जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, May 20, 2009

आता मी नाही बदलू शकत स्वत:ला

नेहमीप्रमाणे मैत्रिणींचे स्नेहसंमेलन भरले होते. सगळ्याजणी उत्साहात चिवचिवत होत्या. छान छान खादडंती होतीच बरोबर. जोडीला थोड्या खमंग, चुरचुरीत मधूनच जरा गंभीर गप्पा रंगल्या होत्या. एका मैत्रिणीची बहीण तिची लहान मुलगीही आज आमच्यात सामील झाले होते. मुलगी-वेदा, खूपच गोड होती. दोन छोट्याश्या वेण्या कानावर घातलेल्या. गोबरे गाल, मिस्कील चमचमणारे डोळे. पाहता क्षणीच उचलून घ्यायचा मोह व्हावा अशी चुणचुणीत पोर. सगळ्या तिचे कौतुक करीत होत्या. अगदी बाळांनाही कौतुक बरोबर समजते, मग ही सोनुकली तर तशी कळती होती. निरनिराळे लाडिक भाव, मध्येच आर्जव करीत सगळ्यांकडून लाड करून घेत बागडत होती.

करता करता कोणीतरी तिला म्हणाले, " वेदा, छानसा नाच करून दाखव ना गं. " पठ्ठीने क्षणभर विचार केला, सगळ्यांवरून एक नजर फिरवली आणि अगदी मोठ्या माणसासारखे म्हणाली, " उहूं, मी नाही करणार आत्ता. माझा बिलकुल मूड नाहीये. " तिचे ते मान वेळावून किंचित गाल फुगवून नकार देणेही खरे तर गोडच दिसले. काही जणी तिला लाडीगोडी लावू लागल्या, पण ती जाम ऐकेना. तिच्या आईला थोडा राग आला. ती म्हणाली,
"
वेदा, फार लाडूकपणा नकोय. कसला आलाय मूडबिड? कर बरं पटकन एक छानसा डान्स. "
"
अग पण आई, खरंच माझा मूड नाहीये ना, मग का करू? "
आई वैतागली, " वेदा, मूड नाहीये तर आण त्याला. जरा बदल स्वतःला. उगाच हट्टीपणा नको करूस. "
"
का म्हणून मी बदलू? मी नाही जा. आता ह्या वयात मी नाही बदलू शकत स्वतःला. अनेक वेळा तू, आपला बाबा, आजोबा-आजी मला जोरात सांगत असता ना, वेदा चूप कारटे, आता ह्या वयात आम्ही नाही बदलू शकत. मग मलाच का म्हणून जबरदस्ती करतेस? " कमरेवर हात ठेवून एका दमात ही मुक्ताफळे ऐकवून वेदाबाई नाकाचा शेंडा उडवून फतकल मारून बसल्या. डान्स नाही तरी पण सगळ्यांची मस्त करमणूक झाली. वेदाच्या आईने कपाळाला हात लावला. ही पोर जाईल तिथे काहीतरी अक्कल पाजळेल असे म्हणू लागली. मग इतर गप्पा चहामध्ये सगळे रंगले. थोड्यावेळाने जोतो घरी गेला.

खरेच वेदाचे काय बरे चुकले होते? जे वाक्य अनेक वेळा तिच्या कानावर सगळ्या वयाच्या माणसांच्या तोंडून पडले होते तेच तिने बोलून दाखविले होते. आजोबा नेहमी म्हणतात, " मी आता सत्तरीला आलो, आता ह्या वयात मला स्वतःला बदलणे जमणार नाही. तेव्हा मी असाच वागणार. तुम्हाला झेपले तर ठीक नाहीतर मला काही घेणंदेणं नाही. " आजीचे तिसरेच, ती म्हणणार, " हो गं बाई, आधी सासू-सासरे होते, त्यांची बोचरी शिकवण ऐकली. मग आमचे ' हे ' तुझे आजोबा गं, जमदग्नीचा अवतार, सारखी मेली वसवस. त्यांच्या धाकाने सतत स्वतःला बदलवले. आता मात्र माझे वय झालेय. मी अशीच वागणार. मला हवे तेच करणार. "

बाबाचे तर काय, तो सदानं कदा कामात. नाहीतर त्या कसल्याश्या मार्केट हां..... आईला ऐकलेय एकदा बोलताना, " तुमच्या त्या सट्टाबाजारात कशाला पैसे उडवताय? मेली दमडी मिळणार नाही पण आहे तेही फुंकताय. " म्हणजे काय ते मला काही कळले नाही. हां आजीला ऐकले होते एकदा आजोबांना सांगताना, " अहो, चहा किती वेळ फुंकताय? गारढोण झाला की पुन्हा म्हणाल, दे गरम करून. " पण हे बाबाचे फुंकणे काहीतरी वेगळे दिसतेय. आई ज्याअर्थी बाबाला ओरडतेय त्याअर्थी नक्कीच काहीतरी वाईट्ट असणार. तर कसा लागलीच ओरडला आईवर, " फुकटची बडबड नकोय. कळत तर काही नाही. हे बघ, मी हे लग्नाआधीपासून करतोय आणि तुला माहीतही होते. उगाच मला बदलवण्याचा प्रयत्न करू नकोस. मी आहे हा असा आहे आणि असाच राहणार आहे. "

आईही किती वेळा म्हणत असते, " मी लहानपणापासून अशीच आहे किंवा माझ्या माहेरी असे नाहीये बाई. जे माझ्या अंगात रुळलेय ते मी तुमच्या घरात आले म्हणून बदलू म्हणता? मुळीच नाही. का म्हणून? तुम्हाला नसेल जमत तर बोलू नका पण उगाच सल्ले नकोत. "

आता हे असे अनेक वेळा एकच वाक्य कानावर पडल्यावर घरातली लहान मुलेही तेच बोलणार. शब्दशः अर्थ समजत नसला तरी त्यांना एवढे नक्कीच समजते की प्रत्येकजण स्वतःला हवे तेच करणार असे म्हणतोय. मग कोणाला ते आवडो, त्रास होवो किंवा राग येवो. कुठल्याही वयासाठी हे वाक्य योग्य आहे असे मला अजिबात वाटत नाही. " मी आहे हा असा/अशी आहे आणि असाच राहणार. आता ह्या वयात मी बदलणार नाही स्वतःला. " ह्या वाक्याने आपण आपल्या स्वतःच्या प्रगतीची, प्रेमाची, आस्थेची, मदतीची सगळ्यांत मुख्य म्हणजे इतरांच्या मनात आपण हवेसे असण्याची प्रक्रियाच खुंटवून टाकतो. कधी ह्यातून उद्दामपणा, कधी अनास्था तर कधी स्वतःवरचा संपूर्णपणे ढासळलेला विश्वास आणि त्यातून आलेली वरवरची बेफिकरी डोकावते. काहीजणांना मी खडूस आहे हे दाखवण्यात धन्यता वाटत असते, तर काहीजण स्वतःला बदलवणे हे कमीपणाचे आहे असे समजून आनंदाचा रस्ताच बंद करून टाकतात.

अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीत आपला हेका सोडून किमान समोरचा काय सांगतोय ते ऐकले तरी खूप चांगले बदल घडू शकतात. सगळ्यांना आपण हवेसे वाटू शकतो. हा माणूस अडेलतट्टू नसून समजूतदार, सांभाळून घेणारा, मदतीस तयार अशी प्रतिमा आपसूकच तयार होते. हे सारे खोटेपणाने करायचे नसून समरसून करायचे आहे. आणि कुठे लोकांसाठी करायचे आहे? सगळे आपलेच आहेत ना?

माझ्या वडिलांनी कधी आम्हा मुलांना उचलून घेतले नाही मग मी का माझ्या नातवंडांना घेऊ? ह्याने काय होईल, तुम्ही तुमच्या नातीचे बाळपण, तिने तुम्हाला मारलेली घट्ट मिठी, तिच्या न्हाऊमाखू घालून उदवलेल्या जावळाचा, दुधाचा, ओकऱ्या लाळेचा गंध ह्या साऱ्याला मुकाल. तिची इवली इवली तुमच्या तोंडात जायचा प्रयत्न करणारी बोटे. तुम्ही तीला ठो दे ठो दे म्हटले की मोठे बोळके पसरून तोल नीट सावरता येत नसल्याने धाडकन ती डोके तुमच्या कपाळावर आपटेल. तुम्ही बुवा कुक करत चेहरा लपवलात की लकलकणारे डोळे तुम्हाला शोधतील आणि तुम्ही भोक केले की खुदकन हसतील. थोडी मोठी झाली की बोट धरून दुडुदुडू पळेल. असे कितीक प्रसंग, रूपे तुमच्या समोर येतील तिची. आजी-आजोबां वाचून तिला चैन पडणार नाही पण हे कधी होईल तुम्ही प्रथम तिला उचलून छातीशी धरले तरच ना?

बायकोची फार ओढाताण होतेय खरी, पण आमच्या घरात कधी कोणी स्वयंपाकघरात काम केले नाही . मग मी कशाला करू? पुन्हा सगळे म्हणतील बायकोच्या आज्ञेत आहे अगदी आणि नावे ठेवतील. पण अशाने बायको दुखावेल. तिला शारीरिक त्रास तर होईलच, त्याहीपेक्षा जास्त मनात कष्टी होईल. शिवाय नोकरी, प्रवासात फुकट जाणारा वेळ ह्यातून जे काही तास घरात घालवतो त्यात ती सगळा वेळ चुलीपाशी नाहीतर मुलांपाशी. मग मदत करता करता तिच्या अवतींभोवती राहून थोड्या गप्पा होतील. सगळ्यांशी संवाद साधता येईल.

जसा माणूस मरेपर्यंत शिकतच असतो तसेच माणसाने आयुष्यभर काळानुसार बदलणाऱ्या नवनवीन संकल्पनांसाठी, आपल्या माणसांच्या आनंदासाठी स्वतःला बदलत राहायला हवे. जीवनातले दररोज सहजगत्या मिळणारे छोटे छोटे आनंद ह्यातच सामावलेले आहेत. प्रयत्न करायला काय हरकत आहे? झाला तर फायदाच होईल, नुकसान नक्कीच होणार नाही.

6 comments:

 1. खरंय. बदलणं कठिण असतं खरं पण नवीन गोष्टी करून नक्की पहाव्य़ा.

  ReplyDelete
 2. मुलं पक्की नकलाकार असतात...
  बदलणं आपल्याला खरच कठीण असतं....पण जर थोडाफार बदल करु शकलो तर आयुष्याची रंगत मात्र खुप वाढते....

  ReplyDelete
 3. नक्कीच, धन्यवाद तन्वी.

  ReplyDelete
 4. फ़ारच छान..भाग्यश्री..

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !