जाता जाता एक नजर इथेही........

Saturday, June 6, 2009

ऑफिसला जाणारी आई


काल संध्याकाळी जुने फोटो काढून बसले होते. आम्हा दोघांचे लहानपणापासूनचे, मग बाळाचे. कालची पोस्ट लिहिताना मनात बरेच तरंग उठले. त्या आठवणींचे भागीदार बरेच आहेत पण ते हजारो मैलांवर. मात्र त्या क्षणांना कैद करून तितक्याच ताकदीने पृष्ठभागावर आणणारे हे मूक साक्षीदार. अगदी रमून गेले होते तोच नवरा आला. " काय गं, जमिनीवर फतकल मारून बसलीस अगदी. एवढी तल्लीन कशात झाली आहेस? पाहू दे. " तो हे बोलत असताना पोराचा एक फोटो हाताला लागला. हातात घेऊन म्हटले, " आठवते तुला? हा पोर म्हणजे..... "

सगळीच मुले मातृभक्त असतात. आमचे पोर अपवाद नाहीच, आई, आई आणि आई. जेवढा वेळ मी घरात असेन तेवढा सगळा वेळ हा मुंगळ्या सारखा चिकटलेला. साडीचा पदर, नाहीतर ओढणी घट्ट हातात धरून मी जशी फिरेन तसे हा माझ्या मागे मागे. पोळ्या करत असेन तर पायांना पाठ बनवून बसे नॉनस्टॉप लाडे लाडे बडबड करत असे. ऑफिस, ट्रेनप्रवासात फुकट जाणारा अमूल्य वेळ आणि घरचे काम निपटताना माझ्या बाळासाठी फारच थोडे तास दिवसाकाठी मिळत. आपण पोराला पाळणाघरात सोडून जातो ही जीव कुरतडणारी खंत सगळ्याच आयांसारखी सदैव मला छळत असे.

आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो त्यावेळी पोरगा तीन वर्षाचा होता. गेल्या गेल्या त्याला नव्यानेच सुरू झालेल्या वागळे बाईंच्या नर्सरीत घातले. पहिले तीनचार दिवस ओठ हिमटून थोडेसे मुसमुसून तो रुळला. थोड्याच दिवसात रडू पळाले आणि त्याला मजा येऊ लागली. होता होता डिसेंबर महिना आला. वागळेबाई म्हणाल्या आपण गॅदरिंग करायचे. मुलांना गॅदरिंग म्हणजे काय हे कळत नसले तरी काहीतरी गंमत करायची एवढे समजले. वेषभूषा स्पर्धा आणि अल्पोपाहार असा आटोपशीर कार्यक्रम योजला. जवळ जवळ ७५/८० मुले स्पर्धेत भाग घेणार. प्रत्येकाला पाच मिनिटे असे ठरले. तरीही एकूण चार/पाच तास मोडणार हे गृहीत होतेच. एवढा वेळ मुले तग धरणार नाहीत त्यामुळे थोडाफार गोंधळ होणार हे सगळेच जाणून होते.

आमच्या घरात पोराने काय पार्ट करावा यावर जोरदार चर्चा सुरू झाली. थोडे काहीतरी हटके करावे असे माझ्या मनात होते. तेवढ्यात नेहमीप्रमाणे पोरगं माझी ओढणी गुंडाळून घेऊ लागले. नवऱ्याला म्हटले अरे आपण ह्याला ऑफिसला जाणारी आई करूयात का? सगळ्यांना पसंत पडले. पोराला नटून घ्यायची हौस होतीच, शिवाय ओढणी गुंडाळायची, सावरायचीही सवय होती. ठरले. आता प्रश्न होता की त्याबरोबर बोलण्यातून, देहबोलीतूनही ऑफिसला जाणारी आई, तिची लगबग व्यक्त व्हायला हवी होती.

पोराला लाडीगोडी लावत विचारले, " शोमू, तू छान छान ऑफिसला जाणारी आई होणार ना? " त्याने माझ्याकडे पाहून अगदी गोड हसून म्हटले, " म्हणजे, मी दररोज तू आलीस की ' तू ' बनून फिरतो तेच ना? " " होरे राजा, अगदी तेच. आणि मी सकाळी तुला कधी कधी खोटे खोटे ओरडते ना, अरे शोमू आटोपले का तुझे? चल चल लवकर, नाहीतर माझी लेडीज स्पेशल चुकेल हं का. आणि मग साहेब रागावेल तुझ्या ममाला. बस हेच तिथे बोलायचे. हे म्हणताना खांद्यावर पर्स अडकवायची, चपला घालायच्या घड्याळ हाताला बांधायचे. आणि घरातून बाहेर पडायचे."

त्याने अगदी लक्षपूर्वक ऐकून घेतले. आणि सगळे कळल्यासारखे माझ्या गालांवर हात घासत विचारले, " ममा तू खूश होशील ना मी असे केले की? मग मी करेन. " आणि माझ्या गळ्याला घट्ट मिठी मारून बसला. चला फारशी चर्चा होता हे ठरले, आता दररोज प्रॅक्टिस सुरू झाली. रात्री जेवणे झाली की दोन-तीन वेळा थोडे उंच आवाजात, घाई असल्यासारखे बोलणे, बोलताना पर्स, चपला, घड्याळ घालणे आणि घराबाहेर पडणे अशी प्रॅक्टिस होऊ लागली. दोन दिवसातच शोमू चुकता सगळे करू लागला. आठ दिवसात त्याला नटवून, ओढणी साडीसारखी नेसवून, मंगळसूत्र, कुंकू कानातले म्हणून टिकल्या लावून एक मोठी रिहर्सल घेतली. मस्तच केलेन त्याने. चला, सुटलो .

पाहता पाहता शनिवार उजाडला. सकाळी दोन वेळा सगळे करवून घेतले. काहीही विसरला नाही. आम्ही सगळे एकदम निर्धास्त झालो. चार वाजता हॉलवर पोचलो. छोटी छोटी मुले निरनिराळ्या वेषात इतकी गोड दिसत होती की ह्यांनी काहीच केले नाही आणि नुसतीच मिरवत राहिली तरीही सगळे खूश होणार होते. कार्यक्रम सुरू झाला. पोर कोणाचेही येऊ दे स्टेजवर प्रत्येक आईबाबाच्या डोळ्यांत आपलेच पोर असल्यासारखे कौतुक दिसत होते. कोणी धीटपणे बोलायचे, कोणी चुणचुणीतपणे शिकवल्यापेक्षा वेगळेच काहीतरी करून हशा पिकवायचे. कोणी ओठ काढत नुसतेच कावरेबावरे भाव आणून उभे राहायचे. फोटोंचा चकचकाट एकीकडे होत होताच.

शोमूचा नंबर आला. स्वारी खुशीत होती. मी होतेच त्याच्याबरोबर. त्याचे नाव घेतले, तसा मला टाटा करून अगदी ऐटीत स्वारी गेली आणि स्टेजचा सेंटर गाठला. माइक समोर होताच. हॉल ठासून भरलेला होता. इतकी गर्दी त्याने कधीही पाहिली नव्हती. एकदम भांबावला. मागे वळून मला शोधू लागला. मी खुणेनेच त्याला कर ना असे म्हटले. तसे त्याने उंच आवाजात सुरवात केली, " अरे शोमू, आटोपले का तुझे?..... " सुरवातीचा पर्फेक्ट लागलेला आवाज चार शब्दांतच चिरकला, डोळे पाण्याने भरले आणि त्याने जो गळा काढला.... मी पळतच त्याच्याकडे गेले. डोळे पुसून म्हटले, " हे बघ मी तुझ्या शेजारी उभी राहते, मग करशील का तू? " मला माहीत होते घरी गेले की हा खूप रडेल की मी स्टेजवर जाऊन काहीच करून दाखवले नाही म्हणून. त्याचा आत्मविश्वास मला घालवायचा नव्हता.

मला चिकटून त्याने सगळे छान करून म्हणून दाखवले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, स्वारी एकदम हरखून गेली. घरी गेल्यावर त्याची दृष्ट काढून झाल्यावर प्रत्येकाला पुन्हा पुन्हा विचारत राहिला, " मी रडलो म्हणून रागावलात का तुम्ही? नंतर मी केले ना सगळे छान. म्हणजे मी आईचा लाडूक बाळ आहे ना?" सगळे जण नक्की कौतुक करत आहेत ही खात्री झाल्यावर दमून गाढ झोपला. अर्धवट झोपेत चालू होतेच, "चल रे लवकर, माझी लेडीज स्पेशल....... ."

8 comments:

  1. किती गोड पोस्ट आहे! खूप क्यूट! :)
    आणि तुमचा शोमू तर कसला क्यूट दिसतोय!!

    ReplyDelete
  2. हसु आवरत नाही आहे...फारच छान लिहीले आहे..आणि हो मुलाचा फोटोपण मस्त आहे...

    प्रसाद - http://prawas.wordpress.com/

    ReplyDelete
  3. यशोधरा, प्रसाद धन्यवाद.:)

    ReplyDelete
  4. फारच छान! त्याचा फोटो इतका छान वाटतोय की आधी मला मुलगीच वाटली :)

    ReplyDelete
  5. पोस्ट उघडतांच फोटोवर नजर गेली.मला वाटलं तो तुझाच लहानपणीचा फोटो असेल.पण... तो शोमू आहे हे वाचलं आणि आधिकच मजा वाटली.गेल्या महिन्यातच मी शोमूला भेटलो तेंव्हाचा शोमू आठवला. त्याच्या दिसण्यांत अजूनही तसा कांही फरक नाही.पण त्याची ही छबी मस्तच!
    तुझा ब्लॉग तू फार छान चालवते आहेस. जियो.

    ReplyDelete
  6. अरुणदादा,तू नुकताच शौमित्रला भेटल्यामुळे तुला अजूनच मजा वाटली असेल.:) आभार.

    सखी, अग लहानपणी हे असे नटून फिरत असल्याने बरेच जण फसत.:) धन्यवाद.

    ReplyDelete
  7. अगं हा शोमुचा फ़ोटो आहे का? कित्ती गोड दिसतोय....बरेच दिवस ठरवत होते शेवटी आता ही पोस्ट वाचायला वेळ मिळाला..मस्त झालीय....मी पुन्हा एकदा मुलगी मिस करतेय....

    ReplyDelete
  8. धन्यवाद अपर्णा. दुधाची तहान ताकावर भागवायचा प्रयत्न.:)

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !