लोकल, म्हणजे विविधतेचा मुक्त खजिना. मी सदैव माणसांमध्ये रमणारी. ठराविक गाड्या, त्यामुळे अनेक तऱ्हांनी ओळखी. ब्रिजवरून धावता धावता दृष्टीस पडणारी नेमकी माणसे. डब्यात तर, नुसते डोळ्यातून दिसणारे..... आलीस का? ह्म्म... काही हात उंचावून दखल घेणारे. मैत्रिणींच्या मैत्रिणी.... अग आज शालीनि दिसत नाहीये. न विचारताच माहिती पुरवणारे. काही न बोलणारे पण जागा देणारे. एखादे दिवशी माझ्या सुंदर साडीवर, ती कशी खुलतेय अंगावर.... लांबूनही मस्त गं अशा खुणा करणाऱ्या सख्या. ओळखही नसताना दोन सीटच्या मध्ये उभे असताना लांब शेपटा हातात घेऊन, " किती सुंदर आहेत गं केस तुझे, टिप्स दे ना. " असे अगदी सहजपणे विचारणाऱ्या. आवर्जून दोन शब्द तरी बोलणारच अश्याही सख्या..... ह्या हरस्वभावाच्या सख्यांनी मला भुरळ घातली. त्यांच्या मूडनुसार बरे-वाईट अनुभव दिले.
ह्यातच एकदा तीही मला सापडली. ठाण्याला नेहमीप्रमाणे फास्टवरून स्लोवर पळवले, बरं अनॉन्समेंट तरी लवकर करावी. पण छे! तसे केले तर रेल्वेच्या कुळाला बट्टा लागेल ना. सगळे जीव घेऊन पळत होते, माझीही भर त्यात. स्लोपवरून उतरून वळले आणि गाडी हालली. मागचा लेडीज फर्स्ट उतरले की अगदी समोरच असतो पण माझी चलबिचल झाली. पकडू का नको, स्पीड जरा जास्तच वाटला. तेवढ्यात तिने हात पुढे केला आणि मला कळायच्या आत मी तो धरून गाडीत चढलेही होते. " काय घाबरली होतीस ना? नशीब माझा हात धरलास नाही तर गेलीच होती तुझी गाडी. " असे म्हणत ती मस्त हसली. काही माणसे संसर्गजन्य रोगासारखी असतात. हसली, बोलली कधी कधी तर नुसते त्यांनी पाहिले तरी आपल्यात उतरत जातात. तशीच तीही होती. मुलुंड येईतो आम्ही दोन-चार वाक्यांची लेन-देन केली, मग तिला टाटा करून मी आत वळले.
तीही ठाण्याचीच असल्याने मधून मधून सकाळची भेट व्हायची. ओळख थोडी वाढली. कोणाच्याही खाजगी आयुष्यात स्वतःहून डोकावण्याचा माझा स्वभाव नाही. मला कुतूहल जरूर असते, परंतु त्यांच्या कलाने. कित्येक ओळखी वीसपंचवीस वर्षांच्या तरीही फक्त नावाचाच परिचय. ही ही त्यातलीच. गळ्यात मंगळसूत्र होते म्हणून लग्न झालेले आहे असे वाटे. अर्थात ते केवळ आधारासाठी घातलेलेही असू शकते. हसतमुख. एकदा अचानक तिने मला विचारले, " ए सुख म्हणजे काय गं? आहेस का तू सुखी? " इतका अनपेक्षित प्रश्न..... मी गडबडलेच. " काय गं, आज काय सकाळी सकाळी माझी खेचायचा विचार आहे का? " जोरात हसून म्हणाली, " विचार कर..... तुझ्या तोंडून हो नाही आले. का? दिवसभर विचार कर... उत्तर मिळालेच तर दे स्वतःला. तुझ्या डोळ्यात मला दिसेल उद्या ..... " गेलीही उतरून, मला प्रश्नार्थक करून.
आता सुख म्हणजे नेमके काय हे मला कधीही समजलेले नाही. मला तर छोट्याश्या गोष्टींमध्येही प्रचंड सुख दिसते. कदाचित म्हणूनच नवरा नेहमी बोंबलतो, " अग मिलियन डॉलरची लॉटरी लागल्यासारखा आनंद झाल्यासारखी वागतेस, मग देव म्हणतो अरे आहेच की हिच्याकडे, आणि जातो पुढे निघून. " आता बोला. मी दिवसभर परीक्षेतल्या कठीण प्रश्नासारखी उत्तर शोधत राहिले. शेवटी विचार केला तिलाच विचारूया तू सांग, सुखी आहेस का ते?"
दोन दिवसांनीच भेटली मला पण संध्याकाळी. जोराची सर आली म्हणून टिपटॉपचा आडोसा व छान छान ढोकळा वगैरे चे वास घेत मी उभी होते. तर बाजूलाच ही. मला बघून डोळे मिचका वत मिष्किलपणे म्हणाली, " काय सापडले का सुख? " अर्धवट भिजलेल्या आम्ही दोघी, धुवांधार कोसळणारा पाऊस, पेट्रोलमिश्रीत मातीचा गंध त्यातच हा अन्नाचा सुगंध...... तिचे ह्या पावसाच्या थेंबासारखे माझ्यात झिरपणारे हसू.... सटकन, शब्द गेले तोंडातून, " हे काय, मूर्तिमंत सुख उभे आहे माझ्यासमोर. " " आयला, तू तर माझीही आई निघालीस. चल मस्त कॉफी पिऊ. " असे म्हणत मला ओढतच निघाली.
ए के जोशीच्या कॉर्नरच्या उडप्याकडे बसून नखशिखान्त भिजलेल्या आम्ही दोघी समाधी लावल्यासारख्या तल्लीन होऊन पाऊस पाहत कॉफी प्यायलो. एरवी फारच उडती गाणी वाजवणाऱ्या उडप्यालाही आज ....... लपक झपक तू आरे बदरवा.... लावायचा मोह झालेला.......
फारच छान..कुणीतरी बरोबरच म्हटले आहे.."सुख शोधायचे नसते..ते तुमच्या समोरच असते..ते प्रत्तेक गोष्टीमधे असते..फक्त ते तुम्हाला बघता आले पाहिजे.."
ReplyDeleteसुंदरच जमलाय लेख . माझी एक छोट्टिशी कवितुली आहे.
ReplyDeleteसुख कशाला म्हणायचं
काय आहे त्याची परिभाषा
जे काय आपल्या बरोबर घडतंय
आजकाल जे कांही मिळतंय
तेच बरं तेच सुख आशा
मला तुझा आता हेवा वाटायला लागला आहे :)
ReplyDeleteकिती छान लिहिला आहेस हा लेख तू!. अगदी थेट त्या वारावरणात घेऊन जातो हा लेख. नॉस्टॅल्जिया या शब्दाला मराठीत जे काय म्हणतात ते हे असे.
अशीच लिहिती रहा.
प्रसाद, अनेक धन्यवाद. तयारी कुठवर आली?:)
ReplyDeleteआशाताई, सुरेख आहे कविता.आभार.
अरुणदादा, तुला आवडले ना, बरं वाटलं. धन्यवाद.
तयारी??.अहो मी बॅग कधीच भरुन ठेवली आहे..बस!! ३० तारीख उजाडायची बाकी आहे..:-)
ReplyDeletemast aahe...barech diwasat comments takata nahi aale...aaj jara nivant vel milala...sagale lekh vachate aata...
ReplyDeleteतन्वी, मायदेशात गेल्यावर इतकी गडबड असते की खरेच फार कमी वेळ मिळतो.:) प्रवास झाला ना मस्त?:)
ReplyDeleteआभार.
भानस........
ReplyDeleteही पोस्ट अगदी भन्नाट जमली आहे. अखेरचा परिच्छेद वाचताना पाऊस निरखण्यात हरवून गेलेल्या चेहरा न दिसणाऱ्या दोन सख्या डोळ्यांसमोर उभे राहिले आणि कानांवर शब्दांचा रुणझुण स्वर पडला. वा अगदी मस्त.....अस्सल कोल्हापुरी भाषेत....नाद खुळाच...
प्राजक्त...:), आभार. ’ नाद खुळा ’ शब्द बोलतात हे सांगणारे...... :)
ReplyDeletechaan aahe post...wegli swatala wichar karayala lawnari...kharach sukh sukh kashat asata nakki asa aapan wichar karto ani mag ekhadya diwashi itar weli lakshat na aalelya goshti pan khup jaast anand deun jatat...
ReplyDeletewow this is such a beautiful post. Got to learn a new marathi word - nakhshikhant! :)
ReplyDelete