जाता जाता एक नजर इथेही........

Tuesday, July 27, 2010

खीर...

तिचे हात एक एक टाका सफाईदारपणे घालत होते. झरझर. एकसारखा. टपोरा. लवकरात लवकर तिला ही दुलई पुरी करून द्यायची होती. शक्य झाले तर आजच. त्या बदल्यात मिळणार्‍या शंभर रुपयात तिच्या जागोजागी फाटलेल्या संसारात निदान मीठ-मिरची-तेलाचे ठिगळ लागले असते. दोन्ही पोरींच्या तोंडात चार दिवस दोन घास पडले असते.

दिवसभर मान मोडून पाठीचा काटा पुरा ढिल्ला करून एकदाची दुलई पुरी झाली. जोरदार झटकून तिवर अजूनही लोचटासारखे चिकटलेले धागेदोरे तिने काढले. वरच्या तारेवर दुलई टाकून निरखून पाहू लागली. दुलई सुंदरच झालेली. मऊमऊ. निगुतीने टाचलेली. एकही ओळ वाकडी नाही का एकाही तुकड्याचा तोल ढळलेला. यावेळी रंगीबेरंगी तुकड्यातुकड्यातून तिने फुले-पाने, पक्षी, सूर्य, गुंफलेले. दुकानदार म्हणाला होता, थोडी कल्पकता दाखवा. खरंय रे बाबा तुझं, माल खपायला रोज नवीन काहीतरी हवेच. पण, उपाशीपोटी कल्पकता कशी सुचावी? डोळ्यापुढे फक्त डाळभात दिसत राहतो, त्याचं काय करावं..... पाणी पिऊन पिऊन पोट फुगतंय निसतं. अन्नाशिवाय काय बी सुचना झालंय. तरी कल्पकता दाखवायलाच हवी. नाहीतर हे कामही हातातून जाईल.

तिने मान झटकली, चटदिशी दुलईची घडी घालून पिशवीत अलगद ठेवली. पदर सावरला अन पायात टाचेपाशी झिजलेली चप्पल अडकवली. " शरे, येते गं मी लगेच माघारी. तोवर अभ्यास करा बरका. उगाच रिकाम्या पोटी एकमेकींशी झोंबू नका. पोटात आग फारच भडकली तर मोठा पेला भरून पाणी प्या गं." शरीचे, हो नाही उत्तर ऐकायच्या आतच ती वाटेलाही लागली. दुकान बंद व्हायची वेळ झालेली. आज पैसे मिळाले नाहीत तर उपाशीच झोपवावे लागेल लेकरांना.

धापा टाकत दुकानात शिरली. " किती उशीर केलास? आता मी बंदच करणार होतो. पाहू दे. हां.... बढिया! ती मेहता, दोन वेळा विचारून गेली आज. आता घरी जाता जाता देतो पोचवून. तिची लेक खूश होईल. हे घे शंभर रुपये. काय झाले? बरं, हे अजून दहा घे वरती. आणि जातांना दोन दुलयांचे कापड, दोरे, लागतील ते तुकडे घेऊन जा. चटचट हात चालव जरा. पोरींना घे की मदतीला. नीघ आता. " असे म्हणून दुकानदाराने नोटा अंगावर फेकल्या आणि दिलीपला दुलयांची कापडे काढायला सांगत तो गायबही झाला.

शंभरावर दहाची अजून एक नोट. तिला खरेच वाटेना. चार दिवसांची सोय तर झाली. लेकी भुकेल्या आहेत. बाजार उठायची वेळ झालीच आहे. संपता संपता गेलं की जरा भाव पाडून मिळतोय. बरेचदा रस्त्याच्या कडेला गिऱ्हाईकांच्या हातून पडलेले चांगले कांदे-बटाटे, वांगी अन थोडेसे दबलेले-मार लागलेले तमाटेही मिळून जातात. पण उशीर झाला पोचायला तर तिच्यासारखे कोणीतरी हात मारते. आज तसे होऊन चालणार नाही, मिळायला हवेच म्हणत तिने दिलिपकडून न बघता माल उचलला. बाकीचे उद्या येऊन पाहीन रे असे म्हणत ती रस्त्यालाही लागली. जड पिशवी काखोटीला मारून ती झरझर पाय उचलत होती. आज थोडा रवा, साखर आणि अर्धा लीटर दूध घेईन. शरीला, रव्याची खीर खूप आवडते. पोरीचे डोळे लकाकतात नुसते खिरीचे नाव काढले तरी. दहा रुपये जादा मिळालेत नं. आज खीर करायचीच. इतकुश्या माझ्या पोरी पण किती समज आहे त्यांना. कधी हट्ट करत नाहीत. जितकी जमेल तितकी मदत करतात बिचाऱ्या.

देवळाला वळसा घालून जाता जाता शंकराकडे न पाहताच तिने हात जोडले. प्रदक्षिणा घातली. एक क्षण टेकावे म्हणून खांबापाशी पाठीचा कणा खेटला. डोळे मिटले. " देवा, माझं मेलीचं राहू दे रे पण पोरींवर तरी दया कर. जास्त काही नाही निदान दिसाच दोन घास तरी पानात पडू देत म्हणजे भरून पावलं. कष्टाला मी डरत नाही रे. कामं मिळू देत म्हणजे रात्रीचा दीस करून निभावीन बघ. इतक्या मोठ्या जगाच्या खटल्यात आमच्यावर लक्ष ठेव रे बाबा." असे म्हणत पुन्हा पुन्हा नमस्कार करून ती बाजाराकडे निघाली.

बाजार जवळपास गुंडाळलाच होता. सराइतासारखी तिची नजर खाली पडलेल्या कांद्या-बटाट्यावर पडत होती. पिशवी फुगत होती. लसणाचे थोडेसे कुजलेले दोन गड्डे व लिंबेही मिळून गेली. आलं- मिरच्या, तमाटेही मिळाले. ती खूश झाली. बाजारातल्या देवीपाशी प्रसादाची नारळाची कवड होती. इकडे तिकडे पाहत देवीला नमस्कार करून अंगारा लावायचे निमित्त करून तिने ती कवड पटदिशी पिशवीत सारली. वाट्यावर लावलेली वांगी व तोंडली घासाघीस करून दोनाच्या भावात तीन वाटे तिने मिळवले.

मनोमन ती आनंदली. आज सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितल्यालं..... अजून जवळपास सगळे पैसे जशेच्या तशे कनवटीला होते आणि तरीही पिशवी भरलेली. देवा, लय उपकार झाले बघ तुझे. असे म्हणत वाण्याकडे जाऊन तिने रवा, साखर घेतले. डेअरीतून अर्धा लीटर दूध घेऊन ती घराकडे निघाली. डोळ्यासमोर स्टोवर मोठ्या पातेल्यात शिजत असलेली खीर व पातेल्याकडे आशाळभूतासारखे डोळे लावून बसलेली शरी अन भुकेने कळवळलेली कुसुम दिसत होती. झोपडी दिसायला लागली तशी चालण्याचा वेग अजूनच वाढला. तोच, हाकारा ऐकू आला.

" पोरी, वाईच जरा थांब गं. दोन थेंब पाणी तरी घाल तोंडात." कण्हत कण्हत कोणी बोलत होते. तिने निरखून पाहिले तर कचऱ्याच्या कुंडीपाशी एक मुटकुळं पडलेलं. त्यातूनच कण्हण्याचा आवाज येत होता. ती जवळ गेली. म्हातारी पाय पोटाशी घेऊन कलंडली होती. गेल्या आठवड्यातच हिला कुठेतरी पाहिल्याचे तिला स्मरत होते. कुठे बरं? हां, त्या मोर का कायसे नाव असलेल्या मोठ्याश्या दुकानापाशी ही भीक मागत होती.

" म्हातारे, अशी इथे का गं लवंडलीस? असे म्हणत तिने म्हातारीला हालवले. अगागा, किती तापली आहेस गं. मरशील नव्ह का अशी तू. माझ्याशिवाय कोणी तुला दिसलं न्हाई व्हय हाकारायला. आधीच चुलीत खडखडाट तशात तुझी भर. काय करावं आता? तुला हितच टाकून गेले तर उद्या सरकारी गाडीतूनच जाशील हे नक्की. शिवाय ते पाप माझ्यामाथीच पडायचं. देवा, तुझ्या मनात तरी काय हाय बाबा? चल म्हातारे, ऊठ बरं. माझ्या आधाराने हळूहळू उभी राहा म्हणजे तुला माझ्या घरला घेऊन जाते. " म्हातारी हो नको म्हणण्याच्या पलीकडे गेलेली. तिला आधार देत, लळतलोंबत कशीबशी घरी आणली.

" शरे, अगं कांबंळ हंतर बिगीबिगी. आज्जी लय तापलीये. कुसे, ग्लासात पाणी भर आणि आज्जेला पाज. तोवर मी स्टोला काकडा लावते. पयला ’ चा ’ करते. लयी दिसांनी साखर आणि दूध घालून केलेला ’ चा ’ पिऊ सगळे. " असे म्हणत ती कामाला लागली. थोड्याच वेळात ’ चा ’ झाला. एकीकडे डाळतांदूळाची खिचडी व दुसरीकडे खिरीचे पातेले स्टोवर रटरटू लागले. झोपडीभर अन्नाचा दरवळ पसरला. शरी, कुसुम आणि आजीचे प्राण कंठाशी आलेले. आता लवकरच तोंडात घास पडणार हे सत्य अजूनही त्यांच्या गळी उतरत नव्हते. तोच, जरासा गोडमिट्ट दुधाळ गरम चा चार पेल्यांमध्ये तिने भरला अन लेकींच्या पुढे ठेवत आजीला बसते करून ती पाजू लागली. फुर्रर्रर्र..... फुर्रर्रर्र.... आवाज करत चौघीही मन लावून चा फुरकू लागल्या. पेले रिकामे झाले तशी खंगलेले चेहरे जरासे उजळले. आजीशी दोघी लेकी बडबडू लागल्या.

पेले धुऊन तिने पानं घेतली. पानात खिचडी, तिवर थोडासा खोबऱ्याचा चव आन वाडग्यात खीर वाढताना नवीन दुलईचे डिझाइन डोक्यात घुमू लागले. आज चौथा कोना भरला व्हता. हे ठिगळ वाईच भारी व्हतं खरं. खाणारं एक तोंड वाढवणारं. पण, जीवात अजून धुगधुगी आहे म्हटल्यावर कचऱ्यात कसं मरू द्यावं म्हातारीला. तिच्या लेकरांनी टाकली तिला म्हणून मीबी डोळे झाकायचे? नाय नाय. माझी माय असती तर राहिलीच असती नं माझ्यापाशी. पोरींनाही माया मिळल. व्हईल काहीतरी सोय. त्यो देव बसलाय नग का वरती, त्यानेच तर आज्जेला माझ्याकडे पाठवलीय. आता तोंड वाढवलंय तर जिम्मेवारी त्याचीच नव्हं का. उद्याचं उद्याला पाहू.

"चला गं पोरींनो, हे ताट आजीला द्या आधी आणि बसा आपापल्या ताटावर. " तिघींचे पटापट घास घेत चवीचवीने मिटक्या मारत हालणारे तोंड, आनंदाने लकाकणारे डोळे पाहून रिकाम्या पोटीच ती भरून पावली. जगातलं सारं सुख या दोन घासातच सामावलेलं. काही करून यांच्या तोंडात हे दोन घास मी घालेनच. असा स्वत:शीच करार करत डोळ्यात आलेले पाणी निपटून काढत ती म्हणू लागली, " शरे, अगं खीर घे की अजून..... उद्याला नग ठेवायला. आजची येळ प्वाट भरून जेवा गं सगळी. कायमच अर्धपोटी राहायच नसतं. कधीतरी तडस लागू दे की. मन आणि प्वाट तुडुंब भरू द्या. " असे म्हणत पोरी व आजीकडे पाहत आनंदाने तिने खिरीचा भुरका मारला.

47 comments:

  1. सुंदर !!! श्रीमंती पैशांतच नाही मोजता येत दर वेळी... आणि मोजुही नये.. अप्रतिम..

    ReplyDelete
  2. धन्यवाद हेरंब. इतकी सुपरफास्ट पावती मिळालेली पाहून खूपच बरं वाटलं. :)

    ReplyDelete
  3. आज खूप काम करून अक्षरशः जाम वैताग आला होता; मात्र मनासारखं काम झाल्यामुळं वैतागूनही कंटाळलो नव्हतो. अशातच ब्लॉगवर गेलो आणि तुमची नवी पोस्ट दिसली. म्हटलं पहावं तरी काय लिहिलंय. वाचायला सुरवात केली आणि वाचतच राहिलो. अखेरचं वाक्‍य वाचताना डोळ्यांतून आपसूक थेंब ओघळले. सुरवात केल्यानंतर अखेरपर्यंत कोठेही लिंक तुटत नाही. वाचत रहावं वाटतं. अगदी हलून गेलो. आता हे मी माझ्या मैत्रीणीला वाचून दाखविणार मला खात्री आहे अखेरच्या वाक्‍याला ती नक्की रडणार! खूप म्हणजे-खूप सुंदर लिहिलं आहे, लाजवाब!

    ReplyDelete
  4. प्राजक्त,तुझी इतकी भावपूर्ण प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला. अनेक आभार. आशा आहे तुझ्या मैत्रीणीलाही आवडेल.

    ReplyDelete
  5. किती भावपुर्ण लिहीले आहेस ग श्री..फार सुंदर..कुठे ही लिंक न तुटता सगळ चित्र डोळ्या समोर आले...प्रत्येक शब्द न शब्द...मनाला भिड्णारा...अप्रतिम !!!

    ReplyDelete
  6. मस्तच... गरीबी असून देखील मनाने श्रीमंत असलेली अनेक लोक सह्यभ्रमंतीमध्ये पाहिली आहेत मी... मन हेलावल्याशिवाय रहत नाही असे काही पाहिले-वाचले की...

    ReplyDelete
  7. खुप सुंदर अन भावस्पर्शी....मनाची श्रीमंती ही सर्वाहुन मोठी अन अमुल्यही..

    ReplyDelete
  8. "जगातलं खरं सुख या दोन घासातच सामावलेलं" किती खरं आहे हे ! कथा मांडणी, वर्णन सर्व अप्रतिम ! एकदम य. गो. जोशी वगैरे लेखक आठवले.

    ReplyDelete
  9. ताई,
    गळा दाटून आलाय..
    माझ्याजवळ खरंच शब्द नाहीयेत..खूप दिवसांनी असा स्टन झालोय..

    ReplyDelete
  10. भानस, रडवलंस की गं! खरंच छान आहे गोष्टं. जीवनाचा अर्थ सांगणारी...

    ReplyDelete
  11. अप्रतीम. अजून काय लिहू? खरच डोळे ओले झाले.

    ReplyDelete
  12. सुरेख! माणुसकीचं असं दर्शन जिथं मिळतं तिथं देवच पावलेला असतो! :-)

    ReplyDelete
  13. तायडे शब्दच नाहीत गं..... मस्त मस्त आणि मस्तच!!!

    उबदार पोस्ट तुझ्या स्वभावासारखेच...पोस्टमधे आपण आपलेच विचार मांडत असतो त्यामूळे हळवी तरी वैचारीक श्रीमंती असलेली पोस्ट!!!

    ReplyDelete
  14. ताई, अप्रतिम. तुझ्या लिहिण्याची खासियत म्हणजे गोष्ट अगदी डोळ्यासमोर उभी राहते...

    ReplyDelete
  15. भानस, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अगदी सकाळी-सकाळी तुमच्या पोस्टचे अभिवाचन मी मैत्रीणीसमोर केले. पोस्ट वाचायला सुरवात केली आणि तीने मुसमुसून रडायला सुरवात केली. अखेरचे वाक्‍य वाचून पूर्ण झाले तेव्हा तिच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहत होतं आणि पुन्हा एकदा आज माझेही डोळे पाणावले. मला वाटतंय तिची प्रतिक्रिया तुम्हाला मिळाली असेलच...

    ReplyDelete
  16. उमा,मनापासून कौतुक करतेस. खूप आनंद होतो. धन्स.

    ReplyDelete
  17. रोहन, खरेच. मन हेलावल्याशिवाय राहत नाही. अशी श्रीमंती जवळून पाहिलीये.

    ReplyDelete
  18. अभिप्रायाबद्दल अनेक आभार योगेश.

    ReplyDelete
  19. शशांक, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. यामुळेच अजून लिहावेसे वाटते. :)

    ReplyDelete
  20. विद्याधर, असे काही मोठ्या मनाचे लोक पाहिलेत ना की त्यांना सलाम केल्याशिवाय राहवत नाहीच. धन्यू रे.

    ReplyDelete
  21. श्रीराज, खूप खूप आभार. :)

    ReplyDelete
  22. हर्षद, अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद. ब्लॉगवर नेहमीच स्वागत आहे. :)

    ReplyDelete
  23. अरुंधती, अगदी अगदी. कदाचित म्हणूनच म्हटले जाते नं की देव सगळीकडे असतो.

    ReplyDelete
  24. पराग, ब्लॉगवर स्वागत आहे.

    ReplyDelete
  25. तन्वे, अगदी खरयं गं तुझं म्हणणं. पोस्टमध्ये आपण आपलेच अनुभव, अवतीभोवती घडलेल्या-घडणा~या घटना ( त्या जश्या आपल्याला दिसल्या-कळल्या ), आपलेच विचार मांडत असतो. असे प्रसंग काळजावर कोरले जातात. धन्स गं.

    ReplyDelete
  26. आनंद, असे अभिप्राय कथा लिहीण्याचा प्रयत्न करण्यास उद्युक्त करतात. खूप खूप थांकू रे.

    ReplyDelete
  27. प्राजक्त, आवर्जून कळवलेस... बरं वाटलं. मैत्रीणीलाही धन्यवाद सांग रे. इतकी भावपूर्ण पोच मिळाल्याने माझा उत्साह खूपच वाढला आहे. :)

    ReplyDelete
  28. 'चा' ची उब जाणवली,
    छोट्या छोट्या 'चा'च्या घोटांमध्ये मध्ये मोठी चैन मानणारी मोठ्या मनाची माणसही भावली
    मस्त :)

    ReplyDelete
  29. भाग्यश्री,
    छान जमून गेलीय बरं का गं गोष्टं!
    डोळ्यासमोर आली चित्रं!
    खूप छान.
    :)

    ReplyDelete
  30. सुंदर झाली आहे कथा...एकदम भावस्पर्शी...कुठेतरी आत भिडणारी...

    ReplyDelete
  31. सुंदर..........................................DOLYAT PANI ALE WHEN I WAS REEDING

    ReplyDelete
  32. Excellent ... very nice.
    I was not able to leave in between.
    Thank you very much for writing such a nice story

    ReplyDelete
  33. अभिप्रायाकरीता धन्यवाद प्रसाद.

    ReplyDelete
  34. अनघा, माणुसकी मुळात मनातच असावी लागते. हेच खरं. झोपडी का महाल... हा मुद्दा नगण्य असतो.

    आभार.:)

    ReplyDelete
  35. देवेन, धन्यू रे. आवर्जून लिहीलेस बरं वाटलं.


    अनामिक, अभिप्रायाकरीता धन्यवाद.

    ReplyDelete
  36. उमेश, ब्लॉगवर स्वागत व अनेक धन्यवाद.असे अभिप्राय लिहीण्याचा उत्साह वाढवतात.:)

    ReplyDelete
  37. महेंद्रAugust 4, 2010 at 9:08 AM

    हे पोस्ट आज तिसऱ्यांदा वाचतोय. पण काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नाही. मनःस्पर्शी.

    ReplyDelete
  38. श्रीताई,
    खूपच सुंदर.
    बर्‍याच दिवसांनी मनासारखे वाचायला मिळाले.
    मस्त मस्त मस्त लेखन.

    ReplyDelete
  39. धन्यवाद महेंद्र.

    ReplyDelete
  40. सोनाली, अभिप्रायाबद्दल अनेक आभार.

    ReplyDelete
  41. हम्म्म... सुरेख लिहलय.

    ReplyDelete
  42. he katha tumhi farach khulavun lihili ahe ..mast jamaliye

    ReplyDelete
  43. धन्यवाद सौरभ.

    ReplyDelete
  44. अनामिक, अभिप्रायाबद्ल आभार.

    ReplyDelete
  45. khup mhanje khupach surekh ahe hi katha... mi last time vachli tenvach mala lihyache hote pan mi khup emotional zale ki lihilech nahi...
    Aplyala sagle milat asunhi apan pratykveli radat asto, thode jari mana sarkhe nahi zale tari dukkhi hoto...pan hya kathetlya bai kadun tumhi khup motha message sangitla ahe... khup khup abhar ahe...navin protsahan yete asha katha vachlyanantar:-)
    Thanks

    ReplyDelete
  46. भाग्यश्री, ब्लॉगवर स्वागत व मनापासून दिलेल्या अभिप्रायाबद्दल आभार!:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !