लहानपणापासून अनेकवेळा आई-बाबांनी सांगितलेले, नाकासमोर चालायचे. उगाच इकडेतिकडे पाहायचे नाही. रस्त्यात कोणी भांडत असेल, मारामारी सुरू असेल तर क्षणभरही रेंगाळायचे नाही. ते म्हणतात ना चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकूनही जायचे नाही. हे मनावर ठळकपणे बिंबलेले आहे. पण कधीकधी अचानक समोर घडत असलेली घटना नजरेआड करताच येत नाही. अन नकळत हस्तक्षेप केलाच जातो.
माझे सासर घाटकोपरला आहे. लग्न झाल्यावर काही वर्षे आम्ही सगळे तिथे राहत होतो. आमचा मुलगा तान्हा असताना मी बरेचवेळा जेवणे आटोपली की त्याला घेऊन घराजवळ असलेल्या बागेत जात असे. बाग बरीच मोठी व छान ठेवलेली होती. संध्याकाळी तर फार गर्दी असे. बागेच्या मागच्या भागात तुरळक जोड्याही बसलेल्या आढळत. हे प्रमाण तसे डोळ्यात भरण्यासारखे नव्हते शिवाय बागेत दोन रखवालदारही असत. काही आक्षेपार्ह दिसल्यास ते लागलीच योग्य ती कारवाई करत.
रात्री साडेआठ नंतर बरीच शांतता असे. बाळाला घेऊन मी जाई तेव्हा माझ्यासारखे काही लहान बाळे घेऊन नियमित येणारे लोक होते. थोड्या ओळखी झालेल्या. कधी त्यांच्याबरोबर जुजबी गप्पा करून मी फेऱ्या घालत असे. बाळालाही आवडत होते. एक दिवस एक साधारण सोळासतरा वर्षाची मुलगी एका मुलाबरोबर सिमेंटच्या बेंचवर बसलेली दिसली. त्यांच्या अगदी डोक्यावरच म्युन्सिपालीटीचा दिवा होता. म्हणजे चांगले प्रकाशात बसले होते. मुलगी खाली मान घालून अंग चोरून बसली होती. मुलगा अखंड बोलत होता. लांबून मी जवळजवळ पंधरा मिनिटे त्यांना पाहत होते. तेवढ्या वेळात तिने एकदाही मान वर केली नाही की एक शब्दही बोलली नाही. कमाल झाली! असे काय बोलत असेल तो मुलगा हा प्रश्न मला सतावू लागला. पण बरेच वाजले होते आणि बाळ पेंगू लागल्याने मी घरी आले.
आल्याआल्या नवऱ्याला सांगितले. तो म्हणाला, " अग असेल काहीतरी. तू नको विचार करत बसू. " मलाही झोप येत होती शिवाय उद्याची थोडी तयारी आणि ऑफिसचे काही कामही आटपायचे होते त्यामुळे मी तिला तात्पुरते डोक्यातून काढून टाकले. लागोपाठ तिनचार दिवस मला बागेत जाता आले नाही. फारच चुटपूट लागली. त्या मुलीला नक्कीच त्रास दिला जातोय असेच मन सांगत राहिले. चार दिवसाने नेहमीच्या वेळी मी जरासे घाईनेच बागेत गेले. भरभर सगळीकडे नजर फिरवली पण ती कुठेच दिसली नाही. अरे! अजून आली नाही का? किंवा तिला काही त्रास नसेलच. नवरा म्हणतो तसे काही नसेल, उगाच मला भासले असेल. बरे झाले. मी सुटकेचा निःश्वास टाकला. तोच,
जरा काळोखात काहीतरी हालचाल दिसली. पाठोपाठ दबके हुंदके ऐकू येऊ लागले. बाळ कडेवर असल्याने मला तिकडे अंधारात जायला थोडी भीती वाटू लागली. नेमकी बागेतही अगदी तुरळक माणसे होती. रखवालदारही दिसेनात. कोणाला तरी हाका मारून काय चालले आहे हे पाहायला सांगावे म्हणून चक्क रस्त्यावरून चालणाऱ्या दोघातिघांना मी हाका मारल्या. पण त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. शेवटी मी जोरात हाक मारून विचारले, " कोण आहे रे तिकडे? काय चालले आहे? " तसे रडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. अंधारातून दोन मुले बाहेर आली आणि माझ्याकडे पाहत निघून गेली.
मी पुढे जाऊन पाहिले तर माझी शंका खरीच ठरली. तीच होती. पाय पोटाशी घेऊन गवतावर पडली होती. तिला उठविले आणि बेंचवर आणून बसविले. लाइटच्या उजेडात तिचा चेहरा नीट दिसत होता. पोरांनी तिला चांगलेच थोबाडले होते. ओठातून थोडे रक्तही आले होते. चुचकारून, धीर देऊन तिला बोलते केले. तिने सांगितले की त्यातला एक तिचा प्रियकर आहे. मागच्या झोपडपट्टीत राहतो. सतत गुंडागर्दी करतो. ही नुकतीच अकरावीत गेली होती. घरची गरिबी असली तरी सगळे ठीक होते. सारखे हिच्या मागेमागे जाऊन, माझे खूप प्रेम आहे तुझ्यावर असे म्हणून म्हणून त्या पोराने हिलाही त्याच्यावर प्रेम आहे असे वाटण्यास भाग पाडले होते.
गेले काही दिवस तिचा शारीरिक फायदा उठवायला सुरवात केलेली. तिने जे काही सांगितले त्यावरून , चाळे करताना ह्याने मित्राला सांगून फोटो काढले होते. आणि आता ते तिला दाखवून हा तिचा प्रियकर घाणेरडे धंदे करायला भाग पाडू पाहत होता. ती दाद देत नाही हे पाहून दोनतीन दिवस दररोज ही अशी मारहाण सुरू होती. मी तिला म्हटले, " अग आता तुला कळले ना, मग तू येतेस कशाला रात्रीची इथे? आणि आईवडीलांना सांग. ते ओरडतील तुला हे नक्की असले तरीही तेच तुला ह्यातून सोडवतील ना. " तिला पटले नाहीच. घरी मी कुठल्या तोंडाने सांगू? आता मला जीवच द्यावा लागेल. असे म्हणत रडत ती गेली. मला तर काहीच सुचेना.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये माझ्या ओळखीच्या ऑफिसरना मी हे सगळे सांगितले. ते आधी आर्मी मग पोलिसखात्यात काम करून आमच्या डिपार्टमेंटला आले होते. त्यांनी घाटकोपरला असलेल्या इन्स्पेक्टर मित्राला फोन करून ह्या प्रकरणात लक्ष घालायला सांगितले. इन्स्पेक्टरने मला नेहमीच्या वेळी बागेत यायला सांगून ते तिथे साध्या वेषात उपस्थित असतीलच असे आश्वासन दिले. प्रश्न होता की ती मुलगी आणि ती मुले आज येतील का नाही.
सुदैवाने मी पोचले त्यावेळी ते सगळे तिथे होतेच. बागेच्या गेटवरच इन्स्पेक्टर आणि काही पोलीस साध्या कपड्यात उभे होते. बाळामुळे त्यांनी मला ओळखले आणि सरळ त्या गुंडाशी जाऊन बोलायला सुरवात कर असे सांगितले व सगळे पोलीस पांगले. मी धडधडत्या हृदयाने त्यांच्या दिशेने निघाले होते, पण मला पाहिल्याबरोबर तो गुंड व त्याचा मित्र एकदम माझ्या अंगावर आले. घाणेरड्या शिव्या देत धमक्या देऊ लागले. ती मुलगी खूप मोठ्याने रडत होती. तिच्या मित्राने माझा हात धरला आणि सुरा दाखवून म्हणाला, " चल फुटायचे बघ. पुन्हा जर इथे दिसलीस ना तर ... " बाळ कडेवर आणि तो सुरा पाहून आजूबाजूला पोलीस आहेत हे माहीत असूनही माझी बोबडीच वळली.
पण हे सगळे असे झाले हे पोलिसांच्या पथ्यावरच पडले. क्षणात सगळ्यांनी त्या तिघांना घेरले. त्या दोघांना तिथेच चांगले तुडविले व घेऊन गेले. इन्स्पेक्टरांनी जाताना माझे आभार मानले , म्हणाले ह्याला कधीपासून शोधतोय. तडीपार केला आहे पाच वर्षासाठी. कुणकूण होतीच इथे फिरतोय ह्याची. तुमच्यामुळे सापडला. आता गेला बाराच्या भावात. पोरीला थोडा धाक दाखवून घरी पाठवून दिले त्यांनी. पुढे त्याचे काय झाले मी विचारले नाही. पण त्या मुलीची सुटका नक्कीच झाली होती. ह्या घटनेला एकोणीस वर्षे होऊन गेलीत. ती मुलगी सुखात असेलच. नकळत केलेल्या धाडसाने एका पोरीची वाताहात टळली ह्याचे समाधान मिळाले.
सच और सहस है जिसके मन मै .. अंत में जित उसीकी रहे ... :)
ReplyDeleteमस्त ... 'आपल्याला काय करायचे आहे' असे म्हणुन सामान्य माणूस अश्या घटनांपासून अलिप्त राहायचा प्रयत्न करतो पण आपली सुद्धा सामाजिक बांधिलकी आहे हे तो विसरतो. छान केलत. तुमच्या ह्या घटनेपासून बरेच जणांना सामाजिक बांधिलकीची जाणीव होइल हे नक्की...
आपला अनुभव धाडसाचा आहे. आपल्या शेजारी जरी वावगे घडत असेल तर जाऊ दे आपल्याला काय करायचे आहे, त्यांच्या भांडणात आपण कशाला पडायचे, अशी भूमिका सर्वसामान्यांची असते. येथे तर आपण मोठेच धाडस केले. हा अनुभव इतरांसाठीही प्रेरणादायी ठरावा
ReplyDeleteशेखर जोशी
तुमच्या हिमतीचे कौतूक वाटते.....खर आहे आपण सामान्य माणसं जरा जरी सजग नागरिक झालो तर असे अनेक जीव होरपळण्यापासून वाचतील......तुमचे मात्र मनापासून कौतुक....
ReplyDeleteरोहन,शेखर,सहजच खूप आभार.
ReplyDeleteतुमच्या या धाडसामुळे त्या मुलीच्या आयुष्यातला कितीतरी मोठा अनर्थ् टळला..
ReplyDelete- प्रसाद्
http://prawas.wordpress.com
होय असे मलाही वाटते. मी घाबरून माघार घेतली असती तर कोण जाणे काय झाले असते. देव बरोबर बुध्दी देतो व करवून घेतो. :)
ReplyDelete