जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, May 24, 2009

तू बघून घे शेवटचे ह्याला...

वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर टाकला की काही वर्षेतरी आम्ही आजोबांकडे जात असू. मग दोन महिने धमाल. यावेळीही जायचे ठरले होते. मी तिसरीत आणि भाऊ पहिलीत. जायचे नक्की झाले असले तरी तिकिटे आधीच बुक करावीत हा प्रकारच नव्हता. तशात सुट्या सुरू झाल्यामुळे गाड्यांना तोबा गर्दी उसळे. तरीही नेहमी सगळे जमून जाई त्यामुळेही असेल आमचे बाबा रिझर्वेशन करीत नसत. शिवाय जर काही कारणाने जाणे लांबले तर उगाच कटकट नको हेही एक कारण होतेच.

परीक्षा संपली. जायची तयारी झाली. बाबा सुटी नसल्यामुळे येणार नव्हते. आईने त्यांच्यासाठी थोडे कोरडे पदार्थ बनवून ठेवले आम्हाला प्रवासात खायला लाडू-चिवडा केला होताच. शिवाय शेंगदाण्याचे घट्ट पिठले, दशम्या लसणीची कोरडी चटणीही घेतली होती. बहुतेक आम्ही नागपूर एक्सप्रेसने जात असू. तेव्हा ती बारा साडेबाराच्या दरम्यान सुटत असे. संध्याकाळी मनमाडला पोचे. आजोबांनी पाठविलेली गाडी तयार असेच. तिच्याने रात्रीच्या जेवणाला आम्ही रावळगावला घरात पोचलेले असू.

घरातून निघेतो साडेअकरा झालेले होते. त्यावेळी आम्ही दादरला(पूर्वेला ) राहात होतो. घरापासून स्टेशन चालत पंधरा मिनिटे. भरभर स्टेशन गाठले. पाहिले तर तिकिटाला रांग होती पण सरकत होती. तिकिटे मिळाली. फक्त दहाच मिनिटे उरली होती गाडी लागायला. आम्ही पळतच प्लॅटफॉर्मवर पोचलो पोचलो गाडी लागतच होती. हल्ली मी बऱ्याच वर्षात रिझर्वेशन करता प्रवास केलेलाच नाही पण अजूनही हा प्रकार होत असेलच. यार्डातूनच हमाल/कुली गाडीत चढून काही सीटस अडवून येतात. मग जसे लोक येतील तसे त्यांच्याशी थोडीफार हुज्जत घालून भाव पटला की सीटस विकत असत.

बाबा जवळजवळ धावत्या गाडीतच चढले. मला फार आश्चर्य वाटत असे ज्याज्यावेळी मी बाबांना असे पाही. एकदम धाडशी प्रकार वाटे तो. पुढे वीस वर्षे मीही दररोज हेच करणार आहे हे तेव्हा माहीत नव्हते ना. बाबांनी पाहिले एक हमाल संपूर्ण एक कंपार्टमेंट अडवून बसला आहे. त्याच्याशी भाव करत बाबांनी एक सलग तीन सीटस असलेल्या बर्थवर आमच्या बॅग्ज ठेवल्या. तोवर आम्हाला खिडकीमधून आईने चढविले होते. त्यावेळी खिडक्यांना मधले गज नव्हते. सर्रास बायका मुले, सामान खिडक्यांमधून चढविले जाई. आमच्या मागोमाग आईने बॅग्जही ढकलल्या ती दरवाज्याकडे गेली.

इकडे मी आणि भाऊ सीटसवर टेकलो. बाबा हमाल ह्यांच्यात हुज्जत चालूच होती. तो बाबांकडे तिस रुपये मागत होता आणि बाबा म्हणत होते की मी फक्त दहा रुपये देईन. ह्या सीटस तुझ्या नाहीत तरीही तुझेही पोट आहे म्हणून. तो अजिबात ऐकेना. तोवर इतर सीटस साठीही लोक आलेलेच होते. बाबांचे ऐकून तेही त्याच्याशी भांडू लागले. आईही येऊन पोचली. डब्यात फारच आरडाओरडा चालू झाला होता. मी आणि भाऊ घाबरून रडकुंडीला आलो होतो. गाडी सुटायची वेळ जवळ येत होती आणि हे भांडण संपतच नव्हते.

बाबाही आता फारच रागावले होते. हमाल ऐकत नाही असे पाहून त्यांनी बखोटीला धरून त्याला सीटवरून उठवले आणि आईला बसवले. एकूण आठ सीटस मिळून हमालाचे फारच नुकसान होणार होते. आणि हे सगळे केवळ बाबांमुळे. गाडी सुटली तशी हमालाने कोण देईल तितके पैसे घेतले. इकडे बाबांनीही आईला सगळे झाले ना नीट आता मी उतरतो असे म्हणून आमचे पापे घेऊन उतरायला निघाले. तोच तो हमाल एकदम दातओठ खाऊन बाबांच्या अंगावर धावून आल्यासारखे करून आईला म्हणाला, " तू जा आता गावी. मी बघतोच ह्याला उद्या. दररोज.०४ फास्ट पकडतो तीन नंबरवरून, माहीत आहे मला. कापूनच टाकतो साल्याला. तू बघून घे शेवटचे ह्याला. " असेम्हणून तो गेलाही उतरून.

तोवर गाडीही बरीच पुढे आली होती. आता प्लॅटफॉर्म संपणार अशी वेळ आल्याने बाबांनाही उडी टाकावीच लागली. बाबा आईला खुणा करून काहीतरी सांगत होते पण गाडीने वेग घेतल्याने काही कळले नाही. आई रडायलाच लागली. तो जे काही बोलून गेला त्याचे गांभीर्य कळायचे आम्हा मुलांचे वय नसले तरी तिला समजत होते. आत्तासारखे सेलफोन तर सोडाच साधा फोन ही आमच्या घरी नव्हता. त्यासाठी पोस्टात जाऊन ट्रंककॉल बुक करावा लागे. मात्र आजोबांकडे घरी फोन होता. त्यामुळे जर बाबांनी फोन केला तरच त्यांची खुशाली आम्हाला कळली असती. परंतु हे सारे करणाऱ्यातले आमचे बाबा नव्हतेच( अजूनही नाहीत ) मुळी.

डब्यातले सगळे आईची समजूत घालू लागले. " अहो ताई, घाबरू नका. तो उगाच धमकी देऊन गेलाय. बहुतेक सगळेच आठच्या आसपास लोकल पकडतात ना मग काहीतरी टाईमींग फेकले त्याने तोंडावर. तो काहीही करणारनाही. एवढा वेळ कुठेय त्याच्याकडे. तो गेला असेल आता दुसऱ्या गाडीत सीट अडवायला. तुम्ही धास्तावून जाऊ नका. " आईला हे कसे पटावे? आता रडून तरी काय होणार आहे असे वाटून असेल काही वेळाने ती शांत झाली. आम्ही दोघे तर केव्हाचेच खिडकीत रमलो होतो.

सगळे सुरळीत होऊन रात्री आजोबांकडे पोचून जेवणे झाल्यावर आईने आजोबांना सगळे सांगितले. आई तेव्हाही रडतच होती. पुढे तीन आठवड्यानंतर बाबांचे कार्ड आले. मी मजेत आहे काळजी, करू नकोस. तो हमाल पुन्हा मला कुठे दिसलाही नाही.( ह्या वाक्याखाली Underline केले होते. ) तेव्हा तू आनंदात राहा. हे वाचल्यावर कुठे आईचा जीव जरा थाऱ्यावर आला. अजूनही हा प्रसंग आठवला की तो हमाल मला दिसतो आणि त्याचे ते दातओठ खात अंगावर धावून येणे.....

8 comments:

 1. खरच .. आपल्या आयुष्यत असे छोटे-छोटे प्रसंग खुप येतात पण ते कायमचे आठवत राहतात. तुमचा हा प्रसंग तुम्ही तिसरीमध्ये म्हणजे अवघ्या ८-९ वर्षांच्या असताना घडला आहे तरी किती पक्का लक्ष्यात आहे... मला देखील माझे असे काही प्रसंग लिहायला हवेत ... :)

  ReplyDelete
 2. आज बराच मोकळा वेळ होता ... तुमचे अगदी आधीपासूनचे पोस्ट वाचत होतो... लक्ष्यात आल तुमच्याप्रमाणे मी सुद्धा १८ फेब.पासून लिखाण सुरु केल आहे ... :)

  ReplyDelete
 3. रोहन खूप खूप आभार. एवढा वेळ काढून अनेक पोस्ट वाचून त्यावर मनापासून टिपण्या टाकल्यात. फार बर वाटल. अरे वा!आपल्यात एक छान दुवा आहे तर. शुभेच्छा.

  ReplyDelete
 4. अजून एप्रिल आणि मे मधल्या काही पोस्ट वाचायच्या आहेत. तेंव्हा अजून काही कमेंट्स येतीलच ... :)

  ReplyDelete
 5. खरच तुमच्य आईची अवस्था काय झाली असेल??? रावळगाव..म्हणजे आणखी एक कॉमन गाव...माझी आत्या आहे तिथे आणि मामीचेही माहेर....मग काय भरपुर चॉकलेट खाल्लेत तुम्हीसुद्धा....
  तन्वी

  ReplyDelete
 6. रोहन, काल एकदम सहा टिपण्या पाहिल्या ना तेव्हां अतिशय आनंद झाला. Thanx :).

  तन्वी, अग आपली नक्कीच ओळख असणार. हो तर प्रचंड चॊकलेट्स खाल्लीत. आणि त्याचे परिणामही अनुभवतो आहोत. कळले ना?हा हा.. माझे माहेरचे आडनाव ’जोशी ’
  आभार.

  ReplyDelete
 7. असं काही घडलं असलं म्हणजे वय लहान असलं तरी बरोबर आठवतं ना? थोडा भयानकच आहे अनुभव. मलाही तीन वर्षांची असतानाचा एक प्रसंग आठवतो. कधीतरी लिहिलं पाहिजे. छान लिहिलय...

  ReplyDelete
 8. हो ना, वय लहान असले तरी लक्षात राहतेच. आभार अपर्णा.

  ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !