नोव्हेंबर पंचवीस पासून हिमाने नुसते गोठवून टाकलेय. गवत, जमीन कशी दिसते हेच मी विसरून गेले आहे. बर्फाने मनसोक्त दंगा घातला आहे. रोज नित्यनेमाने तो पडतो. कधी मोठाले पुंजके तर कधी अखंड भुरभूर. कधी बारीक बारीक तडतड आवाज करत नाचणारे खडे तर कधी इतका सुळसुळीत राडा की अर्धा क्षण जरी चित्त ढळले तर कपाळमोक्षच. माझ्या घरामागे जवळपास चार पाच मैलाचे मोठे रान पसरलेले आहे. ऑक्टोबर मध्ये एकदा का पानगळती होऊन झाडांच्या संपूर्ण काड्या झाल्या की या रानाच्या घेराचा अंदाज येतो. एरवी भंडावून सोडणारे ससे, खारी, वक्तशीर ऑफिस टाइम नेमाने पाळणारी बदके, त्यांची पिलावळ, निरनिराळे पक्षी आणि अखंड बागडणारी फुलपाखरे, गोगलगायी, चतुर नुसती रेलचेल असते. मधूनच हरणांचे मोठाले कळप अगदी घरासमोर येऊन उभे राहतात. लक्ष नसले तर आपलीच घाबरगुंडी उडावी इतकी शूर झालीत हरणे. थंडीची चाहूल लागताच हरणे सोडून सगळे कुठेशी दडी मारून बसतात. एकतर एकही पान नाही. साधारण उणे १० फॅ. पासून अधिक २४ फॅ यात फिरणारे तापमान जवळपास साडेतीन महिने ठाण मांडून बसलेले. मार्च महिना सुरू झाला की पारा मधून मधून ३२ फॅ च्या पुढे मधूनच मुसंडी मारून सरकतो. रात्री पुन्हा हिम त्याला पकडून कुडकुडवते. त्यांचा हा खेळ अगदी एप्रिल संपेतो मनसोक्त चालतो.
थंडी तिचा गुणधर्म सोडत नाहीच. जितके शक्य होईल तितके ती तुम्हाला गोठवून टाकतेच. सूर्य कधी पाहिला होता हे आठवावे लागेल इतके प्रचंड दिवस झालेत. सूर्य नाही म्हणजे जिवंतपणाचा मागमूसच नाही. त्यामुळे येणारा असह्य व अशक्य कंटाळा, अनुत्साह. हाडे फोडणारी थंडी, बेपत्ता सूर्य म्हणजे डिप्रेशनची पर्फेक्ट रेसिपीच. अगदी ओकाऱ्या होतील इतके घुसमटवणारे, मनाला गारद करणारे हे चार महिने सुसह्य करायचा प्रयत्न करणे आणि या थंडीचीच मजा घ्यायला सुरवात करणे ( हे मात्र कितीही प्रयत्न केला तरी मनापासून साधतच नाही... ) एवढेच काय ते हाती उरते.
झाडाझुडपांचे वेड अतिरेकी असल्याने आपल्याकडची अनेक सुवासिक झाडे मी कुंडीत लावलेली आहेत. वर्षातले सात महिने ती मला घरात ठेवावी लागतात. कटकट होतेच. संपूर्ण स्वयंपाकघर फक्त झाडेमय होऊन जाते. पुन्हा झाडांबरोबर असंख्य किडे घरात येतात, ती वीण वाढतच जाते. ते कमी की काय म्हणून येताजाता घरातल्यांचे टोमणे ऐकावे लागतात ही अजून एक भर. घर आहे का झाडेखाना? किती छांदिष्टपण गं तुझा.... पण हौसेला कटकट होतच नाही आणि त्यातून हे असे सुंदर फुल उमलले की सगळी मेहनत सार्थकी लागते. पंधरा दिवसांपूर्वी बाहेर १२-१४ फॅ तापमान असतानाही जास्वंदीचे फूल हसले. भरपूर कळ्यांनी हे झाड लेकुरवाळे झाले होतेच. पण मनात धाकधूक होती, कदाचित आत झिरपणाऱ्या थंडीने झाड कळ्यांना टाकून देईल. दोन तीन गळून गेल्याच मात्र या कळीने जिद्द धरलेली. खिडकीतून अहोरात्र दिसणारे बर्फ पाहत ही खुदकन हसलीये. हिच्या उमलण्याने खूप दिवसांनी मन उत्साहाने भरून गेलेय. आता लवकरच हे दुष्टचक्र संपेल आणि पुन्हा एकदा हे रान फुलापानांनी, पक्षांच्या चहकण्याने भरून जाईल. आसमंतात आनंद ओसंडून वाहू लागेल.
बर्फाचे फोटो काढत होते तर अचानक ही खारूताई माझ्याकडे वळून बघत बघत सुर्रकन पळाली ती थेट झाडावर. तिच्या मागे मी तिचे फोटो काढायला गुडघाभर बर्फातून लगबग केली. ती पठ्ठी एका जागेवर बसेल तर ना. तरीही काही फोटो काढलेच. शेवटी शेवटी ती फांदीला लटकून मस्त झोके घेत होती. ती छबी काही खूप छानशी हाती नाही लागली पण तरीही मी फोटो टाकलाय.
निसर्ग त्याचा कुठलाच गुणधर्म सोडत नाहीच. सगळेच भरभरून देण्याचा अखंड प्रयत्न. आता अचानक ठरलेल्या मायदेशाच्या भेटीत सूर्याची थोडी किरणेच बॅगेत भरून आणावी म्हणतेय.
खारूताई खूप छान आहे ग तुझी! पिवळे जास्वंद नक्कीच तुझ्या मनाला आनंद देत असणार. बर्फातही फुलेझाडे फुलवून आनंद घेणारी तू. तुझे कौतुक आहे मला भाग्यश्री!
ReplyDeleteफोटो छान आहेत..अगदी दोन हिवाळ्यापर्यंत आम्ही पण असेच कुडकुड आणि बर्फमय असायचो त्याची आठवण झाली...अर्थात थंडी अजून आहेच आणि बर्फाची झालर इथेही आहे पण तरी सुटलो बाबा अस वाटतंय ग...
ReplyDeleteतुझी जास्वंद काय मस्त आहे ग...
मायदेश दौऱ्यात खूप मज्जा कर...थोडी जास्तीची सूर्यकिरणे आणून इथेही पाठव...:)
थोडंसं ऊन पाठवून देऊ का इकडून तुझ्यासाठी? ;) इथे ऑलरेडी उन्हाळा जाणवायला लागलाय.
ReplyDeleteदर थंडीत सगळ्या झाडांना वेळेवर घरात घ्यायचं, उन्हाळ्यात पुन्हा बाहेर म्हणजे खरंच कसोटी आहे ग ... मस्तच फुललीय पण तुझी जास्वंद. खारुताईचे फोटो पण छानच.
ते टेबल एकदम आयसिंग केलेल्या केकसारखं दिसतंय :)
:D वाचायला सुरुवात केली तर असं वाटलं की जशी काही सीतामायच सांगतेय वर्णन त्यांच्या 'जंगल ट्रीप'चं! :p हरणं वगैरे! कुठल्याही हरणाच्या मागे धावू नकोस गं बये!
ReplyDelete:) छान आहेत फोटो आणि खारूताई तर गोडच! :)
अभिप्रायाबद्दल अनेक धन्यवाद रोहिणी. खूप आनंद वाटला तुला पाहून. :)
ReplyDelete” कोणी सूर्य देता का सूर्य ’ असे म्हणत फिरावे अशी स्थिती आहे खरी. :D
ReplyDeleteधन्यू गं अपर्णा. :)
गौरी, मेरे मन की बात भांप ली हैं तुमने. खरेच दे पाठवून. :)
ReplyDeleteअगं आणि दर उन्हाळ्यात नवीन भर पडते ती वेगळीच. :D थडीत कुंड्या उचलून उचलून जीव जातोय. हौसेला श्रमही जाणवत नाहीतच. :)
धन्यवाद गं.
अनघे, अगं इथे अनेकदा सोनेरी ठिपक्यांची हरणेही येतात. पॅटिओच्या काचेला तोंड लावून आत पाहत उभी राहतात. :)
ReplyDeleteहा हा... सीतामाय. :D एक बरेय बाबा, इथे फक्त रामच आहे. ना रावण आहे ना लक्षुमण. तेव्हां नो प्रॉब्लेम. :D:D
आभार्स गो. :)
अगं ते फोटो इशानला दाखवले गं आत्ता... कार्ट निघालय तुझ्याकडे... आणि खारूताई पाहून गौराई ही :)
ReplyDeleteजिद्द गं त्या जास्वंदाची अनं तुझीही.... सुंदर
दिसतेय ते....
सगळेच फोटो सुंदर गं तायडे... आपण ना उन आणि बर्फ याची वाटावाटी करूया... हम तुम्हे उन देंगे तुम हमे बर्फ दो... :)
मनही निसर्गाचा एक भाग.. त्याचीही किमया असतेच सोबत, पण ती फारशी लक्षात येत नाही आपल्या!
ReplyDeleteश्री,थोडं पाठवु का ऊन इथुन....कशी जगत आहेस ह्याच पुर्ण अंदाज आला....तुझे स्वयंपाकघर पाहुन आश्चर्यच वाटले..तुझी फुलझाडांची हौस ब्यारीच काय काय करत बसतेय गं...जास्वंद मस्त सुरेख दिसतयं...अमेरीकन खारुताई..डॉलर आंटी सारखी डॉलर खारुताई...:P येताना घेउन ये तीला पण सोबत...
ReplyDeleteसहाव्वा फोटो मस्त..हमारा तो विचार नेक है..तुम सुनाओ अपनी...:P
काही दिवस सुटी या पासून.. :) थोडे दिवस तरी सुटका होईल .
ReplyDeleteएक प्रश्न:-०( हसायचं काम नाय! आधिच सांगतोय)
दिवसभर अशा वातावरणात घरी करतेस तरी काय??
तन्वी, दे गं इशान-गौराला पाठवून. मस्त लोळतील बर्फात. :)
ReplyDeleteकाश ऐसा हो सकता... ये उन और बर्फ की बाटाबाटी में कही बाढ आ जाती... :D:D
ये मी नाय तुझे आभार मानणार यापुढे. उगाच काहीही म्हणजे... :)
सविता, म्हणूनच म्हटलेय ना," मन चंगा तो कठौती में गंगा " :)
ReplyDeleteमी रोज या झाडांचे कौतुक करते, गोंजारते, बोलते त्यांच्याशी तर सगळे मला हसतात. मी नाही लक्ष देत. :)
उमा, अगं इतकी हौसेने जमवलीत ही सगळी. मग आलेच की त्यांचे बाळंतपण मागोमाग. :D
ReplyDeleteअगं,तू उकाड्याने हैराण होऊ लागली आहेस ना म्हणून तो टेबल टॉप खास तुम्हारे लिये! :)
धन्यू गं.
महेंद्र, हो रे. थोडी सुटका. मी येईन तोवर पालवी फुटायला लागलेली असेल.
ReplyDeleteमी काय करते... भेटले की पाढा वाचते. बाकी सध्या थंडी में बंडी चा कारखाना लय जोरात आहे. :D:D
आभार्स!
सोनेरी ठिपक्याची हरणं :-)ती पण खर्री खुर्री !
ReplyDeleteमाझी आजपर्यंत ’सोनेरी ठिपक्याची हरण” ही एक कवि कल्पना आहे असा समज होता:(
एक हरण घेऊन ये येतांना.
बाकी पोस्ट एक दम भन्नाट!
जियो!
अडाणी दादा
भानस :) फोटो गोठवून टाकणारे; पण तुझे लिखाण ऊब देणारे आहे...
ReplyDeleteछान फोटो अन जास्वंद पण छान ..
ReplyDeleteअरुणदादा, ही हरणे मुळीच गोजिरवाणी वगैरे दिसत नाहीत. धिप्पाड आणि धाडसी... :( आपल्या सगळ्या कल्पना ढुस्स होतात.
ReplyDeleteबोलतेच रे तुझ्याशी. :)
धन्यवाद!
आभार्स रे श्रीराज. :)
ReplyDeleteधन्यवाद BB, :)
ReplyDeleteश्रीताई,
ReplyDeleteएकदम मस्त गं... छानच वाटलं सगळे फोटो पाहून.. अन त्यावर तुझं लिखाण.. सुभानल्लाह!! :)
thanks re Vidyadhar :)
Deleteछान पोस्ट आणि फोटोही...
ReplyDeleteThank you Deven
Delete