जाता जाता एक नजर इथेही........

Wednesday, June 17, 2009

हम भी आपके जहन मे बस गये...

गेल्या दोन वर्षात चार वेळा एकटीने विमानप्रवास केला. मुळात प्रवासाला जायचेय ह्या नुसत्या विचारानेच मी रस्त्याला लागते. त्यात बरोबर कोणीही नाही म्हणजे पर्वणीच. त्यातून विमानप्रवास म्हणजे घरातून निघून घरात पोचेतो चोवीस पासून तीस तासांपर्यंतचा मुबलक वेळ पूर्णतः माझ्या मालकीचा ... खरे तर मनाच्या ताब्यात. मी त्याला मुक्त सोडून देते.... जिथे ते नेईल तिथे मी पिसासारखी हलकी होत होत घरंगळत राहते. अंतरंगात कुठेतरी खोलवर गाडलेल्या काही नोंदी, एकेकाळी जीवाभावाची असलेली माझी माणसे. आता हाकेच्या अंतरापलीकडे गेलेले बालपण. कॉलेजमधली धमाल... आणि बरेच काही. ज्यांच्यावाचून मला जगणे कठीण आहे अशी, माझ्यासाठी जीवही देणारी प्रेमाची माणसे. सारे सारे मोकळा श्वास घ्यायला, पुन्हा एकदा भरभरून माझ्या अंतरंगात जगायला अहमिकेने पृष्ठभागावर येतात.

अशीच एकदा नवऱ्याला टाटा करून डेट्रॉईट वरून निघाले. बाबांना बरे नाहीये हे कळल्याने घाईघाईतच मायदेशी निघाल्याने वाचायला छानसे काहीतरी घ्यायला विसरले. त्यात माझ्या समोरच्या पर्सनल टीवीच्या अंगात आलेले. असहकार पुकारून त्याने ताणून दिलेली. नॉर्थवेस्टने जेवण बरे दिले, विचार केला एक झोप काढावी.

किंचित गुंगी चढायला लागली तोच पुढून आवाज ऐकू येऊ लागले, " नमस्ते स्वामीजी। आप को कोई कष्ट तो नही?" जरा नजर उंचावून पाहिले तर एक मायावतीची सख्खी बहीण शोभावी अशी अंमळ जास्तच तंदुरुस्त संन्यासिनी दिसली. गळ्यात ह्या मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा. केसांचा नारदमुनी. ती इतकी गोलमटोल होती ना की तिचा गरगरीत कलिंगडांसारखा चंद्रमा व त्यावर हा नारदमुनी बुचडा त्याला गुंडाळलेल्या रुद्राक्षाच्या माळा... खासंच दिसत होती. अंगावर भगवी कफनी, अन पायात चक्क हाय हिल्स. हे काय भलतेच.

आता ह्या वेषाला साजेसे म्हणजे खडावा असताना हिने हिल्स घातलेल्या. मला उगाच मोह झाला हिची कफनी जरा उचलून पाहावी. नक्की सांगते कफनीच्या आत मस्त पंजाबी किंवा पँट-टॉप असेल. स्वतःच्या हाताला थप्पड मारून गप्प बसवले. तेवढ्यात स्वामीजींचा आवाज ऐकू आला, " बालीके हम संतुष्ट, प्रसन्न हैं। आप चिंता न करे। " अरे वा! स्वामीजींचा आवाज धीरगंभीर होता. पण जरा तरुणच वाटला. ते दिसत नसल्याने उगाच उत्सुकता वाढली. नंतर त्यांचे काहीच संभाषण ऐकू आले नाही. म्हणजे बहुतेक दोघांची समाधी लागलेली असावी. मग नकळत मीही केव्हानूक झोपून गेले.

अमस्टरडॅमला फक्त एक तास वीस मिनिटांचा हॉल्ट होता. त्यामुळे पुढे मुंबईला जाणाऱ्या लोकांना जेमतेम रेस्टरूम मध्ये जाऊन फ्रेश होण्याचा वेळही कसाबसा मिळाला. लागलीच आम्ही सगळे सिक्युरिटीच्या रांगेत उभारलो. आठ-नऊ तास एका जागी बसून पाय अवघडलेले फार वाटत होते किमान पंधरा मिनिटे चालावे पण इलाजच नव्हता. सारखा प्रवास करून करून कुठल्या विमानतळावर काय प्रश्न विचारतात हे आताशा तोंडपाठ झाले आहे. म्हटले चला आता पुन्हा एकदा नऊ तासांची खिंड लढवली की आमच्या मुंबईचे दर्शन होणार. रांग बरीच मोठी होती शिवाय उद्योग काही नव्हता म्हणून आजूबाजूला नजर गेलीच. आणि स्वामिजी दिसले...

कालची उत्सुकता शमली नव्हतीच त्यामुळे.... अंदाज बरोबर होता. स्वामिजी अगदीच तरुण... खरंतर पोरगेलेसेच होते. जवळ जवळ पावणेसहा फूट उंच. अतिशय गौर वर्ण, चकाकती त्वचा ( उगाचच वाटून गेले, फारच साजूक पदार्थ सेवन करत असावेत. ). खांद्यावर रुळणारे कुरळे, लाटांसारखे केस. अंगावर कफनी, रुद्राक्षाच्या दोनच माळा, पायात खडावा. अंगकाठी कृश पण तुडतुडीत. डोळे पिंगट-तेज असलेले. चेहऱ्यावर अतिशय प्रसन्न, निर्मळ हास्य. आवाज संतुलित होता. त्यांच्या हालचाली, बोलणे , हावभाव पाहून सारखे वाटत राहिले हे सगळे आरशासमोर उभे राहून घोटले आहे.
स्वामिजी व शिष्या दोघेही लाईनीत उभे होतेच.

रांग सरकत सरकत एकदाचा ह्या दोघांचा नंबर आला. तुम्ही दोघेही बरोबर आहात का? असे चेकिंग करणाऱ्याने विचारताच, स्वामिजी म्हणाले, " श्रीमान संपूर्ण जगच माझ्याबरोबर आहे. " ( हे सगळे संवाद आंग्ल भाषेत चाललेले होते. ) तो नेदरलँडचा माणूस हे ऐकताच एकदम बावचळलाच. त्याचे इतरही चार-पाच सहकारी कान टवकारून ऐकू लागले. रांगेत उभे असलेली ८०% माणसे आपलीच त्यांच्याही नजरा व कान आता स्वामीजींना चिकटले.
चेकींगवाल्याने आता स्वामिजी व शिष्या यांना त्याच्या डेस्कपाशी नेले. ( छोटी छोटी स्टँडीग डेस्क तिथेच बनविलेली असतात. तिथे प्रश्न विचारले जातात. ह्यांवर मॉनिटरींग करण्यासाठी एक चीफ ऑफिसर फिरत असतो. )

चेकींगवाल्याला आपण जॉन म्हणूयात....

जॉनः कुठल्या विमानाने आपण आलात?
स्वामीजी: 747 ने आलो.
जॉनः नो नो... म्हणजे कुठून आलात असे विचारतोय?
स्वामीजी: डेट्रॉईट वरून आलो.
जॉनः किती वेळ झाला? इथे आल्यावर सगळा वेळ काय केलेत?
स्वामीजी: तू इथला कर्मचारी ना? म्हणजे आमचे विमान कधी आले ते तुला माहीत असेलच. इथे आल्या आल्या तुझ्या रांगेत उभे राहिलोत.
जॉनः हे सामान तुमचे आहे का? रेस्टरुम मध्ये गेला होता का? जर गेला असाल तर सामान कुठे ठेवले होते त्यावेळी?
स्वामीजी: मी दुसऱ्याचे सामान कशाला घेऊ? असेही सामान हा मोह आहे. तो कमीतकमी असावा माणसाला. ( आता सगळे गालातल्या गालात हसू लागले होते. ) रेस्टरूम मध्ये गेलो होतो तर. शरीराची हाक प्रथम ऐकायला हवी . सामान ह्या माझ्या शिष्येजवळ ठेवले होते.
शिष्या गडबडीने काहीतरी बोलू पाहत होती. तर जॉन ने तोंडावर बोट ठेवत तिला चूप केले. ( स्वतःच्या तोंडावर बोट ठेवून....
)
जॉनः बरं महोदय आता आपण कुठे जाणार आहात?
स्वामीजी: तू कुठल्या विमानात जाणाऱ्या माणसांची तपासणी करतो आहेस त्या विमानात. ( आता सगळ्यांची खात्री पटत चालली होती की स्वामी मिश्किल आहेच, ते व जॉन एकमेकांची खेचत आहेत व लोकांची करमणूक होतेय हेही त्यांना कळतेय. कारण उत्तर दिले की स्वामिजी एक नजर आम्हा सगळ्यांकडे टाकत व हसत. )
जॉन: आता शेवटचा प्रश्न..... ह्या बॅगेत काय आहे?
स्वामीजी: माझे सामान आहे.
जॉनः म्हणजे काय ते सांगू शकाल का? ते बॅगेत तुम्हीच भरले आहे का?
स्वामीजी: मी अंदाजे सांगू शकतो. पण ते मी भरलेले नाहीये. माझ्या सेवेसाठी असलेल्या शिष्यांनी भरले आहे. ( इथे त्यांच्या शिष्येने कपाळावर हात मारून घेतला. स्वामीजींचे सत्य कथन आता महागात पडणार की काय ह्या शंकेने तिने पुन्हा तोंड उघडले. लागलीच जॉनचे बोट ओठांवर गेले, डोळे मोठे झाले. )
जॉनः ओह.... म्हणजे किती जणांनी? ते तुमची बॅग भरत असताना तुम्ही कुठे होतात व काय करत होतात?
स्वामीजी: दोघींनी..... ( शिष्येकडे वळून का तिघींनी गं? त्यावर तिने खुणेनेच दोन बोटे दाखवली. जॉनच्या दटावणीने आता तिने ओठांची हालचालही केली नाही. ) भरलेय. मी ना होतो त्यांच्या जवळपासच.
जॉनः किती वेळ लागला सामान भरायला?
स्वामीजी: दोन दिवस. ( केबिन लगेजची बॅग भरायला दोन दिवस लागले म्हटल्यावरच बरेच जण फुसकन हसले. )
जॉनः मग ते दोन दिवस तुम्ही रूम मधून कुठेच गेला नाहीत?
स्वामीजी: अरे तू वेडा आहेस का? दोन दिवस मी कसा बरे राहणार त्या रूममध्ये? कमीतकमी बार-पंधरा वेळा रेस्टरूम मध्ये गेलो. चार वेळा जेवलो. प्रार्थनेला गेलो..... वगैरे बरीच यादी वाचली स्वामीजींनी.
जॉनः ( त्याला आता हसू दाबता येत नव्हते. सहकारी तर मस्त एन्जॉय करत होते. पण वेळ फार कमी होता व रांगेत अजून बरीच लोकं होती. त्यामुळे त्याने आवरते घ्यावे ह्या विचाराने .... ) बरं स्वामिजी आता पटकन सांगा बरे बॅगेत काय आहे?
स्वामीजी: सांगू? त्यापेक्षा असे करतो, सगळी बॅगच इथे उपडी करतो मग तूच घे पाहून. असे म्हणत स्वामीजींनी खरेच बॅगेची चेन काढली आणि आता ते बॅग ओतणार तोच.....
जॉन चा साहेब पळत आला. म्हणाला....., " You are good to go. Have a nice trip and enjoy our hospitality. " आणि त्याने स्वामीजींना चक्क नमस्कार केला.

आम्ही सगळे सोपस्कार पार पाडून एकदाचे शेवटच्या लॉऊंज मध्ये आलो तसे स्वामिजी पटकन म्हणाले, " देवीयों और सज्जनो आशा हैं आपका समय आनंदमय व्यतीत हुआ होगा. इस बहाने आप थोडा हस लियें और हम भी आपके जहन मे बस गए. शुभं भवतु॥ " गंमत म्हणजे सगळ्यांनी उस्फुर्तपणे हलक्याश्या टाळ्या वाजवल्या. स्वामीजींचे म्हणणे खरेच होते.... सगळ्यांच्या स्मरणात.......

12 comments:

  1. हा!!हा!!हा!!...छान अनुभव आहे..:-)

    ReplyDelete
  2. मी दर ५ आठवड्यानी ३०-३६ तास खिंड लढवत मुंबई ते मेक्सिको / अमेरिका असा प्रवास करतो. असे एक एक भन्नाट किस्से पहायला मिळतातच. पण हा स्वामींचा किस्सा भारी आहे एकदम ... :)

    बरं.. भानस नावाचा नेमका अर्थ काय??? शिवाय मी तुम्हाला नेमकी हाक काय मारावी हा मला प्रश्नच आहे ... :)

    ReplyDelete
  3. प्रसाद...आभार.:)गडबड जास्तीच दिसतेय तुझी...अमेरिका पाहणे सुरू आहे ना?

    रोहन, काय सांगतोस? लकी आहेस तू.
    भानस म्हणजे....भाग्यश्री नचिकेत सरदेसाई. ( भाग्यश्री हे नाव आधीच घेऊन झालेले ना म्हणून मग शेवटी हे घेतले...:( ) तू मला भाग्यश्री म्हण...:)

    ReplyDelete
  4. एकदम मस्त... मजा आली वाचताना....

    ReplyDelete
  5. फ़ारच छान अनुभव आहे.........वाचताना मजा आली !!

    ReplyDelete
  6. Too good. Well, my in-laws are devoteed of Shankar Maharaj.

    ReplyDelete
  7. भानस,
    काही वेळेस हे अधिकारी खुप (चामभर) चौकशी करत बसतात...तय वेळेस ह्या स्वमिजिं सारखा कोणी शेरास सवा शेर भेटला की मजा येते....अणि त्यातला त्यात प्लनेचा प्रवास जो १ ते २ दिवसांचा असेल तर ह्या प्रकारचा विरंगुला हवाच हवा..
    शुभं भवतु....

    ReplyDelete
  8. अच्छा..अच्छा.. असं आहे होय... :) नको पण मी भानसताई किंवा भाग्यश्रीताई हाक मारीन. एकेरी बरोबर वाट नाही ना... बाय द वे.. येत्या ३० ला अजून एकदा खिंड लढवायला तयार झालो आहे मी... :)

    ReplyDelete
  9. रोहिणी,उमा,गणेश आभार. तुम्ही म्हणता ते खरेच आहे गणेश, कधी कधी हे अधिकारी उगाचच पोस्टचा गैरवापर करतात. असो.

    Harekrishnaji, धन्यवाद.शंकर महाराजांचे आम्हीही total devotee :)

    रोहन,भाग्यश्रीताई म्हण...:(ताई,माई,अक्का...इथे आल्यापासून हे विसरून गेलेय....सगळेजण First Nameनेच हाक मारतात ना.)
    अरे आत्ताच तर गेला होतास ना? लागलीच परत?:)

    ReplyDelete
  10. छान अनुभव कथन..
    मला वाटलं ती bag ओतल्यावर अंमली पदार्थ वगैरे निघतात की काय? (हिंदी चित्रपटांप्रमाणे)
    keep it up!!:)

    ReplyDelete
  11. फारच छान लिहिता तुम्ही, तुमचे सर्वच लेख वाचनीय असतात. वाचताना मजा येते.
    असेच लिहीत राहा. धन्यवाद.

    ReplyDelete
  12. मुग्धा, अमित तुम्हाला आवडले.... माझा उत्साह वाढला. धन्यवाद. असाच लोभ ठेवा.

    ReplyDelete

आपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.

आपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार !