जिन्नस
- मूग, मसूर, चणा डाळ प्रत्येकी अर्धी वाटी, उडीद, तूर डाळ पाव वाटी.
- एक मध्यम कांदा व एक टोमॅटो बारीक चिरून
- मूठभर कोथिंबीर, एक हिरवी मिरची व पाच-सहा लसूण पाकळ्या बारीक चिरून
- अर्धा चमचा हळद, एक चमचा तिखट, हिंग, ओवा, धणेजिरे पावडर. चवीपुरते मीठ
- तीन चमचे तेल
मार्गदर्शन
मूग, मसूर, चणा, उडीद व तूर ह्या सगळ्या डाळी एकत्र भिजत घालाव्यात. सहा तासाने उपसून मिक्सरवर वाटून घ्यावे. त्यात बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, लसूण, टोमॅटो व कांदा घालावे. हळद, हिंग, तिखट, धणेजिरे पावडर, ओवा व चवीनुसार मीठ घालावे. धिरडी घालावयाची असल्याने भजीच्या पीठापेक्षा थोडे पातळ होईल इतके पाणी घालावे. नंतर हे सगळे मिश्रण चमच्याने दहा मिनिटे फेटावे व थोडावेळ ठेवावे. प्रथमच तवा नीट तापवून घ्यावा. तव्यावर थोडेसे तेल टाकून छोटी छोटी धिरडी टाकावीत. बाजूने तेल सोडावे. झाकण ठेवावे. तीनचार मिनिटाने उलटावे आता झाकण ठेवू नये. उलथण्याने थोडे दाबावे. म्हणजे कडा कुरकुरीत होतील. पाच मिनिटाने काढावे. आवडेल त्या चटणीबरोबर वा दह्याबरोबर खावे.
No comments:
Post a Comment
आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !