
आमच्या एकूण तीन चाळी होत्या. ' अ-ब-क '. ' ब व क ' च्या मध्ये म्युनिसिपालिटीची शाळा होती आणि त्यांचे प्रचंड मोठे मैदान होते. त्या मैदानाची पलीकडची भिंत म्हणजे ' क ' चाळ. तिचे प्रवेशद्वार दादासाहेब फाळके मार्गावर होते. आम्हा ' अ-ब ' वाल्यांनचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर. म्हणजे एकंदर व्याप्ती लक्षात आली असेलच.

एका कोपऱ्यात मोठी देवी व चढाओढीने सजावट असे. रांग लावूनच दर्शन मिळे नाहीतर एकदम लांबून रस्त्यावरून घ्यावे लागे. प्रसादात विविधता असे. पेढे, केळी, सफरचंदे, खोबरे-खडीसाखर दररोज. कधी रेवड्या व लाह्या. क्वचित कधी प्रसादाचा शिरा, कधीमधी ड्रायफ्रूटसही असत. हे दहाही दिवस कबड्डीच्या जोरदार मॅचेस चालत. शिवनेरी मंडळ - बहुतेक हेच नाव होते. ह्या कबड्डीच्या मॅचेस बघायला प्रचंड गर्दी असे. आम्ही तर बरेचदा खाली उभे राहायलाही जागा नसल्याने आमच्या गच्चीतूनच पाहत असू. अनेक संघ, त्यातले चांगले खेळाडू, काही अतिशय लाडके, नावानिशी अनेक वर्षे आम्हाला पाठ होते. मुले व मुली तितक्याच ईर्ष्येने लढत. त्यावेळच्या मानाने मोठीच बक्षिसे-पहिले रु.१०,००० , दुसरे ७,५०० व तिसरे ५,००० असत. ह्या सामन्यांची पूर्णं वर्षभर लोक वाट पाहत इतके ते लोकप्रिय होते.
ह्या मॅचेस संपल्या की लागलीच रात्रीच्या सिनेमासाठी लोकांचे जागा धरणे सुरू होई. काही जण दगड ठेवीत. आता दगड एकासारखे अनेक असत. मग हा माझा दगड आहे आणि तो मी ठेवल्याने ही माझी जागा आहे.... ही भांडणे दररोज चालत. काही जण सूम मध्ये दुसऱ्याचा दगड काढून तिथे आपला वेगळाच दगड ठेवीत आणि आधीचा दूरवर कुठेतरी फेकून येत. मग दाखव ना, कुठेय तुझा दगड यावरून बाचाबाची सुरू होई. काही आपल्या सगळ्यात धाकट्या पोराला ( चक्क लहान मुलांनाही बसवून, किंवा पटकुरावर टाकून जाणारे लोक होते ) तिथे दामटून बसवीत. ते पोर बिचारे रडून, चेहऱ्यावर अश्रूचे ओघळ सुकवीत तिथेच गाढ झोपी जाई. मात्र सिनेमा सुरू झाला की डोळे फाडून बघायला तयार.

सिनेमेही अगदी ठराविक. काही दरवर्षी हवेच ह्या सदरातले. मराठीमध्ये- ' थांब लक्ष्मी कुंकू लावते ' ' मुंबईचा जावई ' आणि दादा कोंडके यांचा एकतरी सिनेमा असेच. हिंदी मध्ये ' दिवार , जंजीर, त्रिशूल, यादों की बारात, गॅंबलर, कहानी किस्मत की, मुक्कदर का सिकंदर, जमीर, परवरीश, फकीरा..... ' हे असे ऑल टाइम हिट सिनेमे असत. कमीतकमी चार तास हे सिनेमा प्रकरण दररोज रात्री चाले, त्यामुळे आजूबाजूला चाटच्या गाड्या, बुढ्ढीके बाल, चणेशेंगदाणे, गोळावाले, बुर्जीपाव.... असे अनेकविध प्रकार थोरांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना खुणावत राहत. दहा दिवस बक्कळ पैसा कमावीत हे सगळेजण. काही लहान मुले-नुकतेच विड्या फुकायला लागलेले, अंधाराचा व गर्दीचा फायदा उठवून अगदी आई-बापाच्या समोरही विड्या फुंकत.

शेवटचे दोन दिवस आनंदमेळा भरे. तिन्ही चाळीतल्या बायका उत्साहाने भाग घेत. वडापाव, भेळ, सँडविचेस, निरनिराळी भजी, इडली-वडा चटणी, समोसा-चाट, फालुदा..... अहमिकेने स्टॉल्स लागत. गंमत म्हणजे संपूर्ण नायगाव, दादर भागात अतिशय प्रसिद्ध असलेले हे मंडळ असल्याने कितीही मोठ्या प्रमाणात पदार्थ बनविले तरीही अवघ्या दोन तासात कुठल्याही स्टॉलवर काहीही शिल्लक नसे. अष्टमीला बायकांचे मोठे हळदीकुंकू असे. नथ, भरपूर दागिने, मोठे अंबाडे त्यावर कलाबुतीची वेणी, सुंदर ठेवणीतल्या झुळझुळीत सिल्क साड्या नेसून लगबगीने मिरवत. लहान मुली, खणाचे परकर पोलके, गळ्यात मोठ्या मोत्याच्या माळा, पायात छनछन वाजणारे पैंजण व गजरे घालून ठुमकत असत. मन लावून ओट्या भरल्या जात. संपूर्ण आसमंत सण असल्याची साक्ष पटवत राही.
नवरा घाटकोपरचा रहिवासी. त्याचे , आमचे कोणाचेही बाबा ह्या असे सिनेमे पाहण्याच्या अतिशय विरोधात होते. नवरा संध्याकाळी सात वाजल्यापासून काकांच्या मागे( वडील ) भुणभूण सुरू करीत असे. " प्लीज ना काका, सगळे जातात. मलाही जायचेय. जाऊ द्या ना. " दर दहा-पंधरा मिनिटांनी पुन्हा सुरू. सिनेमा रात्री दहाच्या आसपास सुरू होत असे. नवऱ्याचे मित्र सारखे खालून शिट्या मारून मारून येतोस ना विचारत घिरट्या घालत असत. तो तो जीव खालीवर होई. सततची भुणभूण ऐकून एकदाचे वडील हो म्हणायचे. पण तोवर बरेचदा सिनेमा सुरू होऊन जाई.
एकदा असेच बराच वेळ तंगवून वडील एकदाचे हो म्हणाले. एक क्षणही घरात न थांबता नवरा व त्याचे तीन मित्र पळतच निघाले. पडदा खूप मोठा असल्याने लांबूनही सिनेमा दिसत असे. टिळक रोडच्या चौकात चारी रस्ते बंद करून सिनेमा चालत असे. जंजीर सुरू होता. छोटा अमिताभ फटीतून फक्त ती घोड्याची चेन पाहतो हा शॉट सुरू होता. रस्त्यावर ठार अंधार त्यात प्रचंड गर्दी. गर्दीत एकमेकापासून हरवू नये म्हणून नवरा व त्याचे मित्र एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून पडद्याकडे पाहत चालत होते. अचानक धप.... आवाज आला, तो विरायच्या आत दुसरा आवाज, तिसरा आणि चौथाही.


हा!!हा!!..सही..मी सुध्दा याच्यावर पोस्ट लिहीणार होतो..आमच्या गावी पण अशीच धमाल होत असे..पोस्ट छान झालाय..:-)
ReplyDeleteआमच्या इथे पण गणपतीचे चार पाच दिवस रोज सिनेमा असायचा.अर्थात जे तुम्हीलिहिले आहेत तेच सिनेमे असायचे. एकदा अलबेला पण दाखवला होता. देवानंदचा नौदोग्यारह पण पाहिल्याचा आठवतो. पण अमिताभचे सिनेमे अगदी हमखास असायचे. आणि उरलेले दिवस ऑर्केस्ट्रॉ... मज्जा यायची.. आवडलं पोस्ट.s
ReplyDeleteप्रसाद, महेंद्र धन्यवाद.
ReplyDeleteखरेच मजेचे दिवस होते,:)