जाता जाता एक नजर इथेही........

Monday, June 1, 2009

सेंग-चना ...

माझे बालपण नायगावच्या टिपीकल चाळीत गेलेले आहे. माणसांचे विविध प्रकार, सगळ्याच अर्थाने अगदी जवळून पाहिलेत. बहुधा तिथेच मला माझ्या आकलनशक्तीनुसार माणसांना वाचण्याचा छंद म्हणा, वेड म्हणा लागले असावे. जात्याच काही गुण आणि अवगुणही आपल्यात असतातच. थोडीशी संधी सापडली की लागलीच ते त्यांचे अस्तित्व दाखवतात. ह्याच चाळीत परिस्थितीच्या चटक्याने पोळत असूनही चांगुलपणा टिकवून असलेली व सारे काही चांगले असूनही जन्मजात दुष्ट प्रवृत्तीचे लोकही पाहिले. हळूहळू ह्यातले काही लोक तुमच्या भेटीस आणते. त्यासाठी एक लेखमाला सुरू करायला हवी. त्यात पहिला मान ह्याचा, मनात खास स्थान घेऊन बसलाय असा.

चाळ म्हटली की सकाळपासून फेरीवाले, भाजीवाले, भंगारवाले अनेकविध लोकांचा राबता. सगळ्याच जीवनावश्यक गोष्टी. चार मजली चाळीतले कोणीनकोणी कुठल्या न कुठल्या वाल्याची वाट पाहणारे होतेच. आम्हा मुलांची अगदी ठरावीक विकणाऱ्यांमध्ये गुंतवणूक. त्यात अग्रक्रमी होता हा सेंग-चनेवाला भैय्या. आम्ही मुलेच नाही तर मोठी माणसेही ह्याची वाट पाहत असत.

साधारण दुपारी अडीचच्या आसपास हा येई. आठवड्याचे पाच दिवस तर आम्ही शाळेत असल्याने हा आमच्या नजरेस पडत नसे. परंतु शनी व रवी हे दोन्ही दिवस अक्षरशः ह्याच्या वाटेकडे आम्ही सगळे डोळे लावून बसत असू. भरपूर नीळ घातलेला पांढरा स्वच्छ लांब बाह्यांचा थोडा ढगळ शर्ट, त्याखाली तेवढेच शुभ्र धोतर. मुळचा गोरा रंग उन्हात फिरून रापलेला. व्यवस्थित विंचरलेले केस, त्यावर टोपी. कपाळावर उभे शेंदुरी रंगाचे गंध व पायात जाड वहाणा. अंगकाठी बारीकात मोडणारी. अत्यंत प्रसन्न चेहरा. नुसते त्याच्याकडे पाहूनच पाहणाऱ्याच्या मनात मृदू, निर्मळ भाव जागे व्हावेत असे एकंदर त्याचे व्यक्तिमत्त्व होते.

पाठीवर कंतानाच्या तीन मोठ्या पिशव्या असत. एकात खारे व गोडे शेंगदाणे व चणे भरलेल्या अशा तीन वेगवेगळ्या पिशव्या असत. दुसऱ्यात फक्त चुरमुरे व साळीच्या लाह्या. आणि तिसऱ्यात अनेक गोष्टी- शेव, खारी मुगाची डाळ, काळे फुटाणे, हिरवे मसाला लावलेले वाटाणे, चना चोर गरम, मसालावाले शेंगदाणे, क्वचित गाठ्या, पापडी असे. हे सगळे छोट्या छोट्या पिशव्यांत ठासून भरलेले. उन्हाळयाच्या सुट्ट्यांमध्ये हमखास बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची व लिंबूही आणत असे.

बहुतांशी फेरीवाले अत्यंत भसाड्या स्वरात ओरडत. त्यातही अनेक तऱ्हा होत्या. ह्याचे सगळेच सौम्य. जीना चढून आले की लागलीच एक तबकडी होती. तिथेच मध्यभागी दोन मोऱ्या होत्या. माझ्या पाहण्यात त्या मोऱ्यांच्या नळांना कधीही थेंबभर पाणी आलेले नाही. अनेकविध गोष्टींसाठी त्यांचा उपयोग केला जात असे. फेरीवाल्यांचे आवडते ठिकाण होते. मोऱ्यांच्या कट्ट्यावर पाट्या ठेवून सगळा धुमाकूळ चालत असे. हा मात्र चुकूनही त्या मोऱ्यांच्या आसपासही फिरकत नसे. बहुतेक ह्याच्या अत्यंत स्वच्छ व नेटकेपणात त्या मोऱ्या बिलकूल बसत नव्हत्या. आला की तबकडीत पाठीवरच्या पिशव्या उतरवून अगदी मंद स्वरात " सेंग-चना " अशी हाळी घालत असे. पुन्हा दोन मिनिटाने दुसऱ्यांदा. संपले पुन्हा एकदाही तो मी आलोय ह्याची वर्दी देत नसे.

इतक्या हळू आवाजात घातलेली ही हाक अगदी कोपऱ्यातल्या घरातले कानही बरोबर टिपत असत. दुसरी हाळी घालायच्या आधीच चोहोबाजूने हा घेरला जाई. आमचे घर तबकडीला लागूनच असल्याने पहिला नंबर आमचा. आई बरोबर असेल तर मग तो काही विचारीत नसे. पण जर आई नसेल तर मात्र शेंगदाण्याची पुडी भरता भरता हळूच विचारी, " बेटा, माँजी को पुछा हैं ना? नही तो पुछके आवो. मैं रुकता हूं. " आम्ही लागलीच सांगत असू, " हो हो आईला माहीत आहे, दे पटकन. " की तो तोंडभर हसून आणिक दोनचार दाणे वर टाकून दहा पैशांची पुडी आमच्या हातात देत असे.

उन्हाळ्यात सगळी पोरे घरात असल्याने ह्याचा कोरड्या भेळीचा धंदा जोरदार होई. पोर घेरून असली की हा एकदम खूश असे. कधी कधी तर शेंगदाणे घेतले की मूठभर चणे हातावर ठेवी. असेही चाळीत येणाऱ्या फेरीवाल्यांमधला हा आवडता व सगळ्यात जास्त खप असणारा होता. धुवांधार पाऊस असो की कडक ऊन असो ह्याची वेळ कधी चुकली नाही की ह्याच्या वेषात, मृदूपणात बदल झाला नाही. माझ्या आठवणीत दहा-बारा वर्षे मी तस्साच त्याला पाहिला.

अनेक लोक उधारी ठेवत. काहीवेळा आई झोपली असेल तर आम्हीसुद्धा पैसे नंतर देऊ असे सांगत असू. हा कधीच कोणाला नाही म्हणत नसे. ह्याला चोपडीत उधारी लिहून ठेवतानाही पाहिल्याचे मला आठवत नाही. सगळा कारभार तोंडी आणि उधारीची नोंद मनात. अनेकवेळा लोक उधारी बुडवत. त्याला सगळे माहीत असूनही पुन्हा तो त्या लोकांना उधारीवरच शेंगचणे देत असे. आई त्याला म्हणे, " अरे, तुला पण घर, बायको-पोरं आहेत ना? मग कशाला असे करतोस? लोक फसवतात तुला हे कळतंय तरीही पुन्हा त्यांना माल देतोस? " त्यावर तो हसून म्हणे, " माँजी, सब अपनेही हैं। अभी कोई बच्चे कहते हैं ममीने बोला है दे दो, बादमें पैसा लेके जाना। फीर उनकी माँजी आके कहती हैं, ना रे ना मैंने नही बोला था। अब पैसा मैं नही दुंगी। अभी आपा ही बोलो, उन बच्चोंको मै कैसे नाराज करू? मेरे बच्चों जैसेही तो हैं वो भी। कोई बात नही। उपरवाला करवांके लेता हैं सब, मैं तो सिर्फ आदेश का पालन करता हूं। " आई म्हणे , " खरे आहे बाबा, तुझ्यासारखीच देव तुला फसवणाऱ्यांनाही चांगली बुद्धी देवू दे म्हणजे बरे. "

आम्ही चाळ सोडली त्याच्या दोनतीन दिवस आधी हा आला होता. त्याला म्हटले , " चाल्लो रे आम्ही. आता आपली भेट कधी होईल ना होईल. " त्याने भर्रकन दोन मोठे पुडे भरले आणि एक माझ्या व एक भावाच्या हातात ठेवून मायेने डोक्यावर थोपटत म्हणाला, " याद करना कभी कभी, सदा खूश रहना." त्याच्या डोळ्यात पाणी तरळत होते. आम्हालाही भरून आले होते. एका फेरीवाल्याने पाहता पाहता आम्हाला प्रचंड जीव लावला होता व आम्हीही तितकेच प्रेम त्याच्यावर करत होतो.

आजही इतकी वर्षे लोटूनही मला तो सगळ्या लकबींसह जसाच्या तसा दिसतो. बरेच वय झाले असेल आता त्याचे. वाटते मायदेशात येईन तेव्हा कुठूनतरी फिरून तीच अत्यंत मृदू साद, " सेंग -चना........ " कानावर यावी आणि पळत जाऊन मी त्याच्यासमोर उभे राहावे. मला खात्री आहे, वय झाले असले तरीही तो मला नक्की ओळखेल आणि म्हणेल, " अरे बच्चा, आप तो बहोत बडे हो गये। सेंगदाना खाओगे ना?" आणि मी तितक्याच आवेगाने म्हणेन, " तेवढ्यासाठीच तर आलेय ना मी तुला शोधत. दे लवकर. किती वर्षे झाली रे तुझ्या हातचे सेंगचना खाऊन. " आनंदाने डोळ्यातले कढ जिरवत तो भरभर पुड्या भरेल.... अन मी पुन्हा एकदा त्याला नजरेत साठवून घेईन.

4 comments:

  1. खरच खूप छान आहे लेख. माझी मावशी परळच्या चाळीत राहायची. गणपतीला वगैरे आम्ही तिथे हमखास असायचो आणि अधून मधून इतरवेळीही. त्यामुळे जास्त रिलेट पण करता येतंय. अशा जुन्या आठवणी खरच ह्रद्द करणा-या असतात. अशा वेळी वाटतं जे सूख आपल्याला मोठ्या ब्लॉकमध्ये किंवा घरात मिळत नाही त्यापेक्षा जास्त मजा आपण चाळीतल्या छोट्या घरात करू शकलो. एकदम नॉस्टॅल्जिक वाटते. पुढे काही लिहिवत नाही.

    ReplyDelete
  2. खूप खूप आभार अपर्णा. छान वाटलं तू आवर्जून लिहीलस.

    ReplyDelete
  3. खुप छान.... नाही म्हणता म्हणता शेवट वाचताना डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय राहिल्या नाही. Hope you meet him sometime...somewhere...keep up the good work..

    ReplyDelete
  4. धन्यवाद रोहिणी.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !