आता या प्रकाराने त्यांचा आनंद काही काळतरी हिरावून घेतला गेलाच शिवाय निष्कारण या बाईकडून हे सगळे ऐकून घ्यावे लागले. रीक्वेस्ट करणे तर दूरच राहिले ही तर अरेरावीच करत होती. मनात कुठेतरी त्यांनाही मुलांना खिडकीत बसायला मिळावे असे वाटतही असेल परंतु कधीही प्रवास केला तरी पुन्हा याचीच पुनरावृत्ती होणारच , म्हणजे खिडकीत कधीच बसायचे नाही का? शिवाय आपल्या मुलांची काळजी आपण करायची नाहीच वर लोकांनी मात्र ती केलीच पाहिजे अशी धारणा. ही कसली जबरदस्ती?

अगदी असे गृहीत धरूयात की आयत्यावेळी ठरल्याने विंडोसीटस मिळाल्या नसतील. पण मुलांना समजावण्याचा प्रयत्न तर करू शकत होतीच. थोड्या वेळाने आपण त्यांना विचारू तुम्हाला दहा मिनिटे बसू द्याल का...... किंवा चक्क त्यांचे लक्ष दुसरीकडेही वळवायचा प्रयत्न करता आला असता. यातले काहीच न करता खिडकीतल्या दोघांवरही ती डाफरत होती. केवळ बाई म्हणून ते दोघेही शांत-सौजन्याने बोलत होते. तर हिचा आवाज अजूनच चढत होता. संपूर्ण प्रवासभर पोरांचे रडणे, हिचे त्यांच्यावर ओरडणे मध्ये मध्ये या दोघांना टोमणे मारणे चालू होते. आजूबाजूच्या सगळ्यांच्या आनंदाची, मजेची हिने वाट लावून टाकली.

सुदैवाने तिचा रोख आम्हा दोघांकडे वळला नाही. माझ्या लेकाने तर आधीच सांगून टाकले होते, आपण चार वर्षांनी हा आपला आवडता प्रवास करतोय. त्यासाठी तू विमानाचे तिकीट बुक करतानाच हे ट्रेनचे तिकीट बुक केले आहेस तेव्हा मी मुळीच ऍडजस्ट्मेंट करणार नाही आणि तूही तुझी खिडकी द्यायची नाहीस. आधी मी थोडावेळ त्यांना बोलावून जागा देणारही होतो पण आता हिची ही अरेरावी ऐकून तर अजिबातच नाही. मी यावर मौन राहिले एकीकडे मला सारखे वाटत होते त्या छोट्यांचा काय दोष, त्यांना बोलावून खिडकीत बसू द्यावे. मात्र एकीकडे असेही वाटत राहीले अशानेच लोकांना गृहीत धरण्याच्या प्रक्रियेस चालना मिळते. मनातून त्या दोघांचे काही चुकलेय असे मात्र मुळीच वाटले नाही.

Sunday, July 12, 2009

बोलके भाव....

बस करो अभी

सही तंद्री

परफेक्ट सहकार

सख्खे शेजारी

हळदीकुंकू

अरे अरे सांभाळ ...

ही सगळी चित्रे बऱ्याच जणांनी आधीही पाहिली असतीलच. श्री. एस. फडणीस यांची ही कार्टून्स आहेत. फडणिसांची स्वत:ची खास शैली आहे. रोजच्या जीवनातील उदाहरणे अतिशय सिंपल स्टाइलने, साधेच रंग-कागद वापरून प्रस्तुत करत. खास मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या मनाच्या जवळ जाणारी ही काही कार्टून्स. ट्रॅफिक जॅम मध्ये सापडल्याने तिथेच हळदीकुंकू देणाया या दोघी, सिनेमा व गॉसिपने भारलेली तरुण आई वा शेजाऱ्यांचे सामंज्यस.... किती साधे तरीही नेमके.श्री.शिवराम दत्तात्रय फडणीस. १९५२ सालापासून फडणीस सर मोहिनी चे मुखपृष्ठ बनवित आहेत. बहुतांशी मोहिनीतच त्यांची सुंदर काळानुरूप व आपल्या सर्वांशी निगडीत घटना, गोष्टी...व्यंगचित्रे पाहीलीत. जून २००१ मध्ये त्यांना ’Life Time Achievement Award'ने गौरवले.
अप्रतिम.

Friday, July 10, 2009

ग्राहकराजा जागा राहा....

टेलिफोन, सेलफोन कंपन्या आपणा सर्वांना किती प्रकारे छळतात याचा अनुभव अनेकदा येतोच. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशी माणसेच यातून सुटली असावीत तीसुद्धा त्यांच्याकडे फोन नाही म्हणूनच. थोड्या दिवसांनी तुम्ही फोन का नाही घेतला म्हणूनही दंड करायला कमी करणार नाहीत. नुकताच मीही एक अनुभव घेतला. फार मोठे काही घडलेले नाही पण अगदी करंट गोष्टीशी निगडित असल्याने माझ्यासारखे बरेच लोक निघू शकतील आणि नजरचुकीने किंवा टेलिफोन कंपनीवर विश्वास ठेवून असतील तर किमान बिल चेक करून क्रेडिट मिळाले नसल्यास मिळवतील म्हणून हा प्रपंच.

भारत व उर्वरित जग इथे फोन करायचा झाल्यास मी रिलायन्सचे ग्लोबल कनेक्शन घेतलेले आहे. गेली पाच-सहा वर्षे आम्ही नियमित हीच सर्विस वापरून फोन करत आहोत. मे महिन्यात ' मदर्स डे ' येतो त्यामुळे रिलायन्सने मोठा गाजावाजा करत, मे महिन्यात आईला हवे तितके फोन करा..... वगैरे वगैरे म्हणत एकूण बिलावर ४५% डिस्कॉउंट जाहीर केले. मी खूश. महिना कुठलाही असो आई-बाबा व समस्त आप्तस्वकीय, दोस्तमंडळी..... आम्हा तिघांचीही त्यामुळे आमचे अव्याहत कॉल चालूच असतात. त्यामुळे ४५% म्हणजे मस्तच डिस्कॉउंट जाहीर केल्याने मी अंमळ जास्तच कॉल केले.
. मदर्स डेच्या दिवशीच मुलगा तीन आठवड्यांच्या मायदेशाच्या भेटिसाठी निघाला. मग तर काय माझ्या कॉल्सना लिमिटच राहिले नाही. शिवाय बॅक ऑफ द माइंड ४५% चे गाजर होतेच.

मे महिना संपला. जून महिन्यात येतो ' फादर्स डे '. पुन्हा एकदा रिलायन्सने आता बाबांना कॉल करा म्हणत २५%चे गाजर दाखवले. तो मेल मे महिना संपता संपताच आला होता. म्हणतात ना काहीच नसण्यापेक्षा २५% काय वाईट आहे. तरीही मी थोडा निषेध फोन करून नोंदवला. बाबां लोकांसाठी असा पक्षपातीपणा बरोबर नाही. आईलाच कायम झुकते माप का म्हणून... पण तो कस्टमर सर्विसवाला काय बोलणार यावर. त्याने हसून गुळमूळ काहीतरी सांगितले. कसे कोण जाणे मी त्याचवेळी त्याला मदर्स डेचे डिस्कॉउंट बिलात दिसेल ना असे विचारले. त्यावर ऑफकोर्स मॅडम नक्की मिळेल असे आश्वासन दिले. नेहमीप्रमाणे सात-आठ तारखेला बिलाचा मेल आला. बील चेक केले असता कुठलेही डिस्कॉउंट दिसले नाही.
.

हे अपेक्षीत होते तरीही वैताग आलाच. कॉल केला असता त्याने अगदी हळूच माझी चूक लक्षात आणून दिली. मेख अशी होती की मदर्स डेचे प्रमोशन १ मे पासून १ जून पर्यंत होते. त्यामुळे ते मे महिन्याच्या बिलात न मिळता जूनच्या बिलात मिळणार होते. मी स्वतःच्या मूर्खपणावर चडफडत त्याचे आभार मानले परंतु हे डिस्कॉउंट व फादर्स डे चे डिस्कॉउंट ( २ जून ते २३ जून हा प्रमोशन पिरेड होता ) ही जूनच्या बिलात मिळेल ना हे दोन दोनदा विचारून खुंटा बळकट करून घेतला. त्यानेही अजिबात चिंताच करू नका नक्की मिळेल. आता बाबांना कॉल करा असेही वर सांगितले.

गेल्या पाच वर्षात आमचे सरासरी बील $४५ च्या वर कधीही गेलेले नाही. पण मे महिन्यात मुलगा तिकडे शिवाय हे डिस्कॉउंट म्हणून असेल आमचे कॉल्स $१०० च्याही पुढे गेले. बील भरण्याची तारीख जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शेवटची असल्याने वेळ होता. अचानक ७ जूनला मुलाचा कॉल आला, आई रिलायन्स थ्रू कॉल करता येत नाहीये. सर्विस तात्पुरती बंद केली आहे. मी बुचकळ्यांत. पुन्हा कस्टमर सर्विसला फोन लावला. काय झालेय असे विचारले तर म्हणे की आजवर तुमचे कधीही $५० च्या पुढे बील झालेले नाही त्यामुळे तुमच्या अंकॉट ला आम्ही ७५ पेक्षा जास्त क्रेडिट ठेवलेले नाही. या त्यांच्या गणिताचा मला इतका राग आला. मी त्याला विचारले की आधी कधी कॉल केले नाहीत म्हणून पुढेही कधी करू नयेत असे आहे का? गेल्या इतक्या वर्षात एकदा तरी आमचे बील पेड झाले नाही किंवा लेट पेड झाले असे कधी झालेय का? तर म्हणे नाही. मग तुम्ही सर्विस कशी बंद करून टाकता? बरे मे महिन्याचे बिल पेड करण्याची तारीख अजून आठवडाभर लांब आहे ना? शेवटी चार चार वेळा सॉरी म्हणत त्याने सजेस्ट केले की तुम्ही मेचे बिल आत्ता भरता का? मी लागलीच सर्विस सुरू करतो. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हताच मी फोनवरच बिल भरले. मात्र तो शब्दाला जागला आणि कनेक्शन माझा फोन सुरू असतानाच जोडून दिले.

जून महिना संपला. पुन्हा एक मेल आला जुलै महिन्यासाठी १५% डिस्कॉउंट दिले आहे. या सोमवारी जूनचे बिल आले. मी लागलीच चेक केले कारण या बिलात दोन्ही प्रमोशन चे डिस्कॉउंट मिळायला हवे होते. पण दिलेल्या प्रॉमिसेसना जागली तर तिला टेलिफोन कंपनी कसे म्हणता येईल. बिलात फक्त जूनचे डिस्कॉउंट दिलेले दिसत होते. मात्र आमचे क्रेडिट वाढवले होते. पुन्हा एकदा फोन केला. प्रत्यक्ष माणूस फोनवर सापडेपर्यंत त्यांच्या त्या चक्रातून फिरून आणि वेटींगमध्येच अर्ध्या लोकांचा पेशन्स संपतो आणि फोनचा नाद सोडला जातो. पण मी तग धरला.

पुन्हा एकदा मे पासूनचा पाढा वाचला. चेक करून सांगतो असे म्हणून त्याने मला दहा मिनिटे लटकवून ठेवले. मग आला लाइनवर, " सॉरी मॅडम, मी बिलींग डिपार्टमेंटशीच बोलत होतो. त्यांनी जूनचे डिस्कॉउंट दिलेय तुम्हाला." त्याला म्हटले मला ते दिसतेय पण मेच्या ४५% डिस्कॉउंट चे काय झाले? पुन्हा दहा मिनिटे मी होल्डवर. नंतर मात्र आवाज एकदम बदलला. मॅडम तुमचे बरोबर आहे. नजरचुकीने मे महिन्याचे डिस्कॉउंट द्यायचे राहून गेलेय. बिलींगवाल्यांच्या लक्षात आलेय, ते आता त्यांची चूक सुधारतील. तुम्ही बिलकूल चिंता करू नका. ऐका, म्हणे चिंता करू नका. त्याला म्हटले हेच मला गेल्या महिन्यातही सांगितले होते ना? बरं आता हे बिल मी भरायला हवे का? कारण माझे डिस्कॉउंट यापेक्षा जास्तीच आहे. तेव्हा तुम्ही ते ऍडजस्ट करून उलट माझ्याच अकॉउंटला क्रेडिट द्या. तर म्हणे नाही नाही मॅडम असे करू नका. बिल भरून टाका. तुम्हाला क्रेडिट नक्की मिळेल. पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे मी काय करू शकत होते?

मी बिल भरून टाकलेय. आता जुलैच्या बिलाची प्रतीक्षा करणे आणि पुन्हा एकदा क्रेडिट मिळाले का नाही याचा पाठपुरावा करणे आले. संपूर्ण अमेरिकेत व जगभर रिलायन्सचे प्रचंड कस्टमर आहेत. मे महिन्याचे प्रमोशन १ मे ते १ जून असे ठेवून रिलायन्सने खोडा घालून ठेवलाय. दोन महिने कोणहो एवढे लक्षात ठेवतेय? अगदी २५% कस्टमर जरी या प्रमोशनबद्दल विसरले तरीही किती पैसे द्यायचे वाचतील ते लक्षात घ्या. माझ्यासारखे जे चिवटपणे फोन करतील त्यांना चार वेळा सॉरी म्हणायचे व पुढच्या बिलात नक्की मिळेल असे म्हणून वाटेला लावायचे.

मित्र-मैत्रिणींनो तुम्हीही जर रिलायन्सचे कस्टमर असाल तर कृपया आपले बिल जरूर चेक करा. कदाचित असाच घोळ झालेला सापडू शकेल. ही डिस्कॉउंटची रक्कम फार मोठी नसेलही परंतु म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावतो आहे. ग्राहकराजा जागा राहा .......

Thursday, July 9, 2009

शेअरींग

वर्षानुवर्षे शेअरींग करून लोक राहत आहेतच. खरे तर कुटुंबपद्धती म्हणजेही शेअरींगच आहे. नवरा-बायको यांनी शेअरींग केले म्हणूनच तर पुढे निर्माण झालेल्या सगळ्यांना शेअरींग म्हणजे काय आणि ते कसे करावे, करतच राहावे हे कळले. कधी आवडून तर कधी अंगवळणी पडलेय म्हणून तर अनेकदा नाईलाज म्हणून..... अगदी लहान बाळं म्हणजे वर्षासव्वावर्षाची झाली की त्यांना एखादी वस्तू, गोळ्या-चॉकलेट दिले की आई म्हणा बाबा कोणीतरी हात पुढे करून तिच वस्तू परत त्याच्याकडे मागते. क्वचित कधी बाळ देते पण बहुतेक वेळा हात मागेच घेते. म्हणजेच एक प्रकारे ह्या छोट्याश्या गमतीच्या कृतीतून पहिला धडा मिळतो बाळाला. आणि तोही लागलीच जीवनाचे सत्य दाखवून देतो. त्याला न आवडणारी गोष्ट असेल तर लागलीच देऊन टाकतो आणि आवडणारी असेल तर..... . पुन्हा पुन्हा मागितली तर शेवटी मोठे भोकाड पसरून निषेध नोंदवतो पण देत मात्र नाही. हा खरे तर एक मोठा गहन विषय आहे. त्यावर पुन्हा कधीतरी लिहीन. आज शेअरींग म्हणजे नोकरी-शिक्षण निमित्ताने चार अनोळखी लोक जेव्हा एकत्र राहतात तेव्हा काय काय महाभारत-रामायण घडत असते व नंतर ते आठवून आठवून फारच करमणूक होते त्याबद्दल. हे वाचता वाचता तुम्हालाही तुमच्या गमती आठवतील अन अजूनच जास्त हसू येईल.

तर एकदा एक माणूस.... म्हणजेच मी-रमेश, भारतातून अमेरिकेत यायला निघा्लोय. विमानतळावर जमलेल्या मोठ्या गोतावळ्याला टाटा, बाय बाय करून... आई-बाबांच्या डोळ्यातले पाणी, सांभाळून जा रे. यशस्वी हो. ( जणू काही युद्धावरच निघालाय.... अनोळखी देशात आपल्या माणसांना सोडून राहणे हे एक प्रकारे युद्धच म्हणायचे का? ) बायकोच्या डोळ्यात हुरहुर व आम्ही कधी येणार हे प्रश्नचिन्ह. पोरांच्या डोळ्यात आता बाबाची मजा... दररोज पिझ्झा, मॅक... काय कार्टी आहेत बाबा चाललाय दूरदेशी अन यांना पिझ्झा सुचतोय. मित्रमंडळीत थोडीशी असूया... चालायचेच. ती गृहीतच असते. मात्र प्रेमही असतेच ते अशावेळी दिसते. त्यांच्या सूचना.... जपून राहा रे. तिथे आम्ही नसणार तेव्हा उगाच राडे नकोत. आपण बरे की काम बरे असा राहा. आणि थोडा उपरोधिकपणा... आमची आठवण ठेवा नाहीतर तिकडे गेलास की कोण तुम्ही वगैरे प्रश्न तुला पडलेच ना तर इथे सुटिला आलास की तंगडे तोडून ठेवू तेव्हा..... मग पाठीवर दोन धपके, मिठ्या ...... शेवटी एकदाचा सगळ्यांचा निरोप घेऊन मी निघालो.

सुखरूप पोचलो. ऑफिसला जॉईन झालो. सुरवातीला ऑफिसनेच दिलेल्या एका अपार्टमेंट मध्ये राहायला आलो. इथे पोचणे-जॉईन होणे आणि अपार्टमेंट मध्ये जाणे हे एकाच दिवसात झाल्याने नक्की काय चाललेय याचे आकलन होण्याइतके त्राण राहिलेले नव्हतेच. एकतर तिथून निघण्याआधीचे चार दिवस इतके भयंकर फास्ट व ताणाचे होते. अनेक कामे, कुठेतरी मनाच्या तळाशी सगळे नीट होईल ना हे प्रश्नचिन्ह, आपल्या माणसांना सोडून जायचे तेही इतक्या लांब त्याचे दडपण, बायकोचे, आई-बाबांचे हजार प्रश्न आणि त्याची स्वतःलाही माहीत नसलेली उत्तरे.

जेमतेम चार-पाच तास मिळालेली झोप. त्यातही बायकोचे कुशीत शिरून रडणे. ( या बायकांना रडण्याशिवाय दुसरे काही येतच नाही. जरा कुठे जवळ घ्यायला जावे तर.... मरो त्यापेक्षा झोपावे म्हणजे निदान मला इतके वाईट वाटतेय तुम्ही दूर जाणार त्याचे अन तुम्हाला नको ते सुचतेय ..... अजून काय काय--( ते खाजगी आहे. सगळेच कसे सांगू तुम्हाला. अहो बायको अशावेळी कशी बोलते ह्याचा अनुभव तर तुम्ही ही घेतलाच आहे ना.... अगदी अगदी. डिट्टो...
) ऐकण्यापेक्षा झोप बरी. ) मग तिची कशीबशी समजूत काढणे. मग हा एवढा मोठा प्रवास. जेटलॅग कसा येतो ते अनुभवण्याची पहिलीच वेळ. गोळाबेरीज मन आणि शरीर आता काहीही समजून घेण्यापलीकडे पोचलेले आहे. तेव्हा अपार्टमेंट मध्ये पोचल्या पोचल्या समोर जो कोच दिसला त्यावर मी स्वतःला झोकून दिले. दोन मिनिटातच गाढ झोपलो.

केव्हातरी जाग आली. काळोख पडला होता. अग दिवा लाव की. अरे कोणी ऐकतेय का..... मी ही असा संध्याकाळचा झोपलोय का पहाट झालीय.... काय चाललेय काय? आता हे कोण गदागदा हालवतेय..... ( डोळे उघडून पाहतो आन ताडकन उठून बसतो. समोर एक अनोळखी चेहरा दिसतो. त्याच्याकडे बघतो मग आजूबाजूला नजर फिरवतो. हे कोणाचे घर अन हा कोण उपटसुंभ? एका क्षणात लक्षात येते.... आपण अमेरिकेत आलोय. आणि हाही आपल्यासारखाच दिसतोय. त्याच्याकडे पाहून हसतो. ) मग हाय- हेल्लो- जुजबी ओळख होते. तोवर आणिक एकजण येऊन पोचतो.

एका अपार्टमेंट मध्ये तीन जण अशी सोय असते. ते दोघेही साऊथवाले- व्यंकटेश व किशोर .... आंडूगुंडू. माझ्यासाठी सगळे एकाच मडक्यातले. दोनचार दगड घाला मडके हालवा की जो आवाज येईल .... पण साऊथवाल्यांसाठी हे गणित इतके सहज नाहीये. अर्थात हे मला ओघाओघाने कळत गेले. दोन बेडरूम्स, माणसे तीन. आता आली पंचाईत. प्रचंड थंडीचे दिवस. मी पडलो पुण्याचा अन हे दोघे चेन्नईचे त्यामुळे थंडीची कोणालाच सवय नाही. म्हणजे अशा हाडे फोडणाऱ्या थंडीची. हे दोघे आधीपासून राहत असल्याने व उगाच कोणाच्यातरी बेडवर झोपण्यापेक्षा सोफा बरा असा विचार करून मी इथेच बराय असे म्हणून त्यांचा बेडरूम्स शेअरींग प्रश्न मी झटक्यात निकालात काढून टाकला.

एकीकडे सारखी घराची-आई-बाबा-बायको, पोरं आठवून आठवून जीव कासावीस होत होताच. भूकही लागली होती. रागिणीने आज जेवायला काय बरे केले असेल असा विचार चालू असतानाच किशोरने सांबार-भात खातोस का असे विचारले. बापरे! सांबार-भात, आजवर तर कधीच खाल्ल्याचे आठवत नाही. भूक तर लागलीये , चला आज खाऊ उद्यापासून करू काहीतरी असे म्हणत मी उठलो. किशोर मला घेऊन किचन मध्ये गेला. पाणी प्यावे या विचाराने मी फ्रीज उघडला अन काय सांगू संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन घडावे असा आ वासला.

फ्रीज उघडल्या उघडल्या डोळ्यांबरोबर नाकानेही ब्रह्मांड अनुभवले. एक थंडगार उग्र भपकारा आसमंत पुलकित करून गेला. सांबार-रस्सम-निरनिराळे भात, सांबार-भाताचे एकत्रित मिश्रण. दही नामक काहीतरी पांढरे, दुधाचा कॅन, ऑरेंज ज्यूस, रॉ भाज्या..... काही ठीक,काही सडलेल्या... देवा..... यावर ताण म्हणजे तीन चार डीश दिसल्या त्यावर दुसरी डीश टाकून झाकलेल्या होत्या. मी मनात विचार करत होतोच की हे काय असेल तोच किशोर ने एक डीश बाहेर काढली. त्यावरचे झाकण काढले तर आत कालवलेला काल रात्रीचा न संपलेला सांबार-भात होता. तो त्याने तसाच मायक्रोव्हेव मध्ये टाकला आता जेवण्यासाठी. मला ते पाहूनच असे काही मळमळले. रागिणीची प्रचंड आठवण आली. एक दिवस जरा कोशिंबीर नसेल किं वा खास आवडीची भाजी नसेल तर चिडणारा मी आणि आता हे असे जेवण....," किशोर, अरे मला ना भूकच नाहीये. मी झोपतो त्यापेक्षा. गूड नाइट." म्हणून मी त्या सांबार-भातापासून पळ काढला पण तो वास काही माझा पिच्छा सोडेना.

भुकेल्या पोटीच पण गाढ झोपलो. सकाळी लवकर जाग आली. उठून पाहिले तो व्यंकटेश किचन मध्ये खुडबुडत होता. मला उठलेला पाहून मॉर्निंग करून, आवर म्हणजे आपल्याला एकाच गाडीतून ऑफिसला जाता येईल अशी सूचना दिली. भरभर आवरून मी तयार होऊन आलो. चला आता कॉफी तरी घ्यावी म्हणून किचन मध्ये डोकावलो. व्यंकटेशने कॉफी, साखर दाखवले व दूध फ्रीजमध्ये आहे ते घे असे सांगून तो बूट घालायला गेला. भयंकर भूक लागलेली होतीच निदान मस्त कॉफी तरी ..... म्हणत एका कपात दूध ओतले..... इथले दूधही आपल्यापेक्षा वेगळे दिसतेय... साखर, कॉफी घालून व्यंकटेशच्या सूचनेप्रमाणे मायक्रोव्हेव मध्ये एक मिनिट ठेवून पहिला घोट घेतला अन हे काय.... आपण कॉफी पितोय का कॉफीच्या वासाचे ताक खरे तर नासलेले दूध पितोय हेच मला कळेना. तसाच घोट थुंकून टाकला. तोच किशोर आला. माझा भयंकर चेहरा व हातातला कॉफीचा कप पाहून म्हणाला, "अरे काय झाले?" सगळे ऐकून हळूच म्हणाला, " काय आहे ना त्या दुधाला आणून महिना होऊन गेलाय. आम्हाला कोणालाही लागतच नाही. तू जरा पाहून घ्यायचेस ना." हे एकले मात्र मला जे मळमळून आले....
. त्या दिवसापासून मी ब्लॅक कॉफी प्यायला सुरवात केली ते आजही तिच पितो आहे.

पहिल्या रात्री बेशुद्ध पडल्यासारखा झोपल्याने आसपासच्या घटना मला कळल्याच नाहीत. दुसऱ्या रात्री मात्र धमाल आली. बटाट्याच्या काचऱ्या व पाव खाऊन थोडे बरे वाटले मग थोडासा टिवी पाहून मी या जोडगोळीला गुडनाईट करून झोपलो. हीटर सुरू होता. साधारण साडेबाराच्या सुमारास दाणदाण चालत कोणीतरी बडबडते आहे असे वाटून मी दचकून उठलो. पाहतो तो काय, किशोर होता." ये पागल व्यंकटेश, इसको अक्कलही नही है. ८५ पे हीटर रखा है-- अरे चमडी जल जायेगा." असे म्हणत त्याने हीटरचे टेंपरेचर एकदम पासष्टावर नेऊन ठेवले. मी किलकील्या डोळ्यांनी पाहत होतो. तो गेला मीही गाढ झोपलो. जेमतेम अर्धा तासच मध्ये गेला असेल तोच व्यंकटेश तणतणत आला, " किशोर मै तुमको हमेशा बोलताय इतना टेंपरेचर कम मत रखो. मुझे ठंडी लगताय. ऐसे मे मर जायेगा एक दिन." आतून किशोरचा आवाज आला....," मर जायेगा.... पागल कुछ भी बकता है. सोने दे मुझे. " इकडे व्यंकटेशने पुन्हा हीटर पंच्याएशीवर नेऊन ठेवला. ही जुगलबंदी संपूर्ण रात्रभर सुरू होती. मी डोक्यावर पांघरूण ओढून या दोघांचा वेडेपणा पाहून पाहून दमलो पण हे दोघे थांबले नाहीत.

भांडी कोणी घासायची, कचरा कोणी उचलायचा, व्हॅक्युम कोणी करायचे पासून अगदी टीवीवर काय पाहायचे इथपर्यंत चाललेल्या हाणामाऱ्या पाहून मी चक्रावलो. तो सांबार-रस्समचा साठून राहिलेला व नव्याने भर पडत असलेला उग्र वास, दूध, ज्यूसचे नासून नासून शेवटी कशात रुपांतर होऊ शकते ते पाहून माझी त्यांच्याशी तुटलेली नाळ....क्लोजेट उघडले की कपड्यांनाही येणारा सांबाराचा वास, एवढेच काय कार्पेट, टॉवेल्स अगदी पाण्यालाही येणाऱ्या या वासाने माझे डोके असे काही भणभणून गेले. खरे तर लुसलुशीत डोसा, इडली, उपमा त्याबरोबर सांबार व पांढरीशुभ्र ओल्या खोबऱ्यावर तडका मारलेली चटणी हे माझे जीवलग पदार्थ. पण या भयंकर वासाने माझे सुख हिरावून घेतले.

अजून जर काही दिवस या वेड्यांबरोबर राहिलोच तर एकतर त्यांच्यासारखा होऊन जाईन किंवा वेडा तरी. मला दोन्हीही परवडण्यासारखे नसल्याने पंधरा दिवसात मी गाशा गुंडाळला व नवीन अपार्टमेंट शोधले. सुदैवाने इथे मला माझ्या सारखा पार्टनर मिळाला त्यामुळे काहीसे शेअरींग जमू लागले. अजूनही कधी कधी झोपेत मला त्या थंडगार सांबार-रस्सम-भाताच्या उग्र वासाने जाग येते अन मी दचकून उठतो... वाटते यमच घेऊन चाललाय अन जाता जाता टॉर्चर कसे असते याची एक झलक देतोय.

Wednesday, July 8, 2009

नाण्याच्या दोन बाजू

आई: विराज... ए विराज... बसला असेल दोन्ही कानांचा जगाशी संपर्क तोडून. काय करावे बाई या मुलांना? सदानकदा गाणी ऐकत बसतात. पूर्वी डेकवर मोठ्याने लावत होता ते तरी बरे होते. निदान बहिरे होण्याची भीती नव्हती शिवाय नाईलाजाने का होईना पण आईच्या हाकेला उत्तर मिळत होते. कुठून एकदा म्हटले त्याला.... अरे केवढा तो आवाज डोकं दुखायला लागलं माझं. पडत्या फळाची आज्ञा सारखा उठला आणि हेडफोन्स घेऊन आला. आता दुनियेत काही का होईना याला काही पडलेले नाहीये. पण ते जाऊ दे. आज जे मनात घोळतेय ते याला सांगायलाच हवे. बारावीत पोत्याने मार्क्स आणलेत पोराने... तसे दहावीतही आणले होतेच पण तेव्हा जरा लहान होता. शिवाय त्याचे विश्वही लहान होते. गेल्या दोन वर्षात ते बरेच रुंदावलेय. मित्र मैत्रिणींचा गराडाही फार वाढलाय. तशी आजकालची पोरं आपल्या त्या वयापेक्षा जास्त हुशार आणि जाणती आहेत हे खरं असलं तरी जग सुंदरच आहे या मताशी सहमत असल्याने अनेक छुप्या गोष्टी समजत नाहीत. किमान काही धोके तरी सांगायला हवेत.

पुन्हा हाका मारते... विराज... अरे ऐकतोस का जरा?

विराज: आई काय गं, कधीपासून कशाला हाका मारते आहेस. मला सगळं ऐकू येतंय. आणि इतका गंभीर चेहरा कशाला केला आहेस? बापरे आज पुन्हा मला एक मोठे लेक्चर ठोकायचा विचार आहे का तुझा? नो नो. ममा आज नाही हं, मी चाललो. कधीपासून तन्वी, मुग्धा, अमेय, रोहन .... आमचा सगळा ग्रुप मॉलमध्ये जमलाय. तू आज घरी आहेस म्हणून मी तुझ्यासोबत थांबलो होतो. नाहीतर म्हणशील कारट्याला एक मिनिट आईबरोबर बोलायला वेळ नाही. पण तुझे उपदेशाचे डोस चालू होणार असतील तर मी चाललो.
आई: कारट्या, उपदेशाचे डोस काय? थांब आज तुला चांगले दोन तास पिळते बघ. अजिबात मॉल मध्ये जायचे नाही. आणि काय रे तुझ्या ह्या मित्र मैत्रिणींना घरात कोणी अडवत नाही का? पाहावे तेव्हा कुठेतरी पडलेलेच असतात.
विराज: पडलेले..... आई तू पण ना.... अग मी ही त्यांच्यातच पडलेला असतो तेव्हा त्यांची आई ही हेच म्हणत असेल ना? बापरे! आता तू या नवीन Subject मध्ये शिरू नकोस. मी पण काय मूर्ख आहे, आणखी एका उपदेशाच्या डोसाची .......
आई: बरं बरं कळलं. तू काहीही म्हणालास ना तरीही आज मी तुला मला जे सांगायचेय ते सांगणारच आहे.
विराज: मातोश्री, ते आम्हाला तुमची पहिली हाक आली ना तेव्हाच उमगले होते. तेव्हा एकदाचे काय ते फर्मान ओकून.... सॉरी वाचून टाका.
आणि प्लीज डायरेक्ट विषयालाच हात घाल गं बाई, उगाच ते तुझं ... काय गं ते, नेहमी मला ऐकवत असतेस.... हां ताकाला जाऊन भांड लपवणे प्रकार नको. ( खो खो हसतो.... आई त्याला दोन धपाटे मारते आणि तीही हसते. )
आई: विराज, तू चांगला मुलगा आहेस. हुशार आहेस........
विराज: ( तिला मध्येच तोडत.. ) आज आमच्या मातोश्री अशी स्तुतिसुमने का बरे उधळत आहेत. सहीच यार, ममा तू उगाच ओरडतेस ... शुद्ध मराठी बोलता येत नाही म्हणून. मीतर आलंकारिक वगैरे काय ते म्हणतात ना तसेच बोललो ना. ( खूश होतो. )
आई: चूप रे.... मध्ये मध्ये बोलून माझी लिंक तोडू नकोस. तर तू हुशार आहेस... चांगल्या घरातला, माझाच पोरगा म्हणून नाही म्हणत पण इंप्रेसिव्ह आहेस. तुझ्यातला आत्मविश्वास, डीप डाउन आम्ही केलेले संस्कार कुठेतरी तुझ्यात सतत जागृत असतात त्यामुळे तुझ्याही नकळत अनेक चांगले गुण तुला चिकटलेत.
विराज: ( आज आईला काय झालेय? काहीतरी मोठ्ठा बाँब टाकेल आता... )
आई: विराज, बाळा स्पष्टच सांगते. हेच वय फार धोक्याचे आहे. कॉलेजमध्ये निरनिराळे मित्र-मैत्रिणी असतात. आत्ताच तुझा केवढा गोतावळा आहे तो अजून अजून वाढणार. कोण चांगले कोण वाईट हे ओळखता आले पाहिजे. मैत्रिणी असाव्यात परंतु जपून राहा. कोणाच्याही आहारी जाऊ नकोस. सगळ्याच मुली साध्या नसतात. तुझ्यासारख्याला पर्फेक्ट टार्गेट करणाऱ्या मुलींपासून दूर राहता आले पाहिजे. तू किती हुशार, हँडसम... वगैरे म्हणत तुझ्या गळ्यात पडतील, नादी लावतील. एकदा का तू गुरफटलास असे लक्षात आले की मग तुला तंगवत ठेवतील व शेवटी टांग मारतील. तुझ्या अभ्यासाची मनाची वाट लागेल. हे वय प्रेमात पडायचे नाही.... प्रथम करियर मग प्रेम. आता तू हुशार म्हणून आजूबाजूला रुंजी घालणाऱ्या मुली जर तू मागे पडलास ना तर तुझ्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. मुली फार कॅलक्यूलेटीव असतात. स्वतःचा अभ्यास, मार्क्स करियर सगळे व्यवस्थित करतात. पण त्यांच्या प्रेमात पडून पोरांची मात्र वाट लागते. याचा अर्थ असा नव्हे की सगळ्या मुली अश्याच असतात. म्हणूनच कोण अननेसेसरी जवळीक करतेय आणि कोण खरेच आपले माणूस आहे हे ओळखता आले पाहिजे. या वयात मैत्रिणींचा सहवास आवडणारच. त्यांचे आसपास घोटाळणे, तू किती आवडतोस.... किंवा.. यार काल रात्री ना तुझी खूप आठवण आली. ग्रुपमध्ये सतत तुझ्या जवळ राहणे, बसणे, सहेतुक अहेतुक स्पर्श..... तुझ्या प्रत्येक बोलण्याला सहमत होणे.... अनेक प्रकारे फक्त तू आणि तू असे दर्शविणे हे सगळे तुला लुभावणार. पण बरेचदा हे फक्त त्या त्या वेळेपुरते आणि त्या ग्रुपपुरतेही मर्यादित असू शकते. दगडापेक्षा वीट मऊ सारखे. तू मात्र त्यात गुंतशील. हे नैसर्गिकच आहे रे. म्हणूनच हे असले घोळ घालूच नयेत. त्यापेक्षा सगळ्यांशी फ्रेंडशिप ठेवावी. कोणाला आपल्या मनात कुठे ठेवायचे हे ठाम ठरवता आले पाहिजे.

दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट..... एकवेळ तू प्रेमात पडून सपशेल तोंडघशी आपटलास तरीही चालेल परंतु तुझ्या कुठल्याही मैत्रिणीला तुझ्याबरोबर कुठेही व कुठल्याही वेळी जाण्यात, राहण्यात तुझी भीती वाटता नये. कोण मिळालेल्या संधीचा फायदा घेऊ शकते हे मुलींना बरोबर कळते. तेव्हा तू नेहमीच तुझा विवेक जागा ठेव. फ्रिडम जरूर असावा परंतु लक्ष्मण रेषा ओलांडू नये. मुलींना तुझ्याबरोबर त्या नेहमीच सेफ आहेत हा विश्वास वाटेल असेच तू वाग.

विराज: आई, अगं तू स्वतः एक मुलगी असून हे सगळे बोलते आहेस.... ह्म्म्म्म्म, मी लक्षात ठेवीन हा तुझा डोस. खरा जरा जास्तच झालाय मला तो. आता उगाच काही दिवस मला सगळ्या मुली व्हिलन वाटायला लागतील. बाबाला विचारायला पाहिजे...... अगं म्हणजे तू त्याच्यावर खरे प्रेम करत होतीस की...... सॉरी सॉरी...... ( मोठ्याने हसतो, आईला मिठी मारतो. आणि टाटा करत पळतो. )
आई: ( स्वतःशीच.... ) अरे मी स्वतः मुलगी असून असे बोलतेय याचे इतके नवल नको वाटायला..... मी जवळून पाहिलेय. आमच्या एका मित्राने जीव गमावला अशा प्रकरणातून. ( सुस्कारा टाकते.... ) अर्थात असेच सगळ्यांच्या बाबतीत घडेल असे नसले तरी आपण जपून राहावे झालं.

उद्या काही झालं तरी अनुजाला भेटायलाच हवेय. अनुजा... माझ्या बहिणीची गोड पोर. एकतर मला मुलगी नाही. अनुजात फार जीव अडकलाय माझा. तिलाही मावशीचे वेड आहेच. कधी मावशी म्हणत नाही.... माई म्हणेल.... काय तर म्हणे मावशीतला मा आणि आईतली ई... म्हणजे तू माझी दोन्ही आहेस. नुसती गोडूली आहे. पण आता पोर मोठी होतेय. दहावीत आहे यंदा. बापरे.... नाही नाही उद्या अनुजाला भेटायलाच हवे.....

पुढच्यावर्षी पोर कॉलेजमध्ये जाणार..... विराजला सांगितले तेच तिलाही सांगायला हवे. फक्त थोडे जास्तीच डीप जाऊन. ह्म्म्म्म...... ही दोघे भेटल्यावर जर चुकून एकमेकांशी या त्यांना वाटणाऱ्या उपदेशाच्या डोसाबद्दल बोलली तर चक्रावून जातील. ही आईच आहे ना.... मला एक सांगते आणि बरोबर उलटे अनुजाला सांगते. काय करावं पोरांनो तुम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहात ना.... मग.....

Tuesday, July 7, 2009

कंट्रोल.....

( साधारण सव्वासात-साडेसातच्या दरम्यान मीनल व महेश घरी येत असत. बहुतेक वेगवेगळे क्वचित ठरवून स्टेशनवर भेटलेच तर बरोबर. मीनलचे भाजीपाला-खाऊ, गरजेच्या गोष्टी खरेदीत महेश वैतागत असे त्यामुळे शक्यतो ही सारी कामे मीनल एकटीच करी. आजही नेहमीप्रमाणे भाजी घेऊन मीनल पाळणाघरात गेली. चार वर्षाची मधुरा आईची वाट पाहतच होती. रिक्शातून उतरून मीनलने तिला हात केला तशी मावशींना टाटा करून मधुरा तिची छोटीशी बॅग घेऊन खाली आली व मीनलला मिठी मारून बसली. दिवसभराच्या अनेक गोष्टी आईला सांगायच्या असल्याने मधुराने चिवचिवाट सुरू केला. मायलेकी दहा मिनिटात घरी पोचल्या. भाजी -खाऊची पिशवी, मधुराची बॅग व आपली पर्स सांभाळत मीनलने दार उघडले. महेश अजून घरी पोचला नव्हता. नेहमीप्रमाणे मीनलची नजर हॉलमधल्या घड्याळाकडे गेली. सात-वीस झाले होते. येईलच आता महेश, तोवर हातपाय धुऊन चहा ठेवावा असा विचार करत मीनलने आवरायला सुरवात केली. एकीकडे मधुराची गोड बडबड सुखावत होतीच. दिवसभराचा सगळा शीण लेकीला नुसते पाहिले तरी पळून जातो. लाघवी आहे पोर. लेकीशी गप्पा करत एकीकडे स्वयंपाकाची तयारी सुरू करते..... )

मीनलः मधुरा, अग खिडकीतून पाहा गं बाबा दिसतो का?
मधुराः ( डोकावून पाहते.... पुन्हा आईकडे पाहते.... पुन्हा पुन्हा जास्ती डोकावण्याचा प्रयत्न करते... पण बाबा दिसत नाही. ) नाही गं ममा, आपला बाबा दिसत नाही अन स्कूटरही नाहीये खाली.
मीनलः ( स्वतःशीच बडबडते.... आठ वाजत आले, अजून कसा आला नाही हा. एखादी गाडी मागेपुढे म्हटले तरी येव्हाना यायला हवा होता. कोणीतरी भेटले असेल नाहीतर वाटेत. एकदा का गप्पा सुरू झाल्या की स्वारी रमते तिथेच. चला तोवर मधुराला वरणभात भरवावा. पोर भुकेजली असेल. आज डबाही पूर्ण संपलेला नाहीये. ) मधुरा, का गं माऊ आज डबा आवडला नाही का? अर्धाच खाल्लास.
मधुराः ममा, अग आज ना मावशीने सगळ्यांना पुरणाची पोळी दिली मग मी नाही संपवला डबा. मला पुरणाची पोळी आवडते. तू करशील ममा?
मीनलः हो करीन हं..... ( मधुराने लागलीच तिच्याकडे प्रॉमिस मागितले. तशी टपलीत मारत ..... ) हे बघ पक्के प्रॉमिस. बरं चला आता वरणभात खायचा ना?

( मधुराला भरवताना सारखे लक्ष घड्याळाकडे... साडेआठ वाजलेत.... अजून कसा नाही आला महेश? सेल ट्राय करते. पण महेश घेत नाही. पुन्हा ट्राय करते.... आता नॉट रिचेबल. वैतागाने सेल आपटते. )

मधुरा: ममा, बाबू कुठेय? काल म्हणाला होता उद्या उनो खेळूया. आणि अजून आला नाही. आता म्हणेल, मधुराणी अग दमलो गं बाई. आज नको ना शोन्या उद्या खेळू, गॉड प्रॉमिस. दररोज मला प्रॉमिस करतो आणि खेळतच नाही. तुझा सेल दे ना मी बाबूला फोन करते. ( फोन लावते पण लागत नाही. पुन्हा लावते..... ) हा बाबा असा काय करतो गं, घेतच नाही. ( हिरमुसली होते )
मीनलः अग, आज नक्की खेळेल बघ. तू आटप बरं. घास तोंडात ठेवून बोलू नये म्हणून कितीवेळा तुला सांगितलंय. मग गाल चावला जातो... रक्त येतं आणि मोठ्याने रडू कोणाला येतं? आणि तो सेल दे इकडे. पुन्हा लावते हं मी.
मधुराः ( खुदकन हसत ) मधुराला, मधूराणीला रडू येतं....... ममा आता जेवण पुरे. मला बाबू हवाय. आत्ताच्या आत्ता हवा. ( हळूहळू रडायच्या बेताला येते )
मीनलः अग आता जेवून रडायला सुरवात करू नकोस हं मधुरा, ओकशील. मी मुळीच पुसणार नाही. आधीच माझं मन थाऱ्यावर नाहीये. ( स्वयंपाक घरात जात जात, पुन्हा घड्याळाकडे पाहते... ..बापरे नऊ वाजून गेले. उशीर होणार आहे तर फोन नाही का करायचा. सेलही घेत नाहीये. तरी त्याला माहीत आहे न सांगता उशीर झाला की माझ्या जिवाची नुसती घालमेल होते. पण त्याला काय फरक पडतोय. आता आला की काहीतरी कारणे सांगेल. ये रे लवकर. मधुराही रडायच्या बेतात आहे अगदी. )

पावणेदहा होतात, मधुरा पेंगायला लागते.... सारखी कोणाची तरी स्कूटर बिल्डींग मध्ये येते की लागलीच मीनल खिडकीतून वाकून पाहते..... आला वाटतं.... दुसरंच कोणीतरी असते. हिरमुसली होतं मधुराला थोपटत पुन्हा पुन्हा सेल ट्राय करते.

मीनलः आज महेश आला की बिलकूल चिडायचं नाही. त्याने कळवायला हवे होते हे खरेयं पण जाऊ दे. आता सकाळपासून तोही बाहेर आहे, दमला असेल. कदाचित काहीतरी तसेच महत्त्वाचे कारण असेल. आणि अगदी मित्राबरोबर गेलाय म्हणून उशीर झाला तरीही आत्ता रागवायचे नाही. भांडायचे नाही. एकदाचा लवकर येऊ दे झालं.
आई कधी कधी बाबांना असा उशीर झाला तर कडीला चमचा, पळी असे अडकवत असे, ते आठवून मीनलही कडीला पळी अडकवते. मधुरा गाढ झोपी जाते. तिला उचलून बेडवर ठेवून फॅन लावून मीनल हॉलमध्ये येते पुन्हा नजर घड्याळाकडे वळते, बापरे सव्वादहा झाले.... सेल ट्राय करते.... तोच बेल वाजते. आला वाटते. मीनलची काळजी एकदम संपते. हुश्श...... सुस्कारा टाकते. अन ती पटकन दार उघडते.

महेशः (हसतो... सेलची बेल वाजते... पाहतो तर मीनलचाच कॉल.... बंद करतो. ) काय राणीसाहेब, आता मी आख्खा समोर असताना सेलवर कशाला बोलायचेय तुला? आणि इतकी शांतता.... मधुराणी कुठेय आमची? मधुरे अगं मधुरे.... बाबू आलाय बघ. चला चला आज उनो खेळायचा ना? ( ही सगळी वाक्ये भराभर बोलतो.... मीनलचा स्फोट होऊ नये म्हणून प्रयत्न करतो........ पण, )
मीनलः ( कंट्रोल... मीनल कंट्रोल ) मिळाला का वेळ घरी यायला? बरेच वाजलेत नाही. मधुरा झोपली अरे. बाबूची वाट पाहून रडून झोपली. सेलची बॅटरी आहे ना ..... नाही म्हणजे एखादा कॉल करायचा ना? किंवा आम्ही केला तर घ्यायचा... मला उशीर होणार आहे असे बोलून आपटून टाकायचा.... ( पारा हळूहळू चढत चाललाय.... महेश एकदम चूप, गरीब चेहरा करून तिच्याकडे पाहतोय. ) पण मित्र भेटले असतील, मग काय कोण बायको आणि पोर तर काय लहानच आहे.... आता हा असा गरीबासारखा कशाला उभा राहिला आहेस? सगळी नाटक मेली. चला आता जेवा म्हणजे मला किचन बंद करायला... उद्या पुन्हा सहाला उठायचेयं.
( महेश नुसतीच मान डोलावतो व कपडे बदलायला जातो. तोवर मीनल पानं घेते.... मायक्रोमध्ये भाजी, आमटी गरम करते तोवर महेश येऊन पानावर बसतो. ताण हलका करावा म्हणून ..... )
महेशः मग मायलेकीनि मिळून मज्जा केली ना? कार्टून्स मधुराने पाहिले की नाही आज?
मीनलः ( मज्जा... हा शब्द ऐकताच तिचा कंट्रोल संपतो व ती सटकते. ) मज्जा ना हो तर खूप मज्जा केली. आलटून पालटून खिडकीतून डोकावलो, सारखा सेल लावला...... बाबू हवा म्हणून मधुरा रडली आणि शेवटी दमून झोपली. नुसती तुझी वाट पाहिली.... मज्जाच मज्जा.
महेशः ( दुर्लक्ष करीत ... ̮मूड लाइटच ठेवत ) आज काय अगदी आईसारखी पळीही अडकवलीस तू कडीला. मग काय पळी अडकवल्यापासून कधी आलो मी? ( तू पण ना gr8 आहेस अशा खुणा करतो. )
मीनलः ( संतापते ) एकतर तू इतक्या उशिरा आलास, तोही न सांगता.... साधा एक मिनिटाचा कॉलही करावासा वाटला नाही तुला. वर माझ्या भावनांची टिंगल करतोस? अजूनही तू का उशीर झाला हेही सांगितले नाहीस. हं, सांगणारच काय म्हणा.... मित्राबरोबर चकाट्या पिटत बसला असशील. ना वेळेची शुद्ध ना बायको-पोरीचा विचार. मला अजिबात चालणार नाही हे असे वागणे.... पुन्हा जर तू असे केलेस ना...
महेशः ( तिला अर्ध्यातच तोडत.... रागाने ) तर काय... नाही सांग ना तर काय करशील गं तू? मी काय मुद्दाम उशीर केलाय का? अर्जंट काम आलं. ते करून निघालो. स्टेशनवर आलो तर समोरच सम्या व अजित भेटले. मग काय थोडावेळ गप्पा करून निघू म्हणता म्हणता वेळ कुठे गेला कळलेच नाही. त्या हॉटेलच्या बेसमेंट मध्ये रेंजच नव्हती येत. मग कसा तुला कळवणार? नाही म्हणजे मी कळवायला हवे होते पण..... समजा एखादा दिवस नाही कळविले तर एवढे घर डोक्यावर कशाला घ्यायला हवे. एक तर मरमर ऑफिसमध्ये काम करा, पॉलिटिक्सला तोंड द्या आणि घरी येऊन काय तर ही मुक्ताफळे ऐका..... ( अन्नाला नमस्कार करतो आणि तसाच न जेवता उठतो. )
मीनलः महेश, अरे महेश..... हे असे भरल्या ताटावरून कशाला उठला आहेस? (एकीकडे संताप तर एकीकडे कंट्रोल न राहिल्याचे दुःख, लागलेली भयंकर भूक अन त्यात भर हा न जेवताच उठल्याने मीनलचा तोल सुटतो. ती रडायलाच लागते. ) असे करू नको रे महेश, ये ना जेवायला.
महेशः मला नाही जेवायचे. पोट भरलेय माझे तुझी मुक्ताफळे ऐकून. झोपतो मी आता. ( दार लावून टाकतो. )
मीनलः हताशपणे हातातला घास तसाच ठेवते. उठते, सगळे आवरून किचन बंद करून बेडरूममध्ये येते. महेशकडे पाहते, तो मधुराला जवळ घेऊन झोपलेला असतो. त्याच्याजवळ जाते, केसांवरून, कपाळावरून हात फिरवते. प्रेमाने गालाचे चुंबन घेते..... त्या स्पर्शाने, प्रेमाने, आर्जवाने महेश कधीचाच विरघळलेला असतो... तो पटकन वळतो. मीनलला कुशीत घेतो. )
महेशः मीनल, सॉरी गं. अगं रस्ताभर घोकत होतो.... चूक माझी आहे. मी कळवायला हवे होते. पण एकदा का गप्पा सुरू झाल्या ना की भानच राहत नाही गं. तू ओरडलीस तरी आपण ऐकून घ्यायचे अजिबात चिडायचे नाही असे मी ठरवून आलो होतो पण.... काय झाले कोण जाणे तू चिडलीस अन मीही सटकलो मग. मनापासून सॉरी म्हणतो... पुन्हा किमान पंधरा दिवस तरी असे नक्की वागणार नाही...... बरं बरं महिनाभर नाही वागणार. आता राग सोड आणि हास पाहू. ए मीनल, एक रिक्वेस्ट..... प्लीज, पटकन फ्लॉवरचा रस्सा गरम करायला घे ना, तोवर मी पाने घेतो.... अग आग लागलीये पोटात.
मीनलः महेश, अरे मीही सारखी स्वतःला बजावत होते रे.... तू आलास की चिडायचे नाही. तू येईतो इतकी काळजी वाटत होती ना मला.... अन तू दरवाज्यात दिसताच काळजी संपून तिची जागा संतापाने कधी घेतली ते कळलेच नाही. पण तुझी चूक आहे हं महेश... मी अशी न सांगता एक दिवस अकरा पर्यंत घरी येत नाही म्हणजे तुला कळेल काय काय विचार तेवढ्या वेळात येतात ते.
महेशः ( कोपरापासून हात जोडत ... ) माझे आई, तू रागाव, पाहिजे तर बोचकार पण माझ्यासारखा वेडेपणा नको हं करूस. अग मी तर तासाभरातच अर्धमेला होऊन जाईन. चल आता जेवायला दे गं फार भूक लागलीये.

( दोघेही हसत हसत किचन मध्ये जातात.... अर्धवट झोपेत मधुराणी बडबडते, माझा बाबू आला.... चला चला उनो खेळायला.)