जाता जाता एक नजर इथेही........

Monday, May 11, 2009

डॉक्टरसाब अरे ये लो ना और डालो इसके घसे में

आमच्या मुलाचा पहिला वाढदिवस अगदी तीन आठवड्यांवर आला होता. हॉलचे बूकिंग झाले, जेवणाचा मेन्यू व कॉंट्रॅक्टर ठरला. आमंत्रणे करून झाली. आता काही बारीकसारीक किरकोळ कामे उरकत होतो. नवरा आणि क्रिकेट हे एक आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातले बहुतांशी चांगले व क्वचित काही प्रसंगी वैताग असे अव्याहत गाजणारे प्रकरण आहे. तो खेळतो खूपच चांगला, आचरेकर सरांचा आवडता शिष्य.

गेली पाच वर्षे नेमाने क्रिकेटचा सीझन संपला की नवरा जाहीर करतो, " आता क्रिकेट बंद. अशी पण तू सारखी शंख करतेस सगळे वीकएंड फुकट जातात म्हणून. " हा झटका फक्त मार्चच्या पहिल्या वीक पर्यंत टिकतो. मग जे काय चक्र गरागर फिरू लागते की पालापाचोळ्या सारखी बायको त्या वावटळीत ऑक्टोबर पर्यंतचे सगळे वीकएंड भिरभिरत राहते. पुन्हा मी इतका चांगला खेळतो पण साला घरात कोणाला कौतुक नाही. हे वर ऐकून घ्यावे लागते. आता ह्यावर्षी तर कॅप्टन आहे म्हणजे माझ्या तोंडाला मोठी चिकटपट्टी. अरे बापरे फारच विषयांतर झालेय. हे मन म्हणजे एकदम पळतच सुटते. तर काय सांगत होते...

रविवार होता, नेहमीप्रमाणे नवरा गेला कुठलीतरी 'कांगा लीग' खेळायला. आता घाटकोपर वरून पार क्रॉस मैदानाच्या कर्नाटक पीचवर सकाळी भले मोठे क्रिकेटचे कीट घेऊन पोचायचे म्हणजे किती दमछाक. आवड आहे तर सबकुछ मॅनेज होते. दिवसभर मी माझ्या माझ्या उद्योगात होते. एकतर बाळ लहान होते. त्याच्याशी खेळत व कामे उरकत रविवार असल्याने ऑफिसला असलेली सुटी मी सार्थकी लावत होते. संध्याकाळ झाली, हळूहळू आठ वाजून गेले तरी नवऱ्याचा पत्ता नाही. आता मात्र अस्वस्थपणा येऊ लागला. बाळही बाबाची वाट पाहत होते. शेवटी एकदाची नवाच्या आसपास बेल वाजली. धावत जाऊन दार उघडले.

पाहते तो काय, नवरा रक्ताने भरला होता. मी काही बोलायच्या आतच हसत म्हणाला, " अग काहीही झालेले नाही विशेष. थोडं नाकाला लागले आहे एवढेच. हे रक्त पाहून घाबरू नको. जरा जास्तच होते अंगात ते गेले वाहून. " चिंता व चीड ह्या दोघी भगिनीनी एकाचवेळी मनाचा कब्जा घेतल्यामुळे पटकन मला काही समजेचना. मग नीट पाहिले तेव्हा लक्षात आले की दोन्ही डोळेही पूर्ण काळेनिळे झालेत. रक्त साकळलेय. धारदार नाक कुठेसे गायब झालेय आणि तिथे खूप सुजलेय. दोन्ही गाल, कपाळ आणि कानही ह्या सगळ्याची सुजून अजूनच शोभा वाढवीत आहेत. काय झाले ते आधी सांग आम्हाला असे मी आणि सासूबाईंनी विचारल्यावर कळले की सीझनचा बॉल नवरा बॅटिंग करीत असताना फाडकन नाकावर बसला होता व नाक फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे एवढे रक्त वाहिले व संपूर्ण चेहरा सुजला होता. इतक्या जबरदस्त वेदना होत असताना हा स्वतःच डॉक्टरकडे जाऊन एक्सरे काढून, औषध घेऊन आला होता. आम्ही घाबरू नये म्हणून हसतखेळत होता.

ती रात्र कशीबशी गेली. दुसऱ्याच दिवशी नवऱ्याचा खास मित्र सकाळी नेहमी प्रमाणे पोहे खायला आला. तो केईएम मध्ये एम डी करीत होता. त्याने पाहिले आणि तो म्हणाला की ताबडतोब ऑपरेशन करायला हवे. मी पाहतो काय करता येईल ते. त्या दिवशी थोडा तापही चढला होता. दुखत तर होतेच पण पुन्हा ह्या दोघी बाया आपल्याला खेळायला द्यायच्या नाहीत ह्या भीतीने नवरा एकदम सेफ गेम खेळत होता. जणू काही झालेच नाहीये असे सगळे वागून आम्हालाच हसत होता.

मित्राने भरभर काय ती यंत्रणा फिरवून मंगळवारी सकाळी ऑपरेशन ठरवले. तो स्वत: व इएनटी सर्जन -तोही त्याचाच मित्र ऑपरेशन करणार होते. फक्त जनरल-स्पेशल वॉर्ड मध्ये कुठेही जागा नसल्याने आम्हाला त्याने बर्नींग वॉर्ड मध्ये जागा दिली होती. सोमवारी दुपारी मी आणि नवरा केईएमला पोचलो. बाळाला घरीच सासूबाईंकडे ठेवले होते. बर्नींग वॉर्ड म्हणजे अतिशय यातना. एक एक पेशंट पाहूनच आम्ही दोघेही लटपटलो. सारखे ओरडण्याचे, कण्हण्याचे आवाज. ७०% पेक्षा जास्त भाजलेल्या पेशंट्स च्या डोळ्यातले विझलेले जीवन पाहूनच जीवाला कापरे भरते. रात्र झाली, सगळीकडे विचित्र शांतता पसरली होती. नवऱ्याला आता काहीही खायला द्यायचे नव्हते. मी त्याला झोपायचा प्रयत्न कर असे सांगून बाहेर बाकड्यावर बसले.

दहा मिनिटे गेली अन एक साधारण बारा-तेरा वर्षांचा मुलगा माझ्याजवळ येऊन बसला. त्याला मी वॉर्डमध्ये दोन-तीन वेळा इकड-तिकडे करताना पाहिले होते. चुणचुणीत होता. नाव विचारून झाले. त्याला कुठेही भाजलेले दिसत नव्हते. म्हणून विचारले, तू इथे कशाला आहेस? तर म्हणाला, " मेरा हाथ टूट गया था, पर वो वॉर्ड मे जगाच खाली नही हैं करके मेरेको इधर रखा हैं. अभी जाऊंगा दो हप्ते मैं घरकू." मग नवऱ्याला काय झालेय, ऑपरेशन कधी आहे विचारून थोड्या गप्पा करून तो गेला झोपायला. मीही येऊन पाहिले तो नवरा गाढ झोपला होता. थोड्या डुलक्या घेत घेत रात्र गेली.

पहाटे सहालाच डॉक्टर मित्र आला. नवऱ्याला उठवून-प्राथमिक गोष्टी आवरून घेऊन गेला. ऑपरेशन झाले की येतोच तुला सांगायला तोवर इथेच थांब. मी मान डोलवली अन देवाची आराधना करू लागले. दोन वाजून गेल्यावर स्ट्रेचरवर घालून नवऱ्याला आणले. ऑपरेशन चांगले झाले होते. नाक सांधले होते. संपूर्ण चेहऱ्याला- डोळे आणि ओठ सोडून पट्ट्या बांधलेल्या होत्या. नाकाला प्लॅस्टर होते व ते तिथेच राहावे म्हणून ह्या पट्ट्या होत्या. नवरा गुंगीतच होता. नाकपुड्या बंद केल्या होत्या. शुद्धीवर आल्यावर एकदम गोंधळ होऊ नये म्हणून नवऱ्याला कल्पना दिलेली होती की तोंडाने श्वास घ्यायचा आहे. परंतु इतक्या त्रासात हे लक्षात राहणे शक्यही नव्हते आणि राहिले असते तरीही त्याची अंमलबजावणी करण्याइतपत मेंदू कामही करत नव्हता. त्यामुळे नवरा शुद्धीवर आल्यावरची काही मिनिटे फारच मोलाची होती. त्यात काहीही मोठा घोळ होण्याची शक्यता दाट होती.

मी आणि मित्र अगदी एक मिनिटही नवऱ्याला सोडून हाललो नाही. न जाणो तेवढ्यातच हा पूर्ण शुद्धीत यायचा. होता होता संध्याकाळचे सात वाजत आले आणि नवरा हालचाल करू लागला. आपण सगळे सहजपणे श्वास घेत असतो, पण साधी सर्दी झाली तरीही किती त्रास होतो. इथे तर नाक मोठे मोठे कापसाचे बोळे भरून बंद करून टाकलेले. नवऱ्याने श्वास घ्यायचा प्रयत्न केला आणि तो एकदम गुदमरला. त्याला तोंडाने श्वास घे असे सांगितलेलेही कळेना. नेमका त्याचवेळी घशात खूप कफ साठला. अशा ऑपरेशन्स मध्ये हे सगळे असेच घडते. पण प्रत्यक्ष घडते त्यावेळी जर पटकन कफ बाहेर काढला नाही तर जीवही जाऊ शकतो. कफ काढायचा म्हणजे तोंडात रबराची नळी घालायची आणि दुसऱ्या बाजूने ओढायचे.

मित्र डॉक्टर असूनही आपल्या खास मित्राला एकदम तडफडताना पाहून गांगरून गेला त्याला पटकन काहीच सुचेना. जवळ कोणी दुसरा डॉक्टरही नव्हता. मला तर अशा वेळी काय करतात हेही माहीत नव्हते. तेवढ्यात जणू देवानेच पाठवल्यासारखा तो लहान मुलगा पळत आला. तिथेच ठेवलेली रबरी नळी मित्राच्या हातात देऊन म्हणाला, " डॉक्टरसाब, ओ डॉक्टरसाब, अरे ये लो ना और डालो इसके घसे में. मूंसे खिचों जोरसे, अभी कफ आयेगा बाहर. " तो गदगदा मित्राला हालवत होता. मित्र पटकन भानावर आला व त्याने पुढचे सगळे काही व्यवस्थित पार पाडले. दहा मिनिटांत नवऱ्यालाही लक्षात आले की पुढचा दीड महिना आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा आहे.

आजही तो मुलगा मला डोळ्यासमोर दिसतो. केवळ त्याच्या समयसूचकतेमुळे नवरा वाचला. इतका लहान मुलगा पण केईएम मधील वास्तव्यात किती मोलाची गोष्ट नुसते पाहून शिकला होता व तितक्याच सहजपणे मदतीला धावला होता. त्याचे उपकार न फेडता येण्यासारखे आहेतच आणि मला ते फेडायचेही नाहीत. खरेच काही लोकांना ही बिकट प्रसंगी अचूक मदत करण्याची कला साधलेली असते. हे असेच माणसांमधले देवदूत सदैव जिवंत राहोत, बस.

9 comments:

 1. प्रसंगावधान .. हेच महत्वाचं.
  प्रसंगातुन निभावलात यातंच सगळं समाधान.

  ReplyDelete
 2. खरय असे काही लोकांचे आभार नसतात मानायचे...पण मनातुन आपण त्यांचे सतत जे भले चिंततो ते मात्र कुठल्यातरी रुपात पोहोचते त्यांच्यापर्यंत....बाकी प्रसंग खरच बाका होता..अश्या वेळी कुठुन बळं येतं आपल्याला कळतं नाही.....

  ReplyDelete
 3. अगदी खरं, धन्यवाद महेंद्र,तन्वी.

  ReplyDelete
 4. खूप वेगळा अनुभव आहे. मज्जा आली वाचताना. शेवट एवढा serious असेल असं वाटलं नव्हतं.
  बाकी एवढ्या सगळ्या प्रकरणानंतर, तुमचे 'हे' लायीनीवर आलेत की नाही मग? ;-)

  ReplyDelete
 5. धन्यवाद श्रध्दा, काश असे झाले असते.क्रिकेट म्हणजे श्वास आहे गं, एकवेळ बायको रुसली तरी चालेल पण बॆटला नाराज करून चालणार नाही. :)

  ReplyDelete
 6. Nachiketchya nakachya hakikatiche shabdchitra chhan rekhatale aahes. Te divas aathavale aani punha ekada chhatimaddhye dhadakale. Baaaaprey! Kaay bhayankar sagale! Ball kaay kunala lagat nahi?
  Really injured!!!
  Nasheeb, Shomuchya vadhadivasala tari nakache bandage sutale hote!
  Aaee

  ReplyDelete
 7. Nahi nahi, Shomuchya wadhadivashihi Nachiketche bandage hotech.:)

  धन्यवाद.

  ReplyDelete
 8. Baapre, vachunach bheeti vatalee.

  Nachiketchya nakachee hee goshT maahit navhatee. Ingrajee comments lihilyabaddal kShamasva. Majhya Mac var sadhya kaahee sadahane nahiyet. Prayatna karatey.

  ReplyDelete
 9. हो ना गं, ते दोन दिवस फार कठीण होते, निभावले. प्रभावित, धन्यवाद.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !