गेल्या वर्षी मायदेशात आले असताना शेजारच्या वहिनींशी बोलत होते. तेवढ्यात त्यांची लहान मुलगी-प्रिया खालून खेळून आली. थोडे कौतुक केल्यावर खुलली. अगदी घरात येऊन गप्पा मारत होती. टीव्ही सुरू होता. दुधाची कुठलीतरी जाहिरात सुरू झाली, अन हिने नाक मुरडले. म्हटले, " का गं, तुला नाही आवडत दूध प्यायला? " " चक, मुळीच नाही आवडत." तसे बऱ्याच लहान मुलांना दुधाचा तिटकारा असतो. कोणाला वास आवडत नाही तर कोणाला आईची भुणभूण. मग अनेक प्रकार करून एकदा का पोरांनी दुधाचे ग्लास पालथे केले की किमान त्यादिवसाचे युद्ध जिंकले अशा आवेशात आया खूश.
आता ह्या चिमुरडीला का आवडत नाही हे शोधावे म्हणून विचारले तर उत्तर ऐकून आधी हसून हसून बेजार झाले आणि नंतर विचारात पडले. पोरीचे म्हणणे, " अगं काकू, दूध ना भैय्या देतो आणि मला तो अजिबात आवडत नाही. " मला वाटले की तो आणून देतो म्हणून ही असे म्हणतेय. " " प्रिया, दूध तर गाय देते ना. भैय्या फक्त आणून देतो आपल्याला. " " छे गं काकू, तुला काहीच माहीत नाहीये. गाय नाही काही भैय्याच देतो आणि मला तो अजिबात आवडत नाही. " मला हसू आवरेना, ती माझ्याकडे काय वेडी आहे अशा आविर्भावात पाहत होती. मग तिला बरेच समजावले, कॉंप्युवर चित्रे काही स्लाईडस दाखवल्या. तिला पटले की नाही कोण जाणे पण पाहत होती. तेवढ्यात आईने हाक मारली आणि ती गेली घरी. मी विचार करीत होते, तिने कधीही गाई/म्हशीचे दूध काढताना पाहिले नव्हते. अजून ती माँटेसरीतच होती त्यामुळे असेल पण शाळेतही कधी सांगितले गेले नसावे. तिची ठाम समजूत होती की दूध भैय्याच देतो.
असेच एकदा माझा मुलगा लहान असताना मी सासऱ्यांना म्हणत होते, " माझ्या कडचे पैसे संपत आलेत तुम्ही जरा मला देता का? " हे ऐकले मात्र लागलीच स्वारी पळत आली. " अग ममा, आजोबांकडे कशाला मागतेस? बँकेत जा ते देतील तुला. आजोबा नेहमीच जाऊन मागून आणतात तिथून. " मी आणि सासरे खोखो हसलो. त्याला म्हणाले, " हो रे राजा , आता बँकेत जाऊनच आणते हं का. " तो भांबावला, त्याला कळेना आम्ही का हसतोय. बऱ्याचदा सासरे त्याला घेऊन बँकेत जात आणि पैसे काढून आणत. त्यामुळे त्याची समजूत झालेली, जसे दुकानात गेले की दुकानदार वस्तू देतो तसेच बँकेत गेले की बँक पैसे देते. काश असे होत असते .
कधी कधी मुलांना सांगितलेले ते गाल फुगवून आपल्यालाच ऐकवतात. इतका निरागस भाव असतो ना की रागावताही येत नाही. मी आणि माझा भाऊ लहान असताना बाबांच्या चुलतभावाकडे गेलो होतो. त्या काकांचे नुकतेच लग्न झाले होते. काकूला बहुतेक आम्ही अचानक गेलेले आवडले नसावे. तिने शिरा केला आणि दिला सगळ्यांना. तो इतका वाईट्ट झाला होता की बस. ती चालतानाही फारच धबाधबा चालत होती.
माझ्या भावाला गोडाचे फार वेड होते-आहे. त्याने पटकन एक घास खाल्ला. मग अगदी वाईट तोंड करून आईला म्हणाला, " आई , असा काय शिला असतो? आणि ती काकू बघ ना कशी धबाधबा चालतेय. तिला लाग आलाय का? " आईला खात्री होतीच शिरा पाहून हा काहीतरी बोलणारच. उगाच खोटे खोटे कशालाही छान म्हणायचे नाही हे त्याला सांगितलेले कधीतरी. ती त्याला गप्प बस म्हणून खुणावत होतीच तोच हा खरे बोलून मोकळा झाला. काकूला आणिकच राग आला असावा कारण नंतर चहा आला तोही कडूच होता. काका बिचारा कानकोंडा होऊन गेला. पुढे काकू आमच्या घरात चांगली रुळल्यावर ही आठवण निघाली तर खूप हसत होती. अशी कशी बाई मी वागले कोण जाणे असे म्हणत सुंदर शिरा करून सगळ्यांना दिला तेव्हा कुठे तिला बरे वाटले.
दुधवाला भैय्या... :)
ReplyDeleteमुलांचं भावविश्व किती सुंदर असतं नाही कां?
जे समोर दिसतं त्याच्यावर अगदी १००टक्के विश्वास ठेवतात.
मनापासुन आवडला लेख..
धन्यवाद महेंद्र.
ReplyDeleteआमच्याकडे पण हे असेच आहे....फक्त इथे तर भय्या ही नाही त्यामुळे दुध हे कॅन मधेच जन्माला येते आणि पैसे ATM मधे....
ReplyDeleteलेख नेहेमीप्रमाणे मस्त....
बरोबर,जे दिसतं तेच खरं ही समजूत. धन्यवाद तन्वी.
ReplyDelete