जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, May 7, 2009

संत्रा डिलाईट



दहा-बारा वर्षांपूर्वी नागपुराला कॅरमच्या मॅचेस खेळायला गेले असताना हलदीराम ची संत्रा बर्फी खाल्ली अन तेव्हापासून ती मनात घुसून बसली. अप्रतिम. मुंबईत मिळत नाहीच आणि इथे तर शक्यताही नाही. म्हणजे स्वतःकेली तरच मिळणार खायला. संत्री आणली होती लागलीच संधी साधली.

जिन्नस

  • आठ ते दहा नारिंगी रंगाच्या पातळ सालीच्या संत्र्याची साल उकडून
  • दोन वाट्या साखर
  • दोन चमचे रिकोटा चीज /खवा
  • अर्धा वाटी बदाम पूड
  • एक चमचा तूप, दोन चमचे बारिक साखर
  • एक चमचा लिंबाचा रस

मार्गदर्शन

आठ ते दहा नारिंगी संत्र्याची पातळ साल घ्यावी. त्याचे धागेदोरे काढून टाकावेत. तुकडे करून कुकरला दोन शिट्या कराव्यात. थोडे कोमट झाले की मिक्सरमधून काढावे. साधारण एक वाटी पेस्ट होईल. संत्र्याची पेस्ट, साखर अर्धा चमचा तूप एकत्र करून नॉनस्टिक पॅन मध्ये मध्यम आचेवर ठेवावे. ढवळत राहावे. सात/आठ मिनिटाने रिकोटा चीज /खवा घालून पुन्हा सात/आठ मिनिटे ढवळावे. मिश्रण एकजीव झालेय असे वाटले की बदाम पूड लिंबू घालावे, पुन्हा ढवळावे. साधारण दहा मिनिटे झाली की मिश्रण थोडेसे घट्ट लागू लागेल. गॅस वरून उतरावे. थोडे थंड झाले की हाताला थोडेसे तूप लावून छोटे छोटे लाडू वळून साखरेत घोळावेत.

टीपा

संत्र्याची साल किंचित कडवट लागते त्यामुळे साखर घालताना हात थोडा सैलच ठेवावा.

4 comments:

  1. नमस्कार
    असेच नेट वर फिरत फिरत तुमच्या ब्लॉगवर धडकले आणि खूप आनंद झाला, संत्र्याच्या बर्फीची पाककृती बघुन. नागपुरची ही स्पेशालिटी खावुन य वर्ष झालीत. त्यावर उपाय सापडला. नक्की करुन बघणार.
    धन्यवाद
    रूपाली

    ReplyDelete
  2. धन्यवाद माझ्या ब्लॊगला भेट दिल्याबद्दल. हो ना मलाही फार आवडते. मग पाहिली करून. जमेलच, मला कळव.

    ReplyDelete
  3. बरेच दिवस झाले संत्रा बर्फी खायची आहे. त्यात मी आहे भारताबाहेर ... आणि आज तुमचा हा पोस्ट वाचला ... आता मी आलो की पहिला नागपूरवरुन मागवून घेणार नक्की ... :) माझ्या मित्राचा साखरपुडा आहे आणि त्याची होणारी बायको सध्या नागपूरला आहे ... मागवूनच घेतो .. हा हा ... :D

    ReplyDelete
  4. रोहन खाताना माझी आठवण काढ नक्की, नाहितर पोटात दुखेल बरं का. ते दारू पिताना काही लोकांना इकडेतिकडे थेंब उडवताना पहिलेय तसे....हा हा हा. धन्यवाद.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !