आई-बाबा, भाऊ व मी जेवायला बसलो होतो. साधारण रात्रीचे नऊ वाजले होते. आईने सुंदर फ्लॉवर, मटार वबटाट्याचा हिरवा मसाला लावून माझा अतिशय आवडता रस्सा केला होता. पोळ्या, वरण-भात, ताक, इत्यादी होतेच बरोबर. रात्रीचे जेवण आम्ही कटाक्षाने एकत्र घेत असू. आम्ही सुरवात केली. आईने पहिलाच घास घेतला आणि दाराची कडी वाजली. त्यावेळी आम्ही चाळीत राहात होतो. तिकडे बेल वगैरे प्रकार नव्हता. आता एवढ्या रात्री कुठला शेजारी डोकावतोय असे वाटून आईने विचारले, " कोण आहे? " बाहेरून आवाज आला, " उघडा बुवा, असेल कोणीतरी. " मी आनंदून म्हटले, " अय्या! आई, हा तर काकाचा आवाज आहे. " पटकन दार उघडले. खरेच की काकाच होता.
काका आत आला. प्रथम स्वयंपाकघर मग बैठकीची खोली. रात्री तीच झोपायची खोली व मागे गॅलरी. असे आटोपशीर परंतु भरपूर सूर्यप्रकाश व हवेशीर असे पूर्व पश्चिम घर होते आमचे. " अरे वा!! अगदी योग्य वेळी आलोय तर मी. " असे म्हणत त्याने बॅग ठेवली. हातपाय धुतले, तोवर आईने भर्र्कन त्याचे पान वाढले व एकीकडे पटकन भाकरीचे पीठ परातीत घेऊन मळायलाही सुरवात केली. त्याला पानावर बसवून तिने सगळे पदार्थ वाढले वतुम्ही सगळे जेवा रे मी आलेच पटकन दोन भाकरी टाकून. भाकरी म्हटल्यावर प्रत्येक जण म्हणू लागला, " ए मला पण हवी गं. " आईने दोन म्हणता म्हणता चांगल्या चार भाकऱ्या केल्या व आम्ही सगळे मस्त गप्पा मारत चांगले तासापेक्षा जास्ती वेळ जेवलो.
तुम्ही म्हणाल ह्यात काय सांगण्यासारखे, पूर्वी हे असे कित्येक घरात नित्यनियमाने घडत असे. बरोबर. पण तुम्ही' पूर्वी ' असे म्हटलेत ना? हेच ते. अचानक काका आला. आईही दिवसभराच्या श्रमाने दमलीच होती. इतके सुंदर जेवण तयार करून पहिला घास घेतेय तोच तिला पानावरून उठावे लागले. नकळत माझ्या मनाने केलेली नोंद आहे ही. कुठेही तिच्या चेहऱ्यावर राग तर सोडाच पण किंचितही वैताग, काय कटकट आहे. सांगून नाही का येता येत. ह्यातला एकही प्रश्न दिसून आला नाही. उलट अगत्यशीलता, आलेल्याला जराही कुठून आलो असे न वाटावे. आमच्याकडे तुझे कधीही स्वागतच आहे हा सहज भाव तिच्या वागण्यातून दिसला. आणि हे मुद्दाम ओढून ताणून नाही. प्रेम होते, आहे ते देहबोलीतून आपसूक व्यक्त होत होते.
आज ही सहजताच हरवून गेलीये. नातेवाईकांकडे जावे असे कितीही वाटले तरी त्यांना प्रथम फोन करायला हवा. आपण अचानक गेलो तर त्यांना आवडेल का? असे अनेक प्रश्न मनात येतात. ठरवून जायचे तर दत्त म्हणून उभे राहून चकित करण्यातली गंमत व आनंद गमावून बसायला होते. आजकालच्या इतक्या धकाधकीच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण चक्रात अडकलेला आहे हे खरेच आहे. पण पूर्वीही सगळे अशा चक्रात होतेच ना? आमचे बाबा तर नेहमीच साईट जॉबवर. सकाळी आठ ते रात्री आठ. लोकलचा परवडला असा तीन चार टप्प्यांचा प्रवास करून काही वर्षे जात होते. घरी आले की नेहमीच आनंदी असत. कधीही जाण्यायेण्याच्या, ऑफिसच्या हाणामारीचा त्रास त्यांच्या चेहऱ्यावर मी फारसा पाहिला नाही. मग आता असे काय बदलले आहे?
मित्रमैत्रिणीनं कडे अजूनही बरेचदा असे उपटसुंभासारखे गेलेले चालते, आवडते. परंतु त्यातही काही वेळा वाईट अनुभव येतात. कधी तोंडावर उघडपणे तर कधी अनुल्लेखाने मारून लोक राग व्यक्त करतात. काही लोकांना वाटते, पाहुणे आलेत म्हणजे आता काहीतरी खायला करा. मग चिडचिडत खायला बनवायचे आणि वाढायचे. हे खाणाऱ्याला दिसल्याशिवाय राहते का? का त्यांना ते दाखवूनच द्यायचे असते?
कधी कधी उपचार म्हणून लोक जेवायला बोलावतात. चार पदार्थ, मोजके बोलणे आणि नेमका वेळ, थोडे इकडे तिकडे झाले की लागलीच त्यांचा तोल ढळतो. त्यापेक्षा कॉफी आणि मस्त मनमोकळ्या गप्पा हे सोपे आहे ना? मन उदास होऊन जाते असे घडले की. कासवासारखे अंग चोरून आपल्याच कोशात सगळे राहू लागलेत. दोन देशी समोर आले तर चुकूनही मनमोकळे तोंडभरून हसणार नाहीत. उलट टाळायचा प्रयत्न करतील. परक्या देशात राहूनही आपल्याला असे करावेसे वाटते म्हणजेच आपण पूर्णपणे एकांडे झालोत का? नको ते पाहुणे आणि नकोच ते अगत्य.
काही घरात स्वतःचे आई वडील आले तरीही चालत नाहीत. अनंत प्रकारे त्यांना पळवून लावण्याचे छुपे प्रयत्न केले जातात. बहुतांशी वय वाढले की अन्न नेहमीच गरम खावेसे वाटते. बरेचदा वयस्कर माणसांना लवकर जेवायचे नसते कारण मग त्यांना रात्री पुन्हा भूक लागू शकते. एकावेळी खूप जेवण जेवता येत नाही त्यामुळे उशिरा जेवले की बरे असते. अशावेळी जर मुलगा म्हणाला, " एकाच वेळी आपण जेवलो तर बरे होईल ना? पुन्हा पुन्हा अन्न गरम करण्यात गॅस फुकट जातो. " आईवडीलांनी काय डोके फोडून घ्यायचे का हे ऐकून. ह्या पेक्षाही वाईट प्रसंग घडतात. का? गेल्या पंचवीस वर्षात आपण खूप तरक्की केली आहे. पण त्याचबरोबर जिव्हाळा, प्रेम, परस्पर संबंध सारे गमावून बसलोय, हे प्रगतीचे, उन्नतीचे लक्षण आहे का?
आपले आईवडील तर असे नव्हते. शिवाय आपल्याला आजोळ, आजी-आजोबांचे प्रेम, सहवासही लाभला. अजूनही अनेक घरांमध्ये एकत्र कुटुंबपध्दती सामंजस्याने नांदताना दिसते. मुले व आईवडील दोन्ही बाजूने असोशीने प्रयत्न केले जातात. कारण एकच, प्रेम आहे. न्युक्लिअर फॅमिली कन्सेप्ट मध्ये आपली मुले आईवडील कधीमधी आलेल्या आजी आजोबांशी कसे वागत आहेत हे नीट ऑब्झर्व करीत आहेतच शिवाय ती अतिशय हुशार आहेत. तेव्हा आपण भविष्यात आपल्यापुढे कुठले ताट वाढून येणार ह्याचाही विचार करायला हवा. संवाद हा इतर कुठल्याही भौतिक गोष्टींचा मौताज नसून त्यासाठी हृदयात प्रेमाचा ओघ जिवंत ठेवला की सगळे सगेसोयरे आपलेच आहेत ह्याची साक्ष मनाला पटेलच.
hmm. Khare aahe. Mee ase achanak pahune miss karate ithe. Amachya ghari sarakhe kunee na kunee asayachech. Agadi ratri ardhvat jhopetun uthun swayampak kelela aathavatoy Aaine. :) Pan hasat hasat. Ani mala yavelee janavale ajunahee tyanche sarvanshee sambandh tasech aahet, kadheehi uthoon janyasarakhe. Majhe matra badalale. :(
ReplyDeleteChal tu anee mee ha payanda padu ya ithe. Kadhee tapakates te saang... ;) Mhanaje na sangata ye.
फ्लो किती सही झालाय या लेखात. काकांबद्दल सांगत होता तेव्हा मी आपसुक लहान झालो.अरे हे तर आपल्याच घरचं चित्र."पूर्वी" या शब्दाने दाणकन आजच्या काळात आणून आपटले.
ReplyDeleteमला वाटतं खरंच असं होत आहे. अगत्य कमी होण्या मागचं कारण काय? घराचे अगत्य मुख्यत: घरातल्या स्त्रीवर अवलंबून असते. (चुकीचं असेल तर सांगा). त्यामुळे आजकालच्या मुली सुना, उच्चा शिक्षण घेउन समाजशीलता विसरल्या आहेत ? असं म्हणता येईल का?
आमच्या घरात अजुनतरी असे अनुचीत प्रकार घडत नाहीत..:-) आजही रात्री बेरात्री आलेल्या पाहुण्यांचे तितक्याच उस्हात स्वागत होते..आणि होत रहाणार आहे..खरच या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत पण त्यानी किती फरक पडतो.. आमची आई अजुनही रोज १-२ पोळी आणि थोडी भाजी काढुन ठेवते..अचानक कोणी आले तर्?...घरात काहीतरी असावे..:-)
ReplyDeleteअसे चांगले संस्कार करणार्या माझ्या आई-वडीलांचा मला फार अभिमान वाटतो..आणि हो या लेखामुळे बर्याच जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला त्याबद्द्ल धन्यवाद!!!
प्रभावित, हो ना गं.त्यांचे संबंध तसेच आहेत अजूनही,पण मला मात्र धाडस होत नाही अचानक कुणाच्याही घरी जाण्याचे. जे काही गिनेचुने लोक आहेत ना माझे त्यात तूही शामील आहेस हे मी मुद्दाम सांगायला नकोच, खरे ना?:) औपचारीकपणे धन्यवाद म्हणत नाही गं.
ReplyDeleteसाधक,हा उच्चशिक्षणाचा परिणाम असेल असं नाही हो वाटत. कारण शिक्षणाने माणूस जास्त प्रगल्भ होतो ना? घड्याळ्याच्या काट्यावर बांधले गेल्याने कदाचित...., कधीकधी घरातल्या कटकटीही..., अनेक कारणे असू शकतील ह्यामागे. मात्र ह्यातून साध्यासुध्या निखळ गप्पाच हरवल्या जात आहेत. अनेक आभार.
प्रसाद, हो रे मलाही आठवते. नेहमी पोळीच्या डब्यात एखादीतरी पोळी, भात-आमटी आई शिल्लक ठेवीतच असे. एवढ्याश्या दोन खोल्यात पाहुण्यांचा प्रचंड राबता होता आमच्या घरात. स्वत:चा मोठा बंगला असणारे आमचे आजोबा चाळीतल्या टिचभर जागेतही अतिशय खूशीत असत. म्हणजे आमच्या आईने किती प्रेम लावले असेल त्यांना. तू म्हणतोस तसेच, अंत्यत विपरीत परिस्थितीतही नाते-मैत्र संबंध जपणार्या आईबाबांचा अतिशय अभिमान वाटतो मला. आभार.
अग हा संपूर्ण सामाजिक दैनंदिन दिनक्रमात बदल झाल्याचा परिणाम आहे.आपल्या आयांपैकी कितीजणी नोकर्या करणार्या होत्या? त्यांचा संपूर्ण दिवस स्वयंपाकघरातच जायचा! आणि आपल्यासारखं त्यांना दिवसभर ऑफिसमध्ये फाईलिंमध्ये डोकं खुपसून , मानेवर खडा ठेवून डेडलाईन्स पाळायची वेळ आली असती तर मला नाही वाटत त्यांच्यातही वेळेवर आलेल्या पाहूण्याची खास सरबराई करण्याची शक्ती राहीली असती.जसा काळ बदलत जातो तसे हे बदल घडत जाणं अपरीहार्य आहे.मला जर मस्तपैकी नोकरी न करता घरी बसायची परवानग़ी मिळाली तर मी रोजच छान छान पदार्थ करुन माझ्या पाक-कौशल्याला दाद देणारा पाहूणा येऊ दे म्हणून प्रार्थना करेन!
ReplyDeleteसोनाली, तू म्हणतेस हे कारण आहे ग. पण कसे आहे ना, ज्यात आपल्याला आनंद मिळतो ते माणूस कितीही वेळ नसू दे, कामाचे फार प्रेशर असू दे, करतोच. मग कधी तरी कोणी आलेच तर थोडासा वेळ आपणही ते Enjoy करावे ना.सरबराई नको पण छान गप्पा. आणि आपल्या आयाही नोकरी करत होत्या, सगळ्याच काही घरात नव्हत्या. असो.
ReplyDeleteबरे वाटले, तू आवर्जून लिहीलेस. आभार.
साधक, आपले दोन्ही ब्लॊग्ज वर जायचा प्रयत्न केला. परंतु....:(
ReplyDeleteभानस,
ReplyDeleteमाझ्या दोन्ही ब्लॉग्स वर एकही पोस्ट नाहीये. मी ब्लॉग फक्त वाचतो. लिहीत नाही. सॉरी.कमेंट टाकायला सोय. म्हणून हे बनवले.
(एक पोस्ट होती ती फार प्रायव्हेट झाल्याने मित्रांनीच उडावयला लावली :D)
छानच जमलाय लेख .मुख्य म्हणजे तुझ्या वयाच्या मुलांना ही जाणीव आहे हे कुठे तरी मनाला सुखवून गेलं.
ReplyDeleteआशाताई, बरं वाटलं तुमचा अभिप्राय पाहून. वाट पहात होते तुमची. :) आभार.
ReplyDeleteसाधक, अरे पोस्ट उडवलीत, ह्म्म...:(