जाता जाता एक नजर इथेही........

Sunday, June 14, 2009

आणि ते मला सोडून गेले...

सकाळी सकाळी फारच गडबड झाली होती. बाई उशिरा आली. तिची वाट पाहत निष्कारण मी पंधरा-वीस मिनिटे फुकट घालवली होती. कणीक भिजवून पहिली पोळी तव्यावर पडली तोच बयाबाई उगवल्या. तिच्या हातात लाटणे देऊन मी भाजीकडे वळले. शेवटी उशीर झालाच. लेडीज स्पेशल जाणार हे दिसतच होते. मन खट्टू होऊन गेले. आज एकीचे डोहाळजेवण होते गाडीत. मला ढोकळा घेऊन जायचे होते. आता कसला ढोकळा आणि कसले डोहाळजेवण. मैत्रिणींना समजेल माझी अडचण पण मी मात्र आनंदसोहळ्याला मुकले.

ऑफिसला तर जायचे होतेच. आवरून निघाले. पाचपाखडीवरून रिक्षा घेऊन नौपाड्याच्या बी-केबिन पाशी आत रिक्षा सोडायची मग तिथून पुढे चालत एक नंबरवर हा परिपाठ. तशीच आजही जात होते. अचानक ठाणे जनता सहकारी बँकेच्या पुढेच असलेल्या होमिओपॅथीच्या (गेल्या वर्षी मायदेशात गेले असताना हे दुकान दिसले नाही. नवीनच कोणीतरी बस्तान बसविले होते.) दुकानाच्या पायऱ्यांच्या बाजूला एक साधारण पासष्ट्च्या आसपास वय असलेले गृहस्थ दोन्ही गुडघे छातीशी घेऊन शून्यात नजर लावून बसलेले. डोळ्यात बिलकूल जीव नाही. काळजात लक्ककन हालले. अरे देवा! हा जिवंत आहे ना? मी अगदी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिले, पण नजर काही हालली नाही.

गुडघ्याला जरासा कळत नकळत स्पर्श केला, " बाबा, बरं नाहीये का? " जरा बुबूळ हालली. आहे, आहे. बरं वाटलं. एकीकडे गाडी पकडायला हवी नाहीतर ऑफिसला लेट मार्क लागणार. पण का कोण जाणे पायच निघेना. अंगावरचे कपडे बरे दिसत होते. एखादे वेळी चक्कर आली म्हणून इथे टेकले असतील तर. " बाबा, घरचा नंबर सांगता का? नाहीतर कुठे राहता ते सांगा, मी नेऊन घालते. " हे ऐकले मात्र, डोळ्यात एकदम राग उतरला, हात झटकत म्हणाले, " तू? तू नेऊन घालणार मला माझ्या घरी? जा, जा तुझ्या रस्त्याने चालू लाग. माझ्या घरचा रस्ता झेपायचा नाही तुला. "

शरीराच्या प्रतिक्षिप्त क्रियेने मी जरासे घाबरून मागे सरले. डोके फिरलेले असले तर माराबिरायचे. हळूच विचारले, " बरं राहू दे. तुम्हाला भूक लागलीये का? " मान जरा जोरातच हो हो म्हणत हालली. मी माझा डबा काढून त्यांच्या हातात ठेवला, " बाबा, मला उशीर होतोय. तुम्ही शांतपणे डबा खा. हे पन्नास रुपये ठेवा जवळ, चहा घ्या आणि रिक्षा करून घरी जा. मी निघते आता. " त्यांनी डबा जवळ जवळ ओढूनच घेतला. हातानेच वर बघता मला नीघ नीघ तू अश्या खुणा करत डबा उघडून पोळीभाजीकडे पाहत नाकाजवळ नेऊन मोठा श्वास घेतला. ते पाहिले आणि मी निघाले.

दिवसभर ऑफिसमध्ये डिपार्टमेंटल परीक्षा असल्याने एक मिनिटही फुरसत नव्हती. डबा नसल्याने सँडविच मागवून खाल्ले. ते खाताना, डबा आधाशीपणे नाकाशी धरणारे बाबा आठवले. कुठेतरी आत बरे वाटले. भ्रमिष्ट झालेले असतील किंवा रागावले असतील तर जरा शांत झाले की जातील स्वतःच्या घरी. नेहमीप्रमाणे दिवस भरभर संपला, संध्याकाळ-गाडीची पकडापकडी, घरचे सगळे आटोपून दहाच्या सुमारास जरा उसंत मिळाली. आईला फोन लावला आणि सकाळी काय झाले ते सांगितले. आई म्हणाली, " बरं केलंस, भूकेजला असेल जीव. गेलेही असतील आता स्वतःच्या घरी. तू नको काळजी करत राहूस. " फोन ठेवला. मनात आलं, तसंच असू दे गं.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठले. आवरून दोन डबे घेऊन निघाले. मनात सारखे देवाला सांगत होते, " आज मला ते दिसू दे नकोत. " रिक्षा सोडली. लांबूनच ते तिथेच बसलेले मला दिसले. म्हणजे गडबड आहे. ह्यांना घरदार नाहीये किंवा आठवत नाहीये. त्यांच्याजवळ जाऊन पोचते तोच, " वाटच पाहत होतो. हा तुझा डबा. घासून ठेवलाय. पोट निवले माझे. त्या तुझ्या डब्याचे ओझे नकोय मला. जीव शिणलाय ओझी वाहून. " एकदम ते गप्पच झाले. डोळे जणू कसलातरी वेध घेत असल्यासारखे. मी डबा पुढे केला, " बाबा, हे घ्या. रात्रभर इथेच होतात का? घर सापडत नाहीये? फोन नंबर?" पुन्हा कालचेच हातवारे करत डबा घेऊन मला त्यांनी जवळजवळ हाकलूनच काढले.

हे सारे बोलणे होत असताना काही ओळखीच्या लोकांनी थांबून विचारले होते, काय? इथे काय करतेस? गाडीही दिसत होतीच, उद्या पाहू असा विचार करत निघाले. आता मला खात्री होती, बाबा उद्या तिथेच सापडतील. तिसऱ्या दिवशी, मी पोचताच त्यांनी डबा दिला हात पुढे केला. " आतड्याची भूक मरतच नाही. सदा वखवखलेली. तुझ्या हाताला चव आहे गं. माझी सुमती..... " आवाज गुदमरला. मी घाईघाईने त्यांना म्हटले, " बाबा , चला उठा इथून. दोन मिनिटांवर एक छोटेसे हॉटेल आहे तिथे बसून कॉफी घेऊया. तुम्हाला बरे वाटेल. मग शांतपणे सांगा मला सगळे. "

त्यांनी ऐकले माझे, आम्ही बसलो जाऊन. हॉटेलवाला थोडासा वैतागला होता त्यांच्याकडे पाहून पण नशिबाने काही बोलला नाही. कॉफी आली. " बाबा, घ्या ना? बरं वाटेल. " त्यांच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागले. त्यांना म्हटले, " मी तुमच्या मुलीसारखी आहे ना? मला सांगा सगळे, काहीतरी मार्ग निघेल. सांगितलेच नाहीत तर मग कसे बरं.... " " मुलीसारखी असशील गं पण मुलगी नाहीस. तेव्हा उगाच नाती जोडू नकोस. सगळे एका फटक्यात गमावून बसलोय मी, जीव द्यायची हिंमत नाही म्हणून दररोज मरत जगतोय. तू नाते जोडून जीवाची काहिली शमणार नाहीच आहे. तेव्हा दूर राहा. पोटाला घातलेस, उपकार झाले. जातो मी." तरातरा चालूही पडले. मी हतबुद्ध तिथेच खिळले.

असेच अजून तीन दिवस गेले. उद्या रविवार. मी कशी जाणार डबा द्यायला. म्हणजे जाऊ शकत नाही असे नसले तरी नेमकी वेळ शक्यच नव्हते. फार बैचेनीत दिवस गेला. सोमवारी पोचले तेव्हा बाबा डबा हातात घेऊन उभेच होते. डब्यांची देवाणघेवाण झाली. आज मुळाशी पोचायचेच असे मी ठरवले होते. " बाबा, काल मला नाही हो जमले यायला. हा डबा घ्या. मी तुमची मुलगी नाही, बरोबर. पण तुमच्या सुमतीकडे मी घेऊन जाईन ना. सांगता का रिक्षावाल्याला पत्ता? "

चक्क हसले, " मला गंडवायला पाहतेस होय. बरं..... चल कॉफी पाज मला." आम्ही गेलो हॉटेलमध्ये. बसताच त्यांनी सुरवात केली, " मी लातूरचा गं. बँकेत ऑफिसर होतो. दोन पोरी, बायको. चांगले हसते खेळते घर होते आमचे. सुमती मोठी पोर हो माझी. असती तर तुझ्याएवढीच ...... भूकंप होतो काय, संपूर्ण घरच गाडले जाते काय. तिघी जणी दगड-विटांत चिणून मेल्या गं. मी नेमका पुण्याला गेलेलो. जगलो. पेपरमध्ये वाचून धावत सुटलो. शवही सापडेनात पटकन. काय सांगायचे पोरी...., अग गेलेल्या जीवाचेही इतके हाल व्हावेत? सभोवताली सगळ्यांची तिच कथा. कोण कोणाचे सांत्वन करणार? टाळके जे सटकले ते दोन वर्षे वेडाच झालो होतो. घर सुटलेच होते आता त्या सरकारने उपकार दाखवत दिलेल्या दाराचा मला काय गं उपयोग? देऊन टाकले एका कुटुंबाला. तेव्हापासून गावोगाव फिरतोय, मरणाच्या शोधात जगतोय. बँकेतून सुटका करून घेतली, होते नव्हते ते पैसे दिले अनाथ आश्रमाला. माझ्या पोरी नाही तर नाही पण दुसऱ्यांच्या टाकलेल्या पोरींना थोडीशी मदत होईल. आता कशाचा मोह राहिला नाही. तू दोन घटका थांबतेस, जेवू घालतेस. मी वाट पाहू लागलो तुझी आताशा. हे बरे नाही पोरी, हे बरे नाही. " पुन्हा तेच, उठले आणि तरातरा निघून गेले.

मी दिवसभरात काही जणांशी बोलून त्यांना कुठे ठेवता येईल का ह्याचा शोध घेत राहिले. माझ्या घरी मी नेऊ शकत नव्हते. पण असे रस्त्यावर सोडूही शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी डबा देताना पाहिले तर बाबा, चांगलेच तापाने फणफणले होते. हे होमिओपॅथिचे दुकान ज्यांचे होते त्या बाई ओळखीच्या होत्या. त्यांच्याकडून औषध घेऊन त्यांना दिले. थोडे लक्ष द्या हो दिवसभरात, पाणी लागले तर जरा...... त्या बरं म्हणाल्या. " बाबा, झोपून राहा बरं का. संध्याकाळी येताना येतेच मी तुमच्याकडे. " विझलेल्या डोळ्यांनी त्यांनी एकटक माझ्याकडे पाहिले आणि हात जोडून कपाळाशी नेत नमस्कार केला. तोंडाने सुखी राहा असे पुटपुटले. " येतेच हं का " असे म्हणत मी निघाले खरी पण मन सांगत राहिले नको जाऊ.

संध्याकाळी येईतो मला साडेसात झाले. बाबा नव्हते तिथे. दुकानात विचारले तर बाई नव्हत्या पण काम करणाऱ्या पोराने डबा एक चिठ्ठी हातात दिली. तिथेच पायरीवर बसून मी चिठ्ठी उघडली. " चि. पोरी, पंधरा दिवस माझ्यासाठी धावलीस. मी खूप प्रयत्न केला गं तुला झिडकारण्याचा पण तू चिवट, पोर झालीस माझी. आज आजारी बाबाला टाकून जाताना तुझी घालमेल पाहिली आणि जाणवले, वेळ आली आता. माझ्या काळजीची भर तुझ्या आयुष्यात नको. तुझ्या हातात अन्नपूर्णा आहे पोरी. जीव सुखावला माझा. आता पुरे. फार दिवस नाही जगायाचो, तुझे देणे होते ते तुझेच खाऊन तुला दुःख देऊन फेडण्याचा करंटेपणा नको आता. सांभाळ, सुखी राहा. "

पुन्हा कधीही भेटण्यासाठी बाबा दूर निघून गेले होते. रिकामा स्वच्छ डबा हातात घेऊन घरचा रस्ता धरला. एक अनोळखी बंध पायाचा आवाजही होऊ देता निघून गेला..... अज्ञाताच्या प्रवासाला.......

(
१९९३ ला झालेल्या किल्लारी-लातूर भूकंपाचा अप्रत्यक्ष बळी, ९८ साली मला भेटले. आता कुठे असतील कोण जाणे.)

9 comments:

  1. हृदय स्पर्शी. एवढं कसं काय जमतं तुम्हाला. अजून माणुसकी शिल्लक आहे यावर खरं तर विश्वास बसत नाही.
    (एक दुरुस्ती,गावाचं नाव किल्लारी आहे)

    ReplyDelete
  2. साधक, नावातली दुरुस्ती केलीये. अनेक धन्यवाद.
    माणुसकी सगळ्यांमध्ये असतेच. मला स्वत:ला अनेक लोकांनी निरनिराळ्या प्रसंगात आपणहून मदत केलेली आहे.:)
    त्या बाबांना दहा/बार दिवस थोडे घरचे जेवण देण्यापलीकडे मी काहीच करु शकले नाही.ना घरी आणले ना सोय लावली.ह्याउलट त्यांनी मदतीचा गैरफायदा न घेता मला त्रास होऊ नये म्हणून निघून जाण्याचा मार्ग पत्करला.असो.आभार.

    ReplyDelete
  3. तुमचा अनुभव मनाला भिडणारा आहे.. ओळख पाळख नसताना एवढी मदत करायला मनाचा मोठेपणा लागतो आणि आयतं मिळत असुन सुद्धा बाबा निघुन गेले हा त्यांचाही मोठेपणाच म्हणायला हवा. Simply Great...

    ReplyDelete
  4. तुमचे मन खरच खुप मोठे आहे. तुमच्या सारख्या लोकांची आज खरच गरज आहे...

    ReplyDelete
  5. रोहिणी, प्रसाद खूप आभार...

    इतके दु:ख सोसूनही एका अनोळखी मुलीला आपल्यामुळे त्रास होऊ नये म्हणून...हा खरा मनाचा मोठेपणा.मी केले ते ओघाओघात त्यांनी केले ते जाणता.

    ReplyDelete
  6. kharach manala bhidale...tumachya baryach post vachun janavate manusaki shillak aahe ajun....

    Tanvi

    ReplyDelete
  7. तुमच्या सारखी मोठ्या मनाची माणसे पहिली कि मला न्यूनगंड येतो... आपण किती खुजे आहोत ते लगेच कळते... GREAT

    ReplyDelete
  8. हर्षल,ओघाने जे जमले ते केले. जी माणसे ह्याही पलीकडे जाऊन करतात ती खरी gr8.
    आभार.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !