जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, June 24, 2009

कतरा कतरा मरत राहतो.....

अव्याहत लोकलने प्रवास करणाऱ्या विविध वयोगटात लहान मुलेही असतातच. काही मुले अगदी वयाच्या पाच-सहा वर्षापासून वस्तू विकतात काही गाणी म्हणतात तर काही भीक मागतात. सकाळपासून रात्रीपर्यंत लोकल हेच त्यांचे जीवन असल्याने लवकरच ही सगळी मुले अनेक वाईट प्रसंगांना सतत सामोरे जाऊन जाऊन मुर्दाड बनतात. सगळ्यांचाच जीवनप्रवाह अतिशय वेगाने चाललेला असल्याने धड स्वतःकडे, स्वतःच्या घरच्या माणसांकडेही पाहायला पुरेसा वेळ नसलेले आपण अशा मुला-मुलींकडे पाहून जीव कितीही तुटला तरी हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. शिवाय ह्यांची संख्या इतकी प्रचंड आहे की तुम्ही धुळीच्या लाखांश कणाइतक्या जीवांना मदत करायचे ठरवले तरीही ते जमणार नाही. मग कधीतरी उगाच गरज नसतानाही त्यांच्यातल्या कोणाकडून काही विकत घे. गाणाऱ्या पोराला पैसे दे किंवा दररोज स्टेशनवर दिसणाऱ्या बहीण-भावंडांना कधीतरी खायला दे.... बस. आपली धाव इथपर्यंतच.

सतत लोकांकडून उपेक्षा, अपमान, मारहाण सहन करत करत साधारण दहा ते सोळा वर्षे वयात जेव्हा ही मुले पोचतात तेव्हा यांच्यात एक लक्षणीय बदल दिसून येतो. कमालीची बेफिकिरी, उद्दामपणा, जगाला फाट्यावर मारण्याची वृत्ती. चुकून जर कोणी त्यांना थोडी जरी आपुलकी दाखवायचा प्रयत्न केलाच तर ते त्यांना सोसत नाही. त्रास होतो. मनात असंख्य भोगाचे ज्वालामुखी धुमसत असणारी ही पोरे याच वयात दुसऱ्यांना त्रास कसा देता येईल हे शोधत राहतात व त्याची मजा घेतात. क्रिया-प्रतिक्रिया या नियमाने ह्या क्रियेचे पुढचे परिणामही असतातच...

संध्याकाळच्या स्लो लोकलच्या प्रवासात असाच एक अनुभव घेतला. साधारण चौदा-पंधरा वर्षाचा पोरगा दररोज आमच्या ट्रेनला परेलला चढायचा. परेलला गाडी पोचेतो लेडीज डबा ठासून भरलेला असतो. त्यात दरवाज्यातच उभे राहणाऱ्या काही ठराविक मुली-बायका असतात. दादरच्या तुफान गर्दीला तोंड देण्यासाठीची स्ट्रॅटेजी परेलपासूनच आखलेली असते. दररोजचे प्रवासी हे अलिखित चढण्या-उतरण्याचे नियम कधीच मोडत नाहीत. पण कधी कधी या अशा मुलांमुळे घोळ होतात. गेले काही दिवस दररोज हा घोळ सुरू होता.

परेलहून गाडी सुटली जरासा वेग पकडला की हा मुलगा कुठूनतरी धावत यायचा व तीन पैकी एक दरवाजा पकडायचा. तीनही दरवाज्यातील बायकांना हे माहीत झालेले असल्याने त्याला चढायला न देण्याचा जोरदार प्रयत्न त्या करत पण तो सगळ्यांना पुरून उरे. कारण एकच.... त्याला त्याच्या जीवाची क्षिती नव्हती पण बायकांना होती, एका निर्णायक क्षणी तो पडेल असे वाटून त्या त्याला आत घेत. तो हे बरोबर जाणून होता. हे जोवर इथवर होते तोवर बरे होते. हळूहळू त्याने खोड्या काढायला सुरवात केली. मुद्दामहून घाणेरडे बोलायचा, भांडण काढायचा.... कधी उतरताना-चढताना कोणाला तरी मारायचा......

काही बायकांनी त्याला ताकीद देऊन पाहिली, एकदोन जणींनी पोलिसांना सांगू म्हटले. दररोज भांडण होत होते. या साऱ्या प्रकाराची तो मजा घेत असे आणि ती स्पष्ट चेहऱ्यावर दिसत असे. मी तुम्हाला इतका छळतोय पण तुम्ही माझे काहीही वाकडे करू शकत नाही.... असे आठदहा दिवस गेले. एक दिवस तो असाच चढला..... दरवाज्यात उभे असलेल्या एकीशी भांडण उकरून काढले. ती पटकन त्याला म्हणाली, " तू फार माजला आहेस. अजूनही वेळ गेली नाहीये. हे चाळे बंद कर. नाहीतर फार महागात पडेल. " हे ऐकून त्याने अजूनच उद्दामपणे... जा जा क्या करोगी तुम..... वगैरे बडबड सुरू केली. त्यादिवशी तेवढ्यावरच भागले.

दुसऱ्या दिवशी परेलला हा चढला. लटकत होताच. एकीकडे कुठलेतरी हिंदी गाणे म्हणत होता..... सायन स्टेशन दिसू लागले..... आणि अचानक याचा चेहरा वेदनेने पिळवटल्यासारखा झाला. मधल्या पॅसेजमध्ये आम्ही बऱ्याच जणी त्याच्या समोर उभो होतो आम्हाला कळेचना की याला काय होतेय. अन तो जोरात खेचला गेला. तो प्लॅटफॉर्मवर जोरात आपटल्याचा आवाज आला. पाच सेकंदात गाडी थांबली. पाहिले तर एक जबरदस्त दणकट स्पेशलवाला अक्षरशः लाथांनी ह्याला तुडवीत होता. या मुलांना हे असे स्पेशलवाले, पोलीस लांबूनच ओळखता येतात. याने त्याला पाहिले पण एकतर हा बाहेर लटकत होता शिवाय गाडीचा स्पीड जास्त असल्याने उडी मारणे शक्यच नव्हते.

दररोजच्या त्रासाला कंटाळून कोणीतरी कंप्लेट केली होती. असेही पोलिसांचे लक्ष असते असे ऐकून होते..... हा स्पेशलवाला दोन-तीन दिवस याच्या मागावरच होता. या मुलाचा बंदोबस्त करायला हवा होताच हे खरे असले तरी सिंगल फसली असलेल्या पोराचे एकही हाड जागेवर राहिले नाही इतका मारलेला पाहून फार त्रास झाला. पुढे किती महीने..... हा मुलगा अंथरुणावर.... रस्त्यावर खितपत पडला असेल.. जन्माचे पंगूपण आले असेल..... याच्या जन्मापासून सुरू झालेले असे बेवारस जिणे आता अजूनच लाचार झाले...... हे असे करोडो जीव..... वर्तुळ कुठे-कसे सुरू होते..... मात्र सुरू झाले की त्यातला प्रत्येक बिंदू ठसठसत राहतो...... कतरा कतरा मरत राहतो.....

5 comments:

  1. एकदा सौ. च्या मागे मालाडला एक माणुस चढला. लेडिज फर्स्ट क्लासचा डबा, त्यामुळे फारशी गर्दी नव्हती. त्याने चक्क पर्स मधे हात घातला. इतर बायका पहात होत्या पण कोणिही काहीही बोललं नाही. सौं ने जेंव्हा आरडा ओरड केली तेंव्हा डब्यातल्या बायकांनी त्याला मागे ढकललं .. आणी सौ ची सुटका झाली.
    हा माणुस चांगला चाळिशीचा असावा. पोलिस कम्प्लेंट लिहिली पण नंत दुसऱ्या दिवसापासुन तो परत दिसला नाही स्टेशनवर!

    मुलांचं तर ठीक, पण हे गर्दुल्ले फार वाईट, यांना ना आपल्या जिवाची पर्वा, ना तुमच्या.. थोड्या पैशाकरिता काहिही करु शकतात हे लोकं. आपणंच सांभाळून रहावं झालं.!

    ReplyDelete
  2. बापरे!! खरं तर लेडिज फर्स्ट्च्या ह्या अटिट्युडला वैतागून मी शेवटची दोन वर्षे सेकंडने जात होते.्बरं निदान सौ ने आरडा ओरड केल्यावर तरी मदतीला आल्या.
    हे गर्दुल्ले फार वाईटच असतात...
    आभार.

    ReplyDelete
  3. रात्री,सकाळी,दुपारी अशा वेगवेगळ्या वेळेत गाडीत चढणारी ही मुलं वेगळी असतात. त्यातल्या अगदी रात्रीच्या सुमाराला चढणा-या मुलांकडे पाहून जीव कासावीस होतो. कारण भूक तोंडावर मी म्हणत असते तरी सोबतच्या एखाद्या बाईबरोबर काहीबाही विकत फिरत असतात. अशावेळी जवळ बिस्कींटाचा पुडा, किंवा काही असेल आणि आपण पुढे केलं की ते उपासमार करुन त्यांचं जगणं पाहणंच अस्वस्थ करतं.

    ReplyDelete
  4. होय गं सखी.... फार त्रास होतो.
    आभार.

    ReplyDelete
  5. Thank god I do not have to travel by train

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !