जाता जाता एक नजर इथेही........

Friday, April 10, 2009

निवडणुका अन हक्काचे बकरे

निवडणुका येऊ घातल्यात, सगळीकडे प्रचाराची एकच धूम उडाली आहे. निवडणूक हा शब्द कानी पडला की मला धडकी भरते. आता कुठे पाठवणार ह्या विचाराने झोप उडते. का? अहो, आम्ही सरकारी नोकर ना. कशासाठीही अन कितीही वेळ कामाला लावता येतात. पुन्हा इलेक्शन ड्युटी करत नाही असे म्हणण्याची सोय नाही. त्यासाठी इतकी नाटके होतात की त्यापेक्षा आलीया भोगासी असावे हजर म्हणणे परवडले. बरे ह्या निवडणुकांना काही वेळकाळाचे बंधन राहिलेले नाही. जरा कुठे खुट्ट झाले की पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे सरकारे कोसळतात, म्हणजे पाडली जातात. आधीच देश झालाय कर्जबाजारी त्यात दररोज नवीन बोजा पडतो आहेच, त्यात ही भर. त्यातून उन्न्ती होईल का? कसचे काय राव, स्वत:चे खिसे फाटतील इतके भरले की पुन्हा नवीन इलेक्शन. की पुन्हा तुंबडी भरणे चालू. जमलेच तर गेला बाजार आपापला तालुका/गाव सुधारायचे. काम कमी डंका पार दिल्ली हादरवतोय.

सतरा वर्षांच्या नोकरीत लोकसभेची सहा इलेक्शन्सस झाली. ( ८४-८५, ८९, ९१, ९६, ९८ अन ९९ ) भरीत भर राज्यसभा अन विधानसभा आहेतच जोडीने. थोडक्यात जितकी वर्षे नोकरी तितक्या इलेक्शन ड्यूट्या. चुकून एखादे वर्ष कारभार थंडा पडलाच तर सेन्सस ड्युटी येतेच. ही सेन्सस ड्युटी म्हणजे एक महिना उन्हातान्हात वणवण करायची. बरे ती येतेही बरोबर मे महिना किंवा ऑक्टोबरचा मुहूर्त साधून. आपल्या घराजवळचा एरिया मिळावा तर एवढे नशीब कुठे आपले. निदान सेंट्रलला राहत असू तर त्याच लाइनवर मिळावी, पण छे. हमखास वेस्टर्नला धाडणार तेही एकदम डेन्स पॉप्युलेशन मध्ये. म्हणजे सकाळी साताला घर सोडायचे ते रात्री आठपर्यंत परतायचे. तहान-भूक सोडाच पण बाईमाणसाने बाथरुमला कुठे जायचे?

कुणाचाही दरवाजा ठोकला आणि माहिती विचारायला सुरवात केली की इतके धमाल अनुभव यायचे. काही लोकांना वाटायचे आले काहीतरी विकायला, की ते एकदम हडहड करायला लागत. मग त्यांना सगळे रामायण समजवायचे, त्यावर त्यांचे गोंधळलेले प्रश्न येणार. एकदा का खात्री पटली की हे सरकारी काम आहे की नको इतकी माहिती पुरवणार. काही वेळा लोक वसकन अंगावर येत, " वेळ नाय आता, आम्ही काय तुमच्यासारखे रिकामे नाहीत. या नंतर मग बघू. " असे बोलून तंबाखू दाढेखाली भरून चेहऱ्यावर मग्रुरी ठेवून नुसते उभे राहत पण दोन ओळींची माहिती देत नसत. कधी कधी काही घरात छान स्वागत होई. चहा-पाणी विचारीत. बाथरुमची सोय होई. क्वचित गरम गरम उपमा/पोहे असेही आग्रह करून खायला देत. पण हे भाग्य फारच कमी ठिकाणी लाभे.

ज्या लोकांना ही ड्युटी आलेली नसे त्यांची ठाम समजूत होती की, काय मजा आहे ह्यांची. ऑफिसला यायला नको, कामही करायला नको. एकदोन घरी जाऊन आले की मस्त आराम. असे कोणी बोलले की आमच्यासारखे पोळलेले लोक लागलीच, पुढच्या वेळी माझ्या जागी तू जा आणी घे मजा करून असे म्हणत. लेको, ही एवढी प्रचंड लोकसंख्या घरी बसून मोजली जाते का? वनवास नुसता.

इलेक्शन ड्युटी ही दोन दिवसांची असे. आदल्या दिवशी चारच्या आसपास बूथवर सगळ्य़ांनी जमायचे. बहुतेक शाळाच असे. आपला वर्ग शोधून काढायचा, सगळा जामानिमा तयार करायचा. ढिगाने पाकिटे बनवावी लागत. सरकारी काम म्हणजे कागदी. काहीही झाले की चार कागद तयार की भर पाकीट. साधारण तीन/चार क्लार्क, एक/दोन शिपाई, एक इन्स्पेक्टर आणि एक ऑफिसर. शिवाय दोन किंवा चार पोलीस, मोठ्या मोठ्या बंदुका घेऊन. त्यांचा उपयोग शून्य पण शोभा वाढे. एरिया फारच तापलेला असेल तर मग ह्या ताफ्यात अजून चारदोन डोकी वाढत. त्याने प्रथमदर्शनी सरकारी माणसे जास्त गर्दी करून राहिलीत ह्यापलीकडे काही साध्य होत नसे. जेवढे उमेदवार उभे असतील तेवढ्यांचे रापलेले पित्ते डोकावतं. उगाच काहीतरी हास्यविनोद करीत अन लक्ष आहे आमचे असे सुचवून जात. आम्हाला नेहमीच प्रश्न पडे की आम्ही ह्यांच्यावर लक्ष ठेवायचे की ह्यांनी आमच्यावर. कधी कधी जरा अतिरेकही घडत. घरी जाताना उद्या काही विपरीत तर घडणार नाही ना ह्या शंकेने जीव अर्धमेला होऊन जाई.

पहाटे उठून भराभर आवरून वेळेवर बूथ गाठावा लागे. नशीब फारच चांगले असेल तर तासाभराच्या आवाक्यात नाहीच तर फरफट आहेच. बूथ गाठला की मात्र सकाळी आठ ते नऊ हा वेळ शांतता असे. तयारी जय्यत ठेवल्याचा फायदा होई. हळूहळू रांगा लागत. आजूबाजूला प्रचारक असतच. प्रसंगी दमदाटी, ओरडाही ऐकू येई. मध्येच स्वतः एखादा उमेदवार बूथवर येऊन धडके. मग आणिक गोंधळ. लोकांशी नमस्कार चमत्कार करून त्याची गाडी आमच्याकडे वळे. मोठ्यांनी खोटे हसत, " अरे यांना चहापाणी दिले का नाय़? आपली माणसे आहेत, नाश्ता-जेवण सगळे नीट होऊ दे. " की कलटी मारत. प्रत्यक्षात ह्यातले काहीच येत नसे. आम्ही आपापले डबे आळीपाळीने खाऊन घेत असू. दुपारचा वेळ पुन्हा थोडी शांतता. अन शेवटचे दोन तास कत्तलचे असत. लोकही दिवसभर कंटाळत बसून राहतात अन नंतर एकदम हातघाईवर येतात. ह्याच वेळात हुल्लडबाजीही होते.

एकदा असेच चार वाजून गेले होते. मोठ्या रांगा लागलेल्या. मतदानाचा जोर सकाळपासून होताच. चार पेट्या सील करून झालेल्या. तीन टेबलवर होत्या अन एकदम गलका झाला. चार/पाच जण घुसले. हातात ही मोठी मोठी हत्यारे. आमची तर बोबडीच वळली. आमच्या साहेबांना धमकावायला सुरवात केली. पेट्या सील का केल्या? माज आलाय का रे तुला xxx? वोटींग करीत असलेली मंडळी गेली पळून राहिलो आम्ही. ना पळू शकत ना काहीप्रतिकार करू शकत. बोंबाबोंब ऐकून पोलीस आले तोवर साहेबाला अन शिपायाला धक्काबुक्की झालीच. पोलिसांना ढकलून ते गेले पळून. पुन्हा काही घडलेच नाही अशा थाटात वोटींग झाले सुरू. त्यादिवशी सगळ्या पेट्या सील करून कलेक्शनची गाडी येईपर्यंत आम्ही सगळे जीव मुठीत घेऊन कामे करीत राहिलो. रात्री दहाच्यानंतर गाडी आली, घरी पोचेतो कॅलेंडरवर तारीख बदललेली होती.

छोट्यामोठ्या घटना नेहमीच घडत. एकदा का तुम्ही ड्युटी केलीत की पुढे हे सरावाचे होऊन जाते. फार तर काय हाणामारी. अगदी वाईट म्हणजे जाळपोळ. सुदैवाने मुंबईत तरी एवढ्यावरच भागतेय. काही वेळा साहित्यिक लोकांची भेट होई. कधी कधी आर्टिस्ट लोक येत. दहा मिनिटे मजा चाले. प्रथमच मतदानाला येणाऱ्या पोरांची गंमत असे. लाथ मारीन तिथे पाणी काढीन अश्या आवेशात मतदान करीत. काही लोक दोन वेळा येत अन हुज्जत घालत बसत. हे माझे नाव नाहीये, मी आलोच नव्हतो, दुसराच कोणीतरी आला असल माझ्याऐवजी. कधी चालता येत नाही अशी म्हातारी माणसे खुर्च्यानवर आणली जात. मग हे उमेदवारांचे पित्ते सरसावीत मदतीला, नुसता सावळा गोंधळ माजे. काही लोकांना कोणाला मत द्यायचे हे कळत नसे ते आम्हांलाच विचारत. काही सरळ सांगत शंभर घेतलेत अमुकवर शिक्का मारण्यासाठी पण मारणार मात्र दुसऱ्यावरच. कधी कधी तर दोघातिघांकडून पैसे, साड्या/भांडी घेतलेले असे अन मग हे लोक येऊन सगळ्या उमेदवारांवर शिक्के मारून ठेवत. अन गालातल्या गालात हसत निघून जात.

हे काम कटकटीचे आहे ह्यात दुमत नाही. तरीही ते कोणीतरी करायला हवेच. सरकारी नोकरांनो निदान तेवढे तरी करा अशी उपहासात्मक अपेक्षा. पण म्हणतात ना जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे, असाच प्रकार आहे. सरकारी नोकर नेहमी काम करतातच हो फक्त लोकांना ते पटत नाही. चालायचेच.

4 comments:

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !