जिन्नस
- काटेरी ताजी वांगी पाच/सहा
- दोन मध्यम बटाटे
- दोन चमचे धणेजिरे पूड, तीन चमचे लाल तिखट, एक चमचा गोडा मसाला
- दोन चमचे ओले खोबरे, तीन चमचे दाण्याचे कूट, एक चमचा तीळकूट
- एक मध्यम कांदा बारीक चिरून, चार लसूण पाकळ्या ठेचून, मुठभर कोथिंबीर बारीक चिरून
- दोन चमचे लिंबाचा रस, पाच चमचे गूळ
- चार चमचे तेल.
मार्गदर्शन
वांगी धुऊन त्यांना +अशा दोन चिरा द्याव्यात. तुकडे करू नयेत. अख्खे वांगे भरायचे असल्याने देठापर्यंत चिरू नये. बटाटे धुऊन त्याचे चार तुकडे करावे. एका ताटात कांदा, कोथिंबीर, ओले खोबरे, दाण्याचे व तिळाचे कूट, गूळ बारीक चिरून, धणेजिरे पूड, तिखट, गोडा मसाला, लिंबाचा रस, ठेचलेली लसूण, चवीपुरते मीठ घेऊन हे मिश्रण हाताने कुस्करून एकजीव करावे. आता हा मसाला वांग्यामध्ये भरावा व बटाट्यांनाही चोळावा. नेहमीप्रमाणे मोहरी, हिंग, हळद, तिखटाची फोडणी करावी. एक एक वांगे हलक्या हाताने फोडणीत टाकावे, बटाटेही टाकावेत. उरलेला मसाला टाकून एक भांडे पाणी घालून झाकण ठेवावे. गॅस मध्यम असू द्यावा. दहा मिनिटांनी वांगी मोडणार नाहीत ह्याची दक्षता घेऊन हालवावे. मसाल्यात मीठ घातलेले आहे हे लक्षात घेऊन त्या अंदाजाने मीठ घालावे. अर्धे भांडे पाणी घालून पुन्हा दहा मिनिटे झाकण ठेवून चांगली वाफ आणावी. ( रस्सा घट्ट/पातळ जसा हवा असेल त्या अंदाजाने पाणी घालावे. फार पातळ करू नये. )
कुठल्याही गरम भाकरी बरोबर ही भरली वांगी अप्रतिम लागतात. ज्यांना वांगी आवडत नाहीत परंतु ह्या मसाल्याची चव आवडते त्यांच्यासाठी बटाटे आहेतच. या सोबत लसणाची ओली चटणी व ताक असेल तर मग काय फक्कड बेत जमेल, अहाहा...!!!
कुठल्याही गरम भाकरी बरोबर ही भरली वांगी अप्रतिम लागतात. ज्यांना वांगी आवडत नाहीत परंतु ह्या मसाल्याची चव आवडते त्यांच्यासाठी बटाटे आहेतच. या सोबत लसणाची ओली चटणी व ताक असेल तर मग काय फक्कड बेत जमेल, अहाहा...!!!
No comments:
Post a Comment
आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !