जाता जाता एक नजर इथेही........

Thursday, May 14, 2009

प्रेमकहाणी- भाग एक

ती येणार आपल्या तांबुस, नितळ, नाजुक पावलानी

रस्त्यावर इवल्याइवल्या अनामय पाऊलखुणा उमटवत

म्हणून तीचा कोमल भार पेलण्यासाठी

मार्गही हळवा, हुळहुळा झालेला

मार्गावरील दोहो बाजूंचे गुलमोहोर

रस्त्यावर झुकून दूरपर्यंत न्याहाळत होते

तीच्या पदचिन्हांचे नर्ममृदू पाऊलठसे

तीचे तांबुस, मांसल पायतळवे जपण्यासाठी

रक्तवर्ण पाकळ्यांचा नरम रूजामा त्यानी रस्ताभर अंथरलेला

अन् एकमेकांचे हात धरून त्यावर सावलीची पांखर धरलेली

तीच्या जीवनोत्सुक, अधिऱ्या डोळ्यांत

कौतुक-उल्हासाचा दरिया उचंबळावा म्हणून

जाई-जुई इवल्या बावऱ्या लाजऱ्या हसत

रातराणीने पहाटेच सडासंमार्जन केलेले मोगर फुलांसंगे

सर्वत्र सुगंधधुंद शिंपडून

तीच्या स्वागतासाठी निळ्या निरभ्र आकाशाचा मांडव घालून

क्षितिज अधीर झालेले तीला डोळे भरून पाहण्यासाठी

रविराजाने सर्वदूर सुवर्णाची फुले उधळलेली

खजिन्याची भांडारे मुक्त उघडून

पानझड लागलेल्या वेशीवरल्या अश्वत्थाच्या वृक्षावरचा

अनागम रस्त्यावर दूरवर नजर लावून बसलेला द्रष्टा राजगरूड

तीच्या उत्कंठित प्रतीक्षेत

आपल्या रूक्ष पंखांची झाडझूड करून

तीच्यासाठी नजराण्याचा शोध घेत त्याने अवकाश पालथे घातलेले

तीच्यायोग्य भेट मिळेना म्हणून तो हताश-उध्वस्त झालेला

अन् मग एका आगळ्या कल्पनेने झळझळून जात त्याने निश्चयपूर्वक

आपले रक्तवर्ण- हृदयमाणिक वेदना दाबत उरातून निखंदून काढलेले

त्रिखंडातील अनमोल असा नजराणा म्हणून

अन् आता कृतार्थ, कृतकृत्य झालेल्या त्याची

चालली होती अधीर मार्गप्रतीक्षा

रक्ताने थबथबलेले, हळूवार स्पंदणारे आपले ह्रदय

त्याने तृप्तपणे आपल्या ओंजळीत धरलेले

No comments:

Post a Comment

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !