जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, June 17, 2010

किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना?

' अ वेनस्डे ',' अब तक छप्पन ' हे दोन्ही सिनेमे मी कमीतकमी २५-३० वेळा पाहिले असतील. शिवाय कधीकधी तर कुठूनही सुरवात करून कुठेही बंद केले... असेही पाहिलेत. हे दोन्ही सिनेमे पाहताना वारंवार वाटते, असे खरेही कधी घडावे. हा ' स्टुपिड कॉमन मॅन ' मला हवाय. आतुरतेने मी त्याची वाट पाहतेय. ते आमचे शेकड्याने मारत आहेत तर किमान त्यांचे दोन तरी मारले गेलेले मला पाहायचेत.

कुठलाही अतिरेकी हमला झाला की जीव मुंडके अर्धवट चिरलेल्या कोंबडीसारखा तडफडू लागतो. खरे तर मुंडके कधीचेच चिरलेय, त्यावर पुन्हा पुन्हा नव्याने सुरी फिरवली जाते. कधी छातीवर तर कधी पाठीवर.... वारच वार. अव्याहत व पद्धतशीर. चार टाळकी एकत्र येऊन इतक्या मोठ्या माझ्या भारतमातेला जेरीस आणत आहेत आणि तिची लेकरे - आम्ही, किडामुंगीसारखे मरण्यापलीकडे काहीच करत नाही.

ज्या दिवशी हल्ला होतो तो सारा दिवस व नंतरचे मोजून चार-सहा दिवस मिडियावाले, घटनेचा चोथा चोथा करून चघळत राहतात. मेलेल्या माणसांच्या नातेवाईकांना, आईला, मुलाला, " कसे वाटतेय तुला? आत्ता तुझ्या मनात नेमके काय चालले आहे? " सारखे भावना-सहानुभूती तर दूरच पण साधे प्रसंगाचे तारतम्यही न ठेवणारे प्रश्न विचारून झालेल्या जखमा आणिकच ओरबाडतात. मरणारे असहायपणे मरून जातात. उरणारे, आज वाचलो रे असे म्हणत चर्चा-आकांत करतात. ( यात मी ही आलेच ) ती चार टाळकी, " कैसे हिंदुस्तानमे घुसके हिंदुस्तानके सिनेमेही खंजीर भोका " चा जल्लोष करतात, अन दुसऱ्या हल्ल्याच्या तयारीला लागतात.

पण, यावर वर्षोनवर्षे मी काय करतेय? हे भ्याड वार थांबवण्यासाठी मी काहीच करू शकत नाही म्हणून, तडफडाट. हल्ले झाल्यावर सरकार ज्या पद्धतीने स्वत:चे समर्थन करते त्याचा, संताप संताप. एखादा-दुसरा अतिरेकी चुकून पकडला गेलाच तर, " आम्ही बाबा सहिष्णू....... शत्रू असला तरीही न्यायदेवता सगळ्यांना सारखीच असते ना? त्यांनी बेमुर्वतपणे - क्रूरपणे, आमच्या लहान लहान मुलांनाही मारले असेल हो पण आपण त्याला संधी नको का द्यायला? जे काय व्हायचं ते न्यायाने झालं पाहिजे...... " म्हणून त्याला अगदी फुलासारखे जपून कोर्टात महिनोंन महिने केस चालवून, जनतेचाच पैसा वापरून तिच्याच सहनशक्तीचा पुरा अंत पाहून झाला की एकदाची शिक्षा सुनावली जाते........ की, तिची अंमलबजावणी होण्याआधीच कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीला किंवा त्याच्या घरच्यांना पळवून न्यायचे आणि बदल्यात याला सोडा म्हणायचे. हिंदुस्तानामध्ये प्रत्येक जीवाची वेगवेगळी असलेली किंमत त्यांनी बरोबर हेरली आहे. गरीब हजारोंनी मेले तरी कोणाला काही फरक पडत नाही पण या गरीबांनीच अतिशय मूर्खपणे महान बनवलेला एखादा नेता किंवा त्याचा जावई / साला.... यांचा जीव फार मोलाचा असतो. हे पाहून आलेली, उद्विग्नता.

आतिरेक्यांना पकडताना मेलेल्या पोलिसांची कोणाला पडलीये इथे. तुम्ही काहीही म्हणाल हो , " ते शहीद झाले. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. निधड्या छातीने सामना केला. सब झूट. त्यांच्या दुर्दैवाने त्यांची नेमकी नको तिथे ड्युटी लागली. मग निदान स्वतःचा जीव वाचवण्याकरिता तरी दोन हात करणे भागच आहे नं? आता, एके फोर्टी सेव्हन समोर साले कुठलेही तमंचे घेऊन येतात. आमचे बच्चे खेळण्यासाठीसुद्धा हातात धरणार नाहीत ते. त्यात वरती मारे बुलेटप्रूफ जॅकेटं घालतात. ज्यांना आधीच स्वार्थाची मोठाली भगदाड पडलेली..... ना ना.... पाडलेली आहेत. कोणी? काय राव, काहीही विचारता? हेच की तुमचे मायबाप राज्यकर्ते. स्वार्थकारण कशात करावे आणि कशात करू नये याचे नियम कोणी शिकवलेलेच नाहीत नं. स्वत:च्या आईलाही विकायला मागे पुढे न पाहणारे, तुम्हाला सोडतील की काय? तर, ही तुमची नेतेमंडळी खोकेच्याखोके पचवून मस्त एसीत बसून ( इलेक्ट्रिसिटीचे बील.... आता त्याचे काय मध्येच? ते कोण भरणार? पागल झालात की दारू ढोसून आलात? कोणाची टाप लागून गेलीये हे विचारण्याची. ) तमाशा पाहत बसतात. मग एकदा का तमाशा पुरा पेटला की खुर्ची बचावण्यासाठी, " अरेरे! काय हे घडतेय. आमची गरीब बिचारी जनता, आमचे शूर जवान.... मेले, मारले गेले " म्हणून गळे काढतात. नंतर मेणबत्त्या, मूक श्रद्धांजल्या वगैरे वाहून झाल्या की डोळ्यावर कातडे ओढतात. त्यातूनही कोणी अतीच आदळाआपट केलीच तर, " वेगवेगळी चक्रेही प्रदान होतात नं? नुकसान भरपाईही दिली जाते नं? कधी व किती ते मात्र नाही विचारायचे...... मग अजून काय हवेय??? "

कुठलाही आतंकवादी हल्ला होण्याआधी ( म्हणजे आधीचे हल्ले होऊन काही काळ लोटल्यानंतर ) व पुन्हा नवीन हल्ला झाल्यानंतर आपल्या मायबाप सरकारची मुक्ताफळे ऐकून ऐकून तर कान किटलेत. जनतेला किती मूर्ख बनवायचे याला काही लिमिट राहिलेलेच नाही. हल्ला होण्याआधी म्हणायचे, " जनतेने संयमाने व धैर्याने वागावे. आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. पूर्ण बंदोबस्त असून घुसखोर लगेच पकडले जातील.
तरीही अतिरेकी कुठल्याही मार्गाने सहजपणे घुसतातच. आम्ही आमच्या भूमीच्या कणाकणाचे रक्षण करू. जमेल तितकी जमीन आम्ही भक्षणच करून टाकू. देशातल्या सगळ्या अतिरेक्यांवर व त्यांच्या हालचालींवर आमची कडक नजर आहे. म्हणजे ते कुठे आहेत हे तुम्हाला माहीत आहे नं... मग पकडा की त्यांना. आमच्या पहाऱ्यामुळे, अतिसावधनतेने अतिरेकी कुठलाही नवीन हल्ला करू शकत नाहीयेत. कसाब आणि साथीदार पार ताजमहालात पोहोचले तरी आम्हाला भनक पण नाय बा पडली. जिथे जिथे हे हल्ले होण्याची शक्यता आहे तिथे तिथे क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. हे कंत्राट, अमुक अमुक नेत्याच्या जावयाला दिले गेलेय. राज्य व केंद्र सरकार यांच्यामध्ये सामंजस्य व सूचना यांत उत्तम ताळमेळ आहे. हल्ला झाला की हा उत्तम ताळमेळ परस्पर विरोधी व्यक्तव्यांनी उघडा पडतो. तिथे चालणारी अतिरेकी शिबिरे बंद होत नाहीत तोवर आम्ही पाकिस्तानाशी बोलणी करणार नाही. पाकिस्तानाशी बोलणी होऊ शकतात, शेवटचा निर्णय केंद्राचा. प्रत्यक्षात होत काहीच नाही आणि ही बोलणी होऊन तरी निष्पन्न काय होणार आहे?

प्रत्यक्ष घटना घडताना/ घडून गेल्यानंतर, घटनेची जबाबदारी अमुकतमुक ने घेतली आहे.
कोणाचेही नाव टाका ना, सिद्ध थोडेच करायचे आहे. सगळे देशवासी एकजूटीने सामना करत आहेत. कुठला दुसरा पर्याय आहे का त्यांना? अतिरेक्यांना सोडणार नाही. दयामाया दाखवणार नाही. आधी पकडा तर आणि ज्यांना पकडलेय त्यांना सजाही द्या. केंद्राकडून हल्ला होणार अशी सूचना होती परंतु कधी व कोठे होणार ही नेमकी माहितीच दिली गेली नाही. पुढच्यावेळी क्रमवार पत्रिकाच हातात देऊ तोवर तुम्ही निवांत राहा. ही सगळी चूक राज्याची ( सरकारची) आहे. अतिरेकी खूप काळ हल्ल्याची तयारी करत होते. मग आमचे हेरखाते काय झोपले होते का? सगळीकडे क्लोज सर्किट कॅमेरे नाहीत व जिथे आहेत ते बरोबर काम देत नाहीत. काय सांगता? अजून कॅमेरे तिथे लटकलेले आहेत??? कमालच झाली. आम्ही अतिरेक्यांना लवकरच पकडू. कसे? सिंपल.... कोणीतरी खबर दिली, की ते इथे इथे आहेत की... काही लोकांना संशयावरून पकडलेही आहे. काहीतरीच काय. गरीब बिचारे. ते मुळी गुन्हेगार नाहीतच. पुढच्या निवडणुकीला हवीत ना त्यांची मतं..... सोडवा त्यांना ताबडतोब. यापुढे पुन्हा असा हल्ला झाल्यास भारत गप्प बसणार नाही. ( वल्गना वल्गना.... )

बस इतकेच? मग, त्या अतिरेक्यांनी बळी घेतलेल्या निष्पाप जिवांचे काय? सामना करताना धारातीर्थी पडलेल्या पोलिसांचे काय? त्यांचा बदला कसा पुरा होणार? मी अहिंसावादी आहे, सहिष्णू आहे. तरीही मला हा '
बदला ' पुरा व्हायलाच हवा आहे. पण, तो कधीच होत नाही म्हणून होणारी, तळतळ. आधीच्या घावांवर अतिपातळसा त्वचेचा पापुद्रा ( शेवटी मन तरी कितिकाळ अरण्यरुदन करणार.... त्याचाही नाईलाजच आहे. ते बिचारे मरतमरत जगण्याचा प्रयत्न करते. ) धरायच्या आतच पुन्हा पुन्हा वार होत आहेत. त्यामुळे चिघळलेली जखम उरात घेऊन नाईलाजाने पोटाची खळगी भरण्याकरिता दुसऱ्याच दिवशी मी ट्रेन पकडते खरी पण तिच्यातून जिवंत सहीसलामत उतरेनची शाश्वती नाहीच. या जाणीवेतून आलेली, अगतिकता. या साऱ्यातून पिळवटलेली, खचलेली, क्वचित, षंढ त्वेषाने का होईना दातओठ खाणारी, कसाबला गेटवेसमोर उलटा टांगा अशी मागणी करणारीही मीच. उरात ही आग पेटलेली असली तरीही, प्रत्यक्षात त्याला एक फटकाही माझ्याच्याने मारवला जाणार नाही. पण, इतर मारत असतील ( निदान काहीजण तरी माझ्या इतके दुबळे नसतील ) ते नक्कीच पाहीन. इतके खोलवर घाव झालेत आता की " डोळ्याला डोळा " सारखीच शिक्षा त्यांना झालेली मला हवी आहे आणि माझे डोळे टक्क उघडे ठेवून ते बंद होऊ लागले तर बोटांनी जबरीने त्यांना ताणून, ती प्रत्यक्षात अमलात येताना पाहायचीही आहे. माझ्यासारख्या सामान्य - मध्यमवर्गीय - हतबल माणसाची ही नितांत गरज आहे.

हे दोन्ही सिनेमे, खोटा तर खोटा पण काही काळापुरता तो बदला पुरा करतात. बेंचखालच्या बॉंम्बने त्यांची उडणारी शकले-देहाचे चिथडे मला क्षणभर का होईना, समाधान देतात. हे घडवणाऱ्या त्या ' स्टुपिड कॉमन मॅनमध्ये ' मी स्वत:ला पाहते. वारंवार पाहू इच्छिते. ’ साधू आगाशे ’ खराच आस्तित्वात आहे यावर मला विश्वास ठेवावासा वाटतो. कदाचित काहींना हा दांभिकपणा वाटेलही..... मला नाही वाटत. किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना?

27 comments:

  1. अगदी हेच - हेच म्हणायचंय मला. ... दोन्ही सिनेमे मी सुद्धा बर्‍याचदा पहिले.. अगदी अर्ध्यातुनही.. कित्येकदा!
    तो ' स्टुपिड कॉमन मॅन ' आणि ’ साधू आगाशे ’ यांच्या वर तीन तास का होईना - मी विश्वास ठेवतो...

    ReplyDelete
  2. Namskar Tai....AAj baryach divsatun tuzya blog la bhet deto aahe...Wednesday tar me 2nada theatre la jaun pahila ani baryach velela gharihi...ha Terorrist navach manushya nahi ga sangataa yet kuthe rahato..kasa disto...pan "Stupid common man" ek taakat deto aplyaala aslya lokka viruudha ladhayla...common mansane kharach ase kele tar kay garaj aahe politician ani policanchi..

    lekh uttamach
    Aabhar....

    ReplyDelete
  3. दिपक, ते तीन तास का होईना, माझ्या दुख~या मनाला एक अधुंकसा आशेचा किरण दिसतो. कदाचित उद्या कोणीतरी ’ साधू आगाशे ’व ’स्टुपिड कॉमन मॅन ’ निर्माण होईलही.

    ReplyDelete
  4. गणेश, अगदी खरं. अतिरेकी कोण आहेत हे माहित असूनही ज्यांच्या हाती सत्ता आहे ते काहीच करत नाहीत.( किमान सामान्य माणसाला दिलासा - जगण्याचा विश्वास मिळेल असे काही दृष्यस्वरूपी )

    फार गडबड सुरू आहे का? छान वाटलं खूप दिवसांनी तुला पाहून.:)

    ReplyDelete
  5. भाग्यश्री , फार सुंदर आणि मनापासून लिहिलंस. नाजूक तार छेडलीस. खरच लाज वाटते स्वत: ची . आपण काहीच कसं करू शकत नाही. ईतके पांढरपेशे कां झालोत आपण. देशाचा विचार करायचा सोडून कां आपण प्रांतवाद , भाषावाद या फुटकळ गोष्टींवर आपल्यातच भांडतोय ?

    ReplyDelete
  6. प्रतिक्रिया द्यायला आलो आणि माझ्या मनातल्या प्रतिक्रियेतला शब्द न् शब्द भुंग्याच्या प्रतिक्रियेत दिसला. मीही हे दोन्ही चित्रपट असंख्य वेळा बघितले आहेत. साधू आगाशे काय किंवा कॉमन मॅन काय हे कितीही स्टुपिड वाटले/असले तरी सच्चे आहेत.

    परवाच कुठेतरी वाचलं की कसाबल सोडवण्यासाठी विमान अपहरणाचे प्लान्स बनताहेत.. चालू द्या..

    मागेही एका लेखात लिहिलं होतं तेच पुन्हा सांगतो कारण अगदी चपखल आहे इथे..

    "An eye for an eye will make the whole world blind" वाल्या फाटक्या डरपोक मनोवृत्तीला माझ्या एका मित्राने भारी उत्तर दिलं होतं. "I'd rather prefer going blind than going dead." !!!

    ReplyDelete
  7. शंतनू, आपली सगळ्यांची मने इतकी प्रचंड पोळली असूनही आपण काही करू शकत नाही ही सतत होणारी जाणीव असह्य झाली आहे.जगण्याचा हक्कच नाकारला जातोय. :(

    ReplyDelete
  8. ह्म्म्म... हेच होणार. २००-२५० लोकांना वेठीस धरणार तेही त्यात कोणीतरी सो कॉल्ड मोठा माणूस असेल याची खात्री करून.

    हेरंब, तुझ्या मित्राशी १००% सहमत.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  9. >>>हे दोन्ही सिनेमे, खोटा तर खोटा पण काही काळापुरता तो बदला पुरा करतात. बेंचखालच्या बॉंम्बने त्यांची उडणारी शकले-देहाचे चिथडे मला क्षणभर का होईना, समाधान देतात. हे घडवणाऱ्या त्या ' स्टुपिड कॉमन मॅनमध्ये ' मी स्वत:ला पाहते. वारंवार पाहू इच्छिते. ’ साधू आगाशे ’ खराच आस्तित्वात आहे यावर मला विश्वास ठेवावासा वाटतो.
    Agdi manatale...!!!

    ReplyDelete
  10. खरच ते दोन्ही चित्रपट थोडा वेळ का होइना मनाला थोड समाधान-दिलासा देउन जातात...बाकी इतके धक्के लागुनही नेहमी ’ आ बैल मुझे मार’ अशी परिस्थीती ठेवणारे आपणही (सरकारी यंत्रणा) तेवढेच धन्य...

    ReplyDelete
  11. मला नेहेमी वाटतं कि आपण नेहेमीच कोणीतरी देव येऊन काहीतरी जादूचे खेळ करणार आहे आणि मग परिस्थिती बदलणार आहे, ह्यावर विश्वास ठेवून असतो.
    वाहतुकीचे नियम सांगायला मला पोलीस लागतो. मला रस्त्यावर कचरा करताना लाज वाटत नाही. मला माझं काम लवकर आणि सुरळीत व्हावं म्हणून लाच देताना काही वाटत नाही. मला वेळ नाही म्हणून मी रस्त्यात बेकायदेशीर बसलेल्या विक्रेत्यांकडून सामान विकत घेणार........हे आणि अश्याच असंख्य गोष्टी मी रोज सवयीने करणार. आणि मग system ला नावं ठेवणार. कारण मला कोणीतरी दुसरा येऊन माझ्या आयुष्यात बदल घडवून आणायला हवाय. प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात छोट्या गोष्टीपासून होत असते. आणि देश हा प्रत्येक माणसाच्या सहभागातून बनलेला असतो. हे जर मानलं तर असं दिसून येतं कि मला माझ्यात बदल घडवून आणायला हवा, तर समोरचा बदलेल...तर देशाची विचारधारणा बदलेलं. जसं घरातील सुख आणि दुःख हे घरातील प्रत्येक सभासदावर अवलंबून असतं.
    असं अर्थात मला वाटतं. :)

    ReplyDelete
  12. धन्यवाद मैथिली. :)

    ReplyDelete
  13. देवेंन्द्र, तेच तर. डोके बधीर झालेय.

    ReplyDelete
  14. अनघा, पर्फेक्ट अवलोकन केलेस. बरेचजण असेच करत आहेत. पण काही मूठभर लोक ( लोकसंख्या पाहता मी मूठभरच म्हणू शकते... शेवटी सुधारणेची सुरवात अशीच होते नं...)तरी या व अश्या सारख्या समाजाला व पर्यायाने देशाच्या प्रकृतिला अपाय करणा~या गोष्टी न करण्याचा मनापासून व सातत्याने प्रयत्न करत आहेत, हे फार महत्वाचे.

    अगदी कच~याचेच उदाहरण घेतल्यास गेली कित्येक वर्षे घंटागाडी येतेय आमच्याकडे, सगळे न चुकता ओला सुका कचरा वेगळा ठेवतात. सोसायटीत कुठेही कचरा दिसत नाही. पण १०० वेळा तक्रार करूनही अनेकदा विनंत्या करूनही हायवेवर स्वनिर्मित बनवलेली कचरापेटी ( महापालिकेची कचरापेटी अक्षरश: १५ फुटावर आहे पण तिथवर जाण्याचे कोणीही कष्ट घेत नाही. :( )रोजच्या रोज ओसंडून वाहतेयं.

    तरिही यावर व अश्यासारख्या गोष्टींवर उपाययोजना होऊ शकते. परंतु अतिरेक्यांशी मी किंवा तू व्यक्तिश: कसे लढणार गं? साधू आगाशे, स्टुपिड कॉमन मॅन आपल्यातूनच निर्माण होणार हे खरेच पण ती ताकद माझ्यात नाही. आणि त्याचे मला अतिशय दु:ख आहे.असो.

    प्रतिसादाबद्दल धन्सं. :)

    ReplyDelete
  15. नि:शब्द... उगाच लिहायचे म्हणून काहीतरी कमेंट देण्यात अर्थ नाही...

    गेले ४ दिवस अधून-मधून येउन पुन्हा पुन्हा पोस्ट वाचली... पण कमेंट देत नाही... समजुन घ्या...

    ReplyDelete
  16. तुझं खरंच आहे. आपण अन आपलं मीडिया काय करतंय लोकांच्या मनांत देश प्रेम चेव निर्माण होईल असं करतंय का......नाही. आपल्याला डान्स इन्डिया डान्स अन सरेगमप च्या पुढे दुसरं सुचतं काय ?

    ReplyDelete
  17. रोहन... :). कळतयं मला.

    ReplyDelete
  18. आशाताई, अगदी अगदी. :(
    अभिप्रायाबद्दल आभार.

    ReplyDelete
  19. aga me Bangalore la hoto...ani May madhe Pune la shift kele aahe...tich thodi gadbad...ani blogging pan madhe karayla vel navta milat...me ajoon laxat aahe, he eikun bare vatale....

    ReplyDelete
  20. वेनसडे मस्त आहे. कधीही पाहिला तरीही त्या मधे नसिरुद्दीन शहाच्या रुपात स्वतःला पहातो आपण.
    नेमका , तेंव्हाच तो प्रसंग झालेला होता, त्यामूळे वेनसडे जास्त मनाशी पोहोचला. लेख पण उत्तम झालाय.

    ReplyDelete
  21. गणेश, अरे तुझी आठवण येतेच की. बरेच दिवस झाले दिसला नव्हतास नं... घर लागले का? तू पुण्याचाच का?

    ReplyDelete
  22. अगदी खरं. महेंद्र, वेन्सडे आपल्या भावनेलाच हात घालतो. शिवाय सिनेमा उत्कृष्ट घडलाय. कुठेही बटबटीत किंवा संथ नाही आणि कलाकारांनी दिग्दर्शकाला अप्रतिम साथ दिली.

    ReplyDelete
  23. You nicely summed up the issue. I would add that this doesn’t exactly concenplate often. xD Anyway, good post…

    ReplyDelete
  24. Good Afternoon

    Can I link to this post please?

    ReplyDelete
  25. Good evening

    Can I link to this post please?

    ReplyDelete
  26. Atishay tadafene likhan kele aahe ! athaat hi tada yogyach !

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !