एक काळाशार वेदनाडोह
माझ्या आस्तीत्वाला व्यापून,
अन रंध्रारंध्राना फुटलेले वेदनांकुर
माझं जिवंतपण तीक्ष्ण करताना
एक विषण्ण एकटेपण मला बिलगून
----- सयामी जुळ्यासारखं------!
अंतर्ताटव्यातून तू
उखडून चुरगाळलेल्या फुलपाकळ्या
तुझ्या स्पर्शाशी जवळिक साधून होत्या म्हणून
माझ्या हृ्दयाशी कवटाळल्यात मी......!
खर सांगू ___
त्या वेदनाच जोजवतात नि जगवतात मला
पोसतात माझा वेदनोत्कट आत्मबिंदू
तुझं सुख त्या वेदनांतूनच एकवटलेलं...
...... साठवलेलं
खर ना बये?
मला माहित आहे गं... सारं सारं माहित आहे
कारण ___
तुझ्या रोमांरोमांतून मी भिनलो आहे.
तुझा श्वास - निश्वास हुंकारतो-फुलतो-
- तो माझ्या हृ्दयस्पंदनांतून.
माझं दुखरं ... जखमी भावविश्व __
___ हाच आनंद आहे ना तुझा?
मग बये,
मुळीच फुंकर घालू नकोस त्या क्षतांवर
भूतदया म्हणूनही.
उलट तुझं माझ्या दुःखातून आकारलेलं सुख __
अबाधित राहावं म्हणून ____
___ रंध्रारंध्राना रक्तकळ्या फुलवीन मी!
रोमारोमाला एकेक अश्रुपिंड निर्माण करीन माझ्या ___!!
कारण तुझ्या सुखासाठीच माझ्या बये,
__ मी नावाच्या कुडीत मनःपूर्वक प्राण फुंकला ___
__ कोणा एका कातर विवक्षित क्षणाने!!
बये __ प्रीतीचा क्रूस पाठीवर अन
स्मृतीचे तुझ्या कफन पांघरून
आहे दुरूनच तुझ्यावर नजर रोखून
मी एक वेडागबाडा.
माझ्यातून ठिबकणाऱ्या रक्तठशांना
तुझ्याविषयी विलक्षण ममत्व,
त्या पायघड्यांवरून तू बिनदिक्कत ___
___ चालत जा .......!
कारण तुझ्यासाठीच अंथरलेत
मी ते रक्तगालिचे.
तुझे मखमल मृदू पायतळ जपण्यासाठी
पण तरीही कधी ठेचकाळलीस
तर त्या रक्तठशांतून बिंदूबिंदूत ___
__ उमलतील वेदनांची अश्रूपिंड
अन कळवळून हुंकारतील ते
___ बये, हळू चाल ग, हळू चाल .... !!!
बाप रे !
ReplyDeleteआशाजी आभार.
ReplyDeleteअप्रतिम.. खुप सुंदर..
ReplyDelete